विठ्ठल साबळे
पहाटे पाच वाजता गणेश डकले यांची झोप उघडते. शेतकऱ्याच्या दिवसाची सुरुवात पूर्वीसारखीच होते, पण यंदा एक गोष्ट बदलली आहे, पाऊस आलेला नाही. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गेवराई गुंगी गावात जूनचा पंधरवडा उलटून गेला, तरी मान्सूनचा पत्ता नाही. शेत नांगरून तयार आहे, खत-बियाण्यांवर ३५ हजार रुपये खर्च झाले आहेत, विहिरीचा तळ उघडा पडला आहे आणि बँकेच्या व्याजाचं मीटर मात्र सुरू आहे. पाऊस लांबल्यावर एका शेतकऱ्याचा दिवस कसा जातो, त्याच्या घरात, शेतात, गोठ्यात आणि मनात नेमकं काय घडतं, हे समजून घेण्यासाठी ‘बाईमाणूस’ने शेतकरी गणेश डकले यांच्यासोबत तब्बल २४ तास घालवले आणि समोर आली त्याची एक अस्वस्थ रोजनिशी…
गेवराई गुंगी गाव (वेळ: पहाटे ५:३० ते सकाळी ८:३०)
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गेवराई गुंगी गाव अजून पूर्णपणे जागं झालेलं नव्हतं. जूनचा पंधरवडा सरत आला, तरी हवेतला उन्हाळ्याचा कडाका रात्रीही जाणवतोय. गावाच्या पाठीवर रात्री पसरलेले उन्हाचे चटके पहाटेही हवेला थंड होऊ देत नाहीत. पहाटेचे बरोबर पाच वाजले. अशा वातावरणातही अंगणात टाकलेल्या खाटेवर गणेश डकले यांनी कुस बदलली. अंगाखाली असलेली जुन्या सुती साड्यांची आणि जीन्सच्या जाड कापडाची गोधडी घामाने पूर्णपणे ओलसर झाली होती. ग्रामीण भागात शेतकऱ्याच्या शरीराला आणि डोळ्यांना जाग येण्यासाठी कोणत्याही अलार्मची गरज नसते. रात्री कितीही उशिरा डोळा लागला, तरी मातीशी इमान राखणाऱ्या बळीराजाचे शरीर पहाटे पाचला आपोआपच ताठ होते.
खाटेवरून उठल्या उठल्या गणेश यांचा हात सर्वात आधी शेजारी ठेवलेल्या जुन्या अँड्रॉइड मोबाईलकडे गेला. डोळे चोळत त्यांनी सर्वात आधी मोबाईल टेडा ऑन केला आणि 'व्हॉट्सॲप' उघडलं. त्यांच्या गावातीलच काही तरुणांनी शेतकऱ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुप्सवर प्रादेशिक हवामान खात्याचे अंदाज आणि उपग्रहाचे नकाशे असलेले मेसेजेस पाठवले होते. गणेश ते पाहू लागले. स्क्रीनच्या उजेडात गणेश यांच्या चेहऱ्यावर बारीक सुरकुत्या उमटल्या. तिथं पावसाच्या ढगांऐवजी फक्त वाढत्या तापमानाचा आकडा आणि कोरड्या उन्हाचा इशारा देणारा पिवळा रंग चमकत होता. गणेश यांनी एक दीर्घ श्वास घेतला, मोबाईलची स्क्रीन बंद केली आणि रागानेच तो बाजूला फेकला. इंटरनेटवरील उपग्रहाचे अंदाज आणि हवामान खात्याचे सॅटेलाईट फोटो कितीही अचूक असले, तरी ते त्यांच्या तीन एकर कोरड्या जमिनीला पाण्याचा एक थेंबही देऊ शकत नाहीत, हे त्यांच्या चेहऱ्यावरील शांततेतून स्पष्ट दिसत होते.

"गेल्या वर्षी जूनपर्यंत आमच्या गावात मान्सूनचा पहिला जोरदार पाऊस होऊन गेला होता," गणेश खाटेवरून पाय खाली सोडत म्हणाले. गेल्या वर्षीच्या पावसाची तुलना करताना ते म्हणाले " गेल्या वर्षी कपाशीची पेरणी पूर्ण झाली होती आणि जमिनीत हिरवे कोंब दिसायला सुरुवात झाली होती. यंदा मात्र आम्ही अजून आभाळाकडे तोंड करून बसलोय."
