अप्सरा आगा
- वारणा खोऱ्यातील आरळा गावाची ओळख शिवजयंतीचा गुलाल आणि ईदचा शिरखुर्मा एकत्र वाटणाऱ्या सामाजिक सलोख्यामुळे होती.
- मात्र गावात एका मुस्लिम समाजाच्या चिकन-मटणाच्या दुकानात सुरू झालेला किरकोळ वाद काही तासांत मारहाणीपर्यंत पोहोचला. गुन्हे दाखल झाले, अटक झाली, मोर्चे निघाले, धरणे आंदोलनाचा आणि गाव सोडण्याचा इशारा देण्यात आला आणि अनेक वर्षे गुण्यागोविंदाने राहणाऱ्या गावात संशयाच्या भिंती उभ्या राहिल्या.
- एका क्षुल्लक भांडणाने एवढं मोठं रूप कसं घेतलं? गावाच्या सामाजिक नात्यांमध्ये नेमकं काय बदललं? आणि सलोख्याची ओळख असलेल्या आरळ्यात आज नेमकं घडतंय तरी काय? ‘बाईमाणूस’चा स्पेशल ग्राऊंड रिपोर्ट…
सांगलीच्या शिरोळा तालुक्यातील आरळा गावात आजही शिवजयंतीच्या मिरवणुकांचे फोटो अनेक घरांच्या भिंतींवर दिसतात. त्याच घरांमध्ये ईदच्या दिवशी शिरखुर्मा खाल्ल्याच्या आठवणीही जपलेल्या आहेत. वारणा खोऱ्यातील हे गाव वर्षानुवर्षे हिंदू-मुस्लिम सलोख्याचं उदाहरण म्हणून ओळखलं जात होतं. पण गेल्या काही आठवड्यांपासून हे गाव चर्चेत आलं आहे आणि त्याचं निमित्त आहे एक साधा चमचा आणि एक ‘की-चेन’.
२८ एप्रिल २०२६ रोजी गावातल्या एका मुस्लिम समाजाच्या चिकन-मटणाच्या दुकानात सुरू झालेला किरकोळ वाद काही तासांत मारहाणीपर्यंत पोहोचला. त्यानंतर गुन्हे दाखल झाले, अटक झाली, मोर्चे निघाले, धरणे आंदोलनाचा आणि गाव सोडण्याचा इशारा देण्यात आला आणि अनेक वर्षे गुण्यागोविंदाने राहणाऱ्या गावात संशयाच्या भिंती उभ्या राहिल्या. एका क्षुल्लक भांडणाने एवढं मोठं रूप कसं घेतलं? गावाच्या सामाजिक नात्यांमध्ये नेमकं काय बदललं? आणि सलोख्याची ओळख असलेल्या आरळ्यात आज नेमकं घडतंय तरी काय? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी ‘बाईमाणूस’च्या टीमने आरळा गावातील विविध लोकांशी संवाद साधला.

‘’मॉब लिंचिंग होण्यापेक्षा गावातून स्थलांतर करणं हाच एकमेव उपाय दिसत होता,’’ असं ४३ वर्षांचे अबीद हुसेन डांगे म्हणतात.
७ जूनच्या दिवशी डांगे, त्यांचा भाऊ सद्दाम शौकत आणि गावातील सात-आठ मुस्लिम कुटुंबांनी सामान बांधून गाव सोडण्याचा निर्णय घेतला होता. काही बाहेरच्या तरुणांकडून झालेली जीवघेणी मारहाण आणि गावकऱ्यांची भूमिका यामुळे या मुस्लिम कुटुंबांना गावात राहण्याची भिती वाटत होती. इतक्या टोकाचा निर्णय घेतल्यामुळे अखेर प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी मध्यस्थी करून या मुस्लिम कुटुंबियांचं मन वळवलं.
