3 ऑक्टोबरची एक रात्र… राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यातील सबंध ‘पुगल’ गाव अर्धी रात्र सरली तरी जागं होतं. पुरुष म्हणू नका, महिला म्हणू नका, तरुण- वृद्ध म्हणू नका, गावातील सगळे जाट धर्माशाळेत जमले होते. तिथल्या भल्या मोठ्या खुल्या जागेत एका ओट्यावर व्यासपीठ उभं केलेलं, किंबहुना आयताकृती लाकडी सापळ्यावर शेणाचा पोतारा मारल्यासारखा कपडा लावलेला. बस्स, बाकी सगळं मोकळं आकाश.
त्या ओट्यावर लोककलाकारांची काहीतरी लगबग सुरु होती. रात्र गहरी होत चाललेली असतानाही जवळपास सगळ्यांचेच कपडे घामाने नाहलेले, इतकं दमट आणि उष्ण वातावरण. चोहो बाजुंनी लावलेल्या एलइडी लाईटांभोवती उडणारे हजारो किडे भिरभीर करत अख्ख्या प्रेक्षकांना डिवचत होते.
पण अचानक सर्वजण शांत होऊ लागले. कारण नारंगी कपड्यांमध्ये असलेले बंगाली लोककलावंत लक्ष्मण दास हातात ‘दोतारा’ हे गिटारसदृश्य पण वेगळ्या धाटणीचं वाद्य घेऊन आपल्या इतर चार साथीदारांसोबत ‘बाउल’ या संगीत प्रकारातील बंगाली लोकगीत गाऊ लागले. थोड्याच वेळात तिथला माहोल बदलला. कुणी आनंदाने नाचत होतं, कुणी डोळे मिटून शून्यात हरवलेलं होतं, कुणी चिपळ्या घेऊन नाचत होतं, कुणी टाळ्या वाजवत होतं.
हे सगळं काही तिथं सुरु होतं एका फकीर माणसाच्या नावावर. 13 व्या शतकात वाराणसीत जन्मलेला एक कवी जो विद्रोही लिखाण करत एक सामाजिक चळवळ उभी करतो आणि आजतागायत ज्याचे दोहे, विचार, संदेश लोकं वेगवेगळ्या माध्यमातून बघत, ऐकत, जगत आहेत. या असाधारण संतांचं नाव कबीर. कबीर हे नाव न ऐकलेला भारतीय शोधणं कठीणच. याच कबीरांच्या विचारांचा प्रचार-प्रसार व्हावा म्हणून एक अवलिया दशकभरापूर्वी 'राजस्थान कबीर यात्रा' सुरु करतो आणि आज तीच यात्रा जगभरातील कैक संगीतप्रेमी फिरस्त्या लोकांसाठी आकर्षण ठरते.
नाव कबीर यात्रा आहे म्हणजे कबीरच गायले किंवा ऐकले जात असतील, असं गृहीत धरत असाल तर चुकाल. सामाजिक विषयांवर भाष्य केलेल्या, परंपरांच्या विरोधात लेखणी चालवलेल्या सगळ्याच संत-कवींना, देशातील विविध संगीत प्रकारांना 'कबीर यात्रा' समर्पित आहे. 2012 पासून राजस्थानच्या विविध भागात होणारी कबीर यात्रा फक्त संत कबीरांची आठवण नाहीये तर त्यांच्यासारख्या कैक संतांच्या काव्यस्वरूपात असलेल्या सामाजिक संदेशाला दिलेली संगीतमय उजळणी आहे.
काय आहे 'राजस्थान कबीर यात्रा'?
2012 साली गोपाल सिंग चौहान या तरुणाने 'राजस्थान कबीर यात्रे'ची सुरुवात केली. संत कबीर, मीराबाई, बाबा बुल्लेशाह, शाह बाहू , शाह लतीफ, आमिर खुसरो, गुरु नानक यांच्या रचना लोकांपर्यंत पोहोचाव्या, राजस्थानी लोककला आबाद रहाव्या, देश-विदेशातील रसिकांना याची माहिती व्हावी, संगीतबद्ध केलेल्या यां रचनांचं रसग्रहण करता यावं हा यामागचा मुख्य उद्देश होता.

