- गेल्या 12 वर्षांपासून सोनी पंधारे ताडोबाच्या जंगलात वनपाल म्हणून काम करत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील 1100 हेक्टर वनक्षेत्र असलेल्या भटाळी बीटचा चार्ज त्या सांभाळतात. अतिशय तरुण, मजबूत शरीरयष्टी, चेहऱ्यावर तेज, तीक्ष्ण नजर आणि जंगल म्हणजे घरच आहे अशी सहज देहबोली असणारी एक आदिवासी गोंड युवती…
- उन्हाळी हंगामात जंगलात वणवे पेटू नये याठी दिवस-रात्र गस्त घालणे, आग लागल्यानंतर ती विझवण्यासाठी जीव धोक्यात घालून युद्धपातळीवर प्रयत्न करणे हे सोनी पंधारेचे काम…
- अंधश्रद्धा आणि गैरसमजामुळे स्थानिक आदिवासी जंगलाला आग लावत असल्याच्या अनेक घटना घडतात. अशावेळी या आदिवासींच्या वस्त्या-वस्त्यांवर जाऊन आग न लावण्यासंबंधी जनजागृती करणे आणि पर्यावरणाचे महत्व सांण्याचे काम सोनी पंधारे मोठ्या खुबीने करते.
- सूर्य अक्षरश:आग ओकत होता.. तापमान होतं 45 अंश सेल्सियसच्या पुढे. चारही बाजूला 1100 हेक्टर इतकं पसरलेलं वनक्षेत्र. या वनक्षेत्रावर नजर ठेवण्यासाठी बांधण्यात आलेल्या उंच लाकडी मचाणाच्या एकेक पायऱ्या झपझप चढत ती वर पोहचली. तिची नजर दुर्बिणीच्या तोडीची होती. 360 अंशात नजर फिरवून तिने जंगलाचा एक आढावा घेतला आणि काही वेळ मचाणावरच थांबून तितक्याच चपळाईने खाली उतरली… खाली उतरताना तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसतं होतं.
“आमची मॅडम वाघीणेय, वाघीण! अख्खं जंगल सांभाळते आमची ही वाघीण…भ्येत न्हाय काय न्हाय. कडक उन असो, रात असो का कडाक्याची थंडी असो…”
ताडोबाला लागून असलेल्या 1100 हेक्टर वनक्षेत्रावर लक्ष ठेवण्यासाठी एक मचाण बांधलयं. वनरक्षक सोनी पंधरे या मचाणावर बसून जंगलातील आगीवर आणि पाणवठ्यावर येणाऱ्या वन्यप्राण्यांवर लक्ष ठेवतात. मॅडम खाली उतरण्याची वाट बघत असलेले दिलीप देठे हे वनरक्षक तेवढ्यात माझ्या कानाशी कुजबुजले.
या मॅडम म्हणजे सोनी पंधारे… गेल्या 12 वर्षांपासून सोनी ताडोबाच्या जंगलात वनपाल म्हणून काम करत आहेत. चंद्रपूरपासून सुमारे 50 किमी अंतरावर झरण रेंज आहे. येथील 1100 हेक्टर वनक्षेत्र असलेल्या भटाळी बीटचा चार्ज त्या सांभाळतात. अतिशय तरुण, मजबूत शरीरयष्टी, चेहऱ्यावर तेज, तीक्ष्ण नजर आणि जंगल म्हणजे घरच आहे अशी सहज देहबोली असणारी एक आदिवासी गोंड युवती.
सोनी पंधारे मचाणावरून खाली उतरली आणि हिरव्या रंगाच्या प्लास्टिकच्या बाटलीतलं गरम झालेलं दोन घोट पाणी प्यायली. ती पुन्हा चोहीकडे बघू लागली. तिच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं. काहीतरी केल्याचं, काहीतरी मिळवल्याचं. आपण करत असलेल्या कामाचं चीज झाल्याचे ते भाव होते. तिला कारण विचारलं तेव्हा ती म्हणाली, ‘यावर्षी आमच्या इथल्या जंगलात अद्याप आग लागली नाही म्हणून मी खुश आहे. उत्तराखंडच्या जंगलाला लागलेल्या भीषण आगीमुळे इथले वातावरण गेल्या काही दिवसांपासून खुपच ‘टेन्स’ होतं. गेल्या काही वर्षात इथेही छोट्या-मोठ्या आगी लागल्या होत्या, पण यंदा मात्र सगळं ठीक दिसतयं.’’
