Skip to main content

‘द व्हॉइस ऑफ हिंद रजब’ : एका चिमुकल्या मृत्यूचा जिवंत दस्तऐवज

Harun Sheikh
Today
5 min read
0 views
‘द व्हॉइस ऑफ हिंद रजब’ : एका चिमुकल्या मृत्यूचा जिवंत दस्तऐवज

हारून शेख


  • ट्युनिशियन दिग्दर्शिका काओथर बेन हानिया यांचा ‘द व्हॉइस ऑफ हिंद रजब’ सारखा एखादा चित्रपट समोर येतो आणि सिनेमा काय असू शकतो याची नव्याने जाणीव करून देतो. 


  • हा चित्रपट तुम्हाला अशा भीषण वास्तवाचा सामना करायला लावतो, ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करूच शकत नाही. 


  • एका निष्पाप मुलीचा अखेरपर्यंत जगण्यासाठी चाललेला आर्त संघर्ष तुमच्या मनावर कायमचे चरे, खडी, व्रण उमटवतो. 


  • गाझामधील पाच वर्षांच्या चिमुकल्या हिंद रजबच्या मृत्यूची केवळ एक घटना म्हणून नोंद न करता तिचा आर्त आवाज थेट प्रेक्षकांच्या अंतःकरणात उमटवून त्यांना हादरवून सोडणारा हा सिनेमा त्यामुळेच निराळा आहे.



Disclaimer : सदर लेखात 'द व्हॉइस ऑफ हिंद रजब’ या चित्रपटातील काही प्रसंग आणि तपशील चर्चिले आहेत. त्यामुळे प्रथम चित्रपट पाहू इच्छिणाऱ्यांनी रसभंग टाळण्यासाठी हा लेख नंतर वाचावा.


सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात, तणाव दूर सारून घटकाभर विरंगुळा मिळवण्यासाठी सिनेमा बघितला जातो. पण मोठं बजेट, कॉम्प्युटर ग्राफिक्स आणि भव्य स्पेशल इफेक्ट्सच्या (CGI/VFX) मदतीने तयार केलेलं चक्रावून टाकणारं विश्व चमकदार पल्लेदार संवाद आणि बरा अभिनय हे सगळं जरी असलं तरी या सिनेमातून माणसाचं खरं दुःख कुठेतरी हरवून जातं असं वाटतं.


पडद्यावर आकाशगंगांच्या पातळीवरचं युद्ध, विनाश आणि मृत्यू दिसतात, पण त्यातील मानवी वेदना मात्र जाणवत नाही. केवळ एका अम्युझमेन्ट पार्कात फिरून आल्याचा तो अनुभव असतो. प्रेक्षक म्हणून आपणही समोरच्या दृश्यांना इतके सरावून जातो की रक्त, आक्रोश आणि उद्ध्वस्त होत जाणारे अख्खे ग्रहच्या ग्रह हे केवळ पडद्यावरच्या प्रतिमा म्हणून उरतात. वास्तवाशी, माणसांच्या अस्सल कथांशी जोडून घेतल्यामुळे त्यातून समष्टीचा विश्वरूप अनुभव देणारा, त्यापुढेही दशांगुळे उरणारा कलानुभव हरवतो आणि अशा प्रकारचा सिनेमा हे केवळ संवेदनांना सुखावणारं वेळ घालवण्याचं साधन बनून राहतो.


अशा वेळी ट्युनिशियन दिग्दर्शिका काओथर बेन हानिया यांचा ‘द व्हॉइस ऑफ हिंद रजब’ सारखा एखादा चित्रपट समोर येतो आणि सिनेमा काय असू शकतो याची नव्याने जाणीव करून देतो. हा चित्रपट नेहमीच्या मनोरंजक चित्रपटांसारखा नाही. तो तुम्हाला मन शांतवणारा विरंगुळा देत नाही, तुमचे दुःख विसरायला लावणारी समाधी मिळवून देत नाही आणि कोणतीही खोटी आशा दाखवत नाही.


