Skip to main content

“वादळ घर घेऊन गेलं, आता मी शहरात धुणीभांडी करते…”

अप्सरा आगा
25 Nov 2025
5 min read
6 views
“वादळ घर घेऊन गेलं, आता मी शहरात धुणीभांडी करते…”

- अप्सरा आगा

चाकरमानी! कोकणवासियांसाठी जवळचा, आपुलीचा, हक्काचा आणि हवाहवासा वाटणारा शब्द. कोकणातल्या किमान प्रत्येक घरामागे एक माणूस मुंबईला हे चित्र नक्की दिसून येत असे. काळ बदलला आणि मोठ्या प्रमाणात कोकणवासी मुंबईची वाट धरू लागली. कधी शिक्षण, कधी घरची परिस्थिती तर कधी वाढती जबाबदारी आणि त्यातून आलेलं पोक्तेपण या साऱ्यामागे असेल कदाचित. पण, यामुळे झालं असं की गावचं घर, वाडा आणि कधीकाळी गजबजलेलं गाव शांत भासू लागलं. घरामध्ये एकतर म्हातारं माणूस, मोजकीच माणसं किंवा घर बंद असं चित्र. 

गेल्या पन्नास वर्षांपासूनचे कोकणाचे हे चित्र आजही फारसे बदललेले नाही. आजही कोकणातील अनेक गावं ओस पडली आहेत, मात्र आज उद्भवलेल्या या परिस्थितीची कारणे पूर्णपणे वेगळी आहेत. कोकणातून होत असलेल्या स्थलांतरामागचे सगळ्यात महत्वाचे कारण पर्यावरण बदल हे आहे. चक्रीवादळ निसर्ग, तौक्ते, बिपरजॉय, तेज, फयान यांनी कोकणवासीयांना स्थलांतर करायला मजबूर केलं आहे.

रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील सुनीता सांगते, 'आमची कोकणात खूप शेती आहे. आम्ही स्वतः शेती करतो. भात शेती करतो, आब्यांची बाग आहे, नारळाची झाडं  आहेत, पण गेल्या चार-पाच वर्षात काहीच फायदा मिळाला नाही. जेवढं शेतीत खर्च करतो तितकंही मिळालं नाही. कधी धो- धो पाऊस येतोय. सगळी झाडं मुळासकट पडतात, शेती करायला मनुष्यबळ नाही. शेतीला खर्च जास्त लागतोय आणि पहिल्यासारखं उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे आम्ही रोजगारासाठी मुंबईला आलो. शेतीच्या कामाशिवाय इतर कोणतं काम आम्ही केलंच नसल्यामुळे मुंबईत आल्यावर आमची पंचाईत झाली.  दुसरं काय काम करणार, कारण इतर कोणतंही आमच्याकडे ‘स्किल’ नाही. गावातले पुरुष मिळेल ते काम करतात आणि आम्ही  घरकाम करतो. मुंबईची आम्हाला सवय नाहीये, पावसाळ्यात लोकल ट्रेनने प्रवास करणं खूप जिकरीचं आहे.

कामाला जाताना सोबत एक साडी घेऊन जाते. कारण प्रवास करताना पूर्ण भिजते. कधीकधी भिजलेल्या साडीवर प्रवास करावा लागतो. त्यामुळे फंगल इन्फेकशन होत. मासिक पाळीच्या काळात तर खूप त्रास होतो. धावपळ खूप होते. व्यवस्थित वेळेवर जेवण मिळत नाही, आमचं कोकण बरं म्हणायचं पण हे नको असं झालंय, पण काय करायचं. हा निसर्गच साथ देत नाही. इथे तुटपुंज्या पगारावर काम करावं लागतंय. इथे महिन्याला घरभाडे द्या, दुकानातून घरात लागणाऱ्या तेलापासून विकत आणावं लागतंय. जेवढ कमवायचं तेवढंच घालवायचं. काय करायचं असल्या जिंदगीला…?

20aug-dharitri2jpg.jpg

निसर्ग संपन्न कोकणातील रायगड जिल्ह्यातलं वेशवी गाव.. डोंगराच्या पायथ्याला आणि समुद्राच्या जवळ वसलेलं. एकेकाळी नारळ, सुपारी, फणस आणि मासेमारीमुळे संपन्न असणारं हे गाव आता दिवसेंदिवस ओस पडायला लागलयं. कोकणात गेल्या काही वर्षांत हवामान बदलांमुळे आलेल्या चक्री वादळांनी, अतिवृष्टीने आणि दरडी कोसळण्याच्या घटनांनी या भागाला थेट स्थलांतराच्या टोकावर नेऊन ठेवलंय. समुद्रकिनारी वसलेल्या या गावांवर हवामान बदलाचा थेट परिणाम म्हणजे, उद्ध्वस्त झालेली शेती, थांबलेली मासेमारी, पडलेली घरं यामुळे माणसांच गाव सोडून मुंबई-पुण्यासारख्या शहरांकडे वाढलेलं स्थलांतराचे प्रमाण.

