नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जेव्हा अखिल भारतीय साहित्य संमेलन सुरू होणार आहे नेमक्या त्याच तारखांना विद्रोही साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून फक्त यंदाचे विद्रोही संमेलन छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न होणार आहे.
21-22-23 फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित 19व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्य व संस्कृतीचे अभ्यासक, इतिहास संशोधक व भाषातज्ञ डॉ. अशोक राणा (यवतमाळ) यांची निवड आज विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी यांनी पत्रकार परिषदेत घोषित केली. डॉ. अशोक राणा हे 18व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ग्रामीण साहित्यिक डॉ. वासुदेव मुलाटे यांच्याकडून सूत्रे हाती घेतील. यावेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे पदाधिकारी किशोर ढमाले व विद्रोही 19वे विद्रोही साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष इंजि. सतिश चकोर, निमंत्रक धनंजय बोरडे हे उपस्थित होते.
या संदर्भात मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत, दिल्लीचे मराठी साहित्य संमेलन हे भाजप सरकारचे आश्रित असल्याचा आरोप विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी यांनी त्या अखिल मराठी साहित्य संमेलनाच्या प्रक्रियेबाबत बोलतांना म्हणाल्या की, आधी राजकीय बनलेल्या अखिल भारतीय संमेलनाचे आता शासकीय आणि पक्षीय संमेलनात रूपांतर झाले आहे जे जनतेच्या हिताचे नाही, असा विद्रोही घणाघाती आरोप या पत्रकार परिषदेत केला.
विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने 1999 पासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या विरोधात विद्रोही मराठी साहित्य संमेलने आयोजित करण्यात येतात. महात्मा फुले यांच्या साहित्य संस्कृतीविषयक भूमिकेवर आधारित या विद्रोही साहित्य संमेलनाचे आयोजन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समोर त्याच दिवशी त्याच तारखांना व अनेकदा समोरासमोर करण्यात आले आहे. नाशिक, उदगीर, वर्धा व अमळनेर या ठिकाणी तर कोट्यावधींचा खर्च करूनही मंडपातील रिकाम्या खुर्च्यांमुळे खजील झालेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आता दिल्लीश्वरांच्या आश्रयाला गेले आहे.
विद्रोहीच्या अध्यक्षपदी डॉ. अशोक राणा तर उद्घाटक कंवल भारती
विद्रोही साहित्य संमेलन मात्र मराठी मातीत पाय रोवून विषमतावादी, शोषक संस्कृतीच्या विरोधात फुले, शाहू, आंबेडकरी भूमिका घेऊन खंबीरपणे लढत आहे; म्हणूनच 19वे अ.भा. विद्रोही मराठी साहित्य संमेलन छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील आमखास मैदानात मलिक अंबर नगरीत 21, 22 व 23 फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे.
सत्यशोधक समाजाचे 151 वे वर्ष, भारतीय प्रजासत्ताकाचे 75वे वर्ष यानिमित्ताने होणाऱ्या एकोणिसाव्या विद्रोही मराठी संमेलनाच्या अध्यक्षपदी मराठीतील लोकसाहित्य, संस्कृती व प्राच्यविद्या अभ्यासक,इतिहास संशोधक,भाषा तज्ञ, विचारवंत डॉ.अशोक राणा यांची निवड तर उद्घाटक म्हणून ख्यातनाम आंबेडकरवादी हिंदी साहित्यिक, समीक्षक, अनुवादक, विचारवंत कंवल भारती (दिल्ली) यांची निवड करण्यात आली असून छत्रपती संभाजीनगरात होणाऱ्या 19व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात तीन दिवस भरगच्च कार्यक्रम होणार असल्याचे या पत्रकार परिषदेत प्रा.प्रतिमा परदेशी व 19व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष इंजि. सतीश चकोर व मुख्य निमंत्रक एडवोकेट धनंजय बोरडे यांनी घोषित केली.
छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथील आमखास मैदानावर उभारलेल्या मलिकअंबर साहित्यनगरीत 2 भव्य सभामंडप असून 3 दालनांमध्ये बालमंच, युवा मंच यासह एकूण 4 विचार मंचावर विद्रोहीचे विविध कार्यक्रम होणार आहेत. "शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला" व "बिस्मिल्ला" या दोन नाटकांसह पुढील दोन दिवसांमध्ये विद्रोहीत 6 परिसंवाद, 14 गटचर्चा, एक विशेष व्याख्यान होईल. काव्य पहाट मैफिल, गझल संमेलन, अशी 4 कविसंमेलने व काही सत्रात साहित्यिक, विचारवंत, पत्रकारांशी साहित्य संवाद होईल.
सांस्कृतिक व कला प्रकारात आदिवासी गाणी, कला दर्शन, लोककलांचे सादरीकरण व महाराष्ट्र दर्शन इत्यादी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. कथाकथनांच्या कार्यक्रमासह दोन नाट्यवाचन, तीन एकपात्री प्रयोगासह दोन एकांकिकेचे सादरीकरण या मंचावर होणार आहे. युवा कलाकारांचे रॅप गीतांचे सादरीकरण लक्षवेधी ठरणार आहे. 
(डॉ.अशोक राणा)
विद्रोही संमेलनात भरगच्च कार्यक्रम
खास मंडपातील एकूण आठ कला दालनात चित्रकाव्य, शिल्पकला, सुलेखन, चित्रकला, कलात्मक फलकलेखन, रांगोळी, व्यंगचित्र अशा 8 कला प्रकारांचे लाईव्ह सादरीकरण व प्रदर्शन होईल. "संविधान आणि स्वातंत्र्य आंदोलनातील मुसलमान " या विषयावरील 2 पोस्टर प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील कथा, कविता, नाटक, ललित इत्यादी साहित्य प्रकारातील 200 हून अधिक निमंत्रित साहित्यिक उपस्थित राहणार असून 21 जिल्ह्यातील 75 लोकशाहीवादी विचारवंत, अभ्यासक, तसेच 10 कथाकथनकार आणि 4 इतिहासकार, 15 गजलकार, यांच्यासह 35 नाट्य व सिनेमालिका अभिनेते , एकपात्री नाटककार, एकांकिका नाट्यछटाकार, 123 निमंत्रित कवी, अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती साहित्यप्रेमींसाठी वैचारिक मेजवानी ठरणार आहेत.
महाराष्ट्रातील वारकरी, महानुभाव, लिंगायत, बौद्ध, आदिधर्म इत्यादी पाच धर्मपीठांचे प्रमुख प्रतिनिधी, तसेच 270 लोककलाकारांसह 15 गायक, शाहीर, भीमगीतकार, रॅप कलाप्रकारातील 7 युवा कलाकार, बोलीभाषांचे 20 अभ्यासक, 7 नामवंत पत्रकार आणि विद्रोहाच्या लेखणीची तोफ तयार करणारे चित्रकार राजानंद सुरडकर व शिल्पकार विकास सरवदे या कलाकारासह 7 शिल्पकार, 1 व्यंगचित्रकार, यांसह 2 चित्रकाव्यकर्ते, 5 चित्रकार, 4 पोस्टर प्रदर्शनकार, 2 सुलेखनकार, 2 फलकलेखनकार आपले योगदान देवून विद्रोही साहित्य चळवळीचा जागर यशस्वी करणार आहे.
या संमेलनात माजी संमेलनाध्यक्ष डॉ. प्रतिभा अहिरे, डॉ.प्रल्हाद लुलेकर, डॉ.वासुदेव मुलाटे, गणेश विसपुते हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच 1) भारतीय जाती व पुरुषप्रधान विषमतेला धर्म आणि संस्कृतीच्या आधारे दूर करता येणे शक्य आहे, 2) बोलीभाषा, प्रमाणभाषा, अभिजात भाषा आणि सांस्कृतिक वर्चस्वाचे राजकारण, 3) सोशल मीडिया अन्यायाविरुद्ध लढण्याचे साधन? 4) अंधकारमय काळात नवे विषय- नवी आव्हाने - नवे लेखन साहित्यिकांशी संवाद. 5) इतिहासाचे विकृतीकरणाविरुद्ध सत्य इतिहासकथन या पाच विषयांवरील परिसंवाद होणार आहेत.
