इंद्रजित भालेराव
- गेल्या ३१ वर्षांपासून नांदेडच्या लोहा तालुक्यातील गुराखीगडावर आगळंवेगळं गुराखी साहित्य संमेलन होत आहे.
- गुराखी साहित्य संमेलनाची फारशी चर्चा मराठी वाङ्मयव्यवहारात कुणी केल्याचे दिसत नाही.
- काय आहे नेमकी गुराखी साहित्याची संकल्पना?
नांदेडच्या गुराखीगड (ता. लोहा) येथे नुकतेच ३१ वे जागतिक गुराखी साहित्य संमेलन पार पडले. डॉ. भाई केशवराव धोंडगे यांच्या संकल्पनेतून सुमारे ३० वर्षांपूर्वी सुरु झालेल्या जागतिक गुराखी साहित्य संमेलनाने आज अनेक उपेक्षित घटकांना आपला हक्काचा आवाज मिळवून देणारे व्यासपीठ निर्माण केले आहे. मराठीत विविध प्रकारची साहित्य संमेलनं भरतात. अनेक साहित्यप्रकारांच्या आणि प्रवाहांच्या व्याख्याही झालेल्या आहेत. पण गुराखी साहित्य संमेलनाची फारशी चर्चा मराठी वाङ्मयव्यवहारात कुणी केल्याचे दिसत नाही. काय आहे नेमकी गुराखी साहित्याची संकल्पना?
मी लिहायला सुरुवात केली तेव्हापासून लोह्याजवळील गुराखीगडावर भरणाऱ्या गुराखी साहित्य संमेलनाच्या मोठमोठ्या बातम्या वाचायचो. हे विलक्षण वेगळं साहित्य संमेलन कधीतरी आपण पाहायला पाहिजे, असंही वाटायचं, पण कधी योग येत नव्हता. आजही हे संमेलन तेवढ्याच जोमात होतं. पण बातम्या येत नाहीत. खरं तर अशा वेगळ्या उपक्रमाची मोठ्या प्रमाणात दखल घेतली जायला हवी. पण ती हवी तशी घेतली जात नाही, हेही खरं.
यावर्षी या साहित्य संमेलनाच्या संयोजकांपैकी एक, लोह्याच्या संत गाडगेबाबा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक गवते यांनी मला फोन केला, 'सर, यावर्षीच्या गुराखी साहित्य संमेलनाला तुम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून यायचं आहे'. मी वाटच पाहत होतो. मी लगेच होकार देऊन टाकला. या गुराखी संमेलनाच्या ग्रंथदिंडीची सुरुवात कामाईच्या झऱ्यापासून होते. या झऱ्यावर पुजन करून सर्व दिंड्या गुराखीगडाकडं निघतात. कामाईचा झरा हे एक निसर्ग संपन्न ठिकाण होतं. केशवराव यांच्या डोक्यातली संकल्पना, कुठल्या गावातून आणि कुठल्या देवळातून ही दिंडी निघण्याऐवजी ती निसर्गाने दिलेल्या अमृत झऱ्यातून निघायला हवी, अशी होती. त्या अमृत झऱ्याचे पाणी प्राशन करून या दिंडीला सुरुवात होत असते.
गुराखी संमेलनाची अनोखी दिडी
या दिंडीत सर्व लोककलावंत सहभागी झालेले असतात. त्यांची यादी मोठी आहे, ती अशी सर्व गुराखीराजे, गोंधळी, पोतराज, वाघ्यामुरळी, वासुदेव, अस्वलवाले, पांगुळ, देवकरीण, माकडवाले, मसणजोगी, नागवाले गारुडी, गोसावी, फकीर, सालदार राजा, बेलदार राजा, कुणबी राजा, कैकाडी, सुगेमुगे, कलाकार, बारा बलुतेदार, वैदू , रायंदर, गोंदणवाल्या बाया, जातं टाकण करणाऱ्या बाया, कोळी असे विविध स्तरातले लोक असतात. हे सर्व कलावंत मागच्या एकतीस वर्षापासून या दिंडीत सहभागी होतात. आपापली कला सादर करतात. या सर्व कलावंतांच्या कलेलाच केशवराव धोंडगे यांनी गुराखी साहित्य संमेलनात प्राधान्य दिलेले आहे. अगदी चकमकीतून विस्तू पाडण्यापासून ते डहाक वाजवण्यापर्यंत या सर्व गोष्टींचा योग्य तो उपयोग केशवरावांनी केलेला आहे.

