‘सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’ म्हणजे सर्वोत्कृष्टांची जिवंत राहण्यासाठी आणि जगण्यासाठीची लढाई. किंवा सर्वात बलशालीच शेवटपर्यंत जिवंत राहू शकतो. आपल्या सर्वांना ही संकल्पना माहित आहे, परंतु जेव्हा जेव्हा आपण कथा किंवा चित्रपटांमध्ये एखादे पात्र त्याच्या अस्तित्वासाठी लढताना आणि जिंकताना पाहतो तेव्हा ते आपल्याला जीवघेण्या परिस्थितीत जीवन जगण्याचे मोठे धैर्य देते.
दक्षिणेचे प्रसिद्ध दिग्दर्शक ब्लेसी ‘आदुजीवितम – द गोट लाइफ‘ या सत्य घटनेवर आधारित असाच एक चित्रपट घेऊन आले आहेत. मूळ मल्याळममध्ये बनलेला हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू आणि कन्नड भाषांमध्येही चित्रपटगृहांमध्ये आणि ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. जगण्याची कथा पडद्यावर येण्याची ही पहिलीच वेळ नाही, पण नजीब मोहम्मदची खरी जीवनकथा पडद्यावर पूर्ण प्रामाणिकपणे मांडल्याबद्दल दिग्दर्शक ब्लेसी नक्कीच कौतुकास पात्र आहेत.
परिस्थितीने नजीबला तीन वर्षे आखाती देशात गुलाम बनवून ठेवले आणि त्या काळात त्याने सहन केलेल्या यातना हृदयद्रावक होत्या. पण आता एक गोष्ट दिलासा देते की नजीब आपल्यात जिवंत आहे.
भारतीय सिनेमांच्या इतिहासातील एक ‘मास्टरपीस’ चित्रपट
सिनेमा बघताना मला आमच्या काॅलेज वेळच्या डॅनियल डेफो यांच्या "राॅबिन्सन क्रुसो" या कादंबरीची आठवण झाली. *क्रुसो बेटावरील जंगलात अडकल्यावर निसर्ग त्याला जगण्यास कसा मदत करतो हे कादंबरीत कळले आणि "द गोट लाईफ" मध्ये एका वाळवंटात अडकल्यावर माणूसचं माणसाचे जीवन कसे असह्य करतो हे कळले.
याचीच तुलना करत सिनेमागृहाबाहेर पडलो..खरंतर हा सिनेमा संपतो आणि आपण सुटकेचा श्वास घेतो.. यातील नायकाचा (पण नायक रूढ अर्थाने हिरो नाही) प्रवास पहात मनात वेदना, यातना, दु:ख आणि छळ घेऊन प्रेक्षक बाहेर पडतो.
'गुलामी' म्हणजे नेमका किती भयानक कष्टदायी अनुभव असतो आणि जगण्याचे वाळवंट कसे होते हे प्रत्यक्ष पडद्यावर पहायचे असेल तर बेन्यामीन यांच्या ‘आदुजीविथम’ या मल्याळी कादंबरीवर आधारित दिग्दर्शक ब्लेसी यांचा ‘आदुजीविथम’ अर्थात हिंदीत 'द गोट लाईफ' हा चित्रपट पहावा.हा चित्रपट भारतीय इतिहास मास्टर पीस आहे.
या चित्रपटात दरवेळी ढिश्यांव ढिश्यांव करत सर्वांना लोळवत आपली सुटका करून घेणारा टिपीकल नायक दिसणार नाही पण ‘निर्जीव वाळू’ कथेचा मुख्य खलनायक आहे. सिनेमा बघताना या वाळूचा थरार प्रेक्षकांच्या काळजाचा थरकाप उडवतो. तर सिनेमाची कथा नजीब, हकीम व इब्राहीम यांच्या आयुष्यातील भयानक संघर्षावर बेतली आहे.
