97 वर्षांच्या Johanna करतात जिम्नॅस्टिक!

  • टीम बाईमाणूस

जिमनॅस्टिक (Gymnastic) हेच पहिलं प्रेम असणाऱ्या जर्मनीतल्या जोहाना क्वास (Johanna Quaas) वयाच्या 97 व्या वर्षीही रोज जिमनॅस्टिकचा सराव करतात. विविध स्पर्धांमध्ये सहभागी होतात. जोहाना यांना जगातील सर्वात वृद्ध जिमनॅस्ट (world oldest gymnast) म्हणून ओळखले जाते. वाढत्या वयासोबत काहींचे मन व शरीरही वृद्धत्वाकडे धाव घेत जाते परंतु जोहाना क्वास या जर्मनीतील 97 वर्षांच्या जिमनॅस्टबद्दल असे म्हणणे वावगं ठरेल. आपण वयानं म्हातारी झालो असलो तरी त्यांना आजी म्हणवून घेण्यापेक्षा जिमनॅस्ट म्हणून घ्यायलाच आवडतं. 2012 मध्ये जोहाना यांची ‘गिनीज वर्ल्ड रेकाॅर्ड’मध्ये जगातील सर्वात वयस्क जिमनॅस्ट (Oldest Gymnast) म्हणून नोंद झाली आहे. तेव्हा त्या 87 वर्षांच्या होत्या. आज जोहाना यांची चर्चा होण्याचं कारण म्हणजे गिनीज वर्ल्ड रेकाॅर्डनं त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर त्यांचे ‘फ्लोर ॲण्ड बीम‘ या जिमनॅस्टिकचा प्रकार करतानाचे फोटो शेअर केले. फोटो शेअर करताच फोटोंना 4,400 लाइक्स मिळाल्या. आज वयाच्या 97 व्या वर्षीही जोहाना हौशी स्पर्धांमध्ये भाग घेतात आणि रोज जिमनॅस्टिकचा सराव करतात.

The 94-year-old Johanna Quaas

जोहाना क्वास यांचा जन्म 1925 मध्ये जर्मनीतील सॅक्सोनी येथे झाला. वयाच्या नवव्या वर्षापासून जोहाना खेळतात. पण दुसऱ्या महायुध्दानंतर पूर्व जर्मनीने वैयक्तिक खेळांपेक्षा सांघिक खेळांना महत्व दिलं. त्यामुळे जिमनॅस्टिककडून त्या हॅण्डबाॅल खेळण्याकडे वळल्या. 1954 मध्ये त्यांच्या संघाने ‘ईस्टर्न जर्मन चॅम्पियनशिप‘ जिंकली. पण जिमनॅस्टिक हा त्यांचा प्राण होता. नंतर लग्न झालं, तीन मुलं झाली. वैयक्तिक स्तरावर जिमनॅस्टिकचा सराव सुरुच होता. मुलांना वाढवत असतांनाच त्या जिमनॅस्टिकमध्ये व्यावसायिक पातळीवर प्रशिक्षक म्हणून परतल्या. पण प्रशिक्षण देताना स्पर्धांमध्ये भाग घेण्याची इच्छा त्यांना व्हायचीच. वयाच्या 56 व्या वर्षी त्यांनी जिमनॅस्टिकच्या स्पर्धांमध्ये पुन्हा भाग घ्यायला सुरुवात केली. 2012 मध्ये 87 वर्षांच्या असतांना त्यांची गिनीज वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये जगातील सर्वात वयस्कर जिमनॅस्ट म्हणून नोंद झाली.

वयाची नव्वदी उलटून गेली तरी आपण थांबणार नाही. जोपर्यंत खेळणं शक्य आहे तोपर्यंत खेळणार. आज रोज जिमनॅस्टिक करते म्हणून आपण तरुण आहोत असं जोहाना म्हणतात. आपण चेहेऱ्यानं म्हाताऱ्या दिसत असलो तरी हदयानं तरूणच आहोत असं सांगणाऱ्या जोहाना म्हातारपणात अपघातानं इकडे तिकडे पडू नये म्हणून रोज जिमनॅस्टिकचा सराव करतात. ज्या दिवशी आपण जिमनॅस्टिक थांबवू तो आयुष्याचा शेवटचा दिवस असेल असं सांगणाऱ्या जोहाना स्पर्धा असो नाहीतर नसो रोज जिमनॅस्टिकचा सराव करतात. रोज दुपारच्या जेवणानंतर छोटीशी डुलकी घेणं आणि आहारात वनस्पतीजन्य पदार्थांचा समावेश करणं हा त्यांचा फिटनेससाठीचा नियम आहे. नव्वदीच्या टप्प्यातलं सळसळीत तारुण्य, लवचिकता आणि शरीर चापल्य बघायचं असेल तर जोहाना क्वास यांना जिमनॅस्टिक करताना बघायलाच हवं.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here