Skip to main content

‘’मॅडम, पाळीत स्वच्छता राखायची हे माहितीये, पण त्यासाठी पाणी कुठून आणायचं…?’’

किरण गिते
18 Apr 2025
7 min read
5 views
‘’मॅडम, पाळीत स्वच्छता राखायची हे माहितीये, पण त्यासाठी पाणी कुठून आणायचं…?’’

(किरण गिते)

महिला आपल्या आयुष्यातील 1800 दिवसांपेक्षा जास्त काळ मासिक पाळी मध्ये घालवते. दुसऱ्या शब्दात बोलायचं झालं तर, तिच्या आयुष्यातील सुमारे 5 वर्षे रक्तस्त्राव होण्यामध्ये घालवावी लागतात. दर महिन्याला स्त्रीला येणारी मासिक पाळी ही स्त्रीच्या जीवनातील अतिशय नैसर्गिक अशी घटना. या अफाट निसर्गचक्राचाच तो एक भाग. हीच गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, पाळीविषयी समाजात असणारे गैरसमज दूर करण्यासाठी, मासिक पाळीच्या काळातील आरोग्य आणि स्वच्छता याविषयी अनेक स्तरावर सध्या जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

मात्र दुसऱ्या बाजूला मासिक पाळीत मुलींना-महिलांना शरिराची स्वच्छता राखायची असेल तर प्रश्न येतो पाण्याचा… आणि ज्या भागात बाराही महिने पाण्याचा तुटवडा असतो तिथं…? जो प्रदेश कायम दुष्काळी पट्ट्यातला असतो त्या भागात…? जिथे एका हंड्यासाठी दररोज किमान 4-5 किलोमीटर पायपीट करावी लागते तेव्हा…?

अशा अनेक अनुत्तरित प्रश्नांना घेऊन महाराष्ट्रातील बीड, धाराशिव आणि पालघर या दुष्काळी पट्ट्यात फिरल्यानंतर जे दृश्य दिसलं आणि जी माहिती हाती आली ती धक्कादायक तर आहेच, परंतू त्यावर काहीच धोरणात्मक बदल होत नाही हे अधिक गंभीर आहे.

‘सुलभ फाऊंडेशन’च्या वतीने महाराष्ट्राच्या दोन जिल्ह्यात जे सर्वेक्षण करण्यात आले त्यात शालेय विद्यार्थिनींचाही सहभाग आहे. या सर्वेक्षणातली आणखी एक महत्त्वाची नोंद म्हणजे, शाळांमध्ये अपुऱ्या सुविधा म्हणजेच स्वच्छ शौचालय नसणे, शौचालयात पाणी नसणे, दरवाजा नसणे, साबण नसणे यामुळे शाळेत मासिक पाळीदरम्यान शौचालय वापरण्यास टाळतात. परिणामी, मुली मासिक पाळीदरम्यान शाळेत गैरहजर सुद्धा राहतात. शैक्षणिक वर्षातील सरासरी 60 दिवसांपर्यंत मुली शाळेत गैरहजर राहतात किंवा त्रासात शाळेला हजेरी लावतात, असंही या अहवालात म्हटलं आहे.

2.jpg

स्थळ- विक्रमगड (जि. पालघर)

14 वर्षाच्या मिनाक्षीला शाळेमध्ये मासिक पाळी आली की स्वच्छता कशी राखायची हे शिकवलं जातं… मासिक पाळीत आपलं शरीर स्वच्छ ठेवणं कसं आवश्यक आहे हे शाळेच्या शिक्षिकेने तिला व्यवस्थित समजावून सांगितलेलं असतं. परंतू मिनाक्षी याबाबतीत पूर्णपणे हतबल आहे. इच्छा असूनही मिनाक्षीला मासिक पाळीत स्वत: शरीर स्वच्छ राखता येत नाहीये… मिनाक्षी जिथे राहते ते गाव आणि जिथे शिकते त्या गावातील शाळा या दोन्ही गोष्टी दुष्काळ पट्ट्यात येतात आणि म्हणूनच जिथे दोन हंडे पाण्यासाठी काही किलोमीटर पायपीट करावी लागले तिथे मासिक पाळीत शरिराची स्वच्छता राखण्यासाठी लागणारे पाणी ही मिनाक्षीच नव्हे तर तिच्यासारख्या अनेकांसाठी चैनीची गोष्ट आहे…