(आपल्या पहाडी आवाजासाठी ओळखले जाणारे गुजरातच्या कच्छचे सुप्रसिद्ध लोककलावंत 'मुरालाला मारवाडा', पुगल येथील सत्संगावेळी.)
यात्रीकरू एका गावावरून दुसऱ्या गावी फिरत सकाळ-संध्याकाळ संगीतसुख घेतात. या कार्यक्रमांना कलाकार मंडळी 'सत्संग' म्हणणं जास्त योग्य मानतात. हा एक विलक्षण अनुभव असतो. जेवण, झोप, आराम या गोष्टी दुय्यम बनून फक्त संगीत-सत्संग सर्वांगात रुजतो. कुठल्याही संगीतप्रेमीसाठी ही एक पर्वणी आहे. प्रवास-संगीत-प्रवास असंच काहीसं या पाच सहा दिवसात सुरु असतं. कबीर लिहितात,
चिंता ऐसी डाकिनी, काट कलेजा खाए।
वैद बिचारा क्या करे, कहां तक दवा लगाए।
हीच चिंता घालवण्यासाठी कित्येक लोकं कबीर यात्रेत येतात आणि यात्री बनून जातात.
राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यात यंदाची 'राजस्थान कबीर यात्रा' सुरु होती. 2 ऑक्टोबर रोजी बिकानेर शहरात सुरु झालेल्या यात्रेचा 6 ऑक्टोबर रोजी देशनोक येथे समारोप झाला. देश-विदेशातील जवळपास 300 यात्री यात सहभागी झालले. यात्रेत राजस्थानी संगीतासह, गायकांसह देशातील विविध संगीतप्रकारात गायन करणाऱ्या नावाजलेल्या गायकांनी संत कबीरांसह विविध संतांच्या रचना सादर केल्या. कबीर यात्रा यावेळी बिकानेर शहर, बिकानेर जिल्ह्यातील पुगल, श्रीकोलायत, कक्कूचा प्रवास करत करत देशनोक येथे यात्रेचा समारोप झाला.
कलाकारांची मांदियाळी
कबीर यात्रेचा मुक्काम जिथे जिथे राहिला तिथे तिथे प्रचंड कमाल माणसं सादरीकरण करून गेली. राजस्थानी लोककला संगीताला एक वेगळी उंची मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावणारे पद्मश्री अनवर खान मांगणियार, आपल्या अतिशय वेगळ्या अंदाजाने भजनांची सुरुवात करणारे आणि आपल्या भल्या मोठ्या मिशांसाठी ओळखले जाणारे गुजरातच्या कच्छचे मुरालाला मारवाडा, कबीर-मीराबाई-गोरखनाथ यांना जगभर पोहचवणारे मध्यप्रदेशाचे लोकगायक कालूराम बामनिया, बंगाल संगीतातली करुणा ज्यांच्या संगीतातून अक्षरश: नदीसारखी वाहते असे बंगालचे लोकगायक लक्ष्मणदास बाउल, विणेवर बोटं खेळवत रसिकांना खेळवणारे महेशाराम मेघवाल, राजस्थानच्या ग्रामीण भागातुन पुढे येऊन आपल्या पहाडी आवाजाने 'पधारो म्हारो देस' गाणाऱ्या मांगीबाई, सुमित्रादेवी, आपल्या वडिलांसोबत गावात होणारा सत्संग ऐकायला जात जात संगीत जगायला लागलेले मध्य प्रदेशच्या देवा जिल्ह्यातील लोककलाकार अरुण गोयल, आठ पिढ्यांनी जपलेलं पारंपरिक लोकसंगित पुढे नेणारे बिकानेर जिल्ह्याच्या पुगलचे लोकगायक मीर रजाक अली, संत जनाबाई -सखुबाईंच्या भजनांना वेगळ्या चालींच्या माध्यमातून गात कबीर यात्रींना फुगडीवर नाचवणाऱ्या पुण्याच्या गायिका श्रुती वीणा विश्वनाथ, आपल्या गायनात मध्ये-मध्ये शेरो शायरी करत कबीर समजावून सांगणारे छत्तीसगडचे पद्मश्री डॉ. भारती बंधू, कमाईचा-खरपाल-ढोलक अशा वाद्यांची जुगलबंदी सादर करणारा देवू खान, सवाई खान, धारा खान, लतीफ खान यांचा संघ, हे आणि अशी कैक नावं.
