संजना खंडारे
- छत्रपती संभाजीनगर शहराजवळील हर्सूल तलाव आणि टेंभापुरी धरण ही ठिकाणं सध्या पर्यटन आणि विरंगुळ्याची केंद्रे म्हणून ओळखली जात असली, तरी त्याच ठिकाणी वाढत्या बुडण्याच्या घटनांनी गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत.
- गेल्या काही वर्षांत आणि विशेषतः मागील काही आठवड्यांत घडलेल्या सलग दुर्घटनांमुळे या भागातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
- दरवर्षी अनेक तरुणांचा बुडून मृत्यू होत असताना, यामागची नेमकी कारणं काय आहेत, प्रशासनाची भूमिका काय आहे आणि नागरिकांची जबाबदारी किती आहे, याचा सखोल आढावा घेणारा हा ग्राउंड रिपोर्ट.
घटना पहिली (५ एप्रिल २०२६): हर्सूल तलावात एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या दुर्घटना घडल्या. पोहत असताना दोन मित्र बुडू लागल्याचे पाहून त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या तिसऱ्या तरुणाचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत अफान खान (१७) आणि आदिल शेख (१३) यांचा समावेश होता. दरम्यान, याच वेळी तलावाच्या दुसऱ्या बाजूला एका व्यक्तीने उडी घेत आत्महत्या केल्याचीही घटना घडली.
घटना दुसरी (२६ एप्रिल २०२६): छावणी परिसरातील प्रिन्स आशेर श्रीसुंदर (१९) हा तरुण मित्रांसोबत टेंभापुरी धरणावर फिरण्यासाठी गेला होता. पोहत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो खोल भागात ओढला गेला आणि त्याचा मृत्यू झाला.
घटना तिसरी (१ मे २०२६): कामगार दिनाची सुट्टी साजरी करण्यासाठी वाळूज एमआयडीसीतील नऊ मित्र टेंभापुरी धरणावर गेले होते. यावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने शैलेश जोगदंड (२५), शैलेश हेलसकर (२४) आणि आविष्कार लोखंडे (२५) या तिघांचा बुडून मृत्यू झाला.
या तिन्ही घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहेत. केवळ महिनाभराच्या कालावधीत सात तरुणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मात्र, या घटना केवळ अलीकडच्या नाहीत. शहरातील हर्सूल तलाव आणि टेंभापुरी धरण परिसरात गेल्या वर्षभरात अंदाजे ३० ते ४० जणांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या वाढत्या दुर्घटनांमागे नेमकी कारणं काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी ‘बाईमाणूस’च्या टीमने टेंभापुरी धरण आणि हर्सूल तलाव परिसरात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
पाण्याच्या शांत पृष्ठभागाखाली इतका भीषण धोका दडलेला असेल, याची कल्पनाही येथे येणाऱ्या कोणालाही पहिल्या नजरेत होत नाही. टेंभापुरी धरणाच्या काठावर उभं राहिल्यावर सगळं काही शांत, निवांत आणि रमणीय भासतं. मात्र, याच पाण्याने अनेकांचे प्राण घेतले आहेत. काहींसाठी ही केवळ सहलीची जागा असली, तरी इतरांसाठी ती आयुष्यभराची जखम बनली आहे. ‘बाईमाणूस’ टीम जेव्हा प्रत्यक्ष पाहणीसाठी टेंभापुरी आणि हर्सूल परिसरात पोहोचली, तेव्हा या शांततेमागे दडलेली भीती, वेदना आणि दुर्लक्षाची कहाणी हळूहळू उलगडत गेली.
टेंभापुरी धरण आणि हर्सूल तलाव परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर तरुण बुडण्यामागची कारणं नेमकी काय आहेत? स्थानिक ग्रामस्थ आणि नागरिक याबाबत काय सांगतात? आणि अशा घटना टाळण्यासाठी प्रशासन कोणती पावलं उचलत आहे?