या दिंडीतला या कलावंतांचा सहभाग मोठा मनोरम असतो. त्यांनी त्यांच्या त्यांच्या वेशभूषा केलेल्या असतात. त्यांच्या त्यांच्या कला सादर करत, ते दिंडीत सहभागी होतात. त्यांच्या लोकवाद्यांच्या मेळाने एक प्रसन्न आणि उत्साही वातावरण निर्माण झालेले असते. सोबतच मोफत एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळा महाविद्यालयातले विद्यार्थीही आपापल्या दिंड्या घेऊन यात सहभागी होतात. त्या दिंड्यांचीही वेगवेगळी वैशिष्ट्ये असतात. त्या वैशिष्ट्यपूर्ण दिंड्या सहभागी झाल्यामुळे या ग्रंथदिंडीला आणखीच शोभा येते. जुन्या-नव्यांचा हा संगम मोठा मनोरम वाटतो. सर्व मान्यवरांसह, लोककलावंतांसह आणि शाळा महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांसह दीड दोन किलोमीटरचा हा प्रवास करत सगळे गुराखीगडावर येतात.
गडावर आलं की गुराखी साहित्य संमेलनाच्या ध्वजाचं आरोहण केलं जातं. तेही लोककलावंतांच्या हस्तेच होतं. या प्रत्येकासाठी एकेका लोक कलावंताची नियुक्ती केशवरावांनी आधीपासूनच करून ठेवलेली होती. दरम्यान तो कलावंत मृत्यू पावला असेल तर त्याच्या मुलाला तो मान दिला जातो. अगदी चकमकीने विस्तू पाडून दिवटी पेटवण्यापर्यंत ही परंपरा अनुवंशाने पाळली जाते.
गुराखी पीठावर फक्त मान्यवर नव्हे तर शंभरएक लोककलावंतही
सूत्रसंचालन करणाऱ्याला गुराखी गडाचा आणि गुराखी साहित्य संमेलनाचा संपूर्ण इतिहास आणि केशवराव धोंडगे यांचं जीवन खडा न् खडा माहित होतं. त्यामुळे या माहितीतले तपशील पेरत ते छान सूत्रसंचालन करत होते. व्यासपीठावर फक्त आम्ही प्रमुख पाहुणेच नव्हे तर, सर्व लोककलावंतांना बसवण्यात आलेलं होतं. केशवरावांनीच ही प्रथा पाडलेली आहे. संमेलनाअध्यक्ष माजी आमदार गोविंद केंद्रे, शाहीर दामोदरअण्णा वजीरगावकर, अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे आणि मी, असे आम्ही प्रमुख पाहुणे होतो. आमच्या सोबत जवळजवळ शंभर लोककलावंत व्यासपीठावर बसवलेले होते.
व्यासपीठ दगडी बांधकामाचं असल्यामुळे ते कोसळण्याची भीती नव्हतीच. केशवरावांनी जे जे केलय ते सगळं मजबूतच करून ठेवलेलं आहे. या आजूबाजूच्या शंभर कलावंतांमध्ये बसलेलो असताना मी आजूबाजूला सहज नजर टाकली. त्यात बंजारा बाया होत्या, देवकरणी बाया होत्या, वारकरी होते, डोक्यावर दिवे घेऊन दीड दोन किलोमीटर प्रवास करणाऱ्या बाया होत्या, किन्नर होते, डहाकवाले होते, बहुरूपी होते.