‘द व्हॉइस ऑफ हिंद रजब’ : गाझामधील पाच वर्षांच्या चिमुकलीचा आर्त संघर्ष


हा चित्रपट तुम्हाला अशा भीषण वास्तवाचा सामना करायला लावतो, ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करूच शकत नाही. पडद्यावर दिसणाऱ्या गोष्टी केवळ काल्पनिक नसून, त्यामागे खऱ्या, जिवंत हाडामांसाच्या लोकांचा, त्यांच्या रक्ताचा, त्यांच्या मृत्यूचा संदर्भ सतत अस्वस्थ करून सोडतो. एका निष्पाप मुलीचा अखेरपर्यंत जगण्यासाठी चाललेला आर्त संघर्ष तुमच्या मनावर कायमचे चरे, खडी, व्रण उमटवतो. गाझामधील पाच वर्षांच्या चिमुकल्या हिंद रजबच्या मृत्यूची केवळ एक घटना म्हणून नोंद न करता तिचा आर्त आवाज थेट प्रेक्षकांच्या अंतःकरणात उमटवून त्यांना हादरवून सोडणारा हा सिनेमा त्यामुळेच निराळा आहे.


जानेवारी २०२४ ची ती काळरात्र...पाच वर्षांची चिमुकली निष्पाप हिंद रजब तिच्या काका, काकू आणि पाच चुलत भावंडांसह कारमधून गाझा शहरातून पळून सुरक्षित ठिकाणी जात होती. तेल अल-हवा भागात असताना अचानक त्यांच्या कारवर इस्रायली सैन्याच्या 'मर्कावा' टँकमधून जोरदार गोळीबार करण्यात आला. या पहिल्याच जबरदस्त हल्ल्यात कारमधील ६ जण जागीच ठार झाले. केवळ हिंद रजब आणि तिची १५ वर्षांची चुलत बहीण 'लायन हमदा' जिवंत उरल्या होत्या.


User Image


लायन हमदा जेव्हा फोनवरून रेड क्रेसेंट सोसायटीशी बोलत मदतीची याचना करत होती, तेव्हाच टँकमधून पुन्हा गोळीबार झाला. फॉरेन्सिक तपासानुसार, अवघ्या ६ सेकंदांत ६४ गोळ्या झाडल्या गेल्या, ज्यात लायनचा आवाजही कायमचा बंद झाला. कारमध्ये आता फक्त ५ वर्षांची हिंद जिवंत होती. तिच्या अवतीभवती तिच्याच कुटुंबातील जिवलगांचे रक्ताळलेले मृतदेह होते. ती प्रचंड घाबरली होती आणि फोनवरून सतत विनवत होती, "मला भीती वाटतेय, प्लीज मला वाचवा, टँक माझ्या अगदी जवळ आला आहे." त्यानंतर घडलेला दुर्दैवी घटनापट दिग्दर्शिकेने सिनेमात प्रभावीपणे मांडला आहे. 


इतिहासाचा एक जिवंत आणि कधीही न पुसता येणारा दस्तऐवज


ही घटना केवळ जागतिक युद्धविषयक बातम्यांतली एक बातमी बनून राहू शकली असती; पण दिग्दर्शिका 'काओथर बेन हानिया' यांनी आपल्या कॅमेऱ्यातून तिला केवळ एक कोरडी बातमी न ठेवता, इतिहासाचा एक जिवंत आणि कधीही न पुसता येणारा दस्तऐवज बनवले आहे.


चित्रपटाची सर्वात धक्कादायक आणि वादग्रस्त गोष्ट म्हणजे हिंदचा खरा आवाज वापरण्याचा निर्णय. चित्रपटातील डिस्पॅच सेंटर, स्वयंसेवक आणि घटनाक्रम कलाकारांनी साकारले आहेत; पण फोनवर ऐकू येणारा थरथरता, घाबरलेला आवाज खऱ्या हिंद रजबचाच आहे.


“माझं सगळं कुटुंब मेलंय”, “अंधार होईल, मला भीती वाटते” तिच्या या वाक्यांमुळे प्रेक्षक आणि पडद्यामधलं अंतर संपतं. मृत्यूच्या सावलीत अडकलेल्या त्या मुलीची भीती, असहायता, तिच्या बाल मनातील गोंधळ, तिचं एकटेपण आणि मदतीसाठी पुन्हा पुन्हा केलेली विनवणी हे सगळं अंगावर येतं.


आता आपण चित्रपट पाहणारे तटस्थ प्रेक्षक उरत नाही, तर जणू त्या फोनच्या दुसऱ्या टोकाला उभे आहोत अशी भावना निर्माण होते. हिंदचा तो आवाज केवळ एक आवाज उरत नाही; तो मानवी असहाय्यता, युद्धाचा क्रूरपणा आणि जगाच्या सोयीस्कर मौनाचा पुरावा बनतो. ‘द व्हॉइस ऑफ हिंद रजब’ हा फक्त एक सिनेमा बघितल्यावर मनाला डागणी बसते. एक कधीही न विसरता येणारी भयाण आठवण तयार होते. आपण कुठल्या काळात जगलो आणि त्या जगात काय भयानक होत होते याची अस्वस्थ जाणीव कायम सोबत करते.