जून संपत आला, पावसाचे चिन्ह दिसत नाही, अशा परिस्थितीत राज्याच्या शेतकरी किती हतबल झाला आहे हे पाहण्यासाठी… एव्हाना पेरणी पूर्ण होणे गरजेचे असताना पावसाअभावी या जून महिन्यात बळीराजाचा दिवस कसा जातो हे अनुभवण्यासाठी ‘बाईमाणूस’ची टीम अगदी पहाटेपासूनच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गेवराई गुंगी गावातील गणेश डकले या शेतकऱ्याच्या घरी दाखल झाली होती.
गणेश खाटेवरून खाली उतरले आणि त्यांनी अंगणात पाऊल ठेवले. त्यांच्या घरात पाऊल जमिनीवर पडताच पायाला जमिनीची गरम वाफ जाणवते. जून महिना संपत आला तरी हवेत गारव्याचा एक कणही नव्हता. गणेशने विहिरीच्या उरल्यासुरल्या कोमट पाण्याने तोंड धुतलं आणि हातात रिकामी बादली घेऊन थेट घराबाहेरच्या गोठ्याकडे वळले. गोठ्यात बांधलेल्या दोन गाई आणि एका म्हशीचं फुरफुरणं पहाटेच्या अंधारात ऐकू आलं. जनावरांनाही या असह्य उकाड्याचा तितकाच त्रास होत असतो. पुढचे दीड-दोन तास गणेश पूर्णपणे जनावरांच्या गोठ्यात घालवतात. गोठ्यातील शेण काढणं, गोमूत्राने ओला झालेला पाला बाजूला करणं, गोठा स्वच्छ करणं आणि गव्हाणीत सुका कडबा टाकणं, हा त्यांचा रोजचा पायाभूत दिनक्रम सुरू होतो. या कामाच्या दगदगीत त्यांच्या शरीरातून घामाच्या धारा वाहू लागतात, पण त्यांचं मन आणि नजर वारंवार पूर्वेकडच्या कोरड्या आभाळाकडे जात राहतं, जिथं पावसाच्या ढगांची एक रेघही दिसत नसते….
गणेश एक रिकामी स्टीलची बादली आणि ग्लासभर पाणी घेऊन म्हशीचे दूध काढायला बसतात. दुधाची धार बादलीच्या तळावर पडताना 'चर्र चर्र' असा आवाज येतो. गणेश बादली घेऊन उभे राहतात आणि अत्यंत हतबलतेने म्हणतात,
"बघा विठ्ठल भाऊ, दरवर्षी गोठ्यात मुबलक ओला चारा असायचा. जनावरांच्या कासेला दूध असायचं आणि ही बादली पाच मिनिटांत फेस येऊन भरत होती. मागे दोन्ही वेळचं मिळून दिवसाला १० ते १२ लिटर दूध सहज निघायचं. आज मात्र गोठ्यात सुक्या कडब्याशिवाय काहीच नाही."
यंदा परिस्थिती अत्यंत बिकट आहे. हिरवा चारा नसल्यामुळे आणि उन्हाच्या त्रासामुळे जनावरांचं दूध निम्म्यावर आलयं. कसाबसा ४ ते ५ लिटरचा आकडा गाठताना गणेश यांच्या नाकी नऊ येतात. दुधाची ही घटलेली धार म्हणजेच त्यांच्या रोजच्या जगण्यातील घटलेली रोकड आहे, हे समजण्यासाठी कोणत्याही अर्थतज्ज्ञाची गरज नाही. दूध काढून झाल्यावर ते किटली घेऊन अंगणात येतात. त्यांची पत्नी शारदा डकले कपाटाजवळून दूध मोजायचं माप आणते आणि ते दूध किटलीत भरून ठेवलं जातं.
