…वारीमध्ये मोकळ्या माळावर फक्त पुरुषांचेच कीर्तन होईल. स्त्रियांनी कीर्तन करू नये.
... स्त्रियांनी वीणेकरांच्या पुढे टाळ वाजवू नयेत, अभंग गाऊ नयेत.
... स्त्रियांनी दिंडीत कायम वीणेकरांच्या मागूनच चालत यावे.
‘यारे यारे लहानथोर, भलतीया नारी- नर’ असे अभंग गात जाणाऱ्या पुरुषांच्या वारीत स्त्रियांना मात्र मोकळेपणा नाही याची ही काही उदाहरणे. असे अलिखित संकेत कळत नकळतपणे अगदी आता आतापर्यंत होणाऱ्या वारीत पाळले जायचे.
‘जनी म्हणे, ज्ञानदेवा बोलावा अभंग’ याचे निरूपण करताना जनाबाईंनी ज्ञानदेवांना अभंग रचायची आज्ञा केली. असे भक्तिभावाने माळकरी कीर्तनकारबुवांच्या निरूपणातली ही स्त्रीची आज्ञा करण्याची शक्ती केवळ अभंगातच म्हणायची का? असा खणखणीत सवाल करत सर्वप्रथम पहिल्या महिला भारुडकार चंदाबाई तिवाडी यांनी केला आणि पुरुषी मानसिकता बदलण्यात हातभार लावला.
एखादी स्री भारुड करू शकते यावर आधी तर वारकरी संप्रदायाचा विश्वासच नव्हता. चंदाबाई भारुड सादर करत असताना वारकरी पुरुषांनी टाळ आणि मृदंगाची साथसंगत करायलाही नकार दिला होता. इंद्रायणी काठी हरीनामाच्या गजरात बालपण गेलेल्या चंदाबाई तिवाडी यांनी दिंडीत भारुड करण्यासाठी खूप विरोध सहन केला. जिद्दीच्या जोरावर ओळखीच्या वादकांना तसेच टाळवाजवण्यासाठी स्त्रियांना उभे केले आज महिला भारुडकार म्हणून चंदाबाई तिवाडींचे नाव आदराने घेतले जाते.
बहुजनातील अज्ञान, अंधकार दूर व्हावा, यासाठी संतांनी भारुडाची निर्मिती केलेली आहे. भारुडातून अध्यात्म सांगत, समकालीन मूल्य साधण्याचा प्रयत्न अनेक संतांच्या रूपकातून झालेला आहे. मात्र अध्यात्म ही संकल्पना प्रामुख्याने सर्वसामान्य माणसाला अतिशय गुंतागुंतीची वाटते. त्यामुळेच सर्वसामान्यांना अतिशय गंभीर आणि अनाकलनीय वाटणारे जे तत्त्वज्ञान आहे, ते फार मोठ्या प्रमाणात भारूड या प्रयोगात्मक लोककला प्रकारातून बहुजनांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील अनेक संतांनी केला आहे.
भारूड म्हणजे…?
भारुडाचा उगम कधी आणि केव्हा झाला, हे नेमकेपणाने सांगता येणार नाही. पण हरिकीर्तनाच्या परंपरेतून भारुडाचा जन्म झाला असावा. कीर्तनाची परंपरा महाराष्ट्रात संत नामदेवांनी सुरू केली. लळितामधून ‘रूपक’ हा नाट्यप्रकार उदयास आला. भक्ताने रूपधारी पद्धतीने केलेले गुणगाण म्हणजेच, भारूड होय. संतानी अनेक रूपके रचून त्याचे सादरीकरण बहुजनांपुढे केले. भारुडाला रूपक म्हणून संबोधण्याचे कारण ते द्वयर्थी असते. शब्दरचना जरी एक असली तरी त्याचे अर्थ दोन निघतात. त्यातला एक अर्थ व्यावहारिक असतो, तर दुसरा पारमार्थिक.
भारूड हे जरी काव्य असले तरी त्यात नाट्यांग मोठ्या प्रमाणात दिसून येते. संत एकनाथ महाराजांनी आपली भारुडे अठरापगड जातीच्या आख्याड्यात वावरणाऱ्या बहुरूप्यासारखी केली आहेत. म्हणून त्यांच्या रूपकांसाठी डौरी, गोंधळी, वाघे, गोपाळ, महार इ. भटका समाज वापरला आहे. अध्यात्म हे सरळसरळ न सांगता ते रूपकांच्या माध्यमातून सांगण्याची खुबी नाथांनी लीलया पेलली आहे. भारुड सादरीकरणाच्या पद्धतीचे दोन प्रकार पडतात- एक भजनी भारूड आणि दुसरे सोंगी भारूड.