कबीर यात्रेत काही म्यझिक बँडदेखील होते. बाबा बुल्लेशाहच्या रचनांना आधुनिक संगीतवाद्यांची जोड देऊन अफलातून सादरीकरण देणारा पंजाबच्या तरुणांचा 'फेरो फ्लूएड' हा मुझिक बँड, 'बुल्लाह की जाना मैं कौन' म्हणत आपल्या तीन सहकाऱ्यांसोबत सुफी संगीत आणि कबीर भजनाचा मेळ घालणारे आणि जगभर कबीर- बुल्ले शाह पोहोचवणारे डॉ. मदन गोपाल सिंह आणि त्यांचा 'चार यार' नावाचा बँड, 'मत कर माया को अहंकार' गाण्याने घराघरात पोहोचलेला नीरज आर्या या तरुणाचा 'कबीर कॅफे' हा बँड, आपल्या आगळ्या-वेगळ्या कंपोझिशनच्या गाण्यांमधून वन्यजीव संरक्षण- आदिवासी जीवन या विषयांवरची गाणी गाणारा आणि तीन वेळा ग्रॅमी अवॉर्ड् वर आपलं नाव कोरणाऱ्या रिकी केज यांचा बँड….

(यात्रा जिथे कुठे मुक्कामाला असेल तिथे यात्रींमधील कलाकार अशी बैठक करून आपापली कला सादर करतात.)
कबीर, शाह बाहू, सुलतान बाहू, बाबा बुल्लेशाह, मीराबाई, आमिर खुसरो, गुरु नानक यांच्या सांगितबद्ध रचनांचं गाठोडं आपल्यासमोर उघडून 'देतो मोलावीन सर्व वस्तू' म्हणत सुखद संगीतमय अनुभव देणारे हे लोककलाकार. आणि यांना एका धाग्यात बांधून तुम्हा -आम्हासमोर आणणारी राजस्थान कबीर यात्रा...
कबीर यात्रा फक्त संत विचार, संगीत एवढ्यावरच मर्यादित नाही आहे. आपल्या पहाडी, मधुर आवाजातून रसिकांना मंत्रमुग्ध करणारे कित्येक कलाकार तर असतातच पण त्यांसह त्यांना ऐकणारे यात्रीसुद्धा त्याच तोडीचे असतात. इथे येणारे यात्रेकरू हे खऱ्या अर्थाने या यात्रेचा प्राण आहेत. जवळपास प्रत्येक यात्री हा कुठल्या न कुठल्या कलेचा पुजारी असतो. यावर्षीही असेच कलाकार यात्री यात्रेत होते.
कबीरांच्या लिखाणातील आर्थिक संदेश शोधू पाहणारे आणि कबीरांवर पीएचडी करणारे कोल्हापूरचे गोपालजी, दुतारा सारख्या वाद्याला लहानपणापासून आपलं जीवन बनवणारा पश्चिम बंगलचा ऑरखो हा तरुण, गोवा विद्यापीठात भक्ती विषयावर पीएचडी करणारी सिरिया देशाची तरुणी बोयाना, एका हातात चिपळ्या आणि दुसऱ्या हातात घुंगरांची माळ घेऊन भजनांवेळी बेधुंद नाचणारा ऋषिकेश शहराचा रहिवासी तरुण शिशिर, ही तर फक्त प्रतिनिधिक नावं.
