2011 च्या जनगणनेनुसार भारतात 5.6 कोटी लोकांनी भोजपूरी भाषेला आपली मातृभाषा म्हटलं आहे. संख्येनुसार देशातली ही सहाव्या क्रमांकाची भाषा ठरते. बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये बोलली जाणारी भोजपूरी तिच्या लोकगीतं, संगीत यासाठी प्रसिद्ध आहे. भोजपूरी लोकगीतांमध्ये बाळाच्या जन्मापासून लग्न, धान्याची लावणी, कापणी, कामासाठी स्थलांतर असे अनेक विषय आढळतात. याशिवाय छट पूजा गीत, फगुआ, चैता इत्यादी पारंपरिक उत्सवगीतांमुळेही भोजपूरी जगभर प्रसिद्ध आहे.
पण आज भोजपूरी म्हटलं की अश्लील घाणेरड्या चढ्या सूरांतील गाण्यांची आठवणच येते. यातील स्त्रियांवरील घाणेरड्या गोष्टी, चित्रण यामुळे मोठे वाद घडताहेत. अभिनेता आणि राजकीय नेता, रवी किशन याने भोजपूरी भाषेला तिची हरवलेली ओळख देण्यासाठी भोजपूरीला घटनेच्या आठव्या सूचीत सामील करावे म्हणून संसदेत विधेयक सादर केलं आहे. या सूचीत 22 भाषा आहेत, ज्यात बिहारची मैथिली भाषा येते.
दिल्लीत काम करणारे सॉफ्टवेयर इंजिनियर उज्ज्वल त्रिपाठी बिहारचे आहेत. ते सांगतात, “भोजपूरी गाण्यांत जितकी अश्लीलता, थिल्लरता आहे तितकीच ती हिंदी आणि त्याहीपेक्षा जास्त इंग्रजी गाण्यांत असते. पण भोजपूरीवर आरोप केले जातात. याचं कारण म्हणजे भोजपूरीत पैसे नाहीत. चांगल्या कलाकारांकडून गाणे गाऊन घेण्यासाठी, चांगली गीतं लिहिण्याऱ्या गीतकारांना पैसे मिळत नाहीत. त्यामुळे कमी पैशांतले गीतकार अश्लील गाणी लिहून देतात. पण असं नेहमीच नव्हतं. सुरूवातीला भोजपूरीतही चांगलं काम झालेलं आहे.”

‘द हिंदू’ला दिलेल्या मुलाखतीत भोजपूरी गायिका नेहा सिंह राठौर हिने म्हटलं होतं, “भोजपूरी बोलणारे लोक दशकांपासून भाषेला घटनात्मक दर्जा मिळावा म्हणून वाट बघताहेत. जोवर या भाषेतून शिक्षण देणं सुरू होणार नाही, नोकरीसाठी प्रवेश परीक्षा घेतली जाणार नाही, तोवर भोजपूरीला ओळख मिळणार नाही.”
जमुई, बिहारची जूही राज भोजपूरीतील अश्लील गाण्यांविषयी म्हणते, “भोजपूरी गाणे वरच्या बीट्स मध्ये बनवली जातात. यामुळे ही गाणी प्रत्येक लग्नात, पार्टीत वाजवली जातात. त्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळते. याशिवाय यात आजच्या पिढीच्या भाषेतील शब्दांचा उपयोग केला जातो ज्यामुळे त्यांना ती आवडतात. या शब्दांना आमच्या आधीच्या पिढीतील लोकांनी आक्षेप घेतला होता. या गाण्यांच्या प्रसारात सोशल मीडियाचा सर्वांत मोठा हात आहे. लहान मुलंही स्क्रोल करताना भोजपूरी गाणी ऐकतात. अनेकदा भोजपूरीत मुद्दाम थिल्लर गाणी तयार केली जातात ज्याचा उपयोग भोजपूरी संस्कृति वाढवण्यासाठी केला जातो.”
एकीकडे केंद्र सरकारने मुलांना मातृभाषेतून शिक्षण देण्याची योजना सुरू केली आहे ज्यांत 52 भाषा येतात. यात भोजपूरीचा समावेश नाही. भोजपूरीत आधी लोकगीतं, पारंपरिक धून, सांस्कृतिक मूल्यांवर आधारीत गाण्यांची रेलचेल असायची. पण आता अश्लील शब्द असतात, शिव्या असतात. पटना येथे शिकणारी अनामिका मेहता सांगते, “आमच्या हॉस्टेलमध्ये जेव्हा पार्टी असते तेव्हा, भोजपूरी गाणी नक्कीच वाजवली जातात. या गाण्यांची पिच हाय असते ज्यामुळे माहौल भडक होतो. यातील अश्लील भाषेमुळे कोणी ती गाणी बंद करायचं म्हटलं तर त्याच्यावर, याला भोजपूरीचं प्रेम नाही, आपल्या भाषेची इज्जत नाही, गाण्यांची इज्जत नाही असं म्हटलं जातं. गाण्यांमध्ये उघडपणे अश्लीलता असते. यावर मुलंच नाही तर मुलीही नाचतात. ही गाणी कमी शिक्षित लोकांकडून जास्त प्रसारीत केली जातात. शहरात सगळीकडेच ही गाणी वाजवली जात नाहीत. या गाण्यांना विरोध केला जात नाही त्यामुळेही यांची लोकप्रियता वाढत आहे. जर सर्वांनी विरोध केला तर त्याचा काही परिणाम दिसून येईल.”
2017 च्या ‘मिड डे’ मध्ये ‘पिपल लिंग्विस्टिक्स सर्वे अव्ह इंडिया’च्या ११ व्या आवृत्तीच्या निमित्ताने बातमी प्रकाशित झाली होती. यात भोजपूरी भाषेकडे लोकांचा कल जास्त दिसून आला. तिने संथाली (ओरिसा), मिजो (मिझोराम) सहित अनेक भारतीय भाषांना मागे टाकलं होतं. दिल्लीची दीप्ती सहाय गृहिणी आहे. लग्नानंतर ती पतिकडे दिल्लीला राहायला आली. बिहारी असल्यामुळे तिला अनेक गोष्टींशी जुळवून घ्यावं लागलं. ती सांगते, “लग्नानंतर घरच्या सॉफिस्टेकेटेड वातावरणाशी जुळवून घेण्यात मला वेळ लागला.

