प्रियांका डहाळे
- बिस्मिल्लाह खान यांची शहनाई घडवणाऱ्या दुर्गादास ठाकूर यांनी सांगितल्या आठवणी.
- शैलेश भागवतांनी उलगडतात खाँसाहेबांच्या रियाजाची कहाणी.
- खाँसाहेबांनंतर त्यांची पोकळी भरुन काढणारं नंतर कुणी झालं नाही, अशी खंती ठाकूर व्यक्त करतात.
शहनाईचे सूर भारतीयांच्या मनात अजरामर करणारे भारतरत्न उस्ताद बिस्मिल्लाह खान यांची आज जयंती. वाराणसीतल्या गंगाकिनारी आणि मंदिरांमध्ये तासनतास रियाज करून खाँसाहेबांनी शहनाईला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली. पण त्यांच्या सुरांना साद देणारी ही 'शहनाई' खास त्यांच्यासाठी घडवायचे नाशिकचे दुर्गादास ठाकूर. आज खाँसाहेबांच्या जयंतीनिमित्त, दुर्गादास ठाकूर यांनी जागवलेल्या त्याच सुवर्ण आठवणींना उजाळा देणारा हा खास लेख...
‘वाराणसीके बालाजी मंदिरमें आधी रात को मैं रियाज कर रहा था। साथ में ना सूर की संगत थी, ना तालकी; कोई भी नहीं था। मैं मेरी शहनाई और सामने बालाजी की मुरत। मैं सबकुछ भूलकर बजा रहा था और मेरे सामने मैंने बालाजी को खडा पाया।’
‘इतकी शहनाईशी तादात्म्यता फक्त खाँसाहेबांचीच असू शकते. खाँसाहेब म्हणजे उस्ताद बिस्मिल्लाँ खाँ हे सांगणे न लगे. ते गेलेत आणि त्यांच्या तोडीची शहनाई वाजविणारे कुणी उरलेच नाहीत. माझ्या हातांनी बनविलेला साज ते जेव्हा वाजवत तेव्हा माझ्यासारख्या कारागिरालाही कृतार्थ झाल्यासारखे वाटायचे.’
ठाकूर यांचं घराणं शहनाई बनविण्यासाठी नाशकात प्रसिद्ध…
दुर्गादास ठाकूर सांगत होते. दुर्गादास ठाकूर यांचं घराणंच शहनाई बनविण्यासाठी नाशकात प्रसिद्ध. आपल्या आजोबांपासून शहनाई बनविण्याचा वारसा त्यांनी जपलेला. आज वयोमानामुळे वयाच्या 79व्या वर्षी दुर्गादास यांनी शहनाई बनविणं थांबवलंय पण त्यांच्या मनात आजही खाँसाहेबांची शहनाई गुँजते आहे.मी बीएस्सीपर्यंतचं शिक्षण घेतलं. पूर्वी माणूस पदवीधर झाला म्हणजे नोकरीकडे वळायचा. त्याकाळी पदवीधर माणसास सरकारी नोकरी सहज मिळत असे.
माझे सहाध्यायी व इतरही परिचित मला नोकरी करण्याचा सल्ला देऊ लागले. पण वेगळे काहीतरी करावे असे माझ्या मनात होते. त्याच दरम्यान एकदा खेडय़ातील काही वाजंत्रीवाली मंडळी सनया बनवून घेण्यासाठी आली होती. अण्णांचे म्हणजे माझ्या वडिलांचे काम चालू होते. ती मंडळी जवळ बसून गप्पा मारत होती. त्यांच्या त्या गप्पा ऐकत होतो. मध्येच त्यांच्यापैकी एकाने अण्णांना विचारले, ‘दादा तुम्हाला किती मुले आहेत?’ त्यावेळी मी अगदी सुटाबुटात रहात असे. अण्णांनी माझ्याकडे बोट दाखवून म्हटले, ‘मला हा एकच मुलगा आहे.’ ती वाजंत्रीवाली मंडळी एकमेकांकडे पाहू लागली. मी ऐकत होतो. त्यातील एकजण दुसऱयाला म्हणाला,‘एक-दोन सनया जास्त घेऊन ठीव, म्होरल्यावेळी मिळतीलच याचा काय भरुसा?’ नंतर माझ्याकडे बोट दाखवून म्हणाला, ‘हा भाऊ थोडाच सनया तयार करणार हाये?’
