- डॉ. तेजस चव्हाण
केंद्र सरकारच्या वतीने नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. यंदाचे 98वे आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासिका तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे सुरू आहे. याआधी 1954 मध्ये 37वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे तर्कतीर्थ लक्ष्मीणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले होते. आता सत्तर वर्षांनंतर पुन्हा एकदा दिल्लीमध्ये मराठी निनादतेय.
देशातील बहुतांश मोठी शहरे राज्यांमध्ये स्थित आहेत. त्या-त्या शहरांना विशिष्ट अशी सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. मुंबई, चेन्नई, बंगळुरू, कोलकाता सारख्या महानगरांना त्या-त्या राज्यांच्या सामाजिक-सांस्कृतिक, वैचारिक पर्यावरणाचा आधार लाभला आहे. परंतु, दिल्ली मात्र याला अपवाद आहे. दिल्लीचा सांस्कृतिक चेहरा हा बहुआयामी आहे. दिल्लीची स्वतःची म्हणून कोणतीच खास ओळख नाही किंवा तिचा स्वतःचा असा कोणताच आवाज नाही. देशाच्या कानाकोपऱ्यातून इथे येऊन स्थिरस्थावर झालेल्या लोकांची संख्या मोठी आहे.
काही काळ दिल्लीत राहून परत आपल्या मूळ ठिकाणांवर परतणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. दिल्लीत येणाऱ्या-जाणाऱ्या या सगळ्या लोकांनी आपल्या कुवतीनुसार आपापली संस्कृती इथे तगवण्याचे काम केले आहे. त्यामुळे दिल्लीला स्वतःची अशी कोणतीही खास सांस्कृतिक ओळख जरी नसली तरी तिला सर्वसमावेशक, बहुविध, बहुभाषिक परिप्रेक्ष्य लाभलेला आहे. जो वैचारिक अदानप्रदानासाठी आणि समाजाच्या शाश्वत विकासासाठी नेहमीच पूरक ठरला आहे.
बोलींच्या मेळ्यात मराठीचा आरव
देशभराच्या कानाकोपऱ्यांतून नोकरी-उद्योग-शिक्षण उदरनिर्वाह आणि इतर बऱ्याच कारणांसाठी लोकांचा सतत दिल्लीत राबता असतो. विशेषतः उत्तर भारतासाठी आणि पूर्वेकडील राज्यांसाठी दिल्ली हे सोईचे आणि केंद्रवर्ती शहर आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये त्यांची वर्दळ अधिक असणे स्वाभाविक आहे. जसे आपल्या मराठी लोकांना मुंबई पुण्याबद्दल आकर्षण असते अगदी तसेच त्यांच्या मनात दिल्लीबद्दल आकर्षण आहे. शिक्षणाच्या उत्तम संधी उपलब्ध करून देणारे केंद्रवर्ती ठिकाण म्हणूनही दिल्लीकडे पाहिले जाते.
उत्तर भारतासह पूर्वेकडील राज्यातील, दक्षिण आशियायी देशांसह जगभरातील लहानमोठ्या देशातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी दिल्लीत येत असतात. आपल्या देशातील असा कोणताच जिल्हा नसावा जेथील व्यक्ती दिल्लीत वास्तव्यास नसेल. यामुळेच दिल्लीची एक बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक शहर अशी ओळख तयार झाली आहे. देशभरातील जवळपास सगळ्याच भाषा आणि बहुतांश सगळ्याच बोलींचे आवाज दिल्लीत कानावर पडतात. याला मराठीही अपवाद नाही.
आपल्याकडे दिल्लीचे नाव निघते, ते केवळ राजकारणाच्या संदर्भाने. याशिवाय तरुणांमध्ये दिल्लीचे आकर्षण असते ते स्पर्धा परीक्षांच्या निमित्ताने. युपीएससीची तयारी करायची असेल तर दिल्लीशिवाय दुसरा पर्याय नाही, हे ओळखून अनेक तरुण नशीब आजमावण्यासाठी दिल्लीची वाट धरतात. भिन्न आर्थिक स्तरांतून, निरनिराळ्या सामाजिक-सांस्कृतिक पर्यावरणातून आलेली ही तरुण मुलं दिल्लीतील हाडे गोठवणाऱ्या थंडीत आणि जीव कासावीस करणाऱ्या उकाड्यात तग धरून राहतात. इथल्या अनोळखी पर्यावरणाशी जुळवून घेताना धडपडतात.
