टीम बाईमाणूस
- दुष्काळ, पूर, प्रदूषण, कृषी संकट आणि स्थलांतर यांचा सर्वाधिक फटका महिलांनाच बसतो. हवामान बदल हा केवळ पर्यावरणाचा नाही, तर महिलांच्या जगण्याचा आणि सामाजिक न्यायाचा प्रश्न आहे.
- पाण्यासाठी मैलोनमैल चालणारी आदिवासी महिला, पतीच्या आत्महत्येनंतर शेती सांभाळणारी विधवा, प्रदूषणामुळे मातृत्वाच्या संघर्षाला सामोरी जाणारी तरुणी आणि महापुरात संसार वाचवणारी आई. बाईमाणुसने समोर आणलेल्या या कहाण्या हवामान बदलाच्या मानवी चेहऱ्याची ओळख करून देतात.
- मात्र या कहाण्या केवळ वेदनेच्या नाहीत; जंगलांचे संरक्षण करणाऱ्या, भरडधान्यांची पुनर्भेट घडवणाऱ्या आणि शाश्वत विकासाचे नवे आदर्श निर्माण करणाऱ्या महिलांनी सिद्ध केले आहे की, हवामान बदलाच्या संकटात त्या फक्त पीडित नाहीत, तर परिवर्तनाच्या प्रभावी नेतृत्वकर्त्याही आहेत.
पहाटे पाच वाजता नंदुरबारमधील सपना तडवी डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी घराबाहेर पडते. धाराशिवमध्ये विधवा शेतकरी फुला पवार पैशांची जुळवाजुळव करून तिच्या मुलांना शाळेत टाकण्यासाठी प्रयत्न करतेय. चंद्रपूरमध्ये अनुराधा जगताप या तरुणीला प्रदूषणामुळे वंध्यत्व आल्याने समाजाच्या टोमण्यांना सामोरं जावं लागतंय. कोकणात चक्रीवादळाने सुनीता शेळके यांचं घर उद्ध्वस्त झालं. आता त्या उदरनिर्वाहासाठी मुंबईत धुणीभांडी करतायेत. पहिल्या नजरेत या सगळ्या वेगवेगळ्या कहाण्या वाटतात. पण त्यांना जोडणारा एक समान धागा आहे - हवामानाचा फटका.
आज जगभरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने हवामान बदल, कार्बन उत्सर्जन, हरित ऊर्जा आणि शाश्वत विकास यांवर चर्चा सुरुये. संयुक्त राष्ट्रांपासून ते स्थानिक संस्थांपर्यंत अनेक स्तरांवर उपाय शोधले जातायेत. मात्र या चर्चांमध्ये एक प्रश्न अनेकदा मागे पडतो. हवामान बदलाची सर्वात मोठी किंमत कोण मोजतं? या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्रातील गावागावांत सापडतं. कारण दुष्काळ असो, पूर असो, प्रदूषण असो किंवा कृषी संकट. त्याचा पहिला आणि सर्वाधिक फटका महिलांच्या आयुष्यावर होतो. पाणी आणण्यापासून कुटुंबाचा उदरनिर्वाह सांभाळण्यापर्यंत, आरोग्याच्या समस्यांपासून स्थलांतराच्या वेदनांपर्यंत हवामान बदलाचे परिणाम त्यांच्या दैनंदिन जगण्यात खोलवर उमटत असतात.
गेल्या तीन वर्षांपासून ‘बाईमाणूस’ने ‘प्रोजेक्ट धरित्री’च्या माध्यमातून याच वास्तवाचा मागोवा घेतलाय. प्रोजेक्ट धरित्री हा उपक्रम ‘बाईमाणूस’ने हवामान बदलाचे महिलांच्या आयुष्यावर होणारे परिणाम केंद्रस्थानी आणण्यासाठी सुरू केला. हवामान संकटाचा सर्वाधिक फटका महिलांना बसत असला तरी त्यांच्या अनुभवांना आणि आवाजाला मुख्य प्रवाहातील चर्चांमध्ये पुरेसे स्थान मिळत नव्हते. त्यामुळे तळागाळातील महिलांच्या कथा, संघर्ष, नेतृत्व आणि उपाययोजना पत्रकारितेच्या माध्यमातून समोर आणून हवामान बदल आणि लिंगभाव या विषयावरील लोकशाहीवादी संवाद घडवणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.
