- डॉ. अशोक राणा
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला फार मोठा ऐतिहासिक वारसा आहे. या जिल्ह्यातील पैठण हे गाव पूर्वी 'प्रतिष्ठान' या नावाने ओळखले जात असे. त्याठिकाणी महाराष्ट्राचा हा ज्ञात आद्य राजवंश सातवाहन यांची राजधानी होती. इ.स.पू. 230ते इ.स. 230 या कालखंडात सातवाहनांचे राज्य आजच्या महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांच्या भूप्रदेशांपर्यंत विस्तारले होते.
आंध्र प्रदेशातील धरणीकोट व अमरावती, तसेच महाराष्ट्रातील जुन्नर व पैठण ही सातवाहनांची प्रमुख ठाणी होती. पैठण ही सातवाहनांची राजधानी होती. नाशिक येथील बौद्ध लेणीच्या कोरीवकामासाठी सातवाहन राजांनी दान दिले होते.
मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर जी काही छोटी राज्ये स्थापन केली. त्यापैकी सातवाहन घराणे हे एक महत्त्वाचे घराणे होय. सुमारे 460 वर्षांहून अधिक वर्षे त्याने राज्य केले. राजा सिमुक सातवाहन हा सातवाहन साम्राज्याचा संस्थापक होता. सातवाहन घराण्याचा उदय सिरी सातवाहन यांच्यापासून झाला असल्याचे पैठण येथे मिळालेल्या नाण्यावरून स्पष्ट होते.
सातवाहन सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी हा माता गौतमी बलश्री हिचे नाव आपल्या नावाआधी लावत असे. यावरून सातवाहन राजे हे मातृसत्ताक पद्धतीमधून आले होते, हे सिद्ध होते. वसिष्ठीपुत्र पुळूमावी हेही एक असेच नाव आहे. सातवाहन शासक हे प्रभावी तसेच वैभवशाली व संपन्न असूनही लोककल्याणकारी राजे होते. ते बौद्ध धर्माचे मोठे उपासक असल्याचे त्यांच्या शिलालेखातून स्पष्ट दिसून येते.
ते बौद्ध धर्मीय मरहट्ट म्हणजेच आजचे मराठा असल्याचे नाणेघाट येथील शिलालेखातून स्पष्ट होते. परंतु त्यांच्या जातीविषयी विद्वानांनी वेगवेगळी मते व्यक्त केली आहेत. सातवाहन साम्राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या डॉ. वा. वि. मिराशी यांनी त्यांना ब्राह्मण ठरविले होते. त्यांचे हे मत ज्ञानकोशकार श्री. व्यं. केतकर यांनी खोडले आहे.
ज्ञानकोशकार डॉ. श्री. व्यं. केतकर यांनी आपल्या अखेरच्या काळात ‘प्राचीन महाराष्ट्र' ही ग्रंथमाला लिहिली. 1937 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर 26 वर्षांनी म्हणजे 1963 मध्ये त्यांचा 'प्राचीन महाराष्ट्रः राजकीय आणि सांस्कृतिक इतिहास, सातवाहनपर्व - विभाग दुसरा-शातवाहनांच्या उदयापासून अंतापर्यंत' हा ग्रंथ प्रकाशित झाला. त्यात (पृ.47) सातवाहनांच्या जातीचा शोध घेणारं टिपण आहे. सातवाहनांच्या आंध्रभृत्य या विशेषणावरून सातवाहन तैलंगी होते, असे व्हिन्सेन्ट स्मिथचं मत त्यांनी खोडून काढलं आहे.
ज्ञानकोशकार डॉ. श्री. व्यं. केतकर यांनी आपल्या अखेरच्या काळात ‘प्राचीन महाराष्ट्र' ही ग्रंथमाला लिहिली. 1937 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर 26 वर्षांनी म्हणजे 1963 मध्ये त्यांचा 'प्राचीन महाराष्ट्रः राजकीय आणि सांस्कृतिक इतिहास, सातवाहनपर्व - विभाग दुसरा-शातवाहनांच्या उदयापासून अंतापर्यंत' हा ग्रंथ प्रकाशित झाला. त्यात (पृ.47) सातवाहनांच्या जातीचा शोध घेणारं टिपण आहे. सातवाहनांच्या आंध्रभृत्य या विशेषणावरून सातवाहन तैलंगी होते, असे व्हिन्सेन्ट स्मिथचं मत त्यांनी खोडून काढलं आहे.
डॉ. केतकरांनी अनेक पुरातत्वीय तसेच ग्रांथिक पुराव्यांच्या आधारे सातवाहन राजे ब्राह्मण नसून नागवंशीय होते हे सिद्ध केलं आहे. त्यांच्या निष्कर्षाप्रती अनेक संशोधकांनी सहमतीही दर्शवली आहे. जैन धर्मियांच्या 'त्रिशष्टी शलाका पुरुष' या ग्रंथात सातवाहनांना जैन धर्मीय म्हणून संबोधलेले आहे.
संशोधकांची मते
डॉ. केतकरांच्या वरील ग्रंथानंतर दोन वर्षांनी (१९६५मध्ये ) ‘पैठणचे सातवाहन राजकुल' हे प्रा. पं. वि. रानडे यांचे पुस्तक मराठवाडा विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळाने प्रकाशित केले. त्यात प्रा. रानडे म्हणतात, 'नाशिक येथील गौतमी बलश्रीच्या शिलालेखात सातकर्णीला 'एक ब्रह्मणस' म्हटलेलं आहे.
त्यावरून काही संशोधकांनी त्यांना दक्षिणापथातील ‘एकमेव ब्राह्मण' ठरवलं आहे. 'एक ब्रह्मणस' या शब्दाचा अर्थ डॉ. भांडारकरांनी ब्राह्मणांचा 'एकमेव रक्षणकर्ता' किंवा 'एकमेव आश्रयदाता' असा केला आहे. पुढील काळातील शिलालेखांतही ह्या शब्दाचा वापर स्वत:ला क्षत्रिय म्हणवून घेणाऱ्या राजांनी ब्राह्मणांचा एकमेव संरक्षक या अर्थानेच केला आहे.
मूळ व्रात्य क्षत्रिय असलेल्या अंधककुळातील सातवाहन राजांनी स्वत:ला पुढील काळात एक ब्रह्मणस म्हणवून घ्यावं, यांत प्राचीन भारतातील जातीय इतिहासाचं एक मार्मिक अंग प्रकट झालं आहे. या विधानांमध्ये सातवाहनकुल मूळ व्रात्य क्षत्रिय म्हणजे हिणकस होते हे मान्य केलेलं आहे. नाशिकच्या शिलालेखात आलेला 'एक ब्रह्मणस' हा शब्द शिलालेख कोरणाऱ्या कोरक्याचाही प्रताप असू शकतो.
पण तेवढ्यावरून त्या राज्यकर्त्यांनी जात बदलवून टाकण्याचा आटापिटा इतिहास संशोधकांनी करावा ही हास्यास्पद घटना आहे. व्रात्य म्हणजे संस्कारहीन. सातवाहनांना हिणवणाऱ्या अनेक कथा प्रचलित आहेत. आर्यपूर्व मूलनिवासी लोकांना व्रात्य म्हणून हिणवायचं व त्यांना स्वीकारण्याकरिता व्रात्यस्तोमासारखे विधी करायचे ही तत्कालीन ब्राह्मणांची एक खेळी होती. शिवराज्याभिषेकाच्या वेळी गागाभट्टाने 'व्रात्यस्तोम' विधी केला होता यावरून तो शिवरायांना शूद्र मानीत होता हे स्पष्ट होतं.
सातवाहनांनी बौद्ध स्तुपांच्या उभारणीसाठी आर्थिक मदत केली होती. यावरून ते बौद्ध होते असेही काही विद्वानांचे मत आहे. हा मूळचा पशुपालक समाज असून महाभारतात औंड्रांना असूर राजा महाबळीचा पुत्र असे म्हटले आहे. या राजसत्तेच्या काळात पैठणचा सर्वांगीण विकास झालेला दिसतो. सातवाहन राजे विद्या आणि कलांचे भोक्ते असल्याने देदीप्यमान कलेची व पंडितांची परंपरा इथे सुरू झाली. त्यांच्याच काळात जगप्रसिद्ध अजिंठालेणी खोदली गेली. पैठणच्या दक्षिणेला गोदावरीकाठी नागघाटाशेजारी भग्नावस्थेत उभा असलेला सातवाहन राजाचा वाडा आजही या राजवटीची खूण आहे असे काहींना वाटते.
