लोकगीतांमध्ये कोणतीही लपवाछपवी न करता लोकांच्या भावना प्रकट होत असतात म्हणून ही गीतं आपली वाटतात. रोजच्या जगण्याच्या गोष्टी असलेल्या या गीतांमधून वैयक्तिक अनुभव आणि आठवणी गुंफलेल्या असतात म्हणूनच त्यांना लोकांच्या ओठांवर कायमचं स्थान मिळालं आहे. या गीतांमधून लोक परंपरा आणि संस्कृतीच्या सोबतच स्त्री-पुरुष संबंधांचं सुंदर चित्रणही असतं. त्यात जगण्याचा संघर्षासोबतच प्रेमाचे हळवे, नाजूक क्षण देखील स्त्रियांच्या गीतांमधून पाझरत असतात.
प्रेमाच्या गोष्टी यातून मुक्तपणे उधळल्या जातात. ज्या स्वातंत्र्यासाठी स्त्रियांना आधुनिक जगात लढावं लागलं, त्याच स्वातंत्र्याचा या गीतांमधून कधीपासूनचा घोष केला जातोय ते कोणालाही माहिती नाही. लैंगिकतेविषयीचं स्वातंत्र्य एरव्ही स्त्रियांना बोल्ड किंवा अश्लील नावाखालीच मिळतं. पण लोकजीवनात अश्लील काहीच नसतं. त्याची अनेक उदाहरणं या गीतांमधून बघायला मिळतात. आपल्या खासगी क्षणाच्या गोष्टीही स्त्रिया सहजपणे गाऊ शकतात. शृंगार रसातील अनेक गीतांमध्ये दांपत्य प्रेमाचे क्षण शालीनपणे ओवले जातात.
अँखिया भइले लाल, एक नींद सुतअ द बलमुआ,
चढत फागुनवा गौना ले के आईले,
मीठी मीठी बतिया में सुधिया हरायिले
टुटे लागल मोर पोर पोर हो,
अरे एक दिन सुत द बलमुआ,
रसे रसे भइले कठोर हो अँखिया भइले लाल.
नवविवाहितेच्या मनातील भावना अगदी सहजपणे इतक्या साध्या सुंदर शब्दांत सांगण्याची कला लोकगीतांमध्येच असते. त्यामुळे स्त्रियांच्या मनापर्यंत पोहोचण्याचा मार्ग लोकगीतांमधून जातो. अगदी अंतरंग क्षणांचं वर्णन करणारी गीतंही अश्लील वाटत नाही. शृंगाररसाने परिपूर्ण अशी गीतं आवडीनं गायली जातात, ऐकलीही जातात.

लोकगीतांमध्ये स्त्रियांची स्वप्नं, आशा, आकांक्षा, तक्रारी, इच्छा, सारं काही असतं. लोक समाज शृंगारप्रिय समाज आहे. ऋतू परिवर्तनासोबतच लोकांच्या मनांतही परिवर्तन घडू लागतं. विशेषतः वसंत ऋतूची अवस्था तशीही मादकच असते. निसर्गात सगळीकडे उल्हास भरलेला असतो. लोकमनही आपला उत्साह आणि प्रसन्नता दर्शवण्यासाठी गीतांचा आश्रय घेतात. यातून प्रेमाची गाणी गायली जातात.
