या दुनियेत फार कमी लोक असे असतात, ज्यांना आपण ठेंगणे असल्याचा जराही न्यूनगंड नसतो. असलाच तर अभिमानच असतो. त्या पैकीच एक होती, रुथ वेस्टहाइमर. तिची उंची जेमतेम 4 फूट 7 इंच किंवा वेगळ्या पद्धतीने सांगायचं तर दीडेक मीटर इतकीच. त्यामुळे तिच्या आईवडिलांनी बेडरुममधल्या बुकशेल्फमध्ये उंचीवर ठेवलेली सेक्स संबंधांतली रसाळ पुस्तके, त्यातही त्यातले 'द आयडियल मॅरेज' नावाचे गरमागरम पुस्तक हाताला लागण्यासाठी तिला नेहमीच खुर्चीवर चढावे लागत असे.
मोठे झाल्यावर जेव्हा सरबॉन इथल्या कॉलेजात मानसशास्त्राची पदवी घेण्यासाठी ती दाखल झाली, तेव्हा समोरच्या शिक्षक वा शिक्षिकेला ऐकण्याबरोबरच बघणेही शक्य व्हावे म्हणून तिला वर्गातल्या जरा उंचावर असलेल्या खिडकीच्या चौकटीवर बसवण्यासाठी दणकट नि देखण्या पुरुषाची मदत घ्यावी लागत असे. तिच्या तिसऱ्या नवऱ्याने मात्र पहिल्यांदाच तिला अशा प्रकारे मदतीसाठी आर्जव केले होते, कारण तोदेखील तिच्याइतकाच ठेंगणा होता आणि स्कीइंगमध्ये पारंगतही.
अनेकदा लेट नाइट शो दरम्यान जेव्हा ती शेजारी बसलेल्या यजमानाच्या हातावर हात ठेऊन स्त्री-पुरुषांच्या लैंगिक अवयवांबद्दल बिनधास्तपणे बोलत सुटत असे, तेव्हा तर तिचे छोटुले पाय जमिनीपासून काही इंच वर हवेत आपल्याच धुंदीत हलत असत.
एक नव्हे, तर असे अनेक शो तिने गाजवले होते. जणू ती या क्षेत्रातली सम्राज्ञी बनली होती. नेमकेपणाने सांगायचे तर 1980 आणि 1990 च्या दशकात तिची लोकप्रियता झरझर बहरली, प्रसिद्धीच्या वलयाने तिला सेलेब्रिटी स्टेटस मिळवून दिले. तिला मिळालेला प्रतिसाद इतका जबरदस्त होता की, अल्पावधीतच ती अमेरिकेची नावाजलेली सायको-सेक्शुअल थेरपिस्ट म्हणजेच मनोलैंगिक उपचारकर्ती होऊन गेली.
कोंडीग्रस्तांची मार्गदर्शक
या सगळ्यात कुठचाही पांचटपणा, उथळपणा नव्हता. 'शहाणे करून सोडावे सकळ जन' अशा उद्देशाने अत्यंत गंभीरपणे ती आपले म्हणणे सर्वसामान्य नागरिकांपासून ते हॉलिवूडमधल्या स्टार्सपर्यंतच्या कोंडीग्रस्तांपर्यंत पोहोचवत होती. तिचा प्रत्येक शब्द स्वत: चे असे मोल घेऊन येत होता. यथावकाश त्यातून एक, दोन नव्हे, तर तब्बल 45 पुस्तके आकारास आली.
तिचे एकमात्र मिशन होते. ते म्हणजे, लैंगिक साक्षरतेचा प्रसार-प्रचार करून मिठाची गुळणी धरून बसलेल्या अमेरिकींनी शिश्न आणि योनीविषयी मोकळेपणाने आणि मुक्तपणाने जाहीरपणे बोलावे, व्यक्त होत राहावे. जेणेकरून जगण्याचे डबके करून टाकणारी लैंगिक कोडी फुटत राहावी. मनातली नसती लाजबिज निघून जावी. दबक्या आवाजातल्या कुजबुजीला पूर्णविराम मिळावा. अमेरिकी लोक जितक्या सहजपणे खाण्यापिण्याबद्दल बोलतात, तितक्याच सहजपणे त्यांनी सेक्सविषयी बोलावे.
