अप्सरा आगा
- पालघर तालुक्यातील बहाडोली हे गाव पंचक्रोशीत 'जांभूळगाव' म्हणून ओळखलं जातं. शेकडो वर्षांची जांभळाची झाडं, जीआय मानांकन आणि देशभरातून येणारी मागणी यामुळे या गावाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
- मात्र यंदा या जांभळांनीच गावासमोर अनेक प्रश्न उभे केले आहेत. बदलत्या हवामानामुळे विस्कटलेलं ऋतुचक्र आणि त्याचा स्थानिक अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम ही त्यापैकीच एक गंभीर बाब आहे.
गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर चर्चा होती ती फक्त जांभळांची… यंदाच्या उन्हाळ्यात महाराष्ट्रातील अनेक भागांत जांभळाच्या झाडांवर अभूतपूर्व फळधारणा झाल्याचे चित्र दिसून आले. रस्त्यांच्या कडेला, शेत शिवारात, नदीकाठच्या परिसरात आणि डोंगर उतारांवर असलेली जांभळाची झाडे फळांनी अक्षरशः लगडून गेली आहेत. अनेक ठिकाणी तर झाडांखाली अक्षरशः जांभळांचा सडा पडत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात वर्षानुवर्षे सांगितली जाणारी एक जुनी समजूत पुन्हा चर्चेत आली आहे. “ज्या वर्षी जांभळाचा सडा पडतो, त्या वर्षी दुष्काळ पडतो,” असे मत अनेकजण व्यक्त करीत आहेत.
मात्र, जांभळाचा सडा आणि दुष्काळ यांचा थेट संबंध असल्याचे कोणतेही ठोस वैज्ञानिक संशोधन अद्याप उपलब्ध नसल्याचे कृषी क्षेत्रातील जाणकार स्पष्ट करतात. झाडांना आलेली भरघोस फळधारणा ही अनुकूल हवामान, मातीतील पोषक घटक अशा विविध घटकांवर अवलंबून असते. त्यामुळे केवळ जांभूळ जास्त प्रमाणात लागल्याने दुष्काळ निश्चित पडेल, असा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नसल्याचे म्हटले जात आहे.
जांभळांचा विषय निघाल्यावर अर्थात सगळ्यात अगोदर नाव पुढे येतं ते म्हणजे बहाडोली या गावाचं… ठाणे जिल्यातल्या पालघर तालुक्यातील जांभूळगाव म्हणून बहाडोलीची ओळख पंचक्रोशीमध्ये आहे. नजर पडेल तिथे जुनी, डेरेदार जांभळाची झाडं दिसून येणारं हे एक समृद्ध गाव. बहाडोलीच्या जांभळांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना मिळालेलं जीआय नामांकन.

आता याच जांभूळगावात म्हणजे बहाडोलीमध्ये एक अतिशय महत्वाचा उपक्रम सुरू झाला आहे तो म्हणजे 'बहाडोली जांभूळ फळ प्रक्रिया उद्योग प्रकल्प'. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ, योग्य हमीभाव, स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी आणि गावाच्या आर्थिक विकासाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. बहाडोली गावाच्या सर्वांगीण विकासासाठी, जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी गावात विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी जांभूळ मूल्यवर्धन प्रकल्प उभारणीचा निर्णय घेण्यात आला.
बहाडोली गावातील सुमारे ८० टक्के शेतकरी जांभूळ उत्पादनाशी संबंधित असून गावाच्या अर्थकारणामध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. जांभूळ हंगामाच्या सुरुवातीला चांगला बाजारभाव मिळत असला तरी हंगामाच्या अखेरीस दरात मोठी घसरण होत असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. अनेक वेळा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून जांभूळ फळाचे मूल्यवर्धन करून विविध प्रक्रिया उत्पादने तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये जांभूळ पल्प, स्क्वॅश, सिरप, ज्यूस, जॅम, जेली, व्हिनेगर, आरोग्यपूरक उत्पादने तसेच निर्यातक्षम प्रक्रिया उत्पादने विकसित करण्यावर भर दिला जाईल.
