- छत्रपती शिवाजी महाराज आणि बहिर्जी नाईक यांनी लपविलेले गुढ! एक रहस्य ज्याची सुरक्षा आजही महाराजांचे आठ शिलेदार जीवाची बाजी लावून करत आहेत. स्वराज्याचा मानबिंदू... बत्तीस मण सुवर्ण सिंहासन ज्यासाठी महाराष्ट्राची अख्खी एक पिढी लढली, ते सिंहासन कुठे असावं? भरभराटीच्या उंचीवर असतानाच लयास गेलेले विजयनगर साम्राज्य आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना जोडणारा 'तो' गुप्त दुवा कोणता?
- राज्याभिषेकानंतर झालेल्या दक्षिण दिग्विजयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाती कोणती गोष्ट लागली होती? तामीळनाडूमधील चिदंबरम मंदिरातील नटराजाची मुर्ती सातशे वर्षांपासून कोणते रहस्य उजागर होण्याची वाट पाहत आहे?
- मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या ‘ग्रॅंडफादर्स क्लॉक’ किंवा ‘8 डे क्लॉक’ या घड्याळीचा याच्याशी काय संबंध? छत्रपती शिवाजी महाराज आणि ‘आठ’ या अंकाचा नेमका काय संबंध आहे?
- राजभवनात एका ब्रिटीश अधिकाऱ्याने सव्वाशे वर्षांपूर्वी कोणती मौल्यवान वस्तू भिंतीत लपवून ठेवली आहे? राजभवनच्या खाली भुयारात नेमकं कोणतं रहस्य काळाने दडवून ठेवलं आहे? बहिर्जींनी आठ शिलेदारांच्या हाती सोपविलेली ‘ती चावी’ कुठे आहे? बारा वर्षापूर्वी मंत्रालयाला लागलेल्या आगीत कोणतं कागद अर्धवट जळालं... आणि काय मजकूर होता ज्याने अख्खी कहाणी बदलली?
- छत्रपती शिवाजी महाराजांकडील जगदंबा तलवारीवर तीन वेळेस कोरलेले ‘IHS’ हे इंग्रजी शब्द कोणते रहस्य बाळगून आहेत?
अशा शेकडो गूढ प्रश्नांची उत्तरे म्हणजे ‘प्रतिपश्चंद्र’... गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईकांचे आजवर कधीही बाहेर न आलेले रूप, कल्पनाशक्ती आणि अचूक नियोजाचा संगम म्हणजे ‘प्रतिपश्चंद्र’...
इतिसातील घटना आणि त्याभोवती गुंफलेली लेखकाची अफाट कल्पनाशक्ती, तितकेच प्रबळ प्रत्येक पात्र, ओघवती भाषा, वेगवान घटनाक्रम, डोके बधीर करून टाकणारे सस्पेन्स, अद्भुत निसर्गवर्णन आणि अचूक आयुष्याचे तत्वज्ञान… एक अद्भुत मिश्रण असलेली अलीकडच्या काळातली सर्वाधिक लोकप्रिय अशी डॉ. प्रकाश कोयाडे या तरुण लेखकाने लिहिलेली कादंबरी म्हणजे ‘प्रतिपश्चंद्र’...
'द सीक्रेट ऑफ द शिलेदार्स’
सीरिजचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी असे म्हटले की, 'द सीक्रेट ऑफ शिलेदार्स' त्यांच्यासाठी खूप खास आहे. एक महाराष्ट्रीय म्हणून ही सीरिज त्यांच्या हृदयाच्या जवळची आहे कारण मराठ्यांचे धैर्य आणि बलिदान पडद्यावर आणण्याचा हा त्यांचा मार्ग आहे. ते म्हणाले की डॉ. प्रकाश कोयाडे यांची 'प्रतिपश्चंद्र' ही कादंबरी त्यांची आवडती कादंबरी आहे.
आता डिज्नी प्लस हॉटस्टार आणि दशमी क्रिएशन्स यांच्या सहकार्याने या कादंबरीचे सीरिजमध्ये रुपांतर करणे हा एक उत्तम अनुभव होता. त्यांनी म्हटले की, ही सीरिज आधुनिक जगात घडते, पण ती इतिहासात रमलेली आहे. धाडस, साहस आणि खजिन्याच्या शोधाने भरलेली ही कहाणी तुम्हाला तुमच्या जागेवरून उठू देणार नाही.
फक्त "शिवाजी" हे नाव कधीही, कुठेही ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येणारी पहिली प्रतिमा एकच, आपल्या मनात येणारे पहिले विचार एकच ते म्हणजे "छत्रपती शिवाजी महाराज" यांचे. या नावात जादूच अशी आहे की आजही अगदी 350 वर्षांनंतरसुद्धा त्यांच्याबद्दल काहीही लिहिलं गेलं तरी ते आपल्याला वाचण्याचा मोह होतोच, अगदी लहानपणापासून आपण त्यांच्या पराक्रमाच्या, शौर्याच्या गोष्टी ऐकत आलो असलो तरी आजही प्रत्येकवेळी त्या ऐकताना, वाचताना ऊर अभिमानाने भरून येतो.
