आशिष यावले
- नेवरेंच्या कृष्ण-धवल छायाचित्रांमध्ये सौंदर्यदृष्टी आणि जीवनातील वेदना/संघर्ष यांचा समन्वय दिसतो.
- शेतकऱ्यांचे जीवन, नैसर्गिक आपत्ती, कर्जबाजारीपणा आणि अन्याय यांचा प्रभाव त्यांच्या कलाकृतींमध्ये स्पष्टपणे दिसतो.
- डबल एक्स्पोजर, लो-कॉन्ट्रास्ट, छाया-प्रकाशाचे संतुलन आणि प्रतीकात्मक घटकांचा वापर करून नेवरेंने कलाकृतींना भावनिक आणि सामाजिक प्रभाव दिला आहे.
कला उन्मुक्त असते. ती कधी सौंदर्य निर्माण करते, तर कधी उद्विग्नता उघड करते; कधी अस्थैर्य पसरवते, तर कधी समाजालाही प्रश्न विचारते. सौंदर्य व उद्विग्नता या दोन्ही भावना भिन्न असल्या, तरी कलेत त्या एकत्र येऊन अधिक तीव्र आणि थेट परिणाम घडवू शकतात. त्यामुळे कला ही केवळ अभिव्यक्तीसाठी नसून विचारांना दिशा देणारी आणि भावनांना स्पर्श करणारी सजीव प्रक्रिया आहे.
सौंदर्यदृष्टी व प्रकाश-छायेच्या विरोधातून कष्टकऱ्यांच्या जीवनातील वास्तव टिपणारा संवेदनशील, सर्जनशील व कृतिशील प्रकाशचित्रकार म्हणून नानू नेवरेंनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. नेवरेंनी टिपलेल्या कृष्ण-धवल प्रकाशचित्रांत कथानकासोबत एक सशक्त दृश्यभाषा असते. ती चित्रे केवळ कलाकृतीपुरती मर्यादित न राहता त्या चित्रांतून सौंदर्याभिरुचीचे हृदयस्पर्शी आक्रंदन प्रकट होते. त्या आक्रंदनातून एक मूलभूत व मूलगामी मूल्यसंघर्ष अधोरेखित होतो. तो संघर्ष अस्वस्थतेचा वेध घेतो. ती अस्वस्थता माणसाला जागे करते. सत्य, संघर्ष आणि विवेकाकडे पाहायला शिकवते.
कुणावरही अन्याय झाला तरी, नेवरेंच्या छायाप्रतिभेच्या स्वभावाला दुःखाच्या, आक्रंदनाच्या हाका ऐकायला येतात. त्या यातनांतून निर्माण झालेली उद्विग्नता, कोलाहल नाट्यमयरीत्या प्रकाशचित्रांच्या माध्यमातून प्रकट होऊ लागते. त्यासाठी नेवरे आपल्या कलाकृतीत तांत्रिक व भावनिक घटकांचा समन्वय साधतात. नव्या प्रतीकांचा प्रभावी वापर करून, पारंपरिक मिथकांची आधुनिक काळाशी सुसंगत अशी मांडणी करतात. जुन्या मिथकांना समकालीन वास्तवाशी जोडून नवा आशय, नवी दिशा आणि व्यापक संदर्भ उपलब्ध करून देतात.
शेतकऱ्यांचे विषण्ण करणारे जगणे आणि त्यांच्या प्रश्नांविषयीचा उद्रेक नेवरेंनी 'माझा शेतकरी' या वास्तववादाकडून अतिवास्तववादाकडे जाणाऱ्या मोनोटोनस 'ब्लॅक अँड व्हाईट' प्रकाशचित्र मालिकेतून उलगडून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. त्या कलाकृतींचे प्रदर्शन नांदेड येथील २० व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलन परीसरातील स्व. नयन बाराहाते कलादालनात भरविण्यात आले आहे.
मदर इंडिया
एकमेकांत मिसळलेली, अनेक दृश्ये असलेली ‘मदर इंडिया’ ही प्रतिमा मल्टीपल एक्स्पोजर तंत्राने तयार केली आहे. प्रतिमेतील ‘स्त्री’ची आकृती तिच्या जगण्यातील अंतर्गत संघर्ष आणि अस्थिरता विशद करते. संकटाशी लढणाऱ्या ‘स्त्री’चा त्याग आणि सामर्थ्य दर्शविण्यासाठी पार्श्वभूमीवरील पाण्याच्या लाटांवर बंडीचे चाक एक्सपोज केले आहे. तर शेतकऱ्यांचे संघर्षमय जीवन अधोरेखित करण्यासाठी दुष्काळग्रस्त स्थिती आणि नागर दाखविले आहे. 'स्त्री' प्रतिमेला लो-कॉन्ट्रास्ट ॲम्बियंट प्रकाशात टिपल्यामुळे टोनल बॅलन्स नियंत्रित आहे. लो-अँगल सिल्हूट व पर्सपेक्टिव्ह रचना असलेली ही कलाकृती ‘कन्सेप्टच्युअल आर्ट फोटोग्राफी' शैलीचा उत्तम नमुना आहे.
