तालिबानने महिला विद्यार्थिनींचे पंख कापले

शिक्षणासाठी अफगाणिस्तानच्या महिला विद्यार्थ्यांच्या परदेश प्रवासावर बंदी; महिलांची परिस्थिती दयनीय

  • टीम बाईमाणूस

अफगाणिस्तानात सत्तेमध्ये येताना आंतरराष्ट्रीय समुदायाला दिलेल्या आश्वासनांपैकी एका महत्वाच्या आश्वासनाला पायदळी तुडवताना शिक्षणासाठी कतार आणि कझाकिस्तान मध्ये जाऊ इच्छिणाऱ्या महिला विद्यार्थिनींना तालिबानने परदेश प्रवासाची परवानगी नाकारली आहे. तालिबान प्रशासनाने पुरुष विद्यार्थ्यांना मात्र शिक्षण सुरु ठेवण्यासाठी परदेशात जाण्याची परवानगी दिलेली असून महिलांच्याबाबत मात्र अजूनही तालिबान आपल्या जुन्याच रूढीवादी आणि कर्मठ विचारांनी ग्रस्त असल्याचे दिसून येत आहे. अफगाणी महिलांना एखादा पुरुष नातेवाईक सोबत असल्याशिवाय घराबाहेर पडण्यावरही तालिबानने याआधीच बंदी घातलेली आहे. ज्या महिलांनी यापूर्वी अधिकृत पदे भूषवली आहेत, त्यांना त्या पदांसाठी त्यांच्या घरातील पुरुषांना नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महिला विद्यार्थिनींना सहाव्या इयत्तेनंतर शाळा, महाविद्यालये किंवा विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्याची परवानगी नाही. तालिबानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही महिलांना पूर्ण शरीर झाकणारा बुरखा घालण्याचे आदेश दिले आहेत.

अफगाणिस्तानच्या शाळांना आता कायद्यानुसार लिंग-आधारित वर्गीकरण आणि विभाजन करणे आवश्यक आहे. तालिबानची सत्ता आल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये बालविवाहाचे प्रमाणही वाढले आहे. महिलांच्या सुरक्षिततेच्या नावाखाली तालिबानचा महिला मंत्रालय महिलांचे शोषण करत आहे. एशियन न्यूज इंटरनॅशनल या वृत्तसंस्थेनुसार, काही तालिबानी अधिकाऱ्यांनी महिलांना स्मार्टफोन वापरण्यास मनाई केली आहे. महिलांनी काढलेला एक मोर्चा थांबविण्यासाठी तालिबान्यांनी निःशस्त्र महिलांवर हल्ला केल्याचाही प्रकार मागे घडला होता. काबुलच्या शैक्षणिक मंत्रालयाच्या इमारतीबाहेर अनेक स्त्रिया “भाकरी, काम आणि स्वातंत्र्य” यांची मागणी करण्यासाठी एकत्र जमलेल्या असताना तिथे काही तालिबानी अतिरेकी आले आणि त्यांनी हवेत थेट गोळीबार करून तिथे आलेल्या महिलांना हुसकावून लावले.

या ऑगस्टमध्ये तालिबानने त्यांच्या राजवटीचे पहिले वर्ष साजरे केले. आम्ही अफगाणिस्तानातील सामान्य लोकांना दिलेली मदत तालिबान चुकीच्या कारणासाठी वापरू शकते अशी भीती व्यक्त करून आंतरराष्ट्रीय समूहांनीदेखील अफगाणिस्तानची मदत करण्यास नकार दिलेला आहे. स्थानिकांचा दावा आहे की तालिबान महिलांना स्मार्टफोन वापरण्यास मनाई करतात आणि महिला व्यवहार मंत्रालय महत्त्वपूर्ण सुरक्षा प्रदान करण्याच्या बदल्यात वारंवार पैशाची मागणी करते. असे म्हटले जाते की देशातील सुमारे 18 दशलक्ष महिला आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक हक्कांसाठी लढा देत आहेत. या अहवालानुसार, प्रसारमाध्यमांमध्ये काम करणाऱ्या अंदाजे 80% महिलांनी आपला रोजगार गमावला आहे.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here