देशातील सर्वांत मोठा साहित्य सन्मान, ज्ञानपीठ पुरस्कार यावर्षी उर्दूसाठी प्रसिद्ध गीतकार गुलजार (संपूरन सिंह कालरा) यांना आणि संस्कृतसाठी स्वामी रामभद्राचार्य यांना जाहिर झाला आहे. ज्ञानपीठ तसं तर एकालाच मिळत आलं आहे. पण 2009 मध्ये श्रीलाल शुक्ल आणि अमरकांत यांनाही एकत्र जाहिर झाला होता. तेव्हाही यावर वाद झाला होता. ज्ञानपीठ सन्मानाची सुरूवात 1965 मध्ये झाली होती. ‘टाईम्स ऑफ इंडिया’चे जैन घराने याचे प्रायोजक आहेत. त्याचं नियोजन एका ट्रस्टकडे आहे. 2023 च्या ज्ञानपीठ पुरस्कारांच्या नावांमध्ये सध्याच्या चर्चित अमृतकाळाचं प्रतिबिंब स्पष्टपणे बघता येतं. साहित्य अकादमी तशीही सरकाराधीन आहे आणि सरकारी निर्णयामुळे ती कधी-कधी अस्वस्थही होत असली, त्यातला सरकारी हस्तक्षेप जाणवत असला तरीही, एकूणच साहित्य विश्वामध्ये मोठी खळबळ माजलेली नसायची. पण यावर्षी मात्र ते होतंय. ज्ञानपीठानेही तडजोड स्विकारली आहे का हा प्रश्न विचारला जात आहे.

पुरस्कार समितीने स्वामी रामभद्राचार्य यांच्याविषयी प्रख्यात स्कॉलर, शिक्षातज्ञ, तत्त्वज्ञानी, धार्मिक नेता अशी माहिती देत त्यांच्या रामानंद संप्रदायाचा आणि त्यांच्या धार्मिक पदांचाही उल्लेख केला आहे. त्यांना 22 भाषा येतात, संस्कृत, हिंदी, अवधी, मैथिली इत्यादी अनेक भाषांत त्यांनी कविता, लेख लिहिले आहेत असं म्हटलं गेलंय. त्यांनी 200 हून जास्त पुस्तकं लिहिली आहेत, चार महाकाव्यं रचली आहेत, ज्यातील दोन हिंदीत आहेत. धर्मग्रंथांवर टीका केली आहे, रामचरित मानसचे ते विशेषज्ञ आहेत. मोदी सरकारने त्यांना 2015 मध्ये पद्मविभूषण दिला होता. स्वामीजी अंध आहेत ही माहिती मात्र यात दिलेली नाही. ते प्रधानमंत्र्यांच्या जवळचे आहेत हेही सांगितलेलं नाही. मोदींनीच त्यांच्या 10 पानांच्या अष्ठाध्यायी व्याख्येचा लोकापर्ण सोहळा चित्रकूटमध्ये केला होता. रामजन्मभूमी प्रकरणात स्वामींनी रामलल्ला विराजमानच्या बाजूने साक्ष दिली होती. रामजन्मभूमी आंदोलनात ते सक्रीय सहभागी होते. बाबरी मशिदीचा कलंकीत ढाचा पाडण्यातही. त्यांना तुरुंगवास झाला. ते नेहमी शिवसेना, सपा, काँग्रेस नेत्यांना नाव घेऊन शिव्याशाप देत असतात. पाकिस्तान ऑक्यूपाईड काश्मीरवर त्यांचे वादग्रस्त विधानं आहेत. राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा ज्या रामानंदी संप्रदायाने केली आहे त्याचे ते निकटवर्ती आहेत.
मी इंटरनेटवर त्यांचं साहित्य शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या एका कवितेचा त्यांच्या विदेशी शिष्यांनी इंग्रजी व रुसी भाषेत अनुवाद केलाय. स्वामींच्या अधिकृत फेसबुक पेजवर ती आहे. रामचरित मानसच्या “अरथ न धरम न काम रुचि गति न चहउं निरबान. जनम-जनम रति राम पद यह बरदानु न आन” या दोह्याचं ते हिंदी भाषांतर आहे.
अर्थ चाहिए न धर्म काम चाहिए
कौसल्याकुमार मुझे राम चाहिए.
मोक्ष चाहिए न स्वर्ग धाम चाहिए
कौसल्याकुमार मुझे राम चाहिए.
अशरण-अनाथ-नाथ दीन-हितकारी
चाहिए विप्र-वधू पाप-शाप हारी
जानकी-जीवन पूर्णकाम चाहिए
कौसल्याकुमार मुझे राम चाहिए…
कोटि मन्मथाभिराम राम मुझे चाहिए
लोक लोचनाभिराम राम मुझे चाहिए
‘रामभद्राचार्य’ का विश्राम चाहिए
कौसल्याकुमार मुझे राम चाहिए.