निसर्ग, तौक्ते, बिपरजॉय, तेज, फयान… एकामागोमाग एक संकटे

2019 पासून 2025 पर्यंत कोकण किनारपट्टीवर अनेक चक्रीवादळांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम केला. चक्रीवादळ निसर्ग (2020) आणि तौक्ते (2021) यांसारखी वादळं थेट कोकणात धडकली, तर बिपरजॉय (2023), तेज (2023), आणि नाव नसलेली चक्री साखळी (2025) यांनीही अप्रत्यक्षपणे मुसळधार पावसाचा मारा केला. ‘फयान’ चक्रीवादळात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले होते.

‘निसर्ग’ चक्रीवादळात रायगड आणि रत्नागिरीच्या सीमेवरचा भाग झोडपला गेला. मंडणगड, दापोली, गुहागर या तालुक्यांना याचा मोठा फटका बसला. कोकण म्हटले की रत्नागिरी, गुहागर, दापोली यासारखे नारळी- पोफळीचे हिरवेगार भाग डोळ्यासमोर येतात पण याच कोकणात मंडणगडसारखा एक अतिदुर्गम तालुका आहे हेही वादळामुळे सगळ्यांसमोर आले. याच मंडणगड तालुक्यातलं ऑलिव्ह रिडले कासवांसाठी झटणारे कासवांचं गाव वेळास उद्ध्वस्त झालं. 

विशेषतः रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये याचा फटका मोठ्या प्रमाणावर बसतोय. फळबाग शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे आंबा, काजू, नारळ यांसारख्या पिकांचं मोठं नुकसान होत आहे. काही ठिकाणी झाडं मुळासकट उन्मळून पडत आहेत. समुद्रकिनाऱ्यालगतच्या घरांमध्ये पाणी शिरणं, वीजपुरवठा खंडित होणं, आणि गावांचा संपर्क तुटणं – हे आता वारंवार घडणारं वास्तव झालं आहे.  



संबंधित लेख वाचा:


1) कोकणचा कॅलिफोर्निया या आश्वासनाआधी कोकणी जनतेच्या या मागण्यांचा विचार करा


 

2021 मध्ये चिपळूण आणि खेडमध्ये आलेल्या पुरात 200 हून अधिक लोक विस्थापित झाले होते.  2020–2023 दरम्यान रत्नागिरी, पोलादपूर, महाड परिसरात दरडी कोसळून 16 लोकांचा मृत्यू झाला. 2023 मध्ये रायगडमधील इरशाळवाडी दरड दुर्घटनेत 26 जण मृत पावले. 2024 मध्ये बिगरमोसमी पावसामुळे भातशेती पूर्णपणे उध्वस्त झाली.  ICAR च्या 2020 च्या अहवालानुसार, “महाराष्ट्रात हवामान बदलामुळे शेतकरी आणि मासेमार यांच्या उत्पन्नावर सरासरी 22% घट झाली आहे. यापैकी कोकणातील आकडे अधिक तीव्र आहेत. 

IMD च्या अहवालानुसार, अरबी समुद्राचं तापमान वाढल्याने चक्रीवादळांची संख्या आणि तीव्रता वाढली आहे. 2001 ते 2019 या कालावधीत चक्रीवादळांची संख्या 52 टक्क्यांनी वाढली. हवामान बदलामुळे चक्रीवादळं अधिक वेळ राहतात, अधिक तीव्र असतात आणि जास्त नुकसान करून जातात. या बदलांचा थेट फटका कोकणातील पायाभूत सुविधा, शेती आणि मच्छीमारी व्यवसायांना बसत आहे. कोकणातील अनेक गावं ही डोंगराळ आणि पर्जन्यप्रधान आहेत. त्यामुळे अतिवृष्टी झाली की दरडी कोसळतात, शेतजमिनी वाहून जातात आणि शेती करण्यास अपयश येतं. यामुळे अनेक कुटुंबं शेतीपासून दूर जात आहेत.

गाव रिकामी, शहरं भरलेली

या सगळ्या संकटांमुळे कोकणातून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होऊ लागलं आहे. मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये कोकणातून आलेल्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. शिक्षण, रोजगार, आणि सुरक्षितता यासाठी गावं मागे टाकून लोक शहरांकडे वळत आहेत. वेशवी गावच्या कोमल सावंत (32) यांचं कुटुंब पूर्वी मासेमारीवर अवलंबून होतं. पण गेल्या तीन वर्षांत पावसामुळे समुद्रात मासे मिळेनासे झाले.