मुखर्जीनगर आणि राजेंद्रनगरच्या रस्त्यांवर ओळखीचे मराठी स्वर कानावर पडत असतात. चांदणी चौक, करोल बागसह महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये विशेषतः सांगली जिल्ह्यातील विटा-खानापूर परिसरातील मराठी कानावर पडते. गलई कामाच्या निमित्ताने दिल्लीत स्थिरस्थावर झालेल्या विटा-खानापूर परिसरातील सोने-चांदी दुकानदारांचे हे आवाज असतात. या शिवाय नागपूरसह विदर्भातील अनेक लोक व्यवसाय व रोजगाराच्या निमित्ताने दिल्लीत स्थायिक झालेले दिसतात.
प्रशासकीय सेवांमध्ये कार्यरत असणाऱ्या मराठी अधिकाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. सुप्रीम कोर्टातील न्यायालयीन कामकाजामध्येही मराठी लोकांचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे. या सगळ्या दिल्लीकर मराठी गोतावळ्याला एकत्र येण्यासाठी काहीतरी निमित्त हवे असते. गणेशोत्सव, दिवाळी पहाट आणि आषाढी वारी या नैमित्तिक कारणांनी हे दिल्लीकर मराठी जन एकत्र येतात आणि काही क्षणांसाठी का होईना अवघे मराठीमय होऊन जातात.
नवी दिल्लीमध्ये गेले अनेक वर्षे वनिता समाजही मराठी भाषा संवर्धनासाठी सतत नवनव्या उपक्रमांचे आयोजन करत असतो. या मंडळाच्या वतीने लोधी रोड परिसरात वनिता समाज बालवाडी स्कूल चालवली जाते. तसेच पहाडगंज परिसरातील नूतन मराठी सिनियर सेकंडरी स्कूलही आहे. जिथे मराठी शब्द कानी पडतात.
या शिवाय दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्येही मराठी सतत वाहत असते. तिच्या निनादात महाराष्ट्रातील नदी झऱ्यांचा आवाज झिरपत असतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतील नेत्यांचा, मुंबईतील मंत्रालयातून ये-जा करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा, पत्रकार मंडळींचा या सदनात सतत राबता असतो.
दिल्लीमध्ये राहणारे मराठी आणि अमराठी लोकही अधूनमधून महाराष्ट्रीय व्यंजनांची चव चाखण्यासाठी महाराष्ट्र सदनात जातात. तेथे त्यांच्या असुसलेल्या कानांवर रसाळ मऱ्हाठीतील गुजगोष्टी, गप्पाटप्पा पडतात आणि साक्षात त्यांना संत ज्ञानदेवांनी म्हटल्याप्रमाणे 'ऐका रसाळपणाचिया लोभा। श्रवणींचि होती जिभा।।' असा अनुभव येतो.
विद्यापीठातली मराठी
ही झाली, दिल्लीतील मराठीची ओळख. याशिवाय आणखी एका कारणाने दिल्लीमध्ये मराठी भाषा तग धरून आहे. ते कारण म्हणजे, दिल्ली विद्यापीठ होय. आपल्याकडे दिल्लीतील विद्यापीठ म्हटले की जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात जेएनयू डोळ्यांसमोर येते. मात्र 'दिल्ली विद्यापीठ' नावाचे 102 वर्षे जुने एक नामांकित केंद्रीय विद्यापीठ दिल्लीत स्थित आहे, हेच अनेकांना ठाऊक नसते.
दिल्लीतील 91 संलग्नित महाविद्यालये, 16 ज्ञानशाखा (संकाय /फकल्टी), 86 अकॅडेमिक विभाग आणि 5 मान्यता प्राप्त संस्थाने इतका मोठा पसारा असणाऱ्या दिल्ली विद्यापीठातील आधुनिक भारतीय भाषा आणि साहित्य अध्ययन विभागाने गेल्या 63 वर्षांपासून मराठी भाषेला तगवून ठेवले आहे.