जांभूळगावाची आंबटगोड कहाणी…
असं काय आहे बहाडोलीच्या जांभळांमध्ये ज्याची दखल साऱ्या जगात घेतली जाते, यासाठी ‘बाईमाणूस’च्या टीमने पालघर जिल्ह्यातील या जांभूळगावाला भेट दिली.
"ही जांभळाची झाडं पाहिलीत ना? 1885 सालापासून ही झाडं आहेत, आमच्या खापरपणजोबांपासून!" जांभळाच्या झाडांकडे बोट दाखवून प्रकाश किणी सांगतात. ते ठाणे जिल्यातल्या पालघर तालुक्यातील बहाडोली गावामधील एक जांभूळ उत्पादक शेतकरी आहेत. जांभूळगाव म्हणून बहाडोलीची ओळख पंचक्रोशीमध्ये आहे. नजर पडेल तिथे जुनी, डेरेदार जांभळाची झाडं दिसून येणारं हे एक समृद्ध गाव.
प्रभाकर पाटील यांनी या गावात अनेक उन्हाळे पावसाळे पहिले आहेत आणि ऋतूंमध्ये झालेले बदलदेखील. " हे झाड दिसतं का? माझ्या पणजोबांनी ते लावले." एका जांभळाच्या झाडाकडे जात जात पाटील सांगतात. "त्यांच्या वेळेपासून ते इकडे आहे. आणि हे असं एकटंच झाड नाही आहे. आमच्या गावामध्ये आमच्या वाडवडिलांनी लावलेली अशी अनेक झाडं तुम्हाला पाहायला मिळतील. इतकी जांभळाची झाडं इकडे असल्याने आमच्या गावाला जांभूळगाव असं नाव पण मिळालं आहे.
दर वर्षी उन्हाळा आला की संपूर्ण महाराष्ट्रातल्या मंडई आणि बाजारांमध्ये ताजी, रसरशीत जांभळ्या रंगाची जांभळं दिसायला लागतात. भारतीय उपखंडाचं प्राचीन नाव जंबुद्वीप हे ह्या फळांमुळेच देण्यात आलेलं आहे. संस्कृत भाषेत 'जंबु' म्हणजे जांभूळ आणि द्वीप म्हणजे जागा/जमीन- अर्थात जंबुद्वीप म्हणजे जिकडे जांभळे आहेत अशी जागा. ह्या आंबटगोड चवीच्या रसरशीत फळांना जगभरातून मागणी असते. जगात सर्वाधिक जांभूळ उत्पादक देशांमध्ये भारताचा क्रमांक लागतो, आणि भारतातील सर्वाधिक जांभूळ उत्पादक राज्यांमध्ये महाराष्ट्राचा. त्याचसोबत तामिळनाडू, गुजरात, राजस्थान आणि आसाम या राज्यांमध्ये पण जांभळाचे उत्पादन होते.
आपल्या उपजीविकेसाठी अनेक शेतकरी पूर्णतः जांभळांवर अवलंबून आहेत आणि बहाडोली गावात नेहमीच जांभळांचं विक्रमी उत्पादन होतं. गावाच्या 297 हेक्टर क्षेत्रफळापैकी 106 हेक्टर जमीन कसायला योग्य आहे. या जमिनीवर आंबा आणि चिंचेच्या वृक्षांसोबतच जांभळाची झाडं मोठ्या प्रमाणात आहेत. ही झाडं अनेक ग्रामस्थांच्या उत्पन्नाचं साधन देखील आहेत. बहाडोलीची जांभळं इतर अनेक ठिकाणच्या जांभळाच्या तुलनेत आकाराने जास्त टपोरी आणि जास्त चवदार असतात.
