गावखेड्यातील परिस्थिती पाहून उद्विग्न होत कवी ना.धों.महानोर यांनी त्यांच्या एका कवितेत प्रश्न केला होता, ‘’खेड्याकडे चला, कोणासाठी कशासाठी’’? मात्र ‘बाईमाणूस’च्या टीमने पाहिलेलं गाव बघून महानोरांची हतबल मनस्थिती निश्चितच दूर होऊन गड्या आपुला गावच बरा अशी झाली असती.
स्वयंपूर्ण खेड्याचे स्वप्न सत्यात उतरलेले किंवा उतरू पाहत असलेल्या स्थितीतील काही मोजकी गावे महाराष्ट्रासह देशात आपल्याला पाहायला मिळतात. असे असताना असं नेमकं कोणतं गाव पाहिलं असा प्रश्न तुमच्या मनात येणे स्वाभाविक आहे. याच प्रश्नाच्या उत्तरासाठी चला तर जाऊया महाराष्ट्रातील पहिल्या सौर गावाच्या भेटीला….
सातारा जिल्ह्यातील हे गाव. आधीच या सातारा जिल्ह्यात अनेक गावं अशी आहेत की, त्यांनी कोणत्या ना कोणत्या बाबतीत 'पहिले ' गाव होण्याचा बहुमान मिळवलेला आहे. राज्यातील पहिले पुस्तकांचे गाव - भिलार याच जिल्ह्यात, पहिले फळांचे गाव - धुमाळवाडी, पहिले मधाचे गाव - मांघुर, पहिले फुलपाखरांचे गाव - महादरे हे देखील याच जिल्ह्यात. तर यात भर पडलेली आहे ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेल्या आणखी एका गावाची.
सातारा जिल्ह्यातील कराड - ढेबेवाडी रस्त्यावर मालदण फाट्यावरून उजवीकडे जात राहिले की, आपल्याला डोंगरउतारावरील चिखलगाळ सोबत घेऊन दुथडी भरून वाहणारी वांग नदी लागते. वांग ही कृष्णेची उपनदी ओलांडून उजव्या बाजूला गेलो की काही किमी अंतरावर ग्रामपंचायतीचे प्रवेशद्वार आपल्या स्वागतासाठी सज्ज असते.
समोर गर्द हिरव्या झाडीत लपलेला डोंगर,आसपासच्या डोंगर परिसरातून मोरांच्या केकाटण्याचा येत असलेला आवाज, नुकताच पडून गेलेला पाऊस, ऊन पावसाचा सुरू असलेला खेळ अशा रम्य वातावरणाच्यां साक्षीने, कमानीतून आत गेल्यावर आपण पोहचतो महाराष्ट्राच्या पहिल्या सौर गावात म्हणजेच मान्याचीवाडी या गावात. या गावामध्ये आता सौर उर्जेच्या आधाराने शाश्वत विकासाचे नवे मॉडेल उभे राहिलंय.
(घराघरांवर सोलर प्लेट्स बसवल्याने मान्याचीवाडी हे गाव असं 'सोलरमय' झालेलं दिसतं.)
उंचावरून गावातील घरांची रचना पाहिल्यावर,
आज अचानक एकाएकी
मानस लागे तिथे विहरू
खेड्यामधले घर कौलारू
या कवितेची आठवण येते. काही कौलारू तर काही पत्र्याची तर काही आधुनिकतेचा स्वीकार केलेली दुमजली घरे. घर कसेही असले तरी प्रत्येक घराच्या बाबतीत असलेला समान दुवा म्हणजे प्रत्येक घराच्या छतावर सौर पॅनल बसवलेले आहेत. या पॅनलची रचना काय, यातून किती वीज निर्मिती होणार या प्रश्नांची उत्तरे पाहण्याच्या अगोदर आधी या सगळ्याची सुरूवात नेमकी कशी झाली हे पाहू…
‘माझी वसुंधरा’ अभियानात गावाला मिळाले एक कोटींचे बक्षीस
मान्याचीवाडी हे छोटंसं गाव प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थेवर आधारित आहे. गावची लोकसंख्या जवळपास 420 कुटुंबांची. बहुतांश गावकऱ्यांनी भाकरीच्या चंद्राच्या शोधात मुंबईची वाट धरली आहे. मात्र त्यांनाही आता ‘गड्या आपुला गावच बरा’ असे म्हणण्याची वेळ आली आहेस कारण गेल्या काही वर्षांत मान्याच्यावाडीने राज्याचे लक्ष वेधले जाईल अशी कामगिरी केली आहे.
राज्य शासनाच्या अनेक पुरस्कारांचा बहुमान मिळवलेली ग्रामपंचायत असा वाडीचा लौकिक सर्वदूर आहे. साधारण चार वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्याने, पर्यावरण संवर्धनासंबंधी ‘माझी वसुंधरा’ नावाचे एक महत्वाचे अभियान सुरू केले.
