अप्सरा आगा / संजना खंडारे
- आषाढी वारी म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो विठ्ठलाचा नामघोष, टाळ-मृदुंगाचा गजर आणि लाखो वारकऱ्यांचा भक्तीचा प्रवास. मात्र या भक्तीच्या सोहळ्यामागे काही हात असे असतात, जे शांतपणे वारीची व्यवस्था उभी ठेवतात.
- पहाटे अंधार असतानाच चुली पेटवणारे, शेकडो वारकऱ्यांसाठी जेवण बनवणारे, पाणी भरणारे, भांडी घासणारे आणि मुक्कामाची व्यवस्था सांभाळणारे हे हात बहुतांश वेळा महिलांचे असतात. त्या स्वतःही वारकरी आहेत; पण त्याचबरोबर वारीच्या व्यवस्थेचा अदृश्य आधार आहेत.
- विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने निघालेल्या या माऊल्या अनेकदा स्वतःचा थकवा, विश्रांती आणि वेळ बाजूला ठेवून इतर वारकऱ्यांच्या सेवेत रममाण होतात. त्यांच्या श्रमांवर उभी असलेली वारी, सेवाभाव आणि न बोलल्या गेलेल्या कष्टांची ही कहाणी...
पहाटेचे साडेतीन वाजले आहेत. ज्ञानेश्वर माऊलींच्या सासवड मुक्कामाच्या ठिकाणी अजूनही अंधार दाटून आहे. काही वारकरी चादर गुंडाळून झोपलेले आहेत. टाळ-मृदुंगाचा आवाज अजून सुरू झालेला नाही. पण एका कोपऱ्यात चुली पेटू लागल्या आहेत. मोठमोठी पातेली स्वच्छ केली जातायेत. कुणी पाणी तापवतंय, कुणी सकाळच्या चहाची तयारी करतंय, कुणी सर्कलच्या न्याहारीची, तर कुणी काल रात्रीच्या भांड्यांचा ढीग आवरतंय.
ही दृश्यं वारीत दरवर्षी दिसतात. मात्र या दृश्यांमधील महिलांकडे फार कमी लोकांचं लक्ष जातं. त्या दिंडीसोबत चालणाऱ्या वारकरी आहेत, पण त्याचबरोबर त्या वारी सुरू ठेवणाऱ्या श्रमिकही आहेत. हजारो वारकऱ्यांच्या जेवणापासून ते मुक्कामाच्या व्यवस्थेपर्यंत अनेक जबाबदाऱ्या त्या सांभाळतात. त्यांच्या श्रमांवर वारीची व्यवस्था उभी असते. तरीही त्यांची ओळख ना व्यासपीठावर होते, ना त्यांच्या कामाची स्वतंत्र नोंद घेतली जाते. वारी ही समतेचा, भक्तीचा आणि सामूहिकतेचा संदेश देणारी परंपरा मानली जाते. पण या परंपरेच्या पडद्यामागे स्त्रियांच्या श्रमांचं एक वेगळंच वास्तव दिसून येतं.

वारीत दिसणाऱ्या या दृश्यांमागचं वास्तव समजून घेण्यासाठी 'बाईमाणूस'च्या टीमने यंदाच्या आषाढी वारीत संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या विविध दिंड्यांमधील महिलांशी संवाद साधला. स्वयंपाक करणाऱ्या, पाणी भरणाऱ्या, भांडी घासणाऱ्या आणि मुक्कामाची व्यवस्था सांभाळणाऱ्या… या महिलांच्या अनुभवांतून वारीचा एक वेगळाच चेहरा समोर आला. विठ्ठलाच्या भक्तीबरोबरच या महिलांच्या श्रमांवरही वारीची व्यवस्था उभी असल्याचं त्यांच्याशी बोलण्यातून स्पष्ट होत गेलं.
त्यांच्या अनुभवांतून वारीचा असा पैलू उलगडला, जो नामघोषात अनेकदा ऐकूच येत नाही. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा मुक्काम जेव्हा सासवड येथे होता तेव्हा तेथे मुक्कामासाठी अनेक दिंड्या थांबल्या होत्या. त्यातील एका दिंडीच्या मुक्कामाच्या ठिकाणी आम्ही गेलो.