चंदाताई तिवाडी यांचा बुर्गुंडा
भारुडाची परंपरा जोपासणारे लोककलावंत महाराष्ट्रात आपणास पुष्कळ दिसतात. त्यातले एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजे, भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त पंढरपूरच्या चंदाबाई तिवाडी. प्रवाहाच्या विरोधात उभे राहून संत परंपरेची पताका डोईवर घेऊन चंदाताई सन 1972 पासून भारुडाचे बहुजनांच्या मनावर गारूड करत आल्या आहेत. चंदाताईंची भारूड सादरीकरणाची पद्धती ही सोंगी भारुडाची आहे.
चंदाताईंची वेषभूषा धारण केल्यानंतरची छटा वेगळीच असते. त्यातूनच त्या समाजाला पारमार्थिक अर्थाचा बोध पटवून देतात. उत्कृष्ट वक्तृत्व, अभिनयशैली, त्याला नृत्याची झालर लावून त्या कधी समाजाला उपदेशात्मक चिमटे काढून तर कधी विनोदातून उपहास व्यक्त करतात. मुंबई-पुण्याचा नागर समाज असो, की सभा, साहित्य, नाट्य संमेलने असो; हजारो लोकांना एका जागी खिळवून ठेवण्याची ताकद चंदाताईंच्या सोंगी भारुडात आहे.
चंदाताई या बहुआयामी आहेत. त्यांना संतसाहित्याचा सखोल अभ्यास आहे. परिवर्तनाची कास धरलेल्या चंदाताई नुसत्याच संतांनी रचलेल्या पारंपरिक रचना साभिनय सादर करत नाहीत, तर एड्स, पल्स पोलिओ, गुटखा बंदी, कुटुंब नियोजन, दारूबंदी, स्त्रीभ्रूणहत्या, प्राणीप्रश्न, महिला सबलीकरण, राष्ट्रीय एकात्मता याविषयी आत्मीयतेने दृष्टांत देतात. अशा हरहुन्नरी चंदाताईंचा जन्म एका मारवाडी कुटुंबात झाला. घरची परिस्थिती तशी बेताची, म्हणून त्यांना लौकिक अर्थाने शिक्षण घेता आले नाही.
भारूड परंपरेतील चालतेबोलते विद्यापीठ
जेमतेम सहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या चंदाताई आज भारूड परंपरेतील चालतेबोलते विद्यापीठच मानावे लागेल. सन 1965 मध्ये पंढरपूरच्या तिवाडी कुटुंबातील जगदीश प्रसाद तिवाडी यांच्याशी चंदाताईंचा विवाह झाला. बालवयापासूनच चंदाताईंना शिवणकामाची मोठी आवड होती. हेच सामाजिक भान ठेवून चंदाताईंनी गरीब, कष्टाळू, विडी कामगार महिलांसाठी शिवण उद्योगही सुरू केले. विवाहबद्ध झाल्यानंतर चंदाताईंना दोनच वर्षांत क्षयरोगाने ग्रासले. परंतु त्यांनी पांडुरंगाच्या आशीर्वादाने क्षयरोगावर मात केली.
पांडुरंग म्हणजेच प्राणायाम. पांडुरंग म्हणजेच, त्यांना आत्मसात असलेली टीपेतील गायकी. याच भांडवलावर क्षयरोगावर मात करून त्या परमार्थाला लागल्या आणि सामाजिक बंधने झुगारून भारूड परंपरेत स्वतःला झोकून दिले. चंदाताईंना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि दुंडा महाराज देंगलूरकर यांचे सान्निध्य लाभले. दुंडा महाराजांचा आदर्श ठेवून त्यांनी आपल्या भारूड सादरीकरणाला सुरुवात केली.
भारूड पाठांतर आणि आपल्या प्रतिभेच्या जोरावर त्याचे सादरीकरण ही खुबी चंदाताईंनी आत्मसात केली. 1981 मध्ये पुणे आकाशवाणी केंद्रातून त्यांना भारूड सादरीकरणाची पहिली संधी चालून आली. पुणे आकाशवाणी केंद्राद्वारे त्या लोकांच्या घराघरात पोहोचल्या.