निसर्गाच्या पंचमहाभूतातील पाच घटकांवर म्हणजेच, भूमी(जमीन) ,जल (पाणी), वायू (हवा), अग्नी (ऊर्जा), आकाश (संवर्धन) लक्ष केंद्रित करून राज्याच्या शाश्वत विकासासाठी या अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. नागरिकांना वातावरणीय बदल आणि पर्यावरणीय समस्यांच्या परिणामांची जाणीव करून देणे आणि पर्यावरण सुधारण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यास प्रोत्साहित करणे हा उद्देश ठेवून राज्याने हे अभियान सुरू केले.

('माझी वसुंधरा अभियान' उत्तमरीत्या राबविल्याने मान्याचीवाडीला सलग दोन वेळा 50-50लाख म्हणजेच 1 कोटी रुपये बक्षीस मिळाले.)
एकजुटीनं बदललं गावाचं नशीब
या अभियानाची एवढी माहिती देण्याचे कारण म्हणजे, मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने हे अभियान अतिशय मनःपूर्वक गावात राबवले. त्याच्याच माध्यमातून वाडीला सलग दोन वर्षे पुरस्कार मिळाले. दोन्ही वेळा पन्नास पन्नास लाख इतकी रक्कम बक्षीस स्वरूपात मिळाली. या रकमेचा विनियोग ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी करण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला.
त्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांना ही कल्पना देऊन गावकरी, महावितरणचे अधिकारी व कर्मचारी आणि टाटा सोलरच्या कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांतून साकारले गेले राज्यातील पहिले सौर गाव. आपले गाव ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण असावे, गावच्या लोकांना उत्तम सोयीसुविधा मिळाव्यात व सर्वात महत्वाचे म्हणजे कर्ब उत्सर्जन कमी करण्यासाठी आपल्या गावाने प्रयत्न करावेत या भावनेतून कार्यरत असलेले गावचे सरपंच रवींद्र माने यांच्या आग्रही भूमिकेमुळे व अविरत प्रयत्नांमुळे पहिले सौर गाव होण्याचा बहुमान मान्याच्यावाडीला मिळाला आहे.
कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत
वाडीच्या ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याच्या वाटचालीबद्दल सरपंच रवींद्र माने सांगतात की, " माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून आम्ही बरेच उपक्रम राबवले. त्याआधीही पेपरलेस लाईट बिल, वृक्षारोपण, बोलक्या भिंती असे उपक्रम आमच्या ग्रामपंचायतीने राबवले. पर्यावरण बदलांना कारणीभूत असलेले महत्वाचे कारण म्हणजे कार्बन उत्सर्जन.
हे उत्सर्जन कमी करण्यासाठी जगभरातून अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत वापरण्यावर भर देणे गरजेचे आहे. हेच लक्षात घेऊन आम्ही शंभर टक्के सौर ऊर्जेवर आधारित चालणारे गाव करण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने प्रयत्न केले व आज राज्यातील पहिले सौर गाव होण्याचा बहुमान आम्हाला मिळाला आहे."
कोळसा किंवा डिझेलसारख्या क्लायमेट चेंजला कारणीभूत ठरणाऱ्या जीवाश्म इंधनांचा वापर येत्या काळात कमी करायचा असेल, तर पर्याय म्हणून सौर उर्जेकडे पाहिलं जातं. पण ती महाग असते, सोलर पॅनल्सची देखभाल ठेवणं कठीण असतं असाही अनेकांचा समज असतो. पण लोक एकत्र आले, तर ते हे करू शकतात, हेच या गावांनी दाखवून दिलंय.
घरगुती कामांसाठी विजेचा वापर जास्त प्रमाणात होतो. अनेकवेळा वीज नसल्यास कामे ठप्प होतात. आता भारनियमनाची समस्या क्वचितच येणार असल्याने या प्रकल्पाच्या निर्मितीमुळे ग्रामस्थही सुखावले आहेत.

(निसर्गाच्या पंचमहाभूतातील पाच घटकांवर म्हणजेच भूमी ,जल, वायू, अग्नी, आकाश यावर आधारित 'माझी वसुंधरा अभियान'.)
गावच्या वंदना पाचुपते या सौर प्रकल्पाबद्दल बाईमाणूसशी बोलताना म्हणतात की, "चक्कीतून पीठ दळणं,पाणी भरणं यांसारखी घरगुती कामे आता वीज नाही या कारणाने अडणार नाहीत. आम्हा महिलांना याचा त्रास होणार नाही. याआधी जे काही चार - पाचशे रूपये लाईट बिल यायचं ते पैसे आता बचत होतील. बाकी लहान सहान कामांना ते पैसे उपयोगाला येतील.आमच्या गावचं राज्यपातळीवर नाव झाल्यानं आनंद वाटतो."