त्यांची पत्नी शारदा कपबशीत वाफाळलेला चहा आणून देते. गणेश ओट्यावर बसून चहाचा पहिला घोट घेतात. चहा गरम आहे, पण त्याहूनही जास्त गरम विचार त्यांच्या डोक्यात सुरू असावेत, कारण चहा पिता पिता त्यांची नजर अंगणात कोपऱ्यात व्यवस्थित रचून ठेवलेल्या कापूस आणि मक्याच्या बियाणांच्या थैल्यांवर एकटक लागली आहे. नेमक्या याच वेळी माझी नजर स्वयंपाकघराच्या उंबरठ्यापाशी काम करणाऱ्या शारदा डकले यांच्या अहोरात्र चालणाऱ्या संघर्षावर खिळली होती. ग्रामीण भागात पाऊस लांबला की पुरुषाच्या डोक्यात बँकेचे आकडे आणि खताच्या गोण्या फिरतात, पण घरातल्या 'बाईमाणूस'ला मात्र पाण्याचा थेंब अन् थेंब गोळा करण्यासाठी थेट निसर्गाशी लढावा लागतो. शारदा काहीच बोलत नव्हत्या, पण ओढणीच्या टोकाने कपाळावरचा घाम पुसत त्यांची नजर अंगणातल्या त्या निम्म्या रिकाम्या दुधाच्या किटलीवर गेली होती. या आधी घरात विरजणाचा, दुधा-दह्याचा एक समृद्ध वास असायचा; तिथं आज पोरांना चहा पुरवतानाही होणारी घालमेल तिच्या शांत, हालचालींमधून थेट दिसत होती. तिनं मुकाट्याने कोपऱ्यात ठेवलेले ताक घुसळायचे रिकामे मडके बाजूला सारले आणि ओसरीवर मांडून ठेवलेल्या पाण्याच्या रिकाम्या हंड्यांकडे पाहिले. विहिरी कोरड्या पडल्याने पाण्यासाठी होणारी वणवण तिच्या थकलेल्या पायांवर स्पष्ट उमटली होती. आकड्यात नजर लावून बसलेल्या नवऱ्याच्या चेहऱ्यावरील चिंता तिने एका नजरेत टिपली, मनातली भीती दाबून तिने पुन्हा चुलीत लाकडे ढकलली, आणि काहीही न बोलता ती पुन्हा त्या धुराच्या विळख्यात हरवून गेली.

गणेशच्या घरात खतांच्या गोण्या रचून ठेवल्या होत्या. पण यंदा जून संपत आला तरी त्या गोण्या ओसरीवर ठाण मांडून पडून आहेत, चहा संपवून गणेश घराबाहेर पडले. गावातल्या जुन्या मारुतीच्या देवळाकडे त्यांची पावले वळली. देवासमोर हात जोडताना त्यांचे ओठ देवाचे नामस्मरण करतात, पण त्यांचे डोळे मात्र बंद नसतात. ते मूर्तीमागच्या खिडकीतून बाहेर आभाळाकडे पाहत असतात. "देवा, फुलंब्री तालुक्यावर काय कोप झालाय तुझा? यंदा तरी वेळेवर बरस!" हीच एक आर्त हाक मनात असते. देवदर्शन आटोपल्यानंतर आता त्यांचा पुढचा टप्पा शेतावरचा असतो.
गणेश डकले यांची शेतातली कोरडी विहीर (सकाळी ८:३० ते १०:३०)
सकाळी पावणेआठ वाजता आम्ही शेताकडे निघालो. या वेळेस गेवराई गुंगी गावातील रस्ते शेतीची कामे नसल्यामुळे पूर्णपणे शांत दिसत होती. रस्त्यावर कोणतीही वर्दळ नाही, ट्रॅक्टरचा आवाज नाही की शेतकऱ्यांची घाई नाही. शेतीची कामंच ठप्प असल्यामुळे संपूर्ण गावावर एक गंभीर शांतता जाणवत होती. शेतात पोहोचल्यावर गमेश बांधावर असलेल्या कडुलिंबाच्या झाडाखाली जाऊन बसले. समोर नजर टाकली तर उताणी पडलेली, नांगरून ठेवलेली त्यांची तीन एकर काळी जमीन उन्हात होरपळताना दिसली.
