भारतीय संस्कृतीचा उगम आणि विकास यांच्या सर्वंकष अभ्यासासाठी भारत सरकारने 16 तज्ज्ञ लोकांची एक समिती नेमली होती. याची घोषणा प्रेस इन्फर्मेशन ब्युरोने 14 सप्टेंबर 2020 या दिवशी प्रसिद्ध केली. 12 हजार वर्षांचा भारतीय संस्कृतीचा विकास कसा झाला याबद्दलचा अभ्यास ही समिती करणार होती. याआधीही म्हणजे 2017 मध्ये 14 लोकांची समिती गठित करण्यात आली होती. 14 असोत वा 16 तज्ज्ञ, मात्र तज्ज्ञ लोकांच्या या समितीत एकही स्त्री अभ्यासक नाही, उत्तर, पूर्व किंवा दक्षिणेकडच्या राज्यातला एकही प्रतिनिधी नाही, तसंच अनुसूचित जाती आणि जमातीमधील एकही अभ्यासक नाही.
हिंदू सोडून इथर धर्मातील एकही सदस्य समितीत नाही. हजारो वर्षांपासून इथे हिंदूच कसे आहेत, तसंच हिंदू पुराणग्रंथ हे काल्पनिक नसून वास्तव सांगणारे आहेत, अशा प्रकारचा इतिहास तयार करून तो भावी काळात/पिढीत रुजवण्याचा या समितीने हेतू यातून दिसून येतो. आश्चर्य म्हणजे केंद्र सरकारनं इतकी महत्त्वाची जबाबदारी देऊनही 2017 पासून आजतागायत एक ओळदेखील या समितीनं प्रकाशित केली नाही.
ज्येष्ठ भाषा अभ्यासक डॉ. गणेश देवी यांना या सर्व गोष्टी कळताच ते अस्वस्थ झाले. त्यांनी तातडीने जगभरातल्या अनेक अभ्यासक मंडळींशी संपर्क/संवाद साधला आणि 12 हजार वर्षांत काय काय घडलं, मग ते मनुष्याच्या उत्क्रांत होण्याबाबत असेल, त्याच्या जडणघडणीबद्दल असेल, त्याच्या सांस्कृतिक विकासाबद्दल असेल, या प्रक्रियेतल्या वेगवेगळ्या धर्मांबद्दल असेल, विविध भाषेबद्दल असेल, या सगळ्यांबद्दलची मांडणी करायची असं ठरवलं.
100 पेक्षा अधिक अभ्यासकांनी सकारात्मक प्रतिसाद देत आपण या प्रकल्पात सामील होत असल्याची खात्री गणेश देवींना दिली. यात पुण्यातले अनेक लेखकही आहेत. या प्रयत्नांतून साकारला ‘द इंडियन्स’ हा ग्रंथ… गेल्याच वर्षी या इंग्रजी ग्रथांचे प्रकाशन झाले होते आणि आता दोन दिवसांपूर्वी पुण्यात भांडारकर इन्स्टिटयूटच्या सभागृहात ‘द इंडियन्स’ या ग्रंथाचा मराठी अनुवाद प्रकाशित झाला.
मनोविकास प्रकाशनाने हा ग्रंथ मराठीतून प्रसिद्ध केला असून ग्रंथाचे संपादन गणेश देवी, टोनी जोसेफ आणि रवी कोरीसेट्टर यांनी केलंय, तर अनुवाद शेखर साठे, प्रमोद मुजूमदार, नीतिन जरंडीकर आणि ज्ञानदा आसोलकर यांनी केलाय. हा ग्रंथ मराठीतूनच नव्हे, तर हिंदी, तेलुगू आणि इतर अनेक भाषांमध्ये भाषांतरित होण्याची प्रक्रिया मोठ्या वेगाने सुरू आहे.

‘द इंडियन्स’ या ग्रंथाचा ब्लर्ब
‘’मनुष्यप्राण्याच्या एकूण इतिहासामध्ये होमो सेपियनची जडणघडण, अन्नसंकलन आणि पशुपालन करणारा भटका समुदाय ते सार्वभौम राष्ट्रीयत्वाची मांडणी करणारा समाज असा एक विशाल आणि विस्मयकारक घटनाक्रम यात दडला आहे. या दूरस्थ गतकाळाच्या आरंभबिंदूपासून भारतीय उपखंड हा मानवी स्थलांतरासाठी एक महत्वपूर्ण हमरस्ता ठरलेला आहे.