मिनाक्षी राहते पालघर जिल्ह्याच्या विक्रमगड तालुक्यातील मानपाडा या आदिवासीबहूल गावात… दरवर्षी उन्हाळ्याला सुरूवात व्हायच्या अगोदरपासूनच पाड्यातील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी तहानलेले असतात. वर्षोनुवर्ष हेच चित्र आहे पालघरचे… गेल्या वर्ष जिल्ह्यात आठवड्याला 19 गावांमध्ये व 73 पाड्यांमध्ये पाणी पुरविले जात होते. मात्र आता हीच संख्या 31 गावे आणि 122 पाड्यांवर पोहोचली आहे. पाणीपुरवठ्यासाठी आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागत असल्याने नागरिकांची पाण्यासाठी वणवण होत आहे.पालघर जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून तापमान 39 ते 42 अंश सेल्सियसदरम्यान असल्याने उन्हाचे चटके बसत आहेत. सर्व ठिकाणचे नाले कोरडे पडले आहेत. तर विहीरी, बोअरवेल, नद्या यांची पाणीपातळी वेगाने खाली जात आहे.

पालघर जिल्ह्याच्या विक्रमगड तालुक्यातील काही गावांमध्ये आणि सरकारी शाळेत मासिक पाळीत स्वच्छता कशी राखावी यासाठी ‘हर जिंदगी’ हा उपक्रम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. ‘हर जिंदगी’च्या प्रकल्प संचालिका प्रियांका भोसले म्हणतात,’’पाणीटंचाई, दुष्काळ आणि महिलांची मासिक पाळी हा विषय इतका गंभीर आहे की यावर चर्चा करणं सोडा साधं बोललंदेखील जात नाही.

आम्ही जेव्हा इथल्या आश्रमशाळेत जाऊन मासिक पाळीत स्वच्छता कशी राखायची यासंबंधी शिबिर घेतो तेव्हा मुली सगळ्यात अगोदर एकच प्रश्न विचारतात, मॅडम, पण त्यासाठी पाणी कुठून आणायचं…? मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेला हा पालघर जिल्हा, मात्र मासिक पाळीच्या तीन-चार दिवसात स्वत:च्याच शरिराला स्वच्छ ठेवण्यासाठी, पाळीत वापरलं जाणारं कापड स्वच्छ धुण्यासाठी एक हंडा पाणीदेखील मिळू नये यापेक्षा अधिक मोठी शोकांतिका काय असू शकेल…?’’



संबंधित लेख वाचा:

1) ‘’पाळी तर मुलीला येते ना, मग आपला काय संबंध..?’’

2) पाळीचे कॉर्पोरेट पॉलिटिक्स..

 

पालघर जिल्ह्यात प्रामुख्याने वारली, कोळी, कोकणा आणि कातकरीसारख्या आदिवासी समुदायांची वस्ती आहे. या प्रदेशातील बहुतेक (आदिवासी) कुटुंबे दारिद्र्यरेषेखाली आहेत. शिवाय, हा एक डोंगराळ प्रदेश आहे, ज्यामुळे इथे रोजगाराच्या संधींची कमतरता निर्माण होते. परिणामी, लोकं चांगल्या उपजीविकेच्या शोधात वर्षभर राज्याच्या इतर भागात स्थलांतर करतात. बऱ्याच प्रकरणांमध्ये, दोन्ही पालक स्थलांतर करतात, त्यांच्या मुलांना सार्वजनिक निवासी शाळांमध्ये सोडतात.

3.jpeg

या भागातल्या अनेक शाळा मासिक पाळीसाठी अनुकूल नाहीत. अनेक शाळा मुलींच्या सुरक्षितता, स्वच्छता आणि स्वच्छतेच्या गरजा पूर्ण करण्यात अपयशी ठरतात आणि त्यामुळेच शाळेत गैरहजर राहणे, शाळा सोडणे असे प्रकार वारंवार घडत असतात. अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे मासिक पाळीच्या स्वच्छतेच्या चुकीच्या पद्धती निर्माण होतात, ज्यामुळे संसर्ग, पुरळ आणि दीर्घकालीन गुंतागुंतीसह विविध आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

तीव्र उन्हाळ्यात तर हे प्रश्न अधिक गंभीर बनतात. शाळेत शौचालय आहेत पण त्यांना दरवाजे नाही आणि पाणीही नाही. त्यामुळे मिनाक्षीसारख्या अनेक मुली रजस्त्राव सुरू झाला की शाळेला जात नाहीत. इतर दिवसांच्या तुलनेत पाळी सुरू असताना पाण्याचा वापर जास्त होतो. सॅनिटरी पॅड्स परवडत नाहीत म्हणून जुनकट लुगड्याची फडकं, वाळलेली पानं किंवा अयोग्य वस्तू पाळीत वापरायची वेळी त्यांच्यावर येते.