आणि एका टप्प्यावर ते शक्यही होत गेले, कारण रुथमध्ये मूलतः एक उत्तम शिक्षिका दडलेली होती. नव्हे ती एक आदर्श शिक्षिका होती. या शिक्षिकेमध्ये आईचे ममत्वभाव होते, कालांतराने जसे वय वाढत गेले, तसे ती बोलण्यात एक मस्त लहेजा राखून असलेली जर्मन ज्यू-अमेरिकन वंशीय आज्जी बनली. या भूमिकेत ओतताना ती अगदी सहजपणे संभोगपश्चात रतिक्रीडेविषयीसुद्धा बोलत असे आणि चिकन सूपबद्दलही स्वतःच्या म्हणून काही टिप्स समोरच्या माणसास देत असे.
तसे पाहता एक स्त्री म्हणून हा एक गुंतागुंत असलेला मोठा व्यापतापच म्हणायचा. मात्र प्लान्ड पॅरेंटहूड अर्थात नियोजनबद्ध पालकत्व या विषयावर सेक्स थेरपिस्ट आणि संशोधिका म्हणून काम करताना तिच्या प्रकषनि लक्षात आले होते, की लैंगिक कोंडी ही सार्वत्रिक समस्या आहे. ती फोडणे अत्यावश्यक आहे. मग, त्या काळानुरुप पहिला विचार तिच्या डोक्यात आला, या संबंधाने एक रेडिओ कार्यक्रम प्रसृत केला तर?

1980 चा तो काळ होता. न्यूयॉर्कमधल्या एका लोकल रेडिओ स्टेशनने तिला 15 मिनिटांची ऑफर दिली. कार्यक्रमाचे नाव ठरले, 'सेक्शुअली स्पिकिंग'. दर रविवारी मध्यरात्रीनंतर तुला जे काही म्हणायचेय, सांगायचेय ते सारे या 15 मिनिटांत सांग म्हणाले. कार्यक्रम सुरु झाला आणि झपाट्याने लैंगिक कोंडीग्रस्तांमध्ये आवडीचाही बनला.
लोकाग्रहास्तव वर्षभरानंतर पंधरा मिनिटांचा वाढून एक तास झाला. वर्षभरात कार्यक्रमादरम्यान तिला सरासरी 653 कॉल आले, त्यातल्या 25 ते 30 जणांनाच रुथला सविस्तर उत्तरे देता आली किंवा त्यांचे शंकानिरसन करता आले. मग आले 1984. या वर्षी तिचा 'डॉ. रुथ शो' टीव्हीवर सुरु झाला आणि त्यानंतर रुथ कधीही रिकाम्या हाती बसली नाही. शांत बसणाऱ्यात तर तशीही ती नव्हती. आणि तिला नियंत्रणात ठेऊ शकेल असाही कोणी दूरदूर दिसत नव्हता. तिने त्या काळी फेमस असेलला टेलिव्हिजन होस्ट आणि कॉमेडियन डेव्हिड लेटरमनला धक्क्यावर धक्के देत दोनदा शो अर्ध्यात सोडून निघून जायला भाग पाडले होते.
ज्यामुळे ते घडले, खरे तर ते फारसे धक्कादायकही नव्हते. बोलता बोलता ती या लेटरमनला असे म्हणाली की, तिने एकदा एकटीने राहणाऱ्या एका वृद्ध महिलेला सल्ला दिला. सल्ला काय दिला, जर तुला योनीमध्ये काही असावे तुझी अशी भावना होईल, तेव्हा सरळ काकडीचा वापर करीत जा! पुढल्या वेळेला तिने एका तरुणाचा खरे तर त्या तरुणाच्या वाट्याला येणाऱ्या कारुण्यप्रद रतिक्रीडेचा प्रसंग सांगितला.
तिच्या संपर्कात आलेला तो तरुण म्हणे संभोगाचे नाव काढताच चिंताग्रस्त होऊन जायचा कारण, त्याच्या मैत्रिणीला त्याच्या ताठरलेल्या लिंगावर कांद्याच्या गोल चकत्या टाकायला आवडायचे, काकडी काय नि कांदा काय, इथे त्याचा काय तो संबंध? म्हणूनच लेटरमन थोडे गमतीत, थोडे चेष्टेत म्हणायचे, 'ग्रेट सलाड हिंट्स.... हेच रुथच्या शोचे खरे तर नाव असायला हवे.
