निळू दामले
गॉडविट पक्षी, वजन किती? फार तर सहाशे ग्रॅम… ऑक्टोबर महिन्याच्या १३ तारखेला पहाटे पाच वाजून १० मिनिटांनी अलास्कावरून निघतो. १३ हजार किलोमीटर कुठंही न थांबता उडतो उडतो उडतो आणि २४ ऑक्टोबरला पहाटे चार वाजून ५५ मिनिटांनी टास्मानियात पोचतो.
पट्टेरी शेपटीचा पक्षी… गॉडविट, वजन किती? फार तर सहाशे ग्रॅम… एका ऑक्टोबर महिन्याच्या १३ तारखेला पहाटे पाच वाजून १० मिनिटांनी अलास्कावरून निघतो. १३ हजार किलोमीटर कुठंही न थांबता उडतो उडतो उडतो आणि २४ ऑक्टोबरला पहाटे चार वाजून ५५ मिनिटांनी टास्मानियात पोचतो.
उत्तर अमेरिकेल्या थंडीतून निघून ऑस्ट्रेलियाच्या उबदार वातावरणात पोचतो. टास्मानियात उतरण्याची जागा त्याला माहीत असते. त्या जागी तो पूर्वी आलेला असतो. आकाशात कित्येक मैलावर असताना खालच्या जमिनीवरचे अगदी बारीक तपशील दिसतात. शक्तीमान सॅटेलाईट कॅमेऱ्याला दिसावेत तसे.
त्याला दलदल दिसते. खडकांच्या आडोशाला खेकडे लपलेले असतात. चिखलात ते किडे त्याला वळवळतांना दिसतात. उबदार हवामान आणि खेकडे किड्यांच्या मेजवानीसाठीच तो टास्मानियात आलेला असतो. आठेक इंच लांबीची दाभणासारखी वाटणारी चोच तो चिखलात खुपसतो. दगडात लपलेले खेकडे तो चोचीत पकडतो. तिकडं अलास्कात ही मेजवानी त्याला कुठं मिळणार असते. तिथं तर मरणाची थंडी.
हा त्याचा पुनरुत्पादनाचा समय. मादीच्या मागं मागं फिरणं सुरु होतं. फिरणं म्हणा, उडणं म्हणा. शेपटी झोकात उंचावतो. चोच नाकासारखी वर खाली करतो. गाणी म्हणतो. सहा महिने गॉडविट मज्जा करतो.
तशी त्याची गाणी मर्यादितच. गॉडविटनं अभिजात शास्त्रीय संगिताचा अभ्यास केलेला नसतो. गाण्याचा रियाझ केलेला नसतो. बैठकीचं गाणं? ते तर त्याला शक्यच नसतं. आकाशात बैठक कशी करणार?लांब लचक काडीसारख्या तंगड्या गुंडाळून बैठक कशी करणार? चिखलात बैठक कशी शक्य होणार? एक दोन ओळी, दोन चार पद्धतीनं म्हणायच्या. मादीला तेवढ्याच पुरतात.गाणं म्हणता म्हणता हवेत गिरक्या घेऊन, सूर मारून खाली यायचं,सूर मारून वरती जायचं, पंख पसरून छान तरंगायचं, मादी खुष. झालं काम. खाऊन पिऊन गॉडविट धष्टपुष्ट होतो. मार्च महिना उजाडलेला असतो. अंडी घालायची वेळ जवळ आलेली असते. गॉडविट पुन्हा अलास्काला जायला निघतो. पुन्हा तेरा हजार किमीचा प्रवास.

