हडप्पा आणि मोहेंजो दारो ह्या अदमासे साडेचार-पांच हजार वर्षांपूर्वी सिंधु नदीच्या खोऱ्यात नांदलेल्या दोन महान संस्कृती. अत्यंत प्रगत. इतक्या प्रगत संस्कृती अचानक लयाला कशा गेल्या ह्याचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही. परंतु त्या लयाला गेल्या, हे सत्य आहे. मुंबईच्या गिरणगांवाचंही तसंच झालंय. 1854 साली सुरु झालेल्या पहिल्या गिरणीनंतरच्या काही काळात, गिरण्यांत काम करणाऱ्या कामगारांनी वसवलेलं हे गिरणगांव... कोकण, घाट, देशाचा उत्तर भाग इथून गिरण्यामधे मिळणाऱ्या रोजगाराने तिथल्या लोकांना मुंबईत खेचून आणलं.
विविध ठिकणांहून आलेले हे गरीब गिरणी कामगार सुरुवातीला येतांना एकेकटे आले असले तरी त्यांनी येताना आपापल्या भागातील आपापली भाषा, प्रथा, परंपरा, संस्कृती, सण, उत्सवही सोबत आणले आणि पुढच्या काळात या सर्वांचं एक मनोहारी मिश्रण या गिरणगांवात नांदू लागलं.
इथले लोक गरीब होते, पण सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत श्रीमंत होते. ही श्रीमंती सण-उत्सवांच्या काळात गिरणगांवात मुक्त हस्ते उधळली जायची. त्यात माझा-तुझा, आपला-परका असा भेदभाव नव्हता. त्यात सर्वांचा समान सहभाग असायचा.
सार्वजनिक गणेशोत्सव, धयकाला (दहीहंडी) हे कोकण्यांनी प्रथम गिरणगांवात आणले आणि मग ते अवघ्या मुंबईचे झाले. भारुडं, तमाशे, पवाडे इत्यादी घाटवरुन गिरणगांवात आले आणि सर्वच गिरणगांवाने ते आपले केले. एकेकाळी गिरणगांवात कव्वाली फार प्रसिद्ध होती. ही गिरणगांवात आणली उत्तर प्रदेशातून गिरणीत राबण्यासाठी आलेल्या कसबी मुसलमान विणकरांनी.
मग ती सगळ्या गिरणगावाची झाली. अशी कित्येत उदाहरणं सांगता येतील. मुळच्या ह्या सण-उत्सवावर इकडच्या खास गिरणगांवच्या कामगार संस्कृतीचे संस्कार होत गेले आणि मग ते गिरणगांवचे म्हणूनच ओळखले जाऊ लागले.
गरिबी हा इथे राहाणाऱ्या सर्वांसाठीच लघुत्तम साधारण विभाजक होता. श्रीमंत होते, ते थेट टाटा नि बिर्लाच. मध्यमवर्गाचा उदय अद्याप व्हायचा होता. धर्म नि जात आपापल्या घरापुरतीच मर्यादीत होती. कोकणी असो, घाटी असो, भैया असो की मुसलमान, एकदा का तो मुंबईच्या गिरणीत कामाला लागला, की त्याचा धर्म नि जात एकच. कामगार… ह्या कामगारांनी वसवलेलं हे वैशिष्ट्यपूर्ण गांव, गिरण्यांच्या 1982 च्या अभूतपूर्व संपानंतर हळहळू लयाला जाऊ लागलं. त्या संपाने इथला कामगार विस्थापित झाला, संपला. गिरणगांवही संपू लागला. आता तर गिरणगांव केवळ जुन्या पिढीच्या स्मृतींतही पुसट होऊ लागलाय.