दिल्ली विद्यापीठातील आधुनिक भारतीय भाषा आणि साहित्य अध्ययन विभाग ओळला जातो, तो 'मॉडर्न इंडियन लँग्वेजेस अँड लिटररी स्टडिज' या नावाने. विद्यापीठामध्ये मात्र सर्वांच्या तोंडात 'एमआयएल' हे लघुरूपच रुळलेले आहे. कला संकायातील ट्युटोरियल बिल्डिंगमध्ये असणाऱ्या या छोटेखानी विभागामध्ये भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये सूचिबद्ध करण्यात आलेल्या भाषांपैकी अकरा भाषा शिकवल्या जातात.
देशाच्या कानाकोपऱ्यांतून दिल्लीमध्ये शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि रोजगार व्यावसायाच्या निमित्ताने भाषा शिकू पाहणाऱ्या इतरेजनांना एकाच छत्राखाली अनेक भारतीय भाषा शिकता याव्यात, या उद्देशाने सन 1961 मध्ये एमआयएल विभागाची स्थापना करण्यात आली होती. विद्यापीठामध्ये हिंदी, पंजाबी, संस्कृत, उर्दूसह पर्शियन, इंग्रजी, आरेबिक भाषांचे स्वतंत्र विभाग असल्यामुळे या भाषांशिवाय उरलेल्या भारतीय भाषांचा समावेश एमआयएल विभागात करण्यात आला होता.
सुरुवातीस सर्टिफिकेट, डिप्लोमा व ॲडव्हान्स डिप्लोमा अशा तीन वर्षांच्या कोर्सेसमध्ये भाषांचे अध्यापन केले जात असे. जे आजही केले जाते. आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, मणिपुरी, ओडिया, सिंधी, तमीळ आणि तेलुगु या अकरा भाषांमधून हे अभ्यासक्रम शिकवले जातात. विभागाच्या स्थापनेनंतर दुसऱ्याच वर्षापासून बंगाली आणि तमीळ या दोन भाषांतून पदव्युत्तर (एम.ए.) वर्गाची सुरुवात झाली. आजही विभागामध्ये अकरा भाषांच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमासह बंगाली व तमीळ या दोन भाषांतून पदव्युतर (एम.ए.) शिक्षण घेता येते.
भाषा विभागातले मराठीचे स्थान
आपल्याकडे बऱ्याच लोकांना दिल्ली विद्यापीठामध्ये स्वतंत्र मराठी विभाग आहे, असे वाटते. मात्र तसा कोणताही स्वतंत्र मराठी विभाग दिल्ली विद्यापीठामध्ये नाही. येथील मराठी भाषा अध्ययन-अध्यापनाचे स्वरूपही पूर्णतः निराळे आहे. आधुनिक भारतीय भाषा विभागाच्या स्थापनेनंतर सुरुवातीस या विभागामध्ये करंदीकर दांपत्य मराठीचे अध्यापन करत असे. किंबहुना, सन 1978 पासून 2008 पर्यंत प्रो. निशिकांत मिरजकर आणि त्यांच्या पत्नी प्रो. ललिता मिरजकर या दांपत्याने सलग तीस वर्षे मराठी विषयाचे अध्यापन केले.
निशिकांत मिरजकरांना सहा वर्षे विभागप्रमुख आणि तीन वर्षे कला संकायचे अधिष्ठाता (डीन) म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या काळात त्यांनी विभागामध्ये एक मोलाची भर घातली. ती म्हणजे त्यांनी एम.ए. सीआयएल (Comparative Indian Leatrature) या नव्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची ओळख विभागास करून दिली. त्याआधी आर. के. दासगुप्ता यांनी विभागप्रमुख असताना विभागामध्ये 'तौलनिक भारतीय साहित्य' या एम.लिट्. अभ्यासक्रमाची सुरुवात केली होती.
पुढे 1978 मध्ये त्याचे एम.फील. च्या अभ्यासक्रमात रूपांतर झाले. मात्र तुलनात्मक अभ्यासाची तात्त्विक ओळख करून देणाऱ्या पदव्युत्तर अभ्यासक्रम विभागात सुरू व्हावा, अशी सर्वांची इच्छा होती. त्यानुसार मिरजकर सरांनी पुढाकार घेत 1994 मध्ये एम.ए. सीआयएल अभ्यासक्रमाची सुरुवात केली.