डॉ. प्रकाश कोयाडे यांनी लिहिलेली कादंबरी "प्रतिपश्चंद्र"
शिवरायांच्या नंतर आणि त्यांच्या आधीही अनेक राजे होऊन गेले पण त्यांपैकी किती राजे लोकांच्या आठवणीत आहेत हा एक प्रश्नच आहे. शिवरायांचं एक महान राजा म्हणून असणारं स्थान जितकं त्यांच्या पराक्रम आणि कर्तृत्वामुळे आहे तितकंच किंवा त्याहून थोडं जास्तच ते त्यांच्या चारित्र्यामुळे आहे. अशा या चारित्र्यसंपन्न, पराक्रमी, कर्तृत्ववान राजाच्या आयुष्यावर आजवर अनेक पुस्तके लिहीली गेली, अनेक रहस्यकथा, चित्रपट, कादंबऱ्या लोकांपर्यंत पोहचल्या आणि तरीही समुद्रातून कितीही काढून घेतले तरी कमी न होणाऱ्या पाण्यासारख्या त्यांच्या आयुष्यातील एक एक घटना, पराक्रम आजही लोकांसमोर येतच असतात.
लेखक प्रकाश कोयडे
शिवरायांच्या आयुष्यात घडलेल्या अशाच एका घटनेचा संदर्भ घेऊन डॉ. प्रकाश कोयाडे यांनी लिहिलेली ही कादंबरी "प्रतिपश्चंद्र". जरी शिवरायांच्या आयुष्यातील घडलेल्या एका घटनेची पार्श्वभूमी या पुस्तकाला असली तरी "प्रतिपश्चंद्र" हा काही इतिहास नाही तर इतिहासातील काही दुवे घेऊन रचलेली एक काल्पनिक रहस्यकथा आहे. इतिहासाला थोडाही धक्का न लावता लेखकाचा हा एक कल्पना अविष्कार आहे. "प्रतिपश्चंद्र" जशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारीत आहे तशीच ती १३ व्या शतकापासून ते २१ व्या शतकाच्या कालखंडात आपल्या भारत भूमीवर घडलेल्या इतिहासाचे धागे पकडून त्याला कल्पनेची जोड देऊन तयार झालेली एक रहस्यमय कादंबरी आहे. ही कादंबरी म्हणजे कहाणी आहे, छत्रपती शिवरायांच्या 32 मणी सुवर्ण सिंहासनाच्या थरारक, रोमांचक शोधाची आणि त्याबरोबरच दक्षिण भारतातील विजयनगर साम्राज्याचा प्रचंड खजिना जो शिवाजी महाराजांनी संरक्षणाची हमी देऊन बहिर्जी नाईक आणि त्यांच्या शिलेदारांमार्फत ३५० वर्षें वाईट लोकांपासून सुरक्षित ठेवला त्या खजिन्यापर्यंत पोहचण्याचा थरारक, रोमांचक प्रवास म्हणजे ही कादंबरी "प्रतिपश्चंद्र".
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईक यांनी राजमुद्रेमध्ये लपवलेले एक रहस्य, जे 350 वर्षांपासून बाहेर येण्याची वाट पाहत आहे आणि ते रहस्य उलगडण्यासाठी केलेला थरारक प्रवास म्हणजे ही कादंबरी "प्रतिपश्चंद्र". विजयनगर साम्राज्याचा प्रचंड खजिना शोधण्यासाठी सुरू झालेला या कादंबरीचा प्रवास 4 दिवसानंतर त्या खजिन्यासोबतच शिवरायांच्या 32 मण सुवर्णसिंहासनाच्या शोधाने संपतो.
कोणत्याही रहस्यकादंबरीमध्ये वाचकाने हरवून जाण्यासाठी लेखकाकडून लिहिल्या जाणाऱ्या कथेला एक असं व्यासपीठ लागतं जिथे वाचत असताना वाचकांच्या मनामध्ये पानापानावर प्रश्नचिन्हांची एक साखळी उभी रहावी, वाचक त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या प्रयत्नात असतानाच एक भांबावून सोडणारा धक्का बसावा आणि त्या धक्क्यातून बाहेर येण्याच्या आतच त्याच्यासमोर होणारा रहस्याचा उलगडा. डॉ. कोयाडे यांची अतिशय थरारक घटनांच्या मालिकेतून पुढे सरकणारी "प्रतिपश्चंद्र" ही कादंबरी म्हणजे अशी बरीच प्रशचिन्हे, रहस्ये आणि एकामागून एक बसणारे धक्के यांनी खचाखच भरलेलं एक व्यासपीठच आहे जिथे वाचक थक्क होऊन हरवून जातो.
"प्रतिपश्चंद्र" कादंबरीचा नेमका प्लॉट काय आहे?
