मनात नाना शंका आणि प्रश्नांचे काहूर सांभाळतच चाओबा थिय्याम हा कलावंत गायक मणिपूरमधल्या पुनर्वसन केंद्रात गेला. समोर भिरभरत्या नजरेची, आधारहीन मुले दिसत होती. मुलांच्या मनावरचे ओझे उतरवण्याच्या उद्देशाने त्याने प्रेमाने त्यांना साद घातली. त्यांच्या हाती कोरे कागद पेन्सिली आणि रंग सोपवले. म्हणाला, तुमच्या मनाला जे आवडेल, ते या कोऱ्या कागदावर उतरवा.
मुले मनात येईल ते कागदावर उतरवू लागली. चाओबा थिय्यामने कुतूहलाने मुलांनी रंगवलेले कागद न्याहाळले. त्यातल्या काहींनीच बंदुकीच्या रुपात एकमेकांकडे रोखलेल्या काठ्या चितारल्या होत्या, तर जवळपास 90 टक्के मुलांनी घराचे चित्र रेखाटून त्यात मनभावन रंग भरले होते आणि त्याला 'माझे घर' असे शीर्षकही दिले होते.
मणिपूरमध्ये गेल्या वर्षीच्या मे महिन्यापासून वांशिक दंगलीचे भडके उडत आहेत. या भडक्यात हजारो हजारो नागरिक बेघर झालेत. आप्तेष्टांच्या मृत्यूमुळे शेकडो कुटुंबे शोकाकुल अवस्थेतून बाहेर येण्यास धडपडताहेत. अशा धास्तावलेल्या क्षणांत चाओबा थिय्यामसारखे कलावंत अत्याचार-अन्यायाचे साक्षीदार बनलेल्या नाजूक वयातल्या मुलांना धीर देण्यासाठी त्यांची मने मोकळी करण्यासाठी कलेचा सुयोग्य असा वापर करीत आहेत.
सामाजिक हाकेला कलेची साद
कलेच्या माध्यमातून घायाळ मने सावरण्याची कल्पना चाओबा थिय्यामच्या मनात आली. त्याला निमित्त ठरले, त्याच्या मोईरंग गावातल्या घराजवळचे एक पुनर्वसन केंद्र. या केंद्रात गेल्यानंतर कोवळ्या वयातल्या मुलांच्या मनाचा होणारा कोंडमारा बघून चाओबा अस्वस्थ बनला, त्याने त्याच अस्वस्थतेत बाहेर संचारबंदी आणि इंटरनेट सेवा सुरु-बंद असण्याच्या काळात इतरांप्रती सहवेदना जपणाऱ्या काही मित्रांना एकत्र केले आणि मुलांच्या पुनर्वसनासाठी मदतनिधी उभारण्याच्या उद्देशाने इन्स्टाग्रामवर लाइव्ह संगीताचा कार्यक्रम सादर केला.

त्यातून चाओबा आणि मित्रांना तीस हजार रुपयांचा मदतनिधी उभारता आला, ते करताना आधी त्याने त्याची एक म्युझिक रुम सावरली. तिथे त्याने गिटार आणि इतर वाद्ये आणली. सोबतीला मैती सोसायटीचे ट्रॉमा रिस्पॉन्स सेंटरही सुरु केले.
आज असे चित्र आहे की, चाओबाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लहान मुलांनी कागदावर रंगवलेली चित्रे अपलोड केलेली आहेत. याशिवाय मणिपुरी लोककथांच्या आधारे तयार केल्या जाणाऱ्या गाण्यांच्या रंगीत तालमींचे व्हिडिओ किंवा म्युझिक व्हिडिओसाठी ही मुले पुनर्वसन केंद्राच्या आसपास आपले छानपैकी फोटोसेशन करून घेत असल्याची दृश्ये इथे बघता येत आहेत.
अभिव्यक्तीचा आधार
'या साऱ्या उपक्रमाचा उद्देशच मुळी आपण तिथे, त्यांच्या जवळ नसतानासुद्धा दंगलींच्या आगीत होरपळलेल्या मणिपुरी मुलांना कलेच्या माध्यमातून अभिव्यक्त होण्याची स्वायत्तता लाभावी हा आहे', चाओबा थिय्याम या उपक्रमाचे मर्म अभिमानाने उलगडतो. पण फक्त गाणे किंवा संगीत वादन इथवरच चाओबा थांबलेला नाही, तर त्याने फोटोग्राफी आणि कथाकथनाचेही वर्ग या पुनर्वसन केंद्रात सुरु केले आहेत. जेणेकरून आपापल्या आवडीनिवडीनुसार मुलांना व्यक्त होता यावे.