किन्नर, पोतराज, वाघ्यामुरळी, वासुदेव, अस्वलवाले अशा अनेकांचा सहभाग
प्रास्ताविकानंतर डहाक वाजवले गेले. त्या डहाकासमोर किन्नरांनी हजेरी दिली. त्यानंतर गाई व्यासपीठासमोर आणल्या गेल्या. आम्हा सर्व पाहुण्यांच्या हातात परंपरेनं गुंफलेल्या लव्हाळ्याच्या दिवट्या दिल्या. त्या दिवट्यांनी गाईंना ओवाळण्यात आलं. तेव्हा झालेला वाद्यांचा कल्लोळ गाईंना बुजवणारा होता. पण धरणारे खमके आणि पक्के होते. गाईला ओवाळल्यानंतर ज्ञानहंडी फोडण्यात आली. या ज्ञानहंडीमध्ये, म्हणजे लटकवलेल्या मोठमोठ्या मडक्यांमध्ये, पुस्तकं, वह्या, पेनी खच्चून भरलेल्या होत्या. ही ज्ञानहंडी फोडल्यानंतर या वह्या पुस्तकांची लूट करण्यासाठी मुलांची मोठी झुंबड उडालेली होती. असे पाच मोठे हंडे वर टांगलेले होते. प्रत्येक पाहुण्यांच्या हस्ते एकेक हंडा फोडून अधिकृत उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर पाहुण्यांची भाषणे झाली.

या संमेलनाच्या व्यासपीठाला गुराखी पीठ म्हणतात. चुकून माझ्याकडून व्यासपीठ हा शब्द उच्चारण्यात आल्यावर, सर्वांनीच 'गुराखी पीठ' 'गुराखी पीठ' म्हणून माझी चूक दुरुस्त केली. या गुराखी पिठाला गुराख्याच्याच वैभवाने सजवलेलं असतं. सगळीकडं ऊस आणि केळींची झाडं लावलेली असतात. प्रत्येक खांबालाही झाडं लावल्यामुळे मंडप लग्नाच्या मंडपासारखा वाटतो. या गुराखी पिठाच्या छताला सर्व प्रकारचा रानमेवा लटकत असतो. शेतात सध्या जी जी पिकं उभी आहेत त्या प्रत्येक पिकाचा वानोळा वर लटकवलेला असतो.
शेतकरी अवजारांच्या सर्व प्रतीकृती वर टांगलेल्या असतात. त्यामध्ये मोठी कलात्मकता असते. ते पाहताना खूप वेगळं वाटत होतं. वाळकाचा आकाश कंदील मी इथे प्रथमच पाहिला. विलक्षण वेगळं काहीतरी पाहत आहोत, असं वाटत होतं. संमेलनाचा मंडपही राहूट्यांचा नव्हता. रेडिमेड राहुट्या आणून ठोकलेल्या नव्हत्या. तर जुन्या काळात तट्ट्याचे मांडव, जसे लग्नात केले जात, तशाप्रकारे हे तट्ट्याचेच मांडव व्यासपीठावरही होते आणि समोरच्या सभागृहावरही होते. त्यामुळे सगळा जुना माहोल विलक्षण आनंद देत होता.
इथं गुराखीगडावर चार दिवस झालेल्या साहित्य संमेलनात या सर्व लोककलावंतांच्या आणि गुराख्यांच्या कलांचं प्रदर्शन होणार होतं. तेच इथले निमंत्रित साहित्यिक होते. ते आपली लोककला, लोकगीतं सादर करणार होते. त्यातून समग्र कृषीजीवनाचं प्रतिबिंब उमटणार होतं. केशवराव धोंडगे होते तेव्हा ते काही गमतीजमती करायचे. फळा-फळांचे विवाह लावून द्यायचे. भाज्या-भाज्यांचे विवाह लावायचे. प्राण्यांचे विवाह लावायचे. गाढव-गाढवीचा, गाई-बैलाचा, कुत्रा-कुत्रीचा विवाह केशवराव लावायचे. त्यासाठी त्यांनी स्वतःच मंगलाष्टके लिहिलेली होती. ती मंगलाष्टके केशवराव स्वतः म्हणायचे. केशवरावांचं असणं हे या संमेलनातला प्राण होता. तो प्राण आता शिल्लक नसला तरी त्यांच्या दोन्ही मुलांनी, मुक्तेश्वर आणि पुरुषोत्तम यांनी हा मोठा डोंगर समर्थपणे पेलला आहे, हे दिसून आलं.