गणेश यांनी पेरणीपूर्व मशागतीची सगळी कामे मे महिन्यातच राबून पूर्ण करून ठेवली आहेत. शेतातला कचरा वेचणे, ढेकळे फोडणे, जमीन भुसभुशीत करणे,आणि वाफे तयार करणे… शेतकरी म्हणून जे त्यांच्या हातात आणि कष्टात होतं ते सगळ त्यांनी प्रामाणिकपणे केलं, आता शेतात एक काडीचेही काम शिल्लक नाही. फक्त आभाळातून चार थेंब पडायचे आणि जमिनीत बियाणे टाकायचं, एवढीच वाट पाहायची आहे. पण हा रिकामा वेळच आजकाल गणेश यांचा सर्वात मोठा शत्रू बनलाय.
बांधावर बसल्यावर गणेश जवळपास पंधरा ते वीस मिनिटे एक शब्दही बोलले नाही. ते शांतपणे समोरच्या कोरड्या आणि नांगरलेल्या शेताकडे पाहत राहिले. त्यांचे मौन खूप काही सांगून जात होतं. मी शांतता तोडत त्यांना विचारलं, गणेशराव, शेत तर पूर्ण तयार आहे, मग मनात काय विचार सुरू आहे?
त्यांनी जमिनीवरची सुकलेली मूठभर माती हातात घेतली आणि ती पुन्हा खाली सोडली.
"भाऊ, शेतकरी रात्रंदिवस कष्ट करू शकतो, पण निसर्गासोबत स्पर्धा नाही करू शकत. .. तिगस्ता (दोन वर्षांपूर्वी) या तीन एकरांत कपाशीचे कोवळे कोंब वाऱ्यावर डोलत होते. मी याच झाडाखाली बसून खताचा दुसरा डोस कसा द्यायचा आणि पिकाला माती कशी लावायची, याचा विचार करत होतो. आज मात्र या रिकाम्या बांधावर बसून फक्त जमिनीची धूळ उडताना पाहण्याशिवाय माझ्या हातात काहीच नाही."
गणेशराव उठले आणि शेताच्या मधोमध असलेल्या विहिरीकडे चालू लागले. विहिरीच्या सिमेंटच्या उघड्या काठावर उभे राहून ते आत डोकावतात. विहिरीने कधीच तळ गाठला असतो. आतमध्ये पाण्याचा ओलावा किंवा पाण्याचा थेंब कुठेच दिसत नाही, दिसतात ती फक्त सुकलेली काळी पांढरी माती आणि उन्हाने तापून उघडे पडलेले काळे खडक. विहिरीच्या अगदी तळाशी गाळात रुतून बसलेली ‘थ्री फेज’ची पाणबुडी मोटर मुकी होऊन पडली होती.
शेतात वीज उपलब्ध आहे, वीज वितरण कंपनीने वीज दिली, पण विहिरीत पाणीच नसल्यामुळे स्टार्टरचा तो हिरवा दिवा आणि 'कट्कन' होणारा आवाज जणू हे शेत आणि गणेश विसरून गेले आहेत. ती मोटरही आता पावसाच्या प्रतीक्षेत थकल्यासारखी स्तब्ध झाली आहे. एरवी जून महिना अर्धा संपला की विहिरीत कमीत कमी चार ते पाच फूट पाणी असायचं, ज्यामुळे पेरणीनंतर समजा पाऊस लांबला तरी पिकाला पाणी देऊन ते जगवण्याची खात्री होती. आज मात्र ती खात्री पूर्णपणे संपली आहे.
गणेश विहिरीच्या पायऱ्यांवरून अत्यंत जपून खाली उतरतात. तळाशी गेल्यावर ते जमिनीवर खाली बसतात आणि हातामध्ये मूठभर माती घेतात. ती माती हातामध्ये घेताच वाळूसारखी बोटांच्या फटीतून निसटून खाली पडते. तिच्यात कसलाही ओलावा नाही की आर्द्रता नाही. जर अजून आठ दिवस पाऊस आला नाही, तर ही माती इतकी तापेल की नंतर पाऊस आला तरी जमिनीची उष्णता बियाणाला आतल्या आत जाळून टाकेल, हा गावातल्या जुन्या जाणत्या आणि अनुभवी शेतकऱ्यांचा पिढ्यानपिढ्यांचा अंदाज आहे, जो यंदा खरा ठरताना दिसतोय.