"ही विठ्ठलाची सेवा आहे..." - विमलबाई
भाकरी थापता थापता मधूनच पदराने कपाळावरचा घाम पुसत विमलबाई बोलू लागल्या. त्यांच्या हातांची लगबग क्षणभरही थांबत नव्हती. एका बाजूला चुलीवर कालवण शिजत होतं, तर दुसऱ्या बाजूला भाकऱ्या तव्यावर भाजल्या जात होत्या. बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर थकवा दिसत असला, तरी त्यामागे समाधानाची एक वेगळीच झलक होती. वारीतील त्यांच्या दिवसाबद्दल विचारलं असता त्या म्हणाल्या,
"वारीला आलं की आमचा दिवस पहाटेच सुरू होतो. वारकऱ्यांचा चहा, न्याहारी, जेवण, पाणी, भांडी अशी कामं दिवसभर सुरूच असतात. दिवसभर चालून दुसऱ्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहचल्यानंतर पुन्हा स्वयंपाकाची जबाबदारी असते. कष्ट होतात, अंगही दुखतं; पण ही विठ्ठलाची सेवा आहे, असं मानून आम्ही सगळ्या महिला मिळून काम करतो. कुणी भाकऱ्या थापतं, कुणी भाजी, कुणी पाणी आणतं, तर कुणी भांडी घासतं. वारकरी पोटभर जेवून तृप्त झाल्याचं पाहिलं की दिवसभराचा सगळा थकवा निघून जातो. तेच आमच्यासाठी खरं समाधान आहे."
विमलबाईंच्या बोलण्यातून वारीतील महिलांच्या दिवसाचं एक वेगळंच चित्र समोर येतं. दिवसभराचा पायी प्रवास, त्यानंतर शेकडो वारकऱ्यांसाठी स्वयंपाक, पाणी, भांडी या सगळ्या जबाबदाऱ्या त्या कोणतीही तक्रार न करता पार पाडतात. त्यांच्यासाठी हे केवळ घरगुती काम नसून विठ्ठलाची सेवा आहे. त्यामुळे कष्टांची जाणीव असली तरी त्याचं ओझं वाटत नाही, असं त्या सांगतात.

"वारकरी एक कुटुंबासारखे राहतात..." - वनिता गायकवाड
असाच अनुभव वनिता गायकवाड यांचाही आहे. गेली चार वर्षे त्या नियमित वारी करताहेत. वारीमुळे मिळणाऱ्या मानसिक समाधानाबरोबरच सामूहिक श्रम आणि एकोप्याची भावना त्यांना पुन्हा पुन्हा या वाटेवर घेऊन येते. ‘बाईमाणूस’शी बोलताना वनिता गायकवाड म्हणाल्या, "वारीला आलं की मनाला खूप समाधान मिळतं. घरात रोज संसाराची, कामाची, पैशाची अशी काही ना काही चिंता असते. पण इथं आल्यावर ती सगळी काळजी मागे पडते. इथं सगळे वारकरी एक कुटुंब असल्यासारखे राहतात. चालता चालता गप्पा होतात, एकमेकांच्या सुख-दुःखाच्या गोष्टी ऐकतो, त्यामुळे प्रवासाचा थकवाही जाणवत नाही.
दिंडी मुक्कामाला थांबली की लगेच कामांची विभागणी होते. कोणतंही काम लहान किंवा मोठं नसतं. आमच्यासोबत पुरुषमंडळी ही काम करतात. वारीमध्ये प्रत्येकजण आपापली जबाबदारी मनापासून पार पाडतो. दिवसभर चालून आल्यानंतर पुन्हा स्वयंपाक करणं सोपं नसतं. हात दुखतात, पायही थकलेले असतात. पण वारकऱ्यांनी पोटभर जेवून 'जेवण छान झालं' असं म्हटलं की सगळा शीण निघून जातो. तेच आमच्यासाठी विठ्ठलाची सेवा आणि त्याचं समाधान आहे."
दिंडीचा प्रवास, जबाबदाऱ्यांची विभागणी अन् सेवाभावाची परंपरा
दिंडीतील प्रत्येक दिवस ठरलेल्या नियोजनानुसार चालतो. वारकऱ्यांचा प्रवास, मुक्काम, जेवणाची व्यवस्था, सामानाची जबाबदारी आणि इतर कामांची विभागणी आधीच केलेली असते. या सगळ्या व्यवस्थेमध्ये महिला आणि पुरुष दोघांचाही सहभाग असतो. मात्र स्वयंपाकाची मुख्य जबाबदारी महिला अनेक वर्षांपासून सांभाळत आल्या आहेत.
