जगातील बहुतेक सर्वच व्यवस्थांवर पुरुषांचं वर्चस्व आहे. प्रत्येक क्षेत्रांत पुरुषाचा एकाधिकार राहिलेला आहे. ज्यात स्त्रियांनी काळानुसार आगेकुच करत आपली जागा तयार केली आणि आजही बनवत आहेत. कला, साहित्य, विज्ञान यांच्याप्रमाणेच प्रकाशन जगतातही पुरुषांचं वर्चस्व होतं.
महिला लेखकांना आपली गोष्ट सांगण्यासाठी अनेक संघर्ष करावे लागले. आपली ओळख लपवून लिहावं लागलं. पण स्त्रियांनी प्रकाशन क्षेत्रातील आपल्या जागेची गरज ओळखली आणि त्या दिशेनं त्या पावलं टाकू लागल्या. या जागेसाठी स्त्रीवादी लेखकांनी पुढाकार घेत काम सुरू केलं.
भारतात स्त्रीवादी प्रकाशन सुरू झाले आणि त्यांनी स्त्रियांशी संबंधीत साहित्य प्रकाशित केलं. एकॅडेमिक पेपर्स, कथा, लेख यातून स्त्रीवादी दृष्टीकोन समोर येऊ लागला. यात स्त्रीवादी प्रकाशकांची भूमिका महत्त्वाची राहिली.
भारतीय स्त्रीवादाचा इतिहास एकोणविसाव्या आणि विसाव्या शतकाच्या तीन भागांमध्ये तयार झाला आहे. पहिला काळ एकोणविसाव्या शतकाच्या मध्यापासून 1920 पर्यंत पसरला आहे. ब्रिटीश सत्तेच्या या अव्वल काळात पुरुष समाज सुधारकच स्त्रीवादावर बोलत होते.
त्यानंतर स्त्रीवादाचं स्वरुप बदलत गेलं, त्यात वेगवेगळे मुद्दे येत राहिले. 1980 च्या दशकात भारतीय स्त्रीवादात एक स्पष्ट पुनरुज्जीवन बघायला मिळालं. याच दशकात भारतात स्त्रीवादी प्रकाशन संस्था उदयाला आल्या.

‘काली फॉर वुमेन’ - भारतीय प्रकाशन उद्योगामध्ये मोठी झेप
1984 मध्ये रितू मेनन आणि उर्वशी बुटालिया यांनी ‘काली फॉर वुमेन’ची सुरूवात केली. या दोन स्त्रियांनी सुरू केलेली ही प्रेस केवळ भारतीय प्रकाशन उद्योगातच नव्हे तर दक्षिण आशियातील स्त्रीवादी साहित्यासाठी मोठी झेप ठरली.
मात्र त्या दोघीही या व्यवसायात योगायोगानं आल्या आहेत असंही त्यांना सुनावण्यात आलं. एका मुलाखतीत रितू मेनन सांगतात, “स्त्रीवादी प्रेस फक्त महिला आंदोलनाचा भाग नव्हती तर प्रिंट आंदोलनात स्त्रियांनाही सामील करण्यात आलं होतं.
यात प्रकाशक होते, ग्रंथपाल होते, पुस्तक विक्रेते, डिझायनर, प्रिंटर, बाईंडर आणि एका आंतरराष्ट्रीय यंत्रणेचा पूर्ण पाठींबाही याला होता. यातून या सर्वांची एकताही दिसून आली.”
ज्या वर्षी मेनन आणि बुटालीया यांनी ‘काली फॉर वुमेन’ची स्थापना केली त्याच वर्षी त्यांनी जागतिक पातळीवरील स्त्रीवादी यंत्रणेतही सहभाग घेतला. 1984 सालापर्यंत भारतीय स्त्रीवादी प्रकाशनांना वास्तवतेच्या परिघात आणण्यासाठी याचा उपयोग झाला.
ही भारतातील प्रमुख स्त्रीवादी प्रकाशन संस्था होती आणि स्त्रीवादी आवाज कसा ऐकला जाईल, कोण त्यांचं प्रतिनिधित्व करेल, देशातील अन्य प्रकाशन व्यवसायांत स्त्रीवादी साहित्याला जागा कशी मिळेल याची दिशा ठरवण्यात या प्रकाशन संस्थेनं मोठं काम केलंय.
1984 च्या लंडनमधील पहिल्या आंतरराष्ट्रीय स्त्रीवादी पुस्तक मेळाव्यात ‘काली फॉर वुमेन’नं सहभाग घेतला ज्यामुळे भारतातील नवोदित स्त्रीवादी प्रकाशन उद्योगाला मोठं बळ मिळालं.