त्या सांगतात, ‘आम्ही मुंबईला आलोय. माझा नवरा भांडुपमध्ये गाडी चालवतो, मी एका झोपडपट्टीत मोलमजुरी करते. इथे काही ओळख नाही. लोक गैरफायदा घेतात. काम शोधणं कठीण जातं. आधी अवकाळी पावसामुळे आमची शेती उश्वासत झाली, नंतर मासेमारी करायला लागलो तर समुद्रातून मासे मिळण्याचे प्रमाण देखील कमी झालं. याशिवाय आमच्या भागात इतर कोणतं काम आम्हाला मिळत नाही. म्हणून इकडे येऊन काम करतोय."

20aug-dharitri3jpg.jpg

‘परिवर्तन’ या सामाजिक संस्थेच्या 2024 च्या सर्वेनुसार, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे 18,000 पेक्षा अधिक कुटुंबांनी 2019 ते 2024 दरम्यान मुंबई, ठाणे, आणि पुण्याकडे स्थलांतर केलं आहे. यातील 65% कुटुंबं ही हवामान बदलामुळे झालेल्या आपत्ती आणि उपजीविकेतील असुरक्षिततेमुळे स्थलांतरित झाली आहेत. 

बदलत्या हवामानाचा लिंग-आधारित परिणाम

कोकणातून स्थलांतर झाल्यावर पुरुष मजुरी, ड्रायव्हर किंवा वॉचमनचे काम करतात. पण महिला? महिलांवर मात्र तिहेरी संकट आहे. गावात असताना त्या भातशेती, घरकाम, पाणी भरणं असे काम करतात. परंतु हवामान बदलाच्या आपत्ती नंतर त्यांच्या जबाबदाऱ्या वाढतात. स्थलांतर होऊन कामाच्या शोधात आलेल्या महिलांना बहुतांश प्रमाणात असंघटित क्षेत्रात काम मिळतं. यामध्ये लैंगिक शोषणाचा धोका आणि आरोग्याच्या अनेक समस्या आहेत. विशेष म्हणजे, हवामान आपत्तीवेळी महिला आणि लहान मुलींना शौचालय, पाणी आणि सुरक्षित निवाऱ्याची सर्वाधिक गरज असते, पण त्याचीच कमतरता भासते.

रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील पाटीलवाडी हे छोटं गाव आता निम्म झालं आहे. इथले 15 घरांपैकी केवळ चार घरांमध्ये लोक राहतात. उर्वरित सगळे लोकं मुंबई, ठाणे आणि पुण्याकडे स्थलांतरित झाले आहेत. या गावातील सुकन्या सुरेखा सांगते, "मी 2016 ला शिक्षणासाठी मुंबईला आले. मुंबईमध्ये माझे नातेवाईक होते. नंतर माझा भाऊ आला. माझे आई - बाबा गावाकडेच होते.आई - बाबा शेती करत होते. पण शेती करायला मनुष्यबळ नव्हतं आणि दोघांना शेती करणं होत नव्हतं. त्यामुळे आई- बाबा पण मुंबईला स्थलांतर झाले. 

2020 साली चक्रीवादळ आलं होतं. त्यावेळी मी ते प्रत्यक्षात अनुभवलं आहे. चक्रीवादळाचा आम्हाला अनुभव नव्हता. खूप मोठं वादळ आलं होतं.  इतक्या मोठ्या प्रमाणात येईल त्याबाबत अंदाजच आला नाही. काहीही पूर्वतयारी नव्हती. प्रशासनाकडून काही सांगितलं गेलं नव्हतं. अचानक येऊन थडकलं. प्रशासनाने फक्त समुद्र किनारी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची लोक तैनात केली होती. पण कोकण किनार पट्टीतील ज्या गावांना सगळ्यात जास्त फटका बसला त्यांना काहीही विशेष सूचना दिल्या नव्हत्या. 

‘’जसजशी वादळांची तीव्रता वाढली तशी लोकांची घर कोसळली, घरात पाणी शिरलं.  सगळ्यांची घर  अक्षरशः कोसळली होती.आंबे- काजूची झाडं मुळासकट पडली. एकतर पूर्वसूचना नव्हती, चक्रीवादळाचा सामना कसा करायचा याचा अनुभव नव्हता. प्रशासनांकडूनही अचूकपणे नियंत्रण ठेवता आलं नाही. हा अनुभव भयंकर होता. सगळं जीवनमान विस्कळीत झालं.आमच्या भागात दोन महिने वीज नव्हती. एक चक्रीवादळामुळे होत्याचं नव्हतं झालं होत. जीवितहानी झाली नाही पण एक मुलाच्या अंगावर भिंत कोसळली आणि तो दगावला. एकेक करून सगळे मुंबईला आले. आता गावी कोणीच नसतं…’’ असं सुकन्या सांगते. 

