मराठीच काय, पण इंग्रजीसह भारतातील कित्येक भाषात गुरुदत्त या कलाकारावर विविध प्रकारे लेखन झाले असून असा मान मिळविणार्यामध्ये जे कुणी मूठभर आहेत त्यात गुरुदत्तचा फार वरचा क्रम लागेल. मराठीतही ज्येष्ठ साहित्यिक भाऊ पाध्ये, नामवंत समीक्षक अरुण खोपकर, लेखक शशीकांत किणीकर, तसेच स्फुट लेखन करणारे अंजन कुलकर्णी यानी हा विषय घेऊन पुस्तकरुपाने ते प्रसिद्धही केले आहे.
इथल्या जवळपास सर्वच रसिक सदस्यांना गुरुदत्तविषयी कसली ना कसली तरी माहिती आहेच असे जर विधान मी केले तर त्यात अतिशयोक्ती असणार नाही, इतके आपले भावविश्व या नावाने व्यापले आहे. चित्रपट या माध्यमाकडे गांभीर्याने पाहणार्या गुरुदत्त यांच्यावर इंग्लिशमध्ये सहा-सात पुस्तके आहेत. यातील नसरीन मुन्नी कबीर यांनी गुरुदत्त यांच्यावर पीएच. डी. केली आहे.
माझ्या जन्मवर्षात (1956) गुरुदत्तने दिग्दर्शित केलेला देव आनंद, वहिदा रेहमान अभिनित 'सी.आय.डी.' प्रदर्शीत झाला होता ही माहिती शिक्षिका असलेल्या माझ्या थोरल्या बहिणीने मला पुढे सांगितली. तर त्याच्या आदल्याच वर्षी (1955) मध्ये खुद्द गुरुदत्त नायक आणि स्वर्गसुंदरी मधुबाला यांचा नर्मविनोदी 'मि.अॅण्ड मिसेस 55' हा बॉक्स ऑफिस हिट झळकला होता अशीही हळूहळू चित्रपटविषयक माहितीत भर पडत गेली.

हायस्कूल कॉलेजच्या वर्षात गुरुदत्तचे चित्रपट नव्याने थिएटर्समध्ये आले नाहीत. 10 ऑक्टोबर 1964 रोजी भंगलेल्या मनःस्थितीत त्याने जीवनाचा शेवट करून घेतला होता. पण त्यामुळे झाले असे की 1965 पासून पुढे जवळपास तीनचार वर्षे कोल्हापूरातील पद्मा, राजाराम आणि व्हीनस (व्हीनसचे मालक अन्वरभाई बोहरी तर जॉनी वॉकरचे नातेवाईक असल्याने त्यांच्या गुरुदत्तसमवेत काही बैठकाही झाल्या होता.
त्यांच्याकडील फोटो कलेक्शन पुढे आम्ही पाहिलेही होते) या थिएटर्समधून गुरुदत्त यांचे जवळपास सर्वच चित्रपट 'री-रन' ला प्रदर्शित झाले अन् तेही 50 पैसे सवलतीच्या दरात. त्या प्रसंगी मात्र आम्ही 'गुरुदत्त' पाहणे सुरू केले. अर्थात ते शालेय वय नेमक्या कोणत्या भूमिकेतून आम्ही ते चित्रपट पाहतोय हे समजण्याच्या पलिकडील होते.
तरीही 'प्यासा' आणि 'कागझ के फूल' ही दोन चित्ररत्ने 'काहीतरी वेगळे सांगत आहेत' असा विचार आमच्या मनावर ठसविण्यात यशस्वी झाली. पुढे इंग्रजी चित्रपटांचा 'भयंकर' म्हणावा असा नाद लागल्यावर पडद्यावर जे दिसते त्याहीपलिकडे चित्रपटातून दिग्दर्शकाला, पटकथाकाराला, गीतकाराला, कॅमेरामनला काही सांगायचे असते ही जाण मनी रुढ होत गेली. कोल्हापूरातील 'चित्रपटमय' वातावरणही त्याला कारणीभूत होतेच.
टीएफटी युनिट स्थापन झाल्यावर वेळोवेळी मग दसरा चौकातील शाहू सभागृहात विविध विषयावर 'चित्रपट महोत्सव' भरत गेले, तीमध्ये सत्यजीत रे यांच्या जोडीने गुरुदत्त असणे अगदी अपरिहार्यच झाले होते. व्याख्यानेही झडत या विषयावर. कॉलेजजीवनापासून मात्र गुरुदत्त व्यक्तीविषयी खोलवर माहिती करून घेण्यास सुरुवात झाली....
आणि काळाच्या पुढे जाऊन आपली प्रतिभा सिद्ध करणारा हा कलाकार खर्या अर्थाने मनस्वी कलाकार कसा होता याचा अभ्यास करण्याचा छंदच लागला. मित्रही तसल्याच विश्वात रममाण होणारे असल्याने चर्चामाध्यमासाठी हा विषय असणे क्रमप्राप्तच झाले.
गुरुदत्तला हयातीत जास्त प्रसिद्धी मिळाली की त्याच्या मृत्युनंतर ?