वीजदरवाढीला कायमस्वरूपी पर्याय
विजेची बचत म्हणजेच विजेची निर्मिती असे महावितरणचे घोषवाक्य आहे. मान्याच्यावाडीने मात्र केवळ विजेच्या बचतीतून विजेची निर्मिती न करता अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा आधार घेत वीजनिर्मिती केली आहे. प्रत्येक घराच्या छतावर बसवण्यात आलेल्या सौर पॅनल मधून एक किलोवॉट तर शेतातील विहरींवर बसवण्यात आलेल्या सौर पॅनल मधून चार किलोवॉट विजेची निर्मिती होणार आहे.
गावात मान्याचीवाडीमध्ये शंभर किलोवाॅट वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारला जात आहे. यातून रोज पाचशे युनिट विजेची निर्मिती होणार आहे. गावाची गरज सध्या तीनशे युनिट असून, उर्वरित दोनशे युनिट विजेची महावितरणला विक्री केली जाणार आहे.
गरजेपुरती वीज वापरल्यानंतर उरलेली वीज महावितरणला विकली जाणार आहे. यासाठी ‘प्रधानमंत्री सूर्यघ'र’ योजनेचीही मदत घेतली जाणार आहे. या सुर्यघर योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सबसिडीचा उपयोग या सोलर पॅनल बसवण्यासाठी होणार आहे.
महावितरण च्या मदतीने हा प्रकल्प राबवण्यात आल्याने सूर्यप्रकाश नसल्यास काय? याची चिंता नाही. जेव्हा सौर पॅनलमधून सूर्यप्रकाशाच्या अभावी वीज निर्मिती झाली नाही तर महावितरणची वीज उपलब्ध असेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तीच वीज जास्त प्रमाणात तयार झाली तर महावितरणला विक्री केली जाईल. वाडीतील 118 घरांच्या छपरांवर सोलर पॅनल बसवण्याचे काम 80 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे.
महावितरणचे 104 ग्राहक या गावात आहेत. त्यापैकी रस्त्यावरील दिव्यासहित, ग्रामपंचायत, अंगणवाडी, प्राथमिक शाळेसहित सर्वच ग्राहकांनी सोलर पॅनल बसवले आहेत. विजेची दरवाढ, भारनियमन या समस्येतून वाडीतील ग्रामस्थांची कायमची सुटका झाली आहे, असे म्हणता येईल.

(गावात सोलर प्लेट्स बसवताना कर्मचारी.)
असा असेल सौरऊर्जा प्रकल्प…
1) गावातील 100 वीजग्राहकांच्या घरांच्या छतावर होणार वीज निर्मिती.
2) ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाडीसाठी 5 किलो वॕटचा स्वतंत्र प्रकल्प.
3) पाणीपुरवठा योजनेच्या विहीरीवर चार किलो वॕटचा स्वतंत्र प्रकल्प.
4) प्रत्येक घराच्या छतावर एक किलो वॕट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प..
5) प्रत्येक घराच्या छतावर निर्माण होणार सुमारे पंधराशे युनिट (वार्षिक) वीज 1500 निर्मिती.
6) गावकरी करणार लाखो युनिट (वार्षिक) वीज निर्मिती.
7) ऊर्जा उत्सर्जनसह कार्बन न्यूट्रलसाठी होणार मदत.
8) वीज दराच्या वारंवार होणाऱ्या दरवाढीवर ग्रामस्थांनी शोधला कायमस्वरूपी उपाय.
(गावात ठिकठिकाणी असे संदेश लिहून ठेवलेले असून मूलभूत सुविधा सार्वजनिक स्तरावर उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत.)
मान्याच्यावाडीतील स्वच्छ रस्ते,स्वच्छ व सुंदर आणि आकर्षक असलेल्या सार्वजनिक जागा याप्रमाणेच यात आता स्वच्छ,अपारंपरिक ऊर्जा निर्मितीची भर पडली आहे. महाराष्ट्रातील बहुतांश भागाला पाटण तालुक्यातील कोयना धरणावरील वीजनिर्मिती प्रकल्पातून विजेचा पुरवठा होतो.
खऱ्या अर्थाने राज्याच्या विकासाला चालना देणारा हा पारंपरिक ऊर्जा प्रकल्प. त्याच कोयनेवरील प्रकल्पापासून काहीशा अंतरावर असलेला त्याच पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी गावचा सौर ऊर्जा प्रकल्प राज्याच्या आगामी काळातील अपारंपरिक ऊर्जेच्या विकासाला चालना देणारा व अनेक गावांना प्रोत्साहन देणारा ठरेल हे निश्चित.
https://youtu.be/5GAzm5PnClQ?si=stsWBSZ7MxpgQSvE
फोटो क्रेडिट - ऋषिकेश मोरे
(असर आणि बाईमाणूस यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘प्रोजेक्ट धरित्री’ उपक्रमांतर्गत ‘पर्यावरण बदल आणि लिंगभाव’ (Climate & Gender) या विषयावरची ही एक विशेष मालिका आहे.)






