"एकदा सौभाग्य गेले म्हणजे स्त्रियांनी आपली तोंडे अगदी एखाद्या महाजबर अपराध्याप्रमाणे काळी करून सर्व आयुष्यभर अंधार कोठडीत रहावे, त्याप्रमाणे तुमच्या बायका मेल्या म्हणजे तुम्हीही आपले तोंड काळे करून दाढ्या मिश्या भादरून यावत जन्मापर्यंत कोठेही अरण्यवासांत का राहू नये बरे?"
ताराबाई शिंदे यांनी 1882 साली स्त्रीपुरूषतुलना या निबंधातून हा प्रश्न केला होता. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना दिली जाणारी दुय्यम वागणूक आजही त्याच व्यवस्थेचे वाहन करत आहे हे दिसून येते. या सगळ्या व्यवस्थेला कुठेतरी संवादाच्या, लेखणीच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न डॉ. ऐश्वर्या रेवडकर यांनी त्यांच्या ' पाळीचं पॉलिटिक्स' या पुस्तकातून केला आहे. ताराबाई शिंदे यांच्या लेखणीस अर्पण केलेलं हे पुस्तक सध्याच्या काळातील स्त्रीपुरूषतुलना सारखेच आहे असे म्हणता येईल. पुस्तकाच्या सुरुवातीलाच संत सोयराबाईंचा,
देहासी विटाळ म्हणती सकळ |
आत्मा तो निर्मळ शुद्धबुद्ध ||
हा अभंग उद्धृत केला आहे. मासिक पाळी ही तशी नैसर्गिक प्रक्रिया.परंतु याबाबत समाजात अतिशय दबक्या आवाजात बोललं जातं. त्यामुळे पाळीच्या अनुषंगाने आरोग्याच्या बाबतीत जी काही काळजी घ्यायची आहे त्याबाबत ना मुलींशी बोललं जातं ना समाजात उघडपणे बोललं जातं.यातून अनेक शारीरिक व मानसिक समस्या उद्भवतात व गंभीर आजारांना निमंत्रण दिले जाते.
यामागे असलेली पुरुषसत्ताक व्यवस्था व त्यातून निर्माण होणारे स्त्रियांचे आरोग्याच्या प्रश्नाच्या बाबतच्या गंभीर समस्या याचा आढावा लेखिकेने या पुस्तकातून घेतला आहे. मासिक पाळी व त्याविषयी निगडित असलेल्या प्रश्नांचा आढावा घेताना लेखिकेने स्वतः अनुभवलेल्या काही घटना सांगून तर कधी, ऐतिहासिक घटनांचा दाखला देऊन त्यांची उत्तरे सोप्या भाषेत देण्याचा प्रयत्न केला आहे.
"गर्भाशय नसणाऱ्या लोकांनी गर्भाशय असणाऱ्या लोकांची मापे आणि रंग काय असावेत हे ठरवू नये." असे सांगून लेखिकेने पुरुषसत्ताक पद्धती स्त्रियांना कशी मारक ठरलेली आहे याचे सविस्तर वर्णन केलं आहे. तसेच पाळी म्हणजे कमजोरी, दुर्बलता, पाळी म्हणजे आजार, पाळी म्हणजे फक्त दुखणे असा धोशा न लावता त्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून बघणे आवश्यक असल्याचं लेखिका अधोरेखित करते.पुस्तक मुख्यतः तीन भागांमध्ये विभागणी केलेलं आहे. पहिला भाग मासिक पाळी आणि लैंगिक राजकारण, दुसरा भाग स्त्री आरोग्य आणि धर्म तर तिसरा भाग विज्ञान आणि लिंगआंधळेपणा अशा मथळ्याचा आहेत.
मासिक पाळीच्या काळात कोणती साधने वापरली पाहिजेत, काय काळजी घेतली पाहिजे, या काळात व्यायाम केला तर चालेल का? पीसीओडी व त्यावरील उपाय अशा बाबींचा विस्तृत आढावा घेतला आहे.