गुरुदत्तला त्याच्या हयातीत जास्त प्रसिद्धी मिळाली की त्याच्या मृत्युनंतर ? हा प्रश्न नेहमी समीक्षक आणि रसिकांसमोर येतो. त्याला कारण म्हणजे त्याने जे चित्रपट निर्माण केले त्यातील सत्य त्या काळात पचनी पडणे कठीण गेले, पण पुढे कालौघात त्या चित्रपटांना असे काही महत्व प्राप्त झाले की जो 'प्यासा' पाहिल्यावर दिलीपकुमारने 'बरे झाले, मी यात विजय साकारला नाही...' असे पळपुटे उदगार काढले होते, तोच 'प्यासा' टाईम मॅगेझिनने शतकातील 100 उत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत झळकवला....

साल होते 2005. म्हणजे 1957 मधील निर्मिती ही जगभर मान्यता पावण्यासाठी जवळपास पन्नास वर्षे वाट पाहते, याचाच दुसरा अर्थ की गुरुदत्तची क्षमता त्याच्या काळातील प्रेक्षकांना न पेलणारी अशीच होती. पाठोपाठ 1959 च्या अत्यंत कलात्मक म्हणून गौरविल्या गेलेल्या 'कागझ के फूल' चे.
आजही आशुतोष गोवारीकर, संजय लीला भन्साळी, रामगोपाल वर्मा आदी बिनीचे दिग्दर्शक त्यांची जडणघडण गुरुदत्तच्या याच दोन चित्रपटांवर झाली असे जाहीरपणे मुलाखतीत सांगतात त्यावरून या चित्रपटांचे कालातीत महत्व लक्षात यावे.
पण दुर्दैवाने चित्रपटाची रीळे फिरतात ती ऑपरेटरच्या हातावर नव्हे तर निर्मात्याच्या बॅन्क बॅलन्सवर. सापाच्या आतड्यासारखी विखारी आहे चित्रपटसृष्टी. इथल्या बाजारात पैसा ओतणार्याला समीक्षकांनी रविवारच्या आवृत्तीमध्ये चित्रपटाविषयी काय लिहिले आहे हे वाचण्याची गरज पडत नाही, त्याना गरज असते ती तिकीट खिडकीत असलेल्या शोचार्टवर किती फुल्या पडल्या आहेत.
त्या पाहणे. पोस्टरवरील मधुबालेच्या वेड लावणार्या हास्यापेक्षा निर्मात्याला 'हाऊस फुल्ल' चा बोर्ड जादा मोहक वाटतो. पैशाशिवाय स्टुडिओतील बेलमनदेखील बेल वाजवीत नाही तर मग चित्रपट निर्मितीसाठी लागणार्या अवाढव्य खर्चाच्या बाजू पाहण्यासाठी दिग्दर्शक कितीही प्रतिभावंत आहे हे सिद्ध झाले असले तरी आर्थिक अपयशाचा त्याच्यावरील शिक्का त्याच्यातील कलात्मकता जाळून टाकण्यास कारणीभूत ठरतो.
मग 1962 चा "साहिब बिवी और गुलाम" असो वा 1961 चा 'चौदहवी का चांद' असो.....बाजारातील व्याख्येनुसार आर्थिकदृष्ट्या अत्यंत यशस्वी गणली गेली, पण स्वतःला 'अपयशी दिग्दर्शक' समजू लागलेल्या गुरुदत्तने या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन अब्रार अलवी आणि एम.सादिक यांच्याकडे जाणीवपूर्वक सोपविले.
एका अर्थी 'गुरुदत्त' नावाचे वादळ जीवनाच्या अखेरच्या पर्वाकडे जात असल्याची ती एक स्पष्ट खूण होती. गुरुदत्त प्रॉड्क्शन्स बॅनर्सचा शेवटचा चित्रपट होता "बहारे फिर भी आयेगी". निम्म्याहून जास्त काम केल्यानंतर गुरुदत्त पुनश्च त्या नैराश्येच्या गर्तेत गेला आणि अटळ असा शेवटही करून घेतला त्याने.
त्यामुळे जरी पुढे 'बहारे...' त्यांच्या धाकट्या भावाने - आत्माराम - पूर्ण करून पडद्यावर आणला तरी लौकिकार्थाने 'चौदहवी का चांद' हाच गुरुदत्तचा स्वत:चा म्हणता येईल असा शेवटचा चित्रपट.
गुरुदत्तच्या प्रणयविश्वातील आणि वैवाहिक जीवनातील नायिका
"चौदहवी का चांद" चित्रपटातील 'चांद....'ने त्याचे खाजगी आयुष्य सर्वार्थाने व्यापले होते आणि शेवटी तो चंद्रमा आपल्या अवकाशात कधीच येणार नाही हे कटुसत्य उमगल्यावर यातील कलाकाराचे तडफडणे त्याच्यातील व्यक्तीला असह्य झाले.

गुरुदत्त + गीता रॉय हे नाते जितके सत्य तितकेच गुरुदत्त + वहिदा रेहमान हेही. रितीरिवाजानुसार गीता रॉय पुढे गीता दत्त झालीही; पण अगदी 1956 पासून ज्या वहिदा रेहमानसमवेत गुरुदत्तचे नाते प्रस्थापित झाले ते त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याच सूरात राहिले. ज्याचा इन्कार वहिदानेही कधी केलेला नाही.
