'एक बंदा काफी है' या सिनेमाची आठवण करून देणारा 'महाराज' हा नवीन सिनेमा वादाची ठिणगी पडल्याने अधिकच चर्चेत आला. या दोन्ही चित्रपटात एक कमालीचा फरक आहे तो म्हणजे 'एक बंदा' सिनेमातील मुलीला आपले शोषण होते याची जाणीव तरी होते. पण 'महाराज' या सिनेमातील स्त्रियांना भक्ती रसातून शृंगार रसात जाताना आपले शोषण होते याची यत्किंचीतही जाणीव होत नाही.
शोषणाची जेव्हा जाणीव होते तेव्हा मात्र उशीर झालेला असतो. गर्भपात, लैंगिक आजार या सारख्या समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागते. भोगवस्तू म्हणून वापरले जाण्याचे शल्य त्यांना सतावतं. याचं कारण म्हणजे भक्तीमुळे निर्माण झालेली कमालीची श्रद्धा आणि अनिष्ट प्रथेला असलेली समाज मान्यता...हीच कमालीची श्रद्धा आणि प्रथेचा स्वीकार कुठलीही शंका घेत नाही!
अशी अंधभक्ती अयोग्य गोष्टीवर योग्यतेची मोहर उमटवते, अनैतिक गोष्टींवर नैतिकतेचा मळवट भरते, गंजलेल्या विचाराला सुवर्णाचे बेगड लावते... महाराजांचा आशीर्वाद, प्रसाद, कृपा यामुळेच त्यांच्या बाहू पाशात जाण्याचं भाग्य आपणास मिळालं आहे ही भावना अंधश्रद्धेचं अत्युच्च टोक गाठते. श्रद्धेतून अंधश्रद्धेकडे होणारा हा प्रवास तरुण पत्रकार करसनदास बघतो.
सुरवातीला श्रद्धेबद्दल मवाळ भूमिका घेणारा हा पत्रकार नंतर हिमतीने वैचारिक लढा देत महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडून महाराजांच्या लैंगिक विकृतीचा पर्दाफाश करतो. धर्म सुधारणेच्या चळवळीचा एक शिलेदार म्हणून करसनदास विरुद्ध पाखंडी महाराज यातील संघर्षाची ही स्वातंत्र्यपूर्व काळातील कहाणी दिग्दर्शक सिद्धार्थ पी. मल्होत्रा यांनी 'महाराज' या सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांसमोर मांडली आहे.

'इंडियन ल्युथर' करसनदास
1862 मध्ये स्वातंत्र्यपूर्व भारतातील बॉम्बे प्रेसिडेन्सीमधील बॉम्बे हायकोर्टात महाराज मानहानीचा खटला चालला होता. 'सत्य प्रकाश' साप्ताहिकाचे संपादक करसनदास मुलजी आणि प्रकाशक नानाभाई रुस्तमजी रानीना यांच्या विरोधात वैष्णवांच्या पुष्टीमार्ग पंथाचे मुख्य पुजारी जदुनाथजी बृजरतनजी महाराज यांनी हा मानहानीचा खटला दाखल केला होता.
'सत्य प्रकाश' सुरू करण्यापूर्वी करसनदास हे दादाभाई नौरोजी यांच्या 'रास्त गोफ्तार' मध्ये सामाजिक लेख प्रकाशित करत होते. परंतु 'रास्त गोफ्तार' मध्ये महाराजांविरोधी लेख छापण्यास असहमती असल्याने त्यांनी स्वतःचे साप्ताहिक सुरू केले. करसनदास यांच्या महाराजांविरोधात लिहिलेल्या 'सत्य प्रकाश' मधील लेख महाराजांच्या जिव्हारी लागल्याने हा खटला दाखल करण्यात आला होता.