20aug-dharitri4jpg.jpg

चेंदणी कोळीवाड्यातील प्रभाकर गोडे सांगतात, 'कोकणातील लोकांना मुंबई जवळ असल्यामुळे रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतर व्हायचे. सुरुवातीला भिवंडीला मोठ्या प्रमाणात कापड गिरण्या होत्या, त्यामुळे कोकणातील लोक कामाला येत होती. सध्या तरुण पिढी मोठ्या प्रमाणात मुंबईत स्थायिक होतात. कोकणात तर तरुण पिढी थांबायलाच मागत नाही. कोकणातील मुलांची लग्नच होत नाहीत, आणि आजची तरुण पिढी शेती करायला नको म्हणतात. माझी कोकणात दोनशे एकर जमीन होती. पन्नास गुरं होती, बैलगाड्या होत्या. पण मला मुंबईला नोकरी लागली मग मुंबईतच राहिलो. कोकणात डोंगराळ भाग खूप आहे.

शेती केली तर पावसाळ्यात जमिनी वाहून जातात. वादळ आलं की आंब्याची झाडं पडतात. सध्या तर खूप वाईट परिस्थिती  आहे. मोठा पाऊस पडला तर पाणी जायला वाटच नाही, त्यामुळे पूरजन्य परिस्थिती होते. चक्रीवादळ,मुसळधार पाऊस, पूर, जोरदार वारे याचा शेतीवर परिणाम होतो. आंबा,नारळ, काजूच्या पिकांचे नुकसान हे कोकणातील शेतकऱ्यांसाठी मोठी समस्या आहे.’’

नैसर्गिक संकटाच्या परिस्थितीमागं हवामान बदल हेच प्रमुख कारण

हवमान बदलासंदर्भात बोलताना भारतीय हवामान खातं हे नेहमी सगळं काही ठीक आहे, म्हणजेच 'ऑल इज वेल' असल्याचं सांगतं. जगभरातल्या तज्ज्ञांचं मत मात्र वेगळं आहे, असं ज्येष्ठ पत्रकार आणि पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी म्हटलं आहे. मात्र सध्या निर्माण झालेल्या नैसर्गिक संकटाच्या परिस्थितीमागं हवामान बदल हेच प्रमुख कारण असल्याचं ठाम मत त्यांनी व्यक्त केलं. जगभरातील हवामान तज्ज्ञांचंही तेच मत असल्याचं त्यांनी सांगितलं.

पाऊस अनियमित बनला आहे. ऋतुमान विस्कटलं आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा याचं गणित बिघडलं. त्यामुळं अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीचे परिणाम वाढू लागले आहेत, असंही मत त्यांनी मांडलं.

''वर्ल्ड मेट्रॉलॉजिकल ऑर्गनायझेशननं (जागतिक हवामान संघटना) 'वर्ल्ड वेदर अॅट्रिब्युशन' नावाची संस्था सुरू केली आहे. ही संस्था घटनांचा कल पाहून निष्कर्ष काढते. 5 वर्षांपासून ते चक्रीवादळ, अतिवृष्टी पूर याचा अभ्यास करत आहेत. हे सर्व म्हणजे कार्बन उत्सर्जन वाढत असल्याचा परिणाम असल्याचं त्यांचं मत आहे," अशी माहिती देऊळगावकर यांनी दिली.

"या सर्वाचा विचार करता काही दिवसांपूर्वीची कॅनडातील किंवा अमेरिकेतील उष्णतेची लाट असेल वा जर्मनीतील पूर असेल. या सर्वामागं हवमान बदल हेच कारण आहे, असं शास्त्रज्ञ संगतात. मग आपल्याकडं जगावेगळं कसं असेल, त्यामुळं हवामान बदल होत आहे, हे नक्की" असं मत देऊळगावकर यांनी मांडलं.

पूर, अतिवृष्टी अशा पावसाशी संबंधित नैसर्गिक संकटांमध्ये अनेकदा पावसाच्या लहरीपणावरही खापर फोडलं जातं. त्याशिवाय पावसाचा पॅटर्न बदलत चालला असल्याचीही चर्चा सध्या होत आहे. अतुल देऊळगावकर यांनी पावसाच्या या लहरीपणामागचं कारणही सांगितलं.