बहाडोलीच्या जांभळांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना नुकतंच जीआय नामांकन. एखादी वस्तू ही काही ठराविक ठिकाणीच तयार होत असेल, आणि त्या पदार्थामध्ये किंवा वस्तूमध्ये त्या ठिकाणी उपजल्यामुळे काही विशेष गुणधर्म असतील, तर अशा वेळी त्या उत्पादनाला जी आय (geographical इंडिकेटर) नामांकन दिलं जातं. 2023 मध्ये खामळोली, धुकटन आणि पोचाडे ह्या आजूबाजूच्या गावांसह बहाडोलीला आपल्या जांभळांबद्दल जीआय मानांकन मिळालं. जीआय नामांकनामुळे एखाद्या उत्पादनाला जागतिक पातळीवर कीर्ती मिळायला मदत होते.

बहाडोलीमधील शेतकरी पूर्ण वर्षाच्या उत्पन्नासाठी ह्या जांभळांवर अवलंबून आहेत. उन्हाळ्यामध्ये जांभळाचं विक्रमी उत्पादन होतं, आणि शेतकऱ्यांना भरपूर नफा देखील मिळतो. मात्र गेल्या वर्षाच्या शेवटी आम्ही ज्या उत्पादकांना भेटलो, त्यातील बहुतेक जण नाराज होते. त्याचं कारण म्हणजे अतिवृष्टीमुळे झाडाला बहर यायला, आणि सीझन सुरु व्हायला झालेला उशीर.
बहाडोलीच्या जांभळांचं वैशिष्ट्य काय?
बहाडोलीतल्या जांभळाच्या झाडांना दर वर्षी उन्हाळ्यात फळं येतात. सूर्या आणि वैतरणा नदीच्या संगमावर वसलेल्या ह्या गावाला नदीचा गाळ जमा होऊन तयार होत असणाऱ्या कसदार मातीचं वरदान लाभलं आहे. ह्या मातीमुळे साहजिकच पिकाची गुणवत्ता देखील वाढते. गावातले बहुतेक शेतकरी जांभळांचं उत्पादन घेतात. झाडाला जांभूळ धरायला साधारण पाच ते सहा वर्षं जावी लागतात. बहाडोलीच्या जांभळांची अनेक वैशिष्ट्य आहेत.
ती चवीला मधुर असतात, फळामध्ये छोटी बी आणि जास्त गर असतो. प्रत्येक फळाच्या आत जवळपास 83 टक्के इतका गर निघतो. फळाचा आकार मोठा टपोरा असतो- प्रत्येक फळाचं वजन साधारणतः 23. ग्रॅम असतं! ह्याशिवाय त्यात पोटॅशचं प्रमाण देखील जास्त आहे. अँटी ऑक्सिडंट , अ आणि क जीवनसत्व आणि सोडियम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, आणि तांबे अशी खनिजे असलेली ही बहाडोलीची जांभळं मधुमेहावर देखील अत्यंत गुणकारी आहेत.
'जांभूळगाव'चा इतिहास’
प्रभाकर पाटील मोठ्या समाधानाने जांभळाच्या झाडांकडे बघत असतात. आपण स्वतः इतक्या वर्षांपासून वाढवलेल्या जांभळाच्या झाडाला फळं आली आणि त्याने इतक्या जणांचा उदरनिर्वाह चालतो आहे, ह्याचं त्यांना समाधान आहे. "पूर्वी आम्ही ही जांभळं तोडून चालत चालत वसई स्टेशनवर जाऊन ती विकायचो. आता हा रस्ता झाला, तर मग रस्त्यावर पण विकायला लागलो." असं ते सांगतात.
