- मीना कर्णिक
'मुलगी बघायला येणं' ही संकल्पना तशी खूप खूप जुनी. त्याविषयी लिहिलं-बोललं जायला लागलं त्यालाही रग्गड काळ उलटून गेला. कधी त्याला 'कांद्यापोह्याचा कार्यक्रम' म्हणून संबोधलं जातं तर कधी 'स्थळ सांगून आलंय' असं सांगून चहापाण्याचा समारंभ साग्रसंगीत पार पडतो. वर्षानुवर्ष 'पाहून' होणाऱ्या लग्नांची ही कथा आहे.
त्यात काळानुसार थोडेफार बदल झाले आहेत, नाही असं नाही. लग्न जमवणाऱ्या संस्था स्थापन झाल्या आहेत, वेगवेगळी अॅप्स निर्माण झाली आहेत. पण म्हणून बघायला येणं थांबलंय असं नाही म्हणता येत. आणि हे 'बघणं' किंवा ही परीक्षा मुलीचीच असते या समजुतीमध्येही बदल झालेला नाही.
जयंत सोमलकर या तरुण दिग्दर्शकाचा पहिलावहिला सिनेमा याच विषयावर आधारलेला आहे, हे 'स्थळ' (इंग्लिशमध्ये द मॅच) या नावावरूनच स्पष्ट होतं. कथाही त्याचीच आहे. एका मुलाखतीमध्ये हे कथाबीज आपल्याला कसं सुचलं ते त्यानं सांगितलंय. तो म्हणतो, '2016 मध्ये माझा चुलत भाऊ मुलगी बघायला गेला होता, तेव्हा मीही त्याच्याबरोबर होतो. मुलगी आली, तिला प्रश्न विचारले गेले... माझ्या मनात मात्र विचार येत होता की आत्ता या मुलीच्या मनात काय चालू असेल? तिला भीती वाटत असेल का? तिच्यावर दडपण आलेलं असेल का? माझी इंजिनिअरची पार्श्वभूमी आहे. मला हे रॅगिंग केल्यासारखं वाटत होतं. पहिल्या वर्षाच्या मुलाला सिनिअर्स प्रश्न विचारतात ना - तुझं नाव काय, ओळख काय तसं. तिच्या जागी आपण असू तर आपलं काय होईल असं मला वाटलं आणि त्यातून या सिनेमाचा विचार सुरू झाला.'
पण म्हणून तो तेवढाच नाही. किंबहुना, मुलीला बघायला येणाऱ्या मुलांच्या निमित्तानं दिग्दर्शक त्याच्या भोवतालाविषयी काही सांगू पाहतो. मुलींच्या आशा-आकांक्षांविषयी बोलू पाहतो. तिच्या शेतकरी कुटुंबाविषयीही चार गोष्टी ऐकवू पाहतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, हे सांगताना तो सिनेमाची भाषा कुठेही विसरत नाही. आपलं म्हणणं आपण ज्या माध्यमातून मांडतोय, त्या माध्यमाचं भान या दिग्दर्शकाला आहे याची जाणीव सिनेमा पाहताना आणि तो संपल्यानंतर आपल्याला प्रकर्षानं झालेली असते.
विदर्भातल्या डोंगरगावात सिनेमाची गोष्ट घडते. स्वतः दिग्दर्शक या गावातलाच आहे, सिनेमाचं चित्रीकरण ज्या घरात झालंय, त्या घरात त्याचा जन्म झालेला होता आणि त्याने निवडलेले कलाकारही तिथलेच आहेत. नंदिनी चिकटे (सविता), संगीता सोनेकर (लीलाबाई), संदीप सोमलकर (काळे गुरुजी), तारानाथ खिरटकर (दौलतराव), सुयोग धवस (मंग्या) हे सगळी सिनेमातल्या व्यक्तिरेखांऐवजी खरीखुरी माणसं वाटतात. अभिनयाशी संबंध नसलेली, पण मातीतल्या प्रश्नांविषयी आपुलकी असलेली. त्यामुळे असेल कदाचित, पण हा सिनेमा पाहताना आपण प्रत्यक्ष या गावकऱ्यांमध्ये वावरत आहोत असं वाटतं. आणि मग त्यांच्या आयुष्यात गुंतून जाणं फारसं कठीण राहत नाही.
मुलगी बघण्याची डोंगरगावची प्रथा शहरांपेक्षा थोडी वेगळी आहे. पहिल्या फ्रेमपासून त्याची झलक आपल्याला बघायला मिळते. मुलगा आणि त्याचं कुटुंब बघायला येणार म्हटल्यावर मुलीच्या घरी काय काय होतं? नुसतेच चहा पोहे होत नाहीत, सगळं घर या पाहुण्यांच्या स्वागताची तयारी करायला सरसावलेलं असतं. अंगणात पाट ठेवला जातो, पाहुण्यांचे पाय धुण्यासाठी नवीन साबण येतो, नवीन टॉवेल येतो, सॅनिटायझर दिसतं. दरवाजात चपलांचे ढीगभर जोड पाहायला मिळतात.
