संजना खंडारे
- छत्रपती संभाजीनगरच्या रशिदपुरा भागात उघडकीस आलेल्या अवैध गर्भपात रॅकेटने संपूर्ण मराठवाडा हादरला आहे.
- एका साध्या अपार्टमेंटच्या आड चालणाऱ्या या बेकायदेशीर ‘मिनी ऑपरेशन थिएटर’मध्ये महिलांचे जीव धोक्यात घालून गर्भपात केले जात होते आणि अर्भकांची अमानुष विल्हेवाट लावली जात होती.
- पोलिसांच्या धडक कारवाईत या भीषण वास्तवाचा पर्दाफाश झाला असून, या घटनेने केवळ कायद्यालाच नव्हे तर समाजाच्या संवेदनशीलतेलाही मोठा प्रश्न विचारला आहे.
तारीख २९ एप्रिल २०२६. दुपारचे साधारण दोन वाजलेत. छत्रपती संभाजीनगरच्या रशिदपुरा भागात तीव्र उन्हाने अक्षरशः अंग भाजून निघतंय. पण या उन्हापेक्षाही अधिक अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे या रशिदपुऱ्यातील स्मशान शांतता. आजूबाजूला नजर टाकली तर एक भला मोठा नाला दिसतो आणि त्या नाल्याभोवती घोळक्याने फिरणारी १०–१२ भटकी कुत्री. त्यांचा सततचा भुंकण्याचा आवाज या शांततेला अधिक भयावह बनवतो. रशिदपुरामधील ‘खमर विला’ अपार्टमेंटसमोर ‘बाईमाणूस’ची टीम उभी आहे. बाहेरून पाहिलं तर हे एक साधं अपार्टमेंट.
मात्र याच अपार्टमेंटच्या एका फ्लॅटच्या चार भिंतींच्या आत काय चालत होतं, याची कल्पनाही करवत नाही. कारण, हे तेच ठिकाण आहे. जिथे जन्माला येण्याआधीच अनेक जीव संपवले जात होते. २८ एप्रिल रोजी पोलिसांनी इथे छापा टाकला आणि उघड झाला एक असा काळा व्यवसाय, ज्याने माणुसकीलाच हादरवून टाकलं. या ठिकाणी अवैधरित्या गर्भपात केले जात होते आणि त्यानंतर त्या निष्पाप अर्भकांना घराच्या मागील नाल्यात फेकून दिलं जात होतं. त्यानंतर त्यांची विल्हेवाट लावत होते ते हेच गल्लीतील भटके कुत्रे. ही केवळ एक गुन्हेगारी घटना नाही, ही मानवतेला काळिमा फासणारी, अंतर्मन हादरवून टाकणारी क्रूरता आहे.
नेमकी काय आहे ही संपूर्ण घटना? पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश कसा केला? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठवाड्यात अवैध गर्भपाताचे प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणावर का वाढतंय? या सगळ्याचा सविस्तर आढावा ‘बाईमाणूस’च्या या विशेष रिपोर्टमधून.
रशिदपुऱ्यातील ‘खमर विला’ अपार्टमेंटमध्ये नेमकं काय सुरू होतं…?
रशिदपुरा परिसरातील ‘खमर विला’ या अपार्टमेंटमध्ये सुरू असलेलं हे प्रकरण केवळ एक साधं गुन्हेगारी कृत्य नसून, एक संघटित आणि नियोजनबद्ध अवैध गर्भपात रॅकेट असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झालंय. निवृत्त न्यायाधीशांचा बंगला भाड्याने घेऊन, कोणतीही वैद्यकीय परवानगी किंवा अधिकृत नोंदणी न करता या ठिकाणी घराच्या आतच मिनी ऑपरेशन थिएटर उभारण्यात आलं होतं. या ठिकाणी अंदाजे गेल्या पाच वर्षांपासून महिलांचे बेकायदेशीर पद्धतीने गर्भपात केले जात होते. या रॅकेटमध्ये एका अल्पशिक्षित दाम्पत्यासह इतर साथीदारांचा सहभाग असल्याचे समोर आले असून, महिलांना संपर्क करण्यासाठी स्वतंत्र एजंटचे जाळे कार्यरत होते. या एजंटमार्फत विविध भागांतून महिलांना येथे आणले जात होते आणि मोठ्या रकमेच्या मोबदल्यात गर्भपाताची प्रक्रिया केली जात होती.
(हेच रशिदपुरातील खमर विला अपार्टमेंट (Photo Credit: Kartik Jadhav))
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी मुख्य सूत्रधार शाहेदा परवीन सय्यद इर्शाद अहमद (५१), तिचा पती सय्यद इर्शाद अहमद सय्यद गणी (६१), मदतनीस नसरीन नजीर शेख (४७) आणि मीनाक्षी मंगेश थोरात (३५) या चौघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना ५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर गर्भलिंग निदान करणारा लॅब चालक मंगेश सुखदेव थोरात आणि सुरेखा बबन हिरडे हे दोघेही फरार आहेत.