गुणाढ्य व पैशाची भाषा
सातवाहनांच्या दरबारात गुणाढ्य नावाचा प्रधान होता. त्याने पैशाची भाषेत लिहिलेला ‘बृहद्कथा' एकमेव ग्रंथ होता. तो संस्कृत भाषेच्या पक्षपाती लोकांनी नष्ट केला. परंतु, त्याची संस्कृत भाषेतील भाषांतरे उपलब्ध आहेत. त्याचा जन्म पैठण येथे झाल्याची माहिती मिळते. त्याने दक्षिणेकडे जाऊन संस्कृत व प्राकृत भाषांचे सांगोपांग अध्ययन केले. नंतर त्याने पैठणक्षेत्री परत येऊन सातवाहन राजाच्या दरबारात मानाचे स्थान मिळविले. त्याने पैशाची भाषेत सात विद्याधरांच्या कथा लिहिल्या व त्यांची एक बृहत्कथा बनविली. भूत-पिशाच्च म्हणून वैदिक व पौराणिक वाङ्मयात ज्यांचा भितीने तर कधी तिरस्काराने उल्लेख होतो, त्या नागवंशियांची भाषा भूतभाषा किंवा पिशाचभाषा म्हणून ओळखली जाते.
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे, श्री. दा. सातवळेकर, ग्रियर्सन, मॅक्समूलर यांसारख्या भाषाकोविदांनी पैशाचीविषयी आपली मते मांडली आहेत. पं. महादेवशास्त्री जोशी यांनी संपादन केलेल्या भारतीय संस्कृतीकोशाच्या पाचव्या खंडात (पृ.676) 'पैशाची' या शीर्षकाखाली टिपण आलेले आहे.
त्यात पैशाची ही पिशाच लोकांची प्राचीन प्राकृत भाषा असल्याचे सांगून 'षड् भाषाचंद्रिका' या ग्रंथाचा कर्ता लक्ष्मीधर हा पांड्य, केकय, बाल्हिक, सिंह, नेपाळ, कुंतल, सुदेष्ण, भोज, गांधार, दैव आणि कनोज या प्रदेशांना पिशाच देश मानतो, असे म्हटले आहे. काही पाश्चात्य विद्वानांच्या मते पैशाची ही उज्जैनच्या आसपासच्या प्रदेशातील भाषा होती ; पण ग्रियर्सनच्या मते भारताच्या वायव्य सीमेवरील दरदिस्तान, चित्रळ वगैरे प्रदेश हा पिशाच लोकांचा व पैशाची भाषेचा मूळ देश होय. तिथूनच ते लोक आपल्या भाषेसह सर्वत्र पसरले असावेत.
पं. जोशी म्हणतात-
‘वररूचीने ‘प्राकृत प्रकाश' या ग्रंथात शौरसेनी या प्राकृत भाषेतून पैशाचीचा उगम झाल्याचे प्रतिपादिलेले आहे. मार्कंडेयाने 'प्राकृत सर्वस्व' या ग्रंथात कांचीदेशीय,पांड्य, पांचाल, गौड, मागध, व्राचड, दक्षिणात्य, शौरसेन, कैकय, शाबर व द्राविण असे पिशाचांचे अकरा प्रकार सांगितले आहेत. दंडीने आपल्या काव्यादर्शात पैशाची भाषेला 'भूतभाषा' म्हटले आहे. भोजदेवाने ‘सरस्वतीकंठाभरण' या ग्रंथात उच्चजातीच्या माणसांनी विशुद्ध पैशाची बोलू नये, असे सांगितले आहे. '
ग्रिसर्यनच्या मते पैशाची हे पाली भाषेचेच एक रूप आहे. ही भाषा संस्कृतशी पुष्कळ मिळतीजुळती असल्यामुळे तिच्यात श्लेषालंकाराला बराच वाव आहे. बृहत्कथा हा कवी गुणाढ्य याने पैशाची भाषेत लिहिलेला एकमेव ज्ञात पण उपलब्ध नसलेला ग्रंथ. बाराव्या शतकापर्यंत या ग्रंथाची ख्याती भारताबाहेर कंबोडियासारख्या देशांपर्यंत पोचली होती. इसवी सनाच्या सातव्या शतकात होऊन गेलेल्या बाणाने आपल्या 'हर्षचरितात ' या ग्रंथाची जन्मकथा दिलेली आहे. इ.स.778 मधल्या उद्योतनसूरीने आपल्या कुवलयमालेत व नवव्या शतकातील जीनसेन या जैनकवीने आपल्या ‘आदिपुराण' या ग्रंथात बृहत्कथेची स्तुती केलेली आहे.
इ.स. च्या दहाव्या शतकातील धनंजयाने रामायण, बृहत्कथा इ. ग्रंथाचा अभ्यास करून रसानुगुण कथानकाची गुंफण करावी असे आपल्या दशरूपकात म्हटले आहे. बृहत्कथा हा पैशाचीतील एकमेव ग्रंथ आज उपलब्ध नाही. पण कश्मीरमधील सोमदेव (इ.स. 1063 - 81) व क्षेमेंद्र ( इ.स. 1000) यांनी 'कथासारित्सागर' व बृहत्कथा मंजिरी' या नावाने केलेली तिची रुपांतरे मात्र उपलब्ध आहेत.
या दोन ग्रंथाच्या व्यतिरिक्त इ.स.800 च्या सुमारातील नेपाळमधील बुधस्वामीने लिहिलेल्या बृहत्कथा - श्लोक - संग्रह मात्र मूळ बृहत्कथेशी अधिक जवळीक साधणारा आहे असे विद्वानांचे मत आहे. याशिवाय जैनधर्मियांनी 'वसुदेवदिंडी' या नावाने केलेले बृहत्कथेचे रूपांतरही उपलब्ध आहे. बृहत्कथेचा कर्ता गुणाढ्य सातवाहनकालीन असून तो पैठणचा होता असे मिराशी म्हणतात. तर वि. भि. कोलते यांच्या मते तो विदर्भातील वाशीमचा होता.
भाषावैज्ञानिक डॉ. ना. गो. कालेलकर पैशाचीच्या भाषा वैशिष्ट्यांविषयी म्हणतात की, 'शक', पहलव, तुषार, दरद, पख्तून आदि पूर्व इराणी भाषिकांचा संचार वायव्य व पश्चिम भारतात इ. स. पूर्वीपासून असलेला ज्ञात आहे. मथुरा, एरण आणि गिरनार ही या लोकांची सत्तास्थाने होती, असेही त्यांनी नमूद केलेले आहे. पैशाची प्राकृत ही शूलिक, शक, पख्तूनादि ईराणी लोकांनी वापरलेली प्राकृत होय असे त्यांचे मत आहे.
इतिहासाचार्य राजवाडे यांनी 'पाली व सौरसेनी यांच्यानंतर पैसाची पिसाउरात (पेशावर) उदयास आली असावी, असे नमूद करुन शहाबाजगढी उर्फ कपूर्दगिरी येथील अशोकाच्या शिलालेखात पैशाची भाषेचा एक पोटभेद दृष्टीस पडतो, तसेच नाटकात कोठे एखादे दुसरे वाक्य पैसाची येते, कृष्णयजुर्वेद संहितेवर पैसाची भाषेत (आधुनिक पैशाची) टीका आहे, परंतु तीही अद्याप प्रसिद्ध झालेली नाही,' असे म्हटलेले आहे. पैशाची भाषेचे 11 भेद प्राकृत वैय्याकरणांनी उल्लेखिलेले आहेत असेही ते म्हणतात. योगेशचंद्र पाल, पं.रघुनंदन शर्मा इ.नी पैशाची ही भारतातील मूळ भाषा असल्याचे प्रतिपादन केले आहे.
द्रविड या नावाने मध्य आशिया, खोतान, चिनी तुर्कस्तान, वायव्य सीमा प्रांत व पंजाब या प्रदेशात सापडलेल्या खरोष्टी लिपीतील काही शिलालेखांत या भाषेची वरील लक्षणे दिसतात. प्राकृत व्याकरणग्रंथ व काही संस्कृत नाटकांमध्येही या भाषेचा काही प्रमाणात वापर आढळतो. पुश्तु व इतर दरद भाषा पैशाची भाषेपासूनच उगम पावलेल्या आहेत किंवा त्या पैशाचीने प्रभावित केलेल्या आहेत.