20 aug - dharitri 5.jpg(फोटो क्रेडिट: मयुरी लाड) 

''पाऊस हा जवळपास तेवढाच पडत आहे. पण तो कोसळण्याचा कालावधी कमी झालाय. म्हणजे पावसाचे तास हे पूर्वी 100 होते. तर ते आता 60-70 वर आलेत पुढं ते 50 पर्यंत जातील. याचा अर्थ म्हणजे आधी जेवढा पाऊस 100 तासांत पडत होता, तेवढाच पाऊस आता 60-70 तासांमध्येच पडतो. त्यामुळं त्याचा वेग आणि प्रमाण जास्त असतं. 'साधारपणे पावसाचा एक थेंब 3 ते 5 मिलीमीटर व्यासाचा असतो. तो ताशी 30 ते 40 किमी वेगानं आकाशातून जमिनीवर पडतो. पण ढगफुटीदरम्यान किंवा अतिवृष्टीत या थेंबाचा व्यास वाढतो. त्याचा वेगही ताशी 100 किमी होतो. त्यामुळं 300-400 मिलीमीटर पाऊस पडतो. एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या पावसाचा सामन करण्यासाठी मात्र आपल्याकडे पुरेशी यंत्रणाच नसल्याचं मत देऊळगावकर यांनी व्यक्त केलं.

कोकणातील पुरुषांचे स्थलांतर झाल्यामुळे सगळी जबाबदारी महिलांवर

कोकण विभागात हवामान बदल आणि महिलांच्या प्रश्नावर काम करण्याऱ्या ‘रिसोर्स अँड सपोर्ट सेंटर फॉर डेव्हलोपमेंट’चे अध्यक्ष भीम रासकर याविषयी सांगतात, 'कोकणातील पुरुषांचे स्थलांतर झाल्यामुळे गावातली सगळी जबाबदारी महिलांवर येते. महिलांचं जीवन चूल आणि मूल असं असलं तरी त्याच्यापलीकडे शेती बघणे,गावचा कारभार बघा, तिसरी गोष्ट येते ती गावच राजकारण अशी सगळी जबाबदारी महिलांवर येते. प्रत्यक्षात किती जर म्हंटल तर निर्णय प्रक्रिया पुरुषांच्याच हातात आहे. सगळंच पुरुषांच्या ताब्यात आहे. निर्णय घेणारे पुरुष आणि अंमलबजावणी करणाऱ्या महिला अजून हे स्वरूप बदलेल नाही. 

आपण किती जर म्हंटल तरी कोकणातील अस्पृश्यता संपलेली आहे पण 'जात'  संपलेली नाही. त्यामुळे बौद्ध वस्त्यांचे प्रश्न वेगळे आहेत, मराठ्यांचे प्रश्न वेगळे आहेत. गावातल लोकांची प्रतिष्ठा आहे ते सगळं बऱ्याचवेळा आर्थिकवर असतं. त्यामुळे होत असं कि वस्तीतील तरुण मुलं, बाकीचे लोक ज्यांनी स्थलांतर केलं आहे. त्याच्याबाबतीत अडचणी जास्त आहेत. कारण जमीन नाही, काही संसाधने नाहीत आणि अशाप्रकारची जी संकटे आली आणि  फटके बसले. खासकरून हवामान बदलामुळे. मध्यंतरी ज्या कंपन्या, उद्योग कोकणात आले त्याच्यामध्ये गाव विभागली जातात. ज्यांना नोकऱ्या हव्या आहेत ते कंपनीच्या बाजूने जातात आणि ज्यांना पर्यावरणाचा विचार करायचा आहे ते कंपनीच्या विरोधात जातात. महिलांच्या बाबतीत म्हणायला गेलं तर पुरुष स्थलांतर करतात आणि महिला गावी राहतात.

त्यामुळे जीवनातला आनंद निघून जातो. ती सुद्धा एक गरज आहे. खूप अशा मानसिक अडचणी येतात. मुंबईमध्ये एकादी राहिला खोली मिळाली तर शंभरमधील दहा महिला मुंबई, पुण्यात स्थलांतर करू शकतात. आपत्ती सगळी एकट्या महिलेलाच झेलावी लागते. फक्त गणपतीला आणि शिमग्याला सगळे एकत्र येतात. कोकणातील जी मनिऑर्डर इकॉनॉमी आहे ती दिसायला वरवर छान वाटते. पण बाईच्या दुय्यमपणाला आणखी साथ देते. बाईच्या कामात खूप वाढ होते. त्याच्यात एक तणाव वाढत जातो. तिथल्या महिलांचं आरोग्य घ्या तिथल्या महिलांचा ८ hb हिमोग्लोबिन असतं. हे सगळं वातावरण बदलाचाच परिणाम आहे.'

