सिनेमा, सिरीजमधून काय सांगायचे आहे ते दिग्दर्शकास पक्के ठाऊक असते. हिरा मंडी ही संजय लीला भन्साळी यांची सिरीज. विसाव्या शतकाच्या प्रारंभीचा कालखंड यात दर्शवलाय. हिरा मंडी पाकिस्तानचे आर्थिक केंद्र असलेल्या लाहोरचा अविभाज्य हिस्सा आहे. इथे रीतसर बायकांचा बाजार भरत असे. यातले खरे हिरे निवडून त्यांना पैलू पाडून घुंगरू बांधून बाजारात उभं करणं हा इथला कर्मभाव. मुजरा नर्तिका, गायिका यांचा जगातला सर्वात मोठा बाजार लाहौर मधील 'हिरा-मंडी' मध्ये भरे. आपल्या नारायणगावला जशी तमाशापंढरी म्हणतात तसे हिरा मंडी ही मुजऱ्याची काशी पंढरी होय.
आपल्या अनेक साहित्य व कलाकृतींचा विषय ठरलेल्या मुजरा नर्तिका असलेल्या अनारकलीचे मूळ लाहौरमध्येच सापडते. 'अकबरनामा' आणि 'तुझुक -ए- जहांगिरी' अर्थात 'जहांगीरनामा' या दोहोतही अनारकलीचा उल्लेख नाही पण ईस्ट इंडिया कंपनीच्या नीळाच्या व्यापारासाठी भारतात आलेला विल्यम फिंच इस. 1611 साली लाहौर येथे पोहोचला तेंव्हा त्याला अनारकली विषयी माहिती मिळाली असे त्याने नमूद केले आहे. अनारकलीच्या निधनानंतरच्या सहा वर्षे पश्चातचा हा कालावधी असल्याचे तो म्हणतो. विल्यम फिंचच्या काही वर्षानंतर भारतात आलेल्या एडवर्ड टेरी या ब्रिटीश प्रवाशानेही अनारकलीचे उल्लेख केले आहेत. इतिहासात तिच्या अस्तित्वाबद्दल एकमत नाही मात्र तत्कालीन मुजरा संस्कृती आणि गुलाम महिलांचे शोषण यावर सहमती आहे.

लाहौरच्या मुजरा इतिहासाची सुरुवात अशा प्रकारे चारशेहून अधिक वर्षाची आहे. मुजरा नृत्य करणाऱ्या बायकांबद्दल अनेक लोकोपवाद होते आणि आजही आहेत. खरे तर यातल्या बहुतांश स्त्रिया खूप प्रेमळ आणि लाघवी असतात, त्या ही सच्च्या प्रेमाच्या भुकेल्या असतात, यातल्या काहींचा रोख त्यांच्या ग्राहकांच्या पैशावर, संपत्तीवर जरुर असतो हे देखील येथे नमूद करावेच लागेल! आपल्यातल्या कुणालाच 'अमरप्रेम'मधला राजेश खन्नाने साकारलेला 'आनंदबाबू' बनायचे नसते पण तरीही जर कधी कुठल्या मुजरावालीशी वा कोठेवालीशी सामना झाला तर तिच्यात वेश्या पहायची की पुष्पाला शोधायचं हे आपल्या संस्कारावर अवलंबून असते. त्याच बरोबर बदलत्या काळात श्रीमंती, अय्याशी आणि ऐशारामाच्या नव्या संदर्भानुसार या दशकात काही ठिकाणी विवाह सोहळ्यात नाचण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा मुजरा कलावंताचे पुनरुज्जीवन होऊ लागलेय. मात्र त्यांच्या या स्वरूपास समाज कोणत्या नजरेने पाहतो हे काळच सांगेल.