पाळीमध्ये वापरण्यात आलेली फडकं स्वच्छ धुण्यासाठी पुन्हा पाण्याचं सावट डोक्यावर घोंगावतं. या सगळ्या गोष्टी पाण्यावर येऊन थांबतात. पाळीत स्वच्छचा न ठेवल्याने युरीन इन्फेक्शन, त्वचेसंबंधी समस्या आणि रक्ताची कमतरता होण्याचा धोका वाढतो.  सुविधांच्या कमतरतेमुळे आरोग्याचा मोठ्या प्रमाणात धोका वाढतो.

स्थळ- कळंब (जि. धाराशिव)

महाराष्ट्रातील बीड आणि धाराशिव या दोन जिल्ह्यांमध्ये ‘सुलभ फाऊंडेशन’च्या वतीने अलीकडेच एक सर्वेक्षण करण्यात आले होते. यात 577 महिलांना मासिक पाळीदरम्यान काय अडचणी येतात यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. बीडमध्ये 351 आणि धाराशिव जिल्ह्यातील 226 महिलांनी दिलेल्या आधारावर हे सर्वेक्षण करण्यात आले. सुनंदा खराटे या एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत, ज्या धाराशिव जिल्ह्यातील कळंबमध्ये राहतात.

सुनंदा खराटे ‘पर्याय’ सामाजिक संस्थेत काम करतात. ‘सुलभ फाऊंडेशन’च्या वतीने जे सर्वेक्षण करण्यात आले त्यात सुनंदा खराटे यांचा सहभाग होता. धाराशिवमध्ये सुमारे 150 महिलांचे सर्वेक्षण करणाऱ्या सुनंदा खराटे यांनी सांगितलं, "गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई आहे. अनेक महिलांशी बोलल्यानंतर असं लक्षात आलं की, महिलांना साधं कापड धुवायलाही अनेकदा पाणी नसतं. वाळत घालायचं म्हटलं की ते उघड्यावर घालता येत नाही. यामुळे महिलांच्या आरोग्याला आवश्यक ती स्वच्छता मासिक पाळी दरम्यान त्यांना राखता येत नाही. गावांत महिला डॉक्टर नसल्यानेही अनेक महिला वैद्यकीय सल्ला घेण्याचं टाळतात. दवाखानाही गावापासून लांब असतो. त्यात पुरुष डॉक्टरांजवळ सगळ्याच महिला बोलत नाहीत."

5.jpeg

धाराशिवमधील तीव्र पाणी टंचाई आणि त्यामुळे महिलांच्या आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम यावर बोलताना सुनंदा खराटे सांगतात की, "धाराशिवमधील अनेक गावात आठ दिवसांतून एकदा पाणी येतं, तेही साधारण एक तासासाठी. आठवडाभर काही पाणी पुरत नाही. इतक्या वर्षांच्या सवयीमुळे या महिला घरातली कामं पाण्याच्या उपलब्धतेनुसार कशीबशी उरकतत. पण मासिक पाळीच्या पाच दिवसांत मात्र या महिलांचे खूप हाल होतात, त्यांना स्वच्छता राखता येत नाही. स्वच्छतागृहात पाणी नसेल तर काय करायचं हा प्रश्न असतो. यामुळे अनेकदा इन्फेक्शन होतं. मासिक पाळीदरम्यान घरात पाणी नसेल तर अनेक महिला लघवी धरून ठेवतात. त्यांना बोअरवेलमधून पाणी आणायला जावं लागतं. हंडा घेऊन बोअरवेलपर्यंत जाऊन-येऊन अर्धा तास लागतो. वजन उचलून पाणी आणावं लागतं. गावात अनेकदा वीज नसते. बोरवेलसुद्धा बंद असते. त्यामुळे अशा परिस्थितीत आम्ही काय करायचं असा सवाल महिला विचारतात."