दुसऱ्या गावातले चार पुरुष मोटरसायकलवरून येतात. त्यांचं आगतस्वागत होतं. घरातला लहान मुलगा पाण्याचे पेले घेऊन येतो. शिळोप्याच्या गप्पा सुरू होतात. त्यात कापसाला मिळणाऱ्या भावाविषयी चर्चा होते. पोहे आणले जातात, चहा दिला जातो. सुपारीचा डबा येतो, खडीसाखर तोंडात टाकली जाते. मुलाकडच्यांची ओळख मुलीकडच्यांना करून दिली जाते. त्यात 'हा कैंडिडेट' असा नवऱ्या मुलाचा उल्लेख होतो. मग मुलीकडचे आपली ओळख करून देतात.
दोन्ही घरातली आर्थिक परिस्थिती, मुलीकडच्यांचं अदबीनं बोलणं, मुलाचं आणि त्याच्या बरोबर आलेल्यांचं रुबाबात वागणं अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून दिग्दर्शक आपल्याला बरंच काही सांगून जातो. मुख्य म्हणजे, हे सगळं दाखवताना दिग्दर्शकाला कोणतीही घाई नाही. त्याला आपली गोष्ट तब्येतीत सांगायची आहे. म्हणूनच त्याने मुलीला बघायला येणं म्हणजे काय काय असतं यातले बारकावे दाखवले आहेत. आणि मग मुलीला बाहेर बोलावलं जातं.
आता होणारी प्रश्नोत्तरं पाहा -
"नाव काय तुझं ?"
"सविता वांधरे."
"पूर्ण नाव?"
"सविता दौलतराव वांधरे."
"मामेकूळ?"
"दशरथ पाटील लांडगे, चिंचोळीतले."
"जन्मतारीख?"
"12 ऑक्टोबर 2000."
"उंची?"
"पाच फूट दोन, नाही पाच फूट एक इंच.”
"मोजली होती का?"
"हो."
"शिक्षण?"
"बी.ए. फायनल."
"विषय?"
"सोशॉलॉजी."
"आवडी ?"
"विणकाम, स्वैपाक, वाचायला."
"शेतीची कामं जमतील?"
"हो."
"ठीक आहे."
मुलगी आत निघून जाते आणि मुलाकडचे पडवीत येऊन 'मुलगी कशी वाटली' याची चर्चा करू लागतात. दुकानात खरेदी करायला गेल्यावर एखाद्या वस्तूची पारख करताना व्हावी तशी ही चर्चा.
"मुलगी रंगाने बरी वाटतेय."
"काहीतरी काय, ते मेकअपमुळे. तिची कोपरं पाहा. बरीच सावळी आहे."
ते पुन्हा घरात आल्यावर मुलगी परत बाहेर येते आणि सगळ्यांच्या पाया पडते. तेव्हा तिच्या हातात पैसे दिले जातात. सवितासाठी बहुदा मुलाच्या होकारापेक्षा या पैशांचं मोल जास्त असावं. कारण त्या पैशांचा उपयोग ती एम.पी.एस.सी.च्या अभ्यासाची पुस्तकं घ्यायला करते.
एव्हाना, सविताला अनेक मुलगे पाहून गेलेले आहेत आणि तिने अनेक नकार पचवले आहेत हे आपल्याला समजलेलं असतं. आणि त्याची सल तिच्यापेक्षा तिच्या आई-वडिलांना जास्त आहे हेही कळतं. तिचा भाऊ मंग्या टिपिकल मुलगा आहे. क्रिकेटर होण्याची स्वप्नं पाहणारा, अभ्यासात गती नसणारा. शेजारी राहणाऱ्या मुलीवर त्याचं प्रेम आहे, पण नोकरीधंदा नाही. वडिलांना शेतीत थोडीफार मदत करणं एवढंच काम तो करतो. आणि तरीही घरातल्या कामांमध्ये त्याचा हातभार लागावा अशी ना आईची अपेक्षा आहे ना वडिलांची.
सविताने मात्र परीक्षेचा अभ्यास बाजूला सारून शेतात कापसाची वेचणी करायला यावं याबाबत ते आग्रही आहेत. अभ्यास काय, रात्री कर की! याचा अर्थ ते असंवेदनशील आहेत असा नाही, मुलीसाठी काय महत्त्वाचं याच्या पारंपरिक कल्पना घट्ट आहेत एवढंच. म्हणून तर, एका रविवारी सविताची एम.पी.एस.सी.ची परीक्षा असताना मुलगा बघायला येणार म्हटल्यावर 'परीक्षेला जाऊ नकोस' असं सांगताना आईला आपण काही चुकीचं करतोय असं वाटत नाही.