कुणी इंजिनिअर, कुणी पत्रकार, कुणी गायक, कुणी वादक, कुणी शिक्षक, कुणी काय तर कुणी काय. असे जवळपास 300 यात्री. यात्रेच्या पाच दिवसात या सगळ्यांशी ओळख होणं आणि त्यांना जाणून घेणं अशक्य. पण तरीही हे सगळे स्वतः ला विसरून पुन्हा स्वतः ला शोधण्यासाठी, संगीत जगण्यासाठी, यात्रेचं सुख घेण्यासाठी, नवीन माणसांना जाणून घेण्यासाठी इथे येतात. आणि आपली झोळी संगीतमय आठवणींनी भरून आपापल्या गावी परत जातात.
दोतारा, खरताल, कमाईचा, सारंगी आणि बरंच काही…
भारतातील प्रत्येक राज्य त्याच्या वेगवेगळ्या संगीतशैलीसाठी, वाद्यांसाठी ओळखलं जातं. कबीर यात्रेत राजस्थानी वाद्यांची ओळख तर झालीच पण त्यासोबतच इतर वाद्यांचीही ओळख झाली. ‘कामाईचा’ हे पारंपरिक राजस्थानी वाद्य. त्याच्या सोबतीला सारंगी. ही वाद्य नुसती वाजवलीही तरी साधारणपणे संगीत ऐकणारा माणूस सहज ओळखून घेईल की ही राजस्थानी धून आहे म्हणून. जनावरांच्या कातडीपासून बनवलेली ही वाद्यं माणसाच्या कानापर्यंत पोहोचली की खोल हृदयात आपोआप जातात. माणसाला ढवळून काढतात.
यात्रेत आम्हाला जयपूरमधून आलेला एक कलाकार तरुण भेटला त्याचं नाव 'मनू'... पेहरावावरून हा पक्का कलाकार असेल याची जाणीव झालीच होती. यात्रा पुगल येथे असताना भल्या पहाटे हा कुरूळ्या केसांचा तरुण एक वेगळंच वाद्य वाजवत बसलेला आम्हाला दिसला. आधीच्या रात्री झालेला कार्यक्रम साडेतीन-चार पर्यंत सुरू होता. तरीही सकाळी त्याचं ते वाद्य ऐकण्यासाठी काही यात्री त्याच्या भोवती बसले होते. जेवणावेळी आम्ही त्याला भेटलो. त्याच्या वाद्याविषयी माहिती जाणून घेतली. त्या वाद्याचं नाव 'हॅन्डपॅन'.

(पंजाबी आणि अरबी संगीताचं कमाल मिश्रण ऐकवणारा आणि पंजाबच्या तरुणांनी सुरु केलेला 'फेरो- फ्लुईड' हा अफलातून म्युझिक बँड.)
स्टीलपासून बनलेल्या या गोलाकार हॅन्डपॅनवर छोटे छोटे गोल गोल खड्डे असतात. यातूनच स्वर बाहेर पडतो. हे नव्या युगाचं वाद्य आहे. मनू म्हणतो, ' हे वाद्य माणसाला शांत करतं. स्वित्झर्लंड या देशात 2001 साली स्टीलपासून वाद्य बनवणाऱ्या काही लोकांकडून चुकीने हे वाद्य तयार झालं. पुढे आतापर्यंत त्याचा जगभर विस्तार झाला. 2013 साली कबीर यात्रेप्रमाणेच एका यात्रेत मी फिरत असताना काही विदेशी यात्रेकरू मला भेटले. ते हॅन्डपॅन वादक होते. तेव्हापासून मी हॅन्डपॅनशी जोडला गेलो. भारतात सध्या ज्ञात असलेले जवळपास 100 हॅन्डपॅनवादक आहेत जे यात निपुण आहेत. हे वाद्य जवळ असणाऱ्या लोकांची संख्या कदाचित जास्त असू शकते.