'मुकद्दर का सिकंदर'मध्ये जोहराबाई एकदा सिकंदरला म्हणते की, "एक तवायफ की जिंदगी कोठे से शुरू होती हैं और कोठे पे खतम होती है.." आता कोठे उरले नाहीत आणि मुजरा नर्तिकाही इतिहासजमा झाल्यात. उरल्यात त्या केवळ त्यांच्या पाऊलखुणा. त्याचबरोबर अलीकडील काळात मुजरा नृत्याच्या नावाखाली बिभत्स आणि हिडीस नृत्य करणाऱ्या तोकड्या कपड्यातील नार्तिकांचा (?) धांगडधिंगा घालणाऱ्यांबद्दल लिहावं वाटत नाही. मुजरा नृत्य आणि नर्तिकांच्याबद्दल मानवी मनात प्रेम, वासना, रसिकता, सौंदर्यासक्ती, आकर्षण अशा विविध भावना असू शकतात त्याचे उदात्तीकरण करणे वा त्याचा धिक्कार करणे हा स्वतंत्र लेखाचा विषय असू शकतो. या भावनांचे स्वरूप काहीही असले तरी मुजऱ्याच्या या पाऊलखुणा अत्यंत वेधक आणि देखण्या होत्या हे नक्की..
संजय लीला भन्साळी यांनी हिरा मंडी पेश केलीय, ती तद्दन पोशाखी आणि भयंकर नटवी झालीये. याहीआधी त्यांनी गंगूबाई काठेवाडीमध्ये असेच चित्रण केले होते. पद्मावत, बाजीराव मस्तानी आणि देवदास या त्यांच्याच तिन्ही चित्रपटांचा त्यांच्यावर भयंकर पगडा आहे असे नेहमी वाटते. पिवळे, लाल नि निळे रंग ते प्रमाणाबाहेर वापरतात. अत्यंत रंगी बेरंगी नि पिवळसर सोनेरी लाइट्सच्या चकचकाटाच्या त्यांच्या फ्रेम्स असतात.
कदाचित ही त्यांची मजबूरी असू शकते वा त्यांचे त्या केमिस्ट्रीशी पर्सनल बॉण्डिंग असू शकते वा बॉक्स ऑफिसची गणिते त्यांना यासाठी प्रेरित करत असतील. हिरा मंडीमधल्या स्त्रिया कोणत्या पोशाख घालत होत्या नि त्यांचा शृंगार कसा असे हे सांगणारं विविध साहित्य पाकिस्तानात नि जगभर उपलब्ध आहे. अमीर उमराव आणि सरदार मंडळींची अंगवस्त्रे 'चोटभर' वापरून झाली की टाकून दिली जात. त्यांची रवानगी या मंडीत होई. त्यांचं रहनसहन आणि बाकी मुजरेवाल्या स्त्रियांचं राहणीमान यात जमीन अस्मानचा फरक होता.

हिरामंडीत नाचगाण्याचं काम करणाऱ्या एका थोराड नर्तिकेचा मुलगा असणाऱ्या इक्बाल हुसेन या प्रौढवयीनाच्या अनुभवांवर आधारित हिरा मंडी हे मूळचे फ़्रेंच भाषेतले पुस्तक आहे. त्याचा इंग्लिश अनुवाद त्याच नावाने उपलब्ध आहे. क्लॉडीन डेल्सन या फ्रेंच लेखिकेने 1988 साली इक्बालशी भेट झाल्यानंतर हे पुस्तक लिहिले आहे. त्यात पुष्कळ वर्णने आढळतात. सियालकोट, फेरोजपूर, मुलतान, जालंधर, बहावलपूर, मुजफ्फरगढ, झेलम आणि थेट पूर्व बंगालमधून मुली इथे आणल्या जात. त्या इथे कशा नि का आणल्या जात हा अनेक पुस्तकांचा कथावस्तू होण्याइतका मोठा घटक आहे.
इथल्या बायका मुजरा करण्यासाठी पर्शियन मुलुखापर्यंत नेल्या जात. त्यांचे सौन्दर्य, त्यांचा वर्ण नि त्यांचे कपडेलत्ते हे सहा टप्प्यात होतं. शेवटचा टप्पा हिजडा आणि पहिला टप्पा राणीचा होता. भन्साळीनी साऱ्यांना एकाच रागरंगात तोललंय. 1970 मध्ये पाकिस्तान सरकारने हिरा मंडी कागदोपत्री बंद केली कारण इथे नाचगाणं बंद होऊन सेक्सवर्किंगच उरलं होतं. हे एका दिवसात झालं होतं का? कधीच नाही! जवळपास दोन शतके इथे स्त्रियांचे शारीरिक शोषण झाले. तवायफ वेश्या कशी झाली याची दास्तान इथल्या गल्ल्यांमध्ये कैद आहे, यातलं या सिरीजमध्ये काहीच येत नाही!