काळाच्या निरनिराळ्या टप्प्यावर विविध समुदायांनी भारताच्या सुजलाम सुफलाम भूमीला आपलं घर बनवण्यास प्राधान्य दिलेलं आहे. परिणामी युगानयुगे बहुसांस्कृतिकता हा इथला स्थायिभाव बनून राहिलेला आहे. तथापि, अलीकडल्या काही विषर्यांत दक्षिण आशिया खंडाचा इतिहास मोडून तोडून टाकण्याची वृत्ती बळावत चालल्याचं दिसून येत आहे आणि या वृत्तीतूनच मग वांशिक शुद्धतेचा मागोवा घेणाऱ्या विवेकशून्य, धोकादायक योजना मूळ धरत असल्याचं दिसून येत आहे.
फेक नरेटिव्हज् रचण्याच्या आजच्या कालखंडात इतिहास जाणून घेण्याचे प्रस्थापित वैज्ञानिक मापदंड आहेत, हेच आपण विसरत चाललो आहोत. त्यामुळे काळाच्या या अशा टप्प्यावर जनुकशास्त्र, पुरातत्वशास्त्र, हवामानशास्त्र, भाषाशास्त्र अशा विज्ञानाच्या कसोटीवर खऱ्या उतरणाऱ्या साधनांच्या साहाय्याने भारताच्या तब्बल 12000 वर्षांच्या गतकाळाचं अतिशय चिकित्सकपणे अवलोकन करणारा हा ‘द इंडियन्स’ ग्रंथ आहे.
यामध्ये जगभरातल्या 100 अभ्यासकांनी आपलं योगदान दिलेलं आहे. इतिहास, तत्वज्ञान, भाषा, संस्कृती या ज्ञानशाखा आणि समाजकारण आणि राजकारण या प्रती सजग असणाऱ्या सर्वांना आवाहन करणारा हा एक अत्यंत महत्वाचा दस्तावेज आहे.
एकशे पाच अभ्यासकांनी पुराव्यांनिशी लिहिलेला ग्रंथ
‘द इंडियन्स’ या ग्रंथात ज्यांचे लिखाण प्रसिद्ध झाले आहे त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या प्रमुख श्रद्धा कुंभोजकर यांनी यासंदर्भात म्हटले आहे की, 'द इंडियन्स' हे पुस्तक एक ठाम संशोधकीय विधान करतं. दक्षिण आशियाचा गेल्या सुमारे बारा हजार वर्षांचा म्हणजे होलोसीन युगाचा इतिहास लिहिण्याची जबाबदारी या पुस्तकानं पेलली आहे.
भारतीय उपखंडात या बारा हजार वर्षांमध्ये माणसाच्या जगण्यात कसकसे बदल होत गेले यावर विविध विषयांच्या एकशे पाच अभ्यासकांनी आपापल्या अभ्यासांचा अनुभव गाठीशी ठेवून आणि संशोधनाचं पद्धतिशास्त्र सांभाळून पुराव्यांनिशी या कालखंडावर लेख लिहिले आहेत. ज्याला शास्त्रीय संशोधनाचं पद्धतिशास्त्र म्हणतात, त्याची पथ्यं पाळून संशोधकीय शिस्तीने लिहिलेला असा हा दक्षिण आशियाच्या इतिहासाच्या अभ्यासकांसाठी उपयोगी पडेल असा संदर्भग्रंथ आहे.
खरं तर ज्या विषयात आपण विशेष प्रशिक्षण घेतलं आहे त्यावर संशोधनाची शिस्त पाळून लिहिणं यात काही विशेष आहे असं मानायला नको. पण इतिहास हा विषय माणसांनी आपापल्या ओळखीसोबत, अस्मितेसोबत जोडलेला असल्यामुळे, त्या विषयाबाबत आस्था असणाऱ्या पण प्रशिक्षण नसणाऱ्या कुणीही उठून इतिहासाबाबत विधानं करावीत, संदेश, चित्रं एकमेकांकडे ढकलावीत आणि त्यातली आपल्या अस्मितेला कुरवाळतील ती कथनं खरी मानून चालावं अशी सध्याची रीत आहे.
ज्ञान या गोष्टीचं अतोनात किरकोळीकरण केलं गेलं आहे. कुणी आपलं संपूर्ण आयुष्य देऊन केलेल्या अभ्यासावर जे ज्ञान निर्माण करतात, त्या ज्ञानाला बहुतेक वेळा काही किंमत दिली जात नाही. स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान् सर्वत्र पूज्यते असं संस्कृत वचन असेल, तरीही विद्वत्तेपेक्षा आपल्या मनातल्या प्रतिमेला सुसंगत असणारी माहितीच हा समाज खरी धरून चालतो. हातात आलेल्या पुराव्यांचा अस्सलपणा, विश्वासार्हता तपासून पाहून त्यानंतर लिहिला गेलेला इतिहास ही गोष्ट दुर्मिळ झालेली आहे. 