यंदा जंगलाला आगी न लागण्याचं कारण काय? असं विचारल्यावर सोनी सांगते की, यंदा त्यांनी अधिक जास्त खबरदारी घेतली होती. आग न लागण्यासाठी ज्या ज्या उपाययोजना करता येतील त्या सगळ्या त्यांनी केल्या होत्या.

उन्हाळ्यात वन्यप्राण्यांची होरपळ होऊ नये म्हणून जंगलात वनविभागाने कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत.
चंद्रपूरपासून जवळ असलेल्या ताडोबाच्या दक्षिणेला असलेल्या या झरण रेंजच्या जंगलात सोनी दिवसरात्र गस्त घालते. हातात काठी आणि सोबतीला एक वनरक्षक.. बास्स इतकचं! जंगलाच्या भयाण शांततेत, माणसांच्या वस्तीपासून दूर फिरत जंगलातील छोट्या छोट्या हालचालींचा आढावा घेणं हे तिचं काम. प्राण्यांच्या पायांचे ठसे, त्यांची विष्ठा, त्यांनी झाडांवर मारलेले ओरखडे काही म्हणजे काहीच तिच्या नजरेतून सुटत नाही. शिकाऱ्यांचे जाळे पकडणे, अवैध वृक्षतोड करणाऱ्या माफियांच्या टोळ्यांवर करडी नजर ठेवणे, जंगलातील चोरवाटा शोधणे, कुठे आग लागू नये म्हणून हवी ती काळजी घेणे किंवा आग लागल्यानंतर ती विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणे, प्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी रात्री ठिकठिकाणी कॅमेरा बसवून सकाळी त्याची तपासणी करणे अशी धाडसाची कामं सोनी करते.
जंगलातील पायवाटेवून चालत चालत सोनी सांगत होती… “मी आदिवासी गोंड समाजाची, त्यामुळे माझी वाढच मुळात जंगलात झालीये. याच जंगलाशी जोडून राहण्याची माझी इच्छा होती. 2012 साली मी ताडोबाच्या जुनोना वनक्षेत्रात फॉरेस्ट गार्ड या पदावर नियुक्ती झाली आणि माझे स्वप्न पूर्ण झाले. फॉरेस्ट गार्ड या पदावर काम करत असताना जवळपास 9 ते 10 वर्ष ते वनक्षेत्र मी जपलं. आता गेल्या दोन वर्षांपासून झरण रेंज मध्ये भटाडी बिट सांभाळतेय. मदतीला एक वनरक्षक, असे आम्ही दोघे मिळून तब्बल 1100 हेक्टर वनक्षेत्रावर लक्ष ठेवतो’’

जंगलामध्ये अवैध वृक्षतोड करणाऱ्यांसाठी, वन्यजीवांची शिकार करणाऱ्यांसाठी आणि वन्यप्राण्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी सोनी पंधरे ठिकठिकाणी कॅमरे लावतात.
दिलीप देठे हे वनरक्षक ‘वनपाल’ सोनी पंधारेसोबत गेल्या सात-आठ वर्षांपासून काम करत आहेत. आपल्या मॅडमबद्दल ते सांगतात की, सुरुवातीला मॅडम जॉईन झाल्या तेव्हा लेडीज आहेत, कसा निभाव लागणार त्यांचा या जंगलात असंच सगळ्या डिपाटईमेंटला वाटत होतं, जंगलात लेडीजनं एवढ्या धाडसानं काम करणं सोपी गोष्ट नाही. इथं पुरुष कर्मचारीदेखील काम करायला बिचकतात. पण पंधारे मॅडमच्या डिक्शनरीत घाबरणं हा शब्दच नाही. आम्हा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम त्या करतात.’