बहाडोलीच्या जांभळाचा पंचक्रोशीत जरी नावलौकिक असला, तरी पूर्वी देशभरात त्यांची काही खास ओळख नव्हती. मुख्यतः आसपासच्या गावांमध्ये त्यांचा जास्त खप व्हायचा. जांभूळ उत्पादक मंदार पाटील सांगतात, "गेल्या काही पिढ्यांपासून आमच्या घरात जांभळाचा व्यवसाय आहे. आज आमच्या जमिनीवर जी झाडं दिसताहेत, ती माझ्या जन्माच्याही आधी लावण्यात आली होती. "
जांभळं पुसून स्वच्छ करून बॉक्समध्ये भरता भरता एकीकडे मंदार आमच्याशी बोलत होते. "आमच्या इकडल्या जांभळाच्या गुणधर्माची माहिती बऱ्याच लोकांना आहे. एकदा शासनाच्या कृषी विभागातल्या काही अधिकाऱ्यांनी आमची भेट घेतली, आणि या जांभळांचं प्रदर्शन लावायची कल्पना आमच्यासमोर मांडली. आम्ही आमचं पहिलं प्रदर्शन २००४ मध्ये भरवलं. हळूहळू लोकांना बहाडोली जांभळांबद्दल माहिती कळत गेली आणि आता आम्हाला जी आय मानांकन पण मिळालं आहे.
बहाडोलीच्या जांभळांना जी आय मानांकन कसं मिळालं?
आपण लावतो त्या जांभळामध्ये विशेष गुणधर्म आहेत आणि जांभूळ आपल्याला चांगलं उत्पन्न देऊ शकतं, हे जसं जसं लोकांच्या लक्षात आलं, तसेतसे जास्त शेतकरी जांभळाच्या लागवडीत उतरले. अगदी भाताच्या शेतात पण मधूनच त्यांनी जांभळाची झाडं लावली. आज त्यातील बऱ्याच रोपांचे मोठे वृक्ष झाले आहेत. कृषी विभागाच्या साहाय्याने उत्पादकता वाढली , तसंच जी आय मानांकनासाठी अर्ज करण्याची कल्पना देखील कृषी विभागामुळेच मिळाली. गावातील शेतकऱ्यांनी नंतर जांभूळ उत्पादक गट तयार केला.

ह्या गटाचे अध्यक्ष किणी सांगतात की, कृषी विभागाच्या पाठिंब्याने ह्या गटाने अनेक बैठका घेतल्या. आम्ही जांभळाच्या गुणवत्तेचं विश्लेषण केलं, ह्याच जमिनीत अशी जांभळं का उगवतात ह्याचा अभ्यास केला. मातीचं परीक्षण करून घेतलं, तसंच फळाच्या आतल्या घटकांचा देखील अभ्यास केला.
दापोलीतल्या कोकण कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी अभ्यास करून असा निष्कर्ष काढला, की ही जांभळं, आणि त्याच्या सालीची पावडर देखील मधुमेहावर अतिशय गुणकारी आहेत. त्याचप्रमाणे कृषी विभागाने बहाडोली मध्ये विविध प्रशिक्षणं आयोजित केली. त्यामागचा उद्देश हा स्थानिकांना 'जे विकेल ते पिकवा' यामध्ये प्रशिक्षित करणे असा होता. आरोग्यदायी आणि तरीही चविष्ट अशा प्रकारच्या फळांचे उत्पादन कसे घ्यावे याबद्दल कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी देखील गावोगावी जाऊन प्रशिक्षण दिले.
बहाडोलीच्या जांभळांसाठी जी आय मानांकन मिळावे म्हणून आम्ही 2022 मध्ये अर्ज केला होता. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातील अधिकारी जगदीश पाटील सांगतात. 5 सप्टेंबर 2023 ला आम्हाला हे मानांकन मिळाले.
जांभळांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह
बहाडोलीमधील आणि गावाच्या आसपासच्या बहुतेक शेतकऱ्यांनी जांभळाची लागवड केली आहे. जांभूळ सोडता त्यांचा नेहमीचा व्यवसाय म्हणजे भातशेती. मात्र आम्हाला झाडांवर होती त्यापेक्षा जास्त मातीमध्ये पडलेली जांभळं दिसली. त्या जांभळांकडे बघून मंदार पाटील म्हणतात, "हे सगळं अवकाळी पावसामुळे झालं आहे. उन्हाळा हा आमचा नेहमीचा सीझन. यंदा मात्र.. " त्यांना पुढे बोलवत नाही.