टेंभापुरी दुर्घटना: सुट्टीचा दिवस ठरला जीवघेणा
१ मे २०२६ कामगार दिनाची सुट्टी साजरी करण्यासाठी वाळूज एमआयडीसी परिसरातील नऊ मित्रांनी टेंभापुरी धरणावर जाण्याचा बेत आखला होता. नेहमीप्रमाणे फिरणं, फोटो काढणं आणि पाण्यात थोडा वेळ घालवणं या उद्देशाने ते सकाळी धरण परिसरात पोहोचले. सुरुवातीला सगळं काही सुरळीत सुरू होतं. काहीजण पाण्याच्या काठावर बसले होते, तर काहीजण हळूहळू पाण्यात उतरले. मात्र, काही वेळातच परिस्थिती अचानक बदलली.
मृत शैलेश जोगदंड (२५), शैलेश हेलसकर (२४)
पाण्याची खोली लक्षात न आल्याने तिघे जण पुढे गेले आणि ते अचानक खोल भागात अडकले. पाण्याखाली असलेल्या खोल खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांना बाहेर येता आलं नाही. इतर मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, आरडाओरडा केला, मदतीसाठी हाक मारली. मात्र, काही क्षणांतच परिस्थिती हाताबाहेर गेली. या घटनेत शैलेश जोगदंड (२५), शैलेश हेलसकर (२४) आणि आविष्कार लोखंडे (२५) या तिघांचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि प्रशासन घटनास्थळी पोहोचले. शोधमोहीम राबवून काही वेळानंतर तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, टेंभापुरी धरणातील वाढत्या दुर्घटनांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
टेंभापुरी धरण: अंधश्रद्धेपलीकडील वास्तवाचा शोध
टेंभापुरी गावात पोहोचल्यावर दुपारचं कडक ऊन जाणवत होतं. गावातील रस्ते जवळपास ओस पडलेले, काही ठिकाणीच मोजकीच माणसं दिसत होती. ग्रामपंचायत कार्यालयही त्या वेळेला बंद होतं. उन्हाच्या तीव्रतेमुळे बहुतांश ग्रामस्थ घरातच होते. स्थानिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता अनेक जण बोलण्यास तयार नव्हते. काही महिलांना आम्ही धरणासंदर्भातील घटनांबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आलो आहोत असं सांगताच त्या लगेच घरात निघून गेल्या. मात्र, एका महिलेच्या बोलण्यातून गावात या घटनांबाबत भीती आणि अंधश्रद्धेची छाया असल्याचं स्पष्टपणे जाणवलं. गावात उघडपणे याबाबत बोलण्यासही लोक टाळाटाळ करत होते.
या गावातील अर्चना ढाले (नाव बदलले आहे) ‘बाईमाणूस’शी बोलतांना सांगतात,
“या सगळ्या घटनांमुळे गावात एक वेगळीच भीती पसरलीये. लोकं जास्त बोलायला तयार नसतात. काहीतरी अपशकुन आहे असंच सगळ्यांना वाटतं. म्हणूनच बाहेरच्यांशी याबद्दल बोलायलाही लोक घाबरतेयेत. एकाच आठवड्यात सात मुलं बुडून मेले म्हणजे नक्कीच त्या ठिकाणी काही तरी असणार. आम्ही तर आमच्या मुलांना तिकडे फिरकू पण देत नाही. आणि रात्री सातच्या नंतर ज्यांची शेत त्या भागात आहेत ते पण जात नाहीत,” असं त्या महिलेने सांगितलं. तिच्या या बोलण्यातून गावावर अंधश्रद्धेची छाया असल्याचं स्पष्टपणे जाणवलं.
मात्र, गावातील काही तरुण आणि जाणकार नागरिकांनी यामागचं वास्तव मांडलं. त्यांच्या मते, या परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात अवैध माती उपसा सुरु आहे. पूर्वी इथे पाणी इतकं खोल नव्हतं. पण माती काढल्यामुळे खाली मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत,” असं एका स्थानिक तरुणाने सांगितलं.