अरविंद सुरवाडे,प्रा .मोहन बाबुळगावकर,प्रभू राजगडकर धर्मकीर्ती महाराज परभणीकर,कोर्णेश्वर आप्पाजी, डॉ वंदना महाजन, डॉ देवेंद्र इंगळे,डॉ. दिलीप चव्हाण, डॉ,लीलाधर पाटील, डॉ.पी.टी.गायकवाड, डॉ.अशोक नारनवरे, डॉ. शिवाजी हुसे, संध्या नरे-पवार, ॲड.वैशाली डोळस, प्राचार्य डॉ.संजय मून, प्रा.कोंडबा हटकर, सुनीता भोसले, शाहू पाटोळे, छाया बेले, डॉ. मारोती कसाब, आशा डांगे, डॉ.नवनाथ गोरे हे मान्यवर सहभागी होणार आहेत.
19व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात मराठी साहित्यिक, नाट्यकलावंत, लोककलावंत, कवी, नाटककार, ललित लेखक, 10,000 दहा हजाराहून अधिक रसिक फुले, शाहू, आंबेडकरी, अंधश्रद्धा निर्मूलन, शेतकरी, कामगार व विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ते तसेच आदिवासी क्षेत्रात काम करणारे संविधानिक मूल्यांसाठी लढणारे कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्षा प्रा.प्रतिमा परदेशी, स्वागताध्यक्ष इंजि. सतीश चकोर व मुख्यनिमंत्रक ॲड.धनंजय बोर्डे यांनी जाहीर केले.
(कंवल भारती)
विद्रोही संमेलन कशासाठी?
विद्रोही सांस्कृतिक चळवळ 1999 पासून महाराष्ट्रभर कार्यरत आहे. महात्मा जोतिराव फुले यांनी ग्रंथकार सभेस पाठविलेले पत्र हा विद्रोहीचा वैचारिक जाहीरनामा आहे. न्या.म.गो. रानडेंनी ग्रंथकार सभेत सहभागी होण्याचे निमंत्रण म. जोतीराव फुले यांना दिले; तेव्हा ‘‘तुमच्या ग्रंथांमध्ये अखिल मानवाचे हित होईल याचे बीज नाही.’’ असे म्हणत म. फुलेंनी ‘‘उंटावरून शेळ्या वळणार्या घालमोड्या दादाच्या’’ त्या संमेलनात सहभागी होण्यास ठाम नकार दिला होता.
आमचे ग्रंथकार तयार होतील, तेव्हा ते स्वाभिमानाने आपली संमेलने भरवतील असेही म्हटले होते. ग्रंथकार सभेचे 20 व्या शतकातील स्वरूप म्हणजे अ.भा. मराठी साहित्य संमेलन आहे. अ. भा. साहित्य संमेलन आणि महामंडळ यांचा आजवरचा व्यवहार हा विषमतावादी राहिला आहे.
संयुक्त महाराष्ट्राचे सेनानी शाहीर अण्णाभाऊ साठे, शा. गव्हाणकर, शा. अमर शेख, शा. वामनदादा कर्डक,शा. यशवंत चकोर, क्रांतीसिंह नाना पाटील, भाई उद्धवराव पाटील, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, यांना संमेलनासाठी साधे निमंत्रणही न देणे; उलट अनेक दांभिकांना अध्यक्षपदे बहाल करणे, स्वातंत्र सैनिक व थोर गांधीवादी नयनतारा सहेगल यांना यवतमाळला उद्घाटक म्हणून बोलावून नंतर अपमानित करणे, संविधान जाळण्याचे समर्थन करणारांना प्रतिष्ठा देणे अशी अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या विषमतावादाची असंख्य उदाहरणे आहेत.
किंबहुना विषमतावादी सांस्कृतिक राजकारणाचे ते मूखंडच आहे. म्हणूनच ब्राह्मणी, भांडवली, पुरुषत्ताक मूल्य आणि विषमतावादी सांस्कृतिक विचारांचा विषारी प्रचार-प्रसार करणार्या संस्था, संघटना व संमेलनाच्या विरोधात भूमिका घेण्याचा फुले-आंबेडकरांचा संदेश मानून विचार व संघटित कृती केली पाहिजे, या हेतूने गेल्या काही वर्षांपासून विद्रोही साहित्य संमेलन आयोजित करण्यात येत आहे.