स्थळ- ऊस तोडणी मजुरांचा तांडा (जि. बीड)

रेखा राठोड, वय 31 वर्ष… रेखा तिच्या पती आणि दोन मुलांसह बीड जिल्हातील एका छोट्या तांड्यात राहते. घरची परिस्थिती बिकट असल्याने नवरा बायको दरवर्षी सहा महिने ऊसतोडणीसाठी स्थलांतर करतात. “सटवाईने पाचवीला कपाळावर फकस्त कष्ट लिहुलेत” असं काकुळती येत रेखा सांगते. पुढे बोलताना, “लेकरांच्या हातात कधीच कोयता देणार नाही, शिकवून त्यांना नोकरी करायला सांगणार” असा दृढ निश्चय रेखाने केलाय. इतर महिलांप्रमाणे रेखाला मासिक पाळीत मरणयातना होतात. 

रेखा सांगते, “लई लहान व्हते तवापासनंच पाळी आली, पोट, कंबर, हात, पाय, पाठ दुखाचे आणि  चकरा आल्यागत व्हायचं, पण पाळी आली हे घरात बोलायला लाज वाटयची, मी बोलले तर सगळी माणसं येड्यागत मह्याकडंच पाहात बसतील, म्हणून लाजंकाजं कुणालाच बोलाईची नाही. गपगुमान बसायची. 18 वर्षाची असतानी लगीन झालं.. दोन लेकरं झाली आणि नवऱ्यासंग म्या बी ऊसतोडायाला जायला लागली. पाळीत लई त्रास होतू पण सांगणार कोणाला अन् सांगितलं तरीबी त्याच्यावर उपाय कराया पैकं नाही” 

परिस्थितीने हतबल झालेली रेखा जेव्हा हे सगळं बोलते तेव्हा तिच्या डोळ्याच्या कडा ओलसर असतात पण, आयुष्य थांबवत नाही, चालत राहायचं खंबीर राहायचं असा आत्मविश्वास उरापाशी बाळगूण राहणार रेखा स्मितहास्य मात्र चेहऱ्यावर कायम ठेवते. 

sugarcane.jpg

ऊसतोड महिलांसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते अशोक तांगडे यांच्याशी जेव्हा यासंदर्भात संवाद साधला यावेळी त्यांनी अनेक मुद्दे मांडले. तांगडे सांगतात, “पाळीत आंघोळ करणं आणि स्वच्छता राखणं गरजेचं आहे. पाळीतच स्वच्छ पॅड वापरणं महत्त्वाचं आहे. पण, ऊसतोड महिलांना पॅड परवडत नाही, त्यामुळे ते कपड्याचा वापर करतात. ऊसतोड करण्यासाठी स्थलांतर केलेल्या महिला जेव्हा वापरलेला कपडा धुतात तेव्हा त्याला माती लावतात आणि डबक्यात साचलेल्या पाण्याचा वापर करून त्या कपड्याला लागलेलं रक्त धुवून घेतात. तो कपडा कोणत्याही पुरूषाला दिसू नये म्हणून एखाद्या कोपऱ्यात वाळत घालतात. तोच कपडा कितीतरी वेळा त्या बायका पाळीत वापरतात. रक्त धुण्यासाठी मातीचा वापर आणि कोपऱ्यात कुठेतरी वाळत घातल्यामुळे त्यावर जंतू तयार होतात आणि पुढे खाज,जळजळ पासून गर्भपिशवीचा कर्करोग होण्यापर्यंत परिस्थिती बिकट होते. गर्भपिशवीच्या कॅन्सरमुळे कित्येक महिलांचा जीव जातो. दुष्काळ, पाणी आणि पाळीचा अत्यंत जवळचा संबंध आहे.”

दुष्काळात पिण्याच्या पाण्याचाच गंभीर प्रश्न सर्वांसमोर असतो तर पाळीत स्वच्छता ठेवण्यासाठी या महिलांना पाणी कोण देणार? पाण्याशी बाईचं अतिशय जवळचं नातं आहे. घरात पाणी संपलं की दूरपर्यंत पायपीट करून पाणी आणण्याचं काम महिलाच करतात त्यामुळे इतकं मेहनतीने आणलेलं पाणी ती महिला पाळीचा कपडा स्वच्छ करण्यासाठी जास्त वापरत नाही. कारण त्या पाण्याचं महत्त्व त्या महिलेपेक्षा आणखी कोणालाच कळत नाही. यामुळे तो कपडा जंतुजन्यच राहतो, असे अशोक तांगडे सांगतात.