आरळा गावाची एकूण लोकसंख्या साधारणपणे ६ ते ७ हजारांच्या आसपास…यात बहुसंख्य लोकसंख्या हिंदू (प्रामुख्याने मराठा आणि इतर बलुतेदार समाज) समाजाची. गावात मुस्लिम समाजाची लोकसंख्या ३ ते ४ टक्के. अल्पसंख्याक असूनही हा समाज गावाच्या शेती आणि सामाजिक जडणघडणीत वर्षानुवर्षे महत्त्वाचा भाग राहिलाय. पण गेल्या काही दिवसांपासून या गावाची शांतता पूर्णपणे ढळली आहे. संपूर्ण राज्यावर या गावात घडलेल्य घटनेचे पडसाद उमटले आहेत. आजवर या गावाची ओळख शिवजयंती, दुर्गा उत्सव आणि गणेशोत्सवात खांद्याला खांदा लावून एकत्र नाचणाऱ्या हिंदू-मुस्लिम तरुणांमुळे होती, मात्र आज याच गावात पोलिसांच्या गाड्यांचे सायरन आणि संशयाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
‘’मॉब लिंचिंग होण्यापेक्षा गावातून स्थलांतर करणं हाच उपाय’’
२८ एप्रिल २०२६च्या त्या दिवशी एका चिकन-मटणाच्या दुकानात झालेल्या अत्यंत क्षुल्लक वादाचे रूपांतर बघता बघता जातीय तेढीत झालं आणि दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप करत मोर्चे, आंदोलनांचं हत्यार उपसण्यात आलं. मुस्लिम समाजाने न्यायासाठी थेट कोल्हापूर उच्च न्यायालय खंडपीठासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला, तर दुसरीकडे खोट्या गुन्ह्यांच्या विरोधात हिंदू समाजाचा प्रचंड जनआक्रोश मोर्चा निघाला. अनेक वर्षे गुण्यागोविंदाने एकत्र राहणाऱ्या या दोन समाजांत अचानक एवढा दुरावा का निर्माण झाला आणि या परिस्थितीमागची खरी कारणं काय आहेत…?

घटना अशी की… परिसरातील चांदोली धरणावर पर्यटनासाठी आलेल्या शेजारच्या पाडळी गावातील काही तरुणांनी आरळा येथील हुसेन डांगे यांच्या दुकानातून चिकन आणि स्वयंपाकासाठी काही भांडी भाड्याने घेतली होती. हुसेन डांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी अकरा वाजता पाडळीची सात-आठ मुलं दुकानावर आली, त्यांनी चिकन घेतलं आणि भांडी मागितली. डांगे यांनी भाडे न घेता केवळ विश्वासाने त्यांना भांडी दिली आणि ती स्वच्छ करून परत आणण्यास सांगितले. दुपारी साडेचारच्या सुमारास दोन मुलं भांडी परत द्यायला आली, मात्र त्या भांड्यांमध्ये एक झाकण आणि चमचा (पळी) गायब होता. डांगे यांच्या मते, ती मुले दारूच्या नशेत होती आणि त्यांना पळी आणि झाकणाबद्दल विचारल्यावर त्यांनी काही वेळाने त्या वस्तू परत आणून दिल्या. परंतू अवघ्या दहा मिनिटांत ती मुलं पुन्हा दुकानावर आली आणि 'आमच्या गाडीची कि- चेन तू घेतलं आहेस, ते दे नाहीतर पाचशे रुपये दे' म्हणून हुज्जत घालू लागली.
त्यावेळी डांगे यांनी त्यांच्या भावाला आणि वडिलांना बोलावून घेतले. वाद वाढत असताना गावातील आणखी काही तरुण तिथे आले, मात्र त्यांनी वाद मिटवण्याऐवजी चिथावणीखोर शब्द वापरून घटनेला जातीय वळण दिले, असा डांगे यांचा आरोप आहे. त्यांनी पोलिसांना फोन करून आरळा गावातील आणि इतर स्थानिक मुलांचा या भांडणाशी संबंध नसल्याचे सांगितले होते, तरीही जमावाने ‘मॉब लिंचिंग’च्या उद्देशाने तिथे गर्दी केली होती, असं सागून हुसेन डांगे पुढे म्हणतात की, माझ्या भावाने लगेचच पाडळीतील माजी सरपंचांना फोन करून त्या घटनेबद्दल माहिती दिली. त्यानंतर सरपंचांनी आरळ्यात आलेल्या पाडळी येथील मुलांशी चर्चा केली. मुलंही आम्ही इथे काही वाद घालत नाही, आम्ही इथून निघतो, असे म्हणाले. 'पण थोड्या वेळातच आरळ्यातील काही मुलं आणि पाडळी येथील पार्टी करायला आलेले ती मुलं हिंदुत्वावादी घोषणा देत आमच्या दुकानाच्या दिशेने आले. पाच ते सहा मुलं दुकानात शिरली. माझ्या वडिलांना मारहाण केली. मीही तेथे होतो, मलाही त्यांनी मारायला सुरू केले. काही मुलांनी दुकानातील गल्ल्यातले पैसे घेतले, हे मी बघितलं. मी खाली पडलो होतो, माझ्या हातातून रक्त येत होते. ते बघून ते मुले पळून गेली.'
