‘खरा भारत ग्रामीण भागात वसलेला आहे’ म्हणजे काय? याचे आकलनपात्र उत्तर आजही मिळत नाही. मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश,राजस्तान व बिहार राज्यातील डाकूंच्या कथा आजही आवडीने वाचल्या जातात. चित्रपटांसाठी तर अशा कथा म्हणजे अस्सल कच्चा माल व चित्रपट चालण्याची हमीच.अशातच 15 ऑगस्ट 1975 रोजी एक क्रूर डाकू गब्बरसिंग आपली खास बोलीभाषा बोलत पडद्यावर अवतरला.
खरे तर या चित्रपटातील पटकथेतील सर्व पात्रे व कथा जिथे घडू शकते ते बघता चित्रीकरण वरील राज्यातील एखाद्या गावात व्हायला हवे होते आणि पूर्वी तसे झालेही होते. पण ‘शोले’ ने ही परंपंरा तोडली. शोलेचा ‘गब्बर’ सर्वस्वी वेगळा. कठोर, निर्दय, दयामाया नसलेला. वेस्टर्न काऊबॉय चित्रपटातील डाकू सारखा. शोलेतील पटकथेला न्याय देणारा निसर्ग चंबळच्या खोऱ्यात कदाचित सापडला
नसेल किंवा सापडला तरी चित्रीकरणासाठी अवघड ठरत असल्यामुळे लोकेशन सर्वस्वी वेगळे निवडले गेले. रामगढ…

रामगढ... खरं तर या नावाचा जिल्हा आताच्या झारखंड मध्ये आहे. मात्र जी प्रसिद्धी शोलेतल्या रामगढला मिळाली ती एकमेव द्वितीय आहे. बंगरूळू शहरापासून 50 कि.मी. अतंरावर असणारे ‘रामनगरम्’ हे आज पर्यटकांचे आवडते स्थळ झाले आहे. शोले प्रदर्शीत होऊन आज 49 वर्षे होत आहेत.
मात्र 49 वर्षापूर्वी हे गाव जसे आज आहे तसे नव्हते. या चित्रपटाचे कला दिग्दर्शक राम येडेकर हे वेस्टर्न काऊबॉय चित्रपटाचे फॅन होते. दिग्दर्शक रमेश सिप्पी यांच्या समोर या ठिकाणांचे छायाचित्रे जेव्हा ठेवली तेव्हा इतर लोकेशन्स बाद झाली.
रामनगरम् हे मूळ गाव होते, मात्र चित्रीकरणाच्या सोयीसाठी स्वतंत्र रामगढ कला दिग्दर्शक राम येडेकर यांनी उभे केले. ठाकूरची हवेली, मशीद, गावातील चौपाल, पाण्याची टाकी, गब्बरचा अड्डा, लाकडी पूल वगैरे अख्खे गावच तयार करण्यात आले. मंदीर व पाण्याच्या टाकीसाठी स्वतंत्र आर्किटेक नेमावा लागला. मी तर म्हणेन ‘शोले’ चे निम्म्यापेक्षा अधिक श्रेय हे छायाचित्रकार द्वारका द्विवेचा, कला दिग्दर्शक राम येडेकर व संकलक एम. एस. शिंदे यानांच द्यायला हवे व विशेष म्हणजे यातील दोन गडी मराठी होते.
चित्रीकरणाचे सर्व साहित्य या ठिकाणी नेता यावे म्हणून निर्माते जी.पी.सिप्पी यांनी मूख्य रस्त्यापासून ते रामनगरम पर्यंत रस्ता तयार करून घेतला होता. या ठिकाणाशी नैसर्गिक प्रकाशमेळ साधणारा जेलचा सेट मुंबईतील राजकमल स्टुडिओ जवळ उभारण्यात आला होता. कर्नाटक सरकारने साहित्य वाहून नेण्यासाठी एका ट्रेनची सोय केली होती. या ट्रेन मधून परदेशातून आलेले स्टंट क्रू मेंबर्स 18 दिवस जात येत होते.

3 ऑक्टोबर 1973 ला शोलेचा पहिला प्रसंग अमिताभ व जया भादुरीवर चित्रीत करण्यात आला. या चित्रपटाचे शुटींग पूर्ण करण्यास 2 वर्षे लागले. अनेकदा अनेक प्रसंग पुन्हापुन्हा चित्रीत करण्यात आले. ‘ये दोस्ती …..हम नही छोडेगें’ या पाच मिनीटाच्या गाण्याच्या चित्रीकरणासाठी 21 दिवस लागले. कारण हे गाणे जवळपासच्या विविध जागेवर चित्रीत करण्यात आले.
यात केट्टोहळ्ळी नावाचे एक ठिकाण असे आहे जेथे जे किमान 400 वर्षा पूर्वीचे वडाचे खूप मोठे एक झाड आहे. त्या ठिकाणापर्यंत जाण्यायेण्यात बराच वेळ खर्च झाला. ‘ठाकूरच्या हवेलीतील राधा दिवा मालवते’ या 2 मिनिटाच्या प्रसंगाासाठी 20 दिवस लागले होते कारण नैसर्गिक प्रकाशाची समस्या येत असे. ‘गब्बर इमामच्या मुलाची हत्या करतो’ या प्रसंगाचे चित्रीकरण 19 दिवस चालले तर यातील डाकुची ट्रेनवरील हल्ल्यांची दृष्ये मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर पनवेल जवळ चित्रीत करण्यात आली होती ज्याला 7 आठवड्यापेक्षा अधिक वेळ लागला.
रामनगरम्चा इतिहास खूप प्रचीन आहे. टिपू सुलतानाच्या राजवटीत या गावाचे नाव समशेराबाद होते. नंतर इंग्रजानी ते बदलून क्लोजपेट असे ठेवले व स्वातंत्र्यानंतर रामनगरम् झाले. एके काळी या परीसराला सिल्क सीटी ऑफ कर्नाटका असे म्हणत. चारही बाजूला टणक खडकाचे उभे कातळ असल्यामुळे सर्वाचे मन आकर्षुण घेते.