सती प्रथा, बालविवाह, विधवांचे केशवपन याप्रमाणे चरणसेवा ही प्रथा सुद्धा अस्तित्वात होती. ही चरणसेवा प्रथा म्हणजे महाराजांची अतृप्त लैंगिक इच्छा शमावण्याची पद्धती होती. या चरणसेवेलाच करसनदास यांनी आपल्या लेखनातून तीव्र विरोध केला. त्यांनी या पाखंडी बाबाला आपल्या लेखणीतून फटकारे मारले. सनातनी पंथावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
देवत्वाच्या मुखवट्याखाली असलेला वासनांध चेहरा उघडकीस आणला... हायकोर्टात वैद्य भाऊ दाजी लाड यांची साक्ष महत्त्वाची ठरली. महाराजांनी अनेक स्त्रियांशी लैंगिक कृत्य केल्यामुळे ते सिफलिस या गुप्तरोगाचे शिकार झाले होते. त्यांच्यावर लाड यांनी उपचार केले होते.
अनेकांची साक्ष होऊन शेवटी स्रियांचे लैंगिक शोषण केल्याचे निदर्शनास आल्याने महाराज ही केस हारले, या केसमुळे त्यांचा समाजातील असलेला दबदबा पुरता ढासळला. तर स्वतःचा बचाव यशस्वीपणे केल्यामुळे करसनदासची निर्दोष मुक्तता झाली. स्थानिक इंग्रजी प्रेसने करसनदास यांना 'इंडियन ल्युथर' असे संबोधून गौरव केला.
खरं तर सत्य घटनेपासून प्रेरित असलेला 'महाराज' हा सिनेमा 14 जूनला ओटीटी वर रिलीज होणार होता. पण एक आठवडा त्यासाठी थांबावे लागले. आमिर खानचा मुलगा जुनैद खान या चित्रपटातील मुख्य कलाकार आहे. आमिर खानच्या 'पीके' सिनेमावर हिंदू कट्टर पंथीय मंडळी आधीच नाराज होती.
त्यात भर घातली त्याच्या मुलाने! हा सिनेमा हिंदूंच्या भावना दुखवू शकतो, त्यातून सार्वजनिक सुव्यवस्था बिघडू शकते अशा आशयाची याचिका कोर्टात दाखल झाली. गुजरात हायकोर्टाने प्रदर्शनावर सुरवातीला स्थगिती आणली. चित्रपट पाहिल्यावर त्यांना काही आक्षेपार्ह आढळलं नाही आणि थोडासा बदल सुचवत प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केला.
तरीही कुठलाही टीझर, ट्रेलर, प्रमोशन अशा भानगडीत न पडता 'स्लीपर मूव्ही' पद्धतीने तो प्रदर्शित करण्यात आला. असं असलं तरी अजूनही या सिनेमाला विरोध करण्याचं काम हिंदू संघटनांनी चालूच ठेवलं आहे. सांस्कृतिक दहशतवाद हा कलाक्षेत्रावर कसं वर्चस्व ठेवू पाहतो याचं हे उदाहरण आहे.
चरणसेवेच्या नावाखाली शृंगार रसात भिजणारा महाराज ही लैंगिक विकृती आहे हे जोपर्यंत आपण सारासार विचार करून समजून घेऊ शकत नाही तोपर्यंत अशा कलाकृतीला धर्माच्या नावाने अविवेकी पद्धतीने विरोध होतच राहणार!... विवेकवादी समाजनिर्मितीसाठी विचार करणे, चिकित्सक होणे, प्रश्न विचारणे, सत्याचा स्वीकार करणे गरजेचे असते.

अनैतिकतेवर नैतिकतेचे पांघरूण
पुष्टी मार्ग म्हणजे आत्म्याचं परमात्म्याशी मेळ, अहंम भाव त्यागून परमात्म्यात विलीन होणे, देवासाठी तन - मन - धन अर्पण करणे, असं मानलं जातं. म्हणजेच समर्पण भावनेने आपली बहीण, पत्नी देवाच्या सेवेला पाठवणे. या सेवेचा अर्थ महाराजांच्या लेखी शृंगार सेवा आहे. कारण महाराजांनी स्वतःलाच कृष्णाचा वंशज म्हणून घोषित करून टाकलं आहे. देव म्हणजे आपणच आहोत असा त्यांचा दंभ आहे.