मनात दबून राहिलेली वेदना, शोकमग्नता कलेच्या माध्यमातून अभिव्यक्त होत असते. लोककलेचा असाही वापर करीत असतात. असाच परिणामकारक वापर मुलांसाठी करता येतो, त्यातूनच मानसोपचार तज्ज्ञांनादेखील मुलांची वेदना समजून घेण्यास मोठी मदत होते... गुरुमय्युम मुकेश सर्मा इम्फाळमधले मानसोपचार तज्ज्ञ आपले मत व्यक्त करीत असतात. ते असेही निरीक्षण नोंदवतात की, वांशिक संघर्षाची धग कमी करण्यासाठी मणिपुरींनी अभिव्यक्तीसाठी गायन-वादन- चित्रकला हे कलाप्रकार इथे लोकप्रियसुद्धा केले आहेत.
इरोम्स काजोल ही कॉलेजात शिकणारी, 19 वर्षीय मणिपुरी तरुणी आहे. सशस्त्र दलात सामील होण्याचे तिचे स्वप्न होते. परंतु मणिपूरमध्ये वंशिक दंगलीने वणवा पेटला आणि इझरोमचे सशस्त्र दलात सामील होण्याचेच नव्हे, तर इतरही स्वप्ने त्यात जळून खाक झाली.
दररोज जाळपोळ आणि हत्या होत असताना तिने कसेबसे चुराचांदपूर जिल्ह्यातून बाहेर पडण्यास यश मिळवले. परंतु नंतर बराच काळ संघर्षांदरम्यानची भयावह दृश्ये तिचा पाठलाग करीत राहिली. एक कधीही न संपणारे दुःस्वप्न आपल्या सोबतीला आले आहे, अशी निराश हताश भावना तिच्या मनात उत्पन्न झाली.
(चाओबा थिय्याम)
नाते जडले संगीतकलेशी
परंतु, तेही क्षण मागे पडले. बिनूपुर जिल्ह्यातल्या मोईरंग गावातल्या 45 विस्थापित मुला-मुलींसह इरोम काजोलने मैती सोसायटी, हार्मनी मणिपूर आणि सियोम (चाओबा थिय्याम याची संस्था) या तीन संस्थांनी मिळून आरंभलेल्या संगीत वर्गात नाव दाखल केले. संगीत वर्गात ती रमलीच, पण पुढे जाऊन इतर कलावर्गात तिने हौसेने भाग घेण्यास सुरुवात केली. आज अशी स्थिती आहे, इरोम गिटार वाजवण्यात अशी काही पारंगत झालेली आहे की, पूर्णवेळ गिटार बादनातच करियर करण्याचा इरादा ती बाळगून आहे.
वांशिक दंगलीदरम्यानच्या हिंसेने काजोलच्या मनात इतका भयावह आघात केला, की तिला झोपेतून दचकून जागे होण्याचा आणि कधीमधी चालण्याचा विकार जडला, परंतु कलेने तिच्या मनाला स्थिरता दिली आहे. ती आता पूर्वीच्याच उत्साहाने आयुष्य जगू पाहतेय काजोलच्या आईचे इरोम नंदिनीचे हे आश्वासक उद्गार आहेत.
इथे हार्मनी मणिपूर या संस्थेतर्फे कमलेश नावाचा तरुण आठ बाय आठच्या खोलीत संगीताचे वर्ग घेतो. लहान मुलांसाठी त्याने वेगळी वेळ आखून घेतली आहे. त्या मुलांमध्ये एक 12 वर्षांचा नाँगदम्बा नावाचा पाचवीत शिकणारा तरतरीत मुलगा आहे. तो मोठ्या कौतुकाने चाओबा थिय्यामने त्याने भेट म्हणून दिलेली बासरी दाखवतो. म्हणतो, शाळा संपल्यानंतर झोप येईपर्यंत रोज तो या बासरीवादनाचा सराव करीत असतो. अर्थातच बासरीतून उमटणारे मंजूळ सूर नाँगदम्बाबरोबरच पुनर्वसन केंद्रातल्या इतरही मुला-मुलींच्या मनाला दिलासा देणारे ठरताहेत.
विद्यासागर मोइरंगथेम नावाचे गृहस्थ मैती सोसायटीचे सभासद आहेत. ते म्हणतात, केवळ पुनर्वसन केंद्र उभारून मणिपूर सावरले नसते. म्हणूनच आम्ही कलेच्या माध्यमातून लहान मुला-मुलींना सावरण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला. सध्या आम्ही इथल्या मुला-मुलींना प्राथमिक स्तरावरचे प्रशिक्षण देत आहोत. परंतु लौकरच आम्ही व्यावसायिक स्तरावरच्या प्रशिक्षणाचेही वर्ग घेणार आहोत.