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम रोटेगाव दिंडीप्रमुख नामदेव सांगतात, "आमच्या दिंडीत सध्या शंभराच्या आसपास वारकरी आहेत. ही दिंडी आमच्या घराण्यातील चार पिढ्यांपासून अखंड सुरू आहे. पूर्वीच्या काळात आजच्यासारख्या सोयी-सुविधा नव्हत्या. सामान वाहून नेण्यासाठी गाड्याही नव्हत्या. डोक्यावर किंवा खांद्यावर सामान घेऊनच वारी करावी लागायची. आता वाहनांची व्यवस्था झाली आहे, त्यामुळे काही गोष्टी सोप्या झाल्या असल्या तरी वारीची शिस्त आणि परंपरा मात्र तशीच टिकून आहे."
पुढे ते सांगतात, "दिंडी चालवण्यासाठी प्रत्येकाची जबाबदारी ठरलेली असते. कोण काय काम करणार, हे आधीच ठरवलं जातं. महिला स्वयंपाकाची संपूर्ण जबाबदारी सांभाळतात. भाज्या चिरण्यापासून, भाकऱ्या करण्यापर्यंत आणि वारकऱ्यांना जेवण वाढण्यापर्यंत त्या सगळं काम एकत्रितपणे करतात. त्यांच्याशिवाय दिंडीची व्यवस्था सुरळीत चालणं कठीण आहे. आम्ही पुरुष मंडळी पाणी, सामान, मुक्कामाची जागा, वाहतूक आणि बाहेरची कामं पाहतो. दिंडीत एखादी अडचण आली, एखादा प्रश्न निर्माण झाला, तर सगळे मिळून बसतो आणि तो सोडवतो. इथं कोणी मोठं-लहान नसतं. प्रत्येकजण आपापली जबाबदारी पार पाडतो. वारी ही फक्त पायी चालण्याची परंपरा नाही, तर एकमेकांना साथ देत, जबाबदाऱ्या वाटून घेत केलेली सामूहिक साधना आहे. अनेक वर्षांपासून हीच परंपरा जपली जाते. प्रत्येक वारकरी आपापल्या परीने सेवा देतो, म्हणूनच दिंडीचा हा प्रवास अखंड सुरू राहतो."

"इतरांच्या पोटाची काळजी घेणाऱ्या माऊल्या"
पदराने घाम पुसत नरसाबाई हसत सांगतात, "मी गेली १०-११ वर्षं या दिंडीसोबत वारी करते आहे. वारीला आलं की खूप समाधान वाटतं. इथं आलं की घरची, संसाराची, कशाचीच चिंता राहत नाही. सगळं विसरून जातो. दिवसभर चालून दिंडी एखाद्या माळावर किंवा मुक्कामाच्या ठिकाणी थांबली की आधी झाडाची सावली शोधायची. तिथं पोतं अंथरून थोडा वेळ अंग टाकायचं. पण ती विश्रांतीही फार वेळ नसते. थोड्याच वेळात उठून पुन्हा स्वयंपाकाच्या तयारीला लागावं लागतं."
पुढे त्या सांगतात, "आमच्या दिंडीत चार-पाच महिला स्वयंपाकाचं काम पाहतात. प्रत्येकीची कामं ठरलेली असतात. कोण पाणी आणतं, कोण चुलीसाठी दगड रचतं, कोण लाकडं गोळा करतं. चूल पेटली की मग भाकऱ्या, भाजी, कालवण सगळ्याची लगबग सुरू होते. एका पंगतीसाठी शंभर ते दीडशे भाकऱ्या कराव्या लागतात. हे काम आम्हाला जास्त कष्टाचं वाटत नाही कारण आम्हाला याची आता सवय झालीये. कारण आम्ही सगळ्या मिळून-मिसळून काम करतो. एकमेकींना मदत करत असल्यामुळे एवढ्या मोठ्या दिंडीचा स्वयंपाकही वेळेत होतो."
"या हातांमुळे आमची वारी सुखकर..."
वारीच्या प्रवासात प्रत्येक वारकरी आपापल्या परीने सेवा देत असतो. मात्र दिवसभर चालून थकलेल्या वारकऱ्यांना वेळेवर जेवण मिळावं, मुक्कामाच्या ठिकाणी आवश्यक व्यवस्था व्हावी, यामागे या महिलांचे मोठे योगदान असते. दिंडीतील पुरुष वारकरीही या श्रमांची जाणीव ठेवतात. त्यांच्या मते, महिलांच्या मेहनतीमुळेच दिंडीचा रोजचा प्रवास अधिक सुरळीत आणि सुखकर होतो.
