या सजीव सृष्टीत मनुष्य प्राणी प्रगत आहे. त्याची उत्क्रांती ज्या झपाट्याने झाली तितकी इतर कुठल्याच प्राण्याची झाली नाही. या प्रगतीचं, उत्क्रांतीचं कारण कुणी मनुष्याची बुद्धिमत्ता म्हणून सांगतं त्याच वेळी कुणी शास्त्रज्ञ एखादा रिसर्च घेऊन उभा ठाकतो आणि म्हणतो की, माणसाच्या सरासरी बुद्ध्यांकापेक्षा डॉल्फिन आणि व्हेलचा बुद्ध्यांक जास्त आहे. मग कुणी म्हणतं माणसाकडे भाषेचं तंत्र आहे त्या वेळीसुद्धा कुणी उभ राहतं आणि प्राणी, पक्षी एकमेकांसोबत संवाद साधत असल्याचे पुरावे मांडू पाहतं. या अशा वादविवादात कदाचित आपण एक मानवाची खुबी विसरून जातो, जी इतर कुठल्याच प्राण्यात आढळत नाही, ती म्हणजे “स्टोरी टेलिंग’ एखादी गोष्ट कथन करण्याची कला…
“एक आटपाट नगर होतं … किंवा कोणे एके काळी… अथवा एकदा काय झालं…. ‘ या अशा वाक्यांनी सुरुवात झाली की अनोळखी लोकांचेही कान आपल्याकडे आपोआप वळतात. गोष्ट, किस्सा, अनुभव ऐकण्यात प्रत्येकालाच रस असतो. प्राणी स्वतःच्या अनुभवांवरून परिस्थितीचा सामना करतात किंवा निसर्गच त्यांच्यात कालानुरूप अनुकूल बदल घडवून आणतो. माणसाचं जरा वेगळं आहे. तो स्वतःच्या अनुभवांवरून जगण्यात बदल करतोच वर तो इतरांच्या सर्वकालीन अनुभवांना ऐकून त्यावर विचार करून स्वतःच्या आयुष्यात योग्य ते बदल करतो. माणसाच्या उत्क्रांतीची सुरुवातच अनुभव कथनाने स्टोरी टेलिंगने झाली आहे. भीमबेटकासारख्या ठिकाणी अश्मयुगीन मानवाची भित्तिचित्रे सापडली. ती चित्रे नक्कीच काही डॉक्युमेंटेशन व्हावं म्हणून काढली नसावीत. कारण तो माणूस तेवढा प्रगत नक्कीच नव्हता. ती चित्रे कदाचित कुणा समूह सदस्यासमोर, लहान मुलांसमोर शिकारीचा थरार उलगडून सांगणारं चित्र रूपातलं कथाकथन असण्याची जास्त शक्यता आहे.

आपली भारतीय संस्कृती गोष्टीरूपानेच बहरत गेलीय.
ज्ञानार्जनासाठी केवळ स्वतःचे अनुभव कामी येत नाहीत, त्यासाठी इतरांचे अनुभव ऐकावे लागतात. म्हणूनच पुस्तकं आणि देशाटन यांवर जास्त भर दिला जातो. पुस्तकांत लिहून ठेवलेले अनुभव आणि प्रवासात इतरांचे तोंडी अनुभव आपल्याला ऐकायला मिळतात. यातून आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी मदत होते. गोष्टींमधून इतरांच्या आयुष्यात घडलेल्या घडामोडी कळतात, त्यातून त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये काय योग्य काय अयोग्य आचरण आहे हे समजायला मदत होते. म्हणूनच आपली भारतीय संस्कृती गोष्टीरूपानेच बहरत गेलीय. रामायण-महाभारतातील पात्रं किती खरे किती खोटे यावर मतमतांतरे आहेत. या वादात जाण्यापेक्षा त्या महाकाव्यांतून कथन झालेली गोष्ट आपल्या आयुष्यात दीपस्तंभ म्हणून कित्येकदा कामी येते. शिवबा कसा घडला हे सांगतानासुद्धा माता जिजाऊ गोष्टींतून संस्कार करत असं सांगितलं जातं. ही गोष्ट सांगण्याची परंपरा आपल्या लोककलाप्रकारांतूनसुद्धा आपल्याला पाहायला मिळते. किंबहुना त्यांनीच गोष्ट जगवलीय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. महाराष्ट्रात पोवाडा, भारूड, कीर्तन, प्रवचन अगदी तमाशासारखे लोककला प्रकारसुद्धा आपापल्या कलाप्रकारानुसार, उद्दिष्टानुसार गोष्टी सांगत आले आहेत.