गेल्या काही वर्षात जास्तीत जास्त नफा कमवायच्या दृष्टीने गावकऱ्यांनी अधिकाधिक प्रमाणात जांभळाची लागवड केली. आम्हाला रस्त्याकडेला अनेक ठिकाणी जांभळाची विक्री होताना दिसली, त्यातील बहुतेक सर्व महिला होत्या. काही जणांनी बॉक्स मध्ये भरून तर काहींनी परड्या भरून जांभळं विकायला आणली होती आणि ग्राहक येण्याच्या आशेने ते बसून होते.
या महिलांमधील एक महिला, गीता, यांनी आमच्याशी संवाद साधला. "आमची जांभळं खूप फेमस आहेत, आणि त्यांना नेहमी चांगला भाव असतो. दरवर्षी तुम्हाला आमच्यासारख्या पन्नास जणी तरी रस्त्याच्या कडेला जांभळं विकताना आढळतील. यंदाच्या वर्षी मात्र इतक्या कमी बायका आहेत, कारण यंदा आमचं खूप पीक वाया गेलं." त्या सांगतात. त्यांच्या शेजारी बसलेल्या रोहिणी सांगत होत्या: काय झालं, की यंदा पाऊस आणि जांभळाला बहर यायची वेळ, हे एकत्र आलं. त्यामुळे आम्हाला जांभळं तोडायला जाताच आलं नाही, कारण सारखा बाहेर धोधो पाऊसच चालू होता. झालंच तर पावसामुळे खूप जांभळं झाडावरून खाली पडून वाया गेली."
रस्त्याकडेच्या विक्रेत्यांनी एकमुखाने एकच गोष्ट सांगितली: यंदाच्या वर्षी पुरेशी जांभळंच आली नाहीत.परडीमधली जांभळं दाखवत किणी आमच्याशी बोलू लागले: "साधारण तीन वर्षांपूर्वीपर्यंत जांभळाच्या सगळ्या झाडांना उन्हाळ्यात- एप्रिल महिन्यात- फळं यायची. त्यानंतर बहर यायचा सीझन पुढे सरकून मे महिन्यात गेला. त्यानंतर गेल्या वर्षी तो जून मध्ये सरकला. आणि यंदा तर जुलै महिन्यात झाडांना फळं धरली. त्यामुळे झालं काय, की फळं येण्याची आणि मुसळधार पावसाची एकच वेळ आली. आमचं 90 टक्के पीक वाया गेलं. आता जे काही थोडं बहुत उरलं आहे, ते आम्ही गोळा करून विकतो आहोत."
पाऊस येताच जांभळाची मागणी उतरणीला
दर वर्षी बहाडोली आणि बाजूची गावे- खामळोली, धुकटन आणि पोलादे, यांच्यात मिळून जांभळाचं विक्रमी उत्पन्न येतं. मंदार पाटील सांगतात: ' एका झाडामागे तुम्हाला कमीत कमी 5000 ते जास्तीत जास्त दीड लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकतं. जर नेहमीच्या वेळी जांभळं आली तर किलोमागे हजार ते बाराशे रुपये इतका भाव सुद्धा मिळतो. पण आता या पावसामुळे हा भाव थेट 200-300 वर आला आहे."
स्थानिक लोक सांगतात की जसा पाऊस सुरु होईल, तसा हळूहळू जांभळाचा खप उतरणीला लागतो. पाऊस आल्यावर फळामध्ये अळ्या-कृमी होतील ह्या भीतीने ग्राहक जांभळं विकत घ्यायचं टाळतात. "पण यंदा तर जांभळं आलीच मुळी पावसाळ्यात-आता आम्ही काय करायचं?!" स्थानिक महिला प्रभावती पाटील विचारात होत्या. "तसं भातशेतीतून आणि इतर पिकांमधून उत्पन्न येतं. पण त्या पिकांचं बियाणं खरेदी करण्यासाठी किंवा इतर गोष्टी विकत घेण्यासाठी लागणारे पैसे जांभळामधून येतात. यंदा जांभळाचं उत्पन्न पुरेसं न आल्याने आमचं सगळं नियोजन कोलमडलं आहे." त्या पुढे सांगतात.