काय आहे नेमकी गुराखी साहित्याची संकल्पना?
मानवाची आदिम अवस्था संपल्यानंतर मानवाने पशुपालनाला सुरुवात केली. जगभर गोपालनाचे आणि विविध पशुपालनाचे प्रकार रूढ झाले. कुठं शेळ्या, कुठं मेंढ्या तर कुठं गायी पाळल्या जाऊ लागल्या. त्याचे पुरावे इतिहासात, पुराणात आणि सर्वत्र सापडतात. वेदकाळाच्या आधीपासून भारतात गोपालन होते, हे आता सिद्ध झालेले आहे. शिकारी अवस्थेतून माणूस फलशोधनाच्या अवस्थेत आला आणि फलशोधनाच्या अवस्थेतून तो गोपालनाकडे वळला. गाई पाळत असताना हळूहळू माणसाला शेतीचा शोध लागला आणि मग तो शेतीकडे वळला. याआधी त्याने पुढच्या अवस्थेचा शोध लागल्यावर मागची अवस्था जवळजवळ त्यागलेली होती.
परंतु शेती हा व्यवसाय असा होता की, त्याला पशुपालनाची जोड आवश्यकच होती. आधी प्राथमिक अवस्थेतली शेती करताना तिथं बैलांचा उपयोग माणूस करत नव्हता. पण जसजसा तो शेतीमध्ये शोध लावू लागला, अवजारं निर्माण करू लागला, तसतसा ती ओढण्यासाठी त्याला बैलाची गरज पडली. त्यामुळे आधीच्या अवस्थेतले त्याचे पशुपालन पुढं शेती अवस्थेतही तसंच टिकून राहिलं. शेती करणारा आणि गोपालन करणारा हा गुराखी, सुरुवातीला गोमांस भक्षक होता. पण हळूहळू शेतातली गाई आणि त्याच्या वंशाची उपयुक्तता लक्षात घेऊन, बैलांशी आणि गाईंशी निर्माण झालेले त्याचे भावबंधातून त्याने गोमांस भक्षण बंद करून गोपूजन सुरू केलं.
भूपती, गोपती आणि मग प्रजापती…
त्याच काळात माणसाला भूपती म्हटल्या जाऊ लागले. कारण तो आता शेती कसू लागला म्हणून जमिनीचा मालक झालेला होता, भूपती झालेला होता. त्याआधी तो गोपती होता. कारण त्याआधी त्याची मालकी गाईवरून ओळखल्या जात असे. नंतर तो प्रजापती झाला. तो गोपती होता त्या काळात आणि पुढंही रुजलेले अनेक शब्द समाजामध्ये आजही कायम आहेत. वयात आलेल्या मुलीला दुहिता म्हटले जाऊ लागले. दुहिता म्हणजे खरं तर दूध काढायला शिकलेली मुलगी.

पण दूध काढणारी मुलगी ही लग्नाच्या वयाची झाली, असा अर्थ त्याला हळूहळू चिकटला. आणि नंतर गाई मागे पडल्या तरी विवाहोत्सुख मुलीला दुहिता म्हटले जाऊ लागले. विवाह लावण्याच्या वेळा यादेखील गाईंच्या वेळांवरून ओळखल्या जाऊ लागल्या. विवाहाच्या मुहूर्ताला गोरज मुहूर्त आणि गोधुल मुहूर्त असे म्हटले जाऊ लागले. सकाळी दूध काढायच्या वेळेला गोरज मुहूर्त आणि संध्याकाळी गाई घराकडं परतताना उठणाऱ्या धुळीच्या वेळेला गोधुल मुहूर्त म्हटलं जाऊ लागलं.
