एक गुढ रहस्य सेंटिनल द्वीपचे!

अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहातील सेंटिनली हे शांतताप्रिय लोक आहेत. ते खूप भयानक आहेत असा लोकांचा समज आहे पण तो चुकीचा आहे. त्यांना सर्व जगापासून अलिप्त राहण्याची त्यांची इच्छा असेल तर आपण त्याचा सन्मान करायला हवा

टीम बाईमाणूस / १२ जून २०२२

आजच्या या विज्ञान युगात अजूनही अशा अनेक आदिवासी जमाती आहेत ज्यांचा या प्रगत जगाशी कोणताही संपर्क नाही काहीही संबंध नाही. दक्षिण अमेरिकेत अमेझॉनच्या घनदाट जंगलात, ब्राझील व पेरू देशांमध्ये अशा आदिवासी जमाती राहतात ज्यांच्या बद्दल इतर जगास काहीही माहिती नाही. जेंव्हा युरोपिअन लोकांनी आक्रमण करून इथे नांदत असलेल्या माया, ऍझटेच, इंका संस्कृती (Civilization) नष्ट केल्या तेंव्हा जे काही लोक या विध्वंसातून वाचले व जीव वाचवून जंगलात पळून गेले हे आदिवासी त्यांचेच वंशज आहेत. ५००-६०० वर्षांपासून या जंगलात राहत आहेत. त्यांची जीवनशैली अगदी तीच आहे जी त्यांच्या पूर्वजांची होती. हे लोक शिकार करतात व काही प्रमाणात शेती.

एक स्वयंसेवी संस्था ‘Survival International’ त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयन्त करते. या जमातींना बाहेरच्या जगाशी संपर्क ठेवायचा की नाही ही मर्जी पूणपणे त्या जमातींची आहे. इतकी वर्षे इतर जगापासून विभक्त राहिल्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती प्रगत जगास अनुरूप विकसित झालेली नाही, बाहेरील लोकांशी त्यांचा संबंध आल्यास त्यांना रोगांची लागण होऊ शकते, साधा सर्दीचा विषाणू देखील त्यांच्या निर्वंशास कारण होऊ शकतो. बाहेरील जगास त्यांच्यासुन दूर ठेवण्याचे काम Survival करते. आफ्रिकेतील काँगो नदीच्या खोऱ्यात, आग्नेय आशियात पापुआ न्यू गिनी च्या जंगलात तसेच ऑस्ट्रेलियाच्या वाळवंटात देखील अशाच काही जमातींचे लोक राहतात.

असेच एक आश्चर्य आपल्या भारतात देखील आहे, जगातील सर्वांचे दूरस्थ, एकाकी व सर्वात धोकादायक जमात ही भारतातील आहे. भारताच्या मुख्य भूमीपासून १२०० किमी दूर बंगालच्या उपसागरामध्ये एक बेट आहे ‘उत्तर सेंटिनल द्वीप‘ या बेटाचे क्षेत्रफळ ७२ sq km असून हे बेट अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहाचा भाग आहे. निळेशार पाणी, शुभ्र वाळूचे बीच व घनदाट जंगलाचे आच्छादन असलेले हे एक प्रवाळ बेट आहे. वरवर पाहता सर्व काही शांत दिसते अगदी स्वर्गच.

परंतु इथे एका रहस्यमय आदिवासी जमातीचे लोक राहतात त्यांना सेंटिलनीज म्हणतात. ही पृथ्वीवरील सर्वात धोकादायक जमात म्हणून ओळखली जात असल्याची चर्चा आहे. कोणीही या बेटावर जाण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना बाणांच्या व भाल्याच्या वर्षावास सामोरे जावे लागते. अशीच एक घटना २०१८ साली घडली आणि सेंटिलनीज जमातीबद्दल सबंध जगभरात चर्चा सुरू झाली. उत्तर सेंटिनेल बेटावरील आदिवासी जमातीच्या लोकांनी १६ नोव्हेंबर २०१८ रोजी एका अमेरिकी नागरिकाची हत्या केल्याची माहिती समोर आली. जोन ॲलेन चाऊ (वय २७) असं या अमेरिकी नागरिकाचं नाव आहे. ख्रिश्चन धर्माच्या प्रचारासाठी हा नागरिक तिथे गेला होता. चाऊ याने यापूर्वी अंदमान आणि निकोबारला पाच वेळा भेट दिली होती. सेंटिनेल येथील आदिवासींना भेटण्याची इच्छा मनाशी बाळगून चाऊने या बेटावर जाण्याचा प्रयत्न केला होता. पण, तो अपयशी ठरला. १६ नोव्हेंबर रोजी त्यानं पूर्ण तयारीसह दुसरा प्रयत्न केला. तो यशस्वी सुद्धा झाला मात्र त्या बदल्यात त्याला आपला जीव गमवावा लागला. या बेटावरील आदिवासींनी त्याला बाणांनी मारून समुद्र किनाऱ्यावर दफन केल्याचं सांगितलं जातंय.