उत्तराखंडच्या नैनितालमध्ये लागलेल्या आगीचा विषय ताजा होता. या आगीच्या पार्श्वभूमीवर फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया (FSI)ने दिलेली माहिती चिंताजनक आहे. फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, भारतातील जवळपास 36 टक्के जंगलांना वारंवार आग लागते. हिवाळा संपल्यानंतर आणि उन्हाळी हंगामात कोरड्या वातावरणामुळे मार्च, एप्रिल आणि मेमध्ये आगीच्या मोठ्या घटना नोंदवल्या जातात. गेल्या काही वर्षांत तापमान प्रचंड वेगाने वाढत आहे. महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ते 48-50 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोहोचले आहे. हे तापमान जंगलाच्या आगीसाठी कारणीभूत ठरत आहे यात वाद नाही. तापमानात होणाऱ्या वाढीबरोबर जंगलाला लागणाऱ्या आगीचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढल्याचे दिसून आले.
आतापर्यंत जंगलातून होणाऱ्या तेंदुपत्ता आणि मोहाच्या संकलनाला वणव्यासाठी कारणीभूत ठरवले जात होते. मात्र, तापमानात होणारी वाढदेखील या वणव्यासाठी कारणीभूत ठरत आहे. उन्हाळ्यातील कोरडे तापमान आणि वेगात वाहणारे वारे यांमुळे जंगलात आगी पसरण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील 11 वर्षांत राज्यात तीन लाख 86 हजार 294.803 हेक्टर जंगल आगीत भस्मसात झाले आहे. इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट (ISFR) 2015 नुसार, देशाच्या जवळपास 6 टक्के वनाच्छादित भागात आग लागण्याची शक्यता जास्त आहे, ज्यात महाराष्ट्राचा चंद्रपूर आणि गडचिरोली हा पट्टा येतो. राज्यातील सर्वाधिक वनाच्छादित भाग असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आणि त्या खालोखाल चंद्रपूर जिल्ह्यात या हंगामात सर्वाधिक वणवे लागत आहेत.

अंधश्रद्धेतून जंगलात आग लावणे कसे चुकीचे आहे याबाबत सोनी पंधरे गावांमध्ये राहणाऱ्या स्थानिक आदिवासींना मार्गदर्शन करतात.
आग स्वतःहून कधीच लागत नाही, ती लावली जाते!
“जंगलात आग आपोआप कधीच लागत नाही, ती एकतर लावली जाते नाहीतर कुणाकडून तरी चुकून लागते.’’
जंगलाला आग का लागते हे सांगताना सोनी पंधारे मुनुष्याला अधिक जबाबदार धरते. जंगलाला लागलेली आग ही बहुतांशवेळा मानवनिर्मित असल्याचा दावा ती करते. सोनी म्हणते की, जंगलाला लागणारा वणवा हा नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दोन्ही प्रकारचा असतो. कधीकधी जंगलातून जाणाऱ्या विद्युत तारांमध्ये बिघाड झाल्यास ठिणगी पडूनही आग लागू शकते, उंच वाढलेल्या झाडांच्या मोठ्या फांद्यांचे एकमेकांवर घर्षण होऊन ठिणगी उडते आणि त्यातूनही वणवा पेटू शकतो. परंतू असे प्रकार अतिशय तुरळक घडतात असा माझा आजवरचा अनुभव आहे. तपासाअंती जंगलाला लागलेली आग ही शेवटी मानवनिर्मित असल्याचे उघडकीस येते. यामध्ये आदिवासी समाजात असलेल्या अंधश्रद्धाही काही अंशी जबाबदार असल्याचा आरोप सोनी पंधरे करते.