अशा या जादुई कलाकाराचा जन्म झाला 9 जुलै 1925 रोजी बंगलोर (कर्नाटक) येथील पदुकोणे कुटुंबात. वडील शिवशंकर पदुकोणे शाळामास्तर आणि आईदेखील शिक्षिका. मात्र या दोघांनी गुरुदत्तला शालेय शिक्षणासाठी मामाकडे (बी.बी.बेनेगल, श्याम बेनेगलचे आजोबा) कलकत्ता इथे ठेवले आणि कदाचित त्या कारणामुळेच गुरुदत्तच्या निर्मिती क्षमतेवर विचारावर 'बंगाली साहित्य' आणि वातावरणाचा प्रभावी परिणाम दिसून येतो.
अगदी अस्खलीत बंगाली भाषा ते लिहित बोलत आणि वाचत असत. मॅट्रिकनंतर आर्थिक परिस्थिती खराबीच्या कारणामुळे कॉलेज शिक्षण हुकले पण काकांच्या मदतीने पुढील पाच वर्षे अल्मोडास्थित उदय शंकर इंडिया कल्चर सेंटर इथे नृत्य आणि संगीताचे धडे गिरविले. किंबहुना त्यांचे नृत्यकौशल्यच त्याना मुंबईच्या चित्रपटसृष्टीत पाय ठेवण्यासाठी कारणीभूत ठरले.
उदय शंकर यांचे डान्स बॅले व त्यातील कलाकारांना छोटीमोठी कामे मिळत गेली. दुसर्या महायुद्धानंतर चित्रपट निर्मितीवर जी बंधने आली, लायसेन्सराज आले, नियमावली आली तीमुळे मुंबईतील चित्रपटनिर्मितीला चांगलीच खीळ बसली आणि मग खर्या अर्थाने जे निर्माते आणि संस्था टिकल्या त्यांच्याकडील निर्मिती नियमित झाली. पण त्यामुळे असे धडपडणारे कलाकार एकदम बेकारीच्या खाईत गेले.
पडद्यावर सितारे म्हणून चमकणार्या कलाकारांचा उद्या कुठे काम मिळेल याची जर चिंता होती तर मग साध्या नृत्यदिग्दर्शकाला कोण विचारेल ? या विचारात गुरुदत्त आपल्या कलकत्यातील मित्रासमवेत पडलेला असायचा. या मित्रात मोहन सैगल (जे पुढे चित्रनिर्मातादिग्दर्शकही झाले...'अनपढ', 'अपना हाथ जगन्नाथ, 'देवर' आदी), मोनी भट्टाचार्य ("मुझे जीने दो", "उसने कहा था" चे दिग्दर्शक)...हे दोघे होते.
एकत्रच राहत होते तिघे आणि बेकारी दिवसातील या तिघांचा खर्च एकटा गुरुदत्त करी. त्याला किमान वडील आणि मामाकडून थोडेफार आर्थिक सहाय्य होत असे. अशाच बेकारीच्या कालखंडात गुरुदत्तचा परिचय झाला 'मदर इंडिया'नियतकालिकाचे बाबुराव पै. यांच्याशी. फार आदराचे नाव होते पै यांचे चित्रपटसृष्टीत. उदय शंकर बॅलेमुळे पै यांचा त्यातील कलाकारांशी किरकोळ का होईना, परिचय होताच.
गुरुदत्तमध्ये केवळ एक नृत्य दिग्दर्शकापेक्षा आणखीन् काही अधिक आहे हे पै यानी ओळखले होते (त्याला कारण त्या कन्नड युवकाने बंगाली भाषेवर मिळविलेले प्रभुत्व आणि तेथील साहित्याची त्याला झालेली जाण) व त्यानीच मग गुरुदत्तला पुण्याच्या 'प्रभात फिल्म स्टुडिओ' मध्ये नृत्यदिग्दर्शक आणि सहा.चित्रपट दिग्दर्शक या पदावर तीन वर्षाच्या करारावर नियुक्त केले. इथे पुण्यात तर "धडपडणार्यां"चा अड्डाच जमला होता.

गुरुदत्तला इथे भेटले देव आनंद, रेहमान, अब्रार अल्वीसारखे पुढे आयुष्यभर साथ दिलेले मित्र (बलराज साहनीही मित्रात होते, पण बलराज ईप्टाशी जोडले असल्याने त्यांची भेट त्याच जागी होत असे). विश्राम बेडेकरांनी 'लाखाराणी' (1954) च्या दिग्दर्शनात गुरुदत्तला 'असि.सिने.डायरेक्टर' अशा नावाचे श्रेय टायटल्समध्ये दिले.
मला वाटते पडद्यावरील 'डायरेक्टर' या नावाची मोहिनी त्याचा मनी तिथेच स्थिर झाली असणार. कारण प्रभात करार संपल्यानंतर पुढे मुंबईत भेटायच्या आणाभाका झाल्यावर गुरुदत्तने देव आनंदला आपल्या पहिल्या चित्रपटात नायक म्हणून घ्यायचे तर देवने आपल्या पहिल्या निर्मितीसाठी गुरुदत्तकडे दिग्दर्शन सोपवायचे हे ठरले.
