भूषण कोरगावकर
आजच्या उजव्या-डाव्या कट्टरतेच्या युगात प्रत्येकजण समोरच्याकडे संशयाने पाहतोय. समोरच्याची प्रत्येक कृती आपल्याला सोयीस्कर भिंगातून पाहिली जातेय आणि तिच्यावर हल्ला केला जातोय. हा द्वेष, हा विखार, ही फूट जाणीवपूर्वक वाढवली जातेय. अशा वेळेस वाईटाला वाईट म्हणण्यासाठी जे धैर्य लागतं ते प्राजक्त देशमुख लिखित आणि भद्रकाली प्रॉडक्शन्स निर्मित 'करुणाष्टके' या नाटकाने दाखवलयं.
वारं सुटलं सुटलं, कुठं उठलं तुफान
उठ तुफान तरीही, जप पायीचं पैंजण...
काळः साधारण 1890 स्थळः नाशिक… महात्मा फुलेंच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून न्हावी समाजाने संप पुकारलाय. त्यामुळे विधवा ब्राह्मण स्त्रियांच्या डोक्यावरचे केस हळूहळू वाढतायत. कर्मठ समाजाची धाबी दणाणलीत. विधवा बायकांना जिवंत राहायचा अधिकार तर इंग्रजांच्या सतीबंदीच्या कायद्याने दिला पण त्यांचं जीवन भकास, भेसूर आणि भगभगीत कसं होईल याची समाज पुरेपूर काळजी घेतोय. आता वाढणाऱ्या केसांचं आणि मुख्य म्हणजे सुधारणावादी विचारांचं काय करायचं?
प्राजक्त देशमुख लिखित दिग्दर्शित 'करुणाष्टके' या भद्रकाली प्रॉडक्शन्सच्या नाटकात 'बाईबाई मिरजकर या विधवा बाईच्या वाड्यातली गोष्ट आपल्यापुढे साकारत जाते आणि त्यातल्या सात बायकांच्या सात कहाण्यांत आपण गुंतून जातो. कुणाचा नवरा चांगला होता, कुणाचा वाईट, कुणाला त्याच्यापासून नेहमीच सुख लाभलं, कुणाला क्वचित, तर कुणाला एकदाही नाही. कुणाला तर आत्यंतिक जाच झाला.
कुणाचा आजारपणात गेला, कुणाचा आत्महत्या करुन, कुणाचा अपघातात. तर कुणाचा घातपातात. पण प्रत्येकीच्या वाट्याला आलेलं केशवपन, आवडीचं अन्न पोटभर खाता न येणं, सतत कष्ट उपसावे लागणं, समाजाची अवहेलना झेलणं, मन मारून, भुईला भार म्हणून जगत राहणं, या सगळ्याला कारणीभूत होत्या केवळ आणि केवळ त्या काळच्या रुढी परपरा. त्या बनवल्या होत्या त्यांचा सर्वाधिक फायदा ज्यांना होणार आहे अशा लोकानी - म्हणजेच उच्चवर्णीय पुरुषांनी।

गीतांजली कुलकर्णी, पर्ण पेठे, कल्याणी मुळे, किरण खोजे, प्रतीक्षा खासनीस, केतकी सराफ, माधुरी भारती अशा एकापेक्षा एक खंद्या अभिनेत्री आणि त्याना चोख साथ देणारा विनायक चव्हाण हे आठ कलाकार आपल्याला त्या खऱ्या काळातल्या काल्पनिक वाड्यात नेतात आणि आपण तिथलेच होऊन जातो. या वाड्यात बाईबाईंचा क्रूर दरारा आहे तसा सिंधूचा स्वतःच सूख स्वतः च शोधत राहाव असा मोकळा अॅटिट्यूडसुदधा आहे. देवकी, गोदाक्का, शाला, यमी खरं तर सगळ्या याच मताच्या आहेत. सिंधु ते यमीला एकदा बोलून दाखवते एवढचं.