त्यांचं साहित्य मी वाचलेलं नाही हे मी मान्य करतो. युट्यूबवर त्यांची काही प्रवचनं ऐकलीत जी मला प्रभावित करू शकली नाहीत. स्वामी अखंडानंद, स्वामी रामसुखदास, आचार्य तुलसी, मौलाना वहीदुद्दीन ख़ान इत्यादी प्रवचनकारांची व्याख्यानं (लेखन नाही) याहून अधिक जोमदार होते. रजनीश ओशो यांच्याविषयी तर बोलायलाच नको. अशावेळी केवळ राम मंदिराच्या आंदोलनात सहभागी असलेल्या एका संताला त्याच्या साहित्याच्या आधारावर बुद्धिजीवी साहित्यिकांच्या पंगतीत आणून ठेवणं उचीत वाटत नाही. हा एका संताचाही मान नाही. त्यांना ज्ञानपीठ मिळाल्याचं स्वागत साहित्यविश्वानं केलं नाही तर, वादग्रस्त बाबा बागेश्वर धाम अथवा शिवराजसिंह चौहान सारख्या भाजप नेत्यांनी केलं आहे.

दुसरे ज्ञानपीठ विजेते गुलजार आहेत. ते गीतकार आहेत, पटकथाकार आहेत, दिग्दर्शकही आहेत. त्यांना 22 फिल्मफेअर अवार्ड्स, 6 राष्ट्रीय सन्मान, बाबासाहेब फाळके सन्मान, पद्मभूषषण तसेच ग्रामी व ऑस्करही (ए. आर. रेहमानसोबत) मिळाला आहे. 2002 मध्ये त्यांना त्यांच्या शायरीसाठी साहित्य अकादमीही मिळाला आहे. मागील काही वर्षांपासून ते जयपूर लिटरेचर फेस्टिवल तसेच अन्य महत्त्वाच्या साहित्योत्सवाचा प्रमुख चेहरा झाले आहेत. या उत्सवांतून मुख्यतः इंग्रजी प्रकाशक, लेखकांचे एजेंट्स, लोकप्रिय नेते, अभिनेते, गायक, एंकर्स यांच्यासोबत बाजारही आला आहे. बाजारच त्यांचा खर्चही उचलतात. चित्रपटांप्रमाणे आता साहित्य उत्सवातही सेलिब्रिटीज येतात, त्यांच्यासोबत सेल्फी घेतली जाते, त्यांचाच बोलबाला असतो. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की या उत्सवांची चमकधमक आता साहित्यातील गंभीर पुरस्कारांनाही प्रभावित करू लागली आहे. मी गुलजारांना तेव्हापासून वाचत आलोय जेव्हा साठच्या दशकात त्यांचे मित्र भूषण वनमाळी यांनी त्यांची शायरी प्रकाशित केली होती. तेव्हा आमच्यात त्यांच्या शायरीविषयी आकर्षण होतं. नंतर मात्र ‘जब भी ये दिल उदास होता है, जाने कौन आसपास होता है’ किंवा ‘शाम से आंख में नमी सी है, आज फिर आपकी कमी सी है’ या गीतांनंतर ती ओढ कमी झाली. सामाजिक किंवा राजकीय हालचाली त्यांच्या गीतांचा शायरीचा विषय क्वचितच झाला. त्यांचा रोमँटीसिझमच वेगवेगळ्या रुपातच येत गेला.
गोल फूला हुआ ग़ुब्बारा थक कर
एक नुकीली पहाड़ी यूं जाके टिका है
जैसे ऊंगली पे मदारी ने उठा रक्खा हो गोला
फूंक से ठेलो तो पानी में उतर जाएगा
भक से फट जाएगा फूला हुआ सूरज का ग़ुब्बारा
छन-से बुझ जाएगा इक और दहकता हुआ दिन
ज्ञानपीठाच्या घोषणेत स्वामीजींचं जन्मस्थान जौनपूर सांगितलं गेलंय पण गुलजार यांचं दीना, पाकिस्तान मात्र सांगण्यात आलं नाही. परिचयातही त्यांची उर्दू शायरी मागे आहे तर हिंदी गीतं पुढे आहेत. त्यात लिहिलंय, संपूरन सिंह कालरा, जे गुलजार या नावाने विख्यात आहेत, हिंदी चित्रपटांचे प्रसिद्ध गीतकार आहेत. याशिवाय ते कवी, पटकथाकार, दिग्दर्शक, नाटककार आणि प्रसिद्ध कवी आहेत. (हो, कवी पुन्हा एकदा!) ते हिंदी, उर्दू आणि पंजाबीत लिहितात. साहित्यात त्यांनी मैलाचे अनेक दगड रोवले आहेत. तीन ओळींच्या ‘त्रिवेणी’ काव्याचा त्यांनी आविष्कार केला आहे. या त्रिवेणी 70 च्या दशकात ‘सारिका’ मासिकात यायच्या जेव्हा कमलेश्वर त्याचे संपादक होते. यातील तिसऱ्या ओळीत ट्विस्ट असायचा.