दिंडीतील लक्ष्मण शेळके या वारकऱ्याने सांगितलं,
"आम्ही दिवसभर विठ्ठलाच्या नामस्मरणात चालत असतो. चालून आल्यानंतर शरीर थकलेलं असतं, भूक लागलेली असते. अशावेळी वेळेवर जेवण मिळतं, मुक्कामाची व्यवस्था झालेली असते, यामागे या महिलांचे खूप कष्ट असतात. त्या स्वतःही आमच्यासोबत चालतात, पण तरीही आमची काळजी घेतात. त्या नसतील तर दिंडीची व्यवस्था चालवणं खूप कठीण होईल. आम्ही त्यांचं काम केवळ स्वयंपाक म्हणून पाहत नाही, तर हीसुद्धा विठ्ठलाचीच सेवा आहे असं मानतो."

"कामाचा मोबदला नाही, पण सेवेत समाधान..."
घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून वारीत येणाऱ्या या महिला स्वतःचा वेळ, श्रम आणि ऊर्जा या वारीला देतात. सकाळच्या चहापासून रात्रीच्या जेवणापर्यंत, भाजी चिरण्यापासून भांडी घासण्यापर्यंतची कामं त्या कोणतीही अपेक्षा न ठेवता पार पाडतात. वारकऱ्यांचं पोट भरलं, त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं, की हाच या सेवेचा खरा मोबदला असल्याचं त्या सांगतात.
याबाबत विमलबाई म्हणतात, "यासाठी आम्ही वेगळे पैसे घेत नाही. ही सेवा म्हणूनच करतो. विठ्ठलाच्या नावाने आलेल्या वारकऱ्यांना जेवण घालता येतं, त्यांचं पोट भरतं, यातच आमचं समाधान आहे. कितीही थकवा आला तरी वारकरी जेवून आनंदाने उठले की वाटतं, आपली सेवा सफल झाली."
वारीच्या अदृश्य हातांची नोंद कधी होणार?
पहाटे पुन्हा चुली पेटतील. पुन्हा धुराच्या लोटात भाकऱ्यांचा थाप... थाप... थाप... असा आवाज घुमेल. पुन्हा हजारो वारकरी विठ्ठलाच्या नामघोषात पुढच्या मुक्कामाकडे निघतील. मात्र या प्रवासाच्या मागे काही हात शांतपणे आपलं काम करत राहतील. हे हात कधी पीठ मळतील, कधी पाणी भरतील, कधी शेकडो वारकऱ्यांसाठी जेवण बनवतील, तर कधी सगळे झोपल्यानंतर भांड्यांचा शेवटचा ढीग आवरतील. त्यांच्या चेहऱ्यावरचा थकवा कुणाला दिसेलही, पण त्यामागचा सेवाभाव अनेकदा शब्दांत मांडला जात नाही.
विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या या महिलाही स्वतः वारकरी आहेत. त्यांनाही पंढरीची ओढ आहे, अभंग ऐकायचे आहेत, नामस्मरण करायचं आहे. मात्र हजारो वारकऱ्यांची वारी सुखकर व्हावी यासाठी त्या अनेकदा स्वतःचा वेळ, विश्रांती आणि भक्तीचा क्षणही बाजूला ठेवतात. तरीही त्या या त्यागाकडे तक्रारीच्या नजरेने पाहत नाहीत. कारण त्यांच्या दृष्टीने प्रत्येक वारकऱ्याच्या पोटाची काळजी घेणं म्हणजेच विठ्ठलाची सेवा आहे.

वारी ही केवळ टाळ-मृदुंगाचा गजर, पालखी सोहळा आणि पंढरीच्या दर्शनाची ओढ नाही. वारी म्हणजे हजारो हातांनी उभी राहिलेली एक जिवंत व्यवस्था आहे. त्या हातांमध्ये या श्रमिक महिलांचे हात आहेत. आज गरज आहे ती त्यांच्या सेवेला केवळ भक्ती म्हणून न पाहता, त्यांच्या श्रमांना आणि योगदानाला योग्य मान्यता देण्याची. कारण वारी चालते ती फक्त वारकऱ्यांच्या पावलांनी नाही, तर या अदृश्य हातांच्या कष्टांनीही. वारीच्या इतिहासात त्यांची नोंद केवळ स्वयंपाक करणाऱ्या किंवा व्यवस्था पाहणाऱ्या महिला म्हणून नव्हे, तर वारीचा अदृश्य कणा उभा ठेवणाऱ्या श्रमिक महिला म्हणून व्हायला हवी.