एम.ए. सीआयएल हा पदव्युत्तर अभ्यासक्रम इंग्रजी भाषेत शिकवला जातो. या अभ्यासक्रमासाठी इंग्रजी विषयातून पदवीचे शिक्षण घेतलेले विद्यार्थी प्रवेश घेतात. भारतातील बहुतांश भाषांतील ग्रंथ इंग्रजी भाषेत अनुवादित केलेले असतात.
तौलनिक दृष्टीने दोन भाषांतील साहित्यकृतींचा अभ्यास करायचा असेल तर इंग्रजी हीच एकमेव उत्तम माध्यम भाषा आहे. तेव्हा एम.ए. सीआयएल अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना तुलनात्मक दृष्टिकोनातून समग्र भारतीय साहित्य शिकवले जाते. भारतीय साहित्यातील महत्त्वाच्या घटना, प्रवृत्ती, वळणे, चळवळी इत्यादींची ओळख करून दिली जाते. विविध भारतीय भाषांतून इंग्रजीत अनुवादित झालेल्या साहित्यकृती शिकवल्या जातात. ज्यामध्ये मराठी साहित्याचाही समावेश आहे.
महाराष्ट्रातील भक्ती चळवळ, दलित चळवळ, नाट्य चळवळ; यासह मराठीतून इंग्रजीत अनुवादित झालेल्या महत्त्वाच्या कादंबऱ्या, नाटके व काही महत्त्वाच्या साहित्यकृतींचा परिचय विद्यार्थ्यांना याद्वारे होतो. पुढे हेच विद्यार्थी पीएच. डी. साठी तुलनात्मक दृष्टिकोनातून संशोधन करतात. प्रो. निशिकांत आणि प्रो. ललिता मिरजकर या दांपत्याने अनेक अमराठी विद्यार्थ्यांकडून मराठी साहित्याशी निगडीत तौलनिक दृष्टिकोनातून संशोधन करवून घेतले आहे. विभागामध्ये इतरही भारतीय भाषांतील विषय निवडून त्यामध्ये संशोधन करता येते. मात्र अशा संशोधनासाठी विद्यार्थी आपली राज्ये व तेथील स्थानिक विद्यापीठे सोडून दिल्लीत येत नाहीत.
एक तर विशिष्ट स्थानिक भाषांमध्ये संशोधन करायचे असेल तर तसे अनुकूल अकादमिक वातावरण त्या-त्या भाषिक राज्यातच अधिक चांगले असू शकते. मुबलक संदर्भ साधने, साहित्यविषयक चर्चासत्रे, कार्यशाळा, अनुषंगिक उपक्रम त्या-त्या भाषिक पर्यावरणात सहज उपलब्ध होऊ शकतात. दिल्लीमध्ये या सगळ्यास मर्यादा आहेत. त्यामुळेच एमआयएल विभागामध्ये भारतीय भाषांतून प्रबंधलेखन खूपच कमी प्रमाणात होते. यास मराठीही अपवाद नाही.
अलीकडच्या दोन-तीन वर्षांमध्ये विद्यापीठाशी संलग्नित असणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना भाषा शिकण्याची एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. 'एनईपी-2020' या नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंगीकारानंतर विद्यापीठाने एईसी (Ability Enhancement Course) अंतर्गत भाषा, साहित्य, पर्यावरण विज्ञान आणि श्वाश्वत विकास या विषयांना केंद्रवर्ती ठेवत काही अभ्यासक्रमांची निर्मिती केलेली आहे.
ज्यामध्ये पदवी शिक्षणाच्या पहिल्या व दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना एईसी अंतर्गत चार क्रेडिटसाठी कोणत्याही दोन वैकल्पिक सत्रांमध्ये भाषा शिकता येतात. सध्या एमआयएल विभागाने पुढाकार घेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन / ऑफलाइन माध्यमांद्वारे एईसी अंतर्गत 17 भाषांचे अभ्यासक्रम उपलब्ध करून दिलेले आहेत. ज्यामध्ये मराठीचाही समावेश आहे.