सेक्सचा विचार करणं, कधी तो मिळवणं, तर कधी लादला जाणं, आणि नेहमीच त्यासाठी झुरणं हे वाट्याला आलेलं जीवन निमूट जगताना कुचाळक्या करणं, हसणं, रडणं, ओरबाडणं, खोड्या काढणं, जुनं आठवणं, सोयिस्कररित्या विसरणं, लपवणं, कबूल करणं हे सगळं त्या करत आल्यात, मनातल्या मनात स्वप्नं बघत आल्यात. एकच गोष्ट त्या करत नाहीत, आपण ती करु शकतो हे त्यांच्या गावीही नाही, ती म्हणजे उंबरठ्याच्या बाहेर पडणं आणि स्वमर्जीने मोकळा श्वास घेणं. याची पहिली जाणीव त्यांना होते ती दुर्गाच्या प्रवेशानंतर, सुंदर, लांबसडक केस असलेली, सुस्वरुप, तरुण, रंगीत लुगडं नेसलेली दुर्गा.
ती येते तेव्हाच लक्षात येतं की बदलाचं वारं आता वाहू लागलंय. या वाऱ्यात अनेक गोष्टी मोडून पडणारेत. अनेक गोष्टी नवीन घडणारेत. अक्षरओळख, आधुनिक विचारांचा बाप अशा दुर्गाच्या काही जमेच्या बाजू. ती स्वतः आहेही मिश्किल आणि बिनधास्त. पण मध्यंतराआधी बाईबाई तिला कोंडून घालतात आणि 'नाही तुला भर चौकात भादरली तर नाव नाही लावणार? अशी धमकी देतात. सगळ्यांचा थरकाप होतो. पुढच्या अंकात नेमकं काय घडते? शांतेच्या पोटात वाढणारं बाळ तिच्या नवऱ्याचंच असतं की इतर कुणाचे? मुंबईहून न्हावी घेऊन येणारे लोक वाड्यात पोहोचल्यावर काय होतं? या प्रश्नांची उत्तरं नाटकात मिळत जातात आणि एक समृद्ध नाट्यानुभव घेतल्याचं समाधान आपल्याला मिळतं.
नाटकाच्या तांत्रिक बाजूंचा नक्कीच उल्लेख करावा लागेल. वेशभूषा, रंगभूषा, नेपथ्य आणि प्रकाशयोजना सारंच उत्तम जमून आलंय. विशेषतः दुर्गाचे केस लावून आरशात आपला चेहरा पाहून औटघटकेच्या अप्सरा बनलेल्या, हरखून गेलेल्या एकेका बाईचा प्रसंग. पुनरावृती असूनही तो भिडतो कारण लिखाण आणि अभिनयाइतकाच तांत्रिकदृष्ट्याही तो सरस आहे. यातली गाणी आणि अजिबात 'बसवलेलं' न वाटणारं नृत्यदेखील अनुभवात मोठीच भर घालतात.
नाटकात काही त्रुटीही आहेत. काही पात्र एकसुरी उतरली आहेत. काही प्रसंग नीटसे स्पष्ट होत नाहीत. काही गोष्टी काळाशी सुसंगत वाटत नाहीत. असं असलं तरी काही काही पात्रांना अनेक पदर आहेत आणि ते फार सहजपणे नाटकात येतात. आपला वेगळा लैंगिक कल असणारा नवरा किती देखणा, शांत, लाजाळू, हुशार होता यात गोदाक्का समाधान मानत राहते. तो आपल्यावर कसा 'भाळलेला होता असं स्वतःलाच पटवत राहते. त्याचा मृत्यू कसा झाला ते बेमालूमपणे लपवते. देवकीसारख्या बाईला नवन्याचा त्रास इतका पराकोटीचा की प्रसंगी वैधव्य परवडलं असं तिला वाटतं.
निष्ठुर बाईबाईंनाही ‘सुटका व्हावीशी वाटावं असं जगणं आपला धर्म मुळात देतोच का बायकांच्या वाट्याला?’ असा प्रश्न पूर्वायुष्यात पडलेलाच असतो. गरोदर शालेला शिव्या हासडायला, तिच्यावर हात उगारायला त्या कमी करत नाहीत पण एखाद प्रसंगी ती धडपडते तेव्हा त्यांच्याही तोंडून "सांभाळ गं बाई" निघतंच. वाड्यातला एकमेव तरणाबांड गडीमाणूस आपल्याला आवडतो असं सिंधु आणि यमी बिनधास्त कबूल करतात. हसतात. त्याची आणि एकमेकींची चेष्टा करतात. पण आपल्याला सिंधुही आवडते हे यमीला नीटसं जाणवतदेखील नाही. अशा छोट्या छोट्या प्रसंगांनी, विनोदांनी, गाण्यांनी नाटक उत्तरोत्तर रंगत जातं.