मनोज गुप्ता हे जांभूळ व्यापारी असून त्यांनी आमच्याशी यंदाच्या उशिराबद्दल संवाद साधला. "दर वर्षी साधारण 100 किलो जांभळं येत असतील तर यंदा वीसच किलो आली. तसंच दर वर्षी मे महिन्यात जांभळं येतात. यंदा जून सरताना आली, आणि त्यातली बरीच जांभळं पाणी लागल्यामुळे चवीत उतरली होती."
बाजारामध्ये इतर ठिकाणाहून जरी जांभळं येत असली तरी बहाडोलीच्या जांभळांना सर्वाधिक मागणी असते.
जांभळाचे भवितव्य काय?
वसई स्टेशनवर जांभळं विकणाऱ्या संगीताने आम्हाला सांगितलं की अलीकडे तिचा धंदा नीट चालत नाही. "आता आम्ही जो माल विकत घेतो तोच खूप महाग असतो, आणि मुळात माल कमीच येतोसुद्धा. या सारख्या कोसळणाऱ्या पावसामुळे सगळॆ फळं गळून गेली. माल कमी असल्याने तो जास्त भावाने विकला जातो. मला तो घेणं परवडत नाही, आणि त्यात काही मार्जिन सुद्धा नाही."
2021 मध्ये पश्चिम किनाऱ्यावर आलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे जांभळाची शंभराहून अधिक झाडं उन्मळून पडली. स्थानिकांचं बरंच नुकसान झालं. पण त्या वेळी शासनाकडून त्यांना बरीच मदत मिळाली होती. आता तीन वर्षांनंतर पुन्हा त्यांना तसंच नुकसान सोसावं लागत आहे.
"आम्ही कोकण कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे, आणि पुढच्या सीझनला कमीत कमी नुकसान होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत." महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागातील अधिकारी जगदीश पाटील सांगतात. जांभळाची उत्पादकता आणि टिकाऊपणा हे दोन्ही कसं वाढेल यासाठी आम्ही सर्व त्याप्रकारचे मदत देऊ केली आहे. सरकारी पातळीवर जांभळाला पीकविमा मिळावा यासाठी प्रयत्न चालू आहेत."
जी आय मानांकनामुळे जांभळाच्या मागणीमध्ये भरपूर वाढ झालेली असतानाच पुरवठ्यामध्ये अशी घट होणं हे नक्कीच दुर्दैवी आहे. ते पुढे सांगतात, "यंदा अवकाळी पाऊस आणि सरासरीपेक्षा जास्त तापमान या दोन्हीमुळे शेतकऱ्यांना अडचणी सोसाव्या लागल्या. आता झाडांना योग्य त्या ऋतूतच बहर यावा यासाठी प्रयत्न करावा लागेल. आम्हाला असं सांगण्यात आलं आहे की काही विशिष्ट प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य पोषण जर झाडांना मिळालं तर झाडांना फायदा होऊन नुकसान कमी होईल. आम्ही यासाठी विद्यापीठाचं मार्गदर्शन घेणार आहोत."
जांभळाची स्वतःची म्हणून एक अर्थव्यवस्था आहे. जांभळाच्या मागणीमध्ये भरपूर वाढ झालेली असतानाच पुरवठ्यामध्ये अशी घट होणं ही परिस्थिती विशेषतः स्थानिक लोक आणि उत्पादकांसाठी चिंताजनक आहे. या परिस्थितीतून मार्ग कसा काढावा यासाठी मोठ्या स्तरावर चर्चा होणं गरजेचं आहे. हवामान बदलामुळे जीवनाच्या सगळ्याच बाजूंवर परिणाम होत असल्याने, ह्या समस्येवर उत्तर शोधताना देखील सर्व घटकांचा विचार होणं गरजेचं आहे.