आधी म्हटल्याप्रमाणे दिल्ली विद्यापीठामध्ये स्वतंत्र मराठी विभाग नाही. तसेच विद्यापीठामध्ये किंवा विद्यापीठाशी संलग्नित असणाऱ्या कोणत्याही महाविद्यालयात मराठी भाषा विषयातून पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकण्याची सोय उपलब्ध नाही. आधुनिक भारतीय भाषा अध्ययन विभागामध्ये शिकवल्या जाणाऱ्या भाषांपैकी केवळ बंगाली, तमीळ आणि तेलुगु या तीनच विषयांचे पदवी अभ्यासक्रम एखाद-दुसऱ्या महाविद्यालयात शिकवले जातात. यामागचे कारण म्हणजे अल्पसंख्याक भाषिक समुदाय होय.
मराठीबाबत बोलायचे झाले, तर दिल्लीमध्ये मराठी भाषकांची संख्या ही खूपच कमी आहे. तसेच जे काही मोजके मराठी विद्यार्थी महाराष्ट्रातून दिल्लीकडे शिकण्यासाठी येतात ते पारंपरिक अभ्यासक्रमांहून काहीतरी वेगळे शिकण्यासाठी आलेले असतात. त्यांना मराठी भाषेत विशेष रस नसतो.
तसेच ज्या विद्यार्थ्यांना मराठी विषयातून पदवी-पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करायचे आहे, ते महाराष्ट्राच महाविद्यालयात किंवा विद्यापीठांतील मराठी विभागात प्रवेश घेतात. त्यामुळे खास मराठी भाषा शिकण्यासाठी दिल्लीकडे कुणीच येत नाही.
अतिशय कमी विद्यार्थी संख्या असल्यामुळे मराठीसह इतर भारतीय भाषांतून बी.ए. आणि एम.ए.चे अभ्यासक्रम एमआयएल विभागाच्या वतीने अजून तरी तयार करण्यात आलेले नाहीत. परंतु, अलीकडच्या दोन-तीन वर्षात विद्यार्थ्यांना भाषा शिकता याव्यात म्हणून एईसी अंतर्गत काही अभ्यासपत्रिकांची निर्मिती करण्यात आलेली आहे. बेसिक मराठी, इंटरमिडिएट मराठी या दोन अभ्यासपत्रिकांद्वारे विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरावरील मराठीची ओळख करून देण्यात येते.
या अभ्यासपत्रिकांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी पूर्वी कधीही मराठी भाषेचे अध्ययन केलेले नसते. मात्र असे काही विद्यार्थी असतात ज्यांनी नवोदय विद्यालयातून, केंद्रीय विद्यालयांतून किंवा महाराष्ट्रामध्ये शिक्षण घेत असताना इयत्ता आठवी, दहावी किंवा बारावीपर्यंत मराठी भाषा शिकलेली असते. अशा विद्यार्थ्यांसाठी ट्रान्सलेशन अँड इंटरप्रिटेशन इन मराठी आणि जर्नलिस्टिक रायटिंग इन मराठी या दोन अभ्यासपत्रिका शिकवल्या जातात.
ज्यामध्ये अनुवाद म्हणजे काय, अनुवादाचे महत्त्व काय आणि पत्रकारिता म्हणजे काय, पत्रकारितेचे स्वरूप काय असते, या अंगाने काही मूलभूत गोष्टींची ओळख करून देण्यात येते. पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ओपन इलेक्टिव्ह (OE) अभ्यासपत्रिकेअंतर्गत तिसऱ्या व चौथ्या सत्रामध्ये मराठी विषय शिकता येतो. याही अभ्यासपत्रिकेचे स्वरूप प्राथमिक स्तरावर मराठी भाषेची ओळख करून घेणे, असेच आहे.
मराठी भाषा शिकणारे कोण आहेत ?