भक्तीच्या बाजारात माणसाला देवपण देण्याच्या प्रवृत्तीमुळे महाराजांचा उष्टा प्रसाद खाणे, महाराज चालतील त्या रस्त्यावर खाली पडून श्रद्धापूर्वक नमन करणे, महाराजांचे पाय जमिनीवर न पडू देता हातावर अलगद घेणे ,आपल्या पत्नीने - बहीणीने महाराजांची चरणसेवा करण्यात धन्यता माणणे, नुकत्याच लग्न झालेल्या मुलीने पहिली चरणसेवा महाराजांना देणे, ही चरणसेवा हवेलीच्या खिडकीतून लोकांनी श्रद्धापूर्वक पाहणे, या साऱ्या घटना म्हणजे आंधळी भक्ती कोणत्या थराला जाऊ शकते याचं रास्त उदाहरण आहे.
एखाद्या माणसाला देवत्व दिलं की भक्त त्यांच्या समर्थनासाठी हर एक प्रकारे मैदानात उतरतात. अशा महाराजांभोवती सुरक्षा कवच निर्माण करतात. श्रद्धास्थानाला धक्का लागणार नाही याची काळजी वाहतात. धर्माबाबत संवेदनशील होऊन विचाराची कवाडे बंद करतात.
सारासार विवेक करण्याची क्षमताच नष्ट झाल्यामुळे अनैतिकतेवर नैतिकतेचे पांघरूण घालतात. कधीकाळी त्यांचा भ्रमनिरास होतोही, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो!
सिनेमात श्रद्धा आणि विचार यातील समन्वयाची भूमिका सुरुवातीला नायकाची राहिलेली आहे. करसनदास हे रुढीप्रिय आहेत. त्यांनाच समकालीन असलेल्या जोतीबा फुले यांच्यासारखी धर्माची चौकट त्यांना तोडता येत नाही की नवीन पर्याय देता येत नाही. आपल्या चौकटीत राहूनच ते समाज बदलाची भाषा बोलतात. तत्कालीन परिस्थितीशी जुळवून घेत समाज सुधारणेत पुढे येतात.
समग्र परिवर्तनाची अभिलाशा ते धरत नाही तर आपल्या डोळ्यासमोर दिसणारी घाण स्वच्छ करणं हाच त्यांचा ध्यास आहे. असं असलं तरी करसनदास यांचं काम दुर्लक्षित करता येत नाही. त्यांची उदारमतवादी वृत्ती, सुधारणावादी विचार आणखी अभ्यास करून समजून घेतली पाहिजे. विधवांचा पुनर्विवाह व्हावा, महिलांना सन्मान मिळावा यासाठी त्यांनी आपली लेखणी चालवली.
जोपर्यंत तुम्हाला प्रश्न पडत नाही तोपर्यंत उत्तराच्या वाटा सापडण्याची शक्यता कमी असते असा संदेश नकळतपणे हा सिनेमा आपल्याला देतो. पुरुषसत्ता पद्धती मात्र प्रश्न पडू नये यासाठी नेहमीच कार्यरत असते. कारण प्रश्नातूनच नव विचार, नव पर्याय उभा राहण्याची शक्यता असते. नवा विचार पुरुष सत्ता पद्धतीला नेहमीच अस्वीकारणीय असतो !...
हा सिनेमा सौरभ शाह यांच्या गुजराती भाषेतील 'महाराज' पुस्तकाचे रूपांतरण आहे. 'ज्या घटनेत काळाची घडी आधीच विस्कटली आहे, त्यावर कल्पनेची इस्तरी फिरून काय उपयोग? पण आजही तरुण मुली धर्माचार्याच्या भोग-लालसेला बळी पडत आहे. डगमगणारी श्रद्धेची ज्योत पुन्हा प्रज्वलित करण्याचा प्रयत्न 'महाराज' कादंबरीच्या पानांत पहायला मिळतो.' असा आशय पुस्तकाच्या मलपृष्ठावर आहे.
यातील पत्रकार देशद्रोही नसून धर्मप्रेमी आहे याकडे लेखकाने अंगुली निर्देश केला आहे. प्रश्न हा आहे की उजव्या विचाराची पाठराखण करणाऱ्या या लेखकाने पाखंडी बाबावर पुस्तक का लिहिलं असावं?.. कारण त्यांना धर्माला, पंथाला लक्ष्य करायचं नाही तर फक्त व्यक्तीचा दोष दाखवून साळसूदपणे निसटती भूमिका घ्यायचीय !... म्हणून ते या कादंबरीला हिंदूविरोधी, सनातनविरोधी, वैष्णव संप्रदायविरोधी कादंबरी असं न म्हणता बचावात्मक पावित्रा घेऊन स्वतःभोवती संरक्षणात्मक वर्तुळ आखतात.