इथून पुढे सुरू झाला तो प्रवास "गुरुदत्त" - एक दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून
1. बाझी (1951): 1948 ते 1950 या काळात देव आनंदने हिंदी चित्रपटसृष्टीत नायक म्हणून चांगलेच पाय रोवले आणि एकीकडे राजकपूर हा जसा सर्वसामान्यांच्या सुखदु:खाचा प्रतिनिधी तर दुसरीकडे दिलीपकुमार भग्न हृदयी आणि गंभीर प्रवृत्तीचा नायक म्हणून गाजण्यास सुरुवात झाली, त्याचवेळी देव आनंदने कॉलेजकुमार आणि कन्यका यांच्यात कमालीची लोकप्रियता मिळविण्यास सुरुवात केली होती.
या यशामुळेच त्याने आपला भाऊ चेतन आनंदसमवेत 'नवकेतन' फिल्मकंपनीची स्थापना करून पहिल्या चित्रपटनिर्मितीचीही तयारी केली. पुण्यातील प्रभातमधून बाहेर पडताना आपल्या मित्राला...गुरुदत्तला...दिलेल्या वचनानुसार देव आनंदने नवकेतनच्या 'बाझी' चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी त्याच्यावर सोपविली आणि आतापर्यंत ग्यान मुखर्जीचा सहाय्यक म्हणून काम करणार्या गुरुदत्तचा 'दिग्दर्शक' म्हणून 'बाझी' तयार होऊ लागला.
चित्रपटाच्या नावाप्रमाणे 'जुगार' हे कथानक प्रधान होते आणि बेकारीचे चटके बसलेला एक टॅक्सी ड्रायव्हर - मदन - मित्राच्यासोबतीने अधुनमधून एका जुगारी अड्ड्यावर जात असतो. तिथे त्याची भेट क्लबची कॅबरे डान्सर (गीता बाली) त्याच्या प्रेमात पडते पण मदनला आपल्या क्षयग्रस असलेल्या बहिणीच्या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक त्या खर्चाची तरतूद प्राधान्याने करणे गरजेचे असल्याने तसेच नोकरी नसल्याने अगदी मनाविरुद्ध 'स्टार क्लब'च्या जुगारी टेबलवर बसतो.
विशेष म्हणजे याच क्लबच्या मालकाची डॉक्टर असणारी मुलगी रजनी, मदनच्या बहिणीचे ऑपरेशन करणार असते. रजनीचे काम कल्पना कार्तिकने केले होते....[जी पुढे प्रत्यक्ष जीवनात सौ.देव आनंद बनली]. पुढे हा प्रेमाचा त्रिकोण आणि मग मदनला 'तदबीर से बिगडी हुई तकदीर बना ले...' असे प्रोत्साहन देणारी नीना...तिचा त्या बॉसने खून करणे...तो आळ मदनवर येणे...पुढे खरा खुनी पकडला जाणे, आणि मग त्याच्या बहिणीवर त्या दरम्यान यशस्वी शस्त्रक्रिया करणारी डॉ.रजनी हिने मदनची जेलबाहेर वाट पाहणे...असा सुखान्त.

एक बेकार तरुण, अर्धवेळेचा टॅक्सी ड्रायव्हर आणि त्यातही पैशासाठी जुगारही खेळणारा...ही सारी लक्षणे खरेतर सामाजिकदृष्ट्या नायकाची नव्हेत, पण गुरुदत्तने अशारितीने नायकाला सादर केले की त्या वेळेच्या तरुण पिढीला तो असा काही भावला (त्यातही एक सुशिक्षित तरुणी, जी चक्क डॉक्टर आहे, अशा आवारा टाईप तरुणाच्या प्रेमात पडते हेही आमआदमीला सुखावणारी बाब वाटायची.
'लखपती की छोरी' एका भणंगाच्या प्रेमात हे फॉर्मट जबरदस्ट अपीलिंग ठरले होते त्या काळातील कित्येक चित्रपटात) की गुरुदत्त आणि नवकेतन दोघांनाही कमालीची लोकप्रियता लाभली आणि एक यशस्वी दिग्दर्शक म्हणून गुरुदत्तची कारकिर्दही "बाझी" पासून सुरू झाली.
"टॅक्सी ड्रायव्हर" हे पात्र इतके लोकप्रिय झाले की पुढे चेतन आनंदने देवला घेऊन याच नावाने चित्रपटही निर्माण केला. तोही तितकाच लोकप्रिय ठरला.
पुढेतर टॅक्सी वा कार वा घोडागाडी अशी वाहने गुरुदत्तसाठी 'लकी' शाबीत ठरली की काय असेच वाटावे या रितीने गुरुदत्तने त्यांचा वापर आपल्या चित्रपटातून केला. 'मि.अॅण्ड मिसेस 55' मधील नायक-नायिकेचे संवाद कारमध्येच...'आरपार' मध्ये परत टॅक्सी, चालत्या गाडीतच नायिकेने गाणे म्हणत नायकाचा रुसवा दूर करणे, 'साहिब बिवी और गुलाम' मध्ये बग्गीत 'बिवी' चा निर्घृण खून होणे.