याच माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन हवामान बदल आणि महिलांचे आयुष्य यांच्यातील नातं समजून घेण्याचा प्रयत्न केलाय. या प्रवासात समोर आलेल्या कथा केवळ संकटांच्या नाहीत, त्या संघर्षाच्या, जिद्दीच्या आणि पर्याय उभे करणाऱ्या महिलांच्या नेतृत्वाच्या देखील आहेत. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘प्रोजेक्ट धरित्री’च्या या तीन वर्षांच्या प्रवासाचा हा विशेष आढावा.
‘’त्यांनी आत्महत्या करायला नको होती. जगणं खूप अवघड आहे’’ एका आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला शेतकरी सोबत 24 तास…
बाईमाणूसच्या रिपोर्टर संजना खंडारे यांनी धाराशिव जिल्ह्यातील येणेगूर मधल्या भोसगा गावातील २४ वर्षीय विधवा शेतकरी महिलेसोबत जेव्हा २४ तास राहून रिपोर्ट केला तेव्हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या आकडेवारीमागचं विधवा शेतकरी महिलांचं भयाण वास्तव समोर आलं.
नापिकीला कंटाळून मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या करतात. त्यांच्या माघारी राहिलेल्या बायकांचं आयुष्य मात्र अजूनच खडतर होतं. अशाच एका शेतकरी विधवा फुलाबाई पवार यांच्या आयुष्यातील एक दिवस उलगडण्याचा प्रयत्न बाईमाणूसने रिपोर्टच्या माध्यमातून केला. मराठवाड्यातली 80 टक्क्यांहून अधिक शेत जमीन थेट पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. सिंचनाचे प्रमाण अत्यल्प. मात्र गेल्या काही काळापासून पाऊस बेभरवशाचा झालाय. आणि त्याचा थेट परिणाम इथल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यावर होतोय.

आम्ही केलेल्या रिपोर्टमध्ये जे भयाण वास्तव समोर आलं ते म्हणजे, फुलाबाईच्या पतीच्या आत्महत्येनंतर तिचं आयुष्य पूर्णपणे कोलमडून गेलं. कर्ज, दुष्काळ आणि हवामान बदलाच्या संकटात अडकलेल्या शेतीचा सर्वात मोठा फटका तिच्या कुटुंबाला बसला. रोजंदारी, घरकाम आणि जनावरांच्या गोठ्यात राबून ती मुलांचा सांभाळ करते, पण तिला मुलांची शाळा बंद करावी लागली कारण फी परवडत नाही. पाणी, अन्न आणि जगण्याच्या मूलभूत गरजांसाठीही तिचा रोज संघर्ष सुरू असतो. सरकारी मदतीसाठी तिने अनेकदा खेटे घातले, पण अजूनही न्यायाचा पत्ता नाही. तरीही या सगळ्या थकवणाऱ्या परिस्थितीत, मुलांच्या चेहऱ्याकडे पाहून ती स्वतःला सावरते. तिच्यासाठी आता प्रत्येक दिवस हा जगण्याची नव्हे, तर मुलांचं भविष्य टिकवण्याची लढाई आहे. फुला ही फक्त एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. फुलासारख्या अश्या महाराष्ट्रातल्या लाखो महिला आहेत ज्या अश्याप्रकारे हवामान बदलाच्या बळी ठरल्या.
संबंधित रिपोर्ट -
बदलते वातावरण आणि प्रदूषण देतेय नपुसंकतेला आमंत्रण!
बाईमाणूसच्या चंद्रपूर मधल्या रिपोर्टर वर्षा कोडापे यांनी चंद्रपूरमध्ये महिलांना बाळ होत नाही. त्यामुळे घरात सासरकडून त्यांना त्रास होतो, समाज टोमणे मारतो, मात्र या वंध्यत्वामागे कारण म्हणजे चंद्रपूरमध्ये वाढत जाणारं प्रदूषण आहे. हे काळं वास्तव समोर आलं.

चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा कोळसा, सिमेंट, वीज आणि स्टील उद्योगांमुळे विकसित झाला असला तरी या विकासाची मोठी किंमत पर्यावरण आणि मानवी आरोग्याला चुकवावी लागतेय. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि विषारी हवेमुळे श्वसनाचे आजार, हृदयरोग, त्वचारोग यासोबतच पुरुष आणि स्त्रियांमध्ये वंध्यत्वाची समस्या वाढताना दिसते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगातील सहापैकी एक व्यक्ती वंध्यत्वाने त्रस्त आहे, आणि चंद्रपूरसारख्या औद्योगिक जिल्ह्यांमध्ये हे वास्तव अधिक तीव्र आहे. तज्ज्ञांच्या मते हवामान बदल, रासायनिक घटक आणि तणाव यामुळे पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या व गुणवत्ता कमी होतेय, तर महिलांच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम होतोय. या समस्येमुळे अनेक कुटुंबांमध्ये मानसिक तणाव, सामाजिक कलंक आणि हिंसाचार वाढताना दिसतोय . त्यामुळे वंध्यत्व ही केवळ वैयक्तिक नाही तर पर्यावरणीय आणि सार्वजनिक आरोग्याशी जोडलेली गंभीर समस्या बनलीये.
संबंधित रिपोर्ट - https://baimanus.in/en/article/article-about-how-chandrapur-pollution-affecting-fertility-issue-in-male-and-female
२०१९ च्या महापुरात महिला आणि दिव्यांगांचे अदृश्य दुःख
बाईमाणूसच्या अप्सरा आगा या रिपोर्टरने पूर आल्यानंतर सामान्य माणसांपेक्षा दिव्यांग व्यक्तींचे जनजीवन कश्याप्रकारे विस्कळीत होते याचा सविस्तर आढावा घेणारा रिपोर्ट केला. मात्र या रिपोर्टने फक्त एवढंच समोर आणलं नाही तर आपत्ती व्यवस्थापकांना महिलांच्या अंगाने विचार करून तातडीने व्यवस्था करण्याची गरज आहे हे ही अधोरेखित केलं.

2019 मध्ये महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर आणि परिसरात आलेल्या महापुराने मोठ्या प्रमाणावर जीवित व आर्थिक हानी झाली. मात्र या आपत्तीचा सर्वात तीव्र फटका महिलांना आणि दिव्यांग व्यक्तींना बसला. पूरस्थितीत सुरक्षित ठिकाणी पोहोचणे, मदत मिळवणे आणि निवाऱ्याच्या ठिकाणी मूलभूत सुविधा वापरणे महिलांसाठी अधिक कठीण ठरले, कारण घरगुती जबाबदाऱ्या, मुलांचा सांभाळ आणि स्वतःची सुरक्षितता यांचा ताण त्यांच्यावर एकाच वेळी आला. अनेक महिलांना मुलांसह पाण्यातून चालत जीव वाचवावा लागला, तर निवारा केंद्रांमध्ये गर्दी, अस्वच्छता आणि स्वतंत्र शौचालय सुविधांचा अभाव यामुळे त्यांचे हाल अधिक वाढले. या घटनेतून हवामान बदलामुळे वाढणाऱ्या अतिवृष्टीसारख्या आपत्तींमध्ये महिलांसह सर्व असुरक्षित घटकांचा विचार करणारी समावेशक आपत्ती व्यवस्थापनाची गरज स्पष्टपणे समोर आली.
संबंधित रिपोर्ट - https://baimanus.in/en/article/read-about-the-forgotten-victims-of-maharashtras-2019-floods
“हवामान बदल, मायक्रोफायनान्सच्या कर्जाचा विळखा आणि शेतकरी महिलांची परवड”
मराठवाड्यातील ग्रामीण महिलांच्या आयुष्यात हवामान बदल आणि मायक्रोफायनान्स कर्जाचा दुहेरी फास कसा आवळला जात आहे. याचा वेध संजना खंडारे या आमच्या रिपोर्टरने घेतला आहे. 
दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि पीकनुकसान यामुळे शेतीतून मिळणारे उत्पन्न घटले असताना हजारो महिला मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या कर्जाच्या चक्रात अडकल्या आहेत. परभणीसारख्या जिल्ह्यांमध्ये शेतमजुरी बंद पडल्याने महिलांना कर्जाचे हप्ते भरणे अशक्य होत असून वसुलीदारांकडून मानसिक छळ, धमक्या आणि सामाजिक दबावाला सामोरे जावे लागत आहे. अनेक कुटुंबांना घर, दागिने किंवा इतर मालमत्ता विकावी लागत असून काहींना गाव सोडण्याची वेळ आली आहे. हवामान बदलामुळे निर्माण झालेली आर्थिक अस्थिरता, मर्यादित रोजगाराच्या संधी आणि कर्जव्यवस्थेतील त्रुटी यांचा सर्वाधिक फटका ग्रामीण महिलांनाच बसत असल्याचे हे वास्तव या रिपोर्टमधून समोर येते.