डॉ. रवीकुमार हा या कथेचा नायक. कथेचा नायक एक हुशार तरुण, डॉक्टर, अतिशय श्रीमंत कुटुंबात जन्मलेला, अगदी मजेत आयुष्य जगणारा एक तरुण. नागपूरहून एका डॉक्टर परिषदेसाठी छ. संभाजी नगरला आपला मित्र आदित्यला सोबत घेऊन आलेला रवी एक दिवस अनपेक्षितपणे एका भोवऱ्यात अडकतो, कादंबरीच्या सुरुवातीलाच तो एका रहस्यात अडकतो पण एकटा नाही तर एक वाचक म्हणून आपल्याला सोबत घेऊनच.
पुढे पानापानावर मिळणाऱ्या सांकेतिक संकेतांचे अर्थ शोधत रवीचा आदित्यसोबत एक थरारक प्रवास सुरु होतो आणि पुढच्या 4 दिवसांच्या या सर्व प्रवासात आपण एक वाचक म्हणून त्यांच्यासोबतच प्रवास करत राहतो, अगदी शेवटच्या पानापर्यंत. कारण अनपेक्षितपणे सुरू झालेल्या या प्रवासाचे रहस्य उलगडणे जेवढी नायकाची गरज आहे तेवढीच एक वाचक म्हणून आपलीही होऊन जाते.
या सर्व थरारक प्रवासासोबत पुढे सरकणाऱ्या या कथेमध्ये अधून मधून इतिहासात डोकावून तिथले संदर्भ देत असताना कोयाडे यांनी वाचक कुठेही न हरवता, त्याचा कुठेही गोंधळ न उडता तो कथेसोबतच जोडला राहील याची पुरेपूर काळजी घेतली आहे.
या थरारक घटनांना असणारी ऐतिहासिक पार्श्वभूमी समजावून सांगण्यासाठी इतिहासात डोकावत असताना बऱ्याच गोष्टींची अगदी सविस्तर माहितीसुद्धा लेखकाने कादंबरीमध्ये दिलेली आहे जसे भारतातील प्राचीन वैभव, विजयनगर साम्राज्य आणि त्यांचा इतिहास, हम्पी आणि त्याठिकाणची प्रसिद्ध स्थळे, प्राचीन गडकिल्ले, वेरुळच्या लेण्या, जगप्रसिद्ध कैलास मंदिर, चिंदबरम येथील नटराजाची मुर्ती, मुंबई - औरंगाबाद शहर, निळावंती ग्रंथ, ऐतिहासिक सांकेतिक भाषा, गौतम बुद्ध, प्राचीन शिल्पकला, घृष्णेश्वर मंदिर, शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय, छत्रपती शिवाजी महाराजांची दक्षिण दिग्विजय मोहीम, महाराजांचे सुवर्णसिंहासन, बहिर्जी नाईक यांची बुद्धिमत्ता आणि बरंच काही. फक्त इतिहास व रहस्य या मध्ये अडकून न राहता एक सुंदर प्रवास वर्णनसुद्धा कादंबरीमध्ये आहे.
यासोबतच नायकाला या थरारक प्रवासात साथ देणारे आदित्य, प्रियल, प्रशिक, ज्योती आणि सुर्यकांतराव यांची श्रद्धा, देव,भक्ती, आस्तिक - नास्तिक, ग्रह, तारे, ते अगदी विष्णूचा दशावतार आणि डार्विनच्या मानवाच्या उत्क्रांतीच्या सिद्धांतापर्यंत अगदी सोप्या भाषेत रवीसोबत होणारी चर्चा वाचकाच्या ज्ञानात नक्कीच भर घालते.
नायकाला शेवटपर्यंत साथ देणारा त्याचा मित्र आदित्य आणि त्यांचे सवांद लाजवाब आहेत. कादंबरी वाचायला चालू केल्यानंतर पुढे काय होणार या उत्सुकतेमुळे ती पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवणे अवघड आहे.
शेवटी सापडलेल्या त्या अफाट खजिन्यात रवीला जेव्हा जरीकापडात गुंडाळलेली महाराजांची कवड्यांची माळ आणि भगवा नजरेस पडतो तेव्हा रवीसोबतच एक वाचक म्हणून अभिमानाने आपलाही ऊर भरून नाही आला तरच नवल. खजिन्यापाठोपाठ सापडलेल्या महाराजांच्या सुवर्णसिंहासनावर कवड्यांची माळ अर्पण करून होणारा या कथेचा शेवट.
हातात पडलेल्या कवड्यांच्या माळेसमोर त्या अफाट खजिन्यालासुद्धा तुच्छ माननारा रवी हेच सिद्ध करतो की आज 350 वर्षें होऊनपण महाराजांबद्दल असणारा अभिमान, आदर थोडाही कमी झालेला नाही. आणि याचे कारण म्हणजे, शिवनेरीहून सुरू होऊन रायगडावर शेवट झालेला तो केवळ शरीराचा प्रवास कधीच नव्हता. शिवराय हा एक विचारांचा प्रवास आहे ज्याचा शेवट कधीच नाही होऊ शकत.
(संदर्भ - pustakpareechay.blogspot.com, लेखक संदीप प्रकाश जाधव)