User Image


या चित्रपटाचे संपूर्ण कथानक 'पॅलेस्टाईन रेड क्रेसेंट'च्या डिस्पॅच कार्यालयात घडते. पडद्यावर कुठलीही उघड हिंसा नाही. तिथे आहेत फक्त सतत वाजणारे फोन, नकाशे, कागदी परवानग्या आणि एक अस्वस्थ करणारी प्रतीक्षा. एका निष्पाप मुलीचा जीव वाचवण्यासाठी रुग्णवाहिकेला अवघ्या काही मिनिटांचा रस्ता पार करायचा असतो; पण 'सुरक्षित मार्ग' आणि 'प्रशासकीय समन्वयाच्या' नावाखाली तासनतास वाया घालवले जातात. चित्रपट इथे युद्धाइतक्याच क्रूर असणाऱ्या 'प्रशासकीय हिंसेचा' क्रूर काळा चेहरा दाखवून देतो. कधीकधी नियमांच्या आड लपून चाललेली दप्तरदिरंगाई ही शस्त्रांइतकीच थंड धारदार कशी असते याचे दर्शन घडते.


चित्रपट नव्हे तर राजकीय स्टेटमेंट…


या चित्रपटाचा राजकीय सूर अत्यंत स्पष्ट आणि रोखठोक आहे. हा चित्रपट सध्याच्या हिंसेची मुळे पॅलेस्टाईनच्या इस्रायली कब्जामध्ये (Occupation) शोधतो. ७ ऑक्टोबर २०२३ नंतर सुरू झालेल्या हिंसक संघर्षाच्या पलीकडे जाऊन, दशकानुदशकांच्या पारतंत्र्याने पॅलेस्टिनी जनतेचे रोजचे जगणे कसे गुदमरवून टाकले आहे, याचे दाहक वास्तव यात दिसते.


चित्रपटातील एक स्वयंसेवक हताश होऊन, संतापून विचारतो, “ज्यांनी त्यांना मारलं, त्यांच्याशीच समन्वय कसा साधायचा?” त्यावर दुसरा पॅलेस्टिनी कर्मचारी अत्यंत शांतपणे पण तितक्याच दुःखाने उत्तर देतो, “हेच आपलं वास्तव आहे.” हा हतबल संवाद ऐकताना प्रेक्षकांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.


एका बाजूला निष्पाप लहान मुलांचा जीव घेणारी क्रूर शस्त्रास्त्रे आणि दुसऱ्या बाजूला केवळ कागदी परवानग्यांच्या आशेवर बसलेली हतबल माणसे; या दोन टोकांमधील दरी हा संवाद दाखवून देतो. इथे पीडिताला आपल्या मारेकऱ्याकडे जीवनदानाची भीक मागावी लागते. गेल्या अनेक दशकांपासून इस्रायली दडपशाहीखाली गुदमरणाऱ्या संपूर्ण पॅलेस्टिनी जनतेची अगतिकता आणि वेदना एका झटक्यात समोर येते. प्रेक्षकालाही या व्यवस्थेच्या क्रूरतेचा साक्षीदार बनवून अस्वस्थ करून सोडते.


चित्रपटाभोवती काही नैतिक प्रश्नही उभे राहतात. खऱ्या मुलीचा मृत्यूपूर्वीचा आवाज वापरणं योग्य आहे का? दुःखाचं सिनेमॅटिक रूपांतर करणं योग्य आहे का ? वगैरे. फ्रेंच समीक्षक जॅक रिव्हेट यांनी एकदा विचारलं होतं की सिनेमा जेव्हा मानवी शोकांतिकेला ‘सुंदर’ बनवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो नैतिक सीमारेषा ओलांडतो का? ‘द व्हॉइस ऑफ हिंद रजब’ हा प्रश्न पुन्हा समोर आणतो.


User Image


पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन हा चित्रपट आवश्यक वाटतो. आजच्या जगात युद्ध, मृत्यू आणि विध्वंस हे जणू केवळ कोरडे आकडे बनून गेले आहेत. बातम्यांतून सतत दिसणाऱ्या रक्तपातामुळे संवेदना बोथट झाल्या आहेत. अशा वेळी हिंदचा आवाज आपल्याला या कोलाहलात जरा थांबायला, विचार करायला भाग पाडतो.