‘’कारण नसताना १२ मुलांची नावे घेतली अन् गाव विरोधात गेलं’’
या घटनेबाबत दोन्ही बाजूंच्या कथा वेगळ्या आहेत. दुसरीकडे, ग्रामपंचायत सदस्य विजय भादूगळे यांनी ‘बाईमाणूस’शी बोलताना सांगितलं की, 'पाडळीच्या पर्यटकांकडून केवळ एक पळी हरवली होती आणि त्यांनी त्याचे पैसे देण्याची तयारीही दाखवली होती, मात्र दुकानदार हुसेन डांगे यांनी पैसे नाकारत 'मला तीच पळी पाहिजे' असा हट्ट धरल्याने शाब्दिक वाद झाला आणि मारामारी सुरू झाली. पाडळीच्या मुलांनी आरळा गावातील तरुण मुलांना मदतीसाठी बोलावलं आणि या वादावादीत पाडळीच्याच एका मुलाने सत्तूरने (मटण कापण्याचा चॉपर) वार केला, ज्यात डांगे यांच्या हाताला दुखापत झाली. खरंतर या घटनेनंतर हुसेन डांगे यांनी पोलिसांत एफआयआर दाखल करताना जुन्या रागातून आणि राजकीय हेतूने घटनास्थळी हजर नसलेल्या आरळा गावातील १२ मुलांची नाव घेतली. यातील ५-६ मुलं तर त्या दिवशी गावातच नव्हती. या तरुण मुलांना त्यांनी टार्गेट केलं. त्यामुळे आमची मुल खोट्या गुन्ह्याखाली १५ ते २० दिवस जेलमध्ये राहिली.'

आरळ्यातील आणखी एक स्थानिक तरुण रोहित पेटकर यांनी सांगितलं की, हा वाद केवळ एका पळीचा नाही, तर २०२४ च्या पूर्वीचा आहे. हुसेन डांगेच्या कुटुंबाने आमच्या गावातील हिंदू कुटुंबाची छेड काढली होती. त्यावेळी त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्याच जुन्या घटनेचा बदला घेण्यासाठी आता हुसेन डांगे यांनी काही चूक नसताना आमच्या निष्पाप तरुणांची नावं या प्रकरणात घेतली आणि संपूर्ण गावाला वेठीस धरले.
बाहेरची काही लोकं दोन्ही समाजात तेढ निर्माण करताहेत...
‘बाईमाणूस’शी बोलताना गावातील अबिद डांगे सांगतात की, 'माझं गाव अठरापगड जातींचं आणि बारा बलुतेदारांचं आहे. अगदी तीन वर्षांपूर्वीपर्यंत गावात कधीही हिंदू-मुस्लिम अशी जातीय तेढ निर्माण झाली नव्हती. सर्व जाती-धर्माचे लोक वर्षानुवर्षे इथे गुण्यागोविंदाने राहतात, सर्व सण-उत्सव एकोप्याने साजरे करतात. गावातील नवरात्र उत्सव मंडळ आम्ही हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन स्थापन केलं आहे; दांडिया असो किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रम, आम्ही ते नेहमी एकत्र साजरे करतो. अनेक गणेश मंडळांमध्येही आमचा असाच सहभाग असतो. पण अलीकडच्या काळात काही बाहेरच्या लोकांनी गावात येऊन उपद्रव पसरवण्याचा प्रयत्न केला. स्थानिक तरुणांची माथी भडकवून त्यांना चुकीच्या विचारसरणीकडे वळवण्यात आलं. बाहेरच्या या समाजकंटकांमुळेच आज गावात अशा गंभीर घटना घडत आहेत, ज्याचा त्रास आम्हा गावकऱ्यांना सहन करावा लागत आहे. आज आम्ही खूप विचित्र आणि कठीण परिस्थितीत येऊन पोहोचलो आहोत.'