संबंधित रिपोर्ट - https://baimanus.in/mr/article/microfinance-debt-trap-climate-change-crisis-rural-women-marathwada
‘’मॅडम, पाळीत स्वच्छता राखायची हे माहितीये, पण त्यासाठी पाणी कुठून आणायचं…?’’
बाईमाणूसच्या रिपोर्टर किरण गीते यांनी पालघर, बीड, मेळघाट या दुष्काळग्रस्त भागांमध्ये हवामान बदल, पाणीटंचाई आणि महिलांच्या आरोग्याचा संबंध उलगडून दाखवणारे महत्त्वाचे रिपोर्टिंग केले. या रिपोर्टमधून दुष्काळाचा परिणाम केवळ शेती किंवा पिण्याच्या पाण्यावरच होत नाही, तर तो महिलांच्या मासिक पाळी, आरोग्य, शिक्षण आणि सन्मानाशीही थेट जोडलेला असल्याचे वास्तव समोर आले.
दुष्काळ आणि पाणीटंचाईचा महिलांच्या आयुष्यावर होणारा परिणाम केवळ पिण्याच्या पाण्यापुरता मर्यादित नाही, तर तो त्यांच्या आरोग्य, शिक्षण आणि सन्मानाशीही थेट जोडलेला आहे. ‘प्रोजेक्ट धरित्री’अंतर्गत पालघर, बीड आणि धाराशिवमध्ये केलेल्या रिपोर्टिंगमधून मासिक पाळी आणि पाणीटंचाई यांच्यातील गंभीर संबंध समोर आला. पाण्याअभावी अनेक मुली आणि महिलांना मासिक पाळीदरम्यान आवश्यक स्वच्छता राखता येत नाही. पालघरच्या आदिवासी भागातील मुलींना शाळांमध्ये स्वच्छतागृहे, पाणी आणि मूलभूत सुविधा नसल्याने पाळीच्या काळात शाळा बुडवावी लागते, तर बीड आणि धाराशिवमधील दुष्काळग्रस्त भागांत महिलांना वापरलेले कापड धुण्यासाठीही पुरेसे पाणी मिळत नाही.

ऊसतोड कामगार महिलांना तर स्थलांतराच्या ठिकाणी शौचालये, पाणी आणि सुरक्षित जागांचा अभाव असल्याने एकच कपडा तासन्तास वापरण्याची वेळ येते. परिणामी मूत्रमार्गाचे संसर्ग, त्वचारोग, प्रजनन आरोग्याच्या समस्या आणि इतर गंभीर आजारांचा धोका वाढतो. हवामान बदलामुळे तीव्र होत जाणाऱ्या दुष्काळाचा हा एक असा पैलू आहे, ज्याची चर्चा क्वचितच होते. मात्र त्याची सर्वाधिक किंमत महिलांनाच आपल्या आरोग्याच्या स्वरूपात मोजावी लागते.
संबंधित रिपोर्ट- https://baimanus.in/mr/article/menstrual-hygiene-water-crisis-maharashtra
‘’बाई शेतात राबण्यासाठीच आम्हाला हवी, पण आपल्या बरोबरीने शेताची मालकीण म्हणून नको’’
आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय संकटांचा सर्वाधिक फटका ग्रामीण महिलांना कसा बसतो, याचा वेध बाईमाणूसच्या रिपोर्टर अप्सरा आगाने शेतकरी महिलांच्या वास्तवातून घेतला.
बीडमधील आशा कांबळे यांच्यासारख्या अनेक महिलांनी पतीच्या आत्महत्येनंतर शेतीत राबूनही जमिनीच्या मालकी हक्कासाठी संघर्ष करावा लागल्याची वस्तुस्थिती या रिपोर्टमधून समोर आली. महाराष्ट्रातील लाखो महिला शेतीत सक्रियपणे काम करत असल्या तरी जमीन, निर्णयप्रक्रिया आणि आर्थिक संसाधनांवर त्यांचा अधिकार अत्यल्प आहे. हवामान बदल, वाढते कृषी संकट, दुष्काळ, कर्जबाजारीपणा आणि स्थलांतर यामुळे महिलांच्या कामाचा ताण वाढत असून त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्य, पोषण आणि मानसिक स्वास्थ्यावर होतोय.