ऋग्वेदात आपणाला एक ऋचा पाहायला मिळते. त्या ऋचेमध्ये गाईंना केलेली आणि गाईंसाठी केलेली प्रार्थना दिसते. त्या ऋचेचा आजच्या कवितिक भाषेतला अर्थ सांगायचा झाला तर,
धेनूंनो
तुम्ही दुर्बल माणसाला
सबल बनवता
दुर्मुख माणसाला
तेजस्वी बनवता
तुमचा हंबर मंगलकारक आहे
तुमच्या सामर्थ्याचे
सर्वांना कौतुक आहे
तुम्हाला खंडीभर वासरे आहेत
तुम्ही कोवळेलुस गवत खाता
नदीचे निर्मळ पाणी पिता
चोराची मात्रा तुमच्यावर न चालो
प्रमत्त पातक्यांचीही मात्रा
तुमच्यावर न चालो
रुद्राचे शस्त्र तुमच्याकडे न वळो
ऋग्वेद आणि उपनिषदकालीन वाङ्मयात गुराख्यांचे काय संदर्भ आढळतात?
ऋग्वेदनंतर उपनिषदकालीन वाङ्मयात आपणाला पुन्हा गाईचे संदर्भ पाहायला मिळतात. माझे 'गाई घरा आल्या' हे पुस्तक वाचून मारुती चितमपल्ली यांनी मला पाठवलेल्या पत्रात लिहिले होते, "उपनिषदात सत्यकाम जाबालीची कथा आली आहे. आठ वर्षाच्या सत्यकाम गुरुच्या शोधाकरिता अरण्यात फिरत असताना गौतम ऋषीच्या आश्रमात आला आणि त्यांना म्हणाला, भगवान मला आपणाजवळ शिकायचे आहे. त्याची परीक्षा पाहण्यासाठी गौतमांनी चारशे गाई त्याच्या स्वाधीन केल्या. यांना आरण्यात घेऊन जा व हजार गाई होतील तेव्हा परत ये, असे सांगितले. सत्यकाम अरण्यामध्ये बारा वर्षे राहिला. या लहान मुलाने अरण्यात गाई कशा सांभाळल्या व वाढवल्या याचा तपशील कुठे आढळत नाही. तुमच्या पुस्तकातील 'गाई घरा आल्या' व 'पितांबऱ्या' या व इतरही लेखावरून याची काही प्रमाणात कल्पना येते" जणू गाई राखण्याचं कसब अंगी असणं, ही ज्ञानग्रहणाची पहिली पायरी समजली जात असावी. त्याशिवाय तेव्हा ऋषी ज्ञान देत नसावेत.
त्या काळातल्या माणसांचं अख्ख भावविश्व गाईभोवती गुंफलेलं होतं. त्यामुळे अशा अनेक ऋचा तेव्हा विविध ग्रंथातून निर्माण झालेल्या पाहायला मिळतात. महाभारत आणि भागवत ज्याच्या चरित्राने व्यापलेले आहे, तो श्रीकृष्ण हा गोपालच होता. गोपाल हा शब्दच मुळात गाई पाळणारा, अशा अर्थाचा आहे. पुढं त्यालाच गुरं राखणारा म्हणून गुराखी, असा मराठी शब्द रूढ झाला. श्रीकृष्णाचं सगळं बालपण गाई राखण्यात गेलेलं आहे. मराठीतल्या सर्व संतांच्या गवळणीमध्ये आलेलं चित्रण म्हणजे एका अर्थानं गुराखी साहित्यच आहे. श्रीकृष्ण आणि गाईभोवतीचं भावविश्व या संतांनी आपल्या गवळणी मधून उभं केलेलं आहे. अर्थात त्यात दूध विक्री करणाऱ्या गवळणींना आणि त्यांच्या शृंगारला जास्त प्राधान्य दिलं. त्याला अध्यात्माचा अर्थ लावला, हा भाग निराळा.