ऊसतोड किंवा जोखमीचं काम करणाऱ्या महिलांची कपडा वापरण्याची एक वेगळी पद्धत आहे. त्यात त्या महिला कंबरेला दोरी बांधतात आणि एक कपडा समोर बांधून दोन्ही पायांच्या मधून गच्च मागच्या बाजूला दोरीला बांधतात. याचं कारण म्हणजे, दोरीच्या सहाय्याने बांधलेला तो कपडा हलणार नाही. किमान बारा तास तो बदलण्याची चिंता राहणार नाही. दोरीच्या सहाय्याने वापरण्यात आलेल्या या पॅडमुळे महिलाच्या कंबरेला फोड येऊन ती संपूर्ण जागा कडक आणि काळी पडते. योनीच्या आजूबाजूला आणि कंबरेला त्वचेचा आजार होतो, अशीही माहिती तांगडे पुढे जोडतात.

ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न अलिकडे अधिक चर्चिला जातोय. होता. धाराशिव जिल्ह्यात तशी दुष्काळ सदृष्य परिस्थिती बाराही महिने असते असं म्हंटलं तर काही वावगं ठरणार नाही. त्यामुळे पाळीत महिलांपुढे पाणीटंचाई आणि आरोग्याची काळजी या दोन गंभीर गोष्टी आहेत. त्यामुळे ऊसतोड कामगार महिलांचा विचार करता ‘पर्याय’ सामाजिक संस्थेने सर्व्हेक्षण केले. सुनंदा खराटेंनी 65 महिलांशी संवाद साधला. सुनंदांनी केलेल्या सर्वेनुसार पाळीत सगळ्याच महिलांना त्रास होतो. पाणी आणि शौचालयाची सुविधा नसल्याने अंग स्वच्छ करण्यासाठी जागा नसते. त्यामुळे अनेक शारिरीक अडचणी येतात. 

या सर्वेक्षणातील निरिक्षण सांगताना सुनंदा खराटे माहिती देतात की, दरवर्षी शेकडोंच्या संख्येनं ऊसतोड कामगार स्थलांतर करतात. त्यात महिलांचं प्रमाण लाक्षणीय असतं. बीड, धारूर, पाटोदा, धाराशिव, माजलगाव, आष्टी, गेवराई या ठिकाणांहून मजूर स्थालांतर करतात. यात पाळी आली तर पॅड परवडत नाहीत आणि पॅडविषयी माहिती नसल्याने कपडा प्रामुख्याने वापरला जातो. आता कपडा रक्ताने माखला की तो धुणे आणि दुसरा कपड्याचा तुकडा घेणे यात सर्वांत मोठी अडचण ती म्हणजे ऊसतोड महिलांसाठी शौचालयांचा अभाव. उघड्यावर कपडा कसा बदलायचा म्हणून एक कपडा तासंतास तसाच वापरायचा.

यामुळे अनेक अडचणींचा समाना या स्त्रियांना करावा लागतो. लघवीच्या जागेवर खाज येणे, बूरशी होणे, दीर्घकाळ लघवी थांबवल्याने पोटात दुखणे, मुतखडा सारख्या आजारांना सामोरं जावं लागतं. पुरूष कामगार सोबत काम करत असल्याने सगळ्यांपुढे लघवीला कसं जाणार हा विचार करून महिला कामगारांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं.  ऊसतोडणीच्या वेळेस पुरूषांसह महिलांनाही जोखमीचं काम करावं लागतं. कापलेल्या ऊसाच्या मोळ्या बांधणं आणि त्या वजनदार मोळ्या उचलून ट्रकपर्यंत नेणं हे कष्टाचं काम करावं लागतं. त्यामुळे पाळीदरम्यान होणारा त्रास मोळ्यांचं वजन यामध्ये शरिराचे हाल होतात. आराम केला तर त्या दिवसाचा रोजगार जाणार. हा विचार केला जातो.”

काय सांगतो अहवाल…?