निहाल डांगे हे गावात राहणारे तरुण सांगतात, 'गावातील सध्याची परिस्थिती बघता आरळ्यात फार बिकट वातावरण निर्माण झालं आहे. अगदी 'जगावं की मरावं' असा प्रश्न आमच्यासमोर उभा आहे. मी माझ्या आजोबांच्या काळापासून बघत आलो आहे, पण असं गढूळ वातावरण आरळ्यात कधीच नव्हतं. माझ्या या ३० वर्षांच्या आयुष्यात मला कधीच जाणीव झाली नव्हती की मी हिंदू आहे की मुस्लिम. आमच्या गावात जाती-धर्माचं राजकारण कधीच घडलं नाही. आम्ही सर्व सण एकत्र साजरे करतो. गणेशोत्सव, दुर्गामाता उत्सव आम्ही एकत्र करतो, तर आमची पूर्ण गल्ली शिवजयंती अत्यंत भव्य पद्धतीने साजरी करते. पहिलं जसं आमचं बारा बलुतेदारांचं एकोप्याचं गाव होतं, तसंच गाव आम्हाला पुन्हा अपेक्षित आहे. पण अलीकडच्या दोन-तीन वर्षांत बाहेरचे समाजकंटक गावात येतात, जातीवाचक बोलतात आणि प्रक्षोभक भाषणं देतात. यामुळे गावात चुकीचा संदेश जातो आणि दोन्ही समाजात तेढ निर्माण होते. काही स्थानिक तरुणांची माथी भडकवून, गावात जिहादी किंवा अतिरेकी राहतात असा खोटा प्रचार केला जातोय, जो कधीच नव्हता. आम्ही संविधानाला मानणारी लोक आहोत. बाहेरून येऊन गावात विष पेरणाऱ्या या लोकांवर आता कुठेतरी बंधन घातलंच पाहिजे. हे रोखणं काळाची गरज आहे. त्यासाठी गावातील सरपंच आणि ज्येष्ठ मंडळींनी एकत्र येत, पुढे होऊन पुढाकार घेतला पाहिजे आणि यावर योग्य तो मार्ग काढून हा वाद कायमचा थांबवला पाहिजे.'

सामाजिक कार्यकर्ते प्रकाश धामणकर सांगतात, 'आमच्या गावात जे प्रकरण झालं, त्यामध्ये काही बाहेरची मुलं होती, काही आमच्या गावातील होती. त्यांना चुकीची माहिती देण्यात आली आणि त्याचा दुष्परिणाम असा झाला की आता नवीन पिढीला मोठा त्रास भोगावा लागत आहे. तसं आमचं गाव दोन्ही समाज पहिल्यापासून गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. सगळे एकमेकाच्या सण, समारंभात सहभागी होतात. ही जी घटना घडली आहे, यापुढे अशा घटना घडल्यातर तरुणपिढीला त्रासदायक ठरणार आहे. त्यामुळे गावातील जाणत्या लोकांनी यांना मार्गदर्शन करणे गरजेचं आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. तरूणांनीही यामध्ये जास्त काळजी घेणे आवश्यक आहे.'
हिंदू जनआक्रोश मोर्चा
या खोट्या गुन्ह्यांच्या विरोधात हिंदू समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला आणि त्याचाच परिणाम म्हणून नुकताच गावात एक 'हिंदू जनआक्रोश मोर्चा' काढण्यात आला. या मोर्चामध्ये शिराळ्याचे आमदार आणि काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते, तसेच संपूर्ण तालुक्यातून हजारो हिंदू बांधव रस्त्यावर उतरले होते. कार्यकर्त्यांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करत त्यांनी प्रशासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. या मोर्चानंतर मुस्लिम समाजामध्ये असुरक्षिततेची आणि भीतीची भावना अधिकच वाढली.
२० मुस्लिम कुटुंबांचे धरणे आंदोलन आणि प्रशासनाची मध्यस्थी...
गावात सुरक्षिततेची हमी आणि न्याय मिळत नसल्याचा आरोप करत, आरळा गावातील सुमारे २० मुस्लिम कुटुंबांनी प्रशासनाला एक प्रसिद्धीपत्रक दिले. यामध्ये त्यांनी गावात घडलेल्या सर्व प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून खऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. प्रशासनाकडून तातडीने दाद न मिळाल्याने, या कुटुंबांनी ७ जून २०२६ रोजी थेट कोल्हापूर येथील उच्च न्यायालय खंडपीठासमोर (सर्किट बेंच) धरणे आंदोलन करण्याचा आक्रमक निर्णय जाहीर केला.

या इशाऱ्यामुळे स्थानिक प्रशासकीय यंत्रणेची मोठी धावपळ उडाली. आंदोलनामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि पोलीस प्रशासनाने तातडीने गावात धाव घेऊन मध्यस्थीचे प्रयत्न सुरू केले. दोन्ही बाजूंकडून आंदोलनाचे पवित्रे घेतले गेल्यावर प्रशासनाने तातडीने गावात आले. प्रशासनाने दोन्ही बाजूंना शांततेचे आवाहन करत, कोणत्याही निष्पाप व्यक्तीवर अन्याय होणार नाही आणि खोट्या गुन्ह्यांची पोलिसांमार्फत योग्य व निष्पक्ष पुनर्तपासणी केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन दिले. प्रशासनाच्या या सकारात्मक प्रतिसादानंतर मुस्लिम समाजाने आपले धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित ठेवले.
