विश्वाचा पहिला हुंकार म्हणजे ध्वनी. आमच्या सर्वच संगीत कलेचा आद्य निर्माता. मग त्याला सोबत केली ती वारा, पाणी, आकाश व निसर्गातल्या इतर घटकांनी. आता हेच बघानां बांबू हे खरे तर अतिशय जलद गतीने वाढणारे गवत आहे. आमच्या जीवनात मात्र बांबूने असे स्थान पटकावले की आम्हाला शेवटच्या प्रवासातही याचीच साथ लागते. असे म्हणतात की बांबूच्या बनात भुंग्यानी पोखरून छिद्र केलेल्या बांबूत जेव्हा वारा प्रवेश करायचा तेव्हा एक वेगळाच ध्वनी त्या ठिकाणाहून ऐकू यायचा. हा ध्वनी ऐकून मग कुणा वेड्या माणसाला सर्वप्रथम एक कल्पना सुचली असावी आणि मग तयार झाले बासरी हे वाद्य.
पावा, बाँसुरी, वेळू, फ्लूट वगैरे वगैरे नावाने हे वाद्य मग जगभर प्रचलित झाले. एक साधा पोकळ बांबू पण त्यावर पारखी नजर पडताच ते आद्य वाद्यापैकी हे एक प्रमूख वाद्य म्हणून मान्यता पावले. अगदी प्राचीन काळा पासून हे वाद्य गुराखी वाजवत आले आहेत. आजही सर्व सामान्य लोक छंद म्हणून बासरी वाजवतात. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात गायन हे सर्वात वर मानले जाते मग वाद्यांचा क्रमांक. वाद्ये नेहमी संगतीसाठीच वापरली जात.
त्यातही गायकाची संगत फक्त तबला, मृदूंग, हार्मोनियम व सारंगी किंवा व्हायोलिन या पलिकडे नव्हतीच. तर स्वतंत्र वाद्य वादनात पहिला मान तंतू वाद्यानां त्यातही सतार सर्वात आघाडीवर. या सर्वात बासरी तशी मागेच होती. तेव्हा ती होती पण इटुकलीच. एक लहानसे लोकवाद्य…

या लहानशा बासरीला खरा आकार तर दिला तो पंडित पन्नालाल घोष या संगीत प्रज्ञावंताने. बासरी शास्त्रीय अंगाने वाजवायची तर ती भारदस्त असायला हवी हाही त्यांचाच विचार. त्यांनी मग सर्वप्रथम 32 इंच लांबीची व 7 छिद्र असणारी शास्त्रीय वादन शक्य होईल अशी बासरी तयार केली. काय गंमत बघा अत्यंत वेगाने वाढणाऱ्या बांबूची बासरी मात्र कित्येक वर्ष लहानच होती.
तिला 32 इंच लांब व्हायला 18वे शतक उजडावे लागले. क्रिएटीव्हिटीची प्रक्रिया अशी प्रदीर्घच असते. पं. पन्नालालजी यांनी मग हा रानावनातला गुराखी बांधवाचा वेणू थेट शास्त्रीय संगीताच्या व्यासपिठावर आणून तर ठेवलाच पण त्याला मानमरातबही मिळवून दिला. त्यावेळी त्यांनाही कदाचित माहित नसेल की त्यांच्या जन्मानंतर 27 वर्षांनी जन्म घेतलेल्या एका मिठाईवाल्या पैलवानाचा मुलगा याच बासरीचा जगभर डंका वाजविणार आहे.