हे कसं काय, आदिवासी तर जंगलाचे रक्षणकर्ते आहेत मग ते या आगींसाठी कसे काय जबाबदार असू शकतात? हा प्रश्न जेव्हा सोनीला विचारला तेव्हा ती म्हणते. “चंद्रपूर जंगल परिसरात राहणाऱ्या स्थानिक आदिवासींच्या काही अंधश्रद्धा आणि गैरसमज आहेत. आदिवासींचं जगणं पूर्णपणे जंगलावर अवलंबून असतं हे तर तुम्हाला ठाऊकच आहे. आदिवासी भागातील अत्याश्यक गरजा या जंगलातून भागवल्या जातात. एकीकडे जंगल वणव्यांचा काळ, मोहाची फुलं वेचण्याचा हंगाम आणि तेंदुपत्ता संकलनाचा हंगाम एकाच वेळी येतो आणि म्हणूनच मोह फुल वेचण्याच्या काळात आणि तेंदुपत्ता संकलनाच्या काळात मोठ्या प्रमाणात आगीच्या घटना घडत असतात, असे आमचे आजवरचे निरिक्षण आहे.’’

ताडोबाच्या लागत असलेल्या झरण रेंजमध्ये वाघांची संख्या लक्षणीय आहे. (photo credit – Kamlesh Thakur)
“सरसकट सगळ्याच आदिवासी समाजाला यासाठी जबाबदार धरता येणार नाही, मात्र आगी लागण्याच्या काही घटनांचा तपास केला असता असे आढळून आले की, तेंदूपत्ता संकलन हा आदिवासी भागातील सर्वात मोठा रोजगार आहे. दरवर्षी या हंगामादरम्यान मोठ्या आकारीची तेंदूपाने मिळवण्यासाठी जंगलांना विनाकारण आग लावण्यात येते. तेंदूपत्ता ज्या भागात आहे त्या भागातही काही लोकं जंगलातून तेंदूपत्ता उपटतात आणि नवीन पाने उगवण्यासाठी या झाडांनाही आग लावली जाते. ती लहान झाडे पूर्णपणे जळून जातात आणि त्यानंतर त्यातून नवीन कोंब निघतो’’ अशी माहिती सोनी देते.
तेंदूपत्तासारखं आदिवासींच्या उत्पन्नाचं आणखी एक साधन म्हणजे महुआ… आदिवासींचा उदरनिर्वाह याच महुआवर अवलंबून असतो. ‘मोह’ हा उष्ण, कोरड्या जमिनीत येणारा पानझडी वृक्ष असून ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. मोहाची फुले पहाटे गोळा करतात आणि ती वाळवून, साठवून ठेवली जातात. जेव्हा रोख पैशांची गरज असेल, तेव्हा ती बाजारात विकतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीला या मोहाला कोंब फुटतो. त्यानंतर सारी पानं गाळून पडतात. काही दिवसांतच फांद्यांच्या देठांतून कळ्यांचे झुंबरच्या झुंबर लटकू लागतात. त्यात हळूहळू मोहाची फुले फुलू लागतात. साधारण मार्चचा शेवटचा आठवडा ते मेचा पहिला आठवडा मोहाची फुलं गळत राहतात. म्हणूनच महुआच्या झाडाखालचा परिसर स्वच्छ करण्यासाठी, झाडांखालची जमीन साफ करण्यासाठी आणि महुआला कीटकांपासून वाचवण्यासाठी शेकोटी पेटवतात. त्यामुळे लोकांना महुआची फुलं गोळा करणं सोपं जातं.

जंगलात वाघ, बिबट्या, अस्वल असे प्राणी असतात. त्यांच्या पायांच्या ठशांची ट्रेसपेपरवर नोंद घेतांना वनअधिकारी आणि सोनी पंधरे.
आग लावण्याची ‘निन्जा टेक्निक’ आणि वनखात्याची तारांबळ…
आग लावण्याचे इथल्या लोकांचे, दलालांचे आणि व्यापाऱ्यांचे प्रकार इतके विचित्र असतात की आम्हालाच आश्चर्याचा धक्का बसतो, असे हसत हसत सोनी सांगते. ही लोकं काय करतात की, जिथे पालापाचोळा जास्त असतो, तिथे एक पेटती अगरबत्ती रोवतात, अगरबत्तीच्या आजूबाजूला आगपेटीच्या काड्या ठेवतात, त्यावर पालापोचाळा टाकतात आणि पळ काढतात. हळूहळू आगपेट्यांच्या काड्या पेटायला लागतात आणि पालापोचाळा लगेचच आगीत सापडतो. आम्ही गंमतीत त्याला ‘निन्जा टेक्निक’ म्हणतो, सोनी माहिती देत असते.
