प्राणघातक हल्ल्यानंतर वादग्रस्त लेखक सलमान रश्दी व्हेंटिलेटरवर

महासत्ता अमेरिकेतही बुकर पुरस्कार विजेत्या लेखकावर जीवघेणा हल्ला

  • टीम बाईमाणूस

अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधल्या शिटाक्वा इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलत असताना ज्येष्ठ साहित्यिक सलमान रश्दी यांच्यावर हादी मातर नावाच्या हल्लेखोराकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. हल्लेखोराला न्यूयॉर्क पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची ओळख पटल्याची माहिती न्यूयॉर्क पोलिसांनी दिलीय. सलमान रश्दी यांच्यासाठी काम करणाऱ्या अँड्र्यू विली यांनी सांगितले की सध्या त्यांची तब्येत गंभीर असून. त्यांची वाचा गेली आहे आणि सलमान रश्दींच्या एक डोळाही या हल्ल्यामुळे निकामी होऊ शकतो. ते म्हणाले, “त्यांच्या जठरात चाकू खुपसला गेलाय तसेच त्यांच्या दांडाजवळच्या मज्जातंतूंचे मोठे नुकसान झाले आहे आणि त्यांची प्रकृती फारशी चांगली नाही.

सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या या हल्ल्याचा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी ट्विट करत निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले की, “मागील 33 वर्षांपासून सलमान रश्दी यांनी स्वातंत्र्यासाठी आवाज उठवला आहे. विखारी व्यक्तींच्या हल्ल्याला ते बळी पडले आहेत. त्यांचा लढा हा आमचा लढा आहे. आम्ही त्यांच्याबरोबर आहोत.

द सॅटनिक व्हर्सेस‘ या वादग्रस्त पुस्तकाचे लेखक असणाऱ्या सलमान रश्दींना यापूर्वीही अनेकवेळा जीवे मारण्याच्या धमक्या आलेल्या होत्या. रश्दी काल न्यूयॉर्कमधल्या एका खुल्या सभागृहामध्ये बोलत होते तेंव्हा अचानक हल्लेखोर त्यांच्या दिशेने धावत आला आणि त्याने रश्दी यांच्यावर हल्ला केला. सुरुवातीला त्याने सलमान रश्दींना ठोस मारला आणि धारधार शास्त्राने भोसकलं. या हल्ल्यानंतर त्या सभागृहात उपस्थित लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. या कार्यक्रमाचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एकाने दुरून रेकॉर्ड केलेल्या या व्हीडिओमध्ये या हल्ल्यानंतर उडालेला गदारोळ दिसून येतोय. यादरम्यान हल्लेखोराने सलमान रश्दी यांच्यासोबत उपस्थित असलेल्या आणखी एका व्यक्तीवरही हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी आतापर्यंत एका पुरुष संशयित हल्लेखोराला ताब्यात घेतलं आहे. हल्ल्यानंतर जखमी अवस्थेतील सलमान रश्दींना स्थानिक हॉस्पिटलमध्ये एअर अॅम्ब्युलन्सने नेण्यात आलं.

सलमान रश्दी यांचा जन्म भारतात झाला. त्यांच्याकडे सध्या ब्रिटिश आणि अमेरिकन नागरिकत्व आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे खंदे पुरस्कर्ते असलेले साहित्यिक, अशी त्यांची जगभर ओळख आहे. 1981 साली प्रकाशित झालेल्या ‘मिडनाईट चिल्ड्रन्स‘ या पुस्तकानंतर ते प्रसिद्धीस आले. या पुस्तकाच्या जगभरात लाखोंच्या पटीत प्रति विकल्या गेल्या. याच पुरस्कारासाठी त्यांना मानाच्या बुकर पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

