अभिजीत तांगडे
- मराठी बिग बॉसमधील एका वक्तव्यामुळे इन्फ्लुएंसर दिव्या शिंदेला घराबाहेर काढण्यात आले.
- तलवार चालवण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे.
- ही कारवाई अन्यायकारक आणि भेदभावपूर्ण असल्याचा दावा करत दिव्याने पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली.
बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. आतापर्यंत या घरातून दोन स्पर्धकांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. नुकतंच एलिमिनेशनशिवाय इन्फ्लुएंसर दिव्या शिंदेला घराबाहेर काढण्यात आलं.नॉमिनेशन टास्कमध्ये दिव्या शिंदेने स्पर्धकांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली. याच कारणास्तव बिग बॉसने थेट तिला घराबाहेरचा रस्ता दाखवला. तन्वीनं दिव्याला नॉमिनेट केलं होतं. यानंतर दिव्याचा प्रचंड पारा चढला. तिनं काही स्पर्धकांना थेट तलवार चालवण्याची धमकी दिली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.
यानंतर दिव्याला चूक सुधारण्यासाठी बिग बॉसने संधीही दिली. मात्र, दिव्या आपल्या वक्तव्यावर ठाम राहिली. बिग बॉसने दंड म्हणून दिव्याला तातडीने घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला. एलिमिनेशनशिवाय घराबाहेर पडल्यामुळे दिव्या शिंदेची प्रचंड चर्चा होत आहे. त्यानंतर आपली बाजू मांडण्यासाठी दिव्याने पत्रकार परिषद घेत तिची बाजू मांडली आहे. 
कोण आहे दिव्या शिंदे?
दिव्या शिंदे सिंहगड कॉलेजमधील विद्यार्थी आंदोलनामुळे चर्चेत आली होती. कॉलेज प्रशासनाने मेरीटमध्ये नाव असूनही आणि सर्व कागदपत्रे बरोबर असूनही प्रवेश नाकारल्याने दिव्याने आंदोलन केलं होतं. दिव्याच्या या आंदोलनाची प्रसारमाध्यमांनीही दखल घेतली होती. तिच्या विद्यार्थी आंदोलनाला यशही आलं होतं. बिग बॉस मराठीमध्येही दिव्याने याचा उल्लेख केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारांची दिव्या एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. चळवळींमध्येही दिव्याचा सहभाग घेत असल्याचं दिसतं.
खासकरून विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी दिव्या आंदोलनातून आवाज उठवते. भाषणातून ती तिचे विचार मांडते. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. इन्स्टाग्रामवर तिचे १.१ मिलियन फॉलोवर्स आहेत. सरकार सेना संघटना नावाची संघटना दिव्या चालवते. या संघटनेची ती अध्यक्ष आहे. रील्समधूनही दिव्या अनेकदा तिचे विचार मांडते. शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांनुसार चालत असल्याचं दिव्याचं म्हणणं आहे.
नेमकं काय घडलं होतं?
दिव्या 'बिग बॉस मराठी'च्या घरात टास्क संपल्यावर सर्वांना उद्देशून म्हणाली होती, "मी बाहेर 'सरकार' म्हणून वावरते आणि हातात तलवार ठेवते. भलेही ती तलवार आता घरी असेल... याचा अर्थ असा नाही की, मी इथल्या गोष्टी विसरेन... मी बाहेर जाऊन ती तलवार चालवेन. आता ती तलवार कोणावर चालवेन हे डिपेंड करतं तुम्ही माझ्याशी किती आणि कसे बोलताय." यानंतर रुचिता तिला विचारते, "ही धमकी समजायची का आम्ही?" यावर दिव्या म्हणते, "हो ही धमकीच आहे." यानंतर घरात बराच गोंधळ झाला. दिव्याला समजवण्याचा बिग बॉसकडूनही प्रयत्न झाला. मात्र, यानंतरही दिव्या 'मी माफी मागणार नाही' या मतावर ठाम होती. शेवटी तिला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
दिव्याने पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली आहे
कलर्स मराठी वाहिनीवरील 'बिग बॉस' सिझन सहा मधून ज्या पद्धतीने आपल्याला काढण्यात आले ती पद्धत केवळ अन्यायकारक नसून जाणून-बुजून केलेल्या भेदभावाचा आणि अपमानाचा स्पष्ट नमुना आहे अशा शब्दात या कार्यक्रमातील आघाडीची स्पर्धक दिव्या शिंदे हिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पुढे बोलताना दिव्या शिंदे म्हणाली की,
"मी तलवारीची धमकी दिल्याचा अर्धवट प्रचार केला जातोय. मात्र मी छत्रपती शिवरायांच्या विचारांची तलवार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीची धार याचा आवर्जून केलेला उल्लेख जाणूनबुजून टाळला जात आहे. त्यामुळे माझी नाहक बदनामी होत आहे. बिग बॉसच्या घरामध्ये केलेले एक सर्वसामान्य, अनौपचारिक विधान “धमकी” म्हणून रंगवून दिव्या शिंदे यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली. मात्र याच कार्यक्रमामध्ये यापूर्वी इतर स्पर्धकांनी उघडपणे धमकीवजा भाषा वापरूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता दुहेरी निकष लावण्यात आले."
१1 फेब्रुवारीला मुंबईतील पत्रकार परिषदेत माध्यमांसमोर बोलताना तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. या वेळी तिच्यासोबत रवि भिलाणे,पत्रकार संजय शिंदे, चित्रपट दिग्दर्शक महेश बनसोडे, ज्योतीताई बडेकर, मयूर शिर्के आणि ज्येष्ठ कार्यकर्ते सुबोध मोरे आदी उपस्थित होते. यावेळी महेश बनसोडे म्हणाले की, हा प्रकार पहिल्यांदाच घडलेला नाही. आतापर्यंत दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक, गरीब आणि संघर्ष करणाऱ्या कलाकारांवर अशाच पद्धतीने अन्याय होत आलेला आहे. 
मुख्य प्रवाहातील माध्यमे आणि टीआरपी प्रधान कार्यक्रम सतत सत्ताधारी मानसिकतेला पोषक भूमिका घेत आहेत आणि बहुजनांचा आवाज दाबला जात आहे. तर रवि भिलाणे यांनी, ही लढाई केवळ एका स्पर्धकासाठी नसून समता, न्याय, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानिक मूल्यांसाठीची लढाई आहे. या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आणि सत्य समाजासमोर मांडण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आल्याचे स्पष्ट केले.
दिव्या शिंदे यांच्या प्रकरणात बिग बॉस ने "संविधान'' हा शब्द वापरण्यास तिला केलेली मनाई ही असंवैधानिक असून बिग बॉस ने आणि कलर्स वाहिनीने त्वरित खुलासा करावा. अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल असा थेट इशारा रवि भिलाणे यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिला आहे.