निव्वळ अंधश्रद्धेमुळेच नव्हे तर लोकांचा हलगर्जीपणामुळेही कधीकधी जंगलाला आग लागते. जंगलात अनेक पायवाटा असतात, अनेक महामार्ग हे जंगलाच्या मधून जातात. प्रवासादरम्यान अनेक जणं रस्त्याच्या कडेला उभे राहून धूम्रपान करतात. आगपेटीची जळलेली काडी, उरलेली सिगारेट रस्त्यावर टाकून देतात. पण उन्हाळ्याच्या दिवसात कोरडा पडलेला पालापाचोळा लगेच आग पकडतो, अशी पुस्ती सोनी जोडते.

उंच मचाणवर बसून जंगलावर करडी नजर ठेवताना सोनी पंधरे.
आग लागल्यानंतरची अग्निपरीक्षा…
तब्बल 1100 हेक्टर वनक्षेत्र असलेल्या झरण रेंजमध्ये कुठल्यातरी कोपऱ्यात आग लागते आणि मग या वनक्षेत्राची जबाबदारी असलेले वनपाल सोनी पंधारे, वनरक्षक दिलीप देठे लगेचच कामाला लागतात. गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात आगी लागण्याचे काही प्रकार घडले होते, अशी माहिती सोनी देते.
“पूर्वी लांबून धूर दिसला की लगेचच त्या दिशेने धावायला लागायचं, परंतू आता टेक्नॉलॉजीमुळे काम जरा सोपं झालयं.’’
“आम्ही असेही दिवसभर जंगलात गस्त घालत असतो. आग लागल्याची घटना घडताच आमच्या मोबाईल वर ‘अलर्ट मॅसेज’ येतो. मेसेजद्वारे आम्हाला एक लिंक पाठवली जाते त्यात आग लागल्याची संभाव्य जागा आणि दिशा गुगल मॅपवर कळते. हे सगळं जवळच्या ऑफिसमधून अपडेट होतं आणि मग आम्ही लगेच बाईक वर ब्लोअर मशीन आणि पेट्रोल घेऊन आगीच्या दिशेने जातो. ब्लोअर मशीन ही पेट्रोलवर काम करते म्हणून पेट्रोल सोबत ठेवावं लागतं. पण यात प्रचंड धोका असतो. आग विझवताना अनेकदा मशीनच आग पकडते. काही वनपालांना या मशीनचा स्फोट होऊन जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे ब्लोवर मशीन फार सांभाळून हाताळावी लागते.’
एकीकडे जंगलात प्रत्यक्ष फिल्डवर वनरक्षक आग विझविण्यासाठी सदैव तैनात असतात. तर नागपूर येथील वनविभागाच्या मुख्यालयात जंगलातील आगींचा रिअल टाइम डाटा मिळविण्यासाठी कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जातं. “NASA च्या सॅटेलाईटवरुन ISRO च्या माध्यमातून माहिती फॉरेस्ट सर्वेला मिळत असते. या सॅटेलाईटमध्ये MODIS (Moderate Resolution Imaging Spectroradiometer) हे सेंसर आहे. जेव्हा या सॅटेलाईटचा भारतावरून प्रवास होतो, तेव्हा त्यांचा डाटा सेंस केला जातो. तो डेटा ISRO ला पाठवितात नंतर FSI ला पाठवितात. फॉरेस्ट सर्व्हे इंडियाच्या पोर्टलवरून वनविभाग हा डेटा घेतो. दिवसातून चार वेळा ही माहिती मिळते, अशी माहिती सोनी देते.
जंगलात वणवा पेटणे म्हणजे दारुगोळा असलेल्या सपाट भुईवर पेटलेली आगपेटी टाकण्यासारखी गोष्ट आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. ती आग कधीही कितीही प्रमाणात पसरू शकते. अशा परिस्थितीत पेट्रोलने भरलेली ब्लोअर मशीन पाठीवर घेऊन आग विझवणं म्हणजे मृत्यू पाठीवर घेऊन वन्यजीव वाचवण्यासारखं आहे. यापूर्वी ब्लोअर मशिनचा स्फोट होऊन काहींचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत, हे सांगताना सोनीच्या चेहऱ्यावर चिंता दिसते.