‘सोपेकॉम’च्या अभ्यासानुसार रासायनिक शेती, अस्थिर उत्पन्न आणि संसाधनांवरील मर्यादित हक्क यामुळे महिलांना आर्थिक असुरक्षितता, आरोग्य समस्या आणि विविध प्रकारच्या हिंसाचाराला सामोरे जावे लागते. कृषी संकटाचा विचार करताना महिला शेतकऱ्यांच्या अनुभवांना केंद्रस्थानी आणण्याची गरज हा रिपोर्ट अधोरेखित करतो.
संबंधित रिपोर्ट - https://baimanus.in/mr/article/women-farmers-land-rights-maharashtra
घोटभर पाण्यासाठी सारं रान धुंडाळते...
बाईमाणूसच्या रिपोर्टर सुमित्रा वसावेने नंदुरबार जिल्ह्यातील पाणीटंचाईचा महिलांच्या दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम व्हिडिओच्या माध्यमातून उलगडून दाखवला. नळजोडणी आणि विविध सरकारी योजनांच्या घोषणांनंतरही अनेक आदिवासी व दुर्गम गावांतील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज लांब अंतर पायपीट करावी लागते. पाणी आणण्याची जबाबदारी प्रामुख्याने महिलांवर आणि मुलींवर असल्याने त्यांच्या शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधींवर परिणाम होतो. उन्हाळा तीव्र होत असताना विहिरी आणि पाणवठे आटतात, त्यामुळे पाण्यासाठी तासन्तास रांगा लावण्याची वेळ येते.

हवामान बदलामुळे अनियमित पर्जन्यमान आणि वाढत्या तापमानाने ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. पाणीटंचाई ही केवळ नैसर्गिक संसाधनांची समस्या नसून महिलांच्या आरोग्य, सन्मान आणि जीवनमानाशी थेट जोडलेला प्रश्न असल्याचे या रिपोर्टमधून अधोरेखित होते.
संबंधित लिंक - https://youtu.be/8u563l8_LhY?si=c-uz-O-VArYA7-_P
“वादळ घर घेऊन गेलं, आता मी शहरात धुणीभांडी करते…”
कोकणातील बदलत्या हवामानाचा आणि वाढत्या चक्रीवादळांचा ग्रामीण कुटुंबांवर, विशेषतः महिलांवर, कसा परिणाम होतो याचा वेध अप्सरा आगाने या रिपोर्टमधून घेतला. निसर्ग, तौक्ते आणि इतर चक्रीवादळांमुळे शेती, फळबागा, मासेमारी आणि घरे उद्ध्वस्त झाल्याने रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील अनेक कुटुंबांना मुंबई-पुण्यासारख्या शहरांकडे स्थलांतर करावे लागले.

मात्र या स्थलांतराची सर्वाधिक किंमत महिलांना मोजावी लागते. गावातील शेती आणि घराची जबाबदारी सांभाळणाऱ्या महिलांना शहरात येऊन असंघटित क्षेत्रात धुणीभांडी, घरकाम किंवा मजुरीची कामे करावी लागतात. अपुरी राहणीमानाची साधने, आरोग्याच्या समस्या, असुरक्षितता आणि आर्थिक अस्थिरता यांचा त्यांना सामना करावा लागतो. हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आपत्ती या केवळ पर्यावरणीय नसून सामाजिक आणि लिंगभेदाशी जोडलेल्या संकटांमध्ये रूपांतरित होत असल्याचे हा रिपोर्ट अधोरेखित करतो.
संबंधित रिपोर्ट - https://baimanus.in/mr/article/konkan-women-climate-migration-domestic-work
मासे कमी झाले; सर्वाधिक फटका कोकणातील मच्छीमार महिलांना
हवामान बदलाचा परिणाम केवळ शेतीपुरता मर्यादित नाही, तर तो समुद्रावर अवलंबून असलेल्या लाखो कुटुंबांच्याही आयुष्यावर होतोय. बाईमाणूसचे रिपोर्टर ऋषिकेश मोरे यांनी रत्नागिरीतील मच्छीमार महिलांच्या आयुष्याचा वेध घेताना हे वास्तव समोर आणले.