"बाझी" चित्रपटातील गाण्यांच्या रेकॉर्डिंगसमयी गुरुदत्तची गीता रॉय या बंगाली गायिकेशी चांगलीच ओळख झाली. स्वतः गुरुदत्त उत्कृष्ट बंगाली भाषा बोलत असल्याने मग या ओळखीचे प्रेमातही रुपांतर झाले.
पण रॉय फॅमिलीला आपल्या मुलीने बेभरवशाच्या म्हटल्या जाणार्या चित्रपटसृष्टीतील एखाद्या युवकाबरोबर विवाह करावा असे वाटत नसल्याने; "बाझी" आर्थिकदृष्ट्या यशस्वी ठरून आणि गुरुदत्तचे मुंबईत बस्तान बसूनही तो विवाह लागलीच होऊ शकला नाही. तरीही गीता रॉय हिने पुढील दोन वर्षे आपल्या आईवडिलांची मने वळविण्यात घालविली आणि अखेरीस 1953 मध्ये गीता रॉय गीता दत्त झाली.

वयाच्या 15व्या वर्षी गीता रॉयने देशात आपल्या आवाजाने कमालीची लोकप्रियता मिळविली होती. "मेरा सुंदर सपना सपना बीत गया" ह्या 1947 मध्ये आलेल्या 'दो भाई' मधील गाण्यामुळे तिचे नाव सर्व सिनेरसिकांच्या हृदयात बसले होते.
त्या घटकेपासून तिची लोकप्रियता इतकी वाढली होती की गुरुदत्तने जाणीवपूर्वक 'बाझी' च्या शूटिंगचा पहिला सीन गीता रॉयच्या आवाजातील 'तदबीर से बिगडे हुई तकदीर बना ले' या गाण्याने केली होती.
'मेरा सुंदर सपना बीत गया...' ह्यातील दर्दभर्या भावनेमुळे गुरुदत्त त्या आवाजाकडे ओढला गेला आणि गीताच्या दुर्दैवामुळे त्या गीतातील भाव तिच्या प्रत्यक्ष जीवनातही प्रखरतेने उमटला. या जोडप्याचा संसार चारचौघांसारखा सुरू झाला असेच म्हटले पाहिजे. 1954 मध्ये प्रथम पुत्र तरुण तर 1956 मध्ये अरुणचा जन्म झाला तर 1962 मध्ये नीनाचा जन्म.
बाझीची नायिका गीता बाली हिचे पडद्यावर नाव होते 'नीना' आणि गीता बाली ही गुरुदत्त आणि देव आनंद या दोघांचीही अत्यंत खेळकर अशी मैत्रीण होती. खरेतर गीताबाली हिनेच पुढाकार घेऊन गुरुदत्त आणि देव आनंद या दोघांचेही विवाह घडवून आणले होते. त्या मैत्रीची आठवण म्हणून आपल्या मुलीचे नाव गुरुदत्तने 'नीना' असे ठेवले.
जाल [१९५२] : 'बाझी' चित्रपटातील सहनायिका कल्पना कार्तिक हिला गुरुदत्तने त्या चित्रपटात योग्य तो न्याय दिला नाही असे नवकेतनचे दुसरे भागीदार चेतन आनंद यांचे मत पडले होते आणि त्यावरून त्यांचा आणि गुरुदत्तचा सेटवर खटकाही उडाला होता.
देव आनंदने जरी आपल्या मित्राची बाजू घेऊन त्याच्या मर्जीप्रमाणे चित्रपट तयार केला असला तरीही गुरुदत्तने नवकेतनच्या दुसर्या चित्रपटाची जबाबदारी स्वतःकडे न घेता स्वतंत्रपणे चित्रपटनिर्मिती सुरू करण्याचा निर्णय घेतला. मित्राला दिलेल्या वचनाप्रमाणे त्याने आपल्या निर्मितीमध्ये देव आनंद यालाच नायकाची भूमिका दिली. हा चित्रपट होता 'जाल' (जाळे).
नायिका अर्थातच दोन्ही मित्रांची लाडकी मैत्रीण गीताबाली होती. गोव्याच्या ख्रिश्चन कम्युनिटीवर आणि तेथील रितीरिवाजावर बेतलेल्या कथेला नायकाच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची डूब होती. मुंबईहून गोव्यात मुद्दाम स्थायिक झालेला टोनी [देव आनंद] हा सोन्याचा तस्कर आणि दगाबाज प्रवृत्तीचा असूनही मारिया [गीताबाली] त्याच्या प्रेमात पडते आणि टोनीला ओळखणारी तिची मैत्रीण तिला धोक्याची सूचना देऊनही प्रेमाच्या क्षमतेवर विश्वास ठेवणारी मारिया सल्ला न ऐकता टोनीला योग्य मार्गावर कशी आणते, अशी सर्वसाधारण कथा, मग त्यात बाकीचा मसाला होताच. गोव्याच्या सुंदर लोकेशन्सवर थेट तिथे जाऊन चित्रीत केलेला हा खास गोवानीज् टच असलेला चित्रपट.