प्रेम तसं तर कामाची मानसिक अभिव्यक्ती आहे पण आधुनिक समाजात कामशक्तीला उघडपणे स्वीकारण्याचा कल कमी असतो. कामाचं नाव ऐकताच लोक लाजतात, मर्यादा पाळतात, संकोचतात. पण लोकजीवनात कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय कामाचा स्वीकार केला जातो. निर्मळ मनाने कामाची अभिव्यक्ती गीतांच्या माध्यमातून केली जाते. तरुण असो, प्रौढ असो, सारेच सामुहिकपणे ही गाणी गातात आणि ऐकतात. लोकसंस्कृतिचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे यातील मोकळेपणा. प्रेमसंबंधांसाठी जशी मोकळी जागा लोकसाहित्यात मिळते तशी अन्यत्र क्वचितच मिळते. मिलनोत्सुक नवविवाहिता म्हणूनच गाते,
“जोबन एडी की धमक से ढलो जाये, भायेली गौना कब होयगौ,
जोबन भरै तरंग मेरौ झुक झोका खावै,
कामदेव बलवान हर घडी अपनौ दखल जमावै,
एरी मेरी आंखिन में नसा सौ रह्यो आवै, भायेली गौना कब होयगौ।”
परदेशी गेलेल्या पतीच्या विरहात पत्नी म्हणते,
“चढल जवानी जोर पियऊ हो गइलन कठोल,
हमें छोड़ के लोभइलन परदेस, छोड़ के लोभइलन परदेस,
बटोही भाई गौना कराके दिहलन घरवा में बइठाई,
का कईली कसूर जे परदेस गइलन पराई।”
ज्या धीटपणे लोकगीतांमध्ये स्त्रिया गातात त्यांतून आपल्या म्हाताऱ्या नवऱ्यासोबत एका तरुण बायकोला असलेल्या अतृप्तीचे भावही सहजपणे प्रकट होतात. ब्रज भाषेतील एका प्रसिद्ध लोकगीतात स्त्रिया म्हाताऱ्या नवऱ्याला शिव्या घालत म्हणतात,
“बिन मेल बिगड़ गया खेल, बुढे से मेरी जोड़ी ना मिले,
पाँच बरस की मैं मेरी मैना, पचपन के भरतार,
वे तो ले गये लगन लिखाय, बुढ़े से मेरी जोड़ी ना मिले।
छ बरस की मैं मेरी मैना, पचपन के भरतार,
वे तो ले गये तोरन मार, बुढ़े से मेरी जोड़ी ना मिले।
याकू बाबा कहूँ भरतार, बुढ़े से मेरी जोड़ी ना मिले।”
लोकजीवनात अशी अनेक गाणी आहेत ज्यांत जबरदस्तीच्या लादलेल्या नात्यांविषयी स्त्रिया आपली नाराजी प्रकट करतात. लोकगीतांमध्ये अशा प्रकारची अभिव्यक्तीची स्वतंत्रता अन्य माध्यमांपेक्षा कितीतरी जास्त आहे. लोकसाहित्य या बाबतीत फार उदार आहे. मैथिली भाषेतील प्रसिद्ध विद्यापति रचित गीतामध्ये बेजोड विवाहाविषयी एक स्त्री आपल्या भाग्यासाठी स्वतःला दोष देत म्हणते,
“पिया मोर बालक हम तरुणी गे,
पिया मोर बालक हम तरुणी गे,
कोन तप चुकल भेलहुं जननि गे।”

या लोकगीतांच्या स्त्रीवादी समीक्षेचे अनेक पैलू आहेत. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्त्री मनाच्या अभिव्यक्तिचं मुक्त स्वातंत्र्य. ग्रामीण स्त्रियांसाठी लोकगीतं ही त्यांच्या अभिव्यक्तीचं एक महत्त्वाचं माध्यम आहे, ज्यात ते आपल्या भावना निःसंकोचपणे बोलून मोकळ्या होतात. आपली ओळख न देताच त्यांना या गोष्टी करता येतात.
त्यामुळे या रचना लोकांच्या होतात. सर्वांसोबत हसून, बोलून आपलं दुःख, आपली व्यथा वाटून घेण्याचा हा एक प्रकार आहे. या गीतांमध्ये नवरा, सासू, ननंद यांना टोमणे मारणारे गीतं असतात, लग्नाच्या विविध रितीविषयीची गीतं असतात. पण यातही या स्त्रिया हसतखेळत एकमेकांना ज्या ‘गारी’ म्हणजे शिव्या देतात त्याचा वेगळाच आनंद असतो. या शिव्या या गीतांचा अविभाज्य अंग असतात. स्त्रिया आपल्या भावना त्यातून मुक्तपणे बोलून दाखवतात. त्याचप्रकारे कामं करताना, शेतात लावणी-रोपणी करताना बायका गातात.
या गीतांच्या अंतरंगात शिरणं म्हणजे या स्त्रियांच्या अंतरंगात शिरण्यासारखंच असतं. दांपत्यांसाठी चैत म्हणजेच चैत्राचा महिना जितका सुखद असतो तितकाच विरहाने व्याकुळलेल्या एकाकी जीवांसाठी तो दुःखद असतो. चैत म्हणजेच मधुमास. वसंताच्या आगमनानंतर चैत महिन्यात चैती गीतं गायली जातात ज्यांना ‘चैतार’ किंवा ‘चैतावर’ म्हणतात. ‘हो रामा’ किंवा ‘आहो रामा’चा झील म्हणजे चैती गीतांची ओळख असते.