नजीब हा केरळचा वाळू उपसा करणारा मजूर.. आई व पत्नी बरोबर सामान्य जीवन जगत असतो.. त्याच्या सोबतीला नदी, पाऊस, हिरवळ, मासे असे निसर्गरम्य जीवन असते. पण अचानक त्याला सौदीला जाऊन पैसा कमविण्याची संधी मिळते.
ती का आणि कशी मिळते हे सिनेमात पहाणे इष्ट. आणि इथूनच नजीबच्या आयुष्याला वळण मिळते. त्याच्या सारख्याचे पैश्याचे स्वप्न उराशी घेऊन सौदीत जाणाऱ्या हकीमशी प्रवासात सोबत होते. दोघे अरबस्तानात पोहचतात आणि यांच्या स्वप्नांचा चुराडा होऊन आयुष्याची अक्षरशः माती... वाळू होते...तिथे हकिम व नजीबची ताटातूट होते.
हकीमला एक व्यापारी घेऊन जातो तर एक कत्तलखाना चालवणारा अरब नजीबला घेऊन जातो. पाचवी पास असूनही गावाकडे सुखाचे जीवन जगणारा नजीब गुलाम बनतो. मेंढपाळ होतो...आणि नजीबचा प्रत्येक दिवस मरणयातना घेऊन उगवतो… रात्र जखमांसह डोळे मिटून घेते.
यातून सुटकेचा प्रयत्न तो करतो पण पुन्हा या वाळवंटात हरतो...शेवटी थकतो...अचानक एकेदिवशी त्याला हकीम भेटतो आणि सुटकेची भावना पुन्हा जागी होते.मग नजीब, हकीम व त्यांना भेटणाऱ्या अफ्रिकन इब्राहीमच्या आयुष्याचे काय होते, हे पडद्यावर पहावे लागेल. 
मानवी दुःखाचे न संपणारे भयानक वाळवंट
हा सिनेमा एक मानवी दुःखाचे न संपणारे भयानक वाळवंट समोर घेऊन येतो. नजीबचा आणि त्याच्या मित्रांचा प्रवास दिग्दर्शकाने अगदी सहज पण प्रभावी मांडला आहे. प्रत्येक दृश्य अन् दृश्य पहाताना प्रेक्षकांना आपले जगणे किती सुलभ आहे याची प्रचिती देतो.
माणसाला माणूस न समजता जनावरांच्या जगण्यात टाकणे कसे असते हेच हा सिनेमा अधोरेखित करतो. नजीब केरळाच्या निसर्ग संपन्न गावात रहाताना त्याची देहबोली आणि सौदीतल्या एका अज्ञात वाळवंटात जगताना होणाऱ्या अफाट याताना पहाताना कथेची केलेली मांडणी एक रखरखत्या कडक उन्हाला समोर आणून ठेवते.
शारिरीक आणि भावनिक पिडा असह्य झाल्यावर माणूस त्या उंट व शेळ्यात स्वतः ला जनावर समजून कसा राबत रहातो याचे अंत:करण हेलावून टाकणारी घटना डोळ्यासमोर दिसू लागते.
वाळू हा खलनायक कसा असू शकतो हे त्यातील वाळूचे दृश्य पहाताना प्रचिती येते. सुरवातीला नदीतील प्रेमळ दिसणारी वाळू नंतर सौदीतल्या एकाकी जीवनातील वाळवंटातील वाळू होते तेव्हा तिचा क्रूरपणा समोर येतो... नजीबच्या प्रत्येक पावलात पसरणारी वाळू प्रेक्षकांना भयानक, भीतीदायक अनुभव देते. भारतीय सिनेमात इतका चित्तथरारक वाळवंट दृश्यांचा अनुभव यापूर्वी कोणत्याचा सिनेमात दिसला नाही.
गुलामीच्या भयानक जगण्याचे वास्तव मांडणारा हा सिनेमा परदेशातील सुखनैव स्वप्नांची राखरांगोळी कशी होते हे ही अधोरेखित करतो. परदेशाच्या आकर्षणाची काळी बाजू मांडतो. प्रेक्षकांना अस्वस्थ करतो. सिनेमा ज्या कादंबरीवर आहे ती वाचण्याची उत्कटता निर्माण करतो... फसवून परदेशात गुलामीसाठी विकल्या जाणाऱ्या माणसांचे माणूस म्हणून जगणे संपलेली कथा समोर आणतो.
