रितेश शिसोदे
- ख्रिस्तोफर नोलन यांच्या The Odyssey या चित्रपटात ‘हेलन ऑफ ट्रॉय’ च्या भूमिकेसाठी कृष्णवर्णीय अभिनेत्री लुपिता न्यॉन्ग'ओची निवड होताच जगभरात वादाला तोंड फुटलं.
- काहींनी तो इतिहासाचा अपमान असल्याचं म्हटलं, तर काहींनी त्याला कलात्मक स्वातंत्र्याची अभिव्यक्ती मानली.
- पण हा वाद केवळ एका चित्रपटापुरता मर्यादित नाही. तो दोन हजार वर्षांपासून आपण जपलेल्या सौंदर्याच्या कल्पनांवर, वर्णभेदाच्या अदृश्य भिंतींवर आणि इतिहासाकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनावर प्रश्न उपस्थित करतो.
- हेलनचा रंग नेमका कोणता होता, याचे उत्तर कदाचित कधीच मिळणार नाही; पण तिच्या रंगावरून सुरू झालेली ही चर्चा आपल्या समाजाबद्दल बरेच काही सांगून जाते.
"जगातील सर्वात सुंदर स्त्री कृष्णवर्णीय कशी असू शकते?" सोशल मीडियावर हा प्रश्न हजारो वेळा विचारला जात आहे. काहींनी तो रागाने विचारला, काहींनी उपहासाने, तर काहींनी इतिहासाच्या नावाखाली. एका चित्रपटाच्या कास्टिंगने एवढा गदारोळ का माजावा, असा प्रश्न अनेकांना पडला. पण हा वाद फक्त एका चित्रपटाचा नाही. तो आपल्या डोळ्यांचा, आपल्या कल्पनाशक्तीचा आणि सौंदर्याच्या आपण केलेल्या व्याख्येचा आहे. म्हणूनच जगप्रसिद्ध दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांच्या बहूचर्चित The Odyssey या चित्रपटाभोवती निर्माण झालेला वाद हा केवळ हॉलीवूडचा विषय राहत नाही तर तो थेट आपल्या समाजातील वर्ण, इतिहास आणि सौंदर्याच्या राजकारणावर येऊन थांबतो.
या वादाचा केंद्रबिंदू आहे ‘हेलन ऑफ ट्रॉय’... जगाच्या सांस्कृतिक इतिहासातील सर्वाधिक प्रसिद्ध स्त्री पात्रांपैकी एक. हजारो वर्षांपूर्वी ग्रीक कवी होमरने रचलेल्या इलियड आणि ओडिसी या महाकाव्यांमधील हेलन ही अशी स्त्री आहे, जिने एका युद्धाला जन्म दिला, असं मानलं जातं. तिच्याविषयी लिहिताना पाश्चात्त्य साहित्याने शतकानुशतके एकच प्रतिमा जपली ती म्हणजे अतुलनीय सौंदर्य असलेली स्त्री. इतकी सुंदर की तिच्यासाठी राजे लढले, साम्राज्ये उद्ध्वस्त झाली आणि हजारो जहाजे समुद्रात उतरली. इंग्रजीतील प्रसिद्ध वाक्य "The face that launched a thousand ships" हे तिच्यासाठीच वापरलं जातं.

दोन हजार वर्षांपूर्वीचे महाकाव्य, आजचा वाद
‘ट्रोजन’ युद्धाची कथा इतिहास आणि पुराण यांच्या सीमारेषेवर उभी आहे. इ.स.पूर्व बाराव्या शतकात एजियन समुद्र परिसरात ट्रॉय नावाचं एक समृद्ध शहर होतं, याचे पुरातत्त्वीय पुरावे उपलब्ध आहेत. मात्र हेलन, पॅरिस, अॅकिलीस किंवा ओडिसियस ही पात्रं नेमकी ऐतिहासिक व्यक्ती होती की पौराणिक यावर आजही मतभेद आहेत. अनेक अभ्यासकांच्या मते ट्रोजन युद्ध घडलं असावं, परंतु होमरने त्याला महाकाव्याचं रूप दिलं आणि अनेक पौराणिक घटक त्यात मिसळले. त्यामुळे ‘ओडिसी’ हा इतिहासाचा दस्तऐवज नसून साहित्य, पुराण आणि मानवी कल्पनाशक्तीचा अद्वितीय संगम मानला जातो.