लाहोरची हिरामंडी, मुंबईचा कामाठीपुरा आणि (तत्कालीन पूर्व पाकिस्तान) आताच्या बांगलादेश मधील दौलतदियामध्ये काही अंडर करण्ट्स काम करत होते. देशाला स्वातंत्र्य मिळाले नव्हते तेव्हा कामाठीपुऱ्यात एका लेनमध्ये केवळ मुजरा चालत असे. कोलकत्याच्या कालीघाटपाशीही मुजरा चाले. बनारस, लखनौ, आग्रा, बुऱ्हाणपूर, मधुबनी आणि मुजफ्फरपूर इथेही याची केंद्रे होती. यांच्यात मुलींची देवाणघेवाण चालत असे.

आता पाकमधली हिरा मंडी आणि बिहारमधले मुजफ्फरपूर वगळता कुठेच नाचगाणं होत नाही. काही कटूसत्ये आहेत जी आपल्या सामान्य पांढरपेशी जीवनाच्या परिघाबाहेरची असल्याने आपल्याला ज्ञात नसतात. सामान्य माणूस दौलतदियाच्या रेड लाइट एरियात गेला तर पाचव्या मिनिटाला तो भडाभडा ओकाऱ्या करेल. आता अस्तित्वात असलेली हिरामंडी जितकी बटबटीत आहे तितकीच भणंग आहे! 1920 च्या सुमारास हा परिसर कसा असेल याची चित्रेही उपलब्ध आहेत. भन्साळी त्याच्याशी मेळ खात नाहीत. लोकांना आवडेल अशा गोष्टी छानछान वेष्टनात चकाचक कल्हई करून खपवण्यात ते माहीर आहेत.
मुळात या स्त्रियांच्या मर्जीची शून्य दखल असे, जे काही असे ते सारे बळजोरीचे असे! मग ती मुलगी रुळली की तिची पेशेवर नायकीण होत असे नि मग अखेरीस तिचे पैलू वयानुसार फिके पडत, मग तिचा करुण अंत ठरलेला असे. त्या दुःख, वेदना, तो संताप नि ती फसवणूक भन्साळी दाखवू इच्छित नाहीत कारण लोकांना स्वतःला एक 'फीलगुड' वाईबने ग्रासलेले आहे हे त्यांनी पक्के ताडले आहे. जमले तर ते लाल रक्तालाही सोनेरी मुलामा लावून पेश करतील आणि प्रेक्षकांसह समीक्षकही त्याची वाहवा करतील!

कचकड्याचे महाल भलेही दाखवता येतील, नटलेल्या सजलेल्या बायकांचे जत्थे दाखवता येतील, आपसात रंजीश असणाऱ्या नि प्रसंगी देशासाठी लढणाऱ्या बायका दाखवून त्यातही देशभक्तीचा फ्लेवर ऍड करता येईल मात्र बेसिक हिरामंडीत काय चालत असे हे दाखवायचे म्हटले की माणूस का कचरत असावा? उत्तर साधे आहे पैसे कमावण्यासाठी सत्याचा गळा घॊटून जे लोकांना आवडते तेच दाखवून नि स्वतःच्या आवडत्या शैलीत रसरसलेली निर्मिती पेश केली जाते! 'हिरामंडी'मध्ये त्यांनी या मूळ अफाट नि उत्कट भावनात्मक घटकाचा आत्माच काढून घेतलेला असला तरी त्याचा देह अफाट सजवला आहे, लोकांनाही बाह्यरूपात जास्त इंटरेस्ट असतो! त्याआड असलेली लसलसती जखम कुणालाच पाहायची नसते!
खरे तर अशी आयुष्ये कुणाच्या वाट्याला येऊ नयेत नि यांच्या कहाण्या कुणीही लिहिल्या तरी त्यातले सत्व गुदमरता कामा नये, अशाने रंडीही अतिव आकर्षक नि चित्तवेधक वाटू लागते! एखाद्या घटकाविषयीच्या आपल्या भावनांचा घाट फसव्या पद्धतीने बदलणे हा एक प्रकारचा धोका असतो नि बाजारू मार्गाने पैसे फेम कमावण्यासाठी धोके देणं आजच्या काळात न्यू नॉर्मल आहे!