व्यावसायिक मराठी नाटकांसाठी हा काळ फार उत्तम आहे. तूफान लोकप्रिय विनोदी आणि कौटुंबिक नाटकांच्या जोडीलाच 'भूमिका', 'असेन मी नसेन मी', 'माझ्या बायकोचा रोबो’ अशी काही सुंदर, सशक्त, रंजक नाटकंही गर्दी खेचत आहेत. अशा वेळेस 'करुणाष्टके च्या निमित्ताने 'ही जुनी मढी तुम्ही का उकरताय?' असा प्रश्न काही जणांना पडतो.
या प्रश्नाकडे एकदा नीट पाहू या. प्रश्नकर्ते म्हणतात तितकी ही मढी जुनी झालीयेत का? मुंबईत चेंबुर, सायन, माटुंगा इथे राहणाऱ्या लोकांना अजूनही आठवतात त्या तमिळ ब्राम्हण कुटुंबातल्या खाकी आलवणातल्या डोकी भादरलेल्या वृद्ध, विधवा बायका. ही प्रथा त्यांच्या समाजात स्वातंत्र्यानंतरही टिकून होती, त्यामुळे 1990-95 पर्यंत म्हणजे अशा बायका जिवंत असेपर्यंत ती डोकावत राहिली, ती ही मुंबईसारख्या सर्वाधिक पुढारलेल्या शहरातून, राजरोस! इतर राज्य आणि महाराष्ट्रतही, तुरळक प्रमाणात का होईना पण वीस-पंचवीस वर्षापूर्वीपर्यंत अशा बायका खेडोपाडी आढळत होत्या. काशीच्या विधवांचा प्रश्न आज तरी सुटलाय का? मढी अजून मेलेलीच नाहीत.
आता दुसरा मुद्दा मानसिकतेचा… नाटकात बाईबाईंच्या तोडी एक वाक्य आहे... पूर्वी चितेवर, बसावं लागत होतं. आता नुसत वपन करायचं तर ते ही होत नाही ह्यांच्याच्यानं?..." याला प्रेक्षकातून "खरय" असा एक ठाम उद्गार आला. ‘मुलगी शिकली, अधोगती झाली’ असं मानणारे आणि ते बोलून दाखवणारे अनेक स्त्री-पुरुष आजही आपल्या समाजात खुलेआम वावरतात. नुसते वावरत नाहीत तर सत्ता गाजवतात आणि पैसाही कमावतात. पण मग दुसरा मुद्दा येतो तो 'फक्त आमच्याच वाईट प्रथा का?’ इतर समाज, धर्म यांना दिसत नाहीत का?' प्रश्न योग्य आहे, वाईट प्रथा असण्याचा मक्ता काही फक्त हिंदू धर्माने आणि उच्च जातींनी घेतलेला नाही. इतर धर्मांमधल्या आणि इतर वरच्या-मधल्या-खालच्या जातींमधल्या पूर्वी आणि आजही सर्रास चालणाऱ्या सगळ्या वाईट, जाचक गोष्टी अधोरेखित झाल्याच पाहिजेत, त्यांच्यावरही नाटक सिनेम-कथा-रिल्स बनलीच पाहिजेत.
'करुणाष्टके'मध्ये घरगडी माधोच्या तोंडी एक वाक्य आहे "आमच्यातबी विधवा होतात की बायका पण त्यांचा बाट होत नाही, त्यांचे दुसरे पाट बी लागतात लगेच... कधी कधी वाटतं तुमच्यापरीस आम्ही बरे...".
अशी अजून काही सूचक वाक्यं या नाटकात येऊ शकली असती का? हा तोच काळ होता जेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी एकत्र येत होती. इंग्रजांविरुद्ध, स्वातंत्र्यासाठी आणि समाज सुधारणेसाठी ठोस पावलं उचलत होती. परंतु हा तोही काळ होता जेव्हा महाराष्ट्र आणि संपूर्ण दक्षिण भारतातल्या मुस्लिम महिला या आपापल्या मूळ जातीनुसारच वेशभूषा करत होत्या. सकच्छ किंवा गोल साड्या नेसत होत्या. बुरखे-परदे ही कोंडमारा करणारी उत्तर भारतीय परंपरा इथे नव्हती. हा तो ही काळ होता जेव्हा रुखमाबाई राऊत या सुतार समाजातल्या महिलेने आपल्या नवऱ्याविरुद्ध केस टाकली जिच्यामुळे मुलींच्या लग्नाची वयोमर्यादा कायद्याने वाढवली गेली.