सरकारची तयारी – पुरेशी की फक्त मलमपट्टी?

हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर IMD आणि स्थानिक प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनात सुधारणा केल्या आहेत. पण प्रत्यक्षात अनेक गावांमध्ये आपत्ती पूर्वसूचना पोहोचत नाही. वादळाचा अनुभव नसलेल्या गावांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण होतं. लोकांना मदत पोहोचवायला वेळ लागतो. प्रशासनाने मदतीचे आकडे जाहीर केले, परंतु अनेक वेळा ती मदत सर्वांपर्यंत पोहोचत नाही. गावातील ज्येष्ठ, अपंग, महिला यांच्यापर्यंत मदतीचा हात पोहोचण्यासाठी अधिक संवेदनशील आणि क्षेत्रीय योजना आवश्यक आहेत.

20 aug - dharitri 6.jpg(फोटो क्रेडिट: मयुरी लाड) 

हवामान बदलाच्या संदर्भात राज्य आणि केंद्र सरकारकडून काही योजनांची घोषणा केली गेली आहे. महाराष्ट्र सरकारने 'राज्य हवामान बदल कृती योजना' (State Action Plan on Climate Change - SAPCC) 2014 मध्ये तयार केली होती. त्यात कोकणातील संवेदनशील भागांमध्ये पर्यावरणीय सुधारणा, वृक्षलागवड, जलसंधारण प्रकल्प यांचा समावेश होता. मात्र या योजनेची अंमलबजावणी ग्रामपातळीवर फारशी दिसून आलेली नाही. उदाहरणार्थ, चिपळूण तालुक्यातील काही गावांमध्ये 2022 मध्ये जलशुद्धीकरण यंत्रणा बसवण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, परंतु 2025 पर्यंतही ती प्रत्यक्षात आलेली नाही.

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या एका अहवालानुसार, कोकणातील शेतकऱ्यांसाठी हवामान आधारित शेतीच्या सल्लागार सेवा देणं आवश्यक आहे. परंतु या सेवांचा लाभ मुख्यतः पुरुष शेतकऱ्यांपुरताच मर्यादित राहतोय. महिलांच्या गरजा, त्यांच्या माहितीपर्यंतच्या पोहोच, आणि त्यांचं हवामान बदलाशी लढण्याचं कौशल्य हे अजूनही व्यवस्थेच्या दृष्टिक्षेपाबाहेर आहे. NGO आणि स्थानिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की हे सर्व नंतरची भरपाई आणि उपचार आहेत. पूर्वतयारी, प्रशिक्षण, आणि पुनर्वसन हे दुय्यम मानलं जातं.

सरकारकडून काही सौर उर्जेचे प्रकल्प, सागरी किनारपट्टी बळकटीकरण, आणि आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण घेण्यात आलं आहे. मात्र हे उपाय प्रातिनिधिक स्वरूपातच झाले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती निवारणासाठी Emergency Relief Fund वापरण्यात आला असला, तरीही तळागाळापर्यंत लाभ पोहचत नाही. महिला स्वयं-सहायता समूह (SHG) अनेक ठिकाणी सक्षम झाले आहेत, पण त्यांच्या प्रशिक्षणासाठी विशेष निधी नाही. मत्स्य महिलांना आवश्‍यक असलेले थंड साखळी (cold chain) प्रकल्प अद्यापही उपलब्ध नाहीत.

रत्नागिरी विभागातील पर्यावरण अभ्यासक आणि मुक्त पत्रकार सतीश कामत याविषयी सांगतात की, 'कोकणातील प्रमुख तीन जिल्हे आपण पहिले तर रायगड, रत्नागिरी आणि सिधुदुर्ग. रायगड जिल्हा हा मुंबईच्या जवळ आहे. त्यामुळे तिथलं स्थलांतर फारसं जाणवत नाही. रायगड जिल्ह्यात भरपूर आधुनिक विकास झाला. ज्याला आपण म्हणतो ते सगळे प्रदूषणकारी उद्योगधंदे असतील असं भरपूर काही पसरलेलं आहे. आता कोकण पण बरंच संपलेलंच आहे. काही पर्यटन ठिकाण आहे ते वगळता बाकी सगळं शहरीकरण आणि पर्यायाने बकाल शहरीकरण रायगड जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी दिसतं.