बिहारमधून आले तेव्हा माझे केस कंबरेच्या खालपर्यंत होते. भाषेत बिहारी लहजा होता. मला लोकगीतं यायची. अपार्टमेंटच्या अनेक बायकांनी या गोष्टी नोटीस केल्या. त्यावरून त्या मला गावंढळ, निरक्षर, गरीब अशा शब्दांनी हिणवायच्या. अजूनही माझ्यासाठी बिहारी बहू हा शब्द वापरला जातो. मी स्वतः भोजपूरी गीतसंगीत आवडीने जपून ठेवलंय. माझ्या पातळीवर प्रयत्न करतेय की याला नवीन ओळख मिळावी. पण सध्याच्या अश्लील आणि थिल्लर गाण्यांनी माझ्या मातृभाषेवर कलंक लावलाय.”
अलिकडेच भारताच्या राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांनी बिहारी लोकगीतं, संगीत, परंपरा यांचं कौतुक केलं होतं. पटना इथे राहणारे भव्य किशोर यांना भोजपूरी गाणी ऐकायला आवडतात. ते सांगतात, “भोजपूरीत अनेक पारंपरिक गीतं येतात. प्रत्येक ऋतूसाठी, उत्सवांसाठी गाणी असायची. आजही जुन्या पिढीजवळ अशी सुंदर गीतं आहेत. पण तरुणांना मात्र थिल्लर गाणी आवडतात. अनेकदा यात जातियताही दिसून येते, उदा. बबुआन, भूमिहार इत्यादी. शिवाय या गाण्यांतून शस्त्रांचं प्रदर्शनही केलं जातं अनेकदा.”
लोकसंगीत बिहारच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. बिहारच्या बाहेर राहणारे बिहारी आजही भोजपूरी गाणी ऐकणंच पसंत करतात. भोजपूरीत स्त्री गीतांचीही समृद्ध परंपरा आहे ज्यात लग्नात शिव्या देणारी गाणीही आहेत. मागील वर्षी विधानसभेत भोजपूरीतील अश्लील गाण्यांचा मुद्दा गाजला होता. त्यांच्यावर बंदी आणण्यासाठी एखादं सेंसॉर बोर्ड असावं अशी मागणी झाली होती. आजही बिहारची रामलीला, नौटंकी, नाटकं प्रसिद्ध आहेत.
भिखारी ठाकूर यांची गीतं, नाटकं मोठ्या प्रमाणात सादर केली जातात. ज्या वेळी ठाकूर यांनी आपल्या गाण्यांमधून समाजातील वाईट प्रथांवर आघात सुरू केले तेव्हा त्यांच्या गाण्यांतील, नाटकांतील विषयांना देशातील म्युझिक इंडस्ट्रीत जागा मिळाली नाही. आजही हिंदी गाण्यांमधून स्त्रिया आणि सामाजिक कुरीतीचे विषय नसतातच.

बिहारची अदिती सिन्हा सांगते, “माझी रुममेट माझ्याहून जास्त भोजपूरी गाणी ऐकते. ती पश्चिम बंगालची आहे. ती म्हणते की तिला गाण्यांचे शब्द, अर्थ समजत नाही पण त्याचे बिट्स नाचायला प्रेरीत करतात म्हणून ती ऐकते. माझ्या घरी छट पूजा, होळी, दसरा अशा सणांच्या वेळी भोजपूरी गाणी वाजवली जातात. पण ती पारंपरिक असतात. मी कधीच थिल्लर गाणी ऐकत नाही.” चित्रपट उद्योग काळानुसार बदलत असतो.
त्यानुसार गाणीही बदलत जातात. भोजपूरी गाण्यांतून प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी स्त्रियांचं वस्तूकरण करण्यात आलं आहे. त्यामुळे भोजपूरी गाणी, चित्रपट समाजात आपली स्वतंत्र ओळख मिळवू शकत नाही. लोक त्यापासून दूर राहतात. प्रत्यक्षात भोजपूरी गाणी गोड असतात पण थिल्लरता आणि अश्लीलतेच्या माध्यमातून, हाय बिट्स वापरून त्यांची ही ओळख पुसली जात आहे.
सौजन्य - फेमिनिजम इन इंडिया
(अनुवाद - प्रतिक पुरी)