'गोवा' चांगलाच लोकप्रिय झाला त्या साली. [उत्तर हिंदुस्थानातील सिनेरसिकांना तर 'टोनी, मारिया, लिसा, गोमेझ, सायमन, कार्लो ही ख्रिश्चन नावेच इतकी भावली की त्या भागात त्याकाळी सुरू झालेल्या कित्येक दुकानांना अशी पात्रांची नावे दिली जात होती. उदा. 'टोनी टी हाऊस, मारिया बॅन्गल्स, लिसा सायकल मार्ट]. देव आनंद गीताबाली गीता दत्त हेमंत कुमार एस.डी.बर्मन आणि गुरुदत्त या सर्वांच्या योग्य त्या सहभागाने अगदी हिट ठरला यात नवल नव्हते.
'जाल' मधील हेमंतकुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील "ये रात ये चांदनी फिर कहाँ...सुन जा दिल की दास्ताँ" ही रचना आज 60 वर्षानंतरही ऐकत राहावी अशीच ठरली.
बाझ आणि आरपार : "बाझी" आणि "जाल" या लागोपाठच्या दोन्ही चित्रपटांच्या यशाने सुखावलेल्या गुरुदत्तने मग गीताबाली हिच्या थोरल्या बहिणीच्या भागीदारीत एच.जी.फिल्म्सची स्थापना केली आणि 'बाझ' (ससाणा) या चित्रपटाची घोषणा झाली.
नायिका अर्थातच गीताबाली होतीच पण देव आनंद या चित्रपटासाठी नायक म्हणून उपलब्ध होऊ शकला नाही, त्याला कारण म्हणजे त्याच दरम्यान त्याची देशात वाढलेली लोकप्रियता आणि मग साहजिकच तारखांचा होऊ शकणारा गोंधळ. गुरुदत्तच्या काहीशा अस्वस्थ तापट स्वभावामुळे तो सेटवर सारे तयार आहेत आणि अमुक एक कलाकार शूटिंगसाठी अजून आलेला नाही हे पाहून संतापत असे.
देव आनंद हा तर मित्रच, पण तोही जर दिलेल्या तारखेस वा वेळेत चित्रीकरणास येणार नसेल तर मग त्याला न घेतलेलेच बरे, असा विचार करून मग गुरुदत्तने स्वतःच 'बाझ' चा नायक म्हणून कॅमेर्याला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला.
दुर्दैवाने आजही भारतीय चित्रपटप्रेमींना 'दर्यासारंग' वा समुद्रावरील साहससफारी अशा कथानकावरील चित्रपट भावत नाहीत. दुसरीकडे हॉलीवूडमध्ये अशा "सी अॅडव्हेन्चर्स" सिनेमांना प्रचंड लोकप्रियता लाभत असल्याचे आपण पाहतो. अर्थात त्याला कारण म्हणजे समुद्राशी निगडीत असलेल्या कथानकांना 'स्पेशल इफेक्टस' ची जी साथ लाभते ती हिंदी कलाकृतींना कधीच लाभल्याचा इतिहास नाही.
16व्या शतकातील चाचेगिरी आणि समुद्रावरील राज्य अशा काहीशा धोपट कथानकावर आधारित पोर्तुगीज परंपरेची छाप असलेल्या चित्रपटाचा नायक गुरुदत्त बिलकुल शोभून दिसला नाही. चित्रपट कोसळणार होताच, तसा तो कोसळलाही.
फक्त या चित्रपटामुळे गीता दत्तच्या सल्ल्यावरून गुरुदत्तने ओ.पी.नय्यर याना संगीताची जबाबदारी दिली आणि मग पुढे ओ.पी. आणि गुरुदत्त पक्के दोस्तही बनले. या चित्रपटाचे दुसरे एक वैशिष्ठ्य म्हणजे बद्रुद्दिन काझी या मूळात बेस्टचा कंडक्टर असलेल्या अभिनेत्याच्या नावाचे गुरुदत्तने फिल्मी बारसे केले आणि त्याला नाव दिले "जॉनी वॉकर".
गुरुदत्तच्या खास मित्रापैकी एक असलेला जॉनी वॉकर बाझी आणि जाल मध्येही होताच, पण श्रेयनामावलीत 'बद्रुद्दिन काझी' या नावाने. 'बाझ' पासून तो सर्वत्र लोकप्रिय झाला आणि मग 'जॉनी वॉकर' हे घराघरातील असे काही नाव झाले की, पुढे तर चक्क त्याच्या नावाने सिनेमाही निघाला.
मूळचे नागपूरचे असलेले लेखक अब्रार अल्वी या चित्रपटाच्या दरम्यान गुरुदत्तच्या सहवासात आले आणि गुरुदत्त टीमचे कायमचे सदस्यही बनून गेले; आणि बाझच्या अपयशाने खचलेल्या गुरुदत्तला पुन्हा उत्साहित करण्यासाठी अल्वी यानीच कथा लिहिली 'आरपार'; जी 'गुरुदत्त फिल्म्स' ची स्वत:ची अशी पहिली स्वतंत्र निर्मिती ठरली.