'मी नाही गेले परीक्षेला, तर माझं अख्खं वर्ष वाया जाईल,' असं सवितानं म्हटल्यावर आईचं उत्तर आहे, 'आणि तुला चांगलं स्थळ नाही मिळालं, तर अख्खं आयुष्य वाया जाईल.'
सवितासारखी मुलगी म्हटलं तर अपवाद आहे. महिला सक्षमीकरणाविषयी वर्गात शिकवला जाणारा धडा गंभीरपणे घेणारी आहे. मैत्रिणीचं लग्न ठरलं म्हणून खूश होताना किंवा दुसऱ्या मैत्रिणीला तिच्या प्रियकराबरोबर पळून जायला मदत करताना तिला आपल्यात काही कमतरता आहे असं अजिबात वाटत नाही. तिचा आनंद निखळ आहे. पण पुनःपुन्हा आपल्याला 'बघण्याच्या' त्याच त्या रुटीनमधून जावं लागतंय याची खंतही तिला आहे.
आपलं लग्न ठरत नाही म्हणून आई-वडिलांना काळजी वाटते, याविषयी किंचित अपराधी भावनाही आहे. त्यांना समजून घेणं आहे, त्यांच्यासाठी परीक्षा किंवा अभ्यासाला दुय्यम महत्त्व देण्यापर्यंत तिची तयारी आहे. बंडाचा झेंडा खांद्यावर घेऊन तिला कुठे क्रांती करायला जायचं नाहीये. बस्स, स्वतःच्या आवडीचं शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहायचं एवढी माफक अपेक्षा आहे तिची आयुष्याकडून.
पण तेच तर दुःख आहे ना. शहरातल्या एखाद्या मुलीला ज्या गोष्टी सहज किंवा छोट्या वाटतात, त्यासाठी ग्रामीण भागातल्या एखाद्या शेतकऱ्याच्या मुलीला किती संघर्ष करावा लागतो !
सविताला जेवढे मुलगे बघायला येतात, त्या प्रत्येक वेळेला आपल्याला अंगणात ठेवलेला पाट, नवीन साबण, बाजूला सॅनिटायझर, नवा कोरा टॉवेल, दरवाजाबाहेरचा चपलांचा ढीग या गोष्टी सारख्याच क्रमानं दिसतात. जणू हे नेहमीचंच झालेलं आहे. त्यानंतर होणारी प्रश्नोत्तरंही तीच. आणि शेवटी येणारा नकारही तसाच. आई-वडिलांना हताश, हतबल करणारा.
दरम्यान, वॉट्स ॲपद्वारे होणाऱ्या प्रेमाच्या गप्पा, एकमेकांकडे चोरून पाहणं या सगळ्या तारुण्यसुलभ गोष्टीही आहेतच. तरुण मुला-मुलींच्या आयुष्याचा तो अविभाज्य भाग आहे. त्याला टाळून कसं चालेल ? त्यामुळे, माझी मुलगी चांगली की तुझा मुलगा वाईट यावरून दोन घरांमध्ये होणारं भांडणंही अगदी सहज. कारण ही सगळी प्रकरणं मूळ गोष्टीच्या ओघात आलेली आहेत. सिनेमातली एकही फ्रेम ठिगळ लावल्यासारखी वाटत नाही. खुद्द सविताचं प्रेमात पडणं तर स्वाभाविकच. मात्र या प्रेमाचं पुढे काय होतं, त्याचा शेवट कशात होतो आणि सिनेमाचा शेवट कसा होतो हे दाखवताना दिग्दर्शकाचं कसब लक्षात येतं. एक क्षणही प्रचारकी न होता आपल्याला जे म्हणायचंय, ते दिग्दर्शकानं अत्यंत ठामपणे मांडलेलं आहे.
जयंत सोमलकरचा हा पहिलाच सिनेमा आहे अशी शंकाही मनात येऊ नये अशा रीतीनं त्याने 'स्थळ'ची मांडणी केली आहे. एकाच वेळी वास्तववादी आणि तरीही मनात आशा जागवणारा हा सिनेमा पाहिल्यानंतर एक गोष्ट नक्की वाटली. मुंबई-पुणे यांसारख्या महानगरांमधून बनणाऱ्या सिनेमांपेक्षा ग्रामीण भागातून आलेले तरुण दिग्दर्शक खूप काही सांगू पाहताहेत. आपल्या मातीतली गोष्ट त्यांना लोकांसमोर आणायची आहे. ती प्रामाणिकपणे सांगितली की त्याला आपोआप वैश्विक अपील प्राप्त होतं. 'स्थळ' विषयी नेमकं हेच म्हणता येईल.
(साभार - साप्ताहिक साधना)