हा मुलगा मातीत न घुमता पावा घुमवणार होता
कलेच्या प्रांतात अनेकदा गंमतीशीर प्रसंग घडतात. गंगाघाट अर्थात अलाहाबादला जन्मलेल्या “हरी”चे नाव वडिलांनी तो पुढे बासरी वाजवणार म्हणून नव्हते ठेवले. त्यांना तर आपल्या मुलाला कुस्तीगिर करायचे होते. एक शक्तीशाली शरीर असलेला रेस्लर बनवायचे होते. पाच वर्षाचा हरी तसा वडीलांसोबत आखाड्यात तर जायचा पण त्याला खुणवायचे ते त्याच्या शेजारच्याच पं. राजाराम यांच्या घरातून येणारे संगीताचे सूर. कुस्तीच्या आखाड्यात तो वडीलांच्या इच्छेने जात असे कारण तो काळ वडीलांच्या धाकात रहाणाऱ्या मुलांचा होता. हा मुलगा मातीत न घुमता पावा घुमवत अख्ख्या जगाला डोलायला लावेल असं जर कुणी त्याच्या वडिलांना सांगितलं असतं तर त्यानी त्या व्यक्तीला धोबीपछाड मारून घरचा रस्ता दाखवला असता. पण असच घडलं.
त्यांच्या शेजारच्या घरातील संगीताच्या सुरांनी या लहानग्यावर असा काही डाव टाकला की आज पर्यंत त्यानां सोडवता आला नाही. आईची लोरी मन लावून ऐकणाऱ्या हातात बासरी देखील त्याच्या आईनेच दिली. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी हरीची आई कायमची दुरावली. पण पुढच्या संघर्षमय आयुष्यात त्यांना आणखी एक आई मिळणार होती व ती त्यांची गुरूही होणार होती.
लपून चोरून संगीत शिकण्याची मुशाफिरी करत हरी पोहचला तो थेट वाराणशीच्या पं. भोलानाथ प्रसन्ना यांच्याकडे आणि येथून हरीच्या बासरीचा सूरमयी प्रवास सुरू झाला तो आजतागयत सुरूच आहे. पं. भोलानाथ यांच्याकडे त्यांनी आठ वर्षे बासरी शिकली. याच काळात ओरिसाच्या कटक आकाशवाणी केंद्रात त्यानां नोकरीही मिळाली. 1952 मध्ये त्यांनी आपला स्वतंत्रपणे सोलो बासरी कार्यक्रम देण्यास सुरूवात केली. कलावंताना अगदी कमी वयातच संघर्षाची सुरूवात करावी लागते. विशेष म्हणजे आयुष्याच्या शेवटा पर्यंत त्यांचा संघर्ष संपत नाही. 
‘’मी अगदी 100 व्या वर्षांपर्यंतही बासरी वाजवेन’’
एका मुलाखतीत त्यानां जेव्हा विचारले गेले की- “मागे वळून पाहताना नेमके काय आठवते?” त्यावेळी ते म्हणाले – की “मला आठवतो तो संघर्ष… सहजासहजी काही मिळाले तर त्यांची किमत फारशी राहात नाही. वडिलांनी तालमीत जायला सांगितले त्याचा फायदा पूढील आयुष्यात झाला. बासरी वादनासाठी आवश्यक शक्ती मला मिळाली. मी अगदी 100 व्या वर्षांपर्यंतही बासरी वाजवेन… माझा संघर्ष तर आजही सुरूच आहे.”
मेहर घराण्याचे संस्थापक बाबा अल्लाऊद्दीन खाँ म्हणजे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे विद्यापीठच. सरोद वादनातील तर ते उस्ताद होतेच पण अनेक भारतीय वाद्यातही ते पारंगत होते. संगीत शास्त्रातील सर्वोत्तम शिक्षक व संगीतातील आदर्श गुरू. पं. रवी शंकर(सतार वादक), अली अकबर खान(सरोद वादक व त्यांचे पूत्र), निखील बॅनर्जी(सतार वादक), वसंत राय(सरोद वादक),पन्नालाल घोष(बासरी वादक),राबिन घोष(व्हायोलिन वादक), व्ही.जी.जोग(व्हायोलिन वादक)वगैरे सारखे एकापेक्षा एक सरस शिष्योत्तम त्यांनी तयार केले.