या संपूर्ण प्रकारात सर्वात गंभीर बाब म्हणजे, वैद्यकीय सुरक्षिततेचे कोणतेही निकष पाळले जात नव्हते. परिणामी संबंधित महिलांच्या जीवाला धोका निर्माण होत होता. याशिवाय, गर्भपातानंतर अर्भकांची अत्यंत अमानुष पद्धतीने विल्हेवाट लावली जात असल्याचेही तपासात उघड झालंय. प्राथमिक चौकशीत लिंगनिवडीच्या संशयावरून गर्भपात केल्याची शक्यता वर्तवली जात असून, त्यामुळे हा प्रकार अधिक गंभीर स्वरूपाचा ठरतो. या प्रकरणात केवळ अवैध गर्भपातच नव्हे, तर बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय, लिंगनिवड प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन, तसेच मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन यांचा समावेश असल्याने पोलिसांनी बहुआयामी तपास सुरू केलाय.
हे प्रकरण उघडकीस कसं आलं?
"रशिदपुरा परिसरात सुरू असलेल्या या अवैध गर्भपात रॅकेटचा उलगडा एका सतर्क महिलेच्या जागरूकतेमुळे झाला. परिसरात ये-जा करणाऱ्या संशयास्पद हालचाली, वारंवार रात्री उशिरा येणाऱ्या वेगवेगळ्या महिला यामुळे तिला संशय आला. अखेर तिने धाडस करून पोलिसांना याबाबत माहिती दिली. या माहितीची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तात्काळ पथक तयार करून ‘खमर विला’ येथे २७ एप्रिलला रात्री ११.३० १२.०० च्या सूर्रास छापा टाकला." असे सिटी चौक ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी यांनी ‘बाईमाणूस’शी बोलतांना सांगितले.
(हेच ते घर ज्या मध्ये अवैध गर्भपात केंद्र चालू होतं... (Photo Credit: Kartik Jadhav))
छाप्यादरम्यान पोलिसांनी घरात प्रवेश केला असता, आत सुरू असलेली परिस्थिती पाहून पोलीस हादरले. एका २४ वर्षीय विवाहित महिलेवर गर्भपाताची प्रक्रिया सुरू असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून ही प्रक्रिया थांबवली आणि संबंधित महिलेला सुरक्षितपणे बाहेर काढून शासकीय घाटी रुग्णालयात दाखल केले. पुढील तपासात घरातच बेकायदेशीरपणे उभारलेले मिनी ऑपरेशन थिएटर, वैद्यकीय उपकरणांचा साठा आणि संशयास्पद साहित्य आढळून आले. त्यानंतर या संपूर्ण रॅकेटचा भांडाफोड झाला आणि संबंधित चार आरोपींना अटक करण्यात आली.
घरातच ‘मिनी ऑपरेशन थिएटर’; २४ उपकरणे जप्त
बाहेरून साधे आणि सामान्य दिसणारे हे घर आतून मात्र एका बेकायदेशीर दवाखान्यात रूपांतरित झाले होते. घरातील एका खोलीत पूर्णपणे कार्यरत असे ‘मिनी ऑपरेशन थिएटर’ उभारण्यात आले होते. तपासादरम्यान पोलिसांनी तब्बल २४ प्रकारची वैद्यकीय उपकरणे आणि साधने जप्त केली. यामध्ये गर्भपातासाठी वापरली जाणारी अत्याधुनिक यंत्रणा, सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स, इंजेक्शन्स, औषधे, सलाईन सेट्स तसेच इतर वैद्यकीय साहित्याचा समावेश आहे.

या उपकरणांची मांडणी आणि वापराची पद्धत पाहता, येथे नियमितपणे गर्भपाताच्या प्रक्रिया केल्या जात असल्याचे स्पष्ट होते. विशेष म्हणजे, ही सर्व उपकरणे कोणत्याही अधिकृत वैद्यकीय परवानगीशिवाय वापरली जात होती. स्वच्छतेचे निकष, निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया किंवा आपत्कालीन वैद्यकीय सुविधा यांचा कोणताही ठोस पुरावा आढळून आला नाही.
दहावी उत्तीर्ण दाम्पत्याचा ‘मृत्यूचा व्यवसाय’
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक आणि चिंताजनक बाब म्हणजे, हा संपूर्ण अवैध व्यवसाय केवळ दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या एका दाम्पत्याकडून चालवला जात होता. कोणतेही वैद्यकीय शिक्षण, प्रशिक्षण किंवा अधिकृत परवाना नसतानाही हे दाम्पत्य गेल्या सुमारे पाच वर्षांपासून महिलांचे गर्भपात करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. पैशाच्या हव्यासापोटी आणि जलद कमाईच्या उद्देशाने या दाम्पत्याने हा ‘मृत्यूचा व्यवसाय’ उभारला होता.