इथपर्यंत आपण मराठी भाषेच्या अभ्यासक्रमाचे स्वरूप विचारात घेतले. आता मराठी शिकणारे विद्यार्थी कोण आहेत आणि ते मराठी का शिकतात, हेही थोडक्यात जाणून घेऊया. मराठी शिकणाऱ्यांमध्ये उत्तर भारतीय विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. तुलनेत पूर्व भारतातील आणि दक्षिण भारतातील विद्यार्थ्यांची संख्या खूपच कमी आहे.
त्यामागील कारणेही काहीशी विचारप्रवृत्त करायला लावणारी आहेत. एक म्हणजे, लिपी आणि दुसरे उच्चारातील वेगळेपण. हिंदी भाषिकांना मराठी अधिक जवळची वाटते ती लिपीमुळे. देवनागरी लिपी उत्तर भारतीयांना परिचयाची असल्याने मराठी वाचण्यापुरता आत्मविश्वास त्यांच्याजवळ आधीच असतो.
तुलनेत दक्षिण भारतातील तमीळ, तेलुगु, मल्याळम, कन्नड किंवा पूर्वेकडील बंगाली, आसामी, मणिपुरी या भाषा शिकण्याची सुरुवात लिपी शिकण्यापासून करावी लागते. लिपीसह या भाषांची उच्चारवैशिष्ट्ये काहीशी वेगळी असतात. त्यामुळे ती समजून घेण्यासाठी विशेष परिश्रम घ्यावे लागतात. त्या तुलनेत मराठीची उच्चारण स्थाने उत्तर भारतातील विद्यार्थ्यांना जवळची व सोपी वाटतात. परिणामी हिंदी पट्ट्यातील विद्यार्थ्यांचा मराठीकडे येण्याचा कल अधिक असतो.
हिंदी चित्रपटसृष्टी हे आणखी एक महत्त्वाचे कारण इतर विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेचे आकर्षण असण्यामागे आहे. चित्रपट, वेबसिरीज आणि हिंदी मालिकांमध्ये वारंवार मराठी संवाद ऐकायला येतात. त्यामुळेही आम्हाला मराठी शिकावीशी वाटते, असे अनेक विद्यार्थ्यांचे म्हणणे असते.
मराठी भाषा आली तर पुढे-मागे आपल्याला मुंबईमध्ये करियर करता येईल आणि संधी मिळालीच तर हिंदी चित्रपट किंवा नाट्य क्षेत्रातही करियर करता येईल, असे काही विद्यार्थ्यांना वाटते. एक विद्यार्थी तर चक्क मराठीतील रॅप साँगच्या प्रेमापोटी मराठी शिकत असल्याचे ऐकून आश्चर्य वाटले. बहुतेक विद्यार्थ्यांना 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेमुळे मराठी शिकण्याची इच्छा झाल्याचे ऐकून नवलही वाटले.
मनोरंजनचा भाग म्हणून मराठीकडे आकर्षित झालेले काही विद्यार्थी असले तरी त्यांची संख्या खूपच जमतेम आहे. काही विद्यार्थी मात्र गंभीर कारणांसाठी मराठीकडे वळलेले दिसतात. महात्मा जोतिबा फुले, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इत्यादी राष्ट्रीय स्तरावर ठाऊक असणाऱ्या महाराष्ट्रातील विचारवंतांनी आपले लेखन मराठी भाषेत केले आहे. हे मूळ लेखन जाणून घेण्याच्या उद्देशानेही अनेक विद्यार्थी मराठी शिकत असतात. काही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील वैचारिक चळवळी जाणून घ्यायच्या असतात.
बारापबोरलांग हा मेघालयचा विद्यार्थी श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये अर्थशास्त्रातून ऑनर्स पदवीचे शिक्षण घेत आहे. तो म्हणतो, भविष्यात मला करियरच्या दृष्टीने मुंबईमध्ये जायचे आहे. त्यासाठी मी मराठी शिकत आहे. तर चारुमुर्थी ही तमीळ विद्यार्थिनी आधीपासून हिंदी जाणते. तिला आता केवळ एक नवी भाषा म्हणून मराठी शिकायची आहे.