तर नाशिकचा साज खाँसाहेबांपर्यंत कधीच पोहचला नसता
या त्यांच्या प्रश्नामुळे माझे मन हेलावले गेले आणि मग त्यांनी निश्चय केला की ही कला खंडित होता कामा नये. मी जर हा निश्चय केला नसता तर नाशिकचा साज खाँसाहेबांपर्यंत कधीच पोहचला नसता (खाँसाहेब शहनाईस साज म्हणायचे.’)शहनाईच्या परंपरेला आधुनिक काळानुसार साजेसे रुप देण्याचा मग दुर्गादास यांनी प्रयत्न सुरू केला. शुद्ध स्वरांचे ज्ञान व्हावे म्हणून कृष्णराव दसककर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचा अभ्यास सुरू केला. शहनाई बनविण्यासाठी नवनवीन प्रकारची हत्यारे बनवून घेतली. शहनाईचे लाकूड सुलभतेने कोरले जावे यासाठी नवीन सामते बनवले.
कुठलीही वस्तू उपयुक्ततेबरोबर देखणीही दिसली पाहिजे या दृष्टीने शहनाईची लाकडी स्वरनलिका लेथवर फिरत असतानाच पृष्ठभागावर शुद्ध लाखेचा मुलामा देण्याची पद्धत विकसित केली. अण्णांबरोबर काकांनीही मग सनईच्या निर्मितीतच पूर्ण लक्ष घालायला सुरुवात केली. त्यावेळी शिसवी लाकूड मुबलक प्रमाणात मिळत असे. मुंबई, पुणे, बडोदा, सोलापूरसारख्या ठिकाणाहून मानवंत शहनाई वादक आमच्याकडेच शहनाई बनवून घेण्यासाठी येत असत असं काका मोठय़ा अभिमानाने सांगतात. हे सांगताना त्यांच्या हातांचं कौशल्यही त्यांच्या डोळ्यांत आरपार झिरपायचं. शहनाईला शास्त्रीय संगीत क्षेत्रात मैफिलीचे वाद्य म्हणून स्थान मिळवून देणारे पुण्याचे शंकरराव गायकवाड यांनीही वृद्धावस्थेत आमच्याकडूनच शहनाई बनवून घेतली होती ज्यावर ते इतर शहनाईपेक्षा चार-पाच तास रियाज करीत पण तरी ते वय झाले असूनही थकत नसत. हा अनुभव त्यांनीच गहिवरुन दुर्गादास यांना सांगितला होता.
त्याकाळात बनारसचे शहनाईनवाज उस्तात बिस्मिल्लाह खाँसाहेब यांचे नाव सर्वदूर गाजत होते. आमचे काही परिचित मित्रमंडळी आम्हास नेहमी म्हणत असत की आमच्या सनया आम्ही खाँसाहेबांना दाखवाव्यात. मात्र त्यावर काकांचे उत्तर असे, ‘आमचे नाव ऐकून एक दिवस खाँसाहेब स्वत: आमच्याकडे येतील.’ त्यावेळी खाँसाहेबांचे कार्यक्रम नेहमीच मुंबई, पुणे व महाराष्ट्रात अनेक ठिकाणी होत असत. तेथील स्थानिक सनईवादक त्यांना भेटायला जात असत, त्यांच्याबरोबर त्यांनी आमच्याकडून बनवून घेतलेल्या सनयाही ते नेत. त्या बघून खाँसाहेब विचारत की, ‘इतना अच्छा साज कहॉँसे लाते हो?’ वादनकार नाशिक के ठाकूर नाम के कलाकारसे बनवाके लाते हैं असे उत्तर देत.