जंगलाच्याच संदर्भात चिंता व्यक्त करत सोनी म्हणाल्या की, “आग लागल्याने फक्त जंगलचं जळत नाही तर हजारो सूक्ष्मजीव यात नष्ट होतात. अनेकदा अशी परिस्थिती ओढवते की चारही बाजूने आग लागून मोठमोठे प्राणी किंवा वनाधिकारी आत अडकतात. आगीमुळे वाटा कळून येत नाही त्यामुळे अशावेळी मोठा धोका असतो. पण हा धोका आम्ही पत्करतो आणि आग विझवतो.”

गेल्या बारा वर्षांपासून जंगलाचं संरक्षण करणाऱ्या वनपाल सोनी पंधरे
रस्त्याच्या कडेला पडलेला पालापाचोळा आम्ही वेळोवेळी साफ करत असतो. रोडच्या दोन्ही बाजूने सहा मीटर अंतराच्या पट्ट्यात आम्ही कटाई करतो आणि तीन दिवसांनी तो कचरा जाळून घेतो. यामुळे कुणाकडूनही चुकून आग लागत नाही आणि लागली तरी ती पसरत नाही. हे काम आम्ही आम्हाला नेमून दिलेल्या वनक्षेत्राच्या हद्दीवरही करतो ज्यामुळे आग चुकून लागलेली असो वा लावलेली असो ती मोठ्या प्रमाणात पसरत नाही.
आग लावण्यासंदर्भात गावकरी म्हणतात…
सोनी पंधारे यांच्या सोबत जंगल फिरत असताना काही महिला तेंदूपत्ता वेचताना दिसल्या.त्यातल्या एकीचे नाव माया कार्लेकर… ‘आम्ही आमचं तेंदू वेचण्याचं काम करतो, आम्ही आग लावत नाही. आम्हालाही कळतं की जंगलात प्राणी वगैरे असतात. त्यामुळे आम्ही असं कसं करणार? आमचं पोटपाणी याच्यावर आहे. आम्ही आग लावतही नाही आणि कोण लावतं हेदेखील आम्हाला माहिती नाही.’ असे माया सांगत होती.
सोनी पंधारे गावागावांत जाऊन यासंदर्भात जनजागृती करतात. जंगलाचं संरक्षण हे सोनी यांच्यासाठी सर्वात महत्वाचं आणि जबाबदारीचं काम आहे. त्या वेळोवेळी विविध गावांमध्ये जाऊन तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या आणि त्यांच्यासह इतर गावकऱ्यांनाही बोलावून त्यांना महत्वाच्या सूचना देतात. स्थानिकांच्या अंधश्रद्धांबाबत जनजागृती करतात.

जंगलात तेंदूपत्ता वेचणाऱ्या स्थानिक आदिवासी महिला
आम्ही त्यांच्याबरोबर फिरत असताना त्या आम्हाला काही गावांमध्ये घेऊन गेल्या. तेथील गावकऱ्यांना एकत्र करून त्या सांगत होत्या की, जंगलात आग लागल्याने तेंदूपत्ता जास्त येत नसतो. जर तुम्हाला असं कुणी सांगत असेल तर साफ खोटं आहे. तेंदूपत्ता दरवर्षी यायचा तेवढाच येतो. त्यामुळे कुणीही जंगलात आग लावत जाऊ नका. यात जंगलसोबतच तुमचं ही फार मोठं नुकसान आहे. जंगल राहिलं तर आपण राहू. तुम्ही जळतन म्हणून जंगलातील बांबू किंवा इतर लाकडे घेऊन जाता पण जर आग लागली तर तेही जंगलात राहणार नाही.’
गावकरी फक्त माना डोलावतात…
सोनी पंधारे फक्त आगीसंदर्भातच नव्हे तर वन्यजीव आणि मानवाचा संघर्ष यावरही गावकऱ्यांशी हितगुज साधतात.