महाराष्ट्रातील बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार, 577 पैकी 286 महिला सातवीपर्यंतच शाळा शिकलेल्या आहेत. म्हणजेच या महिला मासिक पाळी सुरू होण्याच्या वयात किंवा नुकतीच सुरू झाल्यानंतर शाळेबाहेर पडल्याचं निरीक्षणही अहवालात नोंदवण्यात आलं आहे. अहवालानुसार, 577 पैकी 30 टक्के महिला आजही कापड वापरत असल्याचं समोर आलं आहे.

6.jpg 

तर बीडमधील 320 पैकी 70.03 टक्के महिलांनी तर धाराशिवमधील 148 पैकी 66.2 टक्के महिलांनी कापडाव्यतिरिक्त साधने वापरत असल्याचं सांगितलं. तर 62.2 टक्के महिला मासिक पाळीसाठी वापरणारं कापड पुन्हा पुन्हा वापरतात. तसंच 47 टक्के महिलांनी वापरलेलं कापड धुण्यासाठी साबण वापरत असल्याचं सांगितलं. तर काही महिलांनी कधीतरीच साबण वापरत असल्याचं सांगितलं.

मासिक पाळीत वापरलेलं कापड स्वच्छ धुतल्यानंतर सूर्यप्रकाशात वाळवणंही गरजेचं असतं. परंतु 83.7 टक्के महिला कापड धुतल्यानंतर ते कोणाला (उघड) दिसणार नाही अशा ठिकाणी सुकवतात.

बीड आणि धाराशीवमध्ये अनेकदा दुष्काळ किंवा पाणी टंचाई असल्याने गावात टँकरद्वारे पाणी पुरवठा होतो. अशा परिस्थितीत महिलांना मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेसाठी अतिरिक्त अडचणींना तोंड द्यावे लागते.


(असर आणि बाईमाणूस यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘प्रोजेक्ट धरित्री’ उपक्रमांतर्गत ‘पर्यावरण बदल आणि लिंगभाव’ (Climate & Gender) या विषयावरची ही एक विशेष मालिका आहे.)

 

Share this article
 'बाईमाणूस'च्या 'क्लायमेट रिपोर्टर्स'ना आढळलेलं वास्तव... हवामान बदलानं बायांचं जगणंच बदललं
ग्राउंड रिपोर्ट

'बाईमाणूस'च्या 'क्लायमेट रिपोर्टर्स'ना आढळलेलं वास्तव... हवामान बदलानं बायांचं जगणंच बदललं

Extreme heat is no longer just a weather event. From migrant workers and construction labourers to children and low-income families, rising temperatures are deepening inequality across India. This article examines how heatwaves are becoming a public health, livelihood and social justice crisis.

4 min read
T
Team BaiManus
सरकारची वाट न पाहता गाव उभं राहिलं; आदिवासींच्या ‘हलम्याने’ वाचवली विहीर
ग्राउंड रिपोर्ट

सरकारची वाट न पाहता गाव उभं राहिलं; आदिवासींच्या ‘हलम्याने’ वाचवली विहीर

पर्यावरण संवर्धन ही केवळ सरकारी योजनांची जबाबदारी नसून सामूहिक कृतीची प्रक्रिया असल्याचं मध्य प्रदेशातील एका आदिवासी गावाने दाखवून दिलं आहे. झाबुआ जिल्ह्यातील बोरपाडा गावात तीन वर्षे गाळाने भरून गेलेली विहीर ग्रामस्थांनी 'हलमा' या पारंपरिक सामूहिक श्रमपद्धतीच्या माध्यमातून पुन्हा जिवंत केली. भील आदिवासी समाजाची ही शतकानुशतकांची परंपरा केवळ श्रमदानाची नाही, तर जलसंवर्धन, सामाजिक ऐक्य आणि स्वावलंबनाचा जिवंत वारसा आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर, बोरपाडाची ही कथा सांगते की पर्यावरण वाचवण्याचे अनेक उपाय आपल्या लोकपरंपरांमध्येच दडलेले आहेत.