तिथले उद्योगधंदे पण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. बंदरे मोठी झाली आहेत. तो जिल्हा कोकणचा भाग असला तर त्याच्यात कोकण फारच कमी राहिला आहे. जिथे स्थलांतर झालं. तिथे प्रश्न जास्त गंभीर आहे. पण तिथे बऱ्यापैकी रोजगार मिळाला आहे. उत्तर रायगड जिल्ह्यातील लोक मुंबईला ये-जा करू शकतात. अशी एकूण परिस्थिती आहे. त्यामुळे रायगड जिल्हा स्थलांतराच्या बाबतीत फार विचारात घेण्यासारखा नाही. रत्नागिरी आणि सिधुदुर्ग या जिल्ह्यातील आजही परिस्थिती  तशीच आहे. तिथे त्याप्रमाणात रोजगार उपलब्ध नाही. तिथे तशा संधी नाहीत. त्यामुळे लोक मुंबईला स्थलांतर करतात. 

निसर्ग बदलतोय, माणसं हलतायत

कोकणात हवामान बदलाचा परिणाम फक्त पर्यावरणावर नाही, तर घरं, उपजीविका आणि लोकांचं आत्मसमान यावरही झाला आहे. विशेषतः महिलांना दोन आघाड्यांवर लढावं लागतंय – घराच्या जबाबदाऱ्या आणि स्थलांतरानंतरची असुरक्षितता. बदलत्या हवामानाशी जुळवून घेणाऱ्या उपाययोजनांची गरज आता केवळ पर्याय नाही, ती गरज आणि हक्क बनली आहे. धोरणकर्त्यांनी आणि समाजाने या आवाजांपाशी थांबून ऐकायला हवं – कारण कोकण फक्त पर्यटनाचा परिसर नाही, तो अनेक लोकांचं आयुष्य आहे.

20 Aug - dharitri7 - Sukanya.jpg(सुकन्या)

कोकण किनारपट्टीवर वातावरणाचा असमतोल निर्माण झाला आहे. एकीकडे समुद्रात वाढणारे तापमान, हरितगृह वायूंमुळे हवामानात बदल, आणि दुसरीकडे सरकारच्या विकास योजना या सगळ्यांमुळे तिथल्या माणसांच्या जगण्यात मोठं कल्लोळ माजलंय. कोकणातल्या मातीत रुजलेली पिढी आता शहराच्या काँक्रिटमध्ये आपलं घर शोधते आहे. ही केवळ स्थलांतराची व्यथा नाही, ही एका संपूर्ण भूभागाच्या बदलत्या निसर्गाशी चाललेली झुंज आहे.

(असर आणि बाईमाणूस यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘प्रोजेक्ट धरित्री’ उपक्रमांतर्गत ‘पर्यावरण बदल आणि लिंगभाव’ (Climate & Gender) या विषयावरची ही एक विशेष मालिका आहे.)

 

Share this article
 'बाईमाणूस'च्या 'क्लायमेट रिपोर्टर्स'ना आढळलेलं वास्तव... हवामान बदलानं बायांचं जगणंच बदललं
ग्राउंड रिपोर्ट

'बाईमाणूस'च्या 'क्लायमेट रिपोर्टर्स'ना आढळलेलं वास्तव... हवामान बदलानं बायांचं जगणंच बदललं

Extreme heat is no longer just a weather event. From migrant workers and construction labourers to children and low-income families, rising temperatures are deepening inequality across India. This article examines how heatwaves are becoming a public health, livelihood and social justice crisis.

4 min read
T
Team BaiManus
सरकारची वाट न पाहता गाव उभं राहिलं; आदिवासींच्या ‘हलम्याने’ वाचवली विहीर
ग्राउंड रिपोर्ट

सरकारची वाट न पाहता गाव उभं राहिलं; आदिवासींच्या ‘हलम्याने’ वाचवली विहीर

पर्यावरण संवर्धन ही केवळ सरकारी योजनांची जबाबदारी नसून सामूहिक कृतीची प्रक्रिया असल्याचं मध्य प्रदेशातील एका आदिवासी गावाने दाखवून दिलं आहे. झाबुआ जिल्ह्यातील बोरपाडा गावात तीन वर्षे गाळाने भरून गेलेली विहीर ग्रामस्थांनी 'हलमा' या पारंपरिक सामूहिक श्रमपद्धतीच्या माध्यमातून पुन्हा जिवंत केली. भील आदिवासी समाजाची ही शतकानुशतकांची परंपरा केवळ श्रमदानाची नाही, तर जलसंवर्धन, सामाजिक ऐक्य आणि स्वावलंबनाचा जिवंत वारसा आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर, बोरपाडाची ही कथा सांगते की पर्यावरण वाचवण्याचे अनेक उपाय आपल्या लोकपरंपरांमध्येच दडलेले आहेत.

