बुरख्यानंतर आता ‘बुर्किनी’वर बंदी

फ्रान्स हा अत्यंत सेक्युलर असा देश. स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांवर ठाम विश्वास असलेला. आज मात्र बुर्किनी नामक वस्त्रावर बंदी घालून हा देश मुस्लीम कट्टरतावाद्यांच्या रांगेत जाऊन उभा राहिला आहे.

टीम बाईमाणूस / 27 जून 2022

बुरखा आणि बिकिनी या दोन शब्दांपासून ‘बुर्किनी’या शब्दाने जन्म घेतला. बुर्किनी हा पोहण्याच्या वेळी घालण्याच्या पोशाखाचा एक प्रकार आहे. कडव्या इस्लाममध्ये महिलांना सार्वजनिक ठिकाणी पोहण्यास बंदी असताना बिकिनी घालून पोहणे ही बाब दुरापास्तच. त्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियातल्या अहेदा झनेट्टी (Aheda Zanetti) या लेबनन फॅशन डिझायनर महिलेनं फक्त हात, पाय आणि तोंड उघडे ठेवणारा स्वीमिंग सूट तयार केला. हा पोशाख साधारणपणे बुरख्यासारखाच दिसतो. पण पोहण्यासाठी तो सोयीस्कर असतो. तर याच बुर्किनीवरून फ्रान्समध्ये पुन्हा एकदा वादविवादाला सुरूवात झाली आहे. जवळपास सहा वर्षांपूर्वी अर्थात 2016 मध्ये युरोपमध्ये बुर्किनी प्रकारावरून मोठा वाद निर्माण झाला होता. अत्यंत सेक्युलर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फ्रान्समधील अनेक भागांमध्ये बुर्किनीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या मुद्द्यावरून फ्रान्सवर आंतरराष्ट्रीय पातळीवर टीकेच्या केंद्रस्थानी आला होता. आता तब्बल सहा वर्षांनी पुन्हा एकदा बुर्किनीचं भूत फ्रान्सच्या मानगुटावर बसलं असून त्यावरून मोठी चर्चा सुरू झाली आहे.

फ्रान्स हा अत्यंत सेक्युलर असा देश. स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांवर ठाम विश्वास असलेला. आज मात्र बुर्किनी नामक वस्त्रावर बंदी घालून हा देश मुस्लीम कट्टरतावाद्यांच्या रांगेत जाऊन उभा राहिला आहे.

बुर्किनीवरून पुन्हा का सुरू झाला फ्रान्समध्ये वाद?

बुर्किनी पोशाखामुळे निर्माण झालेल्या वादामुळे फ्रान्समध्ये न्यायपालिका विरुद्ध प्रशासन असा संघर्ष निर्माण झाला आहे. 2021 मध्ये बुर्किनीवरील बंदीच्या विरोधात अनेक मुस्लीम संघटनांनी मोर्चे काढले होते. त्यानंतर महिन्याभरापूर्वीच फ्रान्समधील ग्रेनोबल शहर पालिकेनं सर्व प्रकारच्या स्वीमसूटला सार्वजनिक स्वीमिंग पूलमध्ये परवानगी देण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, महिन्याभरानंतर 21 जून रोजी फ्रान्समधील सर्वोच्च प्रशासकीय न्यायालयाने हा निर्णय रद्दबातल ठरवून बुर्किनीवर असणारी बंदी कायम ठेवली आहे. निकाला देताना न्यायालयाने असे सांगितले की, सार्वजनिक ठिकाणी बुर्किनी घातल्याने धर्मनिरपेक्षतता तत्वांचे उल्लंघन होईल. फक्त धार्मिक भावनांची काळजी घेण्यासाठी आम्ही कायद्यामध्ये अपवाद करू शकत नाही. बुर्किनीला परवानगी दिल्यास सर्वांना समान वागणुकीच्या तत्वाला हरताळ फासला जाईल. तसेच, सर्वांसाठी तटस्थपणे सार्वजनिक सेवा-सुविधा पुरवण्याचं उद्दिष्ट देखील यातून साध्य होत नाही”, असे न्यायालयाने म्हटले आहे.

फ्रान्समध्ये सार्वजनिक ठिकाणी पोहण्याच्या वेळी कोणत्या प्रकारचा पेहेराव करावा, यासंदर्भात निश्चित असे नियम आहेत. फ्रान्समधील प्रशासनाच्या मते शारिरीक स्वच्छता डोळ्यांसमोर ठेवूनच सार्वजनिक स्वीमिंग पूलमध्ये वापरण्याच्या कपड्यांविषयी निश्चित असे नियम ठरवण्यात आले आहेत. यासंदर्भात पुरुषांनी देखील कोणते कपडे घालू नयेत, याचे नियम ठरवून दिले आहेत.

विशेष म्हणजे बुरख्यावर बंदी घालणारा फ्रान्स हा युरोपमधला पहिला देश होता. यासंदर्भातले फ्रान्समधील कायदे हे धर्मनिरपेक्षतेचं तत्व आणि धर्म व राज्य यांचे कार्यक्षेत्र स्वतंत्र ठेवणे या गोष्टी डोळ्यांसमोर ठेवून बनवण्यात आले आहेत. त्यामुळेच टर्बन, हिजाब, स्कल कॅप अशा गोष्टी शाळा किंवा कार्यालयांमध्ये घालण्यास फ्रान्समध्ये बंदी घालण्यात आली आहे.

कडव्या इस्लाममध्ये महिलांना मुळात सार्वजनिक ठिकाणी पोहण्याचीच बंदी. त्यांचे तर नखही दिसता कामा नये म्हटल्यावर बिकीनी हा पोशाख त्यांच्यासाठी तौबाच. तेव्हा ऑस्ट्रेलियातील अहेदा झनेट्टी या लेबनानी वस्त्र-अभिकल्पकार महिलेने हा फक्त हात- पाय- तोंड उघडे ठेवणारा पोहण्याचा पोशाख तयार केला. साधारणत: बुरख्यासारखा दिसणारा, पोहण्यास सोयीस्कर असा. मुस्लीम महिलांना तो पटला. सलाफी इस्लामने, आयसिसने मात्र या पोशाखास तीव्र विरोध दर्शविला असून काही इस्लामी देशाने त्यावर बंदी घातली होती. फ्रान्समध्येही आधीपासूनच या पोशाखाला विरोध होता. याचे कारण हिजाबप्रमाणेच हा पोशाख फ्रान्स या राष्ट्राची नतिक मूल्ये आणि सेक्युलर विचारधारेच्या विरोधात असल्याचे अनेकांचे मत आहे.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here