‘ठाकूरसाब, सुना हैं आप बडी अच्छी शहनाई बनाते हो।
दुर्गादास यांना 1958 सालचा तो संस्मरणीय प्रसंग आजही लक्षात आहे ज्यावेळी प्रत्यक्ष खाँसाहेब काकांच्या दुकानात भल्या सकाळी आले होते. त्यावेळी खाँसाहेबांचे वय 40-42 होते. अण्णांनी ताबडतोब एक हार मागविला व यथोचित स्वागत केले. खाँसाहेबांनी बोलावयास सुरुवात केली, ‘ठाकूरसाब, सुना हैं आप बडी अच्छी शहनाई बनाते हो। जहाँ भी जाता हूँ वहाँ के शहनाईवादक आपही का नाम लेते हैं। हमें भी एक दो साज बनाकर दीजिये। इथून खाँसाहेबांना शहनाई बनवून देण्याचा योग आमच्या वाटय़ाला आला आणि आमचे ऋणानुबंध जुळत गेले. हा ऋणानुबंध आयुष्यभराचे संचित देऊन गेला. काळी-1च्या दोन शहनाई वाराणसीला पोहोचत्या केल्यावर अण्णांना खाँसाहेबांचे पत्र आले होते : “I am glad to inform you that I have played several times on the Shehnais prepared and sent by you, and found to my entire satisfaction. I am confident that you are one of the best Shehnai manufacturer in India.”
‘बडे अच्छे साज बनाये हैं रे दुर्गादास तूने। मेरी दुवा हैं’
दुर्गादास सांगतात, ही 1982ची गोष्ट आहे, नाशिक जिल्हा सांस्कृतिक संघटनेच्या वतीने फेब्रुवारी महिन्यात एक मोठा संगीत महोत्सव आयोजित केला होता. तीन दिवसांच्या त्या महोत्सवाचे उद्घाटन खाँसाहेबांच्या शहनाईवादनाने होणार होते. त्यासाठी ते नाशिकला येणार असे समजले आणि मागे एकदा त्यांचे पटटशिष्य पंडित शैलेश भागवतांनी खाँसाहेबांना दोन सनया हव्या आहेत असे सांगितल्याची आठवण झाली. कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी खाँसाहेब नाशिकला आले. रात्री उशिरा येऊनही त्यांनी माझी आठवण काढली. काही कार्यकर्त्यांनी रात्री 11 वाजता आमच्या घरी येऊन तसे सांगितले, मी दुसऱया दिवशी येण्याचे कबूल केले.
पंडित शैलेश भागवतही आले होते. शैलेशसह मी त्यांना भेटायला हॉटेल ग्रीन व्ह्यू वर भेटायला गेलो. खाँसाहेबांनी खूप गप्पा मारल्या. अण्णांच्या जाण्याबद्दल दु:ख व्यक्त केले, मला धीर दिला. नंतर त्यांनी मी बरोबर नेलेल्या सनया वाजवून बघितल्या. मी बनविलेली शहनाई खाँसाहेब वाजवित आहेत हे अनुभवताना माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. समाधान व्यक्त करीत ते म्हणाले, ‘बडे अच्छे साज बनाये हैं रे दुर्गादास तूने। मेरी दुवा हैं’ त्याच रात्री खाँसाहेबांचा शहनाईवादनाचा कार्यक्रम होता. रुंग्ठा हायस्कूलच्या प्रांगणात भव्य शामियाना उभारला होता. श्रोत्यांनी प्रांगण तुडुंब भरले होते. खाँसाहेबांनी मारुबिहागने सुरुवात केली. तासभर त्यांनी तो राग पेश केला. नंतर मालकंस, कजरी, चैती, दादरा अशा एकसे एक पेशकश करुन त्यांनी ऐकणाऱयांचे कान तृप्त केले.

श्रोत्यांच्या आग्रहास्तव ‘दिलका खिलौना हाय टूट गया’ या भैरवीने कार्यक्रमाची सांगता केली.या सांगतेच्या वेळी खाँसाहेबांच्या जागी त्याच तोडीचा कुणी जर निर्माण झाला नाही तर शहनाईचे पुढे काय असा विचारही कुणाला शिवू शकला नाही इतकी खाँसाहेबांच्या सुरांनी सगळ्यांवर जादू केली होती. कार्यक्रम संपल्यावर त्यांची मी भेट घेतली असता त्यांनी दुसऱया दिवशी दुकानावर येण्याचे कबूल केले. चाय कैसी बनी हैं विचारल्यावर बहोत सुरीली बनी हैं असं रसिकपणे म्हणणारे खाँसाहेब दुसऱया दिवशी आमच्या दुकानाबरोबर घरचाही पाहुणचार घेऊन परतले. आता आमच्यात इतकी जवळीक निर्माण झाली होती की ते मला ‘बेटा दुर्गादास’ असे संबोधू लागले होते आणि आम्हीही त्यांना ‘बाबाजी’ म्हणायला लागलो होतो.