समुद्रातील वाढते तापमान, प्रदूषण आणि हवामानातील अनिश्चिततेमुळे माशांची संख्या घटत असून त्याचा थेट परिणाम मच्छीमार महिलांच्या उत्पन्नावर होत आहे. मासे वर्गीकरण, प्रक्रिया आणि विक्री या कामांमध्ये महिलांचा मोठा वाटा असला तरी घटत्या मासेमारीमुळे त्यांच्या रोजगारावर संकट आले आहे. अनेक महिलांना आता बांधकाम मजुरीसारखी पर्यायी कामे स्वीकारावी लागतायेत. हवामान बदलामुळे निर्माण झालेले हे संकट केवळ पर्यावरणीय नाही, तर ते ग्रामीण किनारी भागातील महिलांच्या आर्थिक सुरक्षितता, शिक्षण आणि सामाजिक आयुष्याशीही जोडलेले असल्याचे या रिपोर्टमधून स्पष्ट होते.
संबंधित रिपोर्ट - https://baimanus.in/en/article/how-climate-change-impacts-fisherwomen-from-konkan-region
हवामान बदलाशी दोन हात करणाऱ्या लढवय्या महिला
गेल्या तीन वर्षांतील प्रोजेक्ट धरित्रीच्या रिपोर्टिंगमधून महिलांवरील हवामान बदलाचे गंभीर परिणाम समोर आले. दुष्काळ, पूर, प्रदूषण, कृषी संकट, स्थलांतर आणि कर्जबाजारीपणा यांचा सर्वाधिक फटका महिलांना बसत असल्याचं अनेक रिपोर्ट्समधून दिसून आलं. मात्र यामध्ये काही अशा ही महिलांच्या कहाण्या बाईमाणूसने समोर आणल्या ज्या हवामान बदलाशी दोन हात करून लढल्या.
जलसंधारण, शाश्वत शेती, जंगल संवर्धन, स्थानिक जैवविविधतेचे संरक्षण, ऊर्जा बचत आणि सामुदायिक नेतृत्वाच्या माध्यमातून अनेक महिला आपल्या गावांमध्ये बदल घडवताना दिसल्या. हवामान बदलाच्या चर्चेत महिलांना केवळ पीडित म्हणून नव्हे, तर परिवर्तनाच्या वाहक म्हणून पाहण्याची गरज या रिपोर्ट्सने अधोरेखित केली.
भरडधान्यांची पुनर्भेट : हवामान बदलाशी जुळवून घेत महिलांची नवी वाट
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात नीलिमा जोरवर यांनी उभारलेली ‘कळसूबाई मिलेट’ चळवळ ही हवामान बदलाच्या संकटात महिलांनी शोधलेला शाश्वत पर्याय ठरलीये. कमी पाण्यावर, खडकाळ जमिनीत आणि अनिश्चित पावसातही तग धरू शकणाऱ्या नाचणी, वरई, राळा, सावा, कोदो यांसारख्या भरडधान्यांना पुन्हा शेतीत आणि स्वयंपाकघरात स्थान मिळवून देण्याचे काम त्यांनी केले.

हरितक्रांतीनंतर भात आणि गव्हाच्या पिकांकडे वळलेल्या आदिवासी भागातील शेतकऱ्यांना हवामान बदलाचे परिणाम अधिक तीव्रतेने जाणवू लागले होते. अशा वेळी नीलिमा जोरवर यांनी महिलांचे बचतगट, बीज बँक, प्रक्रिया केंद्रे आणि बाजारपेठेची साखळी उभी करत भरडधान्याला रोजगार, पोषण आणि अन्नसुरक्षेशी जोडले. परिणामी अनेक आदिवासी महिलांच्या हातात स्वतःचे उत्पन्न आले, त्यांच्या कुटुंबांच्या आहारात पुन्हा पौष्टिक भरडधान्य परतले आणि कमी पावसातही टिकणाऱ्या शेतीचा विश्वास निर्माण झाला. “आता पाऊस असो वा नसो, आमच्या ताटात भरडधान्य पण असतं अन् हाती पैसाही,” असे सांगणाऱ्या मंदा बुरंगे यांचे अनुभव या बदलाचे जिवंत उदाहरण आहेत. हवामान बदलाशी जुळवून घेण्यासाठी स्थानिक ज्ञान, पारंपरिक बियाणे आणि महिलांचे नेतृत्व किती महत्त्वाचे आहे, हे या बाईमाणूसने केलेल्या रिपोर्टमधून समोर आले.