“रामा चइत के निंदीया बड़ी बइरिनिया
हो रामा सुतलो बलमुआ नहीं जागे
हो रामा या सुतल संइया के जागवै
हो रामा तोरी मीठी बोलियाँ।
अब ले त रहू कोइली बन के कोइलिया
अब तुहूं भइलू सवतिनिया
हो रामा तोरी मीठी बोलियाँ।”
इथं पती-पत्नीच्या एकांतात कुहूराम करणाऱ्या कोकीळेची तक्रार केली आहे की ती आपल्या कुहूकुहूनं झोपलेल्या पियाला उठवत आहे. पहिले ती संध्याकाळीच कुहूकायची पण आता तर मध्यरात्रीही बोलतोय आणि एकांतात विघ्ण आणते. लोकगीतांची उत्सवप्रियता आणि उल्हास यांची गोष्टच निराळी आहे. चिरयौवन आणि चिरसौंदर्य म्हणजे लोकगीत.
आषाढ़ ते जेष्ठाषाढ़ पर्यंतच्या बारा महिन्यांचा उल्लेख असलेली गीतं बारहमासा म्हणून प्रसिद्ध आहेत. यातही मिलन आणि वियोगाची गीतं गायली जातात. कारण रोजगारासाठी परदेशी गेलेला नवरा आणि त्यामुळे एकट्यानं राहण्याची शिक्षा भोगणारी बायको ही ग्रामीण जीवनाची कटू वास्तवता आहे. “आज भी रेलिया बैरन पिया को लेकर परदेश चली जाती है।” अशात बारा महिने एकट्यानं काढणं कठीण होऊन बसतं.
“सवनवा मोरा लेखे बैरी भइल,
भादों भवन सोहावन न लोगे
आसिन मोहि ना सुहाई,
कातिक कंत बिदेस गइल हो,
समुझि समुझि पछिताई,
अगहन आइल ना, कहि गइल उधौ,
पूस बितल भरि मास,
माघ मास जोवन के मातल,
कइसे धरब जिऊ आस,
फागुन फरकेला नैन हमार,
चैत मास सुनि पाई,
पियना ने अइहन एहि बैसाखे,
फुलवन सेजिया सजाई
जेठ मास में आकुल जैसे राधे,
नाहिं बाड़े साम हमार,
सवनवा मोरा लेखे बैरी भइल असाढ़।”

लोकगीतांमध्ये स्त्री मनाची व्यथा मोठ्या शालीनतेने अभिव्यक्त करण्याची आणि संकेतांमध्ये सर्व काही सांगण्याची चतुराई असते. अभिजात वर्गाच्या तुलनेत ग्रामीण प्रवृत्ती प्रेमाची असते. गीत, नृत्य, आणि उत्साहाने भरलेलं लोकजीवन बदलत्या ऋतूंच्या सौंदर्यपूर्ण अनुभवांना लोकगीतं, कजरी, झुमर इत्यादींद्वारे अभिव्यक्त करतात. मन आणि निसर्ग यांची एकतानता यामुळे ही गीतं जीवंत होतात.
“अरे बैरन हो गई चुनईया में कैसे कहूँ,
जिनकी बैरन सास ननदिया,
रात की बैरन चुनईया मैं कैसे कहूँ, कै
कैसे कैसे चुनईया डुबी,
साजन बड़े सोवइया में कैसे कहूँ,
कैसे तैसे मैंने साजन जगायो,
ललना ब़ड़े है रोवैया मैं कैसे कहूँ,
जैसे तैसे मैंने ललना सोवाओ,
बोलन लगी चिरैया मैं कैसे कहूँ।”
संपूर्ण गीतात संयुक्त कुटुंबातील एक स्त्री आपल्या पतीसोबत एकांत मिळावा म्हणून प्रयत्न करते पण ते निष्फळ ठरतात याचं सुंदर चित्रण या वरील गीतात आहे.
आज स्त्रिया आधुनिक रुपात सशक्त आहेत पण तरीही मोठ्या संख्येनं स्त्रिया आपल्या लैंगिकतेविषयी मुक्तपणे बोलू शकत नाहीत. सभ्य आणि शालीनपणाचा मुखवटा घालून आपलं असहाय जगणं त्यामागे लपवण्याची स्थिती ग्रामीण स्त्रियांची नसते. कारण त्या आपली सारी व्यथा अशा गीतांद्वारे मुक्तपणे बोलून दाखवतात.
शारिरीक संदर्भात ज्या गोष्टी बहुतेक स्त्रिया बोलायला घाबरतात किंवा संकोच करतात त्या सर्व लोकगीतांच्या माध्यमातून उघडपणे त्या व्यक्त करू शकतात. बारहमासातील वियोग असो किंवा संयोग असो, फाग चैती, डहकन अशी लोकगीतांची उधळणच लोकजीवनात आहे ज्यामुळे हे जगणं समृद्ध झालं आहे.
सौजन्य - फेमिनिजम इन इंडिया
(अनुवाद - प्रतिक पुरी)