ब्रिटिशांच्या काळापासून यांच्याशी संपर्क करण्याचे प्रयत्न झाले परंतु कधीही यश आले नाही. भारत सरकारने १९६७ पासून या बेटावर संशोधन करण्याचा प्रयन्त केला परंतु विशेष काही माहिती हाती आली नाही. १९७४ साली नॅशनल जिओग्राफिकचा एक समूह या विषयावर माहितीपट बनवण्यासाठी गेला असता आदिवासींनी त्यांच्यावर हल्ला केला, त्यांचा दिग्दर्शक दंडात बाण घुसल्यामुळे जखमी झाला व त्यांना प्रयत्न सोडून द्यावे लागले. एकदा तेथील खडकांवर आपटून एक जहाज निकामी झाले, जहाजावरील लोकांना त्यावरील सामान सुद्धा तसेच सोडून द्यावे लागले तेंव्हापासून ते अजूनही तसेच आहे. अगदी अलीकडे २००६ साली दोन मच्छीमार तिथे गेले असता आदिवासींनी त्यांची हत्या केली, जेंव्हा त्यांची मृत शरीरं आणण्यासाठी एक हेलिकॉप्टर पाठवण्यात आले तेंव्हा या लोकांनी ते उतरू दिले नाही.

मानववंश शास्त्रज्ञ डॉ. टी एन पंडित यांनी या बेटावर २० वर्षे संशोधन केले आहे, त्यांना शेती माहीत नाही कारण वरून पाहता शेतीच्या कोणत्याही खुणा या बेटांवर दिसत नाहीत, बेटांजवळ किनाऱ्यावर मिळणारे मासे खाऊन ते जगतात, त्यांना नौकायन माहीत नाही, जंगलातील फळे, कंदमुळे, नारळ व इतर वनस्पती त्यांच्या आहारात असतील तसेच ते शिकार करत असतील पण याबद्दल एकही पुरावा नाही कारण या बेटावर जाताच येत नाही.

टी एन पंडित आपल्या स्वानुभवाने ‘बीबीसी’शी बोलताना सांगतात की, सेंटिनली हे शांतताप्रिय लोक आहेत. ते खूप भयानक आहेत असा लोकांचा समज आहे पण तो चुकीचा असल्याचं ते सांगतात. “आम्ही जेव्हा त्या बेटावर गेलो होतो तेव्हा त्यांनी आम्हाला धमकावलं, पण आम्हाला त्रास होईल किंवा मारलं जाण्यापर्यंत स्थिती गेली नाही. जेव्हाही ते चिडले आहेत असं वाटलं तेव्हा आम्ही तिथून माघार घेतली. 1967 साली पहिल्यांदा पंडित यांनी उत्तर सेंटिनल बेटाला भेट दिली होती. पहिल्यांदा जेव्हा त्यांनी पंडित आणि त्यांच्या समूहाला पाहिलं तेव्हा सेंटिनेल लोक जंगलात लपून बसले. नंतर त्यांनी बाण देखील मारून पाहिले, असं पंडित सांगतात.