आपण फक्त प्रेक्षक आहोत का? की या वास्तवाशी आपला काही नैतिक संबंध आहे? माणूस म्हणून, या अफाट मानवी संस्कृतीचा एक भाग म्हणून काही देणे घेणे आहे? हिंदच्या जागी माझी मुलगी असती तर? हिंदच्या मायभूमीऐवजी माझी भूमी असती तर?


'द व्हॉईस ऑफ हिंद रजब’ हा केवळ एक सिनेमा नाही, तर मानवतेच्या अंगावरची एक भळभळती जखम आहे. हा चित्रपट तुम्हाला कोणतीही तयार उत्तरं देत नाही. उलट तुमच्या मनात कधीही स्वस्थ न बसू देणारे प्रश्न सोडून जातो. आणि कदाचित एका महान कलाकृतीची खूण हीच असते. ती तुम्हाला आतून पूर्णपणे बदलून टाकते, मग तुम्ही त्यासाठी तयार असा किंवा नसा.


(सौजन्य - जन-गण-मंगलदायक फेसबुक पेज)

Share this article
लोकशाहीचे सजग प्रहरी व संघर्षाचे प्रतीक : जॉर्ज फर्नांडिस
कला / साहित्य / सिनेमा

लोकशाहीचे सजग प्रहरी व संघर्षाचे प्रतीक : जॉर्ज फर्नांडिस

फुटपाथवरच्या संघर्षमय आयुष्यातून देशाच्या संरक्षणमंत्री पदापर्यंत पोहोचलेले जॉर्ज फर्नांडिस हे भारतीय राजकारणातील सर्वात प्रभावी समाजवादी नेत्यांपैकी एक होते. १९७४ च्या ऐतिहासिक रेल्वे संपापासून ते आणीबाणीविरोधातील लढ्यापर्यंत त्यांनी सत्तेविरोधात निर्भीड भूमिका घेत लोकशाही मूल्यांचे रक्षण केले. कामगार नेता, उद्योगमंत्री, रेल्वेमंत्री, संरक्षणमंत्री आणि लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता अशा विविध भूमिकांमधून त्यांनी भारतीय सार्वजनिक जीवनावर अमिट ठसा उमटवला.

9 min read
V
Vikas Meshram
'ए मेरे वतन के लोगो'... सुमन कल्याणपूर आणि लता दीदी काय आहे संबंध?
कला / साहित्य / सिनेमा

'ए मेरे वतन के लोगो'... सुमन कल्याणपूर आणि लता दीदी काय आहे संबंध?

‘ऐ मेरे वतन के लोगो’ गाण्याची संधी ऐनवेळी हातातून निसटली, पण सुमन कल्याणपूर यांनी त्यासाठी कधीही लता मंगेशकरांना दोष दिला नाही. • लता मंगेशकर यांच्या आवाजाशी असलेल्या विलक्षण साम्यामुळे सुमनताईंना काम मिळालं, पण त्याच साम्यामुळे त्यांची स्वतंत्र ओळख अनेकदा झाकोळली गेली. • मराठी आणि हिंदी संगीतविश्वात दर्जेदार गायकीचा ठसा उमटवणाऱ्या सुमन कल्याणपूर यांच्या कारकिर्दीत प्रतिभेपेक्षा नियतीनेच अधिक परीक्षा घेतल्याची भावना अनेकदा उमटते.

7 min read
S
Sameer Gaikwad
जिथे आठवणी उजळतात, तिथे बशीर बद्र भेटतात…!
कला / साहित्य / सिनेमा

जिथे आठवणी उजळतात, तिथे बशीर बद्र भेटतात…!

महान शायर बशीर बद्र गेले, काळजात कळ उठली. पिकलं पान गळून पडलं. खरं तर ते गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनीक जीवनापासून दूर असले तरी त्यांचे काव्य हे असंख्य रसिकांच्या मनाला कायम भुरळ घालत राहिले आहे. बशीरजींच्या गेल्यानंतर त्यांच्या कार्याला प्रचंड प्रमाणात दिला जाणारा उजाळा हा त्यांच्या महत्तेची ग्वाही देणारा ठरला आहे.