इलियडमध्ये युद्धाची कथा आहे, तर ओडिसी हे युद्धानंतर इथाकाचा राजा ओडिसियस घरी परतण्याच्या दहा वर्षांच्या प्रवासाचं महाकाव्य आहे. राक्षस, समुद्रदेव, जादूगारिणी, मोह, विश्वासघात, प्रेम, युद्ध आणि घराची ओढ या सगळ्यांनी विणलेली ही कथा पाश्चात्त्य साहित्याचा पाया मानली जाते. म्हणूनच प्रत्येक पिढीने ओडिसी नव्याने सांगण्याचा प्रयत्न केला. रंगभूमीवर, चित्रकलेत, ऑपेरामध्ये, कादंबऱ्यांमध्ये आणि सिनेमात. प्रत्येक दिग्दर्शकाने त्याच्या काळानुसार या कथेला नवीन अर्थ दिला आहे.
क्रिस्टोफर नोलन यांनीही हेच करण्याचा प्रयत्न केला. Memento, Inception, Interstellar, Dunkirk आणि Oppenheimer यांसारख्या चित्रपटांत वेळ, स्मृती, नैतिकता आणि मानवी संघर्ष यांचा वेध घेणाऱ्या नोलन यांनी The Odyssey कडेही केवळ ऐतिहासिक किंवा पौराणिक कथा म्हणून न पाहता मानवी प्रवास म्हणून पाहिल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांना शब्दशः पुनर्कथन करायचं नव्हतं तर त्यांना आधुनिक प्रेक्षकांशी संवाद साधणारा अनुभव तयार करायचा होता. त्यामुळेच चित्रपटातील पात्रांच्या मांडणीत आणि कलाकारांच्या निवडीत त्यांनी पारंपरिक चौकटी मोडण्याचा प्रयत्न केला.
… आणि यामुळेच वादाला सुरुवात झाली. ‘हेलन ऑफ ट्रॉय’च्या भूमिकेसाठी ऑस्कर विजेती अभिनेत्री लुपिता न्यॉन्ग'ओ हिच्या नावाची घोषणा होताच सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. "ग्रीक स्त्रीची भूमिका आफ्रिकन वंशाच्या अभिनेत्रीला कशी देता येईल?", "हा इतिहासाचा अपमान आहे", "हॉलीवूड पुन्हा एकदा राजकीय शुद्धतेच्या नावाखाली इतिहास बदलत आहे", "जर आफ्रिकेच्या राणीची भूमिका श्वेतवर्णीय अभिनेत्रीला दिली असती तर काय झालं असतं?" असे प्रश्न विचारले जाऊ लागले. काहींनी तर हा "वोक संस्कृतीचा अतिरेक" असल्याचाही आरोप केला.

हेलन ऑफ ट्रॉय नेमकी कोण होती?
ट्रोल करणाऱ्यांचा मुख्य युक्तिवाद साधा होता. जर एखादा चित्रपट स्वतःला ग्रीक महाकाव्यावर आधारित म्हणत असेल, तर त्यातील पात्रांची वंशीय आणि सांस्कृतिक ओळखही त्या काळाशी सुसंगत असली पाहिजे. हेलन ही स्पार्टाची राणी होती. तिचे चित्रण भूमध्य प्रदेशातील स्त्रीप्रमाणे व्हायला हवं, अन्यथा हा इतिहासाचा विपर्यास आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. काही इतिहासप्रेमींनी असंही नमूद केलं की ऐतिहासिक किंवा पौराणिक पात्रांचे आधुनिक राजकीय कल्पनांनुसार रूपांतर करणं म्हणजे मूळ साहित्याचा अवमान आहे. त्यांच्या मते हा प्रश्न वर्णद्वेषाचा नसून ऐतिहासिक प्रामाणिकतेचा आहे.
परंतु समर्थकांनी याच मुद्द्याला वेगळ्या पद्धतीने उत्तर दिले आहे. त्यांनी सर्वप्रथम एक मूलभूत प्रश्न विचारला. नेमक्या कोणत्या इतिहासाची आपण चर्चा करत आहोत? कारण ओडिसी हा इतिहासाचा ग्रंथ नाही; तो महाकाव्य आहे. त्यात देव आहेत, समुद्रातून उभे राहणारे राक्षस आहेत, जादूने माणसांना डुकरांत रूपांतर करणाऱ्या स्त्रिया आहेत. जर या सर्व गोष्टी स्वीकारल्या जात असतील, तर हेलनच्या त्वचेच्या रंगावरच इतका आग्रह का धरला जातो? होमरने हेलनच्या सौंदर्याचं वर्णन केलं आहे, पण तिच्या त्वचेचा रंग निश्चित करणारं स्पष्ट वर्णन केलेले नाही. मग "जगातील सर्वात सुंदर स्त्री" ही कल्पना आपण नकळत "जगातील सर्वात गोरी स्त्री" अशी का करतो?
एका कास्टिंगने जगभर का पेटली चर्चा?