सडेतोड तरीही सहृदयी
गंमत म्हणजे खुद्द रुथला देखील असे बेबंद आणि त्याच वेळी दयाळूसुद्धा व्हायला आवडायचे. अनेकदा रुथचे लैंगिक समस्याविषयक प्रश्नोत्तराचे जाहीर कार्यक्रम व्हायचे. अशा कार्यक्रमात ती कधीही कोणाला वैयक्तिक प्रश्न विचारायची नाही. उत्तरे देताना मात्र, सोपेपणा आणि साधेपणा मात्र अवश्य जपायची, संभोग करताना फैटंसीज पाहायच्या का? या प्रश्नावर तीचे उत्तर असायचे-फाइन, बट किप युवर माउथ शट! कामोत्तेजनेसाठी काय करायचे? निरर्थक आहे ते. काही करायची गरजच नाही.
कारण, एकच कामोत्तेजनेची तुम्हाला गरज आहे आणि ती तुमच्या दोन कानांच्या मध्ये आहे. 'जी' स्पॉट? उत्तरः अशी काही गोष्टच अस्तित्वात नाही. बोअर्ड इन बेडरुम ? म्हणजे संभोग नकोसा, कंटाळवाणा वाटतोय का? तर कासवासारखे (रुथने एकेकाळी कासवांचा आणि खेळण्यांचा संग्रह केला होता. हा निव्वळ योगायोग म्हणायचा.) रहा. संयमी आणि शांत आणि योग्य वेळेची वाट पहा. संभोग करताना नवनव्या पोझिशन्स घेऊन पहा, शक्यतो आठवड्याचा मधला वार बुधवार असेल, तर उत्तम. पडताळून पहा, नवे साहस तुम्हाला कुठवर घेऊन जातेय, ते.
याशिवाय तुमच्या ज्या काही काळज्या, चिंता असतील, त्या एका कागदात गुंडाळा आणि त्या तुमच्या बेडरुम बाहेर सोडून या. जमल्यास थोडी थोडी वाईन घ्या. थोडी झोपही घ्या. पण हे सारं संभोगाच्या आधी, नंतर नव्हे. त्याला तुमच्यापेक्षा अधिकच्या संभोगाची हाव आहे? नॉट टु वरी. त्याला चरमसुख मिळवून द्या. दोन मिनिटापेक्षा अधिकचा वेळ जायचा नाही. हस्तमैथुन? काहीच अडचण नाही. यासारखे स्वास्थ्यकारक दुसरे नाही. त्यामुळे पुरुषांनी ते अधिकाधिक मिळवायला हवे. रुथ या प्रकाराला 'सेल्फ ग्राटिफिकेशन' म्हणजेच स्व-सुख असे नाव द्यायची किंवा तिला तसे ते द्यायला आवडायचे.
इतके सारे असले तरीही तिच्या प्रेक्षकांना हे नेमकेपणाने ठाऊक असायचे की, आपल्या समोर उभी वा बसलेली रुथ वेस्टहाइमर ही मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि लैंगिक उपचार या विषयांतली उत्तमप्रकारे प्रशिक्षित झालेली व्यक्ती आहे. तिने शिक्षण या विषयात डॉक्टरेट मिळवलेली आहे. शेवटी, ट्राय स्टेटमधल्या (न्यूयॉर्क, न्यू जर्सी आणि फिलाडेल्फिया) जोडप्यांनी केवळ शब्दांच्या आधारे, बोलून कामक्रीडेत पारंगत बनायचे, तर त्यासाठी एखाद्याच्या ठायी विरळा असे गांभीर्यपूर्वक जपलेले समर्पण भावही हवेतच की.

रंगबेरंगी नातेसंबंध
अर्थात, हे झाले रुथचे बाहेरचे जग. चार भिंतीं आडच्या जगातले तिचे इतरांशी असलेले नातेसंबंध नेमके कसे होते? तर ते बरेचसे चढउतार असलेले होते. तिचा पहिला नवरा डेव्हिड सगळे सोडून मायदेशी इस्राएलला जाऊ इच्छित होता आणि रुथला युरोपातच राहुह्न शिक्षण पूर्ण करायचे होते. यावर घटस्फोट हाच फायद्याचा सौदा होता. म्हणजे झाले असे की, या सौद्यात डेव्हिडला लँब्रेटा स्कूटर मिळाली, रुथला घटस्फोट मिळाला. रुथच्या आयुष्यात दुसरा पुरुष आला. त्याचे नाव डॅन.