वादग्रस्त ‘द सॅटनिक व्हर्सेस’ पुस्तकाबद्दल

सलमान रश्दी यांनी लिहिलेलं ‘द सॅटनिक व्हर्सेस’ हे वादग्रस्त पुस्तक 1988 मध्ये प्रकाशित करण्यात आलेलं होतं. हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर इराणचे राष्ट्राध्यक्ष अयातुल्ला खोमेनी यांनी मुस्लिम समुदायातील लोकांना सलमान रश्दींना मारून टाकण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर अनेक देशांनी त्यांच्या या पुस्तकावर बंदी घातली होती या देशांच्या यादीत भारताचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे या भारतात जन्मलेल्या लेखकाच्या पुस्तकावर बंदी घालणारा भारत हाच पहिला देश होता. मग पाकिस्ताननेही भारताचा कित्ता गिरवला आणि मग विविध मुस्लीम देशांनीही तेच केलं. नंतर दक्षिण आफ्रिकेनेही या पुस्तकावर बंदी घातली.

मुस्लीमबहुल देशांमध्ये या पुस्तकामुळे सलमान रश्दींविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. या पुस्तकातील मजकुरावर ईशनिंदेचा आरोप करण्यात आला होता. या पुस्तकानंतर उसळलेल्या दंगलींमध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला. या पुस्तकाच्या अनुवादकाची सुद्धा हत्या आली होती. हितोशी इग्राशी असं या अनुवादकाचे नाव होते. ते सुकाबा विद्यापीठात प्राध्यापक होते. त्यांना विद्यापीठाच्या बाहेर भोसकण्यात आलं आणि त्यांच्या कार्यालयाबाहेर टाकून देण्यात आलं.

या पुस्तकाला ‘व्हाईटब्रेड’ पुरस्कार मिळाला. अनेकांनी पुस्तकाची स्तुतीही केली. मात्र पुस्तकाला विरोधही तितकाच वाढू लागला. दोन महिन्यानंतर लोक रस्त्यावर येऊन आंदोलन करू लागले. काही मुस्लिमांना हे पुस्तक म्हणजे इस्लामचा अपमान वाटला. या पुस्तकातील वेश्यांना मोहम्मद पैगंबराच्या पत्नीचं नाव दिल्याने मुस्लिमांमध्ये संतापाची लाट उसळली. मात्र इराणच्या सरकारने 1998 मध्ये रश्दी यांच्याविरुद्ध काढलेल्या फतव्याला पाठिंबा देणं बंद केलं.

त्यावेळी इंग्लंडमध्ये काही मुस्लीम नेत्यांनी पुस्तकाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली. काहींनी अयातुल्लाह यांना पाठिंबा दिला. तर अमेरिका, फ्रान्स, आणि इतर पाश्चिमात्य देशांनी या फतव्याचा निषेध केला. रश्दींनी मुस्लीमांना झालेल्या त्रासाबद्दल त्यांची माफी मागितली. ते आणि त्यांची बायको पोलीस संरक्षणात राहू लागले. मात्र अयातुल्लाह यांच्यावर त्याचा काही परिणाम झाला नाही. त्यांनी पुन्हा एकदा फतवा काढला. पेंग्विन प्रकाशनाच्या लंडनच्या ऑफिसमध्ये तोडफोड करण्यात आली, न्यूयॉर्क येथील कार्यालयाला धमकी देण्यात आली. मात्र तरीही या कादंबरीची अफाट विक्री झाली. European Economic Community चा भाग असलेल्या देशांनी मुस्लिमांनी केलेल्या आंदोलनाचा निषेध केला. त्यांनी तेहरानमधून त्यांच्या राजदुताला परत बोलावलं.

नंतर रश्दींनी Haroun and Sea of Stories (1990), Imaginary homelands (1991), East-West (1994), The Moor’s last sigh (1995) आणि आणखी काही पुस्तकं लिहिली. Midnight’s children या पुस्तकावर लंडनमध्ये एक नाटक रचण्यात आलं. त्यातही रश्दी यांनी सहभाग नोंदवला. रश्दी यांची चार लग्नं झाली आहेत. त्यांना दोन मुलं आहेत. ते आता अमेरिकेत राहतात. त्यांना 2007 मध्ये नाईट पुरस्कार मिळाला. 2012 मध्ये त्यांनी सॅटनिक व्हर्सेस नंतर झालेल्या आंदोलनाच्या आठवणी पुस्तकरुपाने वाचकांसमोर आल्या.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here