गायन-वादनाने सावरली आयुष्ये
एकीकडे जसे चाओबा थिय्यामने मैती समाजातल्या मुला-मुलींसाठी कलेचे वर्ग सुरु केले, तसेच नोएल सुजिए याने विस्थापित झालेल्या कुकी मुलांसाठी रिलिफ कॅम्प हिल्स नावाच्या संस्थेची स्थापना केली. नोएल इम्फाळमध्ये राहणारा, परंतु दंगलीचे लोण जसे पसरत गेले, त्याचे घरही त्यात खाक झाले. तेव्हा त्याला शेजारच्या नागालँडमध्ये तात्पुरता आसरा घेण्यावाचून पर्याय उरला नाही. जेव्हा तो परत आला, तेव्हा पुनर्वसनाच्या नावाखाली सुरु असलेले व्यवहार पाहून तो व्यथित झाला. कारण, येणारे लोक डिगाने कपडे घेऊन येत होते आणि कुकी लोकांसमोर ते कपडे टाकून निघून जात होते.

मणिपूरच्या पर्वतीय प्रदेशात राहणाऱ्या कुकी मुलांचा दंगलींमुळे विलक्षण कोंडमारा होत होता. त्यानंतर मोकळा श्वास घ्यायचा होता. फुटबॉलच्या मैदानाकडे धाव घ्यायची होती. त्यामुळे आम्ही परिसरातल्या कुकी मुला-मुलींना धीर दिला. त्यांच्यासाठी फुटबॉलच्या मैदानाची सोय करून दिली.
आमचे धाडस पाहून स्थानिक चर्चचे पदाधिकारी पुढे आले, त्यांनी या मुलांसाठी संगीत वर्गाचे आयोजन करण्यास सुरुवात केली. म्हणजे, एका टप्प्यावर परिस्थिती अशी होती की, एकीकडे जाळपोळ, शस्त्रास्त्र लुटीच्या घटना घडत होत्या, आणि दुसरीकडे स्थानिक मुले चर्चच्या आश्रयाला येऊन गायन-वादनात स्वतःला रमवत होती.
दंगलग्रस्त बालकांना साथ पुस्तकांची
बहुदा या सर्व प्रयत्नांनीच राजधानी इम्फाळमधल्या बुक्स अँड कॉफी या पुस्तकाच्या दुकान मालकाचा आत्मविश्वास वाढवला होता. खरे तर तोवर म्हणजे, जून-जुलै दरम्यान मणिपूरमधली स्थिती सामान्य झालेली नव्हती. हिंसेचा भडका कधीही उडावा अशी परिस्थिती होती. तरीही दुकानमालक बिशांतराम युम्मन यांनी हिमतीने मणिपुरी मुला- मुलींसाठी पुस्तक महोत्सव भरवला. त्यात सुलेखनाचे आणि कलेचे वर्ग भरवले. त्यात मुलांनी कागदापासून ससे, फुले आणि भिंगऱ्या बनवल्या.
मुलांना त्यात दंग झालेले पाहून बिशांतराम युम्मन यांच्या मनातली भीतीदेखील कुठच्या कुठे पळून गेली. खरेतर युम्मन 2014 पासून दुकानातर्फे वेगवेगळे महोत्सव भरवत आले आहेत. संघर्षाच्या काळातही त्यांनी आणि त्यांच्यासारख्या काहींनी धैर्याने मणिपूरला उमेद देणारा हा उत्सवी माहोल कायम ठेवला. 'या काळात मी असंख्य मुलांच्या चेहऱ्यावर चिंताग्रस्तता मावळताना आणि हसू उजळताना पाहिले.

म्हणूनच मी जे आजवर करत आलोय, ते या मुलांचे उजळते चेहरे जगाला पाहता यावेत, यासाठीच करत आलोय...' अर्थातच बिशांतराम युम्मन यांच्या बोलण्यात माणुसकीवरच्या दृढ विश्वासातून आलेला आत्मविश्वास झळकतो आहे. तोच खूप काही सांगून जाणारा आहे.
(इंडियन एक्स्प्रेसच्या 11 ऑगस्टच्या अंकात पौलोमी देब आणि जिम्मी लिवोनलिखित प्रस्तुत लेख प्रकाशित झाला. त्या लेखाचा हा साभार स्वैर अनुवाद समतावादी - मुक्त संवाद, ऑक्टोबर 2024 च्या अंकात प्रसिद्ध झालाआहे.)