संगीत सोबत घेऊन फिरणारे मनूसारखे कैक कलाकार
पश्चिम बंगालवरून आपल्या सोबत दोतारा घेऊन आलेला 'ऑरघो' ही असाच काहीसा संगीतप्रेमी होता. ऑरघोशी आम्ही जेव्हा संपर्क साधला तेव्हा दोतारा विषयी काही मजेशीर गोष्टी कळल्या. ऑरघो म्हणतो, 'जगभर दोताराची अनेक रूप आहेत. दोतारा मुख्यत्वे अरबी संगीतात वापरला जातो. अरबीमध्ये एक 'रबाब' नावाचं वाद्य आहे ज्यात आणि दोतारामध्ये बऱ्यापैकी सम्य आहे. बंगाल राज्यात बाउल नावाचे साधू फिरतात. ते याच दोताराच्या साहाय्याने लोकगीत गातात. लक्ष्मणदास बाउल त्यापैकीच एक नाव. बाउल साधनेत संगीत फार महत्वाचं आहे. यात आनंदलहरी, डुबडुबी, बासुरी आणि त्या पाठोपाठ दोतारा अशी वाद्य वाजवली जातात.'
दोतारा आणि गिटार या वाद्यांना लोक अनेकदा एकसारखे समजून बसतात. पण ऑरघो म्हणतो, ' गिटार हे आधुनिक वाद्य आहे. त्या तुलनेत दोतारा प्राचीन पारंपारिक वाद्य आहे. गिटारवर जेव्हा स्वर पकडला जातो तेव्हा त्याची वेगवेगळ्या विभागात विभागणी केलेली असते त्यामुळे बोटांनी स्वर पकडणं सोपं जातं. पण दोतारा वेगळा आहे. या तारांखाली कसलंही विभाजन केलेलं नसल्यामुळे दोतारा वाजवणं जरा कठीण असतं. बाकी दोतारा हे कुठल्याही संगीत प्रकारात फिट होऊ शकतं.'
यात्रेत कलाकारांसोबत फिरणारा एक तरुण भेटलेला. नाव 'लतीब खान'. पाच दिवसात त्याच्या नावाच्या चर्चा ऐकलेल्या. म्हणतात, लतीब खान जेव्हा खरताल हे वाद्य वाजवतो तेव्हा वीज कडाडल्याचा भास होतो. खरताल हे राजस्थानी लोकवाद्य. वाद्य म्हणण्यापेक्षा लाकडाचे चार समान तुकडे. पण वाजवणं तेवढंच कठीण. लतीबकडे खरताल वाजवण्याचं कमालीचं कसब आहे. मुरालाला मारवाडा, साकूर खान, मीर रजाक अली यांच्या गायनात लतीबच्या हातात असणाऱ्या खरतालने चार चांद लावलेले.

(देशनोक येथे कबीर भजन सादर करताना मध्यप्रदेशच्या इंदोरचे लोकगायक अरुण गोयल.)
याव्यतिरिक्त व्हायोलीन सारखं भासणारं वाद्य कमाईचा, राजस्थानी पुरातन वाद्यांपासून प्रेरणा घेत बनलेलं आणि मुघल काळात ज्यावर बरंच संशोधन झालं असं लोकवाद्य सारंगी, पारंपरिक ढोलक अशी कैक वाद्य ज्या त्या संगीताची शोभा वाढवतात. विलक्षण अनुभव देऊन जातात.
संगीतमय सकाळ आणि रात्र
कबीर यात्रेचं आणखी वैशिष्ट्य म्हणजे इथे आराम करण्यासाठी, झोपण्यासाठी तेवढी उसंत मिळत नाही. सकाळ-संध्याकाळ फक्त कार्यक्रम सुरु असतात आणि त्यानंतर लगेच प्रवास. या गावातून त्या गावात. काहीवेळा जेवणही एखादा कार्यक्रम टाळून करावं लागतं. यातूनही जर वेळ मिळाला तर यात्रीकरूंमध्ये असलेले कलाकार ऍक्टिव्ह मोडवर जातात. एकंदरीत काय तर उठता बसता फक्त संगीत. रात्रीच्या कार्यक्रमांआधीच जेवण उरकलं जायचं. पुगल, श्री कोलायत, कक्कू, देशनोक इथले रात्रीचे कार्यक्रम सकाळी 3 ते 4 पर्यंत चालले. पुन्हा सकाळी सहा सातला उठून पुढचा प्रवास सुरु.