ना.गो.कालेलकर यांनी पैशाची भाषेविषयी मराठी विश्वकोश, खंड१० मध्ये (पृ.5) माहिती दिली आहे. तीमध्ये ते म्हणतात की, 'पैशाची ही एक प्राकृत भाषा असून ती भारताच्या वायव्येस बोलली जाई, अशी समजूत आहे; कारण तिचा नमुना आज उपलब्ध नाही.
पैशाची म्हणजे राक्षसांची भाषा किंवा भूतभाषा, एक असंस्कृत भाषा किंवा व्याकरणकारांनी वर्णन केलेली एक प्राकृत भाषा, अशा अनेक कल्पना आहेत. इथे मात्र शेवटचाच अर्थ अभिप्रेत आहे. प्राकृत व्याकरणात पैशाचीचे वर्णन आणि त्याबरोबर नमुन्यादाखल एखाददुसरी ओळ येते. पैशाची भाषा ख्रिस्ती शकाच्या प्रारंभीच्या काळात प्रचलित असावी असा अंदाज आहे. '
ग.वा. तगारे यांनी पैशाची साहित्याची माहिती दिली आहे. ते म्हणतात-'उद्योतनसुरी ह्याने महाराष्ट्री प्राकृतात रचिलेल्या 'कुवलयमाला' ह्या चम्पूकाव्यात संस्कृत, अपभ्रंश इ. भाषांबरोबर पैशाची भाषेचाही अधूनमधून वापर केलेला आढळतो.
तेराव्या शतकात रचिल्या गेलेल्या 'हम्मीरमर्दन' आणि 'मोहराजपराजय' ह्या संस्कृत नाटकांतील काही पात्रे चूलिका पैशाची(पैशाचीची एक पोटभाषा) वापरतात. हेमचंद्रकृत 'कुमारपालचरित’(बारावे शतक) ह्या संस्कृत काव्यात, तसेच त्याने रचिलेल्या प्राकृत व्याकरणग्रंथात पैशाचीतील आणि चूलिका पैशाचीतील सुंदर गाथा आढळतात. जैनांच्या काही स्तोत्रांमधूनही पैशाची - चूलिका पैशाची-रचना पहावयास मिळतात.'
देवीसिंह चौहान यांनी ' मराठी भाषेतील पैशाची अवशेष' या शीर्षकाचा शोधनिबंध प्रकाशित केला आणि या भाषेवर विशेष संशोधन केले आहे. त्यामुळे या भाषेकडे पाहण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन तयार होण्यास मदत झाली आहे. काहींच्या मते तामिळ किंवा द्रवीड भाषेलाच पैशाची अथवा पिशाच भाषा असे म्हटले आहे. तामिळ ही नागकुळांची भाषा होती. मराठी भाषेच्या निर्मितीत पैशाची भाषेचा महत्त्वाचा वाटा आहे. 'ण' या तालव्य वर्णाचे रुपांतर 'न' या दंत्य उच्चारात होणे ही पैशाची भाषेची एक प्रवृत्ती आहे.
पैठण येथील गुणाढ्याच्या विरोधकांनी पैशाची भाषेतील हा एकमेव ग्रंथ नष्ट केला असावा, असे याविषयीच्या दंतकथेवरून स्पष्ट होते. येथील ब्राह्मणांनी गेल्या दोन हजार वर्षांमध्ये धर्मशास्त्रामध्ये मोठा प्रभाव गाजविला होता हेही दिसून येते. त्यांच्या धर्मविषयक मतांनी महाराष्ट्राच्या व भारताच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक जीवनावर खूप प्रभाव गाजविला होता.
पैठणचे ब्राह्मण
महाराष्ट्राचे पहिले राजे सातवाहन हे शूद्र होते म्हणून त्यांना नाकारण्याचे क्षुद्रकर्म ज्यांनी केले, त्यांनीच संत ज्ञानेश्वरांना शिकण्याचा अधिकारही त्यांनी नाकारला होता. संत एकनाथांनाही त्यांनी बहिष्कृत केले होते. नंतरच्या अनेक राजवटींना त्यांचा हा उपद्रव सहन करावा लागला, तसाच छत्रपती शिवरायांनाही त्यांच्या झळा सोसाव्या लागल्या. पैठण येथील भट्ट व शेष घराण्याने मध्ययुगीन कालखंडात बराच धुमाकूळ घातल्याचे तत्कालीन इतिहासावरून दिसून येते.
अकबराच्या काळात 'शुद्राचार शिरोमणी' हा ग्रंथ लिहिणारा कृष्ण नरसिंह शेष याने कलियुगात क्षत्रिय उरले नाहीत,असे आपल्या ग्रंथात म्हटले होते. त्यामुळे या ग्रंथाच्या आधारे शिवकालीन ब्राह्मणांनी शिवरायांचा राज्याभिषेक नाकारला होता. शेष घराण्याविरुद्ध असलेल्या भट्ट घराण्यातील गागाभट्ट याने भरपूर द्रव्य घेऊन शिवरायांना राज्याभिषेक करविला. पण त्यावेळी त्याने वेदोक्त मंत्र न म्हटल्याची माहिती गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळूस्करांनी दिली.
त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'शूद्र पूर्वी कोण होते?' या शोधग्रंथात राज्याभिषेकाच्या वेळी गागाभट्टाला दिलेल्या दान व दक्षिणेची विस्तृत जंत्रीच दिली आहे. हा ग्रंथ बाबासाहेबांनी शिवरायांवरील अन्यायाचा पाढा वाचण्याच्या हेतुनेच रचला आहे हे स्पष्ट होते.
डॉ. वा. सी बेंद्रे यांनी आपल्या शिवचरित्रात राज्याभिषेकाच्या वेळी झालेला दानधर्म,प्रायश्चित्तविधी आणि तुलादान या गोष्टींची गरज नव्हती हे सिद्ध केले आहे. तसेच यावेळी शिवरायांवर झालेल्या 'व्रात्यस्तोम' या विधीतून ते शूद्र होते हेच हे सिद्ध केले आहे.
ऋग्वेद हा भारतीय व इंडो-युरोपीय साहित्यातील सर्वात जुना ग्रंथ असल्याची विद्वानांची मान्यता आहे. या ग्रंथाचे दुसरे मंडल सर्वात प्राचीन असून त्यापासून ऋग्वेदाची सुरुवात मानली जाते. या मंडळाचा सूक्तद्रष्टा अर्थात रचयिता 'गृत्समद ऋषी ' आहे. तो गणसंस्थेचा प्रतिनिधी होता.
आर्यपूर्व काळात प्रचलित अशी गण ही शासन व्यवस्था होती. तिला समाजशास्त्रज्ञांनी अतिलोकशाहीवादी व्यवस्था (अल्ट्रा डेमोक्रेटिक सिस्टम) असे संबोधले आहे. या गणसमाजातील लोक एकोप्याने राहत व सामंजस्याने वागत. निर्णय घेताना एकमेकांचा विचार घेण्याची त्यांची रीत होती. अशी ही आदर्श व्यवस्था आर्यांना मात्र मान्य नव्हती.
काण ते या संस्थेच्या पलिकडे जाऊन राजेशाही व्यवस्थेचे समर्थक बनले होते. गणसमाज हा सर्वांच्या हिताचा विचार करीत असे तर आर्यांच्या राज्यव्यवस्थेत राजाचे हित पहिल्यांदा पाहिले जाई. 'लोकेषु आयतः ' म्हणजेच लोकांच्या हिताचा विचार करणारे ते लोकायत. ते गणसमाजी होते. या गणाचा प्रमुख तो गणपती. जो गणांचा सर्वात मोठा प्रमुख असे त्याला बृहस्पती म्हटले जाई.
गण व गृत्यमद
गण म्हणजेच लोक. गणसंस्थेतील अनेक गणांची वेगळी ओळख राहावी म्हणून त्यांची विशिष्ट चिन्हे ते धारण करीत. त्यांना गणचिन्हे किंवा कुलचिन्हे म्हटले जाते. ही चिन्हे पशु, पक्षी, हत्यारे, वस्तू इत्यादींची असत. गणांचा प्रमुख या चिन्हांना धारण करीत असे. विशिष्ट प्रसंगी गणातील सर्व लोक या चिन्हांचे मुखवटे चेहऱ्यावर लावून एकत्र राहात किंवा नाचत.