घरातील ओशरी आणि खतांच्या गोण्या ( सकाळी १०:३० ते दुपारी १:३०)
शेतातून आम्ही पुन्हा गणेशच्या घरी परतलो. शारदा डकले यांनी जेवणाचं ताट तयार करून ठेवलं होतं. ज्वारीची भाकर, अंबाडीची भाजी आणि कांदा…
दुपारचे बारा वाजले होते. उन्हाचा पारा ४२ अंशाच्या पार गेला होता.
‘’यंदा शेतीचं अर्थकारण सरकारने पूर्णपणे ऑनलाईन केलंय,’’ गणेश रुमालाने कपाळावरचा घाम पुसत बोलू लागतात. "खतं आणि बियाणं खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रात गेल्यावर पीओएस (POS) मशीनवर जोपर्यंत आमचा अंगठा येत नाही, तोपर्यंत खताची एक गोणीही मिळत नाही. सिस्टीमच्या नियमांमुळे एका एकरासाठी मोजून फक्त ३ ते ४ गोण्याच खत मला मिळालं. दर वर्षी आम्ही केंद्रात जाऊन हव्या तेवढ्या गोण्या घेऊन यायचो, यंदा मात्र अंगठ्याचा ताळमेळ लावण्यातच आमचा अर्धा वेळ गेला."
त्यांच्या तीन एकर शेतीसाठी त्यांनी अंदाजे १० गोण्या खत आणि कापूस मक्याचे बियाणे आणून ठेवले आहे. या संपूर्ण ऑनलाईन खरेदीसाठी गणेश यांना खिशातून तब्बल ३५,००० रुपये मोजावे लागले. एवढी मोठी रक्कम घरात रोख नव्हती. सहकारी बँकेचे हेलपाटे मारून, सातबाऱ्याचे कागदपत्रे गहाण ठेवून जे पीक कर्ज मंजूर झाले होते, त्यातून कसाबसा हा खर्च भागवला.
"आता परिस्थिती अशी आहे की, ३५ हजारांचे हे बियाणं आणि खत घरात ओसरीवर पडून आहे. पेरणी झाली नाही, तरी बँकेचे पीक कर्जाचे व्याज मात्र बाजारात मीटर चालू असल्यासारखं रोज वाढत चाललंय. पाऊस लांबला म्हणून बँक किंवा सावकार व्याज थांबवत नाहीत. जर यंदा पाऊस आलाच नाही, तर ही महागडी बियाणी घरातच सडून जातील आणि माझ्या गळ्यात ३५ हजारांच्या कर्जाचा फास कायमचा अडकेल." हे सांगताना त्यांच्या कपाळावरील घामाच्या धारा अधिकच दाट होतात….
गावची चावडी… (दुपारी १:३० ते दुपारी ४:३०)
उन्हाचा कडाका असह्य झाल्यामुळे गणेश घरून निघाले आणि त्यांनी थेट गावातली चावडी गाठली. वडाच्या आणि जांभळाच्या झाडाची मोठी सावली होती तिथे ते बसले. गावातली ही जागा म्हणजेच शेतकऱ्यांची चावडी, जिथे सुख दुःखाच्या गप्पा रंगतात. शेतीची सगळी कामे ठप्प असल्यामुळे गावातले अनेक शेतकरी तिथे येऊन बसले होते. पाराच्या कोपऱ्यात एक जुनं जांभळाचं झाड आहे. दरवर्षी जून महिना सुरू झाला की हे झाड गर्द काळ्या, रसरशीत जांभळांनी डवरून जायचं, यंदाही झाडाला जांभळे लागली होती आणि ती टपटप खाली पडली होती, ज्याला ग्रामीण भागात 'जांभळाचा सडा' म्हणतात.
पारावर बसलेले रामभाऊ बिडी ओढत गणेशला म्हणतात, "गणेशराव, यंदा निसर्गाचं घड्याळ बिघडलंय बघा. जांभळाचा सडा पडला, पण आभाळात पाण्याचा थेंब नाही. ग्रामीण भागात एक जुनी म्हण आहे, यंदा जांभळाला लय बहर आलाय, सडा पडतोय, पण पाऊस गायब आहे. याचा अर्थ असा की निसर्गाने त्याचं चक्र वेळेवर पूर्ण केले, पण तरीही जर आभाळ कोरडं राहिलं, तर जुने लोक मानतात की हा कडक दुष्काळाचा संकेत आहे."