त्यांच्याशी ओळख व्हावी म्हणून पंडित यांचे सहकारी त्यांच्यासाठी वस्तू नेत असत. पंडीत सांगतात, “आम्ही त्यांच्यासाठी भेटवस्तू नेल्या होत्या. जसं की भांडी, तवे, शहाळे, हत्यारं, भाले आणि चाकू नेले होते. त्यांच्याशी संवाद साधता यावा म्हणून आम्ही दुसऱ्या जमातीतील तीन जणांना सोबत नेलं होतं. ते ओंज या जमातीतील लोक होते. सेंटिनल काय बोलत आहेत आणि त्यांच्या वागणुकीचा अर्थ काय हे समजून घेण्यासाठी आम्ही त्यांना नेलं होतं, पण आम्हाला पाहून त्यांनी त्यांचे भाले आणि धनुष्य-बाण तयार ठेवले. आपल्या जमिनीचं रक्षण करण्यासाठी ते तत्पर होते. आम्ही नेलेल्या वस्तू तिथेच ठेवल्या आणि परतलो. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा अनेकवेळा प्रयत्न केल्यानंतर 1991 मध्ये ते आमच्याजवळ आले. आम्हाला भेटायला ते का तयार झाले हे कोडं आम्हाला पडलं. पण ते भेटले. ही भेट पूर्णतः त्यांनी जसं ठरवलं त्याप्रमाणे झाली. आम्ही आमच्या बोटीतून बाहेर पडलो आणि गळ्यापर्यंत असलेल्या पाण्यात उतरलो. आम्ही त्यांना नारळं आणि भेटवस्तू दिल्या.

“त्या वस्तू देता देता मी माझ्या सहकाऱ्यांपासून वेगळा झालो. तिथं एक तरुण सेंटिनल आला. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि विचित्र चेहरा बनवला आणि त्याच्याजवळ असलेला चाकू त्याने स्वतःच्या गळ्याजवळ नेला आणि कापण्याचा इशारा केला. तेव्हाच मी समजलो की आपलं तो स्वागत करत नाहीये. त्यानंतर आम्ही तिथून निघालो,” पंडित सांगतात.

“त्यानंतर भारत सरकारनं त्यांना भेटवस्तू पाठवणं बंद केलं. तसंच इतर लोकांना तिथं जाण्यावर बंदी घातली. जर बाहेरचे लोक त्यांच्या संपर्कात आले तर ते त्यांच्यासाठी घातक ठरू शकतं. ताप किंवा गोवरसारख्या आजराशी लढता येईल इतकी रोगप्रतिकारक क्षमता त्यांच्याकडे नाही. “त्यांना सर्व जगापासून अलिप्त राहण्याची त्यांची इच्छा असेल तर आपण त्याचा सन्मान करायला हवा. त्यांच्याकडे जाण्यापूर्वी सर्व सहकाऱ्यांची वैद्यकीय तपासणी केली जात असे. डॉक्टरांनी परवानगी दिल्यानंतरच त्यांना तिथं नेलं जात असे,” अशी माहिती पंडित देतात.

त्यांची संख्या ५० ते ४०० अशी कितीही असू शकते. संशोधनांमधून हे समोर आले आहे की, हे लोक किमान ६०,००० वर्षांपासून या बेटावर राहत आहेत त्यांचा आफ्रिकेत उगम पावलेल्या पहिल्या मानवाशी थेट संबंध आहे, ही एक अश्मयुगीन जमात आहे. आजच्या या अंतरिक्ष युगात पृथ्वीवर एक अश्मयुगीन जमात राहते याची कोणी कल्पना देखील केली असेल का. अंदमानच्या मुख्य बेटांवर ‘जारवा’ जमातीचे लोक राहतात या दोन्ही आदिवासींची जीवनशैली पूर्णपणे भिन्न आहे. सेंटिलीनीज जारवांपासून देखील हजारो वर्षांपूर्वीच विभक्त झालेले आहेत.

भारत सरकारने १९९७ साली सेंटिनल द्वीप आणि त्यापासून आजूबाजूचा ३ किमी चा परिसर ‘Exclusive Zone’ म्हणून घोषित केला आहे. या टापूत जाण्याची कोणालाही परवानगी नाही. इतकेच काय नौदलाची एक बोट या बेटाभवती नियमित गस्त घालत असते. भारत सरकारच्या या धोरणाचे कौतुक वाटते हे त्या आदिवासींच्या अस्तित्वासाठी आवश्यकच आहे. आक्रमण हाच सर्वोत्तम बचाव मानणाऱ्या या लोकांना माहिती तरी असेल का की भारत सरकार आपले रक्षण करीत आहे.

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here