(दासू भगत)
तेरे घर के सामने...एक घर बनाऊगाँ
दुनिया बसाऊँगा...तेरे घर के सामने...
प्रेमात आकंठ बुडालेला प्रेमी काव्यातून असा व्यक्त होतो. एक छोटसं घर म्हणजे त्याचं अवघं जगच. मग ते कसेही असो. दगडाचं, कुडाचं, मातीचं, पत्र्याचं, गवताचं, विटांचं किंवा सिमेंटचं.... कसंही का असेना पण हक्काचं..आदीम काळात गुहेत राहणाऱ्या मानवापासून ते आजपर्यंतच्या माणसानं हा घराचा वसा टाकून दिलेला नाही. घरांची लालसा असणं यात काहीच गैर नाही. ती मूख्य गरज आहे कारण आपण स्वत:ला कायम असुरक्षित समजत असतो.
पण जेव्हा राज्यसत्ता, वंश, अहंकार, श्रेष्ठता असे एकेक घटक लालसेत मिसळू लागतात तसतसे घरांची जागा वैभवशाली इमारतीत रूपातंरीत होऊ लागते. मानवी इतिहास अशा असंख्य वैभवशाली राजवाडे, महाल, किल्ल्यांनी ठासून भरला आहे.
(पहिली स्त्री दिग्दर्शिका फातमा)
‘धनराज महाल’... मुंबईच्या या वैभवशाली इमारतीची विलक्षण कथा
मुंबईतही अशा अनेक वैभवशाली इमारती आहेत. अशा इमारतीच्या चारही बाजूंनी कसलाच इतिहास नसणारी लाखो माणसं ये जा करत असतात. इमारतीकडे निरखून बघण्यापूर्वीच ‘पोट’ नावाचा अवयव ही कल्पना हद्दपार करतो आणि माणसं वर्दळीत हरवून जातात. छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या मुख्य इमारती बाहेर महात्मा गांधी रोड हा रस्ता आहे. या रस्त्याने ‘काळा घोडा’ पार करून ‘गेटवे ऑफ इंडिया’कडे जाणारे असंख्य मुंबईकर व पर्यटक तुम्ही बघितलेच असतील.
याच रस्त्यावर महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय आहे जे बऱ्याचदा चित्रपटात दर्शन देतं. याच मार्गावर जर काळजीपूर्वक बघत गेलो तर एक भव्य प्रवेशाद्वारावर ‘धनराज महाल’ अशी अक्षरे असलेला एक प्रशस्त महाल आहे. गर्दीच्या डोळ्यानां गेट वे ऑफ इंडिया खुणावत असल्यामुळे या इमारतीकडे सहसा लक्ष जात नाही.
संबंधित लेख वाचा: 1) ग्रामीण जातीसंबंध समजण्यासाठी ‘पिंजरा’ पुन्हा नव्या चष्म्यातून बघणे आवश्यक आहे… 2) सेन्सॉर बोर्डाला ‘संतोष’मध्ये असं काय खटकलं की, थेट सिनेमावर बंदीच घातली…? |
नागा साधू म्हणताच आपल्या समोर जे काही चित्र उभंराह तं ते वेगळं सांगण्याची गरज नाही. कुंभमेळ्याचे आकर्षण मुळी हे नागा साधू आहेत. या नागा साधूंचे जवळपास दहा प्रकार आहेत ज्यातील काहीनां गोस्वामी वा गोसाई असेही म्हटले जाते. याचां इतिहास आदी शंकराचार्यापासूनचा आहे. ते सर्व निपूण शशास्त्र योद्धेही होते. पुढे त्यांचे अनेक संप्रदाय विविध ठिकाणी पसरत गेले.
त्यांनी मठांची स्थापना केली व यातून महंत परंपंरा सुरू झाली. ते बऱ्यापैकी बलाढ्य होत गेले. अनेकदा तर राजे वा संस्थनिक त्यांच्याकडून आर्थिक व सैन्याची मदत मागत. अठराव्या शतकापर्यंत यांची सापंत्तीक स्थिती इतकी सुधारली की ते सावकारीही करू लागले. 