शेतातला गोठा आणि दूध डेअरी (वेळ: दुपारी ४:३० ते रात्री ८:३०)
दुपारचे साडेचार वाजले होते. उन्हाचा कडकडाट आता थोडा कमी झाला असला, तरी हवेतील उकाडा अजूनही असह्यच होता. गणेश पारावरून उठले आणि पुन्हा एकदा आपल्या शेताकडे जनावरांना पाहण्यासाठी निघाले. त्यानंतर त्यांना झाडाखालून काढून मुख्य खुट्याला आणून बांधले. गणेश पुन्हा एकदा म्हशीचे दूध काढायला बसले. जनावरांना पोटभर हिरवा चारा मिळत नसल्याने बादलीत दुधाची धार कमी पडत होती. संध्याकाळच्या सुमारास आम्ही गावातल्या डेअरीवर पोहोचलो. डेअरीवर आजकाल एरवीसारखी लगबग आणि हास्यविनोद नव्हते, तर तिथे जमलेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर फक्त चिंतेच्या सुरकुत्या दिसत होत्या.
तिथल्याच एका चहाच्या टपरीवर बसलो असताना एक वृद्ध पंडितराव म्हणतात, "गणेशराव, यंदा 'धोंडा' (अधिक मास) हाय ना… जुन्या लोकांच्या म्हणण्यानुसार, अधिक मासात जर पाऊस न पडता फक्त उन्हाचा कडाका राहिला, तर त्यावर्षी कडक दुष्काळ पडतो. निसर्गाचा कोप हाय हा…
हवामान बदल किंवा जागतिक तापमानवाढ या वैज्ञानिक कारणांपेक्षा ग्रामीण भागात आजही शेतकरी या अंधश्रद्धांवर नशिबावर हात ठेवून बसतो, हे वास्तव तिथं स्पष्ट दिसत होते.
गणेश डकले यांचे घरातले अंगण (वेळ: रात्री ८:३० ते रात्री ११:००)
गेवराई गुंगी गावात आता संपूर्ण अंधार पसरला होता. महावितरणच्या कृपेने लोडशेडिंगमुळे वीज गेली होती, त्यामुळे घराघरांसमोर मोबाईलचे लुकलुकणारे प्रकाश दिसत होते. गणेश अंधारातच घराबाहेर टाकलेल्या बाजेवर पडून होते. जेवण झाल्यावर गणेश टॉर्चचा प्रकाश टाकत गोठ्यात जातात आणि जनावरांच्या गव्हाणीत शेवटचा सुका चारा टाकतात. रात्रीचे ठीक १० वाजले आहेत. गणेश अंगणात टाकलेल्या बाजेवर आडवे होतात. आभाळात चांदण्या लख्ख चमकत होते, पाऊस येण्याचे ढग दूरदूरपर्यंत कुठेच दिसत नव्हते. आकाश अगदी स्वच्छ आणि निळं काळं गच्च भरलेले होतं. गणेश डोळे उघडे ठेवून त्या अथांग आभाळाकडे पाहतात. रात्रीच्या या भयानक शांततेत त्यांना शेतातल्या त्या मुक्या झालेल्या पाण्यातल्या मोटरची आणि अंगणात पडून असलेल्या ३५ हजार या आकड्याच्या खत बियाणाच्या गोणीची आठवण येते.