अब्रार अल्वी याना चित्रपटातील अकृत्रिम, पोशाखी, सरंजामशाहीचे द्योतक असणार्या लांबलचक संवादाविषयी अगदी तिटकारा होता. त्याना असे वाटत की चित्रपटातील संवाद ऐकताना प्रेक्षकाला असे वाटत गेले पाहिजे की अरेच्या हे तर मी देखील म्हणू शकतो, माझेच बोल नायक पडद्यावर म्हणत आहे.
'आरपार' चित्रपटाची कथा एका टॅक्सी ड्रायव्हरची नायक कालूची, ज्याने रस्त्यावरील वेगमर्यादा पाळली नाही म्हणून कोर्टाने त्याला शिक्षा ठोठावली आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर त्याचा मालक पुन्हा त्याला टॅक्सी देण्यास नकार देतो. विमनस्क अवस्थेत मुंबईच्या रस्त्यावर भटकत असताना नायिका निक्की (श्यामा) आपल्या बंद पडलेल्या गाडीशेजारी मदतीसाठी उभी असलेली दिसते.
कालू तिची गाडी दुरुस्त करून देतो. पुढे रस्त्यावरील असाच एक बेकार मित्र (जगदीप) याच्या मदतीने तो निक्कीच्या वडिलाच्या मोटार गॅरेजमध्ये तिच्याच शिफारशीवर मॅकॅनिक म्हणून नोकरीस लागतो. निक्की आणि कालूचे प्रेमही त्या दरम्यान फुलू लागते. गॅरेज मालकाला पत्ता लागतो आणि कालूला गचांडी बसते. परत बेकार झालेल्या कालूकडे बॅन्क लुटीसाठी सज्ज झालेल्या एक गॅन्गचे लक्ष जाते आणि लूट पळवून नेण्यासाठी असा एक कुशल ड्रायव्हर त्याना हवाच असल्याने कालूला तसले काम मिळते.
कॅबरे डान्सर (शकिला) त्यातील धोके त्याला सांगते आणि त्यातून बाहेर पडण्यास सहाय्यही करते, पण कालू निक्कीला विसरू शकत नाही हे पाहून मत्सरी झालेली ती डान्सर आपल्या साथिदारांच्या मदतीने निक्कीचे अपहरण करते...मग तिची सुटका, आणि शेवट गोड इ.इ. नेहमीचे कथानक....लखपतीची कन्या आणि चहाला महाग असलेला बेकार तरूण...मग दोघांचे मिलन कसे होईल याची चिंता करणारा थिएटरमधील भारावलेला प्रेक्षक.
गुन्हेगारी पार्श्वभूमीवरील हा चित्रपट गाजलाच अन् त्यातील ओ.पी.नय्यरची सर्वतोमुखी झालेली गाणी..."सुन सुन सुन जालिमा कैसा प्यार कैसी जीत रे..." "हूं अभी मैं जवाँ ऐ दिल...", 'कभी आर कभी पार लागा तीर-ए-नझर"..."मोहब्बत कर लो, जी भर लो, अजी किस ने रोका है, पर बडे गझब की बात है इस मे भि धोका है..." आदी गाणी 'हमेशा जवाँ गीत" गटातीलच आहेत. 'आरपार' च्या अफाट यशात ओपी संगीताचा खर्या अर्थाने सिंहाचा वाटा होता.

या चित्रपटात गुरुदत्त दोन सुंदरींनी मागे लागावे असा 'नायक' म्हणून शोभलाही आणि त्याचा नायक म्हणून आपणच पुढील चित्रपटात काम करावे हा निर्धारही पक्का झाला...पुढील चित्रपट होता 'मि. अॅण्ड मिसेस 55"..आणि त्याच्यासमोर नायिका म्हणून उभी राहणार होती, शुक्राची चांदणी "मधुबाला".
"मि.अॅण्ड मिसेस 55" - आपल्याला अमेरिकेचे नागरिकत्व मिळावे म्हणून धडपडणारी एक युरोपिअन युवती त्यासाठी अमेरिकेतील एका बेकार कलाकाराशी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करते, तेवढ्याच काळापुरते की जोपर्यंत तिला कायद्याने अमेरिकन सिटिझनशिप मिळत नाही तोपर्यंतच.
चाळीसच्या दशकातील एका हॉलीवूड सिनेमातील या कल्पनेवर आधारित अब्रार अल्वी यानी त्यांच्या कॉलेजच्या गॅदरिंगसाठी 'मॉडर्न मॅरेज' नावाचे नाटक लिहिले होते. पुढे त्याची प्रत गुरुदत्तच्या वाचनात आल्यावर या कथेला भारतीय बाज देऊन ती पडद्यावर तशाच मौजमजेत आणली तर प्रेक्षकाला नक्कीच भावेल अशी गुरुदत्तची खात्री झाली.