('आणखी एक मोहेंजो दारो' या डॉक्युमेंट्रीचे दिग्दर्शक अशोक राणे)
नवीन पिढ्यांना तर या सुंदर गांवाची कितपत माहिती असेल, ते सांगताही यायचं नाही. मोहंजो दारो संस्कृती का नष्ट झाली, त्याची कारणं अजूनही स्पष्ट झालेली नाहीत. पण एकेकाळी तिथे एक समृद्ध संस्कृती नांदत होती, हे मात्र माहित झालंय. गिरणगांवचंही तसंच झालंय. गिरणगांवच्या लयामागे 1982 चा संप हे मोठं कारण असलं तरी, ते एकमेंव कारण नाही. अनेक कारणं त्यासाठी देता येतील. त्यातील काही स्पष्ट आहेत, तर अनेक अस्पष्ट आहेत. कसंही असलं तरी गिरणगांवात एकेकाळी गरीब गिरणी कामगारांनी उभी केलेली श्रीमंत संस्कृती नांदत होती, हे मात्र खरं आहे.
'आणखी एक मोहेंजो दारो'... गिरणगावचा एक मौल्यवान ठेवा
याच पार्श्वभूमीवर आहे यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर आपली मोहोर उमटवणारी 'आणखी एक मोहेंजो दारो' ही डॉक्युमेंटरी… एखादी व्यक्ती जन्मतच संवेदनशील मन घेऊन येते. जगात वावरताना तिचं मन सतत काही ना काही टिपत असतं, ते मनात रुजवत असतं. खरं तर त्या मनाचं एक वेगळंच अवकाश असतं. अशाच एका संवेदनशील मनात खोलवर रुजलेल्या काळाच्या, प्रसंगांच्या, विचारांच्या आणि भावनेच्या बीजातून प्रसवलेली कलाकृती म्हणजे 'आणखी एक मोहेंजो दारो' ही डॉक्युमेंटरी…
ज्येष्ठ चित्रपट समीक्षक, जागतिक सिनेमाचे अभ्यासक, उत्कृष्ट कथा-पटकथा लेखक आणि दिग्दर्शक अशोक राणे यांनी साकारलेली 'आणखी एक मोहेंजो दारो’ ही डॉक्युमेंटरी म्हणजे मुंबईच्या गिरणगावातील जवळपास लयाला गेलेल्या समृद्ध संस्कृतीचे वास्तव दर्शन घडवणारा एक मौल्यवान ठेवा आहे.
अशोक राणे यांचं बालपण गुजरातमधील नवसारी या शहरात गेलं. त्यांचे वडीलही गिरणी कामगार होते. त्यामुळे पहिलं गिरणगाव त्यांनी अनुभवलं ते नवसारीत. मग मुंबईचं गिरणगाव त्याचे सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय पैलू, त्याची विविध स्थित्यंतरं अनुभवतानाच 2015 मध्ये गिरणगावावर फिल्म करायचं त्यांनी मनाशी ठरवलंच होतं. याविषयी ते म्हणाले, गिरणगाव मी लहानपणापासून पाहत, अनुभवत आलो आहे. मी जेव्हा ही फिल्म लिहायला घेतली तेव्हा माझ्या डोक्यात सगळं पहिल्यापासून निश्चित होतं.
त्या वेळी मी प्रभादेवीला राहत होतो. महाराष्ट्राच्या विविध प्रदेशांतून तसेच भारताच्या इतर भागांतून गिरण्यांमध्ये काम करण्यासाठी आलेले असंख्य लोक होते. ते विविध जातीधर्मांचे असली तरी खऱ्या अर्थाने मात्र त्यांचा धर्म नि जात एकच होती, ती म्हणजे गिरणी कामगार! प्रत्येकाची भावनाच तशी होती. एकमेकांविषयी ममत्व, आदर होता. अडाणी, अशिक्षित, अंगठेबहाद्दर असले तरी याच कामगारांनी एक वैशिष्ट्यपूर्ण गाव उभं केलं…
गिरणगाव! विविध भाषा, प्रथा, परंपरा, खेळ, संस्कृती, सण, उत्सव अशी एक उत्तम संस्कृती निर्माण केली. गिरण्यांच्या 1982 च्या अभूतपूर्व संपानंतर मात्र हळहळू हे सगळं लयाला जाऊ लागलं. तो संप गिरणगावचा काळ ठरला आणि त्या संपाने इथला कामगारही संपला. गिरणगावचे अस्तित्वच संपुष्टात आले. तिथली संस्कृती लयाला गेली. गिरणगाव म्हणजेच अजून एक मोहेंजो दारो ठरलं.