गुरूआई जन्मदात्या आईपेक्षाही सरस ठरली…
रोशनआरा खान ही बाबा अल्लाऊद्दीन खाँ यांची कन्या. पूर्वीच्या मेहर (म.प्र.) संस्थानाचे राजे महाराज ब्रजनाथ सिंघ हे रोशनआरा खान यानां प्रेमाने अन्नपूर्णा देवी असे म्हणत. पूढे तेच नाव रूढ झाले. त्या सूर बहार या वाद्यात पारंगत आहेत…..1941 मध्ये पं. रवी शंकर यांच्या बरोबर त्यांचे लग्न झाले.1942 मध्ये त्यानां मुलगा झाला. शुभेंद्र शंकर हे त्याचे नाव. तो ग्राफिक आर्टीस्ट व म्युझिक कंपोजर होता….. अन्नपूर्णा देवी आणि पं.रवी शंकर 1962 मध्ये वेगळे झाले. वेगळे झाल्यानंतर अन्नपूर्णा देवीने सूरबहारचे कार्यक्रम देणे कायमचे बंद केले..हरीप्रसाद यांची दुसरी आई म्हणजे याच अन्नपूर्णा देवी होत.
त्यांचे शिष्यत्व पत्करताना अनेक अटी हरीप्रसाद याना मान्य कराव्या लागल्या….उदा: यापूर्वी जे काही शिकले ते सर्व विसरून नव्याने सुरू करायचे…..तसेच बासरी वादन पूर्वीसारखे उजव्या बाजूने न करता डाव्या बाजुने करायचे…हरीप्रसाद यानी सर्व मान्य केले. खरं तर दुसरी अट अवघडच होती. कारण आज पर्यंतचा सर्व सराव मोडून नव्याने सुरू करायचे होते. पण जिद्दीपूढे सर्व काही ठेंगणे असते…शिष्य सर्व परीक्षेत पास झाला….गुरूआई जन्मदात्या आईपेक्षाही सरस ठरली.
आयुष्याच्या अखेरपर्यंत ही गुरूआई आपल्या 80 वर्षाच्या या लहान मुलाला अनेकदा बिनधास्त फटकारत असे आणि या मुलालाही याचा प्रचंड अभिमान वाटत असे…सर्व धर्मजाती पलिकडे जाऊन निर्माण झालेले हे नाते आजही दर क्षणाला अधिकाधिक घट्ट होत जातना दिसते. तर त्यांच्याच म्हणण्यानुसार संगीतातल्या आत्म्याचा शोध हरीप्रसादजीना अन्नपूर्णा देवी यांच्या सहवासात लागला व हे ऋण ते आजही मान्य करतात.
60-70 वर्षापूर्वीचे अनेक दिग्गज शास्त्रीय कलावंत सिने संगीत व पाश्चात्य संगीत या पासून स्वत:ला निग्राहाने लांब ठेवत असत. अर्थात इथेही जे अपवाद होते व आहेत त्यात पंडित हरीप्रसादजी यांचे नाव आग्रहाने घ्यावे लागेल. ‘’सिने संगीताची आपल्याला आवड सुरूवाती पासून होती व आहे’’ हे ते प्राजंळपणे मान्य करतात. इतकेच नाही तर संगीत कुठलेही असो कोणत्याही भाषेतील वा देशातील असो जे कानाला मोहवते ते सुंदरच..ही त्यांचा धारणा असल्यामुळे ते सिनेमा संगीत दिग्दर्शनाकडेही वळू शकले. 
‘शिव-हरी’ यांचे भारतीय सिने संगीतात पदार्पण
भारतीय चित्रपट प्रेक्षकानां “शिव-हरी”(शिवकुमार शर्मा आणि हरीप्रसाद चौरसिया) हे नाव माहित झाले ते यशराज चोप्रा यांच्या “सिलसिला’’(1981) या चित्रपटामुळे. मात्र या जोडीने 1964 मध्ये आलेल्या ‘’जहाँआरा’’ या मदन मोहन यांनी संगीत दिलेल्या चित्रपटात सर्वप्रथम काम केले होते. तलत मेहमूदचे ‘फिर वही शाम फिर वही गम’ या अजरामर गाण्यात पंडितजीच्या बासरीचे हळवे कातर स्वर ऐकता येतील. तर दुसरे गाणे ‘मै तेरे नजर का सुरूर हूँ…’ यात शिवकुमारजीच्या संतूरचा शिडकावा अनुभवता येईल. 60 च्या दशकातील अनेक संगीतकारांची ही आवडती जोडी होती.