दिल्लीतील अमराठी विद्यार्थ्यांचे मराठी शिकण्यामागे आणखी एक आगळे कारण पहायला मिळते. ते म्हणजे, काही विद्यार्थ्यांचे आजी-अजोबा, पणजी-पणजोबा किंवा पूर्वज मराठी असतात किंवा नात्यातील कुणीतरी मराठी असते. मग घरात त्यांच्या-त्यांच्या मातृभाषांत, तर कधी हिंदीत, तर कधी मराठीतील संवाद त्यांच्या कानावर पडत असतात.
मग अनोळखी मराठीतील शब्द, वाक्य यांचा अर्थ जाणून घेण्याबद्दल या विद्यार्थ्यांच्या मनात कुतूहल असते. बाहेर वावरताना हिंदी आणि शाळा-महाविद्यालयात इंग्रजीचा वापर होत असल्यामुळे मराठीबद्दल नवे काहीच जाणून घेता येत नाही. आपल्या आई-वडिलांची, आजी अजोबांची, नातलगांची भाषा आपल्यालाही कळावी, किमान ते काय बोलतात हे कळावे, या उद्देशानेही काही विद्यार्थी मराठी भाषेकडे आकृष्ट होतात.
काही विद्याथ्यर्थ्यांनी आईवडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने किंवा नवोदय विद्यालयामध्ये शिकत असताना काही काळासाठी महाराष्ट्रामध्ये वास्तव्य केलेले असते. माध्यमिक शिक्षणादरम्यान त्यांनी एक-दोन वर्षासाठी मराठी शिकलेली असते. त्यांना मराठी कळत असते, मात्र मराठीत बोलण्याइतका आत्मविश्वास त्यांच्याजवळ नसतो. त्यामुळे पुन्हा एकदा मराठीशी जोडून घेत अजून चांगली मराठी शिकता येईल, या उद्देशानेही अनेक विद्यार्थी मराठीकडे येतात.
मराठीसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय असते. त्यांच्या मराठीकडे आकृष्ट होण्यामागे दुहेरी कारण असावे. एक भावनिक आणि दुसरे व्यावसायिक. भावनिक कारण म्हणजे, या विद्यार्थ्यांच्या नातलगातील कुणी तरी रोजगारानिमित्त महाराष्ट्रात वास्तव्यास असते.
आपले नातलग ज्या भाषिक प्रदेशात आहेत, तेथील भाषा आपणही शिकावी, तेथील संस्कृती समजून घ्यावी, या उद्देशाने अनेक विद्यार्थी मराठीकडे आकर्षित होतात. तर काहींना भविष्यात करियरसाठी, रोजगारासाठी महाराष्ट्र खुणावत असतो. भविष्याची पूर्वतयारी म्हणूनही ते मराठी विषयाकडे येतात. या विद्यार्थ्यांचा मनातील मराठी भाषेबद्दलची ओढ आत्मीय व सहृद स्वरूपाची असते.
काही विद्यार्थ्यांचे मराठी शिकण्यामागील कारण गंमतीशीर असते. मित्र-मैत्रिणी मराठी आहेत. त्यांचे बोलणे समजावे, त्यांची संस्कृती समजावी, त्यांच्याशी त्यांच्या कुटुंबियांशी मराठीत संवाद साधता यावा, म्हणूनही काही विद्यार्थी मराठी शिकतात. वरवर पाहता हे कारण अगदीच उथळ वाटते.
मात्र त्या निमित्ताने एका भाषिक समूहाला समजून घेण्याचा गर्भित उद्देश या विद्यार्थ्यांच्या भाषा शिकण्यामागे दिसतो. अलीकडच्या काळात सोशल मीडियामुळे भाषिक अंतर खूपच कमी झाले आहे. युट्युब किंवा काही ॲपच्या माध्यमातूनही ऑनलाइन भाषा शिकता येतात. मात्र तरीही या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्गात हजर राहून भाषा शिकायला आवडते.
भाषा नव्हे संचित
दिल्लीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना सतत एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे, येथे शिकणारे विद्यार्थी केवळ परीक्षेसाठी नाईलाज म्हणून भाषा विषय निवडत नाहीत किंवा केवळ गुण मिळवण्यासाठी भाषा विषय शिकत नाहीत. तर आपल्या भविष्यासाठीचे संचित म्हणून ते भाषांकडे पाहतात. एखादी भाषा शिकल्यानंतर आपसूकच आपण त्या भाषेतील ज्ञान संचितापर्यंत पोहचू, याचा विश्वास त्यांच्या जिज्ञासेमागे असतो.