एका दृश्यात नजीब व मेंढी एकाच ठिकाणी पाणी पिताना असलेले दृश्य मनात माणुसकी मेल्यावर काय उरणार हा प्रश्न विचारून जातो.. आणि हेच चित्र असणार हे उत्तर फुटलेला आरसा देऊन जातं. थेंब थेंब पाण्याची व्याकुळता काय असते..
घश्याला कोरड पडणे म्हणजे काय या सगळ्या प्रश्नांची उत्तरे हा सिनेमा देतो... हा मानवी इच्छांचा, अपेक्षांचा उजेडातून अंधाराकडे झालेला प्रवास मोठ्या पडद्यावर पहाणे गरजेचे आहे कारण कधी कधी आपले इंद्रधनुष्यी स्वप्नं आपल्या जीवनाला अंधकारात कसे लोटतात हे सिनेमा बघताना जाणवते...
हा सिनेमा फक्त मानवी जीवनाची नकारात्मक बाजू दाखवत नाही तर मानवी जीवनाची दुर्दम्य इच्छाशक्ती त्याचा लढा पण दाखवतो... स्वतः चा चेहरा तीन वर्षांनंतर पाहिल्यानंतर नजीबची अस्वस्थता काळजाला टोचते तर एक शर्टाचे बटन आपल्या आठवणींना कसे पकडून असते हे दाखविताना दिग्दर्शकाची कुशलता दिसते.
पाण्याची कमतरता,सापांचा जमाव, माणसाने माणसावर केलेले अत्याचार अशा अनेक दृश्यांना जोडून प्रेक्षकांना सोबत घेत सिनेमा प्रवास करतो.
सिनेमात पृथ्वीराज शिवकुमारन यांनी नजीबची भूमिका साकारली आहे. प्रत्यक्षात जगली आहे. दाक्षिणात्य कलाकार कलेशी किती प्रामाणिक असतात हे पडद्यावर दिसून येते. पृथ्वीराजला सलाम करावे अशी भूमिका त्याने सादर केली आहे.
केरळचा खट्याळ युवक ते सौदीतला संकटामागून संकट झेलणारा हतबल माणूस त्याच्या अभिनयाने त्यांने जिवंत केला आहे. हकीमच्या प्रवासाची व्यथा आणि हतबलता केआर गोकुळ यांनी प्रभावी मांडली आहे. इब्राहिम खादिरीच्या भूमिकेत जिमी जीन-लुईस यांने अविस्मरणीय काम केले आहे. त्याचे दिशादर्शन, मानवी इच्छाशक्ती आणि प्रवासात निसर्गाशी केलेला संघर्ष अफलातून आहे आणि तो टिपणारा कॅमेरामन ग्रेट.
यातील प्रत्येक फ्रेम जबरदस्त आहे.फोटोत दिसणारा रेखांकित वाळवंट, उंट सुंदर वाटतात पण प्रत्यक्षात किती भयानक असू शकते याचा अनुभव सिनेमा बघताना येतो. ए. आर. रहेमान यांचे पार्श्वसंगीत सिनेमाला आणखी थरारक बनवते. एक थरारक, मानवी यातनांची कथा अनुभवण्यासाठी नक्की 'द गोट लाईफ 'बघावा लागेल. माणसाच्या केविलवाण्या जगण्याची जनावरागत कथा.
शेवट कमकुवत हृदयाच्या लोकांनी हा सिनेमा बघू नये..यातील अनेक दृश्य शहारे आणणारे आहेत. माणुसकी रसातळाला गेल्यावर काय परिस्थिती असते याची वेदना हा सिनेमा देऊन जातो.. माणसाला लाज वाटते माणूस असण्याची आणि आपोआप डोळ्यात अश्रू दाटतात माणसाच्या वेदना, यातना आणि संघर्ष पाहून....






