तरुणांना बातम्या नकोत!

एकूण 46 देशांमध्ये ऑनलाईन प्रश्नावलीच्या माध्यमातून केलेल्या या सर्वेक्षणामध्ये 'बहुतांश सामान्य नागरिक आणि पत्रकारितेचे नाते अधिकाधिक कमकुवत होत असल्याचे' समोर आले आहे

टीम बाईमाणूस / 15 जून 2022

2022 मध्ये रॉयटर्स (Reuters) या वृत्तसंस्थेने डिजिटल बातम्यांबाबत केलेल्या एका सर्वेक्षणात (2022 Reuters Institute Digital News Report) असे समोर आले आहे की जगभरात बातम्यांची आणि एकूणच पत्रकारितेची विश्वासार्हता कमी होत आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तरुण बातम्यांवर विश्वास ठेवत नाहीत आणि बातम्या वाचण्याचे टाळतात. जगभरातील विविध देशांमध्ये कशा पद्धतीने बातम्या वाचल्या किंवा पहिल्या जातात याचा वार्षिक अभ्यास या अहवालात रॉयटर्स तर्फे करण्यात येतो. एकूण 46 देशांमध्ये ऑनलाईन प्रश्नावलीच्या माध्यमातून केलेल्या या सर्वेक्षणामध्ये ‘बहुतांश सामान्य नागरिक आणि पत्रकारितेचे नाते अधिकाधिक कमकुवत होत असल्याचे’ समोर आले आहे.

यामध्ये लोकांचा बातम्यांवरचा विश्वास ढासळत चालला असून, पारंपरिक माध्यमांचा बातम्या वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी वापर देखील खालावत चालला आहे असं लक्षात आलं आहे, पण असं असलं तरीही ऑनलाईन आणि समाज माध्यमे (Social Media) देखील बातम्या आणि वाचक-दर्शकांमध्ये निर्माण झालेली ही पोकळी भरून काढण्यास असमर्थ असल्याचे देखील या अहवालात सांगितले आहे. एवढेच नाही तर जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये ‘बातम्या वाचण्याचे किंवा पाहण्याचे टाळणाऱ्यांचे’ प्रमाण देखील लक्षणीय संख्येने वाढले असल्याचे आढळून आले आहे. वाचकांच्या या बातम्या टाळण्याच्या प्रवृत्तीला रॉयटर्स ‘निवडक पद्धतीने टाळणे’ असे म्हणत आहे. बातम्या टाळण्याचे नेमके कारण सांगताना 43% नागरिकांनी “कोवीडच्या काळात आणि राजकारणाच्या संदर्भात त्याच त्याच बातम्या परत परत दाखवल्या जात असल्याने आम्ही निराश झालो आहोत”, असे सांगितले तर 29% लोकांनी “आम्ही बातम्यांना कंटाळलो आहोत”, असे सांगितले. बातम्यांवर विश्वासच नसल्याने बातम्या टाळणाऱ्यांची संख्या देखील 29% एवढी होती. या अहवालात सहभागी झालेल्या सुमारे एक तृतीयांश म्हणजेच 36% लोकांनी ज्यामध्ये प्रामुख्याने 35 वर्षांखालील तरुणांचा समावेश होतो असे सांगितले की “बातम्यांमुळे आमचा ‘मूड’ खराब होतो”, तर 17% लोकांनी बातम्यांमधून भांडणं होतात म्हणून आम्ही बातम्या वाचत नसल्याचे सांगितले आणि 16% लोकांनी बातम्या वाचल्यानंतर परिस्थितीपुढे आम्ही हतबल वाटतो आणि या नको असलेल्या हतबलतेला टाळण्यासाठी आम्ही बातम्याच वाचत नाही असे सांगितले.

मोबाईल केंद्रित बाजार

भारतातील एशियन पत्रकारिता महाविद्यालयाच्या (ACJ) संयुक्त विद्यमाने रॉयटर्सने एका ठराविक परिसरात केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले की, ‘भारत हा एक प्रचंड मोबाईल केंद्रित बाजार आहे’ या अभ्यासात असे आढळून आले की या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांपैकी तब्बल 72% लोक बातम्या वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी मोबाईलचा वापर करतात तर 35% लोकांनी बातम्यांसाठी आम्ही संगणकाचा वापर करत असल्याचे सांगितले. त्याचबरोबर यातील 84% लोक बातम्या ऑनलाईन वाचणे आणि पाहणे पसंद करतात तर यापैकी 63% लोक सोशल मीडिया म्हणजेच समाज माध्यमांवर दाखविल्या जाणाऱ्या बातम्या पाहतात किंवा वाचतात, बातम्या पाहण्यासाठी 59% लोक टीव्हीचा वापर करतात तर या सर्वेक्षणातील 49% लोक मुद्रित माध्यमांचा म्हणजेच वर्तमानपत्राचा वापर करतात अशी माहिती समोर आली आहे.

सोशल मीडिया कंपन्यांपैकी बातम्यांसाठी 53% लोक यूट्यूबचा (YouTube) आणि 51% लोक व्हाट्सअप (WhatsApp) या समाजमाध्यमांचा वापर करत असल्याची माहिती आहे. भारतातील प्रतिसादांचा विचार केला तर अजूनही लोकांचा काही निवडक प्रस्थापित मुद्रित आणि दृकश्राव्य माध्यमांवर विश्वास असल्याचे समोर आले आहे मात्र या ‘माध्यमांमध्ये कुठलाही राजकीय किंवा व्यावसायिक हस्तक्षेप किंवा प्रभाव नाही’ असे मानणाऱ्यांची संख्या अनुक्रमे 36% आणि 35% असल्याची माहिती या सर्वेक्षणाच्या अहवालात दिलेली आहे. या अहवालाचा विचार केला तर यामध्ये सहभागी झालेले लोक हे प्रामुख्याने इंग्रजी बोलणारे तरुण होते त्यामुळे भारतातील सामान्य नागरिकांच्याबाबत या अहवालावरून स्पष्ट माहिती मिळत नाही.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here