“कुठल्याही कामासाठी सकाळी सात वाजेच्या आत जंगलात प्रवेश करू नका. सकाळी पाच ते सात पर्यंत जंगलात वन्यप्राण्यांची हालचाल जास्त असते. यानंतरही जंगलात गेलात तर माणसाच्या चेहऱ्याचा मास्क डोक्याच्या मागच्या बाजूने लावा. यामुळे हिंस्र प्राण्यांना असं वाटतं की तुम्ही त्याच्याकडेच बघत आहात आणि तो तुमच्यावर हल्ला करणार नाही. जर अचानक समोर वाघ किंवा इतर प्राणी दिसला तर घाबरुन न जाता जोरात आवाज करा. तुम्ही मोठ्याने ओरडू शकता किंवा सोबत असलेल्या गोष्टींनी आवाज करू शकता. आवाजाने प्राणी दूर पळतात. जंगलात एकट्याने जाणे टाळा.
वन्यजीव आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी…
वन्यजीवांची शिकार आजही काही प्रमाणात सुरूच आहे. पण सोनी सांगतात की आम्ही याला आळा घालण्याचा कसोशीने प्रयत्न करतो. गावागावांमध्ये असे अनेक लोक आहेत जे पूर्वी जंगलात जाळे बसवून शिकार करायचे. पण आता त्यांनी ते काम थांबवलं आहे. आम्ही अशा लोकांना हाताशी घेऊन जंगलातील जाळे शोधतो. ही माणसं प्रचंड हुशार आणि जंगल जाणून असतात. कुठल्या वेळी कुठला प्राणी कुठल्या वाटेने कुठे जातो याची त्यांना जाण असते आणि शिकारीही अशाच ठिकाणी जाळे लावतात. यात वन्यप्राणी फसतात. आम्ही अशा लोकांच्या मदतीने जाळे शोधून काढतो.
शिकाऱ्यांकडून मेलेले पाळीव प्राणी जंगलात टाकले जातात आणि त्यावर ते विष टाकतात. यामुळे त्याला खायला आलेले वन्यजीव मृत्युमुखी पडतात. ज्याठिकाणी छोटे छोटे पाण्याचे स्थिर साठे असतील तिथेही शिकाऱ्यांकडून विष टाकलं जातं. ते पाणी पिऊनही प्राणी मरतात. गस्तीच्या वेळी आम्ही लिटमस पेपरच्या मदतीने पाणी तपासात असतो.

रस्त्यांवरून कुणी चुकून सिगारेट किंवा आगीची काडी फेकल्यावर आग जंगलात पसरू नये म्हणून सोनी वनमजुरांच्या मदतीने रस्त्याच्या दोन्ही कडेला कटाई आणि जलाई करून परिसर स्वच्छ करतात. (photo credit – Kamlesh Thakur)
प्राण्यांच्या हालचाली कैद करण्यासाठी किंवा त्यांचा वावर जाणून घेण्यासाठी ठिकठिकाणी आम्ही कॅमेरा बसवतो. यात त्यांच्या हालचाली तर कैद होतातच पण अनेकदा शिकारीही त्यात दिसून येतात. यामुळे आम्हाला त्यांच्या वाटा कळतात आणि आम्ही त्यांना पकडतो. आजवर अशा पद्धतीने आम्ही शिकारी आणि अवैध वृक्षतोड करणाऱ्यांना पकडलं आहे. अवैध वृक्षतोड, शिकार किंवा आग लावण्यासाठी मोठ्या शिक्षेची तरतूद असल्याने आणि याबाबत आम्ही जनजागृती करत असल्याने लोक जागृत होत आहेत. यामुळे हे प्रकार स्थानिकांकडूनतरी कमी होताना दिसून येत असल्याचं सोनी सांगतात.
(असर आणि बाईमाणूस यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘प्रोजेक्ट धरित्री’ उपक्रमांतर्गत ‘पर्यावरण बदल आणि लिंगभाव’ (Climate Change & Gender) या विषयावरची ही एक विशेष मालिका आहे.)