हे खड्डे पाण्याच्या वरून अजिबात दिसत नाहीत. त्यामुळे बाहेरून पाणी साधं आणि सुरक्षित वाटतं. मात्र, दोन-तीन पावलं पुढे गेल्यावर अचानक २० फूट खोल भाग सुरू होतो. पाण्यात उतरलेली व्यक्ती त्या खड्ड्यात गेल्यावर घाबरते, तोल जातो आणि बाहेर पडणं कठीण होतं. स्थानिकांच्या मते, प्रशासनाकडून या अवैध माती उपशावर पुरेशी कारवाई झाली नाही. तसेच, धोकादायक भागांची कोणतीही स्पष्ट खूण किंवा सूचना नसल्यामुळे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना धोका ओळखता येत नाही. या सर्व चर्चांमधून एक बाब स्पष्ट होते की, टेंभापुरी धरण परिसरात घडणाऱ्या घटनांबाबत अंधश्रद्धा आणि वास्तव यामध्ये मोठा गोंधळ आहे. परिणामी, या दुर्घटनांमागील नेमकी कारणं अजूनही स्पष्टपणे समोर आलेली नसून अनेक प्रश्न अनुत्तरितच राहिले आहेत.
हर्सूल तलाव: पर्यटन स्थळ की वाढता धोका?
छत्रपती संभाजीनगर शहराच्या जवळ असलेला हर्सूल तलाव हा गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांसाठी विरंगुळ्याचं ठिकाण राहिला आहे. सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येणारे ज्येष्ठ नागरिक, संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ घालवणारे नागरिक, तसेच विकेंडला पिकनिकसाठी येणारे तरुण. अशा विविध वयोगटातील लोकांची येथे कायम वर्दळ दिसते. शहराच्या गोंगाटापासून दूर, शांत वातावरण आणि पाण्याचा नजारा यामुळे हा तलाव अनेकांसाठी आकर्षणाचं केंद्र बनला आहे.
मात्र, या तलावाचं हेच आकर्षण आता धोक्यात रूपांतरित होत असल्याचं चित्र समोर येतंय. स्थानिक नागरिक भूषण म्हसलेकर याच्या मते,
"पूर्वी लोक इथे फक्त फिरायला यायचे, काठावर बसून वेळ घालवायचे. पण गेल्या काही वर्षांत पाण्यात उतरणाऱ्यांची संख्या वाढलीये आणि त्याचबरोबर दुर्घटनाही वाढल्या आहेत. दरवर्षी साधारण 10 ते 15 जण बुडाल्याच्या घटना ऐकायला मिळतात. काही वेळा तर सलग दोन-तीन घटना घडतात.”
हर्सूल तलावात मृत तरुणांचा शोध घेतांना आपत्ती व्यवस्थापक पथक
ते पुढे म्हणाले, “सगळ्यात मोठी समस्या म्हणजे लोकांना पाण्याची खोलीच समजत नाही. अनेक ठिकाणी गाळ साचलेला आहे, तर काही भागात पाय घसरतो. बाहेरून आलेल्या लोकांना या गोष्टींची काहीच माहिती नसते. गेल्या वर्षभरात या घटनांमध्ये आणखी वाढ झालीये. प्रशासनाने फक्त सूचना फलक लावलेत. पण अजूनही ठोस व्यवस्थानाही. एखादी घटना घडली की काही दिवस हालचाल होते, आणि मग पुन्हा सगळं पूर्ववत होतं.” त्यांच्या या प्रतिक्रियेतून तलाव परिसरातील वाढत्या धोक्याचं आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाचं वास्तव अधोरेखित होतं..