7 min read
V
Vikas Parasram Meshram
धाराशिवमध्ये पहिल्यांदाच महिला पंचायत परिषद; हवामान बदल आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी महिलांचा पुढाकार
ग्राउंड रिपोर्ट

धाराशिवमध्ये पहिल्यांदाच महिला पंचायत परिषद; हवामान बदल आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी महिलांचा पुढाकार

धाराशिव येथे पहिल्यांदाच 'पंचायत परिषद' आयोजित करण्यात आली, यात ३५ गावांतील महिला सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्र येत हवामान बदल आणि दुष्काळ निवारणासाठी स्थानिक पातळीवरील 'कृती आराखडा' तयार केला गेला. वाढत्या उष्णतेचा आणि पाणीटंचाईचा थेट फटका ग्रामीण महिलांच्या आरोग्याला, आर्थिक स्थितीला आणि विशेषतः मुलांच्या शिक्षणाला कसा बसत आहे, यावर महिलांनी आपले वास्तव अनुभव मांडले. केवळ समस्या न मांडता महिलांनी गट शेती, ठिबक सिंचन, रेन पाईपचा वापर, वृक्षलागवड आणि शेळी-कुक्कुटपालनासारख्या पूरक व्यवसायांच्या माध्यमातून हवामान बदलावर मात करण्यासाठी धोरणात्मक उपायांची मागणी केली. याच परिषदेत 'दुष्काळ पूर्वसूचना प्रणाली' अहवालाचेही प्रकाशन झाले.

3 min read
A
Apsara Aga
वाघांच्या मागावर कॅमेरे की शिकारी? ताडोबामध्ये नेमकं काय सुरू आहे…?
ग्राउंड रिपोर्ट

वाघांच्या मागावर कॅमेरे की शिकारी? ताडोबामध्ये नेमकं काय सुरू आहे…?

ताडोबातील काही वाघ दिसेनासे झाल्याच्या चर्चांमुळे वन्यजीव क्षेत्रात खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर बंगळुरूस्थित एका वन्यजीव छायाचित्रकाराच्या चौकशीमुळे संशयांना नवे वळण लागले आहे. छायाचित्रणाच्या नावाखाली जंगलात नियमबाह्य हालचाली, मेलेली जनावरे टाकणे आणि रात्री-अपरात्री फिरण्याचे आरोप या छायाचित्रकारावर आहेत. वन विभागाने मात्र चौकशी केवळ अनधिकृत प्रवेशासंदर्भात असून शिकारीचे कोणतेही पुरावे नाहीत, असा दावा केला आहे.

8 min read
S
Shantanu Khuje
Beed : बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी मोकाट की अटकेत?
Video content
ग्राउंड रिपोर्ट

Beed : बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी मोकाट की अटकेत?

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडले आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावी आलेल्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील व्यक्तीने बलात्कार केला, ज्यामुळे ती प्रचंड मानसिक धक्क्यात आहे. ही एक गंभीर "crime" असून, या "rape case" मुळे "beed news" मध्ये मोठी खळबळ उडाली आहे, ज्यामुळे "breaking news" म्हणून हा प्रकार समोर आला आहे. या "crime news" संदर्भात अधिक माहितीसाठी पाहा हा विशेष रिपोर्ट.

S
Sukeshani Naikwade
"पूर्वी रोज भांडणं... आता 3 महिन्यांपासून शांतता!" | CCTV मुळे बदललं बीडमधलं हे गाव...
Video content
ग्राउंड रिपोर्ट

"पूर्वी रोज भांडणं... आता 3 महिन्यांपासून शांतता!" | CCTV मुळे बदललं बीडमधलं हे गाव...

बीड जिल्ह्यातील खळवट लिमगाव हे गाव एकेकाळी किरकोळ कारणांवरून होणाऱ्या भांडणांसाठी आणि पोलिस स्टेशनच्या फेऱ्यांसाठी ओळखलं जायचं. मात्र आता गावभर बसवण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांमुळे परिस्थितीत मोठा बदल झाल्याचा दावा ग्रामस्थ करत आहेत. ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून गावात CCTV यंत्रणा उभारण्यात आली. त्यानंतर गावातील भांडणं, वाद-विवाद आणि असामाजिक प्रकारांवर मोठ्या प्रमाणात आळा बसल्याचं ग्रामस्थ सांगतात. विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यांपासून गावात एकही भांडण झालेलं नसल्याचा दावा करण्यात येत आहे. या विशेष ग्राउंड रिपोर्टमध्ये पोलीस अधिकारी, महिला ग्रामस्थ आणि सरपंच यांच्याशी संवाद साधत CCTV मुळे गावात नेमका काय बदल झाला, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पाहा बाईमाणूसचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट.

S
Sukeshani Naikwade

Comments

Comments are currently disabled or loading...