(झुबेदा ही पहिला भारतीय बोलपट “आलम आरा”ची नायिका होती)
नागा साधू आणि ‘धनराज महल’ यांचा एकमेकांशी नेमका काय संबध होता?
या ‘नागापूराण’ची इथे काय गरज? अशी तुमच्या मनात नक्कीच शंका येईल. तर या धनराज महालाच्या इतिहासाची नाळ बऱ्याच अंशी या नागा गोस्वामी पर्यंत पोहचते. मठांची परंपंरा आजही सर्व देशात बघता येते. या गोस्वामी सावकारातील एक बलाढ्य नाव म्हणजे महाराजा धनराज गीर नरसिंग गीर... यांचे मुळ कुटूंब अफगाणिस्तानहून 15व्या शतकात भारतात स्थलातंरीत झाले होते जे सुरूवातीस पुणे येथे व नतंर हैद्राबादला स्थायिक झाले.
18व्या शतकात निजामाचे बँकर म्हणून महाराजा धनराज गीर ओळखले जात. हा गीर परिवार इतका श्रीमंत आणि इतका बलाढ्य होता की त्यांना ‘दख्खनचे रॉथ्सचाइल्ड’ म्हणून ओळखले जात असे. ‘रॉथ्सचाइल्ड’ हे नाव युरोपियन बँकिंगवर अंकुश ठेवणाऱ्या सुपरिचित सावकार घराण्यावरून आले होते.
निजामाचे बँकर… महाराजा धनराज गीर
या नरसिंग गीर यांनी निजामाला हैदराबादेत रेल्वेचे जाळे निर्माण करण्यासाठी आर्थिक साहाय्य केलं होतं. त्यांच्या या भरघोस आर्थिक सहाय्यामुळे निजामाने त्यांना ‘राजा’ हा किताब दिला होता. पुढे त्यांच्या वारसांनी राईस मिल, सोलापूर वस्त्र उद्योग, मुंबईतले वॅटसन हॉटेल, हैद्राबादचे गयानबाग पॅलेस अशी चढती मालमत्ता संपादित केली. खरे तर भारतीय संस्कृतीत साधू म्हणजे भौतिक जीवनातून वैराग्य प्राप्त झालेली व्यक्ती होय. एैहिकांचा त्याग हा त्याचा गुण विशेष. धन संपत्ती, शाही वास्तूंचा लोभ नसावा ही मूळ धारणा… मात्र इथे चक्र काहीसे उलटे फिरले असावे. ‘धनराज पॅलेस’ हे या उलट्या चक्राचे उदाहरण म्हणावयास हरकत नाही. 
(झुबेदा आणि तिचे पती राजा धनराजगीर नरसिंगगीर)
पहिली स्त्री दिग्दर्शिका फातमा… तिची मुलगी झुबेदा अन् ‘धनराज महल’
सुरूवातीला उर्दू रंगभूमीवर सक्रिय असणारी ‘फातमा’ नावाची एक मुलगी वयाच्या 19व्या वर्षीच आई झाली. सिद्दी इब्राहिम महम्मद याकूत खान तिसरे हे सचिन प्रांताचे नवाब. सचिन प्रांत ब्रिटीश राजवटीत गुजरातमधील सुरत जिल्ह्यात होता. 1887 ते 1930 या कालखंडात सिद्दी इब्राहिम महम्मद याकूत खान तिसरे हे येथील नवाब होते.
फातमा बेगमच्या मुलीचे जैविक पिता हे नवाब होते. मात्र कायदेशिररित्या कोणतीही नोंद कोणत्याच कार्यालयात झाली नाही. अर्थात ते नवाब असल्यामुळे फातमा बेगम कोणताही कायदेशीर लढा लढू शकल्या नसाव्यात. सुलताना, झुबेदा आणि शहजादी अशा तिन मुलींची ही आई पुढे भारतातील पहिली स्त्री दिग्दर्शिका झाली.