गणांचा प्रमुखही चिन्हांमुळे ओळखला जात असे. आज हत्तीचे मुख गणपतीला प्राप्त झाले, त्याला ऐतिहासिक संदर्भ आहे. पाचव्या शतकाच्या उत्तरार्धात हत्ती हे ज्याचे कुलचिन्ह आहे, अशा गणाने मूषक या गणाचे पारिपत्य केले असावे.
आपल्या गणाच्या प्रभावाचा प्रचार म्हणून हत्ती गणाच्या अनुयायांनी उंदरावर आरुढ झालेल्या गजमुख गणपतीच्या मूर्त्या बनविल्या असाव्यात. अर्थात प्रत्येक गणपती हा गजमुख असेलच असे नाही. तर त्या काळी वाघ, सिंह, कोल्हा, लांडगा, वानर, अस्वल, कुत्रा, नाग, मानवी कवटी इत्यादी मुखवटे धारण करणारे गणपतीही होते.
या अर्थाने हनुमान, नरसिंह, जांबुवंत, काकभुशुंडी इत्यादी रामायण महाभारतात उल्लेख असलेले वानर, सिंह, अस्वल, कावळा इत्यादी चेहऱ्यांची पात्रे ही त्यांच्या गणांचे गणपतीचे होते. मुखवटे धारण करुन आपले रूप बदलविणाऱ्या लोकांना आर्यांनी 'विरूप' असे म्हटले आहे. गणपतीला ‘विरूप' हे एक नाव आहे. त्याचप्रमाणे 'गृत्समद' हेही गणपतीचे एक नाव आहे. याचा अर्थ गृत्समद हा आपल्या गणाचा गणपती असावा.
अनार्यांच्या गण किंवा संघांना गृत्स, व्रात, विरूप इत्यादी शब्दांनी संबोधले जायचे. हत्तीच्या गंडस्थळावरून एक प्रकारच्या उन्मत्त पदार्थाचा स्राव होत असतो. त्यावरून 'मद' हा शब्द हत्ती हे ज्याचे गणचिन्ह आहे, अशा गणाला उद्देशून वापरला गेला. अशा गणाचे प्रतीक म्हणून 'गृत्समद ' हा शब्द बनला. गृत्समद व गण या दोन शब्दांचा असा परस्पर संबंध आहे. त्यामुळेही गणपतीला गृत्समद असे संबोधले गेले असावे.
व्रात्य गृत्समद
गणेश व मुदगलपुराण अनुक्रमे भृगु व मुदगल या ऋषींनी लिहिले, असे मानले जाते. या पुराणांची निर्मिती महाराष्ट्रात तसेच विशेष करून विदर्भात आणि त्यातल्या त्यात यवतमाळ व नागपूर परिसरात झाली आहे. यामध्ये गृत्समदाची कथा आली आहे. ती कथा अशी -
एकदा मगध देशामध्ये म्हणजे आजच्या बिहारमध्ये गृत्समद श्राद्धाचे निमंत्रण आल्यामुळे जेवायला गेला. त्यावेळी पंगतीला बसलेल्या ऋषींपैकी अत्री व इतर काही ऋषी होते. जेवणानंतर विद्वानांमध्ये तात्त्विक चर्चा सुरु झाली. या चर्चेत गृत्समदाने सहभाग घेतला. त्यावेळी अत्रीने गृत्समदाला तेथून उठायला सांगितले व म्हटले की, “तू ऋषीवीर्यापासून उत्पन्न झाला नाहीस, तेव्हा तुझा आमच्याबरोबर वाद करण्याचा अधिकार नाही." अत्रीचे हे अपमानास्पद बोलणे ऐकून गृत्समद श्राद्धातून रागारागाने उठून गेला.
आपल्याजवळ तत्त्वचर्चा करण्याइतपत विद्वत्ता असूनही केवळ जन्माने आपण अनार्य असल्यामुळे आपणास आर्य ऋषींसोबत तत्त्वचर्चा करण्यास मनाई केली जाते ही गोष्ट त्याला बोचली. पुढे आर्यांच्या जाचक अटी स्वीकारून तो आर्यसंघात सामील झाला. त्याविषयी लो. बापूजी अणे यांनी म्हटले आहे की, “आपल्या जातीच्या लोकांचा आर्यात समावेश व्हावा अशी खटपट करणारा हा पूर्वकालीन सुधारक होता व त्याचे कार्य यशस्वी होण्यापूर्वी त्याला आर्यांकडून बराच त्रास झाला असावा असे वाटते. गृत्समदाच्या मुलाचे नाव त्रिपुरासुर होते. यावरून तो अनार्य होता याविषयी शंकाच राहात नाही. "
गृत्सपद व्रात्य होता ही सूतांची माहिती होती. 'व्रात्य म्हणजे वर्णसंकरामुळे उत्पन्न झालेली जात' असे बौधायन गृह्यसूत्र म्हणते. आर्यांमध्ये जेव्हा वर्णव्यवस्था निर्माण झाली व रक्ताच्या शुद्धतेविषयीची जाणीव तीव्र झाली तेहा ही व्याख्या तयार झाली असावी. व्रात्य ही अनार्यांमधील एक जमात होती. अनार्य असूनही आर्यांच्या ऋग्वेद या ग्रंथाचा पहिला निर्माता म्हणून त्याचे स्थान अबाधित आहे. गृत्समद हा व्रात्य होता व त्रात्यांचा गुरू बृहस्पती त्याला पूजनीय असल्यामुळेच त्याचे स्तवन करणारी ऋचा गृत्समदाने तयार केली.
बुद्धिजीवी आर्यांनी कितीही हिणविले तरी श्रमजीवी व्रात्यांनी स्वाभिमान सोडला नाही म्हणूनच त्यांच्यामध्ये गृत्समदासारखे वैज्ञानिक, कृषीतज्ञ व विद्वान गेलेत. विशेषतः विदर्भाच्या काळ्या कसदार शेतीत कापसाची लागवड करण्याचे श्रेय गृत्समदाकडे जाते. यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथे त्याने आपली ज्ञानसाधना केली व त्यानंतर तो भ्रदावतीजवळील वरदविनायकाच्या क्षेत्री गेला, असे गणेशपुराणात लिहिले आहे. श्रमाची प्रतिष्ठा वाढविणारास ज्ञान व प्रतिष्ठाही मिळते याचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे गृत्समद होय. जन्माने हीन ठरविला गेल्यावरही जिद्दीने तो मोठा झाला. आज वैदिक धर्मग्रंथांनी शूद्र आणि अतिशूद्र ठरविलेले लोक वैदिकांच्या टोळीमध्ये सामील होत आहेत. त्यांच्यासाठी पूर्वी व्रात्यस्तोम नावाचा विधी होता तर आज त्याचे नाव समरसता मंच असे आहे.
इराणमधून भारतात आलेल्या आर्यांनी भारतातील लोकांना जन्मजात भेदांमध्ये गुरफटून टाकले हे यावरून दिसून येते. या भेदाला तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान देणारी मनुस्मृती ज्या भृगू गोत्रातील विद्वानांनी रचली, त्यांनीच महाभारत या महाकाव्याला विकृत करून भृगू गोत्राचा आदर्श म्हणून परशुराम या काल्पनिक पात्राची निर्मिती केली. महाभारतात त्याचे उदात्तीकरण करून रामायणात त्याची दहशत निर्माण केली आहे. परशुराम हे मिथकीय पात्रसुद्धा इराणमधून भारतात आलेले आहे. त्याचा संघर्ष क्षत्रियांनी ब्राह्मणांच्या गायी पळविल्यामुळे झाला असे पुराणे सांगतात. जे प्राचीन काळी झाले तेच मध्ययुगीन कालखंडात महारष्ट्रात घडले. हेमाद्रीपंत हा त्याचा सूत्रधार होता.