खूपच कमी शास्त्रीय गायक व वादक चित्रपट संगीताकडे वळत असत..अर्थात् इथेही अपवाद शिवकुमार व हरीप्रसाद यांचा….1967 मध्ये दोघांनी प्रसिद्ध गिटार वादक ब्रजभूषण काबरा यांना सोबत घेऊन एक अल्बम तयार केला….Call of the Valley . हा अल्बम लाईट संगीताने नटलेला असल्यामुळे त्याकाळच्या तरूणाई आकर्षित् झाली. मी तर म्हणेन की या अल्बमने तरूणाईला शास्त्रीय संगीताकडे खेचून आणले. अल्बमची तुफान विक्री झाली. या मध्ये अहिर भैरव, नटभैरव, पिलू, भूप, देस, पहाडी, बागेश्वरी, मिश्र किरवानी अशा विविध रागाचां सुंदर गुलदस्ताच आहे. या अल्बमने परदेशातही अफाट लोकप्रियता मिळवली.
जॉर्ज हॅरिसन, डेव्हीड क्रॉसबे, पॉल मॅकार्टन,बॉब डेलन आणि रॉजर मॅक्ग्युईन या सारख्या पाश्चात्य संगीत कलावंताना भूरळ पाडली. आज सर्वत्र फ्युजनची एक लाट आहे त्याचा पाया पंडित हरीप्रसाद व शिवकुमार या कलावंतानी रचला आहे. अर्थात पं. रवी शंकर यांचा मोठा वाटा आहेच. पूढे 1996 मध्ये पुन्हा या दोघांनी The Valley Recalls या लाईव्ह अल्बमची निर्मिती केली.
बी.आर.चोपडा यांच्या चित्रपटासाठी काम करत असतानां त्यांचे लहान भाऊ यशराज चोपडा यांची या दोघावर नजर गेली. त्यांनी ‘काला पत्थर’(1979) या चित्रपटाची ऑफरही दिली पण त्यांनी तेव्हा नकार दिला. या नकारा मागे पं. हरीप्रसाद यांची एक प्रामाणिक भूमिका होती. या चित्रपटाचे संगीत राजेश रोशन करत होते. दोन गाण्या नंतर यशराजशी त्यांचे मतभेद झाले. त्यावेळी त्यांनी हरीप्रसाद यानां संधी देण्याचे ठरविले.
पण पंडितजी राजेश रोशन यांचे वडील प्रसिद्ध संगीतकार रोशन यांचे मित्र होते. आपल्या मित्राच्या मुलाकडून हे हिसकाऊन घेतल्या सारखे होईन म्हणून त्यांनी नकार दिला. शेवटी राजेश रोशन यांनीच बाकी गाणी तयार केली मात्र पार्श्व संगीताची जबाबदारी सलील चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आली. मात्र यशराज चोपडा यांच्या डोक्यात हे दोघेही घट्ट होते.
1981 मध्ये त्यांच्या ‘सिलसिला’ या चित्रपटाची जबाबदारी शिव-हरी यांच्याकडे सोपविली. गीतकार जावेद अख्तर, शिवहरी आणि अमिताभ-रेखा-जया यांनी हा चित्रपट चांगलाच उंचीवर नेला. यातील सर्वच गाणी रसिकांनी डोक्यावर घेतली. शास्त्रीय संगीतातील दोन दिग्गजांनी चित्रपट संगीताचे असे आव्हान पहिल्याच संधीत पेलावे हा एक अपूर्व योगच म्हणावा लागेल. 80 च्या दशकात चित्रपट संगीत पूर्णपणे बदलेले असल्यामुळे खरी कसोटी होती. या कसोटीत ते पहिल्या क्रमांकाने उत्तीर्णही झाले.