कौटिल्याच्या काळात गोपालन हा प्रधान व्यवसाय असला पाहिजे. त्यामुळे गाई पाळण्याविषयी, त्यांच्या गोठ्याविषयी, दूध काढण्याविषयी आणि दूध विक्रीविषयी कौटिल्याच्या अर्थशास्त्रात पुष्कळ माहिती असलेली आपणाला पाहायला मिळते. निसर्गतः गायीचं दूध तिच्या वासराला पिऊ दिलं पाहिजे. हा तेव्हा एक महत्त्वाचा निकष होता. त्यामुळे किती स्तनांचं दूध काढावं, याला मर्यादा होती. त्यापेक्षा जास्त दूध काढणाऱ्याची बोटे छाटावीत अशी शिक्षाही होती. बुद्धकाळात गोवंशाला अभय मिळालेलं दिसतं. त्या आधीची यज्ञसंस्कृती बुद्धकाळात थांबल्यामुळे यज्ञात बळी जाणारे पशुधन वाचले. त्याच काळात शेती आणखी प्रगत झाल्यामुळे ते शेतकऱ्याला उपयुक्त ठरले. नंतरच्या मुस्लिम आक्रमणाच्या काळात पुन्हा एकदा गोमांस भक्षण सुरू झाल्याचे दिसते.
गुराखी साहित्य संमेलनाच्या संकल्पनेचे उद्गाते, केशवराव धोंडगे
गुराखी साहित्य संमेलनाच्या संकल्पनेचे उद्गाते केशवराव धोंडगे ज्या कंधार भागात राहत असत, तो प्रामुख्यानं पशुपालकांचा प्रदेश आहे. तिथं मोठ्या प्रमाणात मेंढीपालन करणारा धनगर समाज आहे, गोपालन करणारा बंजारा समाज आहे, आणि शेतकरी तर गोपालक होतेच होते. विशेषतः याच भागातले लाल कंधारी वळू आणि देवणी वळू, हे देशी गोवंशातले सर्वात शुद्ध बीज म्हणून ओळखले जातात. त्या भागात गुराख्यांना विशेष स्थान असणे स्वाभाविक होते.

केशवरावांनी लहानपणापासून गुराखी अनुभवला होता. त्यामुळे काहीतरी विलक्षण वेगळे करू इच्छिणाऱ्या केशवरावांना, गुराखी साहित्य संमेलन घेण्याची कल्पना सुचली असावी. या भागात अजूनही पशुपालनाला महत्त्व आहे. खाटकाला जनावर विकू नये, अशी भावना इथल्या लोकांमध्ये अजूनही आहे. आंधळ्या बैलाला सांभाळणाऱ्या एका शेतकऱ्याची कथा सध्या समाजमाध्यमावर सर्वत्र फिरत आहे. गाई किंवा बैल मेल्यानंतर उघड्यावर फेकण्याचा प्रकार पूर्वी होत नसे. त्यांचे अंत्यसंस्कार केले जात, असं मी माझ्या लहानपणी पाहिलेलं आहे.
कसेल त्याची जमीन अन् वळेल त्याची गुरे…
गुराखी राजा व्हावा अशी केशवरावांची इच्छा होती. त्यामुळे ते नेहमी 'गुराखी राजा' असाच शब्द वापरत असत. कसेल त्याची जमीन याच तत्वावर वळेल त्याची गुरे, असं झालं पाहिजे, असं केशवरावांना वाटायचं. त्यांच्या लक्षात आलं होतं की नाही माहित नाही पण, एकेकाळी एक गुराखी राजा झाला होता आणि त्याने भारतीय समाजात क्रांती घडवलेली होती. बडोद्याचे सयाजीराव गायकवाड हे मुळात, गुरं राखणारा गुराखी मुलगाच होता. बडोद्याच्या गायकवाड घराण्याचा वंश खंडित झाल्यामुळे, त्यांच्या रक्ताचा कुणी वंशज सापडतो का म्हणून, त्यांच्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव जवळील मूळ गावात येऊन शोध घेतल्यावर, हा गुरं राखणारा मुलगा सापडला. हा मुलगा राजा झाला तेव्हा त्याने भारतात केवढी मोठी सामाजिक क्रांती केली, हे आपण पाहतोच. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी पूरक व्यवस्था निर्माण करण्यात सयाजीरावांचा फार मोठा वाटा होता, हे कुणीच विसरू शकणार नाही. त्याच बाबासाहेबांनी आधुनिक भारताला घडवणारी घटना दिली. यावरून एखादा गुराखी राजा झाला तर काय होऊ शकतं, हे आपण समजू शकतो.