फातमा बेगम यांची सर्वात धाकटी मुलगी झुबेदा ही पहिला भारतीय बोलपट “आलम आरा”ची नायिका झाली. राजा धनराजगीर नरसिंगगीर यांनी झुबेदाला एका समारंभात बघितले तेव्हा ते विवाहित होते. विवाहित असले तरी तरी राजा होते. संपत्ती पायाशी लोळण घेत होती. पूढे 1935 मध्ये त्यांनी झुबेदा बेगमशी लग्न केले. सचिन संस्थानाच्या जैविक पिता असलेल्या मुस्लिम नवाबाची मुलगी हैद्राबादच्या हिंदू महाराजाची पत्नी झाली. फातमा बेगमला मलिका म्हणून मिरविण्याचा मान भलेही नसेल मिळाला मात्र मुलीला ती प्रतिष्ठा मिळाली.
धनराज महाल ही वास्तू झुबेदासाठी बांधली गेली असे सांगितले जाते. त्या काळात ही इमारत शहरातली सर्वात महागडी निवासी वसाहत होती. या आंतरधर्मीय विवाहाला गीर परिवाराचा विरोध होता म्हणून धनराजगीर यांनी झुबेदाला धनराज महालच्या सर्वात वरच्या मजल्यावर 15,000 चौरस फुटांचे पेंटहाऊस बांधून दिले होते.
या दोघांना दोन मुलं झाली. हुमायून धनराजगीर आणि दुर्रेश्वर धनराजगीर. पैकी हुमायून धनराजगीर यांनी औषधनिर्मिती क्षेत्रात बरंच नांव कमावलं आणि त्यांनी ग्लॅक्सो-कॅलिडासारख्या जगप्रसिद्ध औषधनिर्मिती कंपन्यांचे अध्यक्षपद संचालकपद भूषवलं. संजय दत्तची पहिली बायको रिया पिल्लई या दुर्रेश्वरची मुलगी होती. हे हुमायून आणि दुर्रेश्वर- रिया पिल्लई या धनराजगीर महालात राहिले. त्यांच्या पुढच्या पिढ्या म्हणजे सध्याचा ‘आरोहन’, ‘तेरह पन्ने’ सारख्या मालिकांतून पुढे आलेला अभिनेता-निर्माता तरुण धनराजगीर आणि 1978 साली 'मिस इंडिया' किताब पटकावलेली सबिता धनराजगीर-उमरीगर हे देखील या इमारतीशी जोडले गेले आहेत. 
वैभवशाली वास्तूत बंदीस्त झालेला इतिहास
या आणि अशा अनेक राजवाडे व महालांच्या पायात जीवनाचे असे वेगवेगळे स्त्रोत आजही वाहताना दिसतील. या वैभवशाली वास्तूत जो इतिहास बंदीस्त झालेला असतो त्याची विविध रूपे बघायला मिळतात. धनवान सत्तावान संपत्तीवान माणसांच्या जगण्याआड धर्म अनेकदा पंगू होऊन जातो. मात्र सर्वसामान्य माणसं असं करू लागताच धर्माचे बळी ठरतात. हे प्रवाह आजही बघायला मिळतात. आपल्या देशात सुद्धा….
सत्तेच्या सर्वात वरच्या थरात असलेले राजकारणी मग ते कोणत्याही धर्माचे असोत…. सुरक्षित असतात त्यांच्या महालात. मात्र खालच्या थरातील माणसांनी धर्माच्या नावाने ऐकमेकांचा प्रचंड तिरस्कार करावा अशी सतत खेळीही खेळतात. सत्ता ही संपत्तीला तर संपत्ती पुन्हा सत्तेला जन्म देत राहतात. सामान्यांसाठी मात्र धर्म अशावेळी विषाणू बनून थैमान घालत राहतो…