आज रामनगरम् (रामगड) मात्र पूर्णपणे बदलले आहे, मात्र रामनगरच्या नागरिकांनी शोलेचा इतिहास जतन करून ठेवला आहे. रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजूने ग्रफाईट दगडाचे कुंपण घालून त्यावर या चित्रपटातील प्रसंग चितारण्यात आले आहेत.
रामनगर ट्रेक हे आता तरूणाईचे मूख्य आकर्षण झाले आहे. जवळपास 300 दगडी पायऱ्या चढून वर रामाचे मंदीर बघता येते. ज्या ज्या ठिकाणी शुटींग झाले ती ठिकाणे आजही लोकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत. नायिका बसंती ज्या शिव मंदीरात मना सारखा पती मिळावा म्हणून प्रार्थना करते त्या ठिकाणी आता मोठ्या हाय-वे काम पूर्ण झाले आहे. 23 ऑगष्ट 2007 मध्ये रामनगरम् जिल्हा मुख्यालय झाले. आजही हे ठिकाण शोले हिल्स वा शोले लॅण्ड या नावाने ओळखले जाते.
मी सन 1985 मध्ये भर उन्हाळ्यात मैसूरहून बंगलोरला जाताना या ठिकाणी गेलो होतो. गाईडने सर्व शुटींगच्या जागा दाखविल्या होत्या. खरं तर त्या कडक उन्हात आमचा ग्रूप पार घामाघुम झाला होता. या ठिकाणी दिवस दिवसभर शुटींग करणाऱ्या अभिनेत्यांनी, तंत्रज्ञांनी कसे काम केले असेल? येथील दगड उन्हाने खूप तापतात, विना चप्पल पाय ठेवणे अवघडच. एका शिळेवर तो ‘सांबा’ तासन तास किती दिवस बसला असेल?

चित्रपट निर्मिती प्रक्रिया व चित्रपट या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. शेकडो हातांचे पोट यावर अवलंबून असते. छायाचित्रणाचे वजनदार साहित्य रोज आणणे नेणे, सेट खराब होऊ नये म्हणून काळजी घेणे, अचानक येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीना तोंड देणे, सर्वकाही नेमून दिलेल्या वेळेत पार पाडणे यासाठी पडद्यामागे एक खूप मोठी टीम दिवस रात्र राबत असते.
या चित्रपटात स्थानिक लोकानांही सामील करण्यात आले होते. गब्बरच्या गँगमधील एक डाकू स्थानिक निवासी शिवलिंगय्या म्हणतो-‘आम्हाला रोज 10 ते 15 रूपये मिळत असत. जवळपास तीन वर्षे आम्ही या चित्रपटाशी जोडलेलो होतो’. तर पुटय्या नावाची एक व्यक्ती म्हणते- ‘मी दिवसभर अनेक कलावंताच्या डोक्यावर छत्री घेऊन उभा राहत असे व रात्री सुरक्षागार्ड म्हणून काम करीत असे. या कामाचे रोज 15 ते 20 रूपये मिळत.’ तेथील शाळेत शिकणारे अनेक मुलंही खायला मिळतं म्हणून रोज पडेल ती कामे करत असत.
चित्रपट कथा, गीत संगीत, अभिनय यांच्यातील भावनीक नात्यापेक्षा या लोकांचा रोजच्या भाकरीचा प्रश्न अधिक महत्वाचा असतो. राबणारे त्यांचे हात चित्रपटात मात्र कुठेच दिसत नसतात. चित्रपटाला काय वाट्टेल ते नावे ठेवण्यास आम्ही स्वतंत्र असतो.

चित्रपटाचे चित्रीकरण संपले त्या चित्रपटातील या हाताचे नाते संपते मग त्या चित्रपटाने कितीही कोटीचा धंदा केला तरी या हातानां त्यात हिस्सा नसतो. बाह्यचित्रीकरण हे नेहमीच जोखमीचे काम असते त्यातही अशी ठिकाणं जी शोलेत चित्रीत झाली आहेत.
‘शोले’ एक चित्रपट म्हणून हजारो बऱ्या वाईट चर्चा झाल्या आहेत किंवा होऊ शकतात मात्र चित्रपटाची निर्मिती हा पण इतिहासाचा एक भागच असतो. आज रामनगरम् चा जो भूगोल आम्हाला दिसत असेल तो 49 वर्षापूर्वी वेगळा होता व जो या चित्रपटामुळे आजही बघता येतो. ‘चित्रपट हा एक एैतिहासिक दस्तावेज आहे’ असे व्यक्तीश: मला वाटते.