आणि मग त्यातून साकारली 'मि.अॅण्ड मिसेस 55' चित्रपटाचे कथानक. 'स्त्री ही नेहमी स्वतंत्रच राहिली पाहिजे, तिने पुरुषाची गुलामगिरी पत्करता कामा नये...' असा आधुनिक विचार करणारी सितादेवी (ललिता पवार) आपल्या गर्भश्रीमंत कैलासवासी भावाच्या मुलीने अनिताने लग्न न करताच राहावे याचा प्रयत्न करीत असते.
अनिता (मधुबाला) एका टेनिसपटूच्या प्रेमात आहे, पण तो तिच्यापेक्षा विंबल्डन महत्वाचे मानत असल्याने तिला कसे झिडकारायचे या प्रयत्नात असतानाच तो जॉनी वॉकरची मदत घेतो आणि पुढे अजाणतेपणी अनिता आणि प्रीतम (एक धडपडणारा कार्टून चित्रकार...गुरुदत्त) एकमेकाच्या प्रेमात पडतात; पण ज्यावेळी सितादेवीला कळते की आपल्या स्वर्गीय बंधूने आपली 70 लाखाची इस्टेट अनिताच्या नावावर या अटीवर ठेवली आहे की तिने वयाची 21 वर्षे पूर्ण होताच विवाह केला पाहिजे अन्यथा ती सारी इस्टेट अनाथाश्रमाला दिली जाईल.
इतका पैसा हातचा जाणार म्हणून धास्तावलेल्या सितादेवी 'भाड्याने जावई' आणण्याचे ठरवितात, तो नेमका मिळतो प्रीतम. सुरुवातीला असले काम करणे अपमानास्पद असल्याने प्रीतम नकार देतोच, पण त्या बंगल्यातील अनिताच्या फोटोकडे लक्ष जाताच त्याला समजते की हीच ती जिच्या प्रेमात आपण पडलो आहोत (दोघांची टेनिस कोर्ट आणि थिएटरमध्ये भेट झालेली असतेच).
तो होकार देतो, पण तो पर्यंत त्याला एक सज्जन समजणारी अनिता, प्रीतमने पैशासाठी आपल्याशी 'कॉन्ट्रॅक्ट मॅरेज' केले आहे हे समजल्यावर त्याचा द्वेष तिरस्कार करायला सुरुवात करते, पण प्रीतम आशा न सोडता तिला आपल्या प्रेमानेच कसे जिंकायचे ते ठरवितो आणि त्यात तो यशस्वीही होतो, हे सांगणारी ही हलकीफुलकी कथा. मधुबाला यात नायिका म्हणून अशी काही खुलली आणि देखणेपणाने वावरली तिला तोड नव्हती.
मधुबालेच्या सौंदर्याला साजेशीच अशी गाणी ओ.पी.नय्यर यानी या चित्रपटासाठी दिली. "ठंडी हवा काली घटा आ ही गयी झुमके" हे गीतादत्तचे, "जाने कहाँ मेरा जिगर गया जी.." हे जॉनी वॉकर आणि नूर वर चित्रीत झालेले मजेशीर गाणे (ह्या नूर अभिनेत्रीशीच जॉनी वॉकरने विवाह केला), गुरुदत्तच्या तोंडी असलेले "दिलपर हुवा ऐसा जादू तबियत निखर गई...", गुरुदत्त मधुबाला जोडीचे "चल दिये बंदा नवाझ..." हे खेळकर गाणे...सारी मधुर.
पण या सर्वावर कडी करणारे ठरले ते गीतादत्तचे 'प्रीतम आन मिलो...प्रीतम आन मिलो...दुखिया जिया बुलाये, प्रीतम आन मिलो". मुळात सी.एच.आत्मा याने गायलेल्या या सोलो गीताने ओ.पी.नय्यरला सिनेसृष्टीत नाव तर मिळवून दिले होते पण काम नाही. पुढे गुरुदत्तच्या टीममध्ये सामील झाल्यावर नय्यरना प्रसिद्धी लाभली आणि मग 'मी. अॅण्ड मिसेस 55' साठी त्यानी पुन्हा एकदा हेच 'प्रीतम...' गीत गीतादत्तच्या आवाजात सादर केले, जे मधुबालेच्या भूमिकेशी एकदम तंतोतंत जुळले.
या चित्रपटाच्या आर्थिक यशाने सुखावलेला गुरुदत्त आता हलक्याफुलक्या कथानकाकडून गंभीर वाटू शकणार्या कथांकडे लक्ष देणार होता आणि त्यासाठी त्याला हवा होता एक असा चेहरा की जो गीताबाली आणि मधुबालासारखा प्रसिद्ध नाही, पण गुरुदत्तच्या सहवासात त्या चेहर्याला भरपूर प्रसिद्धी मिळत राहील.
त्याने मग अशा नायिकेचा शोध सुरू केला...अन् ती त्याला मिळाली ते मुंबई दिल्ली कलकत्यात नव्हे तर हैद्राबादमध्ये...नाव होते "वहिदा रेहमान", जी पुढे बनणार होती त्याच्यासाठी 'गुलाबो, शांती, जमीला, जब्बाँ...' आणि जिच्यामुळे त्याचे व्यक्तिगत जीवनही उध्वस्त होणार होते...झालेही.
(साभार - मायबोली)