कर्नाटकात यक्षगान, केरळात कथ्थकली, तमिळनाडूमध्ये कथेय्यम पट्टम, राजस्थानात कावड, छत्तीसगडमधील पंडवानी, आंध्र प्रदेशातील बुर्रा कथा यांसारख्या विविध राज्यांच्या विविध भाषांच्या विविध कलाप्रकारांमधून कथाकथन बहरत राहिलं. हे बहरण्या-फुलण्यामागे अनेक कलाकारांनी सगळं आयुष्य त्यासाठी वाहिलं. पौराणिक गोष्टीला गाण्यांमध्ये गुंफून, गरज असेल तिथे गाणे थांबवून गोष्ट सांगून किंवा गोष्टीतल्या पात्राने आपले संवादच गाऊन प्रेक्षकांसमोर मांडणे म्हणजे पंडवानी…आता वयाची 67 वर्षे पूर्ण केलेली तीजन बाई आपल्या ठसकेबाज आवाजात महाभारतातल्या गोष्टी गाऊन सर्वदूर पसरवते. या कलेला ‘पंडवानी’ असं म्हणतात.

पंडवानी गातेय म्हणून समाजातून बहिष्कृत करण्यात आलं.
वयाच्या तेराव्या वर्षी पहिली पंडवानी सादर केलेली तीजन आजपर्यंत थांबलीच नाही. बालविवाह झालेली तीजन पारधी समाजाची असून एक स्त्री असूनही पंडवानी गातेय म्हणून तिला समाजातून बहिष्कृत करण्यात आलं. नवऱ्याने टाकून दिलं. ती एकटी राहिली, जगण्यासाठी संघर्ष करत राहिली, पण कला काही सोडली नाही. तिने पांडवांच्या गोष्टीला जगवलं, गोष्टीने तिला. तिच्या या योगदानासाठी तिला पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पद्म पुरस्कारांनी आणि संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित केले गेले.
तीजनबाईंचा जन्म 24 एप्रिल 1956 रोजी भिलाई जवळच्या ‘गनियारी’ गावांत झाला. त्या जंगलात राहणाऱ्या ‘बनफरा’ जमातीच्या. सामाजिकदृष्ट्या अत्यंत अभावग्रस्त, अतिदलित समाज… चिमणी, जंगली डुक्कर, नीलगाय, साप, गाय, कृमी-कीटक खाणारी. झाडू, सुपं, चटई बनवून, शेतात मजुरी करून गुजराण करणारी ही लोकं. अशा कमालीच्या प्रतिकूल वातावरणाचा घट्ट विळखा असतानाही त्यांनी व्यक्तीची भाग्यरेषा लिहून येत नसून ती आपली आपणच लिहायची असते, हे सिद्ध केलं.
गावांत पेयजल, वीज, रस्ता, दवाखाना, शाळा अशा मुलभूत सुविधाही नव्हत्या. तीजनने लहानपणी एकदा आजोबा ब्रिजलालचं गायन ऐकलं. ते त्यांना फार आवडलं. त्यांनी तसं आजोबांना सांगितलंही. आजोबांनी मग त्यांना जे ऐकलं ते गायला सांगितलं. त्या घाबरल्या. थोडंसं गायल्या. ते ऐकून आजोबांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. आपल्या नातीमध्ये असामान्य प्रतिभा असल्याची जाणीव त्यांना झाली. आजोबा ‘पंडवानी’ गायचे. पंडवानी म्हणजे महाभारतातल्या पांडवांचं गुणगान करणारी पद्यशैलीची गाथा! त्या दिवसानंतर त्या रोज आजोबांना गाऊन दाखवायच्या. अल्पावधीतच त्या आजोबांसारखे गाऊ लागल्या. त्यांच्या गायनाची चर्चा पंचक्रोशीत होऊ लागली. विलक्षण प्रतिभा आणि समर्पण पाहून लोककलावंत उमेदसिंह यांनी त्यांना अनौपचारिकपणे प्रशिक्षित केलं. वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी एका शाळेत त्यांनी आपल्या कलेचं पाहिलं सादरीकरण केलं. त्यांची कला प्रेक्षकांना इतकी आवडली की त्यांना बक्षीसापोटी दहा रुपये मिळाले. बक्षीस मिळाल्याने त्या आनंदाने रडायला लागल्या. या दिवसानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

एक शुद्र स्त्री पंडवानी कसं काय गाऊ शकते ?
एक शुद्र स्त्री पंडवानी कसं काय गाऊ शकते असा आक्षेप सनातनी लोकांनी घ्यायला सुरुवात केली. कारण तोवर ही कला फक्त पुरुषच सादर करू शकत होते. तीजनबाई पहिल्या स्त्री की ज्यांनी ही परंपरा तोडून पंडवानी गायलं. त्यांनी पंडवानीचा तोंडवळाच बदलून टाकला. सर्वस्वी नव्या, आगळ्या-वेगळ्या ढंगात रंगमंचावर आणलं. हे बघून प्रेक्षक दंग झाले. गायकी तर अशी की पुरुष कलावंतांच्या गायकीला जवळपासही फिरकू दिलं नाही. सवर्ण समाजाने मात्र त्यांच्यावर विषारी टीका केली. वडीलांना धमकावले. त्यांची अब्रू लुटण्याचा प्रयत्न केला. कुटुंब आणि गावातल्या लोकांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला. शेवटी त्यांना गावातून परागंदा व्हावं लागलं.
