पुरुषांच्या तुलनेत ‘Google’कडूनही महिलांना कमी वेतन

लैंगिक भेदभाव खटला निकाली काढण्यासाठी भरावे लागणार 118 दशलक्ष डॉलर

टीम बाईमाणूस / 16 जून 2022

गुगलसारखी जगातली बलाढ्य कंपनीही वेतनाच्या संदर्भात लैंगिक भेदभाव करते असे स्पष्ट झाल्यामुळे सबंध जगभरात याबाबतीत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 21 व्या शतकात महिला पुरूषांसोबत सर्व क्षेत्रांमध्ये काम करत आहेत. असे असतानाही कित्येक ठिकाणी एकाच कामासाठी पुरूषांना महिलांच्या तुलनेत अधिक पगार दिला जातो. जगातील सर्वांत मोठी टेक कंपनी (MNC) असलेल्या गुगलमध्येही अशाच प्रकारची वागणूक दिली जात असल्याच्या आरोपांमुळे ही कंपनी चर्चेत आहे. वेतनाच्या संदर्भात लैंगिक भेदभाव केला असा आरोप करत केली एलिस (Kelly Ellis), होली पीस (Holly Pease), केली विसुरी (Kelly Visuri) आणि हैदी लॅमर (Heidi Lamar) या चौघींनी 2017 मध्ये दाखल केलेल्या फिर्यादीवर तडजोड करायचे मान्य करून गुगलने त्यांना 11.8 कोटी अमेरिकी डॉलर्सची ($) नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले आहे. गुगलमध्ये वेगवेगळ्या 236 पदांवर काम करणाऱ्या 15 हजार 500 स्त्रियांच्या वतीने या चौघींनी गुगलवर दाखल केलेल्या खटल्यामुळे अमेरिकी वेतनपद्धतीत सुधारणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुगल आता सुमारे 15 हजार महिला कर्मचाऱ्यांना 118 मिलियन डॉलर्स ($) एवढी रक्कम देणार आहे.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार (Bloomberg) 2017 मध्ये तीन महिलांनी गुगलवर केस नोंदवली होती. त्यांनी आरोप केला की त्यांना पुरुषांपेक्षा कमी पगार दिला जात आहे, जे कॅलिफोर्नियाच्या समान वेतन कायद्याचे उल्लंघन आहे. पुरुषांच्या पगारात आणि त्यांच्या पगारात $17,000 (रु. 13.3 लाख) पर्यंतचा फरक होता. मात्र, गुगलविरुद्धची ही पहिलीच केस नाही. कमी पगार असलेल्या महिला अभियंत्याच्या तक्रारीवरून कंपनीला गेल्या वर्षी $2.5 दशलक्ष (सुमारे 2 कोटी रुपये) सेटलमेंट करावे लागले. कॅलिफोर्निया डिपार्टमेंट ऑफ फेअर एम्प्लॉयमेंट अँड हाऊसिंग (DFEH) देखील कंपनीच्या महिला कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध होणाऱ्या छळ आणि भेदभावाची चौकशी करत आहे.

महिला भेदभाव प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांनी सांगितले की, गुगल आणि महिला कर्मचारी यांच्यातील समझोत्याला 21 जून रोजी न्यायाधीश मान्यता देतील. पाच वर्षे चाललेल्या या खटल्यानंतर दोन्ही पक्षांनी हा समझोता मान्य केला आहे. गुगलने एका निवेदनात म्हटले आहे की कंपनी पगार देण्यास, कामावर घेण्यास आणि आपल्या कर्मचाऱ्यांचे स्तर वाढविण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे.

गुगलने आरोप फेटाळले

वाटाघाटी करण्यास होकार दर्शवला असला, तरी गुगलने लिंगभेदकरत असल्याचे आरोप फेटाळले आहेत. आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना योग्य वेतन देण्यासाठी कटिबद्ध आहोत. गेल्या नऊ वर्षांमध्ये सर्व कर्मचाऱ्यांना योग्य वेतन, बोनस आणि इक्विटी मिळावी हे सुनिश्चित करण्यासाठी एक कठोर सॅलरी इक्विटी (Salary Equity) विश्लेषण आम्ही करत आहोत; असं गुगलच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आलं.

आता पुढे काय ?

गुगलने तडजोडीची भूमिका घेऊन या चौघींना नुकसानभरपाई देण्याचे मान्य केल्यानंतर आता तज्ज्ञांच्या एका स्वतंत्र यंत्रणेकडून गुगलमध्ये नोकरीवर घेतानाच स्त्री- पुरुषांना समान वेतन कसे दिले जाईल यावर काम केले जाईल. स्वतंत्र कामगार अर्थकारण तज्ज्ञ गुगलच्या वेतन श्रेणीचा अभ्यास करेल. संबंधित खटल्यातील तडजोडीनंतरच्या व्यवहारांवरही स्वतंत्र यंत्रणेकडून लक्ष ठेवले जाईल. गुगल ही कंपनी अगदी पहिल्यापासून तंत्रज्ञान क्षेत्राचे नेतृत्व करते आहे. आता स्त्री समानता या मुद्द्यावरदेखील ते काहीतरी दिशादर्शक करतील आणि यापुढच्या काळात या क्षेत्रात येणाऱ्या स्त्रियांना त्यांच्या नोकऱ्यांमध्ये वेतनादी पातळीवर आणखी समान वागणूक मिळेल अशी आशा आहे, असे होली पीसचे म्हणणे आहे.

हे ही वाचा 👉🏽 जातीयतेचे वारे आता ‘गुगल’मध्येही!

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here