याच प्रश्नाने हा वाद चित्रपटातून बाहेर पडून समाजशास्त्र, इतिहास, वसाहतवाद आणि वर्णभेदाच्या चर्चेत प्रवेश करतो. इतिहासात असे अनेक प्रसंग आहेत, जेथे समाजाने आपल्या काळातील सौंदर्याच्या व्याख्या भूतकाळावर लादल्या. हेलन ऑफ ट्रॉयही त्याला अपवाद नाही. Renaissance (१४वे ते १७वे शतक) च्या काळात चित्रकारांनी हेलनला गोऱ्या त्वचेची, सोनेरी केसांची, निळ्या डोळ्यांची स्त्री म्हणून रंगवले. नंतर हॉलीवूडने त्या प्रतिमेला अधिक दृढ केलं. विसाव्या शतकात बनलेल्या जवळपास सर्व चित्रपटांत हेलन गोरीच होती. त्यामुळे अनेकांच्या मनात हेलनची जी प्रतिमा तयार झाली, ती प्रत्यक्षात होमरच्या शब्दांतून नव्हे तर शतकानुशतकांच्या चित्रकला, साहित्य आणि सिनेमातून तयार झालेली होती. म्हणूनच आज जेव्हा कृष्णवर्णीय अभिनेत्री त्या भूमिकेत दिसते, तेव्हा अनेकांना तो "इतिहास बदलला" असं वाटतं. प्रत्यक्षात बदल इतिहासात नसतो; तो आपल्या डोक्यात तयार झालेल्या प्रतिमेत असतो.

नोलन आणि लुपिता यांचे उत्तर
वाद अधिक तीव्र झाल्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांचे म्हणणे होते की कोणत्याही मोठ्या चित्रपटाबद्दल प्रदर्शनापूर्वी होणाऱ्या चर्चा, आरोप आणि वाद हे नवे नाहीत. त्यांनी यापूर्वी The Dark Knight, Dunkirk आणि Oppenheimer च्या वेळीही अशाच प्रतिक्रिया पाहिल्या आहेत. नोलन यांच्या मते चित्रपट हा स्वतंत्र कलामाध्यम आहे. प्रेक्षकांनी चित्रपट पाहण्यापूर्वी त्याचा निकाल लावण्यापेक्षा संपूर्ण कलाकृती पाहून मत बनवावे. The Odyssey चा उद्देश संग्रहालयातील वस्तूंची पुनर्निर्मिती करणे नाही, तर होमरच्या महाकाव्यातील मानवी संघर्ष आजच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे आहे. त्यांच्या मते प्रत्येक पिढीला प्राचीन कथा नव्याने सांगण्याचा अधिकार असतो; अन्यथा त्या कथा जिवंत राहत नाहीत.
अभिनेत्री लुपिता न्यॉन्ग'ओनेही या टीकेला शांतपणे उत्तर दिले. तिने स्पष्टपणे सांगितलं की, ती इतिहासावर आधारित चित्रपटात नव्हे तर पौराणिक महाकाव्याच्या आधुनिक रूपांतरात काम करत आहे. तिच्या मते The Odyssey ही मानवी प्रवासाची कथा आहे आणि त्या कथेत आजच्या जगातील विविधतेचे प्रतिबिंब दिसणं स्वाभाविक आहे. कलाकाराची निवड त्वचेच्या रंगावर नव्हे, तर अभिनयक्षमतेवर व्हावी, असा लुपिताचा आग्रह होता. तिने कोणावरही प्रतिआरोप केले नाहीत, मात्र या वादातून एक गोष्ट स्पष्ट झाली कीआजही जगभरात त्वचेचा रंग हा केवळ जैविक वैशिष्ट्य नसून सांस्कृतिक आणि राजकीय प्रश्न बनलेला आहे.
या वादाचे समर्थक म्हणतात की कला जर समाजासोबत बदलत नसेल, तर ती कालबाह्य होते. शेक्सपियरच्या नाटकांमध्ये आज स्त्रिया पुरुषांच्या भूमिका करतात, कृष्णवर्णीय कलाकार हॅम्लेट साकारतात, जपानी कलाकार किंग लिअर करतात आणि भारतीय रंगभूमीवर ग्रीक शोकांतिका सादर होतात. कोणी त्याला इतिहासाचा अपमान म्हणत नाही. मग हेलनच्या बाबतीतच इतका आक्षेप का? त्यांचा प्रश्न आणखी टोकदार आहे, आपल्याला खरंच इतिहासाची काळजी आहे की गोऱ्या सौंदर्याच्या प्रतिमेची?