दुभंग
‘दुभंग’ या कलाकृतीत शेतकऱ्यांच्या आयुष्यातील आव्हानांचे प्रतीक म्हणून दुष्काळ व महापूर यांचे प्रभावी चित्रण करण्यात आले आहे. प्रकाशचित्रातील विस्कटलेल्या आयुष्याच्या अर्धवट रेषा, अपूर्ण आकृती व छाया-प्रकाशातील ताणतणाव हे शेतकऱ्यांच्या अस्वस्थ वर्तमानामागील आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय घटक कारणीभूत असल्याचे सूचित करतात. विशेषतः शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर ओव्हरलॅप केलेले कोरड्या जमिनीच्या तड्याचे टेक्स्चर, डोळ्याखालील तीक्ष्ण सावली, त्वचेचा पोत, भाव आणि पार्श्वभूमीतील पाण्याच्या लहरींमुळे प्रतिमेत उत्तम परिणाम साधता आला. छाया-प्रकाशाचे प्रमाणबद्ध विभाजन केल्यामुळे प्रकाशचित्राचा विषय अधिक प्रभावी झाला आहे. उच्च कॉन्ट्रास्ट व डबल एक्स्पोजरच्या साहाय्याने साकारलेली ही पोर्ट्रेट प्रतिमा आकर्षक आहे.
पीस
तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब व हरियाणातील हजारो शेतकऱ्यांनी दिल्ली येथे प्रदीर्घकाळ ऐतिहासिक आंदोलन केले. संघर्ष कितीही मोठा असला तरी शांतता व सामंजस्यामुळे विजय मिळवता येऊ शकतो; नेवरेंनी याच विचारांची दृश्य अभिव्यक्ती ‘पीस’ या कलाकृतीतून साकारली. शेतकऱ्यांचे जीवन, परंपरा, श्रम आणि संघर्षाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बंडीच्या चाकावर शांततेचे, आशेचे आणि अहिंसेचे प्रतीक म्हणून कबुतर दाखविले आहे. प्रकाश-छायेचे योग्य संतुलन राखत, कबुतराची मध्यवर्ती रचना केल्यामुळे कलाकृतीतील सौंदर्यमूल्य अधिक वाढले आहे. कलात्मक गुणवत्ता आणि नवीन दृश्यरूप देणारी ही प्रतीकात्मक कलाकृती लक्ष वेधून घेते.
कर्णाहुती
"कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर निर्णायक क्षणी कर्णाच्या रथाचे चाक जमिनीत फसते. विवश झालेला कर्ण शस्त्र खाली ठेवून अर्जुनाकडे युद्धविरामाची याचना करतो; मात्र तरीसुद्धा अर्जुन प्रहार करतो आणि कर्णाचा वध होतो.” महाभारतातील या प्रसंगावर आधारित नेवरेंनी ‘कर्णाहुती’ कलाकृती साकारली. जमिनीत फसलेल्या बंङीच्या चाकाला बाहेर काढण्याची वस्त्रविरहित शेतकऱ्याची धडपड, त्याच्या जगण्यातील संघर्ष आणि एकटेपणा कलाकृतीत ठळकपणे जाणवतो.

विशेषतः दुष्काळाचे वास्तव अधोरेखित करण्यासाठी प्रतिमेत खूप जास्त निगेटिव्ह स्पेस सोडण्यात आली आहे; तर दुपारची झळ, उष्णता आणि श्रम या वातावरणनिर्मितीसाठी अतिशय तीव्र नैसर्गिक प्रकाशाचा उपयोग केला आहे. जगण्यासाठीच्या संघर्षाची कथा सांगणारी ही कलाकृती अंतर्मुख करते.