अलीकडील (५ एप्रिल २०२६) रोजी घडलेली घटना याचं ठळक उदाहरण आहे. पोहत असताना दोन मित्र बुडू लागल्याचे पाहून त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या तिसऱ्या तरुणाचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे तलावातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. प्रत्यक्ष पाहणीदरम्यान तलाव परिसरात कोणतीही ठोस सुरक्षा व्यवस्था नसल्याचं स्पष्टपणे जाणवतं. एकीकडे हा तलाव नागरिकांसाठी विश्रांतीचं ठिकाण आहे, तर दुसरीकडे वाढत्या दुर्घटनांमुळे तो हळूहळू धोकादायक ठिकाण म्हणूनही ओळखला जाऊ लागला आहे.
वेदना अजूनही जिवंत…
या दुर्घटनांनी अनेक कुटुंबांवर न भरून येणाऱ्या जखमा केल्या आहेत. काही मिनिटांच्या निष्काळजीपणामुळे घरातील तरुण मुलगा गमावण्याची वेळ आलीये. छ. संभाजीनगर जिल्ह्यातील न्यू हनुमान नगर परिसरातील कावेरी दिवेकर या महिलेच्या मुलाचा २ वर्षांआधी हर्सूल तलावात बुडून मृत्यू झाला होता. त्या ‘बाईमाणूस’शी बोलतांना सांगतात, "तो मित्रांसोबत फक्त फिरायला गेला होता. आम्हाला वाटलंच नव्हतं की तो परत येणार नाही. जर तिथे योग्य सुरक्षा व्यवस्था असती, तर कदाचित माझा मुलगा आज जिवंत असता.”
प्रशासनाचे प्रयत्न अपुरे का ठरतात?
हर्सूल तलाव आणि टेंभापुरी धरण परिसरात वाढत्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेकडून अधूनमधून जनजागृती मोहीम राबवली जाते. विशेषतः उन्हाळा आणि सुट्ट्यांच्या काळात नागरिकांना पाण्यात न उतरण्याचे आवाहन करण्यात येते. काही ठिकाणी गस्त वाढवली जाते, तर धोकादायक भागांमध्ये जाण्यास मनाई असल्याचेही सांगितले जाते.
टेंभापूरी धरण परिसरात सूचन फलक लावण्यात आलेले आहेत
याबाबत बोलताना पोलीस निरीक्षक स्वाती केदार म्हणाल्या,
“आम्ही वारंवार नागरिकांना धोकादायक ठिकाणी जाण्याबाबत सूचना देतो. विशेषतः तरुणांनी पाण्यात उतरताना काळजी घेणं गरजेचं आहे. अनेकदा सूचना देऊनही लोक दुर्लक्ष करतात, ही चिंतेची बाब आहे. या ठिकाणांचा परिसर मोठा असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी कायमस्वरूपी बंदोबस्त ठेवणं शक्य होत नाही. मात्र, घटना घडू नयेत यासाठी पोलीस आणि प्रशासनाकडून नियमित जनजागृती आणि गस्त वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत."
मात्र, प्रत्यक्षात या उपाययोजना अपुऱ्या ठरत असल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. दरवर्षी घडणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
सुरक्षा उपायांचा अभाव
प्रत्यक्ष पाहणीदरम्यान हर्सूल तलाव आणि टेंभापुरी धरण या दोन्ही ठिकाणी काही गंभीर त्रुटी स्पष्टपणे समोर आल्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या ठिकाणी कुठेही प्रशिक्षित सुरक्षारक्षक उपलब्ध नाहीत. एखादी दुर्घटना घडल्यास तात्काळ बचावकार्य सुरू होण्यासाठी वेळ लागतो. तलाव आणि धरण परिसरात काही ठिकाणी सूचना फलक दिसतात. मात्र अनेक ठिकाणी धोकादायक भागांची कोणतीही स्पष्ट खूण केलेली नाही. याशिवाय, तलावाच्या काठावर मजबूत कुंपण नसल्यामुळे कोणीही सहजपणे पाण्याजवळ जाऊ शकतो. विशेषतः तरुणांमध्ये साहसीपणाच्या नादात धोकादायक भागात जाण्याची प्रवृत्ती दिसून येते.