पुढे नागपूरला दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रात प्रा. कमलाकर सोनटक्के यांनी त्यांना निमंत्रित केले. आणि तेथून पुढे जणू काही भारूडरूपी चंदाताई एक्स्प्रेस वाऱ्याच्या वेगाने धावू लागली. अध्यात्माबरोबर समाजाला त्या उपदेश करू लागल्या. अशातच त्यांना डॉ. प्रकाश खांडगे यांनी नागर रंगभूमीवर सादरीकरणाची संधी दिली. मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत मानद व्याख्याता म्हणून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी निमंत्रित केले.
परिस्थितीशी दोन हात
चंदाबाई म्हणतात, ‘’लग्न होऊन सासरी सोलापूरला गेल्यावर तिथली परिस्थिती हलाखीची होती. गुजरगोड ब्राह्मण समाजाच्या असल्याने सासरी घुंगट पद्धत होती. विडी कारखाना बंद पडल्याने पतीची नोकरी गेली. पदरी तीन अपत्ये, त्याबरोबरच घरात सासूसासरे, तीन दीर एवढी माणसे. घरातील सर्व कामं सांभाळून दिवसभरात आडाचं पन्नासहून अधिक घागरी पाणी शेंदून ते दुस-यामजल्यापर्यंत नेण्याची कसरतही तेव्हा मी केली आहे. त्यातच मला टीबीने ग्रासले.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार संसर्गजन्य रोग म्हणून घरापासून बाजूलाच दुस-याखोलीत माझा मुक्काम पडला. बालपणापासून विठुरायाचे वेड होतेच. माझ्या खोलीच्या बाजूला असलेल्या एका मठातील हरिनाम उत्सवामधील विठ्ठलाचे अभंग कानी पडल्यामुळेच एक प्रकारची ऊर्जा मिळाली. त्यामुळेच या रोगातून मी सहीसलामत बाहेर पडले. हा माझा जणू पुनर्जन्मच होता. त्यानंतर मात्र सोलापूर सोडून कायम वास्तव्यासाठी मी पंढरपूरलाच माहेरी दाखल झाले. या काळात आईने दिलेल्या पाच टाळांवर एकवीरा भजनी मंडळाची मी स्थापना केली. नवरात्रांमध्ये भजनी मंडळाच्या कार्यक्रमापासून माझा ख-याअर्थाने भारुड गायनाचा प्रवास सुरू झाला.
भजने गाऊन कला जोपासली जात होती. मात्र पोटाची खळगी भरायची कशी, हा प्रश्न होताच. त्यामुळे या काळात मी शिवण शिवून संसाराचा गाडा ओढला आहे. मी ही कामं करत असताना माझ्या पतींनी स्वयंपाकघराची जबाबदारी सांभाळली होती, हे आवर्जून सांगावंसं वाटतं. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे खंबीर स्त्री असते असे म्हणतात, पण माझ्या बाबतीत हे उलटेच आहे. मला पतींची खंबीर साथ लाभली. त्यामुळेच राजकारणातदेखील मी सहभागी होऊ शकले. कोणत्याही पदावर नसताना अनेक निराधार, गरीब महिलांना आर्थिक व सामाजिक न्याय मिळवून दिला.
पंढरपूरपासून जवळच मौजे गोपाळपूर इथे शासनाकडून जागा मिळवून बेघर व अल्प उत्पन्न महिलांसाठी पंढरपूर अर्बन बँकेच्या साहाय्याने दीडशे घरांची वसाहत उभी केली. या वसाहतीत एका शिक्षण संस्थेचीही उभारणी केली. याचा आत्मिक आनंद माझ्यासाठी मोठा आहे.’’
नेहरू युवा केंद्र, सोलापूर येथील मानाचा समजला जाणारा सावित्रीबाई फुले पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार, सखीमय पुरस्कार इ. पुरस्कार त्यांना प्राप्त झाले. हेच त्यांचे कार्य पाहून 2011 मध्ये भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीने सर्वोच्च मानाचा वरिष्ठ गटातील लोककलेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार देऊन गौरवले.
सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून चंदाताईंनी 1982 मध्ये पंढरपूरजवळ गोपाळपूर या खुरटही न उगवणाऱ्या माळरानावर एकूण 150 गोरगरीब कुटुंबांना घरकुल योजनेतून निवारा उपलब्ध करून दिला आहे. अशा या चंदाताई तिवाडी मारवाडी कुटुंबातल्या, पण व्यवसाय न करता आध्यात्मिक मार्गाने समाजाची सेवा करण्याचे काम करत आहे. त्यांना व त्यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम!