खाँसाहेबांनंतर त्यांची पोकळी भरुन काढणारं नंतर कुणी झालं नाही…
पण आज ‘शहनाई मेरी नजरसें भी ज्यादा’ असं म्हणणारे खाँसाहेब गेल्यानंतरही त्यांची पोकळी भरुन काढणारं नंतर कुणी झालं नाही. त्यामुळे काकांना आता वाराणसीला कुणाकडे शहनाई पोचवायची, त्या शहनाईतून खाँसाहेबांच्या तोडीचा मालकंस, कजरी कुणी वाजवेल का असा काकांना प्रश्न पडतो. सुरीली चाय म्हणत जगण्याचा रसास्वाद घेणाऱया खाँसाहेबांना अत्यंत सुंदर अशी चंदनाची तस्बी बनवून देणाऱया काकांना ती जपणाऱया खाँसाहेबांच्या नामस्मरणातून मिळणारी दुवा शहनाईमध्ये प्राण ओतण्यास पुरेशी ठरत होती पण आता शहनाई वाजविणारे खाँसाहेबही नाहीत, तस्बी ओढणारे ‘बाबाजी’ही नाहीत आणि त्यांची ती तस्बीही नाही... शहनाई मुकी झाली नसेलही पण तिच्यात पराकोटीचं चैतन्य निर्माण करणारा शहनाईचा पिताच गेला आणि शहनाईला पोरका करुन गेला आणि शहनाई बनविणाऱया दुर्गादास यांनाही एक चिरंतन पोकळी देऊन गेला. शहनाईचं भवितव्य काय हा प्रश्नच मग आपलं आत्मकथन मांडताना दुर्गादास यांना पडल्यावाचून राहिला नाही.
‘आजही माझा मुलगा माझा वारसा चालवितो आहे पण येणारे गिऱहाईक प्रचंड प्रमाणात घटले आहेत. एवढंच की जे येतात ते रिकाम्या हाती कधीच जात नाहीत, शहनाईचं लाकूड वा सामान कितीही महागलं तरी. त्यांनाही या बदलत्या परिस्थितीची जाणीव असतेच. पण...’ दुर्गादास यांचा आवाज शहनाई जणु ओलावल्यासारखा झाला. त्यांच्या या ‘पण’मध्ये पुन्हा एक फार मोठी पोकळी मला जाणवली. त्यांना अभिमानाने सांगता यायचं, ‘खाँसाहेब माझीच शहनाई वाजवतात. आता खाँसाहेब नाहीत आणि त्यांचा रियाजही नाही. जी शहनाई मी त्यांच्यासाठी बनवायचो तीच शहनाई मी इतरांसाठीही बनवायचो. पण खाँसाहेब खाँसाहेब होते. त्यांच्याइतका रियाज आजचे कलाकार करीत नाही. मी कितीही उत्तम शहनाई बनविली तरी त्यातून दैवी सामर्थ्य आणि सुरांवर मेहनत घेणारा दुसरा कलाकार मला आजवर सापडला नाही. माझी शहनाई पोरकी ती पोरकीच झालीय. तिचं गेलेलं पितृत्व थोडीच परत आणता येणार आहे?’