राजस्थानच्या 75 ग्रामीण स्त्रियांचे लेखन प्रकाशित केलं
राधा कुमार यांची ‘द हिस्ट्री ऑफ डुईंग’ आणि वंदना शिवा यांची ‘स्टेईंग अलाईव्ह’, तसंच सुदेश वैद्य आणि कुमकुम सांगरी यांचं, ‘रिकास्टींग वुमेनः एसेज इन इंडियन कोलोनियल हिस्ट्री’ ही पुस्तकं कालीकडून प्रसिद्ध झाली. या प्रकाशन संस्थेतून जास्त करून इंग्रजी पुस्तकं प्रसिद्ध झाली असली तरीही हिंदी आणि स्थानिक भाषांमधूनही त्यांनी पुस्तकं प्रसिद्ध केली आहेत.
‘शरीर की जानकारी’ (1989) हे पुस्तक हिंदीत प्रकाशित झालं. राजस्थानच्या 75 ग्रामिण स्त्रियांनी याचं लेखन केलं. गावांमध्ये सवलतीच्या दरात हे पुस्तक विकण्यात आलं. यात सेक्स आणि स्त्री शरीराविषयी स्पष्टपणे माहिती देण्यात आली होती ज्यात मासिक पाळीसारख्या गोष्टीही होत्या.
दोन दशकं ‘काली फॉर वुमेन’मधून स्त्रीवादी लेखन, पुस्तकं मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालीत. त्यानंतर 2003 मध्ये मेनन-बुटालीया जोडी फुटली आणि त्यांनी नवीन प्रकाशन संस्था सुरू केल्या. बुटालीया यांनी ‘जुबान बुक्स’ आणि मेनन यांनी ‘वुमेन अनलिमिटेड’ची स्थापना केली. यातूनही अर्थातच स्त्रीवादी साहित्यावरच भर देण्यात आला. आजही त्यावरच या प्रकाशन संस्था काम करत आहेत.
स्त्रीवादी प्रकाशन संस्थांचा इतिहास केवळ मनोरंजकच नाही तर अत्यंत महत्त्वपूर्णही आहे. स्त्रियांशी संबंधीत प्रश्नांची गरज लक्षात घेऊन, त्यांचं समर्थन करत ‘जुबान बुक्स’, ‘वुमेन अनलिमिटेड’, ‘तारा बुक्स’, ‘तुलिका बुक्स’, ‘स्त्री’, ‘साम्या’, ‘अस्मिता’ अशा प्रकाशनांनी हे काम पुढे सुरू ठेवलं आणि स्त्रीवादी प्रकाशनासाठी एक रस्ता तयार केला.
यातून जैसे थे स्थिती बदलण्यासाठी आणि आधुनिक स्त्रीवादी साहित्य प्रकाशित करण्यासाठी या संस्थांनी मोठं योगदान दिलेलं आहे. यात त्यांना मुख्य प्रवाहातील प्रकाशन संस्थांशी सातत्यानं संघर्ष करावा लागला आहे. प्रकाशन विश्वातील आपली जागा तसंच बाजारातील आपला हिस्सा कमावण्यासाठी हा संघर्ष मुख्यत्वेकरून होता. जो अजूनही सुरू आहे.
भारतात स्त्रीवादी साहित्य एखाद्या विशिष्ट स्त्रीवादी सिद्धांतानुसार विकसीत झाला नाही तर काळानुसार लिखाणातून तो प्रकट झाला.

भारतात आधी पहिली स्त्रीवादी प्रकाशन संस्था उभी राहिली. तिनं भारतीय स्त्रियांच्या अनुभवांना जागा दिली, व्यक्त होण्याचं माध्यम दिलं. त्यांच्या आवाजांना एक व्यासपीठ दिलं. त्यांच्यासाठी एक अशी भाषा विकसीत केली ज्यातून त्यांचे अनुभव अधिक सशक्तपणे समोर येतील.
यातून स्त्रीवादी आंदोलनं सुरू झाली, त्याचा प्रवास लैंगिक समानतेपर्यंत येऊन पोहोचला. या स्त्रीवादी प्रकाशनांनी स्त्रियांच्या अनुभवांना स्थान दिलं, त्यावर लक्ष केंद्रीत केलं, त्यातून रोजचं जगणं, राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ यातून लैंगिक असमानतेची जी धारणा तयार झाली होती त्याला आव्हान देण्यात आलं.
स्त्रीवादी प्रकाशनांनी स्त्रीवादा संबंधीत अनेक गैरसमज दूर करण्यात मोठी भूमिका निभावली आहे. 1986 मध्ये काली प्रकाशनाने कमला भसीन आणि निगहत सईद खान यांचं ‘सम क्वेश्चन ऑन फेमिनिझम अँड इट्स रिलेवंस’ हे पुस्तक प्रसिद्ध करून स्त्रीवादा संदर्भात तेव्हा रुढ असलेल्या गैरसमजांना आणि प्रासंगिक प्रश्नांना उत्तरं देण्याचा प्रयत्न केला होता.
1980 च्या दशकात पुस्तिका, पॅम्फलेट्स, कार्ड्स यातून स्त्रीवादी प्रकाशनांनी स्त्रीवादाची मांडणी केली. या प्रकाशनांतून आलेली माहिती ही स्त्री आणि पुरुषांसाठी, स्त्रीवादाला एक विचारधारा म्हणून समजून घेण्यासाठी, अंगिकारण्यासाठी उपयुक्त ठरली.
जेव्हा स्त्रीवादी प्रकाशनांची पुस्तकं दुकानांतून, कार्यशाळांमधून उपलब्ध झाली तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं लोकांना कठीण गेलं. स्त्रीवादी सक्रियता, लेखन आणि प्रकाशन यांच्यातील दृढ संबंधांनी टीकात्मक एकतेला सशक्त केलं आणि विविध आवाजांना आकार देण्यात आणि त्यांना पुढे आणण्याचं महत्वाचं काम केलं.
(सौजन्य - फेमिनिजम ऑफ इंडिया)
अनुवाद - प्रतिक पुरी