तीजनबाईंनी पहिल्यांदा आपली कला पेश केली त्यावेळी पंडवानी स्त्री गायिका फक्त बसून गायच्या. रंगमंचाखाली बसून पुरुष गायकांच्या सूरात सूर द्यायच्या. केवळ पुरुष गायकांनीच उभे राहून गायचं असा प्रघात होता. हा प्रघात त्यांनी मोडीत काढला. हा एकप्रकारे पुरुषप्रधान मानसिकतेवर केलेला जोरदार प्रहार होता. त्यांची शैली तूफान लोकप्रिय झाली. लोकं त्यांच्या पंडवानीचा आस्वाद घ्यायला रात्री धावत-पळत यायचे. गावं-खेडी-शहरातल्याच नाही तर दुर्गम-पहाडी-आदिवासी-जंगल परिसरातल्या साऱ्या रसिकांच्या गळातल्या त्या ताईत झाल्या. इतकी अमाप लोकप्रियता त्यांनी मिळवली. त्यांची कीर्ती देशापर्यंतच सीमित न राहता परदेशातही पोहचली. अख्तरीबाई, हिराबाई बडोदेकर, जद्दनबाई (अभिनेत्री नर्गिसची आई), गौहर खान, सुब्बालक्ष्मी, जानकीबाई, गिरिजादेवी आदी दिग्गज कलावंतांसारखी ख्याती त्यांनी मिळवली.
रंगमंचावर सिंहासारखी गर्जना, भारदस्त नि नजरेत भरणारे व्यक्तिमत्व, उंच अंगकाठी, लालभडक साडी, केसांवर चमकता कुंकू, कपाळावर मोठी गोल बिंदी, पानाने रसिले झालेले ओठ, दातांमध्ये लालिमा, हातात तंबोरा असं त्यांचं रूप प्रेक्षकांना विस्मयचकित करून टाकतं ! तीजनबाई एकट्याने रंगमंचाचा संपूर्ण अवकाश व्यापून टाकतात! लोकं प्रचंड भारावतात. दाद आणि बक्षीस म्हणून पैशांची उधळण करतात. श्रेष्ठ भारतीय नाट्यकर्मी हबीब तन्वीर यांनी त्यांना एकदा ऐकलं नि त्यांच्या आयुष्याला वेगळी दिशा मिळाली. तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी ते देश-विदेशातल्या अनेकांनी त्यांच्या अफलातून प्रतिभेची स्तुती केली.

या कलाकारांनी स्वतःच्या आवडीने, जातीच्या परंपरेने, उपजीविकेसाठी किंवा समाजाला सुधारण्यासाठी गोष्टीला जागतं ठेवलं. गोष्टी जगल्या नाही तर माणूस “माणूस’ राहणार नाही हे जाणून, न जाणून तिला जागतं ठेवलं. गोष्टींचा हेतू देव-धर्माचा प्रचार असू देत किंवा सामाजिक-राजकीय परिस्थितीवर उपाय असू देत गोष्टी जगल्या पाहिजेत. गोष्टीला जात नसते, धर्म नसतो. तिच्यात प्रचारकी कावेबाजपणा असण्याची शक्यता असते पण तो “ह्युमन एरर’ तर प्रत्येक ठिकाणी आहेच. जर आपली सद्सद्विवेकबुद्धी जागृत असेल तर आपण राम-सीतेच्या गोष्टीपासून मुल्ला नसिरुद्दीनपर्यंत आणि कृष्ण लीलेपासून अलिफ लैलापर्यंत प्रत्येक गोष्ट तेवढ्याच रुचीने ऐकू शकतो आणि योग्य तो बोध घेऊ शकतो.
राजाश्रयावाचून, लोकाश्रयावाचून भोगवादी संधिसाधू समाजात कित्येक कलाकार आणि कित्येक कलाप्रकार नष्ट झाले याचा तोटा आपल्या पिढीला लगेच दृश्य स्वरूपात दिसणार नाही, पण कालांतराने जेव्हा आपली संस्कृती, आपली तत्त्वे, आपली विचारप्रणाली जेव्हा बिनाबुडाचे गाडगे होईल आणि स्वार्थ दिसेल तेव्हा उताराला गडगडून पळू लागेल तेव्हा आपण माणूस म्हणून, समाजरचना म्हणून स्वतःला हरवून बसलेलो असू. असो. हे सर्व गोष्टीवेल्हाळ कथाकथनकार, कथागोई, स्टोरी टेलर्स आजच्या डिजिटल जमान्यातील फिल्म्स, सिरियल्स, वेबसिरीज यांसारख्या माध्यमांचे पूर्वज आहेत, त्यांनी पाया रचलाय म्हणून हा सर्व माध्यमांचा डोलारा उभा आहे. माणसं जन्माला येतात आणि मरून जातात, त्यांच्या जगण्याच्या, संघर्षाच्या, भलेबुरेपणाच्या गोष्टी अजरामर राहायला हव्यात, त्याशिवाय उत्क्रांतीचं चक्र फिरतं राहणार नाही. म्हणून गोष्टी जगल्या पाहिजेत. माध्यमं बदलतील, पद्धती बदलतील, गोष्टींची रूपं बदलतील पण गोष्टी जगल्या पाहिजेत.