पुढे त्या स्वतंत्र होऊन, इंग्लंडला जाऊन डॉक्टर बनून स्वमर्जीने सन्मानाचं आणि समाजोपयोगी जीवन जगल्या. आणि हा तोही काळ होता जेव्हा बयाबाई, पवळाबाई अशा तमासगीर स्त्रियांनी निव्वळ गल्लीबोळात नाचणं सोडून तमाशाच्या मोठ्या फडात उडी घेतली. बाईचं नाचगाणं जे केवळ खाजगी बैठकांत किंवा छोट्या प्रमाणावर गल्लीबोळात बघायला मिळत होतं, त्याला एक वेगळा, मोठा रंगमंच लाभला. एक कलाकार म्हणून बायकांची नावं लोकप्रिय होऊ लागली. याचा अर्थ त्यांना मोठी प्रतिष्ठा होती का? निश्चितच नाही. ती तर आजही नाहीये. त्यांच्या कहाण्यांमध्ये संघर्ष आहे, शोषण आहे पण एक नवीन वाट आहे, ओळख आहे, अभिव्यक्ती आहे. तो काळ उभा करायचा तर या सगळ्या लहानमोठ्या, बऱ्यावाईट कहाण्या पुढे येणंही आवश्यक आहे.

आजच्या उजव्या-डाव्या कट्टरतेच्या युगात प्रत्येकजण समोरच्याकडे संशयाने पाहतोय. समोरच्याची प्रत्येक कृती आपल्याला सोयीस्कर भिंगातून पाहिली जातेय आणि तिच्यावर हल्ला केला जातोय. हा द्वेष, हा विखार, ही फूट जाणीवपूर्वक वाढवली जातेय. अशा वेळेस वाईटाला वाईट म्हणण्यासाठी जे धैर्य लागतं ते या नाटकाची संपूर्ण टीम आणि मुख्य म्हणजे निर्माते प्रसाद कांबळी यांनी दाखवलय. त्यासाठी त्यांना सलाम!
लाल आलवणातल्या बायका मराठी प्रेक्षकांसाठी नव्या नाहीत. अनेक बऱ्या-वाईट कलाकृतीतून त्या दिसत आल्यायत. त्यांचे ठराविक हावभाव, देहबोली, भाषा प्रेक्षकानाही पाठ झाली असेल. पण त्यांच्याच मध्यवर्ती भूमिका आणि त्याही एक-दोन नाही तर सात असं क्वचितच झालंय. सामान्यतः केलं जातं तसं त्यांच्या दुःखाचं यात उदात्तीकरण नाही, कुरवाळणं नाही तर त्यापलीकडे जाणं आहे. आपलेच चेहरे दाखवणारा एक आरसा या नाटकात आहे. त्यात स्वतःला निरखणं तर आपल्या हाती आहे ना?
आजच्या या, एकाच वेळेस अतिवेगवान आणि दुसऱ्या बाजूने ठप्प झालेल्या विचित्र युगात राजकीय चष्म्यापल्याडची माणुसकीची नाती जपली गेली पाहिजेत. त्यासाठी एकमेकांना भेटणं, बोलणं, चर्चा करणं, वाद घालणं, नाटकं पाहणं, त्यावर बरं-वाईट लिहीणं झालं पाहिजे. शेवटी सुधारणेच्या दिशेने पहिलं पाऊल उचलणं गरजेचं आहे. कारण सिंधुसारखं आपलं सुख आपल्यालाच शोधायचं आहे आणि दुर्गा म्हणते तसं चालायला लागलं की वाट आपोआप उमटते. आज दीडशे वर्षांनंतर तर ही वाट बरीच सोपी झाली असेल ना?
(भूषण कोरगावकर हे तरुण पिढीचे लेखक आहेत.)