बाप माझा शेतकरी
नैसर्गिक आपत्ती, कर्जबाजारीपणा आणि सततच्या अपमानास्पद जगण्यामुळे हवालदिल झालेला शेतकरी अखेर जीवन संपविण्याचा मार्ग निवडतो. याच आशयाला अनुरूप नेवरेंनी साकारलेली ‘बाप माझा शेतकरी’ ही कलाकृती निःशब्द करणारी आहे. कलाकृतीत बुजगावण्याच्या प्रतीकातून शेतकरी बाप दाखविला आहे.

बाप जिवंत असूनही मनाने मृत झालेल्या जन्मदात्याला मरणापासून रोखण्यासाठी चिमुकल्या लेकीने घट्ट कवटाळले आहे. हृदयस्पर्शी असलेली ही कलाकृती तंत्रदृष्ट्यादेखील तितकीच परिपूर्ण आहे. नैसर्गिक सौम्य प्रकाश, लो-अँगल, सेंटर फ्रेमिंग, प्रॉपर कम्पोझिशन व पार्श्वभूमी धूसर करण्यासाठी मध्यम 'डेफ्थ ऑफ फिल्ड'चा वापर केला आहे. त्यामुळे प्रकाशचित्रात भावनिक, कौटुंबिक व सामाजिक परिणाम सहज साधता आला.
"मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते..."
कवी सुरेश भटांच्या रचनेतील ओळीचा संदर्भ घेऊन साकारलेली एकमेव रंगीत कलाकृती या प्रदर्शनात आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्यास भाग पाडणारी ही कलाकृती जीवन-मरणाच्या सीमारेषेवरील धूसर अवस्था सूचित करते. कलाकृतीतील रचना व मांडणीच्या दृष्टीने केंद्रस्थानी दाखविलेले सरण, जळालेली लाकडे, राख आणि पायांची प्रतिमा विषयाच्या खोलात डोकावण्यासाठी प्रवृत्त करते.
उबदार नारिंगी-लाल रंगछटा, गडद पार्श्वभूमी व कॉन्ट्रास्ट वेदना, निराशा, आग आणि अंधारातील संघर्षाची धार वाढवतात. शेतकऱ्यांची अस्थिर मानसिक अवस्था अधोरेखित करण्यासाठी मोशन ब्लर केले आहे; तर डेप्थ व टेक्स्चरदेखील प्रत्येक घटकांशी सुसंगत आहे. वास्तव आणि अतिवास्तव यांना एकरूप करण्यासाठी डबल एक्सपोजरचा उपयोग केल्यामुळे, कलाकृतीतील सौंदर्यमूल्य अधिक वाढले आहे. सामाजिक वास्तवाचे दाहक प्रतिबिंब दर्शविणारी ही प्रतीकात्मक कलाकृती अत्यंत प्रभावी आणि भावगर्भ आहे.

या प्रदर्शनात खेळ मांडीयला, बालपण, हिज मास्टर व्हाईस, मृत्युदार, टोपीखाली, भूमिपुत्र, जागते रहो, कटपुतली, अगतिक, सावकारी काक, ओला दुष्काळ आणि गाव विकणे आहे. यांसारख्या विविध विषयांची कृष्ण-धवल प्रकाशचित्रे आहेत. त्या सर्व कलाकृतींतून शेतकऱ्यांविषयीच्या नेवरेंच्या अंतर्मनातील संवेदना ठळकपणे सामोरे आलेल्या आहेत.
नेवरेंचा सौंदर्यशास्त्रीय दृष्टिकोन प्रगल्भ आहे. रंगाच्या विचलनाशिवाय कष्टकऱ्यांच्या जीवनाचा सार मांडण्यासाठी आणि प्रतिमेला विशिष्ट उंची देण्यासाठी नेवरेंनी काळ्या-पांढऱ्या रंगांत प्रकाशचित्रण केले. किंबहुना आशा आणि निराशा यांचे प्रतीक असलेले हे दोनच रंग त्यांच्या प्रकाशचित्रांचा केंद्रबिंदू राहीले आहेत. एकूणच नेवरेंनी साकारलेल्या कलाकृतींचे विषय त्यातील प्रतीकात्मक घटक, वास्तववादी प्रतिमा, पार्श्वभूमी, विविध आकार, अवकाश विभाजन, पृष्ठभागाचा सूक्ष्म पोत, अग्रभाग, रचना, मूड व प्राकृतिकता या सर्व घटकांमध्ये छाया-प्रकाशाचे नियंत्रण व त्याच्या योग्य वापरामुळे त्या कलाकृती दृश्यदृष्ट्याच नव्हे तर, भावनिकदृष्ट्यादेखील प्रतिध्वनित होतात. संवादू लागतात.