त्यांच्या या प्रश्नातून शहनाईविषयी अनेक प्रश्न उपस्थित होतायत हे मला कळत होते. पण एखाद्या कलाकारीवर अतूट प्रेम असलेल्याला तिच्या व्यथेची, तिच्या संपण्याची, पोरके होण्याची कल्पनाही करवत नाही असे म्हणतात ना तसे दुर्गादास यांचे आहे. त्यांच्या मनात पोरक्या झालेल्या शहनाईविषयी निराशेचा सूर नाही, चिंतेचा आहे. बोलता बोलता त्यांनी पंडित शैलेश भागवतांची आठवण काढली. शैलेशजी सलग 37 वर्षे बिस्मिल्ला खाँसाहेबांकडे शहनाई शिकलेले. खाँसाहेबांचे पट्टशिष्य. आज वयाच्या 54व्या वर्षी ही 37 ते 40 वर्षांची शहनाईची साधना करणारे शैलेशजीं खाँसाहेबांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
‘बेटा, ये मेरी शहनाई लो और नासिकमें ठाकूरसाहब रहते हैं, उन्हे मिलो और ये शहनाई साफ करते लाओ.’
ठाणे इस्टमध्ये अत्यंत साध्या फ्लॅटमध्ये राहणाऱया शैलेशजींच्या बोलण्यात खाँसाहेब आल्याशिवाय त्यांची कुठलीही आठवण पूर्ण होत नव्हती. दुर्गादासजी, खाँसाहेब आणि शैलेशजी हे शहनाईमुळे जोडलेले एक त्रिकोणी ऋणानुबंध होते. या ऋणानुबंधातूनच शैलेशजींना एक दिवस अपूर्व संधी मिळाली.श्वासामधला मळ सतत शहनाईत साठत असतो तो स्वच्छ करावा लागतो. त्याशिवाय शहनाई नीट स्वर उमटवत नाही. एकदा खाँसाहेबांनी शैलेशजींना सांगितले, ‘बेटा, ये मेरी शहनाई लो और नासिकमें ठाकूरसाहब रहते हैं, उन्हे मिलो और ये शहनाई साफ करते लाओ.’
साक्षात आपल्या गुरुंची शहनाई आपल्या हातात मिळतेय म्हटल्यावर शैलेशजींना कोण आनंद झाला. शिवाय शहनाई चांगली झालीय की नाही हेदेखील ती वाजवून बघावे लागणार होते. शैलेशजी नाशिकला आले. त्यांनी दुर्गादासकाकांकडून शहनाई स्वच्छ करवून घेतली. मोठय़ा भक्तिभावाने शैलेशजींनी ती वाजवायला घेतली.‘पण त्यातून खाँसाहेबांचे स्वर कुठे निघत होते... त्यातून शैलेशचाच आवाज निघत होता,’ शैलेशजी सांगत होते. ‘खाँसाहेबांचे स्वर निघेनात म्हणून मी कितीतरी वेळा वेगवेगळे राग वाजवून पाहिले पण काहीच कळेना. विचाराअंती आत्मावलोकन केल्यावर लक्षात आले, खाँसाहेबांची ईश्वरीय साधनाच या लाकडी वस्तूतून उमटेल, त्यांच्या साधनेशिवाय या शहनाईला काय अर्थ ? खाँसाहेब आहेत म्हणून शहनाई आहे.’ हे सांगताना शैलेशजींना अगदी गहिवरुन आले होते.
वयाच्या 11व्या वर्षापासून प्रयत्नांची शिकस्त केल्यानंतर शैलेशजींना खाँसाहेबांचे जसे शिष्यत्व मिळाले तशीच दुर्गादासजींची शहनाईही मोठय़ा प्रयत्नांनी मिळाली. त्यावेळी शैलेशजी अगदी तरुण होते. दुर्गादास काकांनी कितीतरीवेळ त्यांच्या शहनाई वाजविण्याच्या निष्ठेबद्धल, खाँसाहेबांच्या शिष्य असण्याबद्धल विश्वासच बसत नव्हता. शेवटी त्यांनी वाजवून दाखवल्यावरच दुर्गादासजींनी शैलेशजींना शहनाई बनवून दिली. ‘त्यांना माझे सुर पटवून द्यावे लागले पण नंतर आमचे सूर अगदी जन्मोजन्मीचे नाते असल्यासारखे जुळले. मी आलो, पाहिलं आणि जिंकलं असं फक्त फिल्मी दुनियेत घडतं. इथे गाठ शहनाईशी आहे, माझी, दुर्गादासजींची आणि शहनाईबरोबरच खाँसाहेबांशीही. सगळं सहज मिळत असेल तर मग मेहनत कशाला हवी ?’