आरळा गावाला हवं स्वतंत्र पोलीस ठाणे
सध्या आरळा गावात स्वतःचे पोलीस ठाणे नसून, हे गाव कोकरूड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येते. आरळा ते कोकरूड दरम्यान सुमारे २० किलोमीटरचे अंतर आहे. आरळा गावात काही छोट्या-मोठ्या घटना घडल्यास, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कोकरूड पोलीस ठाण्यातील पोलिसांनाच यावं लागतं. २० किलोमीटरच्या या लांबच्या अंतरामुळे पोलिसांना गावात पोहोचण्यासाठी वेळ लागतो. बऱ्याचदा पोलीस येईपर्यंत स्थानिक पातळीवरील किरकोळ वाद विकोपाला जाऊन कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. आरळा गावची वाढती लोकसंख्या, व्यापारी बाजारपेठ आणि अलीकडची संवेदनशील परिस्थिती पाहता, येथे तातडीने स्वतंत्र पोलीस ठाणे किंवा पोलीस चौकी सुरू करण्याची गरज आहे, जेणेकरून वेळेत मदत मिळून अनर्थ टळू शकेल. आमच्या 'गावात पोलीस चौकी असायलाच पाहिजे, ही आमची मागणी आहे,' असे येथील गावचे लोक म्हणत आहेत.
सोशल मीडियावरून पसरणाऱ्या अफवांमुळे आगीत तेल ओतू नये, यासाठी पोलिसांचा सायबर सेल विशेष देखरेख ठेवून आहे. सध्या गावाची परिस्थिती वरकरणी शांत वाटत असली, तरी अंतर्गत तणाव पूर्णपणे निवळलेला नाही. मात्र, अशाही परिस्थितीत आशेचा एक नवा किरण गावात पाहायला मिळत आहे. दोन्ही समाजातील काही समंजस तरुण आणि सुजाण नागरिक आता उघडपणे सोशल मीडियावर आणि प्रत्यक्ष पातळीवर शांततेचे आवाहन करत आहेत. 'बाहेरच्या लोकांमुळे आमच्या गावाचे नाव खराब होऊ देणार नाही,' अशी ठाम भूमिका गावातील दोन्ही बाजूंच्या काही तरुणांनी घेतली आहे.
शिवजयंतीचा गुलाल अन् ईदचा शिरखुर्मा
आरळा हे गाव पिढ्यानपिढ्या सामाजिक सलोख्यासाठी ओळखले जाते. साधारण ६ ते ७ हजार लोकसंख्येच्या या गावात सर्व जाती-धर्माचे लोक वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने राहतात. येथील हिंदू आणि मुस्लिम समाजात इतका एकोपा आहे की, नवरात्र उत्सव, दुर्गामाता उत्सव आणि गणेशोत्सव दोन्ही समाज एकत्र येऊन मंडळे स्थापन करून साजरे करतात. अगदी मुस्लिम गल्लीतील तरुणही शिवजयंती अत्यंत भव्य आणि उत्साही पद्धतीने साजरी करतात. 'शिवजयंतीचा गुलाल अंगावर घेणारे आणि ईदला तितक्याच मायेने शिरखुर्मा वाटणारे गाव' अशी आरळ्याची हक्काची ओळख आहे. बाहेरच्या समाजकंटकांमुळे काही गालबोट लागले असले, तरी हा जुना सामाजिक वारसा आजही गावकऱ्यांच्या मनात जिवंत आहे.

आरळा गावातील या संपूर्ण घडामोडींकडे पाहिले तर एक गोष्ट जाणवते; हा वाद मूळ गावकऱ्यांचा नसून तो बाहेरून आलेल्या काही परिस्थितींमुळे आणि सोशल मीडियावरील गैरसमजांमुळे अधिक चिघळला आहे. एका पळीवरून सुरू झालेला वाद थेट उच्च न्यायालयाच्या उंबरठ्यापर्यंत आणि जनआक्रोश मोर्चापर्यंत पोहोचला, ही वारणा खोऱ्याच्या सुजाण संस्कृतीला नक्कीच न शोभणारी गोष्ट होती.
राजकीय नेते आपापल्या सोयीनुसार भूमिका घेत असले, तरी आरळा गावातील जुनी संस्कृती आणि एकोपा जिवंत ठेवण्यासाठी आता अंतर्गत हालचाली सुरू झाल्या आहेत. गावातील जुन्या जाणत्या ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाच्या सकारात्मक आश्वासनानंतर ग्रामस्थांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होत असून, आरळा गाव लवकरच आपला जुना सलोखा आणि एकोपा परत मिळवून राज्यासमोर सामाजिक एकतेचा एक नवा आदर्श उभा करेल, असा विश्वास आता व्यक्त होत आहे.