यात लेखिकेने त्यांच्या जीवनातील एक प्रसंग सांगितला आहे. हा प्रसंग आपल्या समाजव्यवस्थेतील स्त्रियांची मानसिक कुचंबना समजण्यासाठी पुरेसा आहे. मासिक पाळी आणि भीतीची भाषा या एका प्रकरणात लेखिकेने हा प्रसंग सांगितला आहे. छत्तीसगड येथील एका आश्रमशाळेत मासिक पाळीच्या संदर्भात कार्यशाळा घेण्यासाठी गेलेल्या लेखिकेने तेथील मुलींना पहिली पाळी आली तेव्हा काय वाटलं याबद्दल निबंध लिहायला सांगितला. त्यानंतर बोलताना एक मुलगी म्हणाली की, मी मुलगा का नाही झाले? त्यामुळे मासिक पाळी म्हणजे काहीतरी भयंकर घटना आहे हे वर्षानुवर्षे बिंबवले गेले आहे.
पाळी आणि त्यासंबंधी असलेली भीती ही सर्वधर्मीय आहे. रमजान महिन्यात गर्भवती असलेल्या मुस्लिम स्त्रिया रडकुंडीला येऊन लेखिकेला विनवणी करायच्या की, भूक लागते, तुम्ही सासूला सांगा, मला खाऊ द्या. तसेच वाराणसी मधील काही स्त्रिया चार चार दिवस उपवास धरायच्या मग त्यातून बाकी आजार उद्भवायचे. ही चर्चा आणखी पुढे घेऊन जात डॉ. ऐश्वर्या अनुभव सांगतात की, स्त्रीच्या स्वतःच्या आरोग्यासाठी किंवा दीर्घायुष्यासाठी स्त्री उपवास धरत नाही. घराची समृद्धी, कुटुंबाचे आरोग्य आणि नवऱ्याचे दीर्घायुष्य यासाठीच ती उपवास धरते. जगातील कुठलाच धर्म स्त्रीला न्याय देत नाही असा निष्कर्ष त्यांनी शेवटच्या प्रकरणात काढला आहे.
पुरुषसत्ताक व्यवस्थेत स्त्रियांच्या लैंगिक सुखाच्या संबंधाविषयी देखील फारसे बोलले जात नसल्याची खंत या पुस्तकात मांडली आहे. मासिक पाळी, गर्भधारणा यासोबतच प्रसुतीपश्चात येणारे नैराश्य किंवा भ्रमिष्टावस्था याबद्दल अभ्यासपूर्ण मांडणी लेखिकेने केलेली आहे.
पुस्तकाच्या शेवटी उत्क्रांतीपासून जन्माला आलेली पुरुषकेंद्री व्यवस्था यावर भाष्य केलेले आहे. स्त्री देहावरून असलेल्या शिव्या, व्यसन हे वाईट हे ठरवण्यासाठी व्यक्तीचे लिंग काय यावरून केला जाणारा भेदभाव यांचा आढावा घेत, स्त्रियांच्या शरीर स्वायत्तेसाठी मोठा लढा अजून बाकी असल्याचे लेखिका नमूद करते. स्त्रियांची प्रजननक्षमता व त्याभोवती फिरणारे मार्केट, सध्याची आयव्हीएफ उपचार पद्धती व त्यामागचा व्यापारी दृष्टिकोन यावर भाष्य केले आहे.
या सगळ्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी स्त्रीवादाची कास धरली पाहिजे असे लेखिकेचे म्हणणे आहे. स्त्रीवाद फक्त स्त्रीसाठी हक्क मागत नसून पुरुषासाठी देखील माणूसपणाचा हक्क देऊ पाहतो,पुरुषाची कुचंबना देखील प्रभावीपणे मांडतो त्यामुळे स्त्रीवादी दृष्टिकोन अंगिकारला पाहिजे.स्त्रीचे शरीर एकीकडे शोषणभूमी तर दुसरीकडे मार्केट झाले आहे त्यामुळे मोठा लढा बाकी आहे असं सांगणारं पाळीचं पॉलिटिक्स हे पुस्तक वाचलंच पाहिजे.