यादव कालातील हेमाद्रीची करामत
देवगिरीच्या रामदेव यादवाच्या पदरी असलेल्या हेमाद्रीपंत या अमात्याच्या काळात महाराष्ट्रात अनेक व्रत-वैकल्यांचा सुळसुळाट झाला होता. त्याच्या कृतीमुळे यादव साम्राज्य लयास गेलं. त्याने 'चतुर्वर्गचिंतामणि' हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचे व्रतखंड, दानखंड, तीर्थखंड आणि मोक्षखंड असे चार भाग आहेत. शेवटचा भाग परिशेष खंड म्हणून असून त्यात देवपूजा,श्राद्धविधी, मुहूर्त निश्चिती आणि प्रायश्चित्तविधी असे चार पोटभाग आहेत. याविषयी डॉ. स. रा. गाडगीळ, 'मध्ययुगीन महाराष्ट्र आणि ज्ञानेश्वरांचे युगप्रवर्तन' या लेखात म्हणतात की, 'हेमाद्रीच्या या ग्रंथात जवळजवळ दोन हजार व्रते सांगितली आहेत.
व्रते आणि त्यानिमित्त ब्राह्मणभोजने यांचा इतका सुकाळ अन्यत्र क्वचितच आढळेल. वर्षाचे 365 दिवस, रोज पाच-पाच, सहा-सहा व्रते केली तरी सर्व व्रतांना पुरणार नाहीत. वरिष्ठ वर्णीयांच्या विकृत परमार्थवादाचे आणि सुखलोलुपतेचे प्रत्यंतर या व्रतखंडावरून येते. राजे आणि वरिष्ठ ब्राह्मणवर्ग हे या कर्मकांडात मग्न झालेले असल्यामुळे सामाजिक स्थैर्य अथवा राष्ट्रीय संरक्षण या गोष्टीकडे पाहण्यास त्यांना सवड होऊ नये हे साहजिक आहे. '
इतिहासाचार्य राजवाडे यांनीही तसंच मत यापूर्वी व्यक्त केलं होतं. ते म्हणतात, ‘यादवांच्या अमदानीत म्हणजे इसवी सनाच्या तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठ्यांचे सर्व लक्ष परमार्थाच्या नावावर ऐहिक उपभोग घेण्याकडे लागले होते.' हेमाद्रीला याबाबतीत दोषी ठरवून ते म्हणतात, 'पक्वान्न आणि व्रत यांची फारकत हेमाद्रीने एकाही ठिकाणी केली नाही. एवढी दोन हजार व्रते ज्या ग्रंथात सांगितली आहेत, असा पृथ्वीवरील दुसऱ्या कोणत्याही भाषेत, कोणत्याही काळी एकही ग्रंथ अद्याप निर्माण झाला नाही.
राष्ट्रातील सुखवस्तू लोकांना व त्यांचे लहान प्रमाणावर अनुकरण करणाऱ्यांना कष्टप्रचुर असे मर्दुमकीचे, यातायातीचे, मेहनतीचे, लष्करी व इतर धंदे करण्यास फुरसत नव्हती. अशी वस्तुस्थिती असल्यावर म्हणजे परशत्रूपासून आणि अंत:शत्रूपासून संरक्षण होण्यास लागणाऱ्या मेहनतीपासून लोक परावृत्त झाल्यावर आणि अशा व्रतैकदृष्टी किंवा सुखैकदृष्टी लोकांच्या हाती मुबलक पैसा आल्यावर, त्यांच्याकडे बभुक्षु, मेहनती, साहसी व निर्धन अशा लोकांचे लक्ष जावे यात अजब असे काहीच नाही...
सिंघणाला मरून 50 वर्षे झाली नाहीत तो मुसलमानांकडून मराठ्यांचा पराजय होतो. अर्थात, हा चमत्कार होण्यास मराठ्यांच्या शीलात व चालीरीतीत विलक्षण फरक पडला असला पाहिजे. हा फरक कोणता हे हेमाद्रीच्या व्रतखंडावरून स्पष्ट ओळखता येते. सिंघणादी वीरांच्या विजयाने लोक अत्यंत धनसंपन्न होऊन व्रते,उद्यापने करण्याच्या मिषाने सुखैकपरायण आणि विलासमग्न झाले. सुखैकपरायणता व विलासमग्रता ही मराठ्यांच्या नाशाची तेराव्या शतकात कारणे होती. '
हेमाद्रीने रामदेवरायाच्या सत्तेचा फायदा घेऊन त्यांची सत्ता घालवण्याची कामगिरी केली हे एक ऐतिहासिक वास्तव आहे. अशा हेमाद्री अथवा हेमाडपंताचं नाव मंदिरांच्या स्थापत्यशैलीला दिले जाते. प्रख्यात पुरातत्वविद्या व संस्कृततज्ज्ञ कालवश डॉ. वा. वि. मिराशी यांनी आपल्या 'संशोधन मुक्तावलि सर दुसरा' या शोधनिबंध संग्रहात मात्र तसं म्हणण्याचं धाडस केलेलं होतं. 1957 मध्ये प्रकाशित झालेल्या या ग्रंथातील 'हेमाद्रीचा अंतकाल' या लेखात पृ. 139 वर ते म्हणतात-
'रामदेवराय यादवाचा करणाधिप व चतुर्वर्गचिन्तामणि इत्यादि संस्कृत ग्रंथांचा कर्ता हेमाद्री किंवा हेमाडपंत यांचं नाव सुविख्यात आहे. त्याने विद्वानांना उदार आश्रय दिला. स्वतः अनेक विषयावर ग्रंथरचना केली.
मोडी लिपी प्रचलित केली व स्वतःच्या नावाने पुढे प्रसिद्ध झालेली हेमाडपंती स्थापत्य पद्धती प्रचारात आणली. असा हा महामंडित यादवनृपति महादेव व रामदेव यांच्या दरबारी त्यांचा करणाधिप किंवा लेखनाध्यक्ष व मंत्री म्हणून होता. असं त्यांच्या स्वतःच्या व त्याचा आश्रित बोपदेव यांच्या ग्रंथातील उल्लेखांवरून तो इ.स.च्या तेराव्या शतकाच्या द्वितीयार्धात होऊन गेला यात संशय नाही.'
यावरून हेमाद्री किंवा हेमाडपंत नावाचा विद्वान तेराव्या शतकात होऊन गेला हे स्पष्ट होतं. डॉ. मिराशीसारख्या विद्वानाने हेमाडपंती स्थापत्यपद्धती हेमाद्रीने प्रचारात आणली, असं विधान करून जनमानसातील रूढ समजुतीला अधिकृतता प्राप्त करवून दिली. त्यामुळे त्यावर आधारलेल्या कोशवाङ्मयातही तसाच उल्लेख आला. इतर अभ्यासकांनीही डोळे मिटून त्याचं अनुकरण केलं.
नागपूर विद्यापीठाच्या पुरातत्त्व व प्राचीन इतिहास विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. ओंकार प्रसाद वर्मा यांनी तर 'हेमाडपंती टेंपल्स' या शीर्षकाखाली एक ग्रंथच लिहिला, आणि नागपूर विद्यापीठाने तो प्रसिद्धही केला. 1973 मध्ये प्रकाशित झालेल्या या ग्रंथात हेमाडपंती म्हणून अनेक मंदिरांचा उल्लेख आहे. त्यापैकी अनेक मंदिरे हेमाद्रीपंडित जन्माला यायच्या आधीपासूनच हयात होती. मग त्यांना हेमाडपंती का म्हणायचं, हा प्रश्नही त्यांना शिवला नाही.
'वेडा मुहम्मद' की दूरदृष्टी असलेला मुहम्मद?
देवगिरीच्या पतनानंतर एका गायकाला अल्लाउद्दीन खिलजी याने आपल्या सोबत नेले. त्याने 'देवगिरी बिलावल' या रागाची निर्मिती करून देवगिरीची आठवण कायम केली आहे. आज दौलताबादचा किल्ला म्हणून ओळखला जातो. त्याचे मूळ नाव देवगिरी हे होते. कोणे एके काळी येथे एक समृद्ध साम्राज्य बहरले होते. ते स्थान आज तालुक्याचेही ठिकाण नाही. खुलताबाद तालुक्यात ते येते.
याठिकाणी मुहम्मद तुघलकाने आपली राजधानी दिल्लीवरून आणली होती. त्याला 'वेडा मुहम्मद' म्हणून प्रस्थापितांनी हिणविले होते. परंतु तो अतिशय हुशार असल्याचे पुरावे इतिहासात नमूद आहेत. तो उदार मनाचा होता, असेही इतिहासकार सांगतात. विद्वानांचा आश्रयदाता आणि बुद्धिप्रामाण्यवादी म्हणून त्याचा गौरव इतिहासकारांनी केला आहे.
प्रयोगशील व सुधारणावादी शासक म्हणून ज्याचा उल्लेख इतिहासकार करतात,तो तेराव्या शतकाच्या पूर्वार्धात होऊन गेला. त्याच्या राज्यात त्याने अनेक प्रशासकीय सुधारणा केल्या. आर्थिक व कृषी सुधारणा करताना सांकेतिक चलन रूढ केले होते. त्यामागे सोन्याचा तुटवडा हे प्रमुख कारण होते. सोन्या-चांदीच्या नाण्याऐवजी त्याने तांब्या-पितळेची नाणी घडविलीत.
दिल्लीऐवजी देवगिरी हेच भारताच्या राजधानीचे स्थान निवडण्यामागे त्याचा हेतू राजधानीची सुरक्षितता हे कारण होते. कारण की देवगिरीचा किल्ला हा नेहमी अजिंक्य किल्ला मानला जात असे. रामदेवराय यादव याची राजवट ज्या परिसरात स्थिरावली होती, त्या परिसरात आज आपण आहोत.
यादवांच्या साम्राज्याला सुरुंग लावणारी ब्राह्मणशाही आजही या ठिकाणी आपला प्रभाव गाजवीत आहे. अल्लाउद्दिन खिलजी याने या साम्राज्याचा अंत केला ही एक ऐतिहासिक घटना आहे. या घटनेमुळे ब्राह्मणी दमन व्यवस्थेला सुरुंग लावला होता. त्यामुळे मराठी संतांची चळवळ आकाराला आली, असा सिद्धांत पहिल्या विद्रोही संमेलनाचे अध्यक्ष मा.बाबुराव बागुल यांनी मांडला होता.
संतांची चळवळ ही खऱ्या अर्थाने जातिभेदाच्या भिंतींना तडा देणारी होती. परंतु,तिच्यामुळे केवळ सामाजिक परिवर्तनाचा धुरळा उडाला व पाचोळा होऊन खाली पडला, अशी तक्रार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती. त्याची प्रचीती आज आपणास येत आहेच. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्याकरिता झालेली चळवळ आज बरीच पुढे गेली आहे.
आज महाराष्ट्राचे राज्यकर्ते दिल्लीकरांच्या पायाशी लोळण घालण्यात स्वत:ला धन्य मानतात. मराठीला दिल्लीला नेऊन त्यांनी महाराष्ट्राला दुय्यम लेखले आहे. म्हणून विद्रोही साहित्य संमेलन देवगिरीच्या परिसरात घडवून विद्रोही सांस्कृतिक चळवळीने सध्याच्या प्रस्थापित व्यवस्थेला एक जोरकस धक्का दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या जिल्ह्यात छत्रपती संभाजीराजे यांचे काही काळ वास्तव्य होते व त्याकाळात स्वराज्याला समृद्ध करणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी घडल्या म्हणून या जिल्ह्याला आपण त्यांचे नाव दिले आहे. आज आपण ज्या साहित्यिक,सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय पर्यावरणाचे घटक बनलो आहोत, तिने आपणापुढे अनेक आव्हाने उभी केली आहेत. त्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आपणा सर्वांना एकजुटीने लढायचे आहे.
आज द्वेष-मत्सर हे शत्रू आपणापुढे उभे ठाकले आहेत. दुर्दैवाने तीच आजची राजकीय संस्कृती झाली आहे. धार्मिक उन्माद म्हणजेच जणू काय आपला धर्म आहे, अशी काहींची समजूत झाली आहे. त्यासाठी ते आपल्या दैवतांचा गैरवापर करण्यासही मागे-पुढे पाहत नाहीत. संविधान हा त्यांना आपला खुळखुळा वाटू लागला आहे. त्याचा वापर आपल्या सोयीनुसार करण्याची परंपरा ते रुजवीत आहेत.
संविधानाचे मंदिर बांधण्याची घोषणा झाली. त्यात संविधानाची मूर्ती बसविली जाणार. नंतर तिची पूजा व आरती सुरू व्हायला वेळ लागणार नाही. सोबतच एखादा प्रतिभावान पंडित 'संविधान पुराण' रचण्यासाठी पुढे येईल. त्याला साहित्य अकादमी किंवा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला तर आपणास आश्चर्य वाटायला नको. काही नाही तर पद्मश्री पुरस्कार तर सहजच मिळेल. आज ज्यांना हे पुरस्कार मिळालेत त्यांची कामगिरी पाहून तर आपणास याची खात्री नक्की पटेल.
हे संमेलन महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला 151 वर्षे होत आहेत त्यानिमित्तही आयोजित केले आहे. ‘सत्यमेव जयते' हे ब्रीदवाक्य आधुनिक काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिल्यांदा वापरले होते. इ.स. 1888 मध्ये ग्यानोबा कृष्णाजी ससाणे यांना लिहिलेल्या पत्राच्या आरंभी त्यांनी हे वाक्य लिहिले. मुंडकोपनिषद या वैदिक ग्रंथाच्या एका श्लोकातील (3.1.6) हे वाक्य आहे.
स्वातंत्र्य लढ्यातील एक सैनिक व बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक पंडित मदन मोहन मालवीय यांनी या वाक्याला राष्ट्रीय दर्जा देण्याचे काम इ.स.1918 मध्ये केले. भारत स्वतंत्र झाल्यावर शासनाने या वाक्याला 'राष्ट्रीय ब्रीदवाक्य' म्हणून स्वीकारले. भारतीय राजमुद्रेच्या पायथ्याशी हे वाक्य देवनागरी लिपीमध्ये लिहिलेले आहे. भारतीय चलवू नोटांवरही ते आढळते. त्याचप्रमाणे सर्व शासकीय कागदपत्रांवर ते वापरले जाते.
या वाक्याला आधुनिक काळात पहिल्यांदा सत्यशोधक चळवळीच्या पुरस्कारासाठी वापरले गेले. त्यानंतर स्वातंत्र्य चळवळीचे ब्रीदवाक्य म्हणून ते गौरविले गेले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सत्तारूढ झालेल्या काँग्रेस सरकारने आपले ध्येयवाक्य म्हणून ते प्रस्थापित केले. ज्या उपनिषदामधून हे वाक्य निडले गेले, त्याचा काळ साधारणपणे इ. स. पू. 1000 ते इ.स. पू. 600 पर्यंतचा म्हणजे आजपासून अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वीचा मानला गेला आहे.
याचा अर्थ गेल्या तीन हजार वर्षांपासून सत्याचाच नेहमी विजय होतो,असे आपले पूर्वज मानीत असत. प्राचीन भारतीय विद्वान छातीठोकपणे असे सांगण्याची हिम्मत करीत होते, हे यावरून दिसून येते. आजच्या विद्वानांमध्ये ती हिम्मत राहिली नाही. कारण की ते आज प्रचंड दहशतीमध्ये आहेत. या परिस्थितीचा फायदा घेऊन आज सत्तेवर असलेल्या राज्यकर्त्यांनी त्यांना अधिकच दडपून टाकण्याचा प्रयत्न चालविला आहे.
भारतीय संस्कृती ही वैदिक संस्कृतीपासून निर्माण झाली आहे, असे सांगण्याची परंपरा गेल्या शतकातील इतिहासकारांनी सुरू केली होती. तिला छेद दिला गेला तो सिंधू संस्कृतीच्या उत्खननाने. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात लागलेल्या या शोधाने स्वतःला आर्य किंवा वैदिक समजणाऱ्या लोकांना प्रचंड धक्का बसला. त्याचबरोबर त्यांनी वैदिक संस्कृतीच्या उदात्तीकरणासाठी जाणीवपूर्वक पसरविलेल्या अनेक पारंपरिक समजुतींनाही मिथ्या ठरवले गेले. या धक्क्यातून न सावरलेल्या सनातनी वर्णवर्चस्ववादी विद्वानांनी सिंधू संस्कृती ही आर्यांचीच होती असे मत मांडणारे लेखन शहाजोगपणे आजवर केले.
त्यासाठी त्यांनी पहिल्या टप्प्यात सिंधू संस्कृती सोबत सरस्वती हा शब्द जोडून 'सरस्वती संस्कृती' हा शब्दप्रयोग अस्तित्वात आणला. त्यासाठी संघपरिवाराने विशेष मोहीम आखली होती. या मोहिमेची फलश्रुती म्हणून आज सिंधू या शब्दाच्या ठिकाणी सरस्वती हा शब्द आणण्यात झाली. विशेष म्हणजे सिंधू संस्कृतीच्या शोधाला शंभर वर्षे पूर्ण होत आले असताना अर्थातच सिंधू संस्कृतीच्या शोधाची शताब्दी सुरू असताना त्यांनी हा उद्दामपणा केला.
विद्यापीठ अनुदान आयोग या केंद्र शासनाच्या अनुदानावर चालणाऱ्या स्वायत्त (?) संस्थेने इतिहास विषयाच्या पदवी अभ्यासक्रमात सरस्वती संस्कृती या शब्दाचा वापर केला आहे. आजवर सिंधू संस्कृतीसाठी हडप्पा संस्कृती हा शब्द वापरला जात असे. त्याऐवजी सरस्वती संस्कृती हा शब्द वापरून वैदिक संस्कृतीचाही समावेश अभ्यासक्रमाच्या नव्या आराखड्यात करण्याच्या सूचना आयोगाने दिलेल्या आहेत. वास्तविक सरस्वती किंवा वैदिक या नावांनी संबोधल्या जाणाऱ्या कोणत्याही नागरीकरणाचे पुरातत्वीय अवशेष कुठेही आढळत नाहीत. त्याचप्रमाणे भारतीय संस्कृतीचा विचार करताना केवळ वैदिक संस्कृतीचा आग्रह धरणेही संकुचितपणाचे आहे, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
भारत हा बहुविध संस्कृतींच्या संमीलन आणि सौहार्दाचे जगातील एकमेव आदर्श उदाहरण आहे. अशा व्यापक व उदारमतवादी संस्कृतीला वैदिक संस्कृतीपुरते सीमित करणे हे भारताच्या एकंदर गंगा-जमनी प्रकृतीला मानवणारे नाही. त्याचप्रमाणे सरस्वती हा शब्द केवळ वैदिक ग्रंथांमध्ये आढळतो. पूर्व वैदिक काळातील अवशेषांमध्ये त्याचे कोणतेही अवशेष अस्तित्वात नाहीत. त्यामुळे पूर्ववैदिक अशा सिंधू संस्कृतीला सरस्वती संस्कृती म्हणणे हे अनैतिहासिक असून सिंधू संस्कृतीच्या निर्मात्यांचा घोर अपमान करणारे आहे.
एका वैभवसंपन्न व विस्तृत नागरी संस्कृतीच्या निर्मितीचे श्रेय लाटण्याचा हा घृणास्पद प्रयत्न आहे. . एखाद्या संस्कृतीतील अवशेषांमध्ये लिपीचा अभाव असेल तर ती संस्कृती इतिहासपूर्वकालातील मानली जाते. सिंधू संस्कृतीत लिपी आहे, पण ती वाचली गेली नाही. त्यामुळे तिला इतिहासपूर्वकालीन मानले गेले. लिपीच्या वाचनाने संस्कृतीचे ऐतिहासिक अस्तित्व सिद्ध होत असल्यामुळे प्र.रा. देशमुख यांनी सिंधू लिपीचे वाचन करून त्यावर आधारित आपला शोध ग्रंथ प्रकाशित केला होता.
परंतु, त्यांच्या संशोधनाकडे सोयीस्करपणे डोळेझाक केली गेली आणि त्यांच्या ग्रंथांची पुनर्मुद्रणे झाली नाहीत. या उलट त्यांच्या संशोधनाला खोटे ठरविण्याचे प्रयत्न झालेत. संघ पुरस्कृत इतिहासकार वि.श्री. वाकणकर यांनी या कार्यात पुढाकार घेतला होता. अलीकडे डॉ.म.के ढवळीकर यांनीही अशी खोडसाळ विधाने केली होती. त्यात भर टाकणारे निष्कर्ष डॉ. वसंत शिंदे यांनी काढून आपल्या पुढील प्रगतीची बीजे रोवून ठेवली आहेत.
मुळात सरस्वती नदीचा शोध अजून भारतात लागलेला नाही. तरीही तो लागल्याचे दावे सतत संघीय मंडळी करीत असतात. सरस्वती हा शब्द सरस आणि वती या दोन शब्दांपासून बनलेला आहे. सरस म्हणजे प्रवाह आणि वती म्हणजे तो धारण करणारी. अर्थात जी प्रवाहित आहे, ती सरस्वती होय.
अशा अनेक प्रवाहित नद्यांना सरस्वती या नावाने वैदिक साहित्यात संबोधलेले आढळते. गंगा या द्रवीड शब्दाचा अर्थ नदी असाच होतो. त्यामुळे गावोगावी असणाऱ्या अनेक नद्यांसाठी स्थानिक रहिवासी गंगा हा शब्द वापरतात. संघ विचाराच्या लोकांनी ज्या सरस्वतीचा शोध घेणे चालविले आहे, त्या सरस्वती नदीचा प्रवाह भारतात अजून तरी आढळला नाही.
परंतु, तो गंगा आणि यमुना या दोन नद्यांमध्ये सुप्तपणे वाहत असतो अशी एक धारणा आहे. म्हणूनच आजचे प्रयागराज व पूर्वी अलाहाबाद या नावाने ओळखले जाणारे शहर या तीन नद्यांच्या संगमावर म्हणजेच त्रिवेणी संगमावर वसले आहे असे मानले जाते. ऋग्वेदात आलेला सरस्वतीचा उल्लेख एक नदीदेवता म्हणून असून विद्येची देवता म्हणून ती नंतर प्रस्थापित झाली.
संघाच्या पठडीतील लोक वारंवार संविधान विरोधी वक्तव्ये करीत असतात. परंतु सरसंघचालक मात्र आपली व्यापक भूमिका मांडताना दिसतात. गोळवलकर गुरुजींचे निधन झाल्यानंतर त्यांचे उत्तराधिकारीम्हणून मा. बाळासाहेब देवरस हे सरसंघचालक या पदावर आरूढ झालेत. गुरुजींनी त्यांचे नाव आपला उत्तराधिकारी म्हणून आपल्या मृत्यूपूर्वीच एका चिठ्ठीत लिहून ठेवले होते, असे म्हणतात. डॉ. हेडगेवारांचा निकट सहवास लाभलेले देवरस गुरुजींच्या तालमीत तयार झाले होते. परंतु, त्यांची मते गुरुजींपेक्षा वेगळी होती. 
ती त्यांच्या भाषणांमधून वेळोवेळी व्यक्त झाली आहेत. त्यांच्यानंतर सरसंघचालकपदी आलेले डॉ. राजेन्द्रेसिंह ऊर्फ रज्जुभैय्या आणि के. सुदर्शन यांनी मात्र गुरुजींच्या विचारांवर कुरघोडी करणारी मते मांडली नाहीत. त्यांच्यानंतर सरसंघचालकपद सांभाळून भारताच्या संसदेत सर्वाधिक खासदार निवडून आणण्याचे सामर्थ्य सिद्ध करणारे आजचे सरसंघचालक मा. मोहन भागवत मात्र देवरस यांच्या पावलावर पाऊल टाकून संघाला अद्ययावत करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
चड्डीतील संघ त्यांनी फुलप्यांटीत आणला. अलीकडे त्यांनी दिलेल्या वक्तव्यांवरून संघाला ते धर्मनिरपेक्षतेकडे नेण्याचा प्रयत्न करीत आहेत असे दिसते. अलीकडे भागवतांनी अतिशय क्रांतिकारक म्हणविली जाणारी तीन भाषणे दिल्लीत दिली आहेत. त्याविषयी भाष्य करताना संघाचे विचार मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणारे दैनिक तरुण भारतसुद्धा त्यांच्या विचारांना देवरस यांच्या विचारांशी जोडते.
भागवतांनी संविधानाची समीक्षा करण्याची भाषा वारंवार केलेली आहे. त्यामुळे आज त्यांच्या वक्तव्याकडे कोणीही गांभीर्याने पाहणार नाही. काही दिवसांपूर्वी केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री अनंत कुमार हेगडे यांनी एका सभेमध्ये 'आम्ही संविधान बदलण्यासाठी आलो आहोत' असे विधान केले होते.
हेगडे यांच्या या विधानानंतर विरोधी पक्षांकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली गेली. शेवटी त्यांना आपल्या वक्तव्याबद्दल लोकसभेत माफी मागावी लागली. अशी नाटके संघ-भाजपचे नेते सतत करीत आली आहेत. जेव्हा त्यांच्या हाती सत्ता येते, तेव्हा ते संविधानाच्या बदलासाठी आक्रमक होत असतात. परंतु, जेव्हा जागरूक जनता त्यांना जाब विचारायला पुढे येते, तेव्हा ते मागे सरण्याचा आभास निर्माण करतात.
. वर्ग ही संज्ञा साम्यवादी तत्त्वज्ञानातील आहे आणि प्रामुख्याने आर्थिक गट या अर्थाने ती आली आहे. त्यामुळे आर्थिक गटामध्ये जो सर्वसामान्यांचा वर्ग आहे हा वंचितांचा वर्ग आहे. वंचितांना त्यामुळे अनेक साधनसुविधा आणि अपेक्षित सोयी मिळत नाहीत. त्यामुळे अभिजात आणि बहुजात अर्थात क्लासीकल व मासीकल असा संघर्ष सांस्कृतिक क्षेत्रात जगभर आहे, तसाच भारतात सुद्धा आहे.
प्रस्थापित वैदिकांच्या संस्कृतीने अवैदिक संस्कृतीतील असुर, राक्षस, दैत्य व दानव, भूत, पिशाच, या शब्दांचे अर्थ विकृत करून टाकले आणि देव या शब्दाचा अर्थ चांगला केला अर्थात त्याचे उदात्तीकरण झाले. वास्तविक देव हा आर्यांमधील एक चतुर वर्ग होता. आणि त्यांनी स्वत:ला उच्च ठरवून भारतातील मूलनिवासी लोकांना हीन लेखले. त्यांचा संघर्ष वैदिक व पौराणिक साहित्यात मोठ्या प्रमाणात येतो.
या क्लासीकल मासीकल संघर्षाची दखल साहित्याने घ्यायला हवी. मिथकांमध्ये आढळणाऱ्या या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी योग्य ते प्रयत्न करायला हवे. त्यासाठी मिथकांची चिकित्सा व्हायला हवी. मिथक चिकित्सा ही धर्म चिकित्सेचे एक पाऊल आहे. संस्कृती समीक्षा ही त्यातून केली जाते म्हणून साहित्यिकांनी मिथकांच्या चिकित्सेसाठी पुढे यायला हवे.
अभिजात 'बहुजात’ भाषा
मराठी भाषेमधून पाठयपुस्तके तयार करण्याचे इंग्रज सरकारच्या शिक्षण खात्याने ठरविल्यावर मुंबईच्या मराठी भाषेत तयार करणे योग्य नाही, असे त्यांना वाटले. त्यामुळे पुण्यातील मराठीची निवड त्यांनी केली. त्याकाळात सदाशिवपेठेत ब्राह्मण जातीतील शिकलेल्या लोकांची संख्या अधिक होती. त्यांच्याकडे मराठीचे व्याकरण तयार करण्याची जबाबदारी सोपाविण्यात आली.
त्याचप्रमाणे पाठ्यपुस्तकेही निर्माण करण्याचे कार्यही त्यांनीच करावे असर ठरविले गेले. त्यामुळे जी पाठ्यपुस्तके तयार झालीत, ती सदाशिव पेठेत राहणाऱ्या ब्राह्मणांच्या बोलीत लिहिली गेली. पाठयपुस्तके, प्रसारमाध्यमे व राज्यव्यवहारात जी भाषा वापरली जाते, तिला प्रमाण भाषेचा दर्जा मिळतो. या वास्तवानुसार पुण्यातल्या ब्राह्मणांची बोली मराठीची प्रमाण भाषा बनली.
या भाषेत संस्कृत शब्दांचा भरणा अधिक होता. त्याचप्रमाणे संस्कृत भाषेचे व्याकरण तिच्यासाठी वापरण्यात आले. संस्कृत भाषेतील शब्द जसेच्या तसे वापरले गेले, तर त्यांना तत्सम म्हणतात. त्याचप्रमाणे शब्दामधून तयार झालेल्या शब्दांना तद्भव म्हणून संबोधले जाते. या शब्दांना मराठीचे नियम लागू होत नाही, असा नियम तयार करण्यात आला.
वास्तविक मराठी भाषेत त्यांचा समावेश झाल्यावर त्यांना मराठीचे नियम लागायला हवेत. जसे, मराठी भाषेत 'मी' या प्रथमपुरुषी एकवचनाच्या रुपाला प्रत्यय लागत नाही, हा नियम पुण्यातील ब्राह्मणांच्या बोलीला लागू होतो. परंतु, इतर विभागात मी या सर्वांनामाच्या रुपाला 'या' आणि 'न' हे प्रत्यय दोन प्रत्यय लागतात. ज्ञानेश्वरांनी 'ती शारदा सुंदरी नमिली मिया' असे म्हटले आहे.
याचा अर्थ ज्ञानेश्वरकालीन मराठी भाषेत मी ह्या प्रथम पुरुषी एकवचनी सर्वनामाच्या रुपाला या हा प्रत्यय लागत होता आणि आजही महाराष्ट्रातल्या मराठी भाषिक हा प्रत्यय लावतात. त्यामुळे मराठीच्या अर्थांतरणात काही फरक पडत नाही हे स्पष्ट होते.
मराठीचे प्रमाण लेखन म्हटले की जो बागुलबुवा उभा केला जातो तो ऱ्हस्व - दीर्घ इकार व उकार यांचा. कारण की, संस्कृत भाषेत ऱ्हस्व आणि दीर्घ यांच्या लेखनामुळे शब्दाच्या अर्थामध्ये फरक होतो त्याला ‘अर्थ विभेदकता' असे म्हणतात. अशी 'अर्थ विभेदकता' मराठी भाषेत नाही. त्यामुळे ऱ्हस्व लिहिले काय किंवा दीर्घ लिहिले काय मराठी शब्दाच्या अर्थामध्ये काहीही फरक पडत नाही. असे असताना संस्कृतचे नियम मराठीला लावून मराठीची गळचेपी करणे योग्य नाही म्हणून मराठीच्या मानगुटीवर संस्कृतची वेलांटी लावून मराठीचा गळा आवळल्यास मराठी भाषेचा अंत होणे दूर नाही.
मराठी भाषेला अभिजात हा दर्जा मिळाल्यास ही आनंदाची गोष्ट आहे. परंतु हा दर्जा सदाशिवपेठेतील ब्राह्मणांच्या बोली पुरता सीमित आहे की महाराष्ट्रातील सर्व विभागातील बोली भाषांनाही लागू आहे हे स्पष्ट झाले नाही. वऱ्हाडी, मराठवाडी, खान्देशी, अहिराणी, कोकणी, सातारी, कोल्हापुरी, या बोलींना अभिजात मराठीमध्ये कोणते स्थान आहे हे स्पष्ट झाले पाहिजे.
आज देशभर धार्मिक उन्माद वाढलेला आहे. राजकारणाच्या सोयीसाठी धर्माचा बेधुंद वापर केला जात आहे. याची परिणती धार्मिक संघर्षात होऊ शकते. त्यामुळे भारताच्या गंगा-जमनी संस्कृतीला तडा जाऊ शकतो. पन्नास वर्षांपूर्वी म्हणजे 1975 मध्ये मी एक कविता लिहिली होती. ती सादर करतो आणि थांबतो.
थांबवा आक्रोश सारा, थोपवा आवर्तने; पेटवा आयुष्य सारे, जोडण्या लाखो मने.
जाती-धर्माच्या पताका, आपुल्या मिरवू नका; मित्रहो ! विसररू नका, लाखो जीवांची स्पंदने;
आज बाहूंना विसावा, आपुल्या देऊ नका; तट-तटा तुटतील सारी, कालची ती बंधने.
फोल सारे शब्द आता, मोल कर्मालाच आहे; पाऊले टाका प्रीतीची, खुलविण्याला जीवने.