ऋषिकेश शहरातून आलेल्या शिशिर नावाच्या तरुणाने आम्हाला यावर त्यांचं मत सांगितलं, तो म्हणतो,' कबीर यात्रा हेच तर शिकवते. यात्रेचं माझं हे दुसरं वर्ष आहे. 2022 साली मी यात्रा केलेली. इथे धावपळ आहे. हेच तर आपलं जीवन आहे. कबीर यात्रा आपल्याला कन्फर्ट झोनमधून बाहेर पडत जीवनाचा खरा आशय समजावून सांगण्याचं काम करते.'
कबीर यात्रेत सादरीकरण करणारे सर्वच कलाकार हे अफलातून होते. आधुनिक आणि पारंपरिक संगीताला एकाच व्यासपीठावरून ऐकण्याचं 'कबीर यात्रा' हे जंक्शन म्हणता येईल. गायक माहेशाराम असो, मुरालालाजीं असो वा अरुण गोयल असो, यांनी सर्वात जास्त गायलेली रचना म्हणजे,
'वारी जाऊ रे बलहारी जाऊ रे
मेरा सद्गुरू आंगण आया में वारी जाऊ रे'
हे राजस्थानी लोकगीत. आपल्याकडे आलेल्या संतांचं स्वागत करतेवेळी राजस्थानात या लोकगीताला अनन्य असाधारण असं महत्व आहे. या रचनेने अनेक यात्रींना आनंदाने नाचवलं.
पंजाबच्या तरुणांनी सुरु केलेला 'फेरो-फ्लूएड' हा म्युझिक बँड फारच वेगळी संगीत अनुभूती देऊन गेला. बाबा बुल्ले शाह यांच्या रचनेला या अवलियांनी अरबी संगीताचा शृंगार चढावलेला. बँडमध्ये जवळजवळ सात आठ जण. त्यात एक मुलगी सोडून बाकी सगळे पुरुष. ही मुलगीही मधून मधून अरबी स्वर लावायची. अगदी वरचा बिंदू पकडायची. त्याक्षणी ऐकणारा फक्त स्तब्ध व्हायचा. आपण जे ऐकलं त्यावर विश्वास करणं कठीण इतकं ते अद्भुत. बँडमध्ये एक गायक ‘कम’ समीक्षक.
प्रत्येक रचनेआधी तो काही संदर्भ सांगतो पण त्याचं साधं बोलणंही कुठल्या संगीतापेक्षा कमी नाही. आवाजात कमालीचा बेस. या सगळ्याचं मिश्रण आणि सादर होणारं संगीत. हे सगळं तर शब्दात व्यक्त करणं अशक्याच्या घरात. हे सगळं अनुभवावं. बोलून,लिहून किंवा सांगून समजण्याइतपत ते सहज नाही. कितीतरी रचना या त्याला दिलेल्या संगीतामुळे जगप्रसिद्ध होतात. संगीत ही या रचनांना लोकांपर्यंत भावनिकतेची जोड देऊन पोहोचवणारी नाव आहे.
(पद्मश्री भारती बंधू यांच्या कार्यक्रमात बेधुंद होऊन नाचताना यात्री.)
यात्रेत ऐकलेल्या अनेक रचना सदैव लक्षात राहतील. साकुर खान यांनी गायलेलं 'साची कहू तो जग ना माने, झूठ ना माने राम', अरुण गोयल यांनी गायलेलं 'घना दिन सो लियो, रे अब तो जाग मुसाफिर जाग' आणि 'जरा धीरे धीरे गाडी हाको मेरे राम गाडी वाले', सलीम खान यांनी ऐकवलेल्या रचना, "मेरा पिया घर आया, नित्त खैर मंगा, लाल मेरी पत रखियो बला झूले लालण", श्रुती विश्वनाथ यांनी ऐकवलेलं जनाबाईंचं भजन 'डोईचा पदर आला खांद्यावरी', राजस्थाच्या मांड सांगितप्रकरात गायन करणाऱ्या गायिका मांगीबाई यांनी गायलेलं 'पधारो म्हारे देस', या आणि अशा कित्येक रचनांनी मोबाईल आणि कॅमेऱ्याचं स्टोरेज वाढवलं पण पुढे जोवर त्या ऐकण्यात येतील तोवर मन हलकं करतील.