तेवढ्यात शेजारी ठेवलेला त्यांचा मोबाईल 'टणकन' आवाजासह वाजतो. गणेश दचकून मोबाईल उचलतात. स्क्रीनच्या उजेडात सहकारी बँकेचा पीक कर्जाच्या व्याजाचा मेसेज आलेला दिसतो. तो मेसेज आणि आभाळातल्या त्या लख्ख चांदण्या बघून गणेश काही क्षण स्तब्ध होतात. हे आभाळ जसं कोरडं आणि शांत होऊन उभं आहे, तसाच शेतकरी या कर्जाच्या आणि निसर्गाच्या दुहेरी विळख्यात एकटाच उभा आहे. ते मोबाईल बाजूला ठेवतात, डोळ्यात साचलेले पाणी चोरून मिटतात…

"उद्या सकाळी पुन्हा ५ वाजता उठायचं आहे," गणेश माझ्याकडे न पाहता अंधारातच कुजबुजतात. "पुन्हा तोच सुका चारा प्राण्यांना टाकायचा, पुन्हा त्याच रिकाम्या विहिरीकडे बघायचं आणि पुन्हा त्याच बियाणांच्या गोण्यांकडे पाहत दिवस सुरू करायचा." बळीराजाकडे उद्या पाऊस पडेल या एका अंधुक, थिजलेल्या आशेशिवाय दुसरे काहीच उरलेले नाही, आणि एका कोरड्या रात्रीची रोजनिशी तिथेच थांबते…
रात्रीच्या त्या शांततेत, मोबाईलवर आलेल्या व्याजाच्या मेसेजचा तो आवाज डोक्यात घेऊन आम्ही गेवराई गुंगी गावाच्या वेशीबाहेर पडलो. आजूबाजूला पसरलेल्या कोरड्या शेतांमधून जाणाऱ्या रस्त्याने चालताना सतत डोळ्यासमोर गणेश, शारदा आणि ओसरीवर पडून असलेल्या खताच्या गोण्यांचे चेहरे फिरत होते. गावातून बाहेर पडताना, २४ तासांच्या या अनुभवातून व्यवस्थेच्या भिंतीवर आदळणारे काही अस्वस्थ प्रश्न टोचत राहिले…
१. हवामान खात्याचे उपग्रह आणि सॅटेलाइट नकाशे जर गणेशच्या कोरड्या विहिरीत पाण्याचा एक थेंबही वाढवू शकत नसतील, तर त्या प्रगत तंत्रज्ञानाचा आणि मोबाईल स्क्रीनचा बळीराजाला नेमका काय उपयोग?
२. खत बियाणं खरेदीसाठी मशीनवर गणेशचा अंगठा घेणारी सरकारी यंत्रणा, पाऊस न पडल्यामुळे तेच बियाणं ओसरीवर सडून गेलं तर त्याला नुकसानभरपाईची खात्री द्यायला का पुढे येत नाही?
३. निसर्गाने पाठ फिरवली म्हणून कृषी केंद्र बियाणांचे पैसे परत करत नाही आणि बँक व्याज थांबवत नाही; मग या संपूर्ण देशाच्या पोशिंद्यानेच निसर्गाच्या आणि व्यवस्थेच्या दुहेरी नुकसानीचा भार एकट्याने का वाहायचा?
४. पाण्यासाठी लांबच लांब वणवण करणारे शारदाचे ते थकलेले पाय आणि गाईच्या दुधाची धार आटल्यामुळे कोलमडणारं तिचं स्वयंपाकघर, सरकारच्या कोणत्याही कृषी धोरणात किंवा मदतीच्या यादीत का मोजले जात नाहीत?
५. शेतात वीज आहे, स्टार्टरचा हिरवा दिवा चालू आहे, पण विहिरीच्या पोटात पाणीच नाही; निसर्गाच्या या क्रूर थट्टेसमोर आपल्या कागदी विकास योजना इतक्या ढिम्म आणि हतबल का ठरतात?
६. आजचा तरुण शेतकरी सुशिक्षित असूनही, पाऊस लांबल्यावर या हवामान बदलाशी लढण्याऐवजी 'धोंड्याचा कोप' म्हणून नशिबाच्या स्वाधीन का होतोय? आपण त्याला इंटरनेट तर दिलं, पण संकटसमयी लढायचं आर्थिक बळ देण्यात आपण कुठे कमी पडलो?
७. मी तर रिपोर्टींग संपवून शहरात माझ्या घरी निघालोय, पण उद्या सकाळी ५ वाजता गणेश जेव्हा पुन्हा खाटेवरून पाय खाली सोडेल, तेव्हा पाऊस पडेल या एका अंधुक आशेशिवाय त्याच्याकडे दुसरं काय उरलेलं असेल?