गोले, बारूद, आग, बम, नारे
बाज़ी आतिश की शहर में गर्म है
बंध खोलो कि आज सब ‘बंद’ है.
गुलजार एक चांगले माणूस आहेत, सिद्ध चित्रपट निर्माता आहेत, लोकप्रिय गीतकारही आहेत पण साहित्यातला त्यांचा प्रभाव जेमतेमच आहे. सोशल मीडियावर याविषयी फार नाही पण चर्चा सुरू आहे.
हिंदी कवी आणि संपादक विष्णु नागर यांनी फेसबुकवर लिहिलं की हिंदी कथासाहित्य, काव्य आणि बालसाहित्यात मोठं काम करणारे विनोद कुमार शुक्ल आणि इतर लेखकांची उपेक्षा दुर्दैवाची गोष्ट आहे. अन्य भारतीय भाषांमध्येही असे अनेक साहित्यिक असतीलच ज्यांना अजून ज्ञानपीठ मिळाला नाही.

गीतकार गुलजार यांना ज्ञानपीठ मिळाल्यानंतर काहींनी त्याची तुलना बॉब डिलन या गीतकार-गायकाला मिळालेल्या नोबेल साहित्याशी केली आहे. पण ही तुलना अनाठायी वाटते. डिलनने त्याच्या काळात त्याच्या गीतांनी अमेरिकेतील तत्कालीन दांभिक मानसिकता उघड केली होती. राजकारणावर कडवट टीका केली होती. स्वातंत्र्य, शांती, न्यायिक अधिकार याविषयी आवाज उठवला होता. युद्धविरोधी, अण्वस्त्रविरोधी, गुलामीविरोधी, वंशवादविरोधी भूमिका घेतली होती. गोऱ्यांनी आफ्रिकन लोकांवर केलेले अत्याचार, हिंसा यावर टीका केली होती. जनआंदोलनांच्या समर्थनार्थ लिहित नागरी अधिकारांची व लोकांची बाजू घेतली होती. डिलन हे एक विद्रोही गीतकार होते. त्यांच्या शब्दांची तेव्हाच्या अमेरिकेला गरज होती जी गर्जून म्हणेल,
होय, आणखी किती वेळा माणसानं वरती बघावं
जोवर त्याला ते आभाळ दिसणार नाही?
आणि एका माणसाला किती कान हवेत
जोवर त्याला ऐकू येणार नाहीत लोकांचे आक्रोष?
होय, आणि किती लोकांनी मरायला हवं,
जेणेकरून त्याला समजेल की लोक खरंच मरत आहेत?
याचं उत्तर, माझ्या मित्रांनो, इथल्या हवेत वाहत आहे.
गुलजार यांच्यावर माझं प्रेम आहे. एक भला माणूस आणि संवेदनशील चित्रपट निर्माता म्हणून त्यांच्याविषयी आदर आहे. त्यांच्या रोमँटीक वृत्तीवर मी फिदा आहे. स्व. केदारनाथ सिंह यांच्यासोबत मी गुलजारवर बोललो आहे. पण माझ्या 50 वर्षांच्या पत्रकारीतेत, ज्यात 35 वर्ष संपादक म्हणून मी काम केलंय, मला कधीही असं दिसलं नाही की गुलजार यांनी सामाजिक, राजकीय गोष्टींवर साहसी आवाज उठवला आहे, गीतं लिहिली आहेत. रोमँटीक गाणी थोडा काळ आवडतात पण नंतर कंटाळा आणतात. ढिली पडतात. गुलजार देखिल हे मान्य करतील की भारतीय भाषांमध्ये अनेक कवी असे आहेत की ज्यांचा ज्ञानपीठावर त्यांच्यापेक्षा जास्त अधिकार आहे. ज्यांना तो देऊन या पुरस्काराचा खरा सन्मान होईल. ज्ञानपीठाची ती परंपरा होती. पण आता ती एका लाचार वळणावर येऊन ठेपली आहे. हा अर्थात नवा भारत आहे. ज्यात गीतकार, मंचीय कवी, कथावाचक (हे सारे गुण आता एकाच माणसात दिसून येतील) यांनाच सन्मान मिळत आहेत. पुरस्कार आता केला जात नाही, तर लादला जातोय.
(सौजन्य – द वायर)
(लेखक, जनसत्ता वृत्तपत्राचे माजी संपादक आणि हरिदेव जोशी पत्रकारीता विश्वविद्यालय, जयपूर येथील संस्थापक-कुलपति आहेत.)