समता, बंधुता आणि प्रेम
कबीर असो वा इतर संत, सर्वांचं सबंध आयुष्य या तीन गोष्टी समजावून सांगण्यात गेलं. कबीर यात्रेत या तीन गोष्टी प्रकर्षाने जाणवतात, जगायला भेटतात. यात्रेचा आनंद घ्यायला आलेले यात्री असो वा लोकगीत ऐकवण्यासाठी आलेले गायक असो, इथे सर्व समान. जेवणासाठी ज्या रांगेत यात्री उभे होते त्याचं रांगेत लक्ष्मणदास बाउल, मुरालालाजी, अरुण गोयल, कालूराम बमानिया किंवा मीर रजाक अली उभे होते.
पुगल, कक्कू, देशनोक, नोखा ही छोटी छोटी गावं. संध्याकाळी पुगलमध्ये पाय ठेवण्याआधीच ढोल वाजण्याचा आवाज येऊ लागलेला. बसमधून बाहेर पडलो तेव्हा मावळतीचा सूर्य दिसलाच पण त्याची शोभा वाढवणारे कैक गावकरी हातात गुलाबाच्या पाकळ्या आणि कुंकू घेऊन नाचत आमच्या स्वागतासाठी उभे होते.
गावकऱ्यांपैकी कुणी नाचत होतं तर कुणी यात्रींवर पुष्पवर्षाव करत होतं, कुणी हात जोडून नमस्कार करत होतं तर कुणी कपाळावर कुंकू लावत होतं. यात्रीही नाचत 'हैं -हैं' करत त्यांच्यासह नाचू लागले. पुगलप्रमाणे कक्कू, देशनोक इथेही यात्रींचं असंच स्वागत झालेलं. या गावकऱ्यांची ही 'मेहमान नवाजी' कबीरांनी सांगितलेल्या बंधुतेच आणि प्रेमाचं प्रतिक होतं.
कबीर इज ए 'रॉकस्टार'
कबीर यात्रेच्या पाचव्या आणि निरोप समारंभाच्या दिवशी रात्रीच्या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण होतं 'कबीर कॅफे'. 'मत कर माया को अहंकार', 'फकिरी' अशा गीतांनी लोकांच्या म्युजिक प्लेलिस्टमध्ये जागा मिळवणारा नीरज आर्याचा कबीर कॅफे.
कार्यक्रमाआधी नीरज आर्या विषयी बोलताना 'राजस्थान कबीर यात्रे'चे संस्थापक गोपाल सिंग म्हणतात, 'आम्ही पहिल्यांदा जवळपास 15 वर्षांपूर्वी भेटलेलो. आता नीरज यांनी 'कबीर कॅफे'ची सुरुवात करून त्याला एक उंची गाठून दिली. नीरज मला बोलताना एकदा म्हणाला की 600 वर्ष झाली तरी काबीरांना वाचलं जातं, ऐकलं जातं, गायलं जातं किंबहुना त्यांना लोक जगतात. मुळात कबीर हे खरे रॉकस्टार आहेत.'
काळी पठाणी घातलेला, कानावर आलेल्या लांबलचक कुरूळ्या केसांचा हा धडधकट तरुण हातात गिटार घेऊन कबीरांच्या ओळींचा संदर्भ देत सांगत होता.
'घट घट में पंछी बोलता
आप ही डंडी आप ही तराजू
आप ही बैठा तोलता'

(वरचा फोटो : नीरज आर्याच्या 'कबीर कॅफे' या बँडसह पारंपरिक भाजनाचं कोलॅबरेशन करताना लोकगायक साकुर खान. खालचा फोटो: डावीकडून महाराष्ट्राच्या गायिका श्रुती विश्वनाथ आणि त्यांना दोतारा या वाद्याची साथ देताना बंगाली वादक शायोन सिन्हा.)