संबंधित रिपोर्ट - https://baimanus.in/mr/article/click-here-to-read-Special-article-on-Kalsubai-Millet-Shetkari-Company-by-Neelima-Jorwar-
‘कार्बन न्युट्रल गाव’ असलेल्या ‘बेला’ ग्राम पंचायतीकडे असा कोणता यशाचा फॉर्म्युला आहे…?
भंडारा जिल्ह्यातील बेला ग्रामपंचायतीची यशोगाथा केवळ ‘कार्बन न्युट्रल गाव’ या पुरस्कारापुरती मर्यादित नाही, तर लोकसहभाग, महिलांचे नेतृत्व आणि शाश्वत विकासाच्या व्यापक दृष्टिकोनाची ती एक प्रेरणादायी कहाणी आहे जी बाईमाणूसच्या रिपोर्टर संजना खंडारे यांनी समोर आणली. सरपंच शारदा गायधने-शेंडे यांच्या नेतृत्वाखाली गावाने वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्ती, घनकचरा व्यवस्थापन, सौरऊर्जेचा वापर, ई-वाहनांना प्रोत्साहन आणि जलसंधारण अशा अनेक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली.
मात्र बेला गावाची खरी ताकद म्हणजे ग्रामपंचायतीने उभारलेली लोकसहभागाची रचना. गावातील १५१ बचत गट, विविध विषयांवरील समित्या, महिलांचे सक्रिय योगदान, पथनाट्यांच्या माध्यमातून होणारी जनजागृती आणि प्रत्येक नागरिकाला विकास प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची पद्धत यामुळे विकास ही केवळ कागदावरील संकल्पना न राहता लोकांची सामूहिक चळवळ बनली. रस्ते, गटारे आणि इमारती उभारणे म्हणजेच विकास नाही, तर आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, स्वच्छता, जैवविविधता आणि सामाजिक सहभाग यांचा समतोल साधणे म्हणजे खरा विकास, ही भूमिका बेला ग्रामपंचायतीने प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करून दाखवली आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेत महिलांनी केवळ सहभाग घेतला नाही, तर निर्णयप्रक्रिया, नियोजन आणि अंमलबजावणी या सर्व स्तरांवर नेतृत्वाची भूमिकाही निभावली. त्यामुळे बेला हे गाव हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्था आणि महिला नेतृत्व यांच्या संयुक्त शक्तीचे प्रभावी उदाहरण म्हणून पुढे आले.
संबंधित रिपोर्ट - https://baimanus.in/mr/article/click-here-to-read-What-is-the-formula-for-success-of-the-Bela-Gram-Panchayat-a-carbon-neutral-village
हवामान बदलावर मात करण्यासाठी महिलांना केंद्रस्थानी आणण्याची गरज
गेल्या तीन वर्षांत ‘प्रोजेक्ट धरित्री’ अंतर्गत ‘बाईमाणूस’ने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून समोर आलेल्या कहाण्या एक गोष्ट स्पष्टपणे सांगतात, हवामान बदल हा केवळ तापमान वाढीचा, कार्बन उत्सर्जनाचा किंवा पर्यावरणीय संकटाचा विषय नाही. तर तो सामाजिक न्यायाचा आणि लैंगिक समानतेचाही प्रश्न आहे.
हवामान बदलाच्या परिणामांचा सर्वाधिक फटका महिलांना बसत असला तरी उपाययोजनांच्या नियोजनात त्यांचा सहभाग अजूनही मर्यादित आहे. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर नियमित महिला सभा आयोजित करणे, जलव्यवस्थापन समित्या आणि ग्रामविकास समित्यांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढवणे, स्थानिक हवामान कृती आराखडे तयार करताना महिलांचे अनुभव आणि गरजा केंद्रस्थानी ठेवणे आवश्यक आहे.
गटशेती, ठिबक सिंचन, रेन पाईपचा वापर, वृक्षलागवड, जलसंधारण, सेंद्रिय शेती आणि शेळी-कुक्कुटपालनासारख्या पूरक व्यवसायांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्याचबरोबर दुष्काळ पूर्वसूचना प्रणाली, पाण्याच्या कार्यक्षम वापराबाबत जनजागृती आणि स्थानिक नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धनात महिलांना नेतृत्वाची भूमिका देण्यात यावी. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी केवळ धोरणे पुरेशी नाहीत, तर स्थानिक ज्ञान, महिलांचे अनुभव आणि समुदायाच्या सहभागावर आधारित उपाययोजनाच अधिक प्रभावी ठरू शकतात.