7 min read
S
shekhar patil
महात्मा बसवेश्वर : ९०० वर्षांपूर्वी पाळीचा विटाळ झुगारून देणारा महापुरुष
कला / साहित्य / सिनेमा

महात्मा बसवेश्वर : ९०० वर्षांपूर्वी पाळीचा विटाळ झुगारून देणारा महापुरुष

ज्याकाळात आधुनिकता ह्या शब्दाचा मागमूस देखील नव्हता. जेव्हा स्त्रिया सोडाच पण माणसालाच माणूस म्हणून वागवलं जात नव्हतं. अशा काळात एका महात्म्याने मासिक पाळीला विटाळ म्हणण्यास कडकडून विरोध केला होता. महात्मा बसवेश्वर यांनी जनन, मरण, जात, रजस्व आणि उच्छिष्ट हे पंचसूतक नाकारलंय. त्यापैकी जन्म आणि रजस्व ही दोन्ही सुतकं थेट स्त्रीत्वाशी नातं सांगतात. त्यामुळे मासिक पाळीतला विटाळ पाळणं, स्पर्श केल्यास अपवित्र झाल्याचं मानणं, हे बसवण्णांच्या विचारांच्या विरोधात आहे.

4 min read
C
Channveer Bhadreshwarmath
 ‘’जेव्हा फाळणीने क्रिकेटच्या दोन जिवलग मित्रांना मैदानावर प्रतिस्पर्धी बनवलं…’’
कला / साहित्य / सिनेमा

‘’जेव्हा फाळणीने क्रिकेटच्या दोन जिवलग मित्रांना मैदानावर प्रतिस्पर्धी बनवलं…’’

भारत-पाकिस्तान क्रिकेटचा इतिहास आपण अनेकदा युद्ध, राष्ट्रवाद आणि तणावाच्या चौकटीत पाहतो. पण या वैराच्या मुळाशी एक अशी कहाणी दडलेली आहे, जिथे दोन क्रिकेटपटू एकाच शहरात वाढले, एकाच मैदानावर खेळले आणि एकमेकांना मित्र मानत मोठे झाले. फाळणीने त्यांना दोन देशांच्या विरुद्ध बाजूंवर उभं केलं; पण त्यांच्या मैत्रीच्या आठवणी सीमारेषाही पुसू शकल्या नाहीत. ही केवळ दोन क्रिकेटपटूंची गोष्ट नाही; ती फाळणीने जखमी झालेल्या उपखंडाची, तुटलेल्या नात्यांची आणि तरीही माणुसकी जिवंत राहू शकते, या आशेची कहाणी आहे. आता आशुतोष गोवारीकर आणि आमिर खान फाळणीच्या पार्श्वभूमीवर याच घटनेवर आधारित चित्रपटाची तयारी करत असल्याची चर्चा सुरू आहे.

10 min read
A
Akshay Ramesh
अजिंठ्याची पारू : प्रेम, उपेक्षा आणि इतिहासाचा अंधार…दीडशे वर्षांनंतरही रॉबर्ट स्मरणात राहिला, पण पारूची ओळख धूसरच!
कला / साहित्य / सिनेमा

अजिंठ्याची पारू : प्रेम, उपेक्षा आणि इतिहासाचा अंधार…दीडशे वर्षांनंतरही रॉबर्ट स्मरणात राहिला, पण पारूची ओळख धूसरच!

अजिंठ्याच्या संशोधकाला शिल्पकहाणीची गाथा उघडल्यावर, एक कहाणी विलक्षण लक्ष वेधून घेते, ती कहाणी म्हणजे रॉबर्ट गिल आणि पारूची प्रेमकथा. जी अजिंठ्याच्या शिल्परांगेत एक जिवंत शिल्प बनून उभी आहे. अमर पावली आहे... अजिंठ्याच्या पारू आणि रॉबर्ट गिलची प्रेमकथा गेली दीडशेहून अधिक वर्ष जगाने ऐकली आहे. भेदाच्या भारतीय समाज मानसाने अजिंठ्याच्या पारूच्या प्रेमकथेला नावे ठेवली, विपर्यस्त करून सांगितले. जिच्या प्रेमकथेने अजिंठ्याच्या कातळालाही भावनांनी ओलावून टाकले, त्या पारूची समाधी आज मात्र उपेक्षा, दुर्लक्ष आणि विस्मृतीच्या सावलीत उभी आहे. आज २३ मे हा पारूचा स्मृतीदिवस त्यानिमित्ताने एका ‘सैराट’ कथेची झालेली ही आठवण.

6 min read
V
Vira Rathod

Comments

Comments are currently disabled or loading...