या सर्व त्रुटी केवळ स्थानिक पातळीपुरत्या मर्यादित नाहीत. महाराष्ट्रात दरवर्षी शेकडो जण बुडून मृत्युमुखी पडतात. आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित उपलब्ध माहितीनुसार, राज्यात दरवर्षी अंदाजे 1,500 ते 2,000 लोकांचा बुडून मृत्यू होतो, यामध्ये मोठ्या प्रमाणावर तरुणांचा समावेश असतो. उन्हाळा आणि सुट्ट्यांच्या काळात या घटनांमध्ये विशेष वाढ होते. विशेष म्हणजे, अशा अनेक घटना पर्यटनस्थळे, तलाव, धरणे आणि नदीकाठच्या भागात घडतात, जिथे मूलभूत सुरक्षा उपायांची कमतरता असते. या पार्श्वभूमीवर हर्सूल तलाव आणि टेंभापुरी धरण येथील परिस्थिती पाहता, तातडीने ठोस सुरक्षा उपाययोजना राबवण्याची गरज असल्याचं स्पष्टपणे जाणवतं. अन्यथा, अशा दुर्घटना रोखणं कठीण आहे.
नागरिकांनी स्वतःची काळजी घेणं गरजेचं...
हर्सूल तलाव आणि टेंभापुरी धरण परिसरात घडणाऱ्या या दुर्घटनांसाठी केवळ प्रशासनालाच जबाबदार धरता येणार नाही, तर नागरिकांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे. प्रत्यक्ष पाहणी आणि स्थानिकांशी संवादातून अनेक ठिकाणी निष्काळजीपणाचे प्रकार स्पष्टपणे दिसून आले. अनेक तरुणांना पोहता येत नसतानाही ते पाण्यात उतरतात. काहीजण मित्रांच्या दबावामुळे किंवा साहसीपणाच्या नादात खोल भागात जाण्याचा प्रयत्न करतात. याशिवाय, मद्यप्राशन करून धोकादायक ठिकाणी जाण्याचे प्रकारही स्थानिकांनी सांगितले, जे अपघातांची शक्यता अधिक वाढवतात.
तसेच, काही जण सोशल मीडियासाठी फोटो किंवा व्हिडिओ काढताना धोकादायक काठावर उभे राहतात किंवा पाण्यात पुढे जातात. या क्षणिक आकर्षणासाठी घेतलेला धोका अनेकदा जीवघेणा ठरतो. या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे अपघातांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनासोबतच नागरिकांनीही स्वतःची जबाबदारी ओळखून अधिक सतर्क राहणं अत्यंत गरजेचं आहे.
हर्सूल तलाव आणि टेंभापुरी धरणातील वाढत्या दुर्घटना या केवळ अपघातांची मालिका नाही, तर एक गंभीर इशारा आहे. एका बाजूला अंधश्रद्धा, निष्काळजीपणा आणि माहितीचा अभाव आहे, तर दुसऱ्या बाजूला अपुरी सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासनाची मर्यादा आहे. या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामामुळे दरवर्षी अनेक निष्पाप जीव गमवावे लागत आहेत. या ग्राउंड रिपोर्टमधून एक गोष्ट स्पष्ट होते, हे अपघात टाळता येण्यासारखे आहेत. मात्र, त्यासाठी केवळ घटना घडल्यानंतर हालचाल करून चालणार नाही, तर आधीच ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना राबवणं गरजेचं आहे.
सुरक्षा व्यवस्था मजबूत करणं, अवैध माती उपसा रोखणं, धोकादायक भाग स्पष्टपणे दर्शवणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नागरिकांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण करणं या सर्व गोष्टी एकत्रितपणे करणं आवश्यक आहे. अन्यथा, शांत दिसणाऱ्या या पाण्याखाली अजून किती जणांचे जीव जाणार हा प्रश्न पुढेही तसाच उभा राहणार आहे.