बॉक्स आफिसवर ‘सिलसिला’ खूप असा प्रभाव पाडू नाही शकला मात्र या चित्रपटाने आठ फिल्फेअर पुरस्कार पटकावले ज्यात उत्कृष्ट संगीताचा पुरस्कार शिव-हरी यांना मिळाला… ‘देखा एक ख्वाब तो….’नेदरलँडच्या स्वप्नवत पसरलेल्या टयुलिप फुलांच्या बागेतील याचे नेत्रदिपक चित्रीकरण या चित्रपटाचा प्लस पॉईट ठरला.शिव हरी या जोडीने मग फासले(1985), विजय(1988), चांदनी(1989), लम्हे(1991), परंपंरा, साहिबान व डर(1993) असे आठ चित्रपट आठ वर्षाच्या काळात दिले. यातील चांदनी, लम्हे व डर चे संगीतही गाजले.
‘परंपंरा’ चित्रपटातील ‘फुलोंके इस शहरमे…….’या गाण्यात आधुनिक तालवाद्या सोबत शिवकुमारजीचे संतुर वेगाने थिरकावयाला लावते हे एक आश्चर्यच आहे. ‘जादू तेरी नजर….’(डर)…ओ मेरी चांदनी (चांदनी), कभी मै कहूं….(लम्हे), ये कहाँ हम आ गए…(सिलसिला) ही गाणी कायम स्मरणात राहतील यात वादच नाही. चित्रपट संगीतातील त्यांचे करीअर त्यांच्या 43 ते 56 या वयातील होते हे विशेष.
शास्त्रीय संगीतात जगभर प्रसिद्धी असताना चित्रपटा सारख्या बेभरवशाच्या क्षेत्रात ते आले याचे कारण सर्वकष संगीतावर त्यांचे असलेले प्रेम. आपल्या सांगितिक घराण्याची पत सांभाळून सर्वसामान्या वर्ग ज्या संगीताच्या सहाय्याने आपले जीवन आनंदी करत असतो त्या रसिक समुहाला ते विसरले नाहीत, हे मला अधिक भावतं.
आपापल्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानावर असलेले पंडित हरीप्रसाद आपले मातीतले पाय जमिनीवर घट्ट् रोवून आजही उभे आहेत. नव्या तरूणाई बद्दलही ते आत्मियतेने बोलतात. बासरी बद्दल बोलताना एकदा ते म्हणाले होते- ‘हे ऐकमेव असे वाद्य आहे जे टयून करता येत नाही तर स्वत: वादकालाच टयून व्हावे लागते.’ हा मूलमंत्र बहूदा प्रत्यक्ष जीवनातही ते आमलात आणताहेत हे त्याचं माणूस म्हणून मोठेपण नाही का?
भारतीय संगीतातील सर्वच अंगाचे अध्ययन करून त्यांनी ही बासरी जगातल्या कान्याकोपऱ्यात पोहचविली. चित्रपट संगीत असो की परदेशी कलावंता सोबतचे फ्युजन, विविध वाद्या बरोबरची जुगलबंदी असो की तरूण कलवंता सोबत सहज केलेल्या सांगितीक गप्पा… हा संगीतमेरू नवीन तरूणाई सोबत संवाद साधतानां आज कुठेही आपलं मोठेपण आडवं येऊ देत नाहीत…
या वयातही ते आपले बासरी वादन सादर करतात व आपण शंभर वर्षाचे झालो तरीही अशीच बासरी वाजवू असा आत्मविश्वासही बाळगतात. नुकतीच (1 जुलै 1938) त्यांनी वयाची 86 वर्षे पार केली. त्यांच्या बासरीचे सूर आमच्या जीवनात असेच मिसळत राहो…