खाँसाहेबांकडे सतत एक छत्री असायची. मोठा अवकाश असलेल्या या छत्रीखाली त्यांच्यामागे उभं राहताना त्यांच्या छत्राखाली मिळेल तितकं रहावं, एकही क्षण सोडू नये कारण न जाणो ही छत्री कधी बंद व्हायची ! असं त्यावेळी दुर्गादासजींना आणि शैलेशजींना वाटायचं. दोघांचंही खाँसाहेबांवर, शहनाईवर अतोनात प्रेम.
शहनाई कोण पराकोटीच्या साधनेने पुढे नेणार ही चिंता
खाँसाहेबांच्या शहनाईत मिठास होती. शंकरराव गायकवाड यांनी ध्वनिमुद्रिकेपर्यंत शहनाईला आणले त्यांच्या वादनाची पद्धत मराठमोळी होती व त्यासाठी विलक्षण ताकद लागायची. पण खाँसाहेबांच्या बनारसी पद्धतीच्या शहनाईवादनात ताकद कमी लागत असल्यामुळे एक प्रकारची सलगता वादनात आणता यायची, त्यात गोडवा असायचा जो नंतर उत्तर भारताबरोबरच दक्षिण भारतातही लोकप्रिय झाला. दोऱयाने ओढलेल्या एका साध्या खाटेवर दोन अंथरुणांसह झोपणारे खाँसाहेब परदेश दौरा विमानप्रवासामुळे करायला घाबरायचे. पण अनेकांनी त्यांचे मन वळविल्यानंतर 1962 साली त्यांनी काबूलचा दौरा केला होता जो अतिशय गाजला. खाँसाहेब नमाजी होते. नमाज कानावर पडावा म्हणून शैलेशजींना ते नेहमी त्यावेळी त्यांच्यासोबतच थांबायला सांगायचे. त्यातून दुवा मिळते असे ते म्हणत.
त्यांच्यासारखी अत्यंत संयमाने रियाज करणारा आज कोणीही सापडणे कठीण आहे. याबाबतीत दुर्गादासजींच्या म्हणण्याला दुजोरा देत ते म्हणतात, ‘आजची पिढी टेपरेकॉर्डर झालीय. लतादीदींसारखा तंतोतंत आवाज काढला वा कुणा दिग्गज तबलजींसारखा हुबेहूब त्रिताल वाजविला म्हणून आज रिऍलिटी शोमध्ये या पिढीचं प्रचंड कौतुक केलं जातं. पण अशा अनुकरणापेक्षा स्वत:ची शैली विकसित करु पाहणारे फार कमी. स्वत: खाँसाहेबांनाही हा प्रश्न सतावयाचा, शहनाई माझ्यानंतर कोण तितक्याच पराकोटीच्या साधनेने पुढे नेणार ही चिंता त्यांनाही असायची. त्यांनी शेवटपर्यंत शहनाईसाठी आपलं आयुष्य वेचलं. शहनाईवादनात तर आजच्या पिढीत असं कोण आहे हे आठवूनही सापडत नाही. मग काकांना आपली शहनाई पोरकी झालीय, मला शहनाई आता कोण पुढे तितक्याच तादात्म्यतेने वाजविल असे का वाटणार नाही?’

पूर्वी छातीवर आपल्याला मिळालेली मेडल्स लावून सायंकाळच्या कार्यक्रमासाठी लोक यावेत म्हणून जाहिरात करत फिरावे लागे. खाँसाहेबही आपली ती भारदस्त टोपी, शेरवानी घालून एकेकाळी असेच लोकांमध्ये कुतूहल निर्माण करुन फिरत असायचे, नवीन असताना. दिवसभर असे फिरल्यानंतर लोक कुतूहलापोटी सायंकाळी मैफिलीला जमायचे आणि मग समरसून दाद द्यायचे. त्याकाळी आजसारखी युटयूब, फेसबुकसारखी माध्यमे नव्हती. तरी त्यांची शहनाई सिनेमापर्यंत गेली. गुँज उठी शहनाई चित्रपट आठवत असेलच. आज माध्यमांचा सुकाळ आहे पण काकांच्या पोरक्या झालेल्या शहनाईला खाँसाहेबांइतका न्याय देणारा कुणी उरला नाही. मी पोटतिडकीने सांगत असतो, माझ्याकडे या, मला जितकं देता येईल तितकं देतो, शिकवतो. मी खाँसाहेबांच्या तालमीत 37 वर्षे वाढलो, आता कुणी रियाजासाठी, शिकण्यासाठी दहा वर्षेही द्यायला तयार नाही.’