7 min read
V
Vikas Parasram Meshram
धाराशिवमध्ये पहिल्यांदाच महिला पंचायत परिषद; हवामान बदल आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी महिलांचा पुढाकार
ग्राउंड रिपोर्ट

धाराशिवमध्ये पहिल्यांदाच महिला पंचायत परिषद; हवामान बदल आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी महिलांचा पुढाकार

धाराशिव येथे पहिल्यांदाच 'पंचायत परिषद' आयोजित करण्यात आली, यात ३५ गावांतील महिला सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्र येत हवामान बदल आणि दुष्काळ निवारणासाठी स्थानिक पातळीवरील 'कृती आराखडा' तयार केला गेला. वाढत्या उष्णतेचा आणि पाणीटंचाईचा थेट फटका ग्रामीण महिलांच्या आरोग्याला, आर्थिक स्थितीला आणि विशेषतः मुलांच्या शिक्षणाला कसा बसत आहे, यावर महिलांनी आपले वास्तव अनुभव मांडले. केवळ समस्या न मांडता महिलांनी गट शेती, ठिबक सिंचन, रेन पाईपचा वापर, वृक्षलागवड आणि शेळी-कुक्कुटपालनासारख्या पूरक व्यवसायांच्या माध्यमातून हवामान बदलावर मात करण्यासाठी धोरणात्मक उपायांची मागणी केली. याच परिषदेत 'दुष्काळ पूर्वसूचना प्रणाली' अहवालाचेही प्रकाशन झाले.

3 min read
A
Apsara Aga
वाघांच्या मागावर कॅमेरे की शिकारी? ताडोबामध्ये नेमकं काय सुरू आहे…?
ग्राउंड रिपोर्ट

वाघांच्या मागावर कॅमेरे की शिकारी? ताडोबामध्ये नेमकं काय सुरू आहे…?

ताडोबातील काही वाघ दिसेनासे झाल्याच्या चर्चांमुळे वन्यजीव क्षेत्रात खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर बंगळुरूस्थित एका वन्यजीव छायाचित्रकाराच्या चौकशीमुळे संशयांना नवे वळण लागले आहे. छायाचित्रणाच्या नावाखाली जंगलात नियमबाह्य हालचाली, मेलेली जनावरे टाकणे आणि रात्री-अपरात्री फिरण्याचे आरोप या छायाचित्रकारावर आहेत. वन विभागाने मात्र चौकशी केवळ अनधिकृत प्रवेशासंदर्भात असून शिकारीचे कोणतेही पुरावे नाहीत, असा दावा केला आहे.

8 min read
S
Shantanu Khuje
Beed : बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी मोकाट की अटकेत?
Video content
ग्राउंड रिपोर्ट

Beed : बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी मोकाट की अटकेत?

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडले आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावी आलेल्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील व्यक्तीने बलात्कार केला, ज्यामुळे ती प्रचंड मानसिक धक्क्यात आहे. ही एक गंभीर "crime" असून, या "rape case" मुळे "beed news" मध्ये मोठी खळबळ उडाली आहे, ज्यामुळे "breaking news" म्हणून हा प्रकार समोर आला आहे. या "crime news" संदर्भात अधिक माहितीसाठी पाहा हा विशेष रिपोर्ट.

S
Sukeshani Naikwade
"पूर्वी रोज भांडणं... आता 3 महिन्यांपासून शांतता!" | CCTV मुळे बदललं बीडमधलं हे गाव...
Video content
ग्राउंड रिपोर्ट

"पूर्वी रोज भांडणं... आता 3 महिन्यांपासून शांतता!" | CCTV मुळे बदललं बीडमधलं हे गाव...

बीड जिल्ह्यातील खळवट लिमगाव हे गाव एकेकाळी किरकोळ कारणांवरून होणाऱ्या भांडणांसाठी आणि पोलिस स्टेशनच्या फेऱ्यांसाठी ओळखलं जायचं. मात्र आता गावभर बसवण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांमुळे परिस्थितीत मोठा बदल झाल्याचा दावा ग्रामस्थ करत आहेत. ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून गावात CCTV यंत्रणा उभारण्यात आली. त्यानंतर गावातील भांडणं, वाद-विवाद आणि असामाजिक प्रकारांवर मोठ्या प्रमाणात आळा बसल्याचं ग्रामस्थ सांगतात. विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यांपासून गावात एकही भांडण झालेलं नसल्याचा दावा करण्यात येत आहे. या विशेष ग्राउंड रिपोर्टमध्ये पोलीस अधिकारी, महिला ग्रामस्थ आणि सरपंच यांच्याशी संवाद साधत CCTV मुळे गावात नेमका काय बदल झाला, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पाहा बाईमाणूसचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट.

S
Sukeshani Naikwade

Comments

Comments are currently disabled or loading...