ही डॉक्युमेंटरी करायचं जेव्हा नक्की झालं, तेव्हा पटकथेसाठी राणेंच्या नजरेसमोर एकच व्यक्ती आली, ती म्हणजे लेखक-नाटककार जयंत पवार. यावर चर्चा करण्यासाठी ते पवारांच्या कार्यालयात गेले. राणेंनी जेव्हा पवारांना सांगितलं, मी 'गिरणगाव उद्ध्वस्त झालं’ अशी एक डॉक्युमेंटरी करतोय आणि त्याच्यावर एक फिल्म करतोय, त्याचं नाव 'आणखी एक मोहेंजो दारो’. तेव्हा पवार त्वरित म्हणाले,''अरे, तू एका 'मोहेंजो दारो’मध्येच मला हे सांगतोयस.” कारण पवार यांचं कार्यालय होतं ते कमला मिल कंपाऊंडमध्ये!

गिरणगावाचे सर्व पैलू केवळ दोन-अडीच तासांच्या मर्यादित डॉक्युमेंटरीत साकारणं तसं कठीणच… तरीही हे सर्व डॉक्युमेंटरीत आणण्याचा आटोकाट प्रयत्न त्यांनी केला आहे. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात गिरणी कामगारांनी बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका, गिरण्यांत काम केलेल्या आणि आता हयात असलेल्या काही गिरणी कामगारांच्या मुलाखती, त्यांनी जागवलेल्या आठवणी, हुतुतू हा त्या वेळचा लोकप्रिय खेळ, गिरणगावात जपला जाणारा धार्मिक आणि जातीय बंधुभाव, गिरणगावाने जन्माला घातलेली कामगार रंगभूमी आणि त्यातून उदयाला आलेले मराठमोळे कलावंत, गिरणगावातील नाटकांच्या रंगलेल्या तालमी, त्या वेळी पडद्यावर दाखवले जाणारे सिनेमे आणि दिवाळीत चाळीतील आनंदाने एकत्रित येऊन फराळ करण्याची दृश्यं, नळावरील भांडणं, चाळीतील हळुवार प्रेमप्रकरणं इ. तसेच गिरणगावची खास ओळख असलेला गणेशोत्सव, दहीहंडी, होळी हे सण-उत्सव.
याशिवाय तमाशा, भारुडं, नमन, दशावतार, भजनं, उभी भजनं, बाल्या डान्स, जात्यावरच्या पहाटेच्या ओव्या, पाळणा तसेच ऑर्केस्ट्रा इ. त्या काळातलं जे जे शक्य झालं ते ते सर्व दाखवण्याचा किंवा शब्दांच्या माध्यमातून उभं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या डॉक्युमेंटरीत केला आहे. हे निश्चितच कौतुकास्पद आहे.
फिल्म साकारताना कोविड काळ, लॉकडाऊन, त्यामुळे सगळ्याच गोष्टींवर आलेली बंदी, कोरोनामुळे ज्यांचे अनुभव चित्रबद्ध करायचे, असे अनेक जाणते गिरणगावकर जग सोडून गेलेले, अशा अनेक अडचणींचा सामना करत ही डॉक्युमेंटरी अखेर आकाराला आली. गिरणगावात एकेकाळी गरीब गिरणी कामगारांनी उभी केलेली श्रीमंत आणि समृद्ध संस्कृती नांदत होती, या वास्तवाचे समग्र दर्शन घडवणारी ही कलाकृती आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
बर्लिनच्या इंडो-जर्मन फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'आणखी एक मोहेंजो दारो’ या डॉक्युमेंटरीला बेस्ट डॉक्युमेंटरी : ऑडियन्स अवॉर्ड मिळालं आहे. तसंच 2023-24 चा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला असून नॉन-फिचर विभागात ही डॉक्युमेंटरी, सर्वभाषिक सर्वोत्तम चरित्र/ऐतिहासिक/संकलन या विभागात सर्वोत्कृष्ट ठरली आहे.
शिवकालीन युद्ध कला असलेल्या मर्दानी खेळाचा ‘वारसा’...
स्वातंत्र्यपूर्वच नव्हे तर शिवकालीन इतिहासाचे संवर्धन करण्यासाठी आज कार्यरत असलेल्या 10-11 तालमी, आखाड्यांनी मर्दानी खेळाचे कौशल्य जपले आहे. हे कौशल्य पुढच्या पिढीपर्यंत पोचावे आणि त्याचे संवर्धन व्हावे यासाठी सचिन बाळासाहेब सूर्यवंशी यांनी जे प्रयत्न केले त्याला फळ मिळाले आहे. सचिन बाळासाहेब सूर्यवंशी यांनी मर्दानी खेळावर तयार केलेल्या ‘वारसा’ या महितीपटाला यंदाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये उत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. यापूर्वी याच माहितीपटाला 2022 चा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
सचिन सूर्यवंशी हे मागील काही वर्षांपासून मर्दानी खेळावर संशोधन तसेच अभ्यास करत होते. पडद्यावर भव्य दिव्य स्वरूपात दिसणाऱ्या माहितीपट तयार करण्यासाठी तब्बल 30 लाख इतका खर्च झाला आहे. हा माहितीपट बनवताना सचिन यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. तरी माघार न घेता स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर त्यांनी हा माहितीपट पूर्ण केला. 2019 मध्ये सचिन सूर्यवंशी यांच्याच ‘सॉकर सिटी’ या माहितीपटाला फिल्मफेअर मिळाला होता.
प्रतिक्रिया व्यक्त करताना सचिन सूर्यवंशी यांनी, आपली मुलं परदेशातील खेळ खेळतात कारण त्या खेळात करियर करता येते. आपल्या मातीतल्या या खेळाला शालेय क्रीडा प्रकारात कुठेलेच स्थान नाही. शासनाने मर्दानी खेळाला शालेय क्रीडाप्रकारात स्थान द्यावे. असे झाले तर शिवरायांचा हा समृद्ध वारसा जपला जाईल, असे सांगितले.
या चित्रपटासाठी सलग दोन वर्षे संशोधन आणि शूटिंगचे काम कोल्हापुरात झाले. फुटबॉलवेड्या कोल्हापुरात मर्दानी खेळाचे आखाडे अजूनही तग धरून आहेत. मर्दानी खेळाडू व त्यांना घडविणारी वस्ताद मंडळी स्वतःच्या खिशाला झळ लावून हा खेळ जपत आहेत ते केवळ शिवरायांवरील प्रेमापोटीच. मर्दानी खेळ म्हणजे शिवकालीन युद्धकला.
या युद्धकलेच्या जोरावर शिवाजी महाराज यांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार केला. शिवाजी महाराजांचे मावळे मर्दानी खेळात निपुण होते. हा युद्धकलेचा वारसा जपण्यासाठी कोल्हापुरातील स्थानिक कसा प्रयत्न करत आहेत. हे या माहितीपटात दाखवण्यात आले आहे. वस्तादांच्या व खेळाडूंच्या मुलाखती,मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके असे या पंचवीस मिनिटांच्या माहितीपटाचे स्वरूप आहे.
वर्ल्ड मिल्ट्री गेम्स असोत वा कॉमनवेल्थ. दिल्लीतला इंटरनॅशनल टुरिझम डे असो वा मुंबईतला काळाघोडा फेस्टिव्हल. डेक्कन ओडिसीच्या फेरीतून येणारे देशोदेशीचे पर्यटक असोत वा शिवजयंती आणि गणेशोत्सवातील मिरवणूक.
देशातलं असं एकही राज्य नाही, की ज्यांनी कोल्हापूरच्या मातीने प्राचीन युद्धकला आणि मर्दानी खेळांच्या रूपाने टिकवलेला लढाऊ बाणा पाहिलेला नाही. तलवार, पट्टा, भाला, बर्ची, कट्यार, विटा, माडू, बाणा या पारंपरिक शस्त्रात्रांचे जतन आणि ही शस्त्रे चालविण्याचे वाडवडिलांकडून आलेले कौशल्य जपण्याचे धडे इथल्या आखाड्यांतून मिळतात.
पूर्वी लढाईपूर्वी युद्धकलांचा सराव केला जायचा. इंग्रज भारतात आले आणि नंतरच्या काळात बंदुका आल्यावर पारंपरिक युद्धशस्त्रांचा वापर कमी झाला. पण, त्याचे ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित करण्याचे काम देशभरात फारच कमी ठिकाणी झाले. स्वातंत्र्यपूर्वच नव्हे तर शिवकालीन इतिहासाचे संवर्धन करण्यासाठी आज कार्यरत असलेल्या 10-11 तालमी, आखाड्यांनी मर्दानी खेळाचे कौशल्य जपले आहे. हे कौशल्य पुढच्या पिढीपर्यंत पोचावे आणि त्याचे संवर्धन व्हावे यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.

('वारसा' या डॉक्युमेंट्रीचे दिग्दर्शक सचिन सूर्यवंशी)
शिवकालात आपले मावळे तयार करण्यासाठी मनोरंजनाचे कलाप्रकार म्हणून या मर्दानी खेळांना पुढे आणले गेल्याचे जुनी-जाणती माणसे सांगतात. राजर्षी शाहू महाराजांच्या काळात भवानी मंडपात मर्दानी कला प्रकारांच्या तीन-तीन दिवस स्पर्धाही व्हायच्या. कालौघात त्या लोप पावल्या तरी आजही सार्वजनिक कार्यक्रमांच्या निमित्ताने मर्दानी खेळ जपले आहेत.
मर्दानी खेळात महत्त्व असते ते तीन गोष्टींना. पवित्रा, नजर आणि शस्त्र फिरवण्याची गती. पवित्रा म्हणजे तुमच्या शरीराचा समतोल कसा साधता यावर तुमची प्रतिकाराची शक्ती ठरते हे साधं तत्त्व मर्दानी खेळांच्या सरावावेळी उलगडते. तलवारीपासून भाल्यापर्यंत कुठलेही शस्त्र घेतले तर त्यात वार कसा करायचा याचे किमान 14 प्रकार पडतात. तलवार हातात धरली तर त्याचा वार शक्यतो थेट असतो. मर्दानी खेळाच्या भाषेत शीरवार, बाजूवार, बगलवार असेही प्रकार येतात.
बैठेवार आणि चोरवारही असतात. ‘वार’ म्हणजे तोडणे. त्यामुळे दुधारी असलेल्या पट्ट्याचा वार आडवाच फिरतो; कारण समोरच्या शत्रूला एका झपाट्यात संपवायचे असते. पट्टा सरळ पकडावा लागतो, तर तलवार सरळ. लांब अंतरावरच्या शत्रूला टिपायचे तर भालाच चांगला, पण भालाफेक केल्यानंतर हाती शस्त्र उरत नाही. त्यामुळे मराठ्यांनी विकसित केलेले शस्त्र म्हणजे विटा.
अस्त्र आणि शस्त्र या दोन्ही प्रकारांत ते वापरता येतं. इंग्रजांच्या काळात या शस्त्राला गौरवले गेले. लांब अंतरावरच्या शत्रूला टिपून पुन्हा फिरून आपल्या हाती येणारे हे शस्त्र. पन्हाळगडावर वीर शिवा काशीद यांच्या उभारलेल्या पुतळ्याच्या हातीही हेच शस्त्र आहे. यात फेक अचूक लागते, अन्यथा ते बुमरँग होण्याची शक्यता असते. हे शिवकालीन शस्त्रभांडार आजही जपले आहे. हे सारे शिकवले जाते, ते मर्दानी खेळांमध्ये.
अर्थात, प्राचीन युद्धकला किंवा स्वसंरक्षण, बलोपासनेचा मुख्य उद्देश म्हणून. कालानुरूप मर्दानी खेळाच्या प्रकारात बदल झाले. शस्त्र वापरण्यास बंदी असल्याने ढाल-तलवारीऐवजी फरीदगा आला. लढाईचे प्रत्यंत्तर देणाऱ्या, अचूकतेचा मंत्र देणाऱ्या, तलवारीने लिंबू कापण्याच्या प्रकारानेही मूळ धरले. झोपलेल्या मावळ्याच्या मानेवर खाऊचे पान ठेवून त्याचे तलवारीच्या पात्याने अचूक तुकडे करण्याचा प्रकारही थरारक असतो.
केरळचा कल्लरीपयटू, तमिळनाडूचा सिलंबम, पाठोपाठ महाराष्ट्रातील कोल्हापुरात शिवकालीन युद्धकलेचे (मर्दानी खेळ) बीज जोमाने अंकुरले आहे. शहरातील काही तालमींपुरत्या मर्यादित राहिलेल्या शिवकालीन युद्धकलेचे लोण आता सर्वत्र पसरले आहे. शिबिर म्हटले, की लाठी-काठीचा समावेश ठरलेला, असेच चित्र दिसू लागले आहे.
यानिमित्ताने शरीरासाठी उत्तम व्यायाम असलेल्या युद्धकला प्रशिक्षणाला पुन्हा सोनेरी दिवस आले आहेत. शालेय स्तरावर नियमांच्या भक्कम बांधणीत खेळाच्या स्पर्धा झाल्या तर शिवकालीन युद्धकला महाराष्ट्राचा खेळ म्हणून पुढे येऊ शकेल.
महाराष्ट्राचा युद्धकला प्रकार म्हणून शिवकालीन युद्धकलेचे वेड कोल्हापुरात जपले गेले आहे. महाकाली, खंडोबा-वेताळ, नंगीवली, सुबराव गवळी, सणगर-बोडके, धोत्री, जय जवान फेकणे मंडळ, मर्दानी खेळाच्या आखाड्याने ही युद्धकला टिकवून ठेवली. वस्ताद शामराव जाधव, आनंदराव ठोंबरे, बाबासाहेब तिबिले, निवृत्ती पोवार, बाबासाहेब लबेकरी यांनी या कलेचे धडे नव्या पिढीला दिले. मध्यंतरीच्या काळात मोजक्याच तालमीत ही युद्धकला जिवंत राहिली.
जंगल-आदिवासींचं अतूट नातं… आदिगुंजन’ (मरमर्स ऑफ द जंगल)
एकीकडे जगाची तांत्रिक प्रगती, विज्ञानाची झेप, मुक्त बाजारपेठ, अर्थव्यवस्थेतून जागतिक खेडे बनण्याच्या दिशेनं मानवाची चाललेली तगमग आणि दुसरीकडे मृत्यूचं डोक्यावर फिरणारं भीषण सावट.. शेवटी अंत हा मातीमध्येच! मग ही सर्व धडपड का? हे प्रश्न मनाला घुसळून काढत असताना आदिवासी समूहाचे निसर्ग, मानव, परमेश्वर आणि मृत्यू यांबद्दलचे विचार खूप नावीन्यपूर्ण आणि सखोल वाटले. मिथकांकडे जडवादी दृष्टिकोनातून बघायला गेलो तर ती अंधश्रद्धा ठरतात आणि चैतन्यवादातून बघितलं तर ती अद्भुततेकडे जातात.
पण या दोन्ही तत्त्वचिंतनातील विचारप्रवाहांतून मिथकांकडे मला बघायचं नव्हतं. तर त्या मिथकांमागील कथा, सामाजिक जाणिवा, आणि रुपक ही मला मानववंश शास्त्रातील प्रवासामधला एक अविभाज्य घटक म्हणून समजून घ्यायची होती. या मिथकांच्या मुळाशी जाणे म्हणजे आदिवासी समूहाच्या हजारो वर्षांच्या जडण घडणीचा इतिहास उलगडण्याचा प्रयत्न करणे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणजे सोहेल वैद्य यांची राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त डॉक्टुमेंट्री ‘आदिगुंजन’ (मरमर्स ऑफ द जंगल)...