आम्ही कबीरांना गातो. कबीरांशिवाय आम्ही काहीही गाणं टाळतो. आम्ही बॉलिवूड गात नाही, पण बॉलिवूड आमची गाणी गातं. नीरज आर्याच्या याच कार्यक्रमात कबीर यात्रेचे संस्थापक गोपाल सिंह यांनी एक प्रयोग केला. साकूर खान यांना नीरज आर्याच्या बँड सोबत गायला बसवलं. नीरज यांच्या बँडची आधुनिक वाद्यं आणि लोकगायक साकूर खान यांचा पहाडी आणि 'कबीरी' आवाज यांचं अफलातून मिश्रण यावेळी बघायला आणि ऐकायला मिळालं. साकूर खान यांनी यावेळी मीराबाईची दोन भजनं गायली.
‘’मोहब्बत करो मोहब्बत जरुरी हैं’’
संत कबीर यांच्या शेकडो रचना विद्रोही असल्या तरी शेवटी त्या एकाच निष्कर्षावर येऊन थांबतात, ते म्हणजे प्रेम. लोकगायक अरुण गोयल ‘बाईमाणूस’शी बोलताना कबीरांच्या रचनेचा उल्लेख करत म्हणाले की, ''ढाई आखर प्रेम का, पढ़े सो पंडित होय'. कबीर हेच सांगत राहिले. दया, करुणा ही प्रेमाची रूपं आहेत. सगळ्यांनी प्रेम करावं, सगळ्यांचं प्रेमी असणं फार गरजेचं आहे. निसर्गावर, माणसांवर प्रेम करावं, छोट्या-मोठ्याचा भेद विसरावा, जातपात विसरावी हाच तर कबीरांचा संदेश आहे.'
मीर रजाक अली यांचाही सूर असाच काहीसा होता. आम्ही त्यांना कबीर यात्रेत त्यांच्या अनुभवाबद्दल विचारल्यानंतर ते उत्तरले, 'भजन गातेवेळी तर लोक नाचत होतेच पण त्यानंतर काही लोक माझ्या जवळ येऊन माझ्या गळ्यात पडून रडले. त्यांचं ते प्रेम व्यक्त करण्यासाठी ना त्यांच्याकडे शब्द होते ना माझ्याकडे. त्यांच्या मनात करुणा आणि प्रेम आहे. म्हणून हे झालं. त्यांनी त्यांचा 'मी' विसरला.'
'जब मैं था हरी नाही, अब हरी हैं मैं नाही
प्रेम गली अति सांकरी जामे दो न समाही'
ही कबीरांची रचना पुटपुटत ते म्हणाले, 'दोन माणसांमध्ये जर प्रेम नसेल, वैरीभाव असेल एक गाव देखील त्यांना पुरणार नाही. ते एका गावातही राहू शकत नाही. पण जर त्या दोघांमध्ये प्रेम असेल तर छोट्यातल्या छोट्या जागेतही ते राहू शकतात.'
देशनोक येथे झालेल्या कार्यक्रमात शेवटी पद्मश्री डॉ. भारती बंधू यांचा कार्यक्रम होता. कबीरी गीतांमध्ये शायरी म्हणत त्यांनी शेकडो रसिकांची मनं जिंकली होती. त्यांच्या अंदाज-ए-शायरी वर प्रेक्षक एवढे फिदा झालेले की जवळपास सर्वजण व्यासपीठाभोवती नाचत होते. पण जेव्हा तिथे 'राजस्थान कबीर यात्रेचा' निरोप समारंभ झाला तेव्हा कबीरांच्या आणि इतर कैक संतांच्या संदेशाचा सार सांगत ते शेवटी म्हणाले, 'मोहब्बत करो, मोहब्बत जरुरी हैं… कबीर यात्रेला आपण जर एक भलं मोठं सभागृह म्हटलं तर हे लिहिलेलं सर्व काही त्या सभागृहाचं दार म्हणता येईल.
फोटो क्रेडिट: ऋषिकेश मोरे