हा फ्रेंच इस्राएली होता. मस्त उंचपुरा, देखणा गडी होता. पण त्यांचे नाते बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड इतपतच मर्यादित राहिले. लग्न टिकून राहावे इतका परिपक्वपणा त्यात कधी आला नाही. त्यामुळे इथेसुद्धा विभक्त होण्यावाचून पर्याय उरला नाही. दोघे विभक्त झाले, तेव्हा डॅनने कार स्वतःकडे ठेऊन घेतली. रुथने मरियम नावाच्या मुलीचा स्वतःकडे ताबा घेतला.
तिसरा पुरुष तिच्या आयुष्यात आला, त्याचे नाव फ्रेड. हा तिचा खरा नवरा. तब्बल 36 वर्षांचे दोघांचे सहजीवन राहिले. फ्रेड हा असा पुरुष होता, ज्याने सेक्स थेरपिस्टचा कोर्स पूर्ण करून घरी परतलेल्या रुथच्या तोंडी 'या लोकांमध्ये काहीतरी गडबड आहे', असे काहीसे वैतागवाणे उद्गार प्रथम ऐकले होते. या दोघांच्या नात्यातली अजून एक गंमत अशी होती की, ते एकमेकांशी कधीही राजकारण, हवापाणी किंवा रेस्टॉरंटविषयी बोलले नाहीत. ते बोलत होते, फक्त सेक्स या विषयावर. अर्थात, सुरुवातीसुरुवातीला तिच्या भुवया उंचवायला लावणाऱ्या, अब्रह्मण्यम प्रकारातल्या विषयातल्या बोलण्याला त्याला महत्प्रयासाने सहन करणे भाग पडले होते.
परंतु स्वतःचे स्थान पक्के करण्याच्या धडपडीत असलेल्या रुथच्या बेधडक बोलण्याची जशी, त्याला सवय झाली, मग कालांतराने सेक्सविषयक बोलणे, ऐकणे त्याच्या अंगवळणी पडत गेले. त्याला ते आवडतही गेले. त्याच्यासाठी हा फॅब्युलस टॉपिक होऊन गेला. पण एवढे सगळे असले तरीही रुथने फ्रेडला तिच्या सार्वजनिक चर्चात्मक कार्यक्रमात येण्यास मज्जाव केला.
कारण, हा इसम कार्यक्रमात कितीवेळा तरी प्रश्न विचारण्याच्या बहाण्याने हात वर करे आणि 'हिचे काही ऐकू नका, ही नुसती वायफळ बडबड आहे,' असे म्हणून रुथचीच अडचण करीत असे. एकदा अशी गंमत झाली, उपस्थितांपैकी एकाने त्यालाच प्रश्न विचारला, सगळ्या जगाची उठाठेव करता, तुमचे सेक्स लाइफ कसे ते तर सांगा आधी? त्यावर हा फ्रेड निर्विकारपणे उद्गारला-द शूमेकर्स चिल्ड्रेन्स डॉट हॅव शूज...
काळवंडलेल्या बालपणावर थरारक तारुण्याचा उतारा
असे सगळे असले तरीही, सेक्स हाच काही रुथ वेस्टहायमरचा एकमेव विषय नव्हता. किंबहुना तिला हा विषय निर्व्याज प्रेम आणि निखळ जीवनानंदा पर्यंत न्यायचा होता. तसे तिने जर्मनीमध्ये असताना लहानपणी तिच्या वाट्याला आलेली शोकांतिका कधी पृष्ठभागावर येऊ दिली नव्हती. तिचे बालपण शब्दशः अत्याचाराने काळवंडलेले होते. तिच्या वडिलांना नाझी सैनिकांनी अटक केली, तेव्हा भेदरलेल्या तिच्या आईने रुथची रवानगी स्वित्झर्लंडच्या बालगृहात केली.