याच नाल्यामध्ये गर्भ फेकले जात होते.(Photo Credit: Kartik Jadhav))
महिलांच्या आरोग्याची, त्यांच्या जीवाची किंवा कायद्याची कोणतीही पर्वा न करता हा व्यवसाय सुरू ठेवण्यात आला. तपासात असेही समोर आले आहे की, आरोपींनी पोलिसांपासून बचाव करण्यासाठी अत्यंत चलाखीने आपली कार्यपद्धती आखली होती. संशय निर्माण होऊ लागल्यास ते तातडीने आपले ठिकाण बदलत असत. एका भागात काही काळ काम केल्यानंतर ते दुसऱ्या भागात स्थलांतर करत आणि पुन्हा त्याच पद्धतीने अवैध गर्भपात सुरू करत. या सततच्या घरबदलामुळे आणि गुप्त पद्धतीने काम केल्यामुळे ते अनेक वर्षे प्रशासनाच्या नजरेआड राहण्यात यशस्वी ठरले. या प्रकारामुळे केवळ कायद्याचे उल्लंघन झाले नाही, तर अनेक महिलांच्या जीवाशी आणि आरोग्याशी गंभीर खेळ केला गेला असल्याचे स्पष्ट होते.
मराठवाड्यात वाढले अवैध गर्भपात रॅकेट्स
छत्रपती संभाजीनगरमधील रशिदपुरा येथे उघडकीस आलेले हे प्रकरण एकमेव नाही. उलट, गेल्या सहा महिन्यांत संपूर्ण मराठवाडा विभागात अवैध गर्भपाताच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाल्याचं चित्र समोर येत आहे. विविध जिल्ह्यांमध्ये पोलिस आणि आरोग्य विभागाच्या कारवायांमधून अशा अनेक रॅकेट्सचा पर्दाफाश झाला आहे. दोन महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्यात उघडकीस आलेल्या प्रकरणाने राज्यभर खळबळ उडवली होती. त्या ठिकाणीही महिलांचे बेकायदेशीर गर्भपात करून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर प्रशासनाने कारवाईचे आश्वासन दिले असले, तरी अशा प्रकारच्या घटना थांबलेल्या दिसत नाहीत.

याशिवाय, छत्रपती संभाजीनगरमधील सातारा आणि पिसादेवी परिसरात देखील गेल्या दोन महिन्यांत दोन स्वतंत्र अवैध गर्भपात रॅकेट्स उघडकीस आले आहेत. या दोन्ही ठिकाणी घरगुती पातळीवर मिनी ऑपरेशन थिएटर उभारून बेकायदेशीर पद्धतीने गर्भपात करण्यात येत असल्याचे समोर आले होते. विशेष म्हणजे, या प्रकरणांमध्येही एजंटच्या माध्यमातून महिलांना आणले जात असल्याचे निष्पन्न झाले होते. तसेच, लातूर आणि परभणी जिल्ह्यांमध्येही संशयास्पद पद्धतीने गर्भपात होत असल्याच्या तक्रारी गेल्या काही महिन्यांत पुढे आल्या आहेत. काही प्रकरणांमध्ये आरोग्य विभागाने तपास सुरू केला असून, काही ठिकाणी औषधांच्या बेकायदेशीर पुरवठ्याचाही मागोवा घेतला जातोय.
विशेष म्हणजे, या बहुतांश प्रकरणांमध्ये लिंगनिवडीचा संशयही व्यक्त करण्यात येतो. मुलगी नको या मानसिकतेमुळे किंवा सामाजिक दबावामुळे महिलांना अशा ठिकाणी जाण्यास भाग पाडले जात असल्याचेही पोलिसांच्या तपासात समोर आले.
आकडेवारी काय सांगते?
Guttmacher Institute आणि Indian Council of Medical Research यांच्या अभ्यासानुसार भारतात दरवर्षी सुमारे 1.56 कोटी गर्भपात होतात, ज्यापैकी केवळ 22 टक्के नोंदणीकृत केंद्रांमध्ये होतात, तर बहुतेक गर्भपात औषधांच्या माध्यमातून नोंदीबाहेर होतात. २०१९–२२ मधील Ministry of Health and Family Welfare (HMIS) डेटानुसार दरवर्षी 30–35 लाख गर्भपात अधिकृत नोंदींमध्ये दिसतात, मात्र ही संख्या प्रत्यक्ष घटनांपेक्षा कमी मानली जाते. National Family Health Survey नुसार जन्मावेळी लिंग गुणोत्तर अजूनही असमतोल (929 मुली प्रति 1000 मुलगे; महाराष्ट्रात सुमारे 913) आहे, तर National Crime Records Bureau नुसार PCPNDT कायद्यांतर्गत नोंदवली जाणारी प्रकरणेही मर्यादित आहेत.