सिनेमात जयदीप अहलावत याने महाराजाची भूमिका अत्यंत चोखपणे बजावली आहे. सुखासीन आयुष्य, ऐश्वर्यातून आलेला अहंम भाव, देवत्वाची झालर यातून आलेली प्रौढी वृत्ती आणि गिळून घेतलेला राग यातील सारा अर्क आपल्या हसऱ्या चेहऱ्यातून प्रकट करणे हे सगळं कसदार अभिनेत्याला जमू शकतं. जुनैद खान याने संयमी तितकाच धाडसी पत्रकार करसनदास साकार केला आहे. शोषित स्त्रियांचा तारणहार म्हणून तो ठामपणे उभा आहे.
त्याच्या पहिलाच चित्रपटातून तो कुठेही नवखा कलाकार वाटत नाही. सिनेमाच्या काही त्रुटीही जाणवतात. जुन्या पद्धतीचे चित्रण करताना कलर ग्रेडिंगकडे लक्ष दिलेले नाही. दुसरे साप्ताहिक काढण्याचा निर्णय, कोर्ट रूम ड्रामा आटोपता घेण्यात आला आहे. चित्रपटातील क्लायमॅक्स साधता आलेला नाही.

'जो धर्म उत्तर देऊ शकत नाही तो धर्म अपूर्ण असतो'
धर्म, प्रथा, अंधश्रद्धा, महापुरुष यांच्याबद्दल चिकित्साच करू नये अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. याबद्दल मत व्यक्त करणारे नाटक आणि सिनेमा आले की 'बॉयकॉट' च्या नावाने न पाहताच त्याच्यावर बोलले जाते, विरोध दर्शविला जातो.
'अन्नपूर्णी' हा तामिळ सिनेमा प्रचंड विरोधामुळे नेटफ्लिक्स वरून काढून टाकण्यात आला आहे. या सिनेमामुळे लव्ह जिहादचा धोका उद्भवू शकतो असं हिंदू संघटनांचं म्हणणं आहे. पुजाऱ्याच्या मुलीने मांसाहार करणे, देवाने मांसाहार केल्याचा उल्लेख या सिनेमात असणे ही गोष्टही त्यांना रुचलेली नाही. काय खावे? आणि कुणावर प्रेम करावे? याचाही बंदिस्त साचा निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.
उजव्या शक्तीमुळे मुक्त वैचारिक चर्चा करण्याचा प्रकार प्रत्यक्षपणे किंवा सोशल मीडियावर बंद होण्याच्या मार्गावर आहे. कोणी वैचारिक चर्चा केली की त्याला ट्रोल करून जेरीस आणले जाते. जे लोक महापुरुषांच्या फोटोपासून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने व्हिडिओ तयार करून अश्लील संवाद त्यात घालतात ते लोक सर्वसामान्य माणसाचं जगणंच मुश्किल करून टाकतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
धर्मातील वाईट प्रथा, प्रवृत्तीवर बोलणं सुद्धा गुन्हा ठरत आहे. अशा काळात करसनदाससारखी व्यवस्थेला प्रश्न विचारणारी सुधारणावादी चळवळीची माणसं निर्माण होणे काळाची गरज आहे. 'जो धर्म उत्तर देऊ शकत नाही तो धर्म अपूर्ण असतो' अशी करसनदास यांची मांडणी आहे. अशा माणसांचा इतिहास हेतूपुरस्कर लपविला जातो.
'तत्कालीन चौकटीत राहून महिला सन्मानासाठी दिलेला लढा' अशी ही एक घटना असली तरीही ती ऐतिहासिक म्हणून महत्त्वाची असतेच. आपापल्या पातळीवर जमेल तसा संघर्ष करणारी अशी माणसं अभ्यासक्रमात येत नाही की विद्यापीठात दिसत नाही. कारण त्यांना खड्यासारखी बाजूला केले जाते. म्हणून अशा दुर्लक्षित पैलूवर सिनेमा येणे ही फार मोठी गोष्ट आहे.