हिटलरच्या अत्याचारांनी कळस गाठला तसे, थोड्यात काळात या बालगृहाचे अनाथालय बनले. 1941 नंतर तर तिला पत्रे येणेही थांबले. ती सर्वाथनि निराधार बनली. वयाच्या सोळाव्या वर्षी झपाटेपणात तिने पॅलेस्टाइनची वाट धरली. इस्राएलच्या निर्मितीचे वेड डोक्यात घेऊन हॅगनाह या निमलष्करी दलात सामील झाली. ज्युईश समाजाला आपली स्वतःची भूमी मिळावी म्हणून तिथपासून ती जी काही झायोनिस्ट बनली, आयुष्यभर झायोनिस्ट राहिली.
+हॅगनाह मध्ये असताना, युद्धप्रसंगी किर्र अंधारात सब मशिनगनची वेगाने जुळणी करता यावी आणि तितक्याच वेगाने ती मोडता यावी, यासाठी तिला स्नायपरचे प्रशिक्षण मिळाले होते. हँड ग्रेनेड कसा फेकायचा हेदेखील ती शिकली होती. अर्थात, त्या काळात तिने कोणालाही मारले नव्हते. मारण्याची क्षमता मात्र तिने अंगी पुरेपूर बाणवली होती. या कष्टप्रद भूतकाळाची मुलाखतकर्त्यांना आठवण करून देण्यात रुथला कधीमधी गंमतही वाटत असे.
एका बाजूला रुथला कर्मठ बातावरणात झालेल्या आपल्या जडणघडणीबद्दल बोलायला आवडायचे. मात्र त्याचवेळी अशी कर्मठ वातावरणात वाढलेली, आठवड्यात एकदा वडिलांबरोबर सिनेगॉगमध्ये गेलेली रुथ लैंगिक स्वातंत्र्य, समलिंगी विवाह, वर्णभेद आदी संबंधांतल्या आंदोलन, चळवळीतही हिरिरीने प्रसंगी आक्रमकपणे सहभागी व्हायची, गंमत ही की, ती तशी पाहता जुनाट फॅशनची होती, जुन्या रितीभाती जपणारी होती.

ती दीर्घकालीन नातेसंबंधांचा पुरस्कार करायची, विवाहाबाह्य संबंधांत गर्भनिरोधकांच्या वापराचा आग्रह धरायची. वधू-वरांच्या जोड्या जुळवण्यातही तिची ना नसायची. चवीचे, गंध रंगांचे तिचे विशिष्ट उंची आग्रह असायचे. साहित्य तत्त्वज्ञानही त्याला अपवाद नसायचा. किंबहुना, जेव्हा कधी कोणाला चार शहाणपणाच्या गोष्टी सांगण्याचा प्रसंग यायचा, ताल्मुडमधली (ज्यू धर्मशास्त्र आणि कायद्याचा पवित्र ग्रंथ) वचने अशी तिच्या ओठांवर यायची.
'ए लेसन टॉट विथ ह्युमर इज ए लेसन रिटेन्ड' हे त्यातले तिचे आवडते बचन, रुथ कायम उत्साहाने खिदळत असायची, खिदळता खिदळता बहुतप्रसंगी, कशी गंमत केली तुमची असे म्हणून हाताचे बोट समोरच्यापुढ्यात नाचवायची.
... आणि एका टप्प्यानंतर आयुष्याला चहुबाजूंनी स्थिरता लाभल्याने सुखद वाऱ्याचा झोत एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे झेपावा, तशी ती सहजपणे वार्धक्याकडे झुकली. आश्चर्याची गोष्ट ही की, वयाच्या ऐंशीमध्ये असताना तिची उंची पाऊण-एक इंचाने घटली. अर्थातच तो वार्धक्यामुळे आलेल्या आक्रसलेपणाचा परिणाम होता.
याहून अधिकची उंची कमी झाली असती, तर ती एखाद्याला नजरेसच पडली नसती. पण, तुम्ही तिला तिच्या खणखणीत आवाजात, बिनधास्त नि बेधडक सुरांत ऐकू नक्कीच शकला असतात. या विषयी शंका घेण्याची शक्यताच नाही. कारण ती सर्वाथनि खमकी रुथ वेस्टहायमर होती!
(प्रस्तुत मूळ लेख 'द इकॉनॉमिस्ट च्या च्या अंकात प्रकाशित झाला. त्या लेखाचा हा साभार स्वैर अनुवाद आहे.)
(साभार - समतावादी मुक्त संवाद, सप्टेंबर २०२४)