मराठीची ओढ
आता या चर्चेच्या शेवटी येथील सर्टिफिकेट, डिप्लोमा आणि ॲडव्हान्स डिप्लोमा अभ्यासक्रमांबद्दल थोडेसे. आधी म्हटल्यानुसार या विभागाची स्थापनाच केवळ भारतीय भाषांतील अभ्यासक्रम सर्टिफिकेट, डिप्लोमा आणि ॲडव्हान्स डिप्लोमा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी झाली आहे.
तेव्हा या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जमतेमच असते. मिरजकर दांपत्य सेवानिवृत्त झाल्यापासून जवळपास सोळा-सतरा वर्षापासून विभागामध्ये मराठी भाषेचे अध्यापन थांबलेले होते. जून 2023 पासून ते पुन्हा सुरू झाले आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी वेगवेगळ्या वयोगटातील असतात.
ज्यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी, सुप्रीम कोर्टामध्ये प्रॅक्टिस करणारे वकील, व्यावसायिक, नोकरदार, गृहिणी आणि केवळ आवड म्हणून शिकणाऱ्यांचा समावेशही लक्षणीय असतो. गेल्या वर्षी मराठीसाठी प्रवेश घेतलेली ज्योती ही विद्यार्थिनी इतिहास विषयातून एम.फील.साठी संशोधन करत होती. दलित चळवळीतील एक महत्त्वाचे कार्यकर्ते बी. आर. मोरे यांच्या कार्याबद्दल तिचे संशोधन सुरू होते. तर दुसरे विद्यार्थी रवि कांत शर्मा हे 68 वर्षांचे गृहस्थ केवळ आवड म्हणून मराठी शिकत होते.
त्यांनी याआधी विभागातून आमासी, बंगाली, तमीळ, गुजराती आणि सिंधी भाषा शिकल्या होत्या. यंदा मराठी सर्टिफिकेट अभ्यासक्रमासाठी पाच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यातील तीन विद्यार्थी ॲडव्होकेट असून दिल्लीतील विविध कोर्टामध्ये वकिलीची प्रॅक्टिस करत आहेत. तर कुणी दुकानदार आहे, कुणी व्यवसाय करत आहे. थोडक्यात, अनेक उद्देशांपोटी, अनेक कारणांसाठी मराठी भाषा शिकणाऱ्या लोकांची मराठीकडे ओढ आहे.
निरनिराळ्या भाषिक-सांस्कृतिक पर्यावरणातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या मातृभाषा भिन्न असतात. मराठी भाषा शिकत असताना हे विद्यार्थी आपल्या मातृभाषेच्या भाषिक व्यवस्थेशी व व्याकरणिक नियमांशी तुलना करत मराठी शिकत असतात. त्या अनुषंगाने त्यांच्या मनात अनेक भाषिक, व्याकरणिक प्रश्न निर्माण होतात. अध्यापनादरम्यान मध्येच थांबून ते प्रश्न विचारतात. वरवर साधे वाटणारे विद्यार्थ्यांचे हे प्रश्न भाषाभ्यासकालाही गंभीर चिंतन करायला भाग पाडणारे असतात.
अध्यापनादरम्यान बहुभाषिक विद्यार्थ्यांशी चर्चा करत असताना अनेक नव्या गोष्टी कळतात. आपल्या मराठी संस्कृतीशी, मराठी परंपरांशी मिळत्याजुळत्या अनेक समान गोष्टी त्यांच्याकडेही थोड्याफार फरकाने असल्याने निदर्शनास येते. भारतासारख्या असले, तरी भारतीय म्हणून वाढत आलो आहोत, याचा प्रत्यय क्षणाक्षणाला आल्यावाचून राहत नाही.
(लेखक दिल्ली विद्यापीठात आधुनिक भारतीय भाषा आणि साहित्य अध्ययन विभागात मराठीचे सहाय्यक प्राध्यापक आहेत. )
(साभार - समतावादी मुक्त संवाद, जानेवारी 2025)