‘मेरा बच्चा कहाँसे कहाँत पहुँचगया, बस्स एकही दुआँ है. तू दुसरा बिस्मिल्लाह बन जा’...
‘खाँसाहेब माझ्या एका कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमात त्यावेळी व्यासपीठावर कालनिर्णयचे जयंत साळगावकरही होते.’ कोणताही राग हा समोरच्या प्रेक्षकांना समजावा, त्यांना तो भावला पाहिजे यासाठी वाजविला पाहिजे, , प्रेक्षकांना तो कधीच अवघड, अवजड आणि कंटाळवाणा वाटायला नको असं सांगणाऱया खाँसाहेबांनी महफिल झाल्यानंतर आशिर्वादपर बोलण्यासाठी माइक हातात घेतला आणि एकदा नव्हे दोनदा मला ‘मेरा बच्चा कहाँसे कहाँत पहुँचगया, बस्स एकही दुआँ है. तू दुसरा बिस्मिल्लाह बन जा’.
यापेक्षा दुसरा आशिर्वाद काय असू शकतो. आयुष्याची कमाई हीच आहे मात्र वास्तवात दुसरा बिस्मिल्ला आता होणे नाही. शहनाईचा शहेनशहा एकच होता. पण त्यावेळी शहनाईचं खाँसाहेब गेल्यानंतर काय भविष्य असेल याची पाल मात्र मनात चुकचुकली होती जी आज दुर्गादासजींनाही लेथवर त्यांचा मुलगा शहनाईचे काम करत असलेले बघताना सतावत आहे. खाँसाहेब गेल्यानंतर 21 तोफांची सलामी त्यांना देण्यात आली होती. भारतरत्न होते ते. इथपर्यंत पोहचायला नुसते शहनाईतून स्वर उमटवून चालत नाही, त्यास अध्यात्माची जोड लागते, मेहनत लागते, परिश्रम लागतात ज्याची मानसिकता नसणाऱया पिढीने पायाखालची जमीन ओळखूनच चालावे. हे बोलत असताना त्यांनी शहनाई दुर्गादास यांनी बनविली पण त्यात चैतन्य निर्माण करण्याचे काम खाँसाहेबांनी केले आणि दुर्गादासजींची शहनाई सातासमुद्रापार गाजली. माझ्या शहनाईलाही खाँसाहेबांनीच घडवलं. गंगुबाई हनगल यांच्या 96व्या वाढदिवसाला शैलेशजींचा शहनाईवादनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता या दोघांमध्ये खाँसाहेबांच्या शहनाईचा दुवा होता आणि खाँसाहेबांची दुऑँ होती.
दुर्गादास यांना शिसव महाग झाले, अमुक महाग झाले यापेक्षा या उतावीळ पिढीच्या शहनाईवादनासंबंधीच्या उथळ दृष्टिकोनामुळेच शहनाईची चिंता आहे. खाँसाहेबांच्या शहनाईचे निर्माते म्हणून एका दिग्गज कलावंताने शहनाईची महती केवळ एका ओळीत सांगितली होती, ‘न छिला तो रहा पत्थर, छिला तो बना भगवान’.
आता दुर्गादास यांच्या शहनाईस खॉंसाहेबांनी देवत्व दिले खरे, शैलेशजींनी त्या देवत्वाची चाळीस वर्षे पूजा केली खरी पण या देवत्वाचा वारसा चालविणारा कुणी आता नाही. शहनाई खरंच पोरकी झाली.
साभार - दिव्य मराठी (दिवाळी अंक)