गुराखी गडावर ३१ वर्षांपासून होतयं अनोखं गुराखी संमेलन
केशवरावांनी १९८५ मध्ये गुराखी गडाची स्थापना केली आणि १९९१ पासून त्यांनी तिथं साहित्य संमेलन घ्यायला सुरुवात केली. या साहित्य संमेलनाची त्यांची संकल्पना विलक्षण वेगळी होती. सुरुवातीच्या कितीतरी संमेलनांना त्यांनी कुणीही प्रथितयश लेखक बोलावला नाही. त्या परिसरातल्या लोककलावंतांनाच त्यांनी तो मान दिला. सुरुवातीच्या काही संमेलनांच्या अध्यक्षांची नावे पाहिली तर, ही गोष्ट आपल्या सहज लक्षात येईल. उदाहरणार्थ - कोंडामाय सांगळे, गीतामाय गाडकर, केशवराव पाटील गिरे, पार्वतीमाय धुळगुंडे, बयाबाई देवकांबळे, चंद्रभागाबाई शेळके, वत्सलाबाई केंद्रे, अहिल्याबाई बनसोडे, संताबाई शहापूरवाड, तातेरावजी डक्कलवार, सलीमभाई फकीर, दत्तात्रय वासुदेव या सुरुवातीच्या अध्यक्षांमध्ये सर्व जाती, जमाती, आदिवासी अशा लोकांची अध्यक्ष म्हणून केशवरावांनी निवड केलेली दिसते. यात प्रामुख्याने त्यांनी स्त्रियांना प्राधान्य दिलेलं दिसतं. त्यांचा तेव्हाचा नियमच असा होता की, मागच्या वर्षीचा अध्यक्ष हा पुढच्या वर्षीच्या संमेलनाचा उद्घाटक असे.
काय होती केशवरावांच्या डोक्यात गुराखी साहित्य संकल्पना, याचा शोध घेत असताना, गुराखी साहित्य म्हणजे काय ? हे सांगण्यासाठी केशवरावांनी गुराखी साहित्याच्या १३६ व्याख्या लिहून ठेवलेल्या आहेत. केशवरावांनी लिहिलेल्या या व्याख्या म्हणजे मराठी भाषेतल्या १३६ कविताच आहेत. ग्रामजीवनाचं इतकं सखोल चिंतन आतापर्यंत कोणाही प्रतिभावंतानं केलेलं नसावं, असं त्या व्याख्या वाचताना माझ्या लक्षात आलं. या व्याख्या मी वाचल्या आणि केशवराव ही काय असामी होती, हे माझ्या लक्षात आलं. या व्याख्या वाचताना अक्षरशः माझ्या अंगावर रोमांच उभे राहत होते. मी शहरुन येत होतो. केशवरावांचा आत्मा किती सूक्ष्म होऊन, ग्रामसंस्कृतीत शिरून, कुठून कुठून फिरून येतो आणि ग्रामजीवनाची एक एक रहस्ये उलगडत जातो, ते या व्याख्या वाचताना कळतं. केशवरावांमध्ये प्रचंड अवाक्याची प्रतिभा होती, हेही आपल्या सहज लक्षात येऊन जातं. या ग्रामसंस्कृतीच्या प्रत्येक घटकाशी संबंध असलेला आणि त्या भोवती आपलं भावविश्व गुंफणारा प्रत्येक माणूस हा गुराखी साहित्यिक आहे, असं केशवरावांना वाटायचं.
(इंद्रजित भालेराव हे प्रतिथयश कवी-लेखक आहेत.)