भारतीय उपखंडाचा गेल्या बारा हजार वर्षांचा इतिहास लिहिण्याची जबाबदारी देऊन केंद्र सरकारनं स्थापन केलेल्या समितीमध्ये नर्मदेच्या दक्षिणेकडचा एकही माणूस नाही, एकही स्त्री नाही, हिंदू सोडून कोणत्याही धर्माची माणसं नाहीत. आश्चर्य म्हणजे केंद्र सरकारनं इतकी महत्त्वाची जबाबदारी देऊनही 2017 पासून आजतागायत एक ओळदेखील या समितीनं प्रकाशित केली नाही.
2019-20 च्या दरम्यान समितीच्या स्थापनेला तीन वर्षे लोटली आणि तिची सदस्यसंख्या वाढवली तरीही इतिहासलेखनात काही प्रगती झाली नाही. अशा स्थितीत प्रा. देवींनी ही जबाबदारी घेऊन जे काम केंद्र सरकारच्या समितीनं करायला हवं होतं, ते काम अंगावर घेतलं. इतकंच नाही तर चार वर्षांत ते पूर्ण करून शास्त्रशुद्ध पद्धतीनं लिहिलेला बारा हजार वर्षांचा इतिहास प्रकाशित केला. अर्थातच तो अतिशय लोकप्रिय झाला आणि त्याच्या अनेक आवृत्त्या लगोलग संपल्या.
"इतिहास हा चंद्रप्रकाशातल्या जगासारखा असतो. आपल्याला त्यातलं जे दहा टक्के दिसतं, त्याचा आपल्या परीनं आपण अर्थ लावत असतो." असं सुंदर विधान प्रा. देवींनी मराठी आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात केलं. इतिहासाचं असं अनिश्चित आणि बदलतं स्वरूप प्रा. देवी आणि त्यांचे सहकारी जाणत असल्यामुळे समाजाच्या विविध घटकांपर्यंत हा इतिहास पोचवावा यासाठी त्यांनी या पुस्तकाची चार भाषांमध्ये भाषांतरं करायला सुरुवात केली. मराठी भाषांतर दि. 24 ऑगस्ट रोजी प्रकाशित झालं.
मराठी वाचक म्हणून आपल्याला यातल्या अनेक गोष्टींचा विशेष आनंद वाटण्यासारखी परिस्थिती आहे. या पुस्तकात अनेक मराठी लेखक आहेत. जगाच्या पाठीवरच्या उत्तमोत्तम अभ्यासकांमध्ये इतके मराठी इतिहाससंशोधक समाविष्ट झाले आहेत ही चांगली गोष्ट आहे. इंग्रजीत लिहिली गेलेली सुप्रसिद्ध पुस्तकं वर्षानुवर्षांची प्रतीक्षा करूनही मराठी वाचकांना मराठी भाषेत मिळणं दुरापास्त असतं. मनोविकास प्रकाशनानं ते साहस केलं आहे.
याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे एके काळी मराठी लेखकवाचकांच्या जगात अतिशय मोकळिकीनं अभ्यासाच्या विषयांवर वाद-संवाद झडत असत. उदा. 'भारतीय समाज आणि संस्कृती' या ग्रंथात प्रा. म. अ. मेहेंदळे यांनी नवभारत मधल्या अनेक लेखांना प्रतिसाद म्हणून दिलेली अभ्यासपूर्ण पत्रं लेखाच्या स्वरूपात संग्रहित केलेली आहेत. अशी सशक्त वादाची परंपरा सध्या कुंठित झाल्यासारखी दिसते. लोक मुद्द्यांवर न बोलता गुद्द्यांनी बोलायला सरावत आहेत.
या पुस्तकातल्या सर्वच लेखकांची मतं एकमेकांशी तंतोतंत जुळणारी नाहीत. पण संशोधन या गोष्टीचं सौंदर्यच यात आहे, की जे एखाद्या संशोधकाला दिसतं, ते मांडलं जातं. दुसऱ्या संशोधकाला काही वेगळं दिसलं, तर संवाद पुढे चालू ठेवून आपापले मुद्दे सर्व संशोधक मांडत राहतात. द इंडियन्स या पुस्तकाच्या माध्यमातून या संवादाच्या दिशेनं एक पाऊल पडलं आहे.
अशा स्थितीत या पुस्तकाचं मराठी वाचकांनी स्वागत करावं, त्यात जे खटकेल, त्यावर मुद्द्यांसहित टीका करावी, जे आवडेल, नवं कळेल-त्याचा आनंद मिळवावा असं या पुस्तकातल्या एका लेखाची लेखिका म्हणून आणि अनेक लेखांची वाचक म्हणून मला वाटतं.