गॉडविट अलास्कात पोचतो. यथावकाश अंडी. यथावकाश अंड्यातून पिल्लं बाहेर येतात. महिनाभरात पिल्लं मोठी होतात. गॉडविट पिलांचं बरं असतं. त्यांना शिशुवर्ग, बालवाडी असले उद्योग करावे लागत नाहीत. लाखो रुपये फी नाही. पिलांना शाळेत घालण्यासाठी शाळा चालकांची मनधरणी करावी लागत नाही. चिखलात, दलदलीत कुठं असतेय शाळा? पिलांना पांगुळगाडा द्यावा लागत नाही की सायकल चालवायला शिकवावं लागत नाही. अंड्याबाहेर पडली की तासाभरातच पिलं पळायला लागतात. आपले आपणच ते पटापटा किडे गोळा करू लागतात.
नो मार्गदर्शन, नो शिकवणी. नो संस्कार. नो क्लास. नो ट्यूशन.
हां हां म्हणता पुन्हा ऑक्टोबर उजाडतो. पिलं मोठी झालेली असतात.पिलांना कोणी सांगावं लागत नाही की आता उडायचंय. ती तयारच असतात. त्यांच्याकडं होकायंत्रं नसतं.त्यांना अक्षांश रेखांश कळत नाहीत, त्यांनी भूगोलाची पुस्तक वाचलेली नसतात. ते बरोब्बर टास्मानियाच्या दिशेनं निघतात.
एकदा एक गॉडविट वाट चुकला. वळायच्या ऐवजी थेट सरळ उडत राहिला. त्याला कळलं की घोळ झालाय,आपण चुकलोय. तो नव्वद अंशात उजवीकडं वळला, नेहमीच्या जागी पोचला. या नादात त्याला ५०० किमी अंतर जास्त काटावं लागलं. न थांबता १३ हजार किमी? अर्धा किलो वजनाच्या पक्षाच्या पंखात येवढं बळ कसं येतं?
वैज्ञानिकांनी गणितं मांडली. गॉडविटच्या पायाला सेन्सॉर बांधले. गॉडविटच्या शरीरात काय काय चालतं याच्या नोंदी झाल्या. गॉडविट निघायच्या आधी खाऊन घेतो. किती खातो? फार तर तीन चारशे ग्रॅम. येवढ्यावर भागतं? गॉडविट त्याच्या शरीरातले उपयोगी नसलेले काही अवयव छोटे करतो. त्या अवयवांना लागणारी ऊर्जा कमी होते. कमीत कमी अन्नावर गॉडविटचं भागतं. अंगावर कमी अन्न साचवलेलं असल्यानं वजन कमी होतं, उडणं अधिक एनर्जी एफिशियंट होतं.

खाली समुद्र असतो. गॉडविट समुद्रातलं पाणी पीत नाही. खारं पाणी त्याला उपयोगी नाही.वीसेक हजार फुटावरून उडत असतो, पाण्यासाठी खाली येणं परवडतही नाही. शरीरातल्या चरबीचं पाण्यात रुपांतर करतो.
नॉन स्टॉप उडायचं? विश्रांती नको? झोप नको?
वैज्ञानिक म्हणतात की गॉडविट अर्धा झोपतो. म्हणजे त्याच्या मेंदूचा अर्धा भाग झोपतो, अर्धा भाग जागा असतो. आळीपाळीनं मेंदूचे भाग विश्रांती घेतात. गॉडविट उडत असतो आणि झोपलेलाही असतो.
या गॉडविटांमधेही अनेक जाती आहेत. त्यांच्या पिसांचे रंग वेगळे आहेत, त्यांची गाणीही वेगळी आहेत. युरोप, सायबेरिया, चीन, रशियातल्या उत्तरेतल्या थंड हवामानात हे गॉडविट रहातात. गॉडविटांना थंडी आवडत नाही. म्हणून थंडी पडायला लागली की ते उबदार हवेकडं येतात. आवड सांभाळण्यासाठी किती कष्ट करावे लागतात पहा. कुडकुडत बसण्यापेक्षा ११ दिवस उडणं बरं.
Bruce M.Beehler या अभ्यासकानं Flight of the Godwit: tracking Epic shorebird migrations या नावाचं पुस्तक लिहिलंय.
अगदीच स्वैर विचार. मानवी गॉडविट.

उदा. भारतातले मानवी गॉडविट. भारतात उन्हाचा कडाका सुरु झाला की ते अमेरिकेत जातात. अमेरिकेत थंडीचा कडाका सुरु झाला की भारतात येतात.
एक फरक अर्थातच आहे. पक्षी गॉडविट पुनरुत्पादनाच्या खटाटोपात येजा करतात. उत्पादक शृंगार एके ठिकाणी करतात, पिलं दुसऱ्या ठिकाणी जन्माला घालतात.
मानवी गॉडविट बहुदा केवळ हवामानाचा त्रास वाचवण्यासाठी स्थलांतर करत असावेत. लेखक संशोधक Bruce M.Beehler ना अभ्यासाला एक चांगला विषय.
(सौजन्य - niludamle.com)