('आदिगुंजन' या डॉक्युमेंट्रीचे दिग्दर्शक सोहेल वैद्य)
दिग्दर्शक सोहेल वैद्य सांगतात, महाराष्ट्राच्या पश्चिम प्रदेशातील डोंगरांमध्ये, दऱ्या-खोऱ्यांत, घनदाट जंगलांमध्ये काही आदिवासी समूहांचं अस्तित्व आहे. त्यांच्याशी झालेल्या संभाषणामधून निसर्ग, मानव आणि परमेश्वर यांच्या नात्याचा नव्याने विचार होत गेला. या साऱ्यांतूनच कळत - नकळतपणे ‘आदिगुंजन’ (मरमर्स ऑफ द जंगल) या डॉक्युमेण्ट्रीची सुरुवात झाली होती.
जंगल आणि माणूस यांचे अतूट नातं आहे. ते पुरातन काळापासून चालत आले. जंगलाशी आपलं नातं काय? हे उलगडून दाखविण्यासाठी आदिवासी भागात जाऊन अतिशय कठीण परिस्थितीमध्ये माहितीपट शूट केला. तेव्हा कोणाचाही पाठिंबा नव्हता. पैसे नव्हते, पण विषय अत्यंत महत्त्वाचा होता आणि मला तो करायचा होता, म्हणून 'मर्मर्स ऑफ दी जंगल' हा माहितीपट बनवला. त्याला राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळाला, हे माझ्यासाठी प्रेरणादायी आहे, अशा भावना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक सोहिल वैद्य याने व्यक्त केल्या.
अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी (दि.16) झाली. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील पहिले ग्रैंड प्रिक्स पारितोषिक मिळविणारा पुण्याचा तरुण चित्रपट दिग्दर्शक सोहिल याच्या 'मर्मर्स ऑफ दी जंगल' (आदिगुंजन) या लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. तसेच या लघुपटाने सर्वोत्कृष्ट नरेशनच्या पुरस्कारावरदेखील आपले नाव कोरले.
या लघुपटाची निवड भारतातील इफी, रॉटरडॅम या आंतरारष्ट्रीय चित्रपट महोत्सवासह अनेक प्रतिष्ठित महोत्सवांमध्ये झाली. सोहिल वैद्य हे मूळचे पुण्याचे असून, ते सध्या अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे वास्तव्यास आहेत. ते लॉस एंजेलिस येथील जगप्रसिद्ध यू, एस. सी. फिल्म स्कूलच माजी विद्यार्थी असून, त्यांनी तेथून चित्रपट दिग्दर्शनाची एम.एफ.ए. ही पदवी प्राप्त केली.
या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सोहिल म्हणाले, 'महादेव कोळी हा आदिवासी समाज महाराष्ट्राच्या पश्चिम घाटावरील घनदाट जंगलात वास्तव्य करतो. या आदिवासी समाजाची मुळे, त्यांच्या श्रद्धा, समजुती हे हजारो वर्षांपासूनचे प्राचीन संचित आहे. त्यांच्या पूर्वजांच्या कथा या पिढ्यानपिढ्या चालत दंतकथा बनत आलेल्या आहेत. त्यांच्या वर्तमान जीवनाचे त्यांच्या भूतकाळाशी काय नाते आहे, त्याचा शोध घेत गेलो.
त्यांच्या निसर्गाशी असलेल्या एकरूपतेचे मला कुतूहलनिर्माण झाले. त्यांच्या दृष्टीने जंगल म्हणजे काय? त्यांचे जगणे आणि जंगल या दोन भिन्न गोष्ठी आहेत? का एकच आहेत? निरीक्षक आणि निरीक्षण याबद्दलचे प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान इथे महत्त्वाची भूमिका बजावते. जड वस्तू वस्तू ही मनाशिवाय अस्तित्वात येऊ शकते? जंगल हे जड असेल तर मानवी निरिक्षणाशिवाय ते अस्तित्वात येऊ शकते का? याचा शोध म्हणजे 'आदिगुंजन' हा लघुपट होय."