मात्र विरोधकांचाही युक्तिवाद पूर्णपणे फेटाळून लावता येत नाही. ते म्हणतात, प्रतिनिधित्वाच्या नावाखाली ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संदर्भ पुसले जाऊ नयेत. आफ्रिकन इतिहासावर चित्रपट बनवताना आफ्रिकन कलाकारांचा आग्रह धरला जातो, आशियाई पात्रांसाठी आशियाई कलाकारांची मागणी केली जाते, मग ग्रीक पात्रांच्या बाबतीत वेगळे निकष का? त्यांच्या मते विविधतेचे समर्थन महत्त्वाचे आहे, पण त्यासाठी मूळ सांस्कृतिक संदर्भ बदलणे योग्य नाही. हा मुद्दाही चर्चेला पात्र आहे. कारण इतिहास आणि कलात्मक स्वातंत्र्य यांच्यातील सीमारेषा नेमकी कुठे आखायची, याचे एकच उत्तर नाही.

गोरेपणा, वसाहतवाद आणि सौंदर्याचे राजकारण
पण या संपूर्ण चर्चेत सर्वात महत्त्वाचा प्रश्न वेगळाच आहे. आपण "जगातील सर्वात सुंदर स्त्री" असं ऐकताच आपल्या डोळ्यांसमोर कोण उभं राहतं? गोरी त्वचा, सरळ केस, टोकदार नाक, निळे किंवा हिरवे डोळे? ही प्रतिमा कोणी तयार केली? होमरने? की हॉलीवूडने? की युरोपीय वसाहतवादाने? की सौंदर्यप्रसाधन उद्योगाने? की आपल्या समाजाने?
भारतात हा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा आहे. येथे शतकानुशतके गोरेपणाला श्रेष्ठत्वाची जोड दिली गेली. विवाहाच्या जाहिरातींपासून चित्रपटांपर्यंत "गोरी, सुंदर, सुसंस्कृत" ही शब्दयोजना सामान्य मानली गेली. फेअरनेस क्रीमच्या जाहिरातींनी तर गोरेपणाला यश, प्रेम, नोकरी आणि आत्मविश्वास यांच्याशी जोडले. अनेक उत्तम अभिनेत्री सावळ्या असल्यामुळे त्यांचा मेकअप करून रंग उजळवण्यात आला. अनेक अभिनेत्यांनाही तेच करावे लागले. म्हणजेच हेलनचा वाद हा केवळ ग्रीसचा किंवा हॉलीवूडचा नाही; तो आपल्या घरातही आहे.
आपण जर उद्या एखाद्या भारतीय दिग्दर्शकाने द्रौपदीची भूमिका गडद सावळ्या वर्णाच्या अभिनेत्रीला दिली, किंवा सीतेची भूमिका ईशान्य भारतातील अभिनेत्रीला दिली, तर आपली प्रतिक्रिया काय असेल? आपण त्याला कलात्मक स्वातंत्र्य म्हणू की इतिहासाचा अपमान? या प्रश्नाचे उत्तर देताना आपल्या मनातील पूर्वग्रह समोर येतात. म्हणूनच The Odyssey भोवतीचा वाद महत्त्वाचा आहे. तो आपल्याला नोलन किंवा लुपिता यांच्याबद्दल कमी आणि स्वतःबद्दल जास्त सांगतो.
हेलन ऑफ ट्रॉयचा खरा रंग आज कोणालाच माहीत नाही. कदाचित तो कधीच समजणार नाही. पण तिच्या रंगाबद्दल सुरू झालेल्या चर्चेने एक गोष्ट निश्चित सिद्ध केली आहे. दोन-अडीच हजार वर्षांपूर्वी लिहिलेली कथा आजही आपल्या समाजातील जखमा उघड करू शकते. महान साहित्याचे हेच वैशिष्ट्य असतं. ते प्रत्येक काळात नव्याने वाचलं जातं, नव्याने समजलं जातं आणि नव्याने वाद निर्माण करतं. The Odyssey ही त्याला अपवाद नाही.
कदाचित या संपूर्ण वादाचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, आपण खरंच हेलनच्या त्वचेच्या रंगाबद्दल बोलतो आहोत का? की आपण अजूनही आपल्या मनात खोलवर रुजलेल्या त्या जुन्याच कल्पनेचे संरक्षण करतो आहोत. सौंदर्य म्हणजे गोरेपणा. जर या चित्रपटाने जगाला हा प्रश्न पुन्हा विचारायला भाग पाडले असेल, तर त्याने प्रदर्शनापूर्वीच एक मोठे सांस्कृतिक काम करून ठेवले आहे. कारण प्रत्येक वाद चुकीचा नसतो. काही वाद समाजाला आरसा दाखवतात. The Odyssey भोवती निर्माण झालेला वाद त्यापैकीच